Skip to main content

वाघ्या हौश्या (एक आठवण)

Published on गुरुवार, 03/01/2013
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो. गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता. त्यामुळ दिवसभर शाळत असल तरी काय बी वाटत नव्हतं. आईनं आवाज दिला म्हणून जरा नाखुशीनच उठलो. जा लवकर उरकून घे साळत जायचं ना? हा जायचंय पर अजून लय येळ हाय -मी आरं लवकर उठून अंघुळ करून अभ्यासाला बसावं, सकाळी सकाळी ध्यानात राहत -आई म्हणाली आईच आणखीन टुमाकनं नको म्हणून मी बरं बरं म्हणलो नि आंघुळीला नदीवर निघालो. तेवढ्यात अप्पा म्हणाले.आरे अनिल माझ्या बरुबर चल बैलांना पवनी घालायची हाये. मी आनंदाने लगेच हो म्हणालो कारण माझे आवडते काम होते. जाता जाता मी म्हणालो -आप्पा आज मधीच बैलांना पवनी कशाकरता, मंगळवारी पवनी घालत्यात ना? आरे आज आत्याला आणायला पुनावळ्याला जायचंय तव्हा वाघ्या हौश्याच्या बैलगाडी न्यायचीय. मी लगेच म्हणालो आप्पा मला पण ने ना. आरे घरातली सगळीच माघं लागल्यात रामू दादा , सुमी वश्या सगळीच रडायला लागल्यात न्याव म्हणून. पण आप्पा मी तुझ सगळ ऐकतो ना? मग तू फक्त मलाच ने. बर बघू घरी गेल्यावर असं म्हणून आप्पानं बैल नदीत घातली आणि चांगली चोळून काढली त्यांच्या मांड्या वरील शेणाचे डाग घासून काढले. बैल पाण्याबाहेर काढल्यावर शुभ्र दुधावानी दिसू लागली. बाहेर काढल्यावर आप्पाने त्यांच्या पायात काळे गंडे बांधले.मी विचारले हे काय बांधतोय. आरे आपली गाडी पाच सहा गावं पार करून जाणार जो तो आपल्या बैलांकडे बघणार तव्हा वाघ्या हौष्याला दृष्ट नको लागाय. ह्या काळ्या दोरयानी दृष्ट लागत न्हाय? मी विचारलं न्हाय लागत मंतरलेला हाय हा गंडा , अस म्हणून आम्ही घरी निघालो. घरी पोहोचेपर्यंत मी मला ने म्हणून आप्पाला इस एक दा म्हणालो. घरी गेलो तर रामू दादा सुमी वश्या सगळी उरकूनच बसली होती. आप्पांनी गाडी जोडली तव्हा सगळ्या पोरांची रडारड चालू झाली. आप्पाला प्रश्न पडला कोणाला न्याव म्हणून. तेवढ्यात आण्णा शिमटी घेऊन आला. आण्णाला पाहताच रामू दादाने नि वश्याने धूम ठोकली. मी आणि सुमी घाबरून जाग्यावरच रडत थांबलो. तरी आण्णाने एक एक ओढलीच आम्ही दोघांनीही भोकाड पसरले. मग अप्पांनी जवळ घेऊन आमची समझूत काढली. सुमीला आत्याला सोडायला नेईन म्हणून समझुत काढली नि तिला चार आणे दिले ति तेवढ्याने खुश झाली. मला हळूच म्हणाले जा पळ कपडे घालून ये मी उड्या मारीतच घरात पळालो. घुंगरमाळा घातलेली खिल्लारी बैलाची गाडी धुरळा उडवत निघाली. मी आप्पाचा लाडका होतो म्हणूनच आप्पांनी मलाच बरोबर घेतले होते. एक शिमटी खावी लागली म्हणा. एखादे गाव जवळ आले कि मी आप्पाच्या हातातला कासरा माझ्याकडे घ्यायचो. गावातली माणसं पोर आमच्याकडे टुकू टुकू बघायची त्यांना वाटायचे एवढसं पोरगं गाडी हाकतंय आणि तीही खिल्लारी बैलांची माझा ऊर अभिमानाने भरून यायचा, लय मजा यायची. आत्याच्या गावी पोहचलो तिथंही आमच्या खिलारी बैलांचे कौतुक झाले. जेवण खावन उरकून आम्ही चार वाजता आत्याला घेऊन निघालो.मारुन्जीची शिव ओलांडून आम्ही मानच्या पान्धीत गाडी घातली (आता तिथ आय टी पार्क आहे ) दोन्ही बाजूंनी दाट झाडी दिवस मावळायला आला होता त्यामुळ तिथ थोडा अंधार पडल्यागत वाटत होता. तेवढ्यात झाडीतून एक धिप्पाड माणूस बाहेर आला. नि गाडीला आडवं होत म्हणाला पाव्हनं तमाकू द्या जरा. आप्पांनी त्याच्याकडे पहिले नि त्यांच्या मनात काय आले ते म्हणाले सरा बाजूला मी न्हाय तमाकू खात तो माणूस गाडीला आडवा होऊन गाडी थांबवायला बघत होता. नि आप्पा गाडी जोरात हाकायला बघत होते. तेवढ्यात अजून तिघेजण झाडीतून बाहेर आले. नि गाडीला आडवे झाले. नि आत्या सुद्धा ओरडली आप्पा गाडी पळव हे चोर हायेत. ते चौघेही गाडीच्या समोर होते नि बैलांच्या येसणी धरायला पाहत होते आत्या ओरडताच आप्पांनी बैलांच्या अंगावर कासरा टाकला नि त्यांच्या शेपट्या पीरगळाल्या वाघ्या हौश्या ने अशी काही मुसंडी मारली कि चोरांना झक मारून बाजूला व्हायला बाजूला होता होता त्यातील दोघे पडले. मी पार घाबरून गेलो होतो.आप्पा आत्याला म्हणाला कि पोराला निट धर . आत्याने माळा पोटाशी धरले. तरीही मी आत्याच्या कुशीतून मागे पाहत होतो. आडवा हौश्या अशी काही उधळली कि मागे फक्त धुरळाच दिसत नि त्या धुराळ्यात गाडीमागे पळणारे दोघेजण दिसत होते. बराच वेळ आमच्या गाडीचा पाठलाग चालू होता. परंतु पुढे मान गावाची एक वाडी लागली नि चोरांनी पाठलाग थांबविला. वाडीवर आल्यावर आप्पाने गाडी थांबवली. बैलांच्या तोंडातून फेस गळत होता. आप्पा खाली उतरला नि त्यांच्या पाठीवर थोपटले. तेवढ्यात पारावर बसलेली काही माणसं जवळ आली. त्यातील काहीजण आप्पाला ओळखीत होते.त्यातील एकजण म्हणाला काय झाल ओ पाव्हन आप्पांनी सारी हकीकत सांगितली ते म्हणाले आव पाचच्या नंतर पान्धीतून कुणीच येत न्हाय मागच्या आठवड्यातच दोघांना त्य चोरांनी लुटलं हुतं बर झाले ह्या बैलांनी तुम्हाला वाचविले भारी हाय खिल्लारी जोडी चांगलं जपा त्यांना. आप्पाने हो म्हणून मान हलवली नि आम्ही निघालो. घरी आल्यावर आत्याने सारा प्रसंग सगळ्यांना सांगितला. आण्णा म्हणाले पुरण पोळीचा सयपाक करा नि चांगल्या पाच पाच पोळ्या वाघ्या हौष्याला चारा आज आपल्या पोरीची अब्रू नि डाग दागिने वाचावाल्यात त्यांनी. पुढे जवळ जवळ चौदा वर्षे हि जोडी आमच्या कडे होती. पंधरा दिवसाच्या अंतराने हि जोडी गेली आम्ही त्यांना आमच्या शेतातच पुरले
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 5815
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

खुपच सुंदर... लहानपणीच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.. आम्ही सर्व भावंडे काकासोबत उन्हाळ्यात शेतात जात असु.. तेव्हा शहरातुन आल्यामुळे, ते बैलगाडित बसुन शेतात जायचे, कैर्‍या खायच्या हे खुप मस्त वाटायचे. शेतात एक ओढापण होता.. त्यात मस्त आंघोळ करायची.... वा.. काय मस्त दिवस होते ते...

छानच झाली आहे गोष्ट. मोठ्या माणसाने लहान मुलाच्या नजरेतून लिहिलेली गोष्ट. आवडली.

छान आठवण अमोल केळकर मला इथे भेटा

गावची भाषा, एका लहान मुलाच्या डोळ्यातून पाहिलेले जग, आणि बैलांबद्दलची आत्मीयता. छान लिहिलंय.

खिल्लारी बैलं! आमचा सावळ्या आठवला. जवळ गेलं की खांद्यावर मान टाकणारा. त्याला लहाणपणापासुन एका बाईनं सांभाळल होत म्हणे. फारच पैशाची गरज लागली तेंव्हा विकला होता. एव्हढ मोठ जनावर पण अस सायीगत मऊ! एकदा त्याचा पाय मुरगळला तर गाडीत घालुन घरी आणेपर्यंत नुसता थरथर कापत होता. मग घरी आम्हाला पहिल्यावर त्याच्या जिवात जीव आला. पुढे जवळ जवळ पंधरा दिवस बिन कासर्‍याचा परड्यात फिरत होता लंगडत. पण साध शिंग सुद्धा नाही हलवल कधी. फार छान लिहिलाय प्रसंग तुम्ही तापकिरे.

निश आणि धनंजय धन्यवाद, धनंजयजी मि मुलखेड या गावचा आहे मारुंजी पासुन ९-१० कि मि लांब आहे .माण च्या पुढे ३ कि मी

In reply to by अनिल तापकीर

अच्छा. मारुंजीचा रोजचा संबंध येत होता. मी त्याच गावातुन ऑफिसला जात होतो. पण १५,२० दिवस झाले ऑफिसवाल्यांनी तो रोड आता फ़क्त गावकर्‍यांसाठी ठेवला आहे. मस्त गाव आहे. पण आता बर्‍याच लोकांनी शेती विकली असे दिसते आहे. माण गावातुन एकदाच गेलो आहे.

In reply to by अनिल तापकीर

माण, मारुंजीचा उल्लेख आणि आपले आडनाव वाचुन आपल्याला हेच विचारणार होतो कि तुम्ही मुलखेडचे का? माझे गाव 'भरे'. लिखाण छानच!

धनंजय्,टुकुल्,रेवती, आणि ५० फक्त धन्यवाद धनंजयजी तिकडे बहुतेक जमीन विकली गेली आहे इकडे आमच्याकडे म्हणजे चांदे मुलखेड, भरे इकडे थोडिफार शिल्लक आहे

तीस वर्ष्यापुर्विच्या वातावरणात घेउन गेलेली हि कथा खुप खुप आवडली धन्यवाद, तापकीरसाहेब

मस्त वाटलं कथा वाचून. आमच्या शेर्या-नंद्याची आठवण झाली. धन्यवाद :)

तापकीरसाहेब लेखन आवडले... एकेकाळी मी बैलांकडे एखाद्या लैला कडे पहावे तसे पाहात असे. त्याचे वशिंड , शिंगे , चाल , ( त्याला पौंडा असा शब्द होता ) अश्या गुण विशषण , वर्णन करीत असे . गावात नवा बैल आला की पाहायला जात असे. आता आठवून हसू येते आणि गेले ते दिवस म्हणून वाईट सुध्दा वाटते.

आमचाहि एक बैल होता अ‍ॅक्च्युली आजोबानी विकत घेताना असेच दोन बैल एकत्र विकत घेतले होते . बिस्त्या आणि बब्या अशी नावं होती . पण बब्या पाचच वर्ष जगला घेतल्यानंतर . बिस्त्या मात्र म्हातारा होउन मेला . त्यालाहि आमच्याच शेतात पूरलं . आज्जी खुप रडली होती . उन्हाळ्याच्या सुट्टित घडलेला प्रकार त्यामुळे अगदी डोळ्यासमोरचा . बिस्त्या तलकिरी रंगाचा भारदस्त बैल होता . दूरच्या शेतात अगदि काम करता करता मेला . काकानी त्याला बैलगाडीत घालुन गोट्यात आणलं होतं . तो बैलगाडीत नीट पूरत नव्हता एवढा मोठा . मला आठवतय त्याप्रमाणे त्याचे हात पाय गाडी सोबत बांधले होते . काकांनी त्याला रानातल्या शेतात न पूरता गोट्याजवळच्या शेतात पूरलं . त्याठिकाणी डाळींबीचं झाड लावलं . आजहि बिस्त्याची आठवण काढली जाते .

ग्रामिण जीवनातले असे हे अनुभव वाचल्यावर खूप हेवा वाटतो. छान लिहिलयं.

सुरेख लिहलंय. ६-७ वर्षांपुर्वी आम्हीही बेल्ह्याच्या बैलबाजारातून दोन गोर्हे विकत घेतले होते. खुपच दणकट नि चपळ होते. जसं जसं वाढू लागले तसं तसं आम्हाला खात्रीच पटली कि अशी जनावरं आमच्या अख्ख्या वाडीत कोणाकडंच नव्हती.

खूप सुरेख लिहिलंय. माझ्य पणजोळी एक गाय होती, मोठी शहाणी आणि गुणी होती. तिची आठवण झाली हे वाचून.