लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!!
......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं. अंघोळ कर. शादी कर. नाच कर . जाच कर. .....वेग्रे वेग्रे !! शॉट संपला की खुर्चीत बसून ज्युस प्याचा. ज्युस पितापिता फोन कानाला लाऊन काहीतरी पुटपुटत राहायचं - बीझी दाखवायला ! किंवा मम्मी बरोबर बोलण्याचे नाटक करताना इकडे तिकडे नजर भिरभिरत बसायचं. किंवा सेटवर बसल्या बसल्या इंटरव्हू द्याचा. " आय जस्ट लव माय, मम्मी. शी इझ सो कुट......मूऊऊम्मा,मूऊऊम्मा. वेग्रे वेग्रे !! मग एकदिवस पिच्चर तयार होतो. मग तो खपवायला लैम लायटात राहावं लागतं. म्हंजे खुलेआम स्टंट माराचे. म्हंजे कायतरी माकडचाळे करून पेपेरात किंवा टीवीत सारखं दिसाचं. म्हंजे कोन्त्यातरी छोट्यावयीन नटीला सांगाचे की अमुक अमुक याने माझा विनै भंग केला अशी बोंब ठोक. अचानक पेपरात बातमी फुट्टे. अन टीवी बोंबटत सुट्टो. झाली यांची चर्चा सुरु. किंवा कोंच्यातरी हाटेलात जौन हा कुणा बरोबर तरी मारामारी करणार. झाली बातमी. झाली यांची चर्चा सुरु. वेग्रे वेग्रे. म्हंजे यांनी येवडीशी फुसकली सोडली तरी लगेच बातमी होते अन त्यावर चर्चा. याला ही पोपटी जमात व्यवसायाचा भाग मानते. मग एक दिवस तो पिच्चर थेटरात लागतो. मला वाटायचं पूर्वी म्हंजे आपल्या लहानपणीच थेटरात खिडकीवर मारामारी व्हाची. पण आता हि होते. भर जानेवारी २०१३मध्ये होते. अलीकडेच झाली. हो. आणि हाणामारी इतकी एक माणुस वारून गेला. ऑन द स्पॉट. हो. अन हे पाटण्यात नव्हे. चक्क जोश्यांच्या दादरात. मुंबईत. आणि भर जानेवारी २०१३मध्ये. थेटरात कल्ला. टाळ्या. शिट्ट्या. लहानपणी "डफलीवाले डफली बजा" गाणे चालु झाले की पब्लिक पडद्याव पैसे फेकणार. चवल्या. पावल्या. अधेल्या. आठाणे. चाराणे. प्रभात टाकीचे मैनेन्जर घराशेजारीच -हाचे. मी, त्यांचा अज्या, संज्या आम्ही थेटरात चिल्लर गोळा करायला जाचो. डफलीवर घुंघरू ठेवल्याचा सीन आला की लगेच आमी विंगेत आडवे झोपणार. या बाजुने एकटा. त्याबाजूने दोघे. जयाप्रदाला तंद्री लागुन स्वप्नात डफलीवाला ऋषीकपूर दिसून ती कृष्णाच्या गळ्यातला हार काढुन ऋषीकपूरच्या गळ्यात हार घालेतोवर आमाला रग्गड वेळ मिळाचा. आम्ही सेट. जयाप्रदाने टाळी वाजीवली की पब्लिकच्या शिट्ट्या स्टार्ट. आणि ऋषीकपूरने डफलीवर हात मारला की पडद्यासमोर खनखनाट चालू. चवल्या. पावल्या. अधेल्या. आठाणे. चाराणे. पब्लिक कल्ला कराचे, आम्ही खिसे भराचो. वेग्रे वेग्रे.
गंमत अशी आहे की थेटरात सिनेमा यायच्या आधीपासून जो पब्लिसिटीचा धुरळा उडालेला असतो तो सिनेमा गेल्यावरही पब्लिकच्या मनात तसाच राहतो. हीच मला वाटते ती हिरोंची कीर्ती वेग्रे. प्रत्यक्षातही ही सारी मंडळी, खरेतर पोपट मंडळी, जनसामान्यांचे हिरो होतात. त्यांची देवळे बनतात. हिरो सांगतात ते पदार्थ विकत घेतले जातात. त्यांच्या गाड्यांवर पप्प्यांचे शेकडो हजारो ओठ चिकटतात आणि त्यांच्या वाढदिवसांना त्यांच्या माड्यांवर नट नट्यांना बघण्यासाठी हजारोने जनता दिवस रात्र उभी असते. हे नट नटी मग सामाजिक भाष्य करतात, मेणबत्त्या पेटवतात, अण्णा हजारे आंदोलनात अर्धा पाऊण तास उपवास करतात, टीवीवर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. वेग्रे वेग्रे !! या सगळ्याचा एकत्रित इतका भीषण परिणाम बुद्धीवाद्यान्वरही इतका आहे की चक्क नाना पाटेकर लोकसत्तासारख्या प्रमाण मराठी दैनिकामध्ये एक दिवस अतिथी संपादक होतो. भर जानेवारी २०१३ मध्ये !! समाजाचा आय क्युच खालावलाय की हेच वास्तव आहे असा संभ्रम निर्माण झालाय. जो खरे तर, लिहिलेले संवाद कोणत्या तरी अदृश्य दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शकाचे समाधान होईतोवर म्हणत राहतो तो नाना पाटेकर एक दिवस,प्रगत मराठी जनतेला मार्गदर्शन वेग्रे करतो !! नानाचे सिनेमा व्यतिरिक्त कतृत्व, त्याचे मार्गदर्शन घ्यावे इतके कुठे दिसले वा वाचले नाही. माझ्या माहिती प्रमाणे तसे काही नाहीच. पण नानाने संधी मिळाल्यावर काही रचनात्मक संदेश देण्याऐवजी समाज कसा रसातळाला गेला आहे आणि इथली घाण साफ करण्यासाठी इथले राजकारणी आणि व्यवस्था किती नालायक आहेत असे काहीसे रडगाणे त्याच्या अग्रलेखात गाईले. म्हणाला अण्णा हजारे जरा बरे होते. पण ते ही टीम च्या नादाने वाया गेले. चाळीत राहणारे आम्ही लहानपणी कसे आदर्श जीवन जगत होतो आणि आता माणसे श्वापदां सारखी जगताहेत. यावर उपाय देण्याचे एक महान सत्कृत्य पाटेकरांनी केले आहे. हे सगळे साफ करण्यासाठी त्यांनी इंग्रज साहेबाची याचना केली आहे. त्यांना पुन्हा एकदा भारतात येण्याची विनंती केली आहे. नाना अभिनेता म्हणून थोर (कदाचित)असेल. इंग्रजाला पुन्हा निमंत्रण देण्याची नानाची याचना, गंमत म्हणून, चेष्टा म्हणून,उपहास म्हणून की गंभीरपणे घ्यायची हे नट नट्यांना वास्तवातही हिरो समजणाऱ्या आणि त्यांची देवळे बांधणाऱ्या जनतेला कसे समजणार? नाना हा काही बुद्धिवादी, विचार करू शकणाऱ्या, संवेदनशील जनतेचा वास्तवातला हिरो नाही. त्याला कुणीही एखाद्या गंभीर राजकीय सामाजिक विषयावर बीजभाषण करायला बोलावत नाही. लोकसत्ताने अशा बुद्धिवादी जनतेला आकृष्ट करण्यासाठी नानाचे चित्र पहिल्या पानावर छापून काही उपयोग नाही. त्यांना आकृष्ट करायचे होते ज्यांचा तो वास्तवातही हिरो आहे अशाच लोकांना . त्यामुळे त्याचे लिखाण, याचना, विचार ही जनता कदाचित गंभीर पणे स्वीकारेल याचा लोकसात्तेसारख्या दैनिकाने विचार नको करायला ? लोकसत्ताने हा चावटपणा करण्याचे धाडस कसे केले असेल ? धंद्यासाठी ? याच पाटेकरकाकांनी क्रांतिवीर सिनेमा मध्ये शेवटच्या त्यांच्या फाशी देण्याच्या सीनमध्ये लंबे चौडे टाळ्या मिळवणारे भाषण केले आहे, दिग्दर्शकाने शिकविले तसे. त्यात जनतेला नामर्द वेग्रे संबोधले आहे आणि इंग्रज गेले तरी तुम्ही अजुनी गुलाम आहात वेग्रे सुनावलंय. म्हंजे खरा नाना कुठला? क्रांतिवीर की लोकसत्तावाला ? ज्या कोणत्या भावनेने नानाने हे सगळे लिहिलंय त्यातून गेल्या साठ वर्षात केलेल्या प्रगतीचा आणि प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या तमाम वीरांचा घोर अपमानच केलाय. इंग्रज चार गाजरं खायला घालून अडीचशे वर्षात कायकाय लुटून घेऊन गेला आणि जाताजाता समस्त भारतीयांच्या हातात भिकेसाठी करवंटी ठेऊन गेला हे नाना सारख्या पोपटपंची करणा-याला काय कळणार ? तो अभ्यासाचा विषय आहे !!. दुर्दैव या समाजाचे असे आहे की असे तथाकथित हिरो, या समाजाचा इथल्या बळकट होऊ पाहणा-या व्यवस्थेवरचा विश्वास उडवण्याचा घात करीत आहेत. त्याही पुढे दुर्दैव असे आहे की लोकसत्ता सारखी प्रमाण दैनिके अशा कचकडी बाहुल्यांचा उदोउदो करतात. धंद्यासाठी हे करावे लागते असे वर समर्थनही करतात. त्यामुळे उत्तम निष्काम कर्मयोग आचरणारा एखादा शिक्षक किंवा उपलब्ध तोकड्या साधन सामाग्रीमधून खेडूतांची अहोरात्र सेवा करणारा प्राथमिक आरोग्य केंद्रातला एखादा डॉक्टर किंवा प्रामाणिक काम करणारा नगर परिषदेमधला एखादा प्रशासक वेग्रे इथल्या माध्यमांचा अतिथी संपादक होऊ शकत नाही. कारण मग धंद्याचे काय ?
सिनेमा या करमणूक माध्यमाचा द्वेष करण्याचा किंवा सिनेचीत्र तारे तारकांना हीन लेखण्याचा अपराध मला करायचा नाही. तो उद्देश नाही. व्यवसाय आणि कला म्हणुन सिनेमाविषयी मला आदरच आहे. पण अजूनही उभे राहण्याची धडपड करणाऱ्या भारतीय समाजाचे संदर्भ बदलण्याची मात्र प्रचंड गरज आहे. दादासाहेब फाळके या नाशिकच्या कलाकार आणि व्यावसाईकाचे भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदान वादातीत आहे. दादासाहेबांना भारतीय चित्रपट आजही आदराने संबोधतो आणि त्यांच्या नावाने अनेक पारीतोषके दिली जातात. नाशकात त्यांचे भले मोठे स्मारक आहे आणि हे स्मारक आज नाशिकची शान आहे, त्याचा एक नाशिककर म्हणून अभिमानही आहे. याच नाशकात आपले संपुर्ण आयुष्य गणिताला वाहून घेतेलेला एक शिक्षक ही होऊन गेला. साधा हायस्कूल शिक्षक. शेवटच्या घटकेपर्यंत सदैव रोजच्या जेवणाची भ्रांत असायची. रविवार कारंज्याजवळ एका खोपटात राहायचा. पण गणितातले योगदान आंतर राष्ट्रीय ख्यातीचे आहे. अनेक विद्यापिठांमध्ये दत्तात्रेय रामचंद्र कापरेकरांनी केलेल्या कामावर संशोधन चालू आहे. शून्याची देणगी भारतीयांनी जगाला दिली हे सांगताना आपल्या छातीचा ब्लाउज होतो, त्याच तोडीचे योगदान कापरेकर स्थिरांकाचे आणि कापरेकर नंबरचे आणि अन्य त्यांच्या कामाचे आहे. कापरेकर सर देशात काय हो, नाशकात ही फारसे कुणाला माहिती नसतील. भाड्याचे दोन रुपये नसताना टांग्यात बसले म्हणून साधा टांगेवालाही म्हणे सरांशी हुज्जत घालायचा, ते ही त्यांच्या उतार वयात. शून्याची देणगी ओळखणारा तत्कालीन भारतीय समाज विद्वतेची कास धरणारा आणि गुणांना पूजा स्थानी मानणारा होता, आजचा समाज कदाचित सिनेमाच्या झगमगाटात मशगुल आहे.
वाचने
3906
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म..
धक्का बसला...
In reply to हम्म.. by दादा कोंडके
सुधीरजी लेख पटला नाही बघा..
??
In reply to सुधीरजी लेख पटला नाही बघा.. by आनन्दिता
ही काय गेम आहे?
बरोब्बर !!
In reply to ही काय गेम आहे? by आदूबाळ
हाणामारी इतकी एक माणुस वारून
नानाला तुम्ही किती ओळखता हो ?
बाबा थांबा !!
In reply to नानाला तुम्ही किती ओळखता हो ? by बाबा पाटील
आजच नानाला पद्मश्री जाहीर
In reply to बाबा थांबा !! by सुधीर मुतालीक
ना..ना..
In reply to आजच नानाला पद्मश्री जाहीर by आनन्दिता
तुम्हाला काविळ झालीय का हो ?
In reply to बाबा थांबा !! by सुधीर मुतालीक
भर जानेवारीत
+१
In reply to भर जानेवारीत by तिमा
आयला
नाही पटलं..
सहमत!!
In reply to नाही पटलं.. by उपास