Skip to main content

नानाचा अग्रलेख.....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 20/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!! ......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं. अंघोळ कर. शादी कर. नाच कर . जाच कर. .....वेग्रे वेग्रे !! शॉट संपला की खुर्चीत बसून ज्युस प्याचा. ज्युस पितापिता फोन कानाला लाऊन काहीतरी पुटपुटत राहायचं - बीझी दाखवायला ! किंवा मम्मी बरोबर बोलण्याचे नाटक करताना इकडे तिकडे नजर भिरभिरत बसायचं. किंवा सेटवर बसल्या बसल्या इंटरव्हू द्याचा. " आय जस्ट लव माय, मम्मी. शी इझ सो कुट......मूऊऊम्मा,मूऊऊम्मा. वेग्रे वेग्रे !! मग एकदिवस पिच्चर तयार होतो. मग तो खपवायला लैम लायटात राहावं लागतं. म्हंजे खुलेआम स्टंट माराचे. म्हंजे कायतरी माकडचाळे करून पेपेरात किंवा टीवीत सारखं दिसाचं. म्हंजे कोन्त्यातरी छोट्यावयीन नटीला सांगाचे की अमुक अमुक याने माझा विनै भंग केला अशी बोंब ठोक. अचानक पेपरात बातमी फुट्टे. अन टीवी बोंबटत सुट्टो. झाली यांची चर्चा सुरु. किंवा कोंच्यातरी हाटेलात जौन हा कुणा बरोबर तरी मारामारी करणार. झाली बातमी. झाली यांची चर्चा सुरु. वेग्रे वेग्रे. म्हंजे यांनी येवडीशी फुसकली सोडली तरी लगेच बातमी होते अन त्यावर चर्चा. याला ही पोपटी जमात व्यवसायाचा भाग मानते. मग एक दिवस तो पिच्चर थेटरात लागतो. मला वाटायचं पूर्वी म्हंजे आपल्या लहानपणीच थेटरात खिडकीवर मारामारी व्हाची. पण आता हि होते. भर जानेवारी २०१३मध्ये होते. अलीकडेच झाली. हो. आणि हाणामारी इतकी एक माणुस वारून गेला. ऑन द स्पॉट. हो. अन हे पाटण्यात नव्हे. चक्क जोश्यांच्या दादरात. मुंबईत. आणि भर जानेवारी २०१३मध्ये. थेटरात कल्ला. टाळ्या. शिट्ट्या. लहानपणी "डफलीवाले डफली बजा" गाणे चालु झाले की पब्लिक पडद्याव पैसे फेकणार. चवल्या. पावल्या. अधेल्या. आठाणे. चाराणे. प्रभात टाकीचे मैनेन्जर घराशेजारीच -हाचे. मी, त्यांचा अज्या, संज्या आम्ही थेटरात चिल्लर गोळा करायला जाचो. डफलीवर घुंघरू ठेवल्याचा सीन आला की लगेच आमी विंगेत आडवे झोपणार. या बाजुने एकटा. त्याबाजूने दोघे. जयाप्रदाला तंद्री लागुन स्वप्नात डफलीवाला ऋषीकपूर दिसून ती कृष्णाच्या गळ्यातला हार काढुन ऋषीकपूरच्या गळ्यात हार घालेतोवर आमाला रग्गड वेळ मिळाचा. आम्ही सेट. जयाप्रदाने टाळी वाजीवली की पब्लिकच्या शिट्ट्या स्टार्ट. आणि ऋषीकपूरने डफलीवर हात मारला की पडद्यासमोर खनखनाट चालू. चवल्या. पावल्या. अधेल्या. आठाणे. चाराणे. पब्लिक कल्ला कराचे, आम्ही खिसे भराचो. वेग्रे वेग्रे. गंमत अशी आहे की थेटरात सिनेमा यायच्या आधीपासून जो पब्लिसिटीचा धुरळा उडालेला असतो तो सिनेमा गेल्यावरही पब्लिकच्या मनात तसाच राहतो. हीच मला वाटते ती हिरोंची कीर्ती वेग्रे. प्रत्यक्षातही ही सारी मंडळी, खरेतर पोपट मंडळी, जनसामान्यांचे हिरो होतात. त्यांची देवळे बनतात. हिरो सांगतात ते पदार्थ विकत घेतले जातात. त्यांच्या गाड्यांवर पप्प्यांचे शेकडो हजारो ओठ चिकटतात आणि त्यांच्या वाढदिवसांना त्यांच्या माड्यांवर नट नट्यांना बघण्यासाठी हजारोने जनता दिवस रात्र उभी असते. हे नट नटी मग सामाजिक भाष्य करतात, मेणबत्त्या पेटवतात, अण्णा हजारे आंदोलनात अर्धा पाऊण तास उपवास करतात, टीवीवर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. वेग्रे वेग्रे !! या सगळ्याचा एकत्रित इतका भीषण परिणाम बुद्धीवाद्यान्वरही इतका आहे की चक्क नाना पाटेकर लोकसत्तासारख्या प्रमाण मराठी दैनिकामध्ये एक दिवस अतिथी संपादक होतो. भर जानेवारी २०१३ मध्ये !! समाजाचा आय क्युच खालावलाय की हेच वास्तव आहे असा संभ्रम निर्माण झालाय. जो खरे तर, लिहिलेले संवाद कोणत्या तरी अदृश्य दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शकाचे समाधान होईतोवर म्हणत राहतो तो नाना पाटेकर एक दिवस,प्रगत मराठी जनतेला मार्गदर्शन वेग्रे करतो !! नानाचे सिनेमा व्यतिरिक्त कतृत्व, त्याचे मार्गदर्शन घ्यावे इतके कुठे दिसले वा वाचले नाही. माझ्या माहिती प्रमाणे तसे काही नाहीच. पण नानाने संधी मिळाल्यावर काही रचनात्मक संदेश देण्याऐवजी समाज कसा रसातळाला गेला आहे आणि इथली घाण साफ करण्यासाठी इथले राजकारणी आणि व्यवस्था किती नालायक आहेत असे काहीसे रडगाणे त्याच्या अग्रलेखात गाईले. म्हणाला अण्णा हजारे जरा बरे होते. पण ते ही टीम च्या नादाने वाया गेले. चाळीत राहणारे आम्ही लहानपणी कसे आदर्श जीवन जगत होतो आणि आता माणसे श्वापदां सारखी जगताहेत. यावर उपाय देण्याचे एक महान सत्कृत्य पाटेकरांनी केले आहे. हे सगळे साफ करण्यासाठी त्यांनी इंग्रज साहेबाची याचना केली आहे. त्यांना पुन्हा एकदा भारतात येण्याची विनंती केली आहे. नाना अभिनेता म्हणून थोर (कदाचित)असेल. इंग्रजाला पुन्हा निमंत्रण देण्याची नानाची याचना, गंमत म्हणून, चेष्टा म्हणून,उपहास म्हणून की गंभीरपणे घ्यायची हे नट नट्यांना वास्तवातही हिरो समजणाऱ्या आणि त्यांची देवळे बांधणाऱ्या जनतेला कसे समजणार? नाना हा काही बुद्धिवादी, विचार करू शकणाऱ्या, संवेदनशील जनतेचा वास्तवातला हिरो नाही. त्याला कुणीही एखाद्या गंभीर राजकीय सामाजिक विषयावर बीजभाषण करायला बोलावत नाही. लोकसत्ताने अशा बुद्धिवादी जनतेला आकृष्ट करण्यासाठी नानाचे चित्र पहिल्या पानावर छापून काही उपयोग नाही. त्यांना आकृष्ट करायचे होते ज्यांचा तो वास्तवातही हिरो आहे अशाच लोकांना . त्यामुळे त्याचे लिखाण, याचना, विचार ही जनता कदाचित गंभीर पणे स्वीकारेल याचा लोकसात्तेसारख्या दैनिकाने विचार नको करायला ? लोकसत्ताने हा चावटपणा करण्याचे धाडस कसे केले असेल ? धंद्यासाठी ? याच पाटेकरकाकांनी क्रांतिवीर सिनेमा मध्ये शेवटच्या त्यांच्या फाशी देण्याच्या सीनमध्ये लंबे चौडे टाळ्या मिळवणारे भाषण केले आहे, दिग्दर्शकाने शिकविले तसे. त्यात जनतेला नामर्द वेग्रे संबोधले आहे आणि इंग्रज गेले तरी तुम्ही अजुनी गुलाम आहात वेग्रे सुनावलंय. म्हंजे खरा नाना कुठला? क्रांतिवीर की लोकसत्तावाला ? ज्या कोणत्या भावनेने नानाने हे सगळे लिहिलंय त्यातून गेल्या साठ वर्षात केलेल्या प्रगतीचा आणि प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या तमाम वीरांचा घोर अपमानच केलाय. इंग्रज चार गाजरं खायला घालून अडीचशे वर्षात कायकाय लुटून घेऊन गेला आणि जाताजाता समस्त भारतीयांच्या हातात भिकेसाठी करवंटी ठेऊन गेला हे नाना सारख्या पोपटपंची करणा-याला काय कळणार ? तो अभ्यासाचा विषय आहे !!. दुर्दैव या समाजाचे असे आहे की असे तथाकथित हिरो, या समाजाचा इथल्या बळकट होऊ पाहणा-या व्यवस्थेवरचा विश्वास उडवण्याचा घात करीत आहेत. त्याही पुढे दुर्दैव असे आहे की लोकसत्ता सारखी प्रमाण दैनिके अशा कचकडी बाहुल्यांचा उदोउदो करतात. धंद्यासाठी हे करावे लागते असे वर समर्थनही करतात. त्यामुळे उत्तम निष्काम कर्मयोग आचरणारा एखादा शिक्षक किंवा उपलब्ध तोकड्या साधन सामाग्रीमधून खेडूतांची अहोरात्र सेवा करणारा प्राथमिक आरोग्य केंद्रातला एखादा डॉक्टर किंवा प्रामाणिक काम करणारा नगर परिषदेमधला एखादा प्रशासक वेग्रे इथल्या माध्यमांचा अतिथी संपादक होऊ शकत नाही. कारण मग धंद्याचे काय ? सिनेमा या करमणूक माध्यमाचा द्वेष करण्याचा किंवा सिनेचीत्र तारे तारकांना हीन लेखण्याचा अपराध मला करायचा नाही. तो उद्देश नाही. व्यवसाय आणि कला म्हणुन सिनेमाविषयी मला आदरच आहे. पण अजूनही उभे राहण्याची धडपड करणाऱ्या भारतीय समाजाचे संदर्भ बदलण्याची मात्र प्रचंड गरज आहे. दादासाहेब फाळके या नाशिकच्या कलाकार आणि व्यावसाईकाचे भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदान वादातीत आहे. दादासाहेबांना भारतीय चित्रपट आजही आदराने संबोधतो आणि त्यांच्या नावाने अनेक पारीतोषके दिली जातात. नाशकात त्यांचे भले मोठे स्मारक आहे आणि हे स्मारक आज नाशिकची शान आहे, त्याचा एक नाशिककर म्हणून अभिमानही आहे. याच नाशकात आपले संपुर्ण आयुष्य गणिताला वाहून घेतेलेला एक शिक्षक ही होऊन गेला. साधा हायस्कूल शिक्षक. शेवटच्या घटकेपर्यंत सदैव रोजच्या जेवणाची भ्रांत असायची. रविवार कारंज्याजवळ एका खोपटात राहायचा. पण गणितातले योगदान आंतर राष्ट्रीय ख्यातीचे आहे. अनेक विद्यापिठांमध्ये दत्तात्रेय रामचंद्र कापरेकरांनी केलेल्या कामावर संशोधन चालू आहे. शून्याची देणगी भारतीयांनी जगाला दिली हे सांगताना आपल्या छातीचा ब्लाउज होतो, त्याच तोडीचे योगदान कापरेकर स्थिरांकाचे आणि कापरेकर नंबरचे आणि अन्य त्यांच्या कामाचे आहे. कापरेकर सर देशात काय हो, नाशकात ही फारसे कुणाला माहिती नसतील. भाड्याचे दोन रुपये नसताना टांग्यात बसले म्हणून साधा टांगेवालाही म्हणे सरांशी हुज्जत घालायचा, ते ही त्यांच्या उतार वयात. शून्याची देणगी ओळखणारा तत्कालीन भारतीय समाज विद्वतेची कास धरणारा आणि गुणांना पूजा स्थानी मानणारा होता, आजचा समाज कदाचित सिनेमाच्या झगमगाटात मशगुल आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3906
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

एकुणच फिल्म ईंड्स्ट्रीचा आपल्याकडे भयानक (कु)प्रभाव आहे. साहित्य संमेलनामध्ये चश्मा घालून मोठ्या साहित्यिकाच्या थाटात वडीलांची कविता वाचून दाखवणारा अमिताभ बच्चन लाल बादशहा मध्ये कोर्टात, "...उस के बाद हम खुदही फासी का फंदा हम गले मे डाल लेंगे. और जब गवाहही नही है, तो फासी का फंदा हम (खाली बघून) कहां डालेंगे, बोलिये." असं म्हटलेलं लोकं विसरून जातात आणि त्याला वेगळ्या उंचीवर नेउन बसवतात.

In reply to by दादा कोंडके

आत्ताच चेपुवर कुणितरी शेअर केलेला हा विडीओ पाहिला. काय आस्था आहे सामाजिक प्रश्नांबद्द्ल या लोकांना!

सुधीरजी लेख पटला नाही बघा.. मात्र लेख वाचून बरेच प्रश्न पडलेत.. तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा आहे. तुमच्या काही विधांनांनी मला जरा संभ्रमित केलय.
नानाचे सिनेमा व्यतिरिक्त कतृत्व, त्याचे मार्गदर्शन घ्यावे इतके कुठे दिसले वा वाचले नाही. माझ्या माहिती प्रमाणे तसे काही नाहीच. पण नानाने संधी मिळाल्यावर काही रचनात्मक संदेश देण्याऐवजी समाज कसा रसातळाला गेला आहे आणि इथली घाण साफ करण्यासाठी इथले राजकारणी आणि व्यवस्था किती नालायक आहेत असे काहीसे रडगाणे त्याच्या अग्रलेखात गाईले.
तुम्हाला काय वाटतं काय करायला हवं होतं नानाने अतिथीसंपादक झाल्यावर?? रचनात्मक संदेश वगैरे द्यावे म्हटले,तर कुठलेही उल्लेखणीय कर्तुत्व नसलेल्या नानाचे (तुमच्या मतानुसार) संदेश देणे तुम्हाला पटले असते काय?? इथं भल्याभल्यांच ऐकत नाहीत लोकं, मग कोणा ऐर्‍यागैर्‍याचे का म्हणुन ऐकतील?? हा कोण आला शहाणपणा शिकवणारा अशी हेटाळणी तुमच्यासहित सगळे करतील की नाही सांगा?? नानाचं ही काहिसं तुमच्यासारखच मत दिसतय बहुतेक. त्यामुळेच त्याने स्वतःबद्दल फार आव न आणता एखादा सामान्य माणूस जसं भाष्य करेल तसंच काहीसं लिहिलं आहे. कारण राजकारण आणि एकंदरितच सगळी परिस्थिती कौतुक करण्यासारखी आहे यावर कोणाही सामान्याचा विश्वास बसणार नाही. आण्णा हजारेंवर त्यानं लिहीलेलं तर तंतोतंत पटतंय बघा.. मागे सत्याग्रहाच्या वेळी राजघाटावर 'भारतमाता की जय' म्हणुन घोषणा देणारा त्यांच्या चेहारा आठवुन पहा (किंवा तुनळी व पहा).. खुप मनापासुन जय म्हणणारे आण्णा आणि त्यांच्या मागे बेरकी नजरा घेऊन उभे असणारे टिम अण्णा मधले काही सदस्य बघा.. खरच वाटुन जातं की हे आण्णा म्हणजे एक निरागस माणुस आहे न त्यांना उपासाला बसवणारे काही लोक खरच बोके आहेत. ( हे माझं वैयक्तिक मत आहे)

In reply to by आनन्दिता

"तुम्हाला काय वाटतं काय करायला हवं होतं नानाने अतिथीसंपादक झाल्यावर?? " अहो त्यांचं म्हणणं असं आहे की नानाची अतिथीसंपादक व्हायचीच लायकी नाही. त्यामुळे त्या पुढचा प्रतिसाद गैरलागू ठरतोय. असो.

ही काय गेम आहे? शीर्षक वेगळं आणि लेख तोच? जुने प्रतिसाद कुठाहेत? यात संपादकीय शक्तींचा हात तर नाही? ;)

नानाला तुम्ही किती ओळखता हो ? नाना नुसता कलाकार म्हणुन नाही तर माणुस म्हणुन ही खुप चांगला आहे,मुंबईच्या दंग्यात हाच नाना दंगेखोरांना थांबवायला रस्त्यावर उतरला होता,याची काही माहिती आहे का तुम्हाला ? आंनदवानात जाउन बिनबोबाट कुष्ठरोग्यांची सेवा करतो याची काही माहिती आहे का ? माई संकपाळांच्या अनाथालयाला भरगोस मदत करतो याविषयी का कल्पना आहे ? समाजात असे किती कलाकार आहेत जे आपली संवेदना जपतात, उगच देवांने तोंड दिलय म्हणुन बोंबच मारायची का ? जरा दुसर्‍याच काही चांगल्या गोष्टी ही पहात जा अ‍ॅसिडीटी अंमळ कमी होईल तुमची....

In reply to by बाबा पाटील

हे सगळे तथाकथित सामाजिक उद्योग लष्करे तोयबापण करते म्हणे. सामाजिक काम करणे म्हणजे आनंदवनाची पिकनीक नाय बाबा !!

In reply to by सुधीर मुतालीक

आजच नानाला पद्मश्री जाहीर झालाय... उगिचच्या उगीच दिला असेल नाही का हो?. आता तुम्ही नानाला डायरेक्ट लष्करे तोयबाशी वैग्रे कंपेअर करताय मग " सरकार् चे डोके ठिकाणावर आहे काय" असला एखादा धागा काढा की!!

In reply to by आनन्दिता

इतर कलाकारांपेक्षा तो वेळ आणि संधी मिळाली की सध्याच्या व्यवस्थेवर बोलतो इतकच. बाकी पद्मश्री 'कला' या क्याट्यागरीत मिळाली आहे. जी सैफला पण त्याच्या आधी मिळाली आहे.

In reply to by सुधीर मुतालीक

तुम्हाला काविळ झालीय का हो ? काय आहे काविळीत माणसाला सगळेच पिवळे दिसु लागते,आनी त्याचा ज्वर वाढला की असबंद्ध बडबड करतो...

भर जानेवारी २०१३ मधे नानाने इंग्रजाला बोलावलं तरी इंग्रज येणार नाही हे नानालाही माहिती आहे. पण सध्याच्या सडलेल्या व्यवस्थेवर रोष व्यक्त करायचा तो एक मार्ग आहे. आजच्या राजकीय पक्षांतला एकतरी निष्कलंक नेता दाखवून द्या की ज्यामुळे आम्ही आमच्या देशाचा अभिमान बाळगावा. जे गाजावाजा न करता समाजकार्य करत आहेत त्यांच्याविषयी आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण भ्रष्ट व्यवस्थेपायी हे त्यांचे श्रमही मातीमोल होत आहेत. अशा वेळेस 'आपण काही करु शकत नाही' या असहाय भावनेने कुठल्याही देशप्रेमी माणसाची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.

In reply to by तिमा

तसही बोलवायची काय गरज आहे इंग्रजांना आप्लयावर तशीही परकिय सत्ताच आहे. हं! आता ती इंग्रजांची नसुन इटालीयन आहे ही गोष्ट वेगळी.

आयला शीर्षक वाचून वाटलं आपल्या नान चेंगट रावांनी आघ्रीव्लेख लिवला का काय. तसा नसला तर रावन्द्या, काय जगबुडी आली न्हाई आजूक ;)

तुमचा आक्षेप नट-नट्यांवर आहे की नानावर? नाना इतरांपेक्शा नक्कीच वेगळा आहे. सिनेमातल्या नानाला सोडा पण जो इतर माध्यमातून समोर आलाय तो बेधडक, तोंडाळ, धीट, मेहनती, जहाल नाना.. त्याला मी , माझ्यासारखे कैक कित्येक वर्ष बघतोय. अगदी तो नाटकात कामं करायला लागल्यापासून.. तो चित्रपट सृष्टीत वाहात गेलेला कार्टा नाही की पार्ट्यांमध्ये रमणारा नाही. त्याला न्यूज बनवायला लागत नाही ती बनते. सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेत. नुसते पैसे फेकून सामाजिक कार्य केल्याचा आव न आणता त्याने स्वतः श्रम दिलेत आनंदवनात. तो थेट भिडतो माणसांना, प्रसंगाना. विचार करुन बोलेल तर नाना कसला, त्याचं जे येतं ते थेट आतून. आणि इंग्रजांबद्दलच त्याचं मत आहे ते वैफल्यातून आलय, जे 'नाना' काय चीज आहे ते जाणतात तेच समजू शकतील. अर्थात नानाने अजून काही वेगळं आणि चांगलं सांगायला हवं होतं का? तर तो त्याचा प्रश्न आहे, पण ठरवून, चांगलं सांगायचं म्हणून भंपक चित्र रंगवण्यापेक्षा थेट लिहिलेलं आवडतं काही लोकांना वाचायला. जे निरक्षीरविवेक बाळगून आहेत त्यांनी भावना बाजूला ठेवून बुद्धीने चांगलं काय ते घ्यावं त्यातलं. (नानाचा जमिनीवर पाय असलेला नट म्हणून चाहता) - उपास

In reply to by उपास

सहमत!! नानाच्या 'नाना' सदगुणांची चाहती - आनन्दिता