Skip to main content

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 05/02/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा एक मॅटर ऑफ फॅक्ट वॄत्तांत. इनिगोयने धागा टाकल्यापसून ते शनिवारपर्यंत धाग्यावर बरीच चर्चा झाली, बरेच प्रतिसाद पडले. त्यातले बहुसंख्य प्रतिसाद न येणार्‍या मंडळींचे असल्याने गवताच्या गंजीतून सुया शोधत बसण्यापेक्षा इनिगोयने येणार्‍या मंडळींना तिला व्य. नि. करायला सांगून यादी बनवली. १६ जणांनी होकार कळवला. पुष्कळ जणांनी 'येत नाही' हे सांगण्यासाठीही व्यनी केल्याने तिथेही गवताची गंजी झालीच. हा कट्टा फिरता कट्टा असणार आहे हे कळल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या. आज फिरता कट्टा म्हणजे पुढचा कट्टा बैठकीचा होणार असे अनुमान बांधून आम्ही यायला होकार दिला. एक दिवस तरी कटकट नाही असं म्हणून बायकोनेही मोठ्या मनाने जायची परवानगी दिली. असा सगळा जंगी बेत जमून आला होता. वाट बघणं सुरू होतं. शेवटी रविवार उजाडला. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी इनिगोय पोचली. ती पोचल्यावर पाचच मिनिटांत मी घरून निघालो. सुदैवाने तिरसिंगराव माणूसघाणे आणि स्टेडियम कॅफे वाला इराणी सोबत असल्याने मी पोहोचेपर्यंत त्यांचा वेळ मजेत गेला. बन-मस्का, पुडिंग, चहावर चहा इत्यादि गोष्टीही मजेत गेल्याचे मला नंतर कळले. स्टेशनवर आम्हाला कस्तुरी आणि प्रास भेटले. सु.झे. ने १५ मिनिटांत पोचतोय असे कळवल्याने आम्ही भेटायच्या ठिकाणाकडे कूच केले. चालता चालता प्रास आणि कस्तुरीने त्यांना माझा ब्लॉग प्रचंड आवडल्याचे सांगितले, खूप कौतूक केलं, मला अगदी कसंसं होईपर्यंत. थोड्यावेळाने ते हीच वाक्य आधी इनियोग (हिचा ब्लॉग नाहीये) आणि नंतर ति.मा.ना सांगतानाही ऐकल्याचा मला भास झाला. आमच्या गप्पांवरून इनिगोय आमच्याजवळच राहत असल्याचा साक्षात्कार झाला. लगेच तिला कोणत्या कारणासाठी पार्टी मागता येईल हा विचारही सुरू झाला. परंतु लगेचच आम्ही बंगळूरी मुक्कामास असतान एका मैत्रीणीने चहासाठी घरी बोलावून चाहासोबत एक मारी बिस्किट देऊन 'माझ्या जन्माच्या पार्टीपासून ते नव्या जॉबच्या पार्टी पर्यंतच्या सगळ्या पार्ट्या फिट्टुस बरं का रे आड्या' अशी घोषणा केल्याचे स्मरले. ह्यावेळी पुन्हा अशी चूक न करण्याचे आणि प्लॅनिंग करून पावलं उचलण्याचे ठरवले आणि उचलेलेली जीभ पुन्हा खाली ठेवली. हुतात्मा चौकात आम्हाला सेंट्रलची मंडळी भेटणार होती. ठरल्यावेळेपेक्षा तासभर जास्त होऊनही ती मंडळी न आल्याने मला उशिरा आल्याची नैतीक टोचणी नेहेमीप्रमाणे लागली नाही. तेव्हढ्यात समोरच्या रस्त्यावरून मोर्चा निघाल्यासारखा प्रचंड गलबला ऐकू आला आणि आम्ही हे ताडले की आले मि.पा.कर. आणि ते खरंच आले. तसे कैक जण एकमेकांना पहिल्यांदाच भेतत होते. पण उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी) चे आम्ही संस्थापक असल्याने त्यातल्या बहुसंख्य जणांना आम्ही सभासद म्हणून ओळखत होतो. पण चारचौघात पहिल्यांदाच भेटताना कॉम्रेड्सनी एकमेकांना ओळख द्यायची नाही असा कमिटीचा नियम असल्याने सगळ्यांनी एकमेकांशी पुन्हा अनौपचारीक ओळख करून घेतली. हळू हळू चालत चालत आम्ही काला घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या दिशेने निघालो. जाता जाता रामदास काका परिसरातल्या जवळ जवळ प्रत्येक इमारतीची बखर आमच्यापुढे उघडत होते. त्याबद्दल लिहायचं म्हणजे वेगळा लेखच लिहावा लागेल. जो मी लिहिणार नाही. कारण माझी इतकी स्मरणशक्ती नाही आणि रामदास काकांना बोलताना ऐकण्याची मजा ते वाचण्यात नाही. ही चालती बोलती एन्सायक्लोपिडीया प्रत्येकानी प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा आहे. चालता फिरता कट्टा आणि मि. पा. कर चालता फिरता कट्टा आणि मि. पा. कर एक इमारत एक इमारत का. घो. आ. फे.पाशी पोचल्यावर एकदाची औपचारीक ओळख परेड झाली आणि कॉम्रेड्स एकमेकांचा चारचौघात ओळख दाखवायला मोकळे झाले. तोवर सु.झे.ही पोचले होते. ओळख परेड ओळख परेड ओळख परेड ओळख परेड ओळख परेड झाल्यावर प्रास आणि कस्तुरी ह्या २ विकेट पडल्या. प्रासने कालच खूप लांबचा प्रवास करून आलेला शिणवटा आणि कस्तुरीने घर ते चर्चगेट प्रवासाचा शिणवटा अशी कारणं दिली. ते गेले आणि देव काका अवतरले. पोलिसांच्या गाडीच्या बॅकड्रॉपवर एक समुहचित्र काढून घेतल्यावर आत जाण्याचा निर्णय झाला आणि मंडळी पांगली. थोड्या वेळाने इथेच भेटायचं आणि जेवायला जायचं असं ठरलं. सगळे आत गेल्यावर सुझे, घा. को. आणि मी उसाचा रस प्यायला गेलो. हाय-प्रोफाईल जत्रा असे आम्ही जिचे अनेक वर्ष वर्णन करत आलो आहोत तो काला घोडा आर्ट फेस्टिव्हल बघायला आम्ही आत शिरकाव केला. बरंच काही बघितलं, फोटू काढले. एकंदरीत वर्षभराचं एकदम चालून घेतलं.काही इंस्टॉलेशन्स खरंच अतिशय सुंदर आयडियाबाज होती. वेगवेगळ्या इंस्टॉलेशन सोबत अनेक गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असलेली अनेक छोटी छोटी दुकानंही दुतर्फा होती. का. घो. आ. फे. - हा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी का. घो. आ. फे. - हा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी का. घो. आ. फे. का. घो. आ. फे. का. घो. आ. फे. मधला काळा बैल - हा सुद्धा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी का. घो. आ. फे. मधला काळा बैल - हा सुद्धा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी आमच्यातल्या एकाने तिथे करू नये ती चूक केलीच. उ. न. क. चा एक महत्त्वाचा नियम त्याने मोडला. त्याने चक्क चक्क बायकोसाठी तिने न सांगता साडी घेतली. तो बाहेर आल्यावर आमच्या चेहेर्‍यावरचे प्रश्नचिन्ह बघून आपण हे काय करून बसलो ह्याचा त्याला साक्षात्कार झाला. आता एकदा हा पायंडा पडल्यावर दर वेळी चढत्या भाजणीत गिफ्ट खरेदी करावे लागणार हे त्याला उमगले आणि तो हताश झाला. तिथल्या तिथे मोबाईलवर उभ्या उभ्या हिमालयात जाणार्‍या गाड्या शोधू लागला. शेवटी सल्ला मसलतीनंतर 'लकी ड्रॉ मधे साडी लागली' असे सांगून त्याने वेळ मारून न्यायची ठरवली. जत्रेत लोकं हरवतात हे माहिती होतं. पण ह्या जत्रेत आपले स.म. सदस्य हरवले. किसन शिंदे साहेब ह्यांनी केव्हा कलटी मारली हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही काही जण बाहेर पडलो आणि इतरांची वाट बघत गप्पा हाणायला लागलो. तेव्हढ्यात मकी ने 'तू बंगळूरूला डाण्याच्या घरात रहायचा का?' असा प्रश्नार्थक बाँब माझ्यावर टाकला. आणि इतकी वर्ष न उलगडलेलं एक कोडं मला सुटलं. बंगळूरूला आल्यावर केवळ वर्षभरातच डाण्याच्या नावावर ५ घरं आणि ७ मोटारी कशा जमल्या ह्याचा पत्ता मला लागला. आमचे परममित्र डान्राव आणि धमालपंत ह्यांचा अतीव आदराने उल्लेख करून आम्ही गप्पा पुढे सुरू ठेवल्या. बंगळूरास मुक्कामी असताना आम्ही सुरू केलेल्या २ महत्त्वाच्या संघटना 'उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी)' आणि 'सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' ह्यांच्या स्मॄतीस उजाळा मिळाला. जुन्या अनेक विषयांना हात घातला गेला. काही विषय नव्याने चघळले गेले. ठरल्यावेळेपेक्षा बर्‍याच वेळाने मंडळी पुन्हा एकत्र आली. 'अरे मी त्या ठिकाणी थांबलो होतो, तुम्ही इथे होतात होय...' असं जवळ जवळ प्रत्येकजण दुसर्‍याला म्हणत होता. शेवटी एकदाचे सगळे पुन्हा जमल्यावर खिशाला ब्लेड न मारणार्‍या हॉटेलात जायचे ठरले. जेवण म्हटल्यावर पुन्हा सगळ्यांच्यात उत्साह संचारला. माँडेगारकडे जाणारी पावलं कशी बशी वळवून आम्ही सहकार रिफ्रेशमेंट्समधे स्थानापन्न झालो. इतकी जणं एका टेबलवर मावणं शक्य नसल्याने ३ टेबल्स पकडण्यात आली. जेवण येईपर्यंत तोंडाचा दुसरा उपयोग म्हणजे गप्पा असल्याने तीनही टेबल्स वर वेगवेगळे विषय पोस्टमॉर्टमला घेण्यात आले. टेबल क्र. १ वर 'विपश्यना'वर चर्चा झडली. टेबल क्र. २ वर तिसरे महायुद्ध आणि अध्यात्म, तर टेबल क्र. ३, जिथे आम्ही होतो, तिथे स्पेस ट्रॅव्हल आणि रम हा अभिनव विषय चघळण्यात आला. सोबतच का. घो. आ. फे. मधल्या स्टॅटीक इंस्टॉलेशन्सपेक्षा तिथे फिरणार्‍या चालत्या बोलत्या कलाकॄतीच कशा भारी होत्या ह्यावर जबर खलबत झालं. ह्याचा परिणाम म्हणून जेवण झाल्यावर सु. झे. मित्राला भेटायचं कारण देऊन पुन्हा का. घो. आ. फे. मधे शिरला. तसंच, प्रथम साहेब इतक्या सटासट फोटो कसले काढत होते ह्याचाही उलगडा झाला. कट्ट्याला फोनवरून हजेरी लावण्याचीही एक मि.पा.ची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही आमच्या एका पुणेकर कॉम्रेड मित्रास फोन लावला. जो त्यांच्या सौ ने उचलला. झालेला संवाद आम्ही इथे लिहू शकत नाही. उ.न.ची. आवश्यकता किती आणि का आहे ह्याची पुन्हा उजळणी झाली. (विनंतीवरून कॉम्रेडचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे.) यथेच्छ जेवण झाल्यावर, सु. झे., प्रथम आणि मी दिल्ली दरबार समोरच्या पानवाल्याकडे पान आणायला निघालो. मकीच्या टेबलपाशी पोचल्यावर तिने ऑर्डर सोडली '४ पानं'. ती सगळ्यांसाठी असतील असं वाटलं पण तेव्हढ्यात तिने 'माझ्यासाठी' ही पुस्ती जोडल्याने तो गैरसमज वेळीच दूर झाला. पानवाल्यापाशी गेल्यावर आम्ही जेवलोय की नाही असं वाटावं इतक्या संख्येने पानं फस्त करून आम्ही अजून थोडी पार्सल घेऊन हॉटेलकडे रवाना झालो. आहारलेले मि. पा. कर आहारलेले मि. पा. कर पान खाता खाता पुन्हा गप्पांचा फड जमला. सगळ्यांनी आपापले पानाचे कागद जवळच्या एका कचर्‍याच्या डब्यात टाकल्याने त्या बिचार्‍या पानवाल्याचा डबा दुसर्‍याच पानवाल्याच्या कचर्‍याने भरून गेला. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बाराना. गप्पांच्या ओघात कसं, कधी आणि कुणी हे माहिती नाही पण वृत्तांत टाकायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकण्यात आली. सगळ्यांसमोर मकीने 'तू डान्रावांचा मित्र असल्याने तू सुद्धा वायदे आझमच असणार' असा टोमणा मला मारला. मी त्यावर काही तरी बाणेदार उत्तर देण्यासाठी तोंड उघडले पण आमच्या उ. न. क.च्या एका कॉम्रेडने मला डोळ्यांनीच खूण करत 'भलतं साहस करू नकोस. मी सुद्धा करत नाही. जीवाला जप स्वतःच्या.' असे समजावले. जीवाल जीव देणारे मित्र म्हणतात ते हेच. (विनंतीवरून कॉम्रेडचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे.) पुन्हा एकदा गप्पांकडे वळून बराच वेळ टिपी केल्यावर आम्ही निघायची घोषणा केली. एकूण ३ मंडळी घरी जायला निघाली आणि बाकीची मंडळी गप्पा कंटिन्यू करण्यासाठी दुसर्‍या ठिकाणी रवाना झाली. येतो असे सांगून ऐनवेळी अभिनव कारणं देऊन टांग द्याची मि.पा. कट्ट्यांची परंपरा ह्या वेळीही जपली गेली. सुड, लीलाधर आणि पिंगु ह्यांनी मेगाब्लॉक आहे इथपासून ते दाट धुक्यामुळे रिक्षा बंद आहेत (डोंबिवलीत) इत्यादि कारणं देत सप्तरंगी टांग दिली. कट्टा उत्तरार्ध समाप्त. टांगा पलटी. घोडे फरार. अशा प्रकारे मि.प. का. घो. आ. फे. कट्टा पंचनामा - पार्ट १ समाप्त झाला. पार्ट २ लवकरच पोहोचवण्यात येतील. आपला नम्र, आदि जोशी हजर मिपाकर घाशींराम कोतवाल तीरशिंगराव माणूसघाणे निखिल देशपांडे मस्त कलंदर निम आनंद घारे प्रथम फडणीस मिसळलेला काव्यप्रेमी रामदास काका लिमाऊजेट सुझे सुर आणि तिचं पिल्लू आर्या किसन इनिगोय मी देवकाका प्रास कस्तुरी विलासराव टांग देण्याची परंपरा जपणारे मि. पा. कर सुड लीलाधर पिंगु धमालपंत अभिज्ञ सूचना १ - लवकर म्हणजे तुझ्या हिशोबाने की आमच्या, येतोय वॄत्तांत वाट बघतोय आम्ही, अरे दुसर्‍या कट्टाची तयारी झाली... अशा खवचट कॉमेंट्स टाकू नयेत. सूचना २ - सगळे फोटो इथे https://plus.google.com/photos/107365542060239942560/albums/58411210349… आणि https://picasaweb.google.com/104688623505589346553/DropBox?authkey=Gv1s… इथे बघता येतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12775
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

प्रतीक्षा वाया गेली नाही. बाकी जेवणात काय होते याचा उल्लेख नसल्याने किंचित निराशा झाली... उपस्थित मिपाकरांची नावे फोटोतल्याअ क्रमानुसार लिहावी हि विनंती... अवांतर - येत्या वसंत ऋतूमध्ये उसातील उत्तरी मिडवेस्ट भागाचा कटटा आयोजित करण्यात येणार आहे...

In reply to by श्रीरंग_जोशी

जेवण म्हणजे फक्त रोटी सब्जी एवढेच होते पण भुका इतक्या लागल्या होत्या की समोर येणारा कांदा, लोणचे सुद्धा अमृततुल्य लागत होते. साधेच पण चविष्ट जेवण ही सहकारी भांडाराच्या कॅन्टीनची परंपरा आहे.

कट्ट्यासारखा वृत्तांत पण जबरदस्त! यातल्या २ उ न क च्या कार्यकर्त्यांबाबत अंदाज बांधला आहे पण सध्या गप्प रहाते. ;) पंचनाम्याचा पुढचा भाग डान्रावांसारखा वेळेत लिही. वाट बघत आहे. :P

फूल्टू हशा आणि टाळ्या.

In reply to by यशोधरा

आयुष्याचे नाटक ह्या आमच्या ८ भागांच्या मालिकेनंतरही तू 'इतकुसंच' अशी प्रतिक्रीया दिल्याने आम्ही हे वाचून न वाचल्यासारखे करत आहोत ह्याची नोंद घ्यावी :)

In reply to by आदिजोशी

अ‍ॅड्या, मेल्या नुसते आपले काळ्या घोड्याचे (जास्त करुन) फोटो टाकलेत आणि मुख्य म्हंजे कट्ट्यामध्ये झालेल्या चर्चाप्रकारांचे डिटेल्स न देता तू उगाच खूप काही लिहिल्याचा आव आणलेला आहेस, हे माझ्या लक्षात आलेय बरं का! मुद्द्याचे लिहिले नाहीयेस! पुन्हा काय जेवलात वगैरे त्याची रसभरीत वर्णने केली नसल्याने तुझ्या नोंदीला बेदखल करण्यात आलेले आहे! :D

In reply to by यशोधरा

जे घडलं ते तसंच्या तसं लिहिलं. मॅटर ऑफ फॅक्ट वॄत्तांत असं सुरुवातीला उगाच नाही म्हटलंय :)

In reply to by आदिजोशी

तेच की! इतकुस्सच. :) इतर उपस्थितांनी पण लिहा की :)

In reply to by यशोधरा

इतकुस्सच याच्याशी सहमत. वृत्तांत अजून बाकी आहे, असेच वाटत आहे. पहिल्या काही ओळीतून विनाकारण 'ब्लॉगचं कौतुक वाचावं लागलं' माझा तर इथे प्रचंड हिरमोड झाला होता ;) पण, हळुहळु वृत्तांत पुढे सरकला आणि लगेच संपल्यामुळे 'आदिजोशी' यांचा काळ्या फिती लावून सदस्यांनी निषेध करावा, असे सध्या मनात आले आहे. वृत्तांत तपशिलवार नसला तरी केलेला पंचनामा आवडला. -दिलीप बिरुटे

का. घो. आ. फे. मधला काळा बैल - हा सुद्धा कुणी मि.पा.कर नव्हे ह्याची नोंद घ्यावी
शक्यच नाही, कारण त्याची शिंगे अजिबात टोकदार नाहीत... ;-)

भन्नाट लिहिलयत आदिकाका ..... सुरुवात गालातल्या गालात हसण्याने झाली ... मध्यावर अगदि मनापासुन हसायला आलं .. शेवटपर्यंत खिळवुन ठेवलत ... अपेक्षेप्रमाणे खुम्खुमित लिहिलयत :) उ. न. क. बद्दल आदर वाटायला लागलाय ;) ... पण सगळ्यांची नावं ओळीने द्याकि .. कळ्त नैये कोण कूठे उभय ते ... ते व्हाईट ड्रेस मधले आडदांड व्यक्तिमत्व माणुस्घाणे असल्यागत वाटतायत .. जबरा पर्सनालिटि .. ते जरा जास्तच बारिक आहेत ..वजनकाट्यालाहि आनंद व्हावा इतके . ते कोन आहेत ?? .. सुर चं पिल्लु छान दिसतय . बाकि माझ्या स्मार्ट काकाचं नाव अजुन न कळल्याने वाईट्ट वाटतय :-/ व्रुतांत खुपच मजेशिर मांडलाय ... कीपिटप ... :) आता अवांतर : आदि जोशींचा लेख आणि त्यात बायकोचा उल्लेख नाहि ?? ह्या शक्यय का ?? ;) ब्लॉग बद्दलचं कौतुक ऐकुन खुप खुप कौतुक दाटुन आलं . रम चा विषय किंवा रम हा विषय नुसताच चघळलात याबद्दल उ. न. क. चा थरारुन निषेध . बाकि खुमासदार .. मजा आली वाचुन :)

In reply to by जेनी...

ते व्हाईट ड्रेस मधले आडदांड व्यक्तिमत्व माणुस्घाणे असल्यागत वाटतायत .. जबरा पर्सनालिटि . बरोबर वळीखलंत, आडदांड व्यक्तिमत्वाच्या बाबतीत आम्ही तात्यांचे भाऊ लागतो.

टांग देणार्‍यांमध्ये का होईना पहिला नंबर माझा लागल्याचं वाचून बरं वाटलं. वृत्तांत झकास. कुठून सकाळ सकाळ मी बातम्यांचं च्यानल लावलं असं राहून राहून वाटतंय. असो.

तेवढं फटूखाली नावं दिली असती तर मेंबरं वळखायला बरं झालं असतं..a

अरे वा, छान छान. मस्त केलात की कट्टा. कट्ट्याचा खरडफळा करु नका असे सांगतील म्हणून मी आलो नाही. ;) नाहीतर मीपण आलो असतो. ;) असो नेक्स्टैम. :)

उ. न. क आणि त्याचा संस्थापक आड्या चा जोर्रदार निषेध. उ. न. क. चे 'ते' कॉम्रेड कोण आहेत ते समजलेत असे वाटते. इवलास्सा वृ. लिहिल्यामुळे अजुन एकदा झणझणीत / दणदणीत निषेध. मोट्ठा व डिट्टेलवार वृ येउ देत. तसेच ओळख परेडीतल्या मिपाकरांची नावेही येउदेत फोटोखाली.

ह्या कट्टा वृत्तांताच्या निमित्ताने का होईना टिप्पीकल अॅड्यास्टाईल लिखान बर्याच दिवसांनी वाचायला मिळालं. मस्त खुसखूशीत लिहलंय. तुझा पुणेकर काॅम्रेड मित्र आणि का.घो.आ.फे च्या बाहेर डोळ्यांनी दटावणारा मित्र कोण असतील याची पक्की खात्री झालीय. बाकी काही व्यक्तीगत कारणांमुळे तुम्हा सगळ्यांना टाटा न करताच पळावं लागल्याचं खुप दुःख होतंय. (उ.न.क चा नवा सदस्य) किसन

asa फोटूमधले मिपाकर (डावीकडून मागील रांग)- निम, तिरशिंगराव माणूसघाणे, निखिल देशपांडे, प्रास, आनंद घारे, मिसळलेला काव्यप्रेमी, विलासराव, रामदास आणि किसन शिंदे. (डावीकडून पुढील रांग)- आदिजोशी, लिमाऊजेट, कस्तुरी, मस्त कलंदर, इनिगोय, सूर आणि तिची आर्या आणि प्रथम फडणीस.

In reply to by नानबा

आता ओळख परेड उत्तम झाली. धन्स टू किस्ना. फोटोवरुन असे वाटते की, कस्तूरी यांची परवा देवसाहेबांच्या मुलीच्या लग्नात भेट होऊनही मिपाकर म्हणून मी त्यांना ओळखू शकलेलो नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by नानबा

धन्यवाद, प्रथम, मित्र-मैत्रिणींच्या चेहेर्‍यांची ओळख करून दिल्याबद्दल. बिनचेहेर्‍यांची ओळख आधी होतीच..

पाच पंचांमध्ये अस्मादिक दुसर्र्या क्रमांकावर आहेत. पुढील कट्ट्याचा पंचनामा करण्यात अस्मादिक अग्रेसर असतील याची क्रुपया णोंड घ्यावी.

In reply to by बॅटमॅन

कमाले भौराया ! ' मेल्या गेलो आहे ' ही कसली वाक्य्रच्ना बे ?? कारण माझ्या माहितीप्रमाणे ... मेल्यावर दुसरेलोक घेवुन जातात .. तुच कसा काय जाशील .. काय्पन :-/

In reply to by जेनी...

@मेल्यावर दुसरेलोक घेवुन जातात .. >>> =)) @तुच कसा काय जाशील ..>>> =)) या वाक्य रचनेमुळे,बॅटमॅन तिरडीवरून तरंगत गेल्याचा भास झाला.

In reply to by जेनी...

प्रमाण वाक्यरचनेचा आग्रह तू धरणे म्हंजे रोज मटण चापणार्‍याने शाकाहारावर प्रवचन देण्यापैकी आहे. बाकी काकूबाईपणा काय म्हणतोय?

In reply to by ह भ प

म्हंजी नक्की फिरता कसा कट्टा करायचा.? पुणेकर टू व्हीलरवाले, रिक्षावाले आपल्याला नीट फिरू देत्याल का ?ब्वॉर फिरायचं त्ये बी कुटून भुसारी कालनी एम्प्रेस गार्डन की शालूकराचा बोळ ? आपला चावट चौ रा .

In reply to by चौकटराजा

@फिरायचं त्ये बी कुटून भुसारी कालनी एम्प्रेस गार्डन की शालूकराचा बोळ @>>> =)) नको...त्यापेक्षा सिटिपोस्ट चौक ते बोहोरे आळी हा ट्रॅक निवडूया... मला म्हयतीये...त्या रस्त्यानी वय-झालेली मंडळी http://www.sherv.net/cm/emo/funny/1/walking-zombie-smiley-emoticon.gifसुद्धा ''बळ'' आल्यासारखी चालतात. http://www.sherv.net/cm/emoticons/playful/cute-smiley-tongue-in-cheek-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अ आ , स्माईलीत काय तरी गर्बल्ड हाय. ते म्हातारं वाटत नाय टक्कल पडल्यालं पन दात शाबूत असल्यालं सेव्हाग वाटतया !

In reply to by बाबा पाटील

चला आता पुण्यात पांढरा बैल स्मार्ट फेस्टिवल कुठं होतो ते शोधणे आले. चला लागा कामाला,

प्रथम, तुमच्यामुळे जोशींच्या वृत्तांताला ओळखीची जोड मिळाली. आम्हा सारख्या भारतापासुन हजारो मैल दुर रहाणार्‍यांना लेखनाबरोबर आंखो देखा हाल पाहण्यासाठी दिलेल्या फोटोंचीही ओळख लागते. तसेच इतर मिपाकरांनी म्हटल्या प्रमाणे खाण्यापिण्याचाही वृत्तांत वाचायला आवडला असता. आता पुढील वृत्ताच्या अपेक्षेत.

मजा नै आया.

वृत्तांत व फोटो आवडले ,मजा आली वाचायला :)

फोटो आवडले... मुंबईतली लोकं वेळेच्या बाबतीत एवढी ढिसाळ असतील असं नव्हतं वाटलं... आमच्याकडे असं नसतं, आठ म्हणलं की शार्प आठ जण जमा होतात.

In reply to by ५० फक्त

खरंच गुणी हो पुणेकर..! पन्नास्राव, त्या व्यनिंमध्ये 'अरे वा, काही हरकत नाही' असं म्हणून गवताची भर करणार्‍या नॉन-मुंबैकरांची यादीपण करायला घेतल्ये हां! :D

In reply to by इनिगोय

ओ उगाच पुणेकरांबद्दल बोलायचं काम नाही, मी सोलापुरकरांबद्दल बोलतोय. उगा ५-७ वर्षे पुण्यात ते देखील गावकुसाबाहेर राहलो म्हण्जे पुणेकर होत नाही कुणी,हां अर्थात नियम अपवादाने सिद्ध होतात हे पण खरं, असो.

फिरत्या कट्याच्या आयडेची कल्पना मस्त ! फोर्ट परिसरात गोथिक शैलीतल्या अनेक इमारती पाहण्या सारख्या आहेत. काळा घोडा, हुतात्मा चौक याना मोठा इतिहासही आहे.त्याची थोडी चर्चा झाली का ? की कोन्च्या जागी फोर्टात हादडायला चांगला स्पॉट हाय याचीच चर्चा झाली ? असो .माणसाला माणसाचा सहवासच नको च्या जमान्यात आपण एकत्र आलात, बागडलात याचे तीव्र कवतिक व मत्सर ही ! जाता जाता - आनंद घारे आजोबा, त्यांच्या शेजारी काळी दाढी व त्यांच्या शेजारी पांढरी दाढी व शेजारीच चस्मेवाला विश्वनाथ आनंद् म्हणजे आनंदरावा कास्पारोव ( काळ्या सोंगट्या ) आनि किसनराव विशवनाथन(पांढया सोंगट्या) हे चेस खेळताहेत काय असे वाटले.

गविंचा दोष आहे. आधी एक फोटो टाकुन थोडा धुऑ काढला आणी मग मिपाचे पब्लिक चेकाळले, व्रुत्तांत व्रुत्तांत म्हणुन.त्यात अ‍ॅड्याचा उद्धार जास्त म्हणुन युद्धपातळीवर त्याने लेख टाकला(पाडला) मग अपेक्षित असा व्रुत्तांत मिळाला नाही म्हणुन सगळे उलुसा, इतकुसाच काये हे, मजा नाय आली असे वदत असावेत. बाकी व्रुत्तांतात नसली तरी प्रत्यक्षात भरपुर मजा केलेली दिसतेयच. ** गविंना हलके घ्यायला कसे सांगु.

वृतांत भारीच खुसखुशीत आदी जोशी त्या निमित्ताने का होईना पण लिहिते झाले , अजून काय हवं ;)

In reply to by स्पा

वृतांत भारीच खुसखुशीत आदी जोशी त्या निमित्ताने का होईना पण लिहिते झाले , अजून काय हवं
असेच म्हणतो, वृत्तांत आवडला.

आयला मला भलत्याच वेळी टांग्यात बसायला लागल्याने कट्ट्याला हजेरी लावता आलेली नाही. पुढच्या वेळेस कसर भरुन काढली जाईल, ह्याची नोंद घेण्यात यावी.. - पिंगू

In reply to by पिंगू

टांगा घेउन येता का काय पुढच्या वेळी कसुर भरुन काढायला, म्हणजे ऑफिशियली टांगा पलटी घोडे/घोडा/घोडी फरार असं म्हंता येईल.

फोर्ट परिसरात गोथिक शैलीतल्या अनेक इमारती पाहण्या सारख्या आहेत. काळा घोडा, हुतात्मा चौक याना मोठा इतिहासही आहे.त्याची थोडी चर्चा झाली का ?
अर्थात. सोबत त्या भागाचा चालता बोलता विश्वकोष रामदास काका असल्यामुळे या विषयाची प्रचंड माहिती मिळाली, अगदी अनपेक्षितपणे एखादं घबाड हाती लागावी तशी. त्या इमारतींचा इतिहास, त्यांच्या स्थापत्यशैलीची पद्धत, त्यांच्यावर कोरलेल्या मुर्तींचा तपशील अशी अगदी इत्थंभूत माहिती कळली. लहानपणापासून त्या भागात इतका फिरलोय, पण ह्या नजरेने कधी पाहिलंच नव्हतं. हुतात्मा चौकात असणार्‍या अमेरिकन ड्रायफ्रुट्स स्टोअरच्या बाजूला असणार्‍या पंडोल दुकानाच्या बाहेरील भिंतीवर २ घोड्यांचं एक चित्र काढलं आहे. ते सुप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी काढलयं ही माहितीसुद्धा रामदास काकांकडून कळली. थोडक्यात रविवारची सुट्टी सत्कारणी लागल्याचं समाधान घेऊनच परतीचा प्रवास झाला. abc हेच ते हुसेन यांचं चित्र.

झक्कास वृतांत. आवडला. पण यशोधरातै म्हणतात त्याप्रमाणे मुद्द्याच्या गोष्टी गाळल्यात तुम्ही.

In reply to by मृत्युन्जय

वरील प्रतिसादाशी संपुर्ण सहमत. आपल्या काही जुन्या दोस्तांवर टिका करण्याच्या नादात कट्ट्यातल्या अनेक महत्वाच्या गोष्टी विसरलेल्या आहेत असे दिसतेय, पण अ‍ॅडी कट्ट्याला आला आणि त्याने चक्क वृत्तांतही लिहला ही बाब अत्यंत महत्वाची आणि उत्साहवर्धक मानायला हरकत नसावी. बाकी ह्यनिमित्ताने आमचे मित्रवर्य निदे ह्यांनाही पाहुन आनंद झाला. विलासराव, नमस्कार, ते ब्राझिल वर्ल्ड कपच्या तिकिटांचे विसरु नका बरं का. फेसबुकच्या स्टेटसमधल्या भांडणाचा बदला इथे आमच्याबद्दल अ‍ॅड्याला अनेक वेडेवाकडे प्रश्न विचारुन काढल्याबद्दल मकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाकी ह्या कट्ट्यात गवि न दिसल्याने कट्टा सुनासुना वाटला. आता पुढे जेव्हा बैठा कट्टा कराल तेव्हा आम्ही येऊ, हे फिरणं वगैरे हमारें बस की बांत नहीं है. - (कट्टेकरी)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बाकी ह्या कट्ट्यात गवि न दिसल्याने कट्टा सुनासुना वाटला.
या वाक्याबद्दल डॉनरावांना धन्यवाद. आमचा भ्रमनिरास झाला.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

हॅ हॅ.. आपल्या सर्वांचे आमच्या भरीवपणाबद्दलचे प्रेम पाहून डोळे भरुन आले. !! ;) बादवे, पुढच्या कट्ट्याला येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार......

In reply to by छोटा डॉन

टिका आम्ही नाही हो केली डान्राव. उलट तुमच्या नाहक बदनामीला बाणेदार उत्तर देणार होतो. पण... पुढचं तुम्हाला माहितीच आहे.