✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

व
विकास यांनी
Fri, 01/11/2013 - 21:14  ·  लेख
लेख
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे. तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला. आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली: Sagarika Ghose says sorry Chetan Bhagat apology Pierre Fitter of India Today Pierre Fitter of India Today मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे: Media misleads ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे. ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात... अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51196 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

काँट्रॉव्हर्सी होत नसेल तर ती

आनन्दिता
Fri, 01/11/2013 - 23:43 नवीन
काँट्रॉव्हर्सी होत नसेल तर ती तयाऱ करा , हे आपल्या प्रचार माध्यमांचं वर्क कल्चर बनलंय.. आता राष्ट्र्पतींचा दिवटा व इतर काँग्रेसी मंडळी या संवेदनशील विषयावर रोजच अशी बेताल वक्तव्ये करू लागल्याने त्यात नवा मसाला असा काही उरला नव्हता. मग तो तयार करण्यासाठी संघासारखा दुसरा पर्याय होउच शकत नाही.. अशात भागवत कुठेसे भाषणाला गेलेत असं ऐकुन काहीतरी मिळेल या आशेने जमलेल्या बिचार्या माध्यमांच्या हातात 'तसं ' काहीच आलं नाही.. तरीही निराश न होता त्या खत्रुड पत्रकारांनी भागवतांचे जे काही शब्द मिळाले त्यांनाच तोडुन मोडून आपल्याल हवं तसं मोल्ड करुन, काँट्रॉव्हर्सी तयार करण्याचं आपलं काम चोख पार पाड्लं... गरज आहे तिथे न बोलणार्या व नको तिथे उच्छाद मांडणार्या मिडीयाला आणि सनसनीखेस बातम्यांनाच भीक घालणार्या प्रेक्षकांना देव सदबुद्धी देवो. बास्स.
  • Log in or register to post comments

आभार

संचित
Sat, 01/12/2013 - 00:22 नवीन
हे लक्ष्यत आणून दिल्याबाबत आभार. बाकि स्वतःला विद्वान् समजणार् या टाइम्स ने बरेच आकडे अणि टक्केवारी प्रसिद्ध करण्यात वेळ घालवला. जरा युट्युब विडिओ पण पहिला असता तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments

जे आडात असते तेच पोहर्‍यात येते...

योगप्रभू
Sat, 01/12/2013 - 00:27 नवीन
ज्या देशातील समाजाची जशी जाण/आवड/मानसिकता/पातळी तीच तेथील प्रशासन व्यवस्था, राजकारण, प्रसारमाध्यमे, साहित्य आणि दैनंदिन व्यवहारांत प्रतिबिंबित होते.
  • Log in or register to post comments

+ ∞

दादा कोंडके
Sat, 01/12/2013 - 01:10 नवीन
भारतात 'हे असं का?' याचं उत्तर हेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

अप्रामाणिकपणा..??

मोदक
Sat, 01/12/2013 - 00:32 नवीन
पद्मश्री सुचेता दलाल (यांच्या अधिक कार्याबद्दल माहिती नाही पण जनजागृतीमध्ये आहेत असे ऐकून आहे) यांच्या मनीलाईफ फाऊंडेशनच्या एका सेमीनारमध्ये मिडीया आणि करप्शन यावर एक शॉर्ट फिल्म दाखवली होती. गावपातळीवरच्या वर्तमानपत्रापासून नीरा राडीया केसपर्यंतचे बरेच काही होते त्यामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे प्रभु चावला, वीर संगवी अशी अनेक "व्हूज व्हू" (?) अचानक का गायब झाली ते कळाले. बाकी "प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा" ही खंग्री द्विरूक्ती झाली.. :-D
  • Log in or register to post comments

लेख पटला.

दादा कोंडके
Sat, 01/12/2013 - 02:03 नवीन
पण याउप्पर सद्यस्थिती बघून असं वाटतं की राजकारण्यांना जर कुणाची भिती वाटत असली तर ती माध्यमांची. एखाद्या स्टेटमेंटची अकाउंटॅबिलिटी विचारण्याची शक्ती फक्त माध्यमांकडेच आहे. परवाच चेपूवर एकाने हा विडिओ टाकला होता. नक्की बघा.
  • Log in or register to post comments

सहमत

विकास
Sat, 01/12/2013 - 02:15 नवीन
एखाद्या स्टेटमेंटची अकाउंटॅबिलिटी विचारण्याची शक्ती फक्त माध्यमांकडेच आहे.
सहमत. म्हणूनच तर माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणातात. फक्त माध्यमांनी त्यांचे काम हे अलिप्तपणे करायला हवे - अर्थात कुठल्याही विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणून नाही. शहारूख - जुही चा या संदर्भात मेसेज देणारा (पण विशेष न चाललेला) "फिर भी दिल है हिंदूस्थानी" हा चित्रपट या संदर्भात आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

लेखाचा विषय आणि त्याचे

निनाद मुक्काम …
Sat, 01/12/2013 - 03:36 नवीन
लेखाचा विषय आणि त्याचे सादरीकरण ह्यामुळे तुम्ही दिलेल्या शीर्षकाला लेख जागतो. माझ्या मागच्या मलालाच्या लेखात तिचे उदाहरण एक निमित्त होते मात्र लेखाची सुरुवात आपण प्रसार माध्यमांच्या आधीन का आहोत असे लिहिले होते , परकीय प्रसार माध्यमे व त्यांच्याकडून प्रेरित आपली देशी प्रसार माध्यम सवंग बनत चालली आहेत , आज सागरिका ह्यांनी जेव्हा सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली तेव्हा मला हा संघाचा विजय वाटण्यापेक्षा सोशल मिडियाचा विशेषतः तू नळी व थोबाड पुस्तक व टीव टीव चा विजय वाटला , मूळ भाषण उपलब्ध असल्याने हरी तात्यांच्या भाषेत पुराव्याने ह्या माध्यमांची लबाडी शाबीत झाली , ह्या आधी गडकरी ह्यांच्या बाबतीत हाच प्रकार झाला होता. आज आठवण होत आहे त्या ब्लॉगर ची ज्यावर अश्याच एका पंचतारांकित पत्रकारितेने तिच्या विरुद्ध लेख लिहिला म्हणून कोर्टात खटला भरला होता. कुत्रा माणसाला चावला ही साधी बातमी होऊ शकते मात्र माणूस कुत्र्याला चावला ही मसालेदार बाजारू बातमी होऊ शकते , व लोकांचे जास्त लक्ष वेधून घेते म्हणून साधी बातमी चे मसालेदार बातमीत रूपांतरण करण्याकडे प्रसार माध्यमांचा कटाक्ष असतो.
  • Log in or register to post comments

तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 04:47 नवीन
एखाद्याने जे म्हटलंच नाही ते त्याने म्हटलं असा दावा करणं हे कुठच्याच माध्यमाला शोभत नाही. कोणीतरी मुळात ती चूक केली, आणि ती बातमी पसरवणारे काही जण क्षमा मागत आहेत हे उत्तमच. अशा तांत्रिक चुका कुठच्याच कारणाने होऊ नयेत झाल्या तर लवकरात लवकर निस्तरल्या जाव्यात. मात्र लोकांचा यावर विश्वास बसला यात आश्चर्य वाटण्यासारखं नक्की काय आहे? संघ स्त्री-पुरुष भेदभाव करतो हे जगजाहीर आहे. संघाच्या वेबसाइटवर हे सापडलं. Expressed in the simplest terms, the ideal of the Sangh is to carry the nation to the pinnacle of glory, through organising the entire society and ensuring protection of Hindu Dharma. ध्येय अर्थातच उदात्त आहे. मात्र हे करणार कोण? तर स्वयंसेवक. आणि स्वयंसेवक कोण? संघाच्या घटनेप्रमाणे, - Any male Hindu 18 years or above, who subscribes to the Aims and Objects of the Sangh and conforms generally to its discipline and associates with the activities of the Shakha will be considered as a Swayamsevak. म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही. या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. अर्थातच संघाने हे कुठे जाहीर म्हटलेलं नसल्याने तशी बातमी देणं तांत्रिकदृष्ट्या चूकच होईल. पण मूलभूत तात्विक पातळीवर सगळेजण ते मानतात हे उघड आहे. 'मी हे वाक्य म्हणालोच नव्हतो, माझी माफी मागा' असं खुशाल म्हणता येईल. पण जोपर्यंत या तात्विक भूमिकेत बदल होत नाही, तोपर्यंत त्याला नक्की काय अर्थ आहे? सरसंघचालक जर खरोखरच स्त्रीपुरुष समानता मानत असतील, तर तो male शब्द घटनेतून काढून टाकता येतो का बघा म्हणावं.
  • Log in or register to post comments

तुम्ही चुकताय भाऊ

अर्धवटराव
Sat, 01/12/2013 - 07:56 नवीन
>>म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही. -- अर्थाचा अनर्थ कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे असले दावे. इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं स्विकृत जबाबदारी" असा अर्थ घेऊन बघा आहे. असो. संघाच्या कार्यात स्त्रियांनी किती आणि काय योगदान दिलय हा वेगळा विषय आहे. >> या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. -- पुरुषांना उच्च समजायचा आणखी एक (चुकीचा) अर्थ. संघाचा संपूर्ण भार संस्कार देण्यावर आहे... आणि संस्कार देण्याचं काम घरातली स्त्रि जास्त उत्तम करु शकते ये संघाला निश्चित समजतं. शिवाय बाल संगोपन आणि घर सांभाळणे - स्वयंपाक घर खासकरुन- हे आपल्या करता जरी "इतर काम" क्षुल्लक असले तरी याच दोन घटकांवर कुटुंब-समाज-राष्ट्राचा गाडा सावरु शकतो, तेंव्हा ते इतकं हलक्या प्रतिचं नाहि असं वाटण्यास जागा आहे. माणासाची प्रथम शाळा त्याचं घर असतं आणि स्वयंपाक घर हे (निदान मध्यम आणि कनिष्ठ वर्गीयांसाठी) पैसा, आरोग्य, सामाजीक संबंध सांभाळाण्याचं महत्वाचं व्यासपीठ आहे. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 10:39 नवीन
इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं स्विकृत जबाबदारी" असा अर्थ घेऊन बघा आहे.
स्वयंस्वीकृत जबाबदारी ही संघाने घेतलेली आहे यात वादच नाही. पण अशी जबाबदारी घेण्यासाठी जे कार्यकर्ते निवडलेले आहेत ते फक्त पुरुष असले पाहिजेत अशी अट आहे. ती अट इतकी महत्त्वाची आहे की ती घटनेमध्येच अंतर्भूत केलेली आहे. त्यावरून काय बोध घ्यायचा? जाहीर भाषणांपेक्षा लिखित घटना, आणि ती पाळण्याची कसोशी अधिक स्पष्टपणे बोलते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

त्यावरून काय बोध घ्यायचा?

अर्धवटराव
Sat, 01/12/2013 - 10:53 नवीन
क्लॅरीटी ऑफ थॉट्स म्हणतात त्याला. "जबाबदारी देणे" हि फार जबाबदारीने करायची गोष्ट आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आरएसएस चीच महिला स्वयंसेविका

मृत्युन्जय
Sat, 01/12/2013 - 10:55 नवीन
आरएसएस चीच महिला स्वयंसेविका संघ ही एक शाखा देखील आहे हे गुरुजींना कदाचित माहिती नसावे. संघाने महिलांना चळवळीतुन वगळले नसुन त्यांची केवळ एक वेगळी शाखा आहे एवढेच. जसे भावे हायस्कूल ही फक्त मुलांची शाखा आहे. म्हणुन काय भावे हायस्कूल मुलींना दुय्यम दर्जाचे मानते आणि त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारते असे मानावी की काय? तसेच हुजुरपागा केवळ मुलींची शाळा आहे म्हणुन ती शाळा पुरुषांना दुय्यम दर्जाची मानते आणि त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारते असे म्हणावे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सेपरेट बट इक्वल?

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 11:25 नवीन
हे सेपरेट बट इक्वल डॉक्ट्रीन वाटतं. आणि 'महिला स्वयंसेविका संघ'? तुम्हाला 'राष्ट्रीय सेविका समिती' म्हणायचं आहे का? "Laxmibai Kelkar was the founder of Rashtra Sevika Samiti. Before starting the organization she visited Dr K.B. Hedgewar in 1936 and had a long discussion with him to convince Dr Hedgewar about the need for starting a ladies wing in Rashtriya Swayamsevak Sangh itself, but Dr Hegewar refused." (विकीपेडिया) समितीच्या साइटवर हे सापडलं. Women constitute the very backbone of the family. They simultaneously play multiple roles: Caring-providing nutrition, nursing, maintaining hygiene and sanitation, taking care of ecology, bringing up children, and a host of other roles......All the above mentioned duties of a women could be summarized in a single word “Matrutva” (Enlightened Motherhood) थोडक्यात घरकाम, बालसंगोपन, स्वच्छता आणि मातृत्व. आणि हो प्रमिला मेढेंच्या मते या बलात्कार वगैरे घटना भारतातच घडल्या आहेत. इंडिया असा शब्द वापरलेलाच नाही त्यांनी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कृपया पूर्ण वाचा

पैसा
Sat, 01/12/2013 - 11:58 नवीन
त्यंच्या उद्देशांमधे फक्त मातृत्व नाही तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे सुद्धा यात अंतर्भूत आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे उपाय शिकवणे असणि इतर अनेक गोष्टी आहेत. महिलांना कोणत्याही प्रकारे कमी दर्जा आणि रा स्व संघाचे पुरुषी वर्चस्व नाही तर महिलांचे स्वतंत्र नेतृत्व या संस्थेत आहे. हे सगळे मी फक्त वाचून आणि ऐकून लिहिते आहे. कारण माझ्या डोळ्यावर कोणताही चष्मा नाही. मी राष्ट्र सेविका समितीशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. असलेच तर मी ज्या कर्मचारी युनियनचे काम करते त्यांच्या पेरेंट कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित आहे. पण कोणालाही गैरसमजातून नावे ठेवली जाऊ नयेत, कारण इथे राष्ट्र सेविका समितीची बाजू मांडायला कोणी येण्याची शक्यता नाही. ती अत्यंत लो प्रोफाईल संघटना आहे. गाजावाजा न करता महिलांना सबल करण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्षे करत आहे याबद्दल महिला मुक्तीवाल्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

त्यंच्या उद्देशांमधे फक्त

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 12:46 नवीन
त्यंच्या उद्देशांमधे फक्त मातृत्व नाही तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे सुद्धा यात अंतर्भूत आहे.
समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट समिती' पानावर फक्त मातृत्वाचा उल्लेख आहे.
पण कोणालाही गैरसमजातून नावे ठेवली जाऊ नयेत, कारण इथे राष्ट्र सेविका समितीची बाजू मांडायला कोणी येण्याची शक्यता नाही. ती अत्यंत लो प्रोफाईल संघटना आहे.
उद्देश नावं ठेवण्याचा नव्हता. सरसंघचालकांची विधानं काय आहेत याचा विकास यांनी अत्यंत समर्पक आढावा घेतला आहे. त्याच अनुषंगाने तात्विक भूमिका काय आहे याचा ऊहापोह चालू होता. समिती लो प्रोफाइल आणि संघ हाय प्रोफाइल, यातच बरंच काही दिसून येत नाही का?
गाजावाजा न करता महिलांना सबल करण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्षे करत आहे याबद्दल महिला मुक्तीवाल्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे.
स्त्री-मुक्तीला समितीने दिलेलं योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. संघाप्रमाणे समितीची घटना आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट

पैसा
Sat, 01/12/2013 - 14:09 नवीन
समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट समिती' पानावर फक्त मातृत्वाचा उल्लेख आहे.
http://rashtrasevika.org/about-us/ideals-for-women/ इथे इतर गोष्टी पहायला मिळतील. http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Sevika_Samiti
समिती लो प्रोफाइल आणि संघ हाय प्रोफाइल, यातच बरंच काही दिसून येत नाही का?
मला वाटते संघाचे काम सुद्धा आवाज न करता चालू असते. त्यांना बरीवाईट प्रसिद्धी मिळते ती इतरांकडूनच.
स्त्री-मुक्तीला समितीने दिलेलं योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. संघाप्रमाणे समितीची घटना आहे का?
याबद्दल मी आधीच लिहिले आहे की मी कोणत्याही प्रकारे रा.से.स. शी संबंधित नाही. पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांना जवळून ओळखते. या सर्वच्या सर्व महिला घर संसार, मुले, नोकरी, समितीचे काम सांभाळून इतर सामाजिक कार्यांत उत्साहाने भाग घेत असतात. अतिशय सुसंस्कृत, चतुरस्त्र, आणि तडफदार असे प्रभावी व्यक्तिमत्व असेच मी सगळ्यांचे वर्णन करीन. त्यांच्यावरून समितीमधे घरकोंबड्या बायका तयार करत नसावेत हा माझा अंदाज. पण तरीही त्यांच्यापैकी एखादीकडून समितीच्या कार्याबद्दल लेख मिळवायचा नक्कीच प्रयत्न करीन. या लेखाच्या विषयाला सोडून फारच अवांतर होत आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ओ एम जी...

विकास
Sat, 01/12/2013 - 11:12 नवीन
||| म्हणजे संघाची उदात्त ध्येयं साध्य करण्याची परवानगी संघ स्त्रियांना देत नाही. या दोन ओळींच्या मध्ये लिहिलेलं सत्य हेच आहे, की संघ पुरुषांना उच्च समजतो, आणि स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. ||| असं दिसतयं की तुम्हाला रा.स्व. संघा प्रमाणेच राष्ट्रसेवीका समिती देखील आहे ह्याची कल्पनाच नाही. :( या राष्ट्रसेवीका समितीच्या संस्थळावर लिहील्याप्रमाणे:
Pujaneeya Doctorji reiterated that in the interest of both the organisations, Sangh and Samiti should function independently but with mutual co operation, just like the parallel lines which go in the same direction, but never meet maintaining a specified distance between them. He promised all help and guidance in the beginning and abided by it. Still he stressed that Samiti should function independently.
आता कदाचीत तुम्ही असे म्हणाल की राष्ट्र सेवीका समिती पुरूषांना का येऊ देत नाही म्हणून... पण संघ आणि समिती त्यांच्या समान ध्येयाबाबत सुस्पष्ट आहेत. त्याच बरोबर त्यांना स्त्री-पुरूष ह्यांच्यासाठी स्वतंत्र संघटना काढणे योग्य वाटले हा त्यांचा त्यांच्या संघटनेसाठीचा निर्णय होता. आता राहता राहीला स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा... या बाबत केवळ ध्येयपुर्तीसंदर्भातच समानता नव्हती तर सध्याच्या काळात जे काही स्त्रियांच्या बाबतीत अन्याय होत आहेत त्यावरून संघाच्या प्रतिनिधी सभेत (ज्यात राष्ट्रसेवीका समितीच्या सरसंचालीका पण हजर असतात आणि त्यांना देखील सरसंघचालकांचाच मान मिळतो) २००८ ला "Dignity of Women" ठराव संमत करण्यात आला. त्यातील काही भागच खाली देत आहे. उरलेला खरच अभ्यास करायचा असेल तर येथे अवश्य संपूर्ण वाचा.
... किंतु भारत की परम्परा ने महिला के प्रति किसी भी प्रकार के भेदभाव को मान्यता नहीं दी है, अपितु उसे सदैव एवं सर्वत्र अत्यन्त श्रद्धा व सम्मान का स्थान दिया है। अत: यह सुनिश्चित किया जाना चाहिए कि महिलाओं के प्रति किसी भी प्रकार का भेदभावपूर्ण व्यवहार न हो तथा निर्णयप्रक्रिया में सदैव उनकी भागीदारी बनी रहे।...
||| आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. अर्थातच संघाने हे कुठे जाहीर म्हटलेलं नसल्याने तशी बातमी देणं तांत्रिकदृष्ट्या चूकच होईल. ||| इथेच तर गोच झाली. कारण ते पाश्चात्य संस्कृतीबद्द्ल ते म्हणत होते. आता कदाचीत ते देखील तुम्हाला माहीत असण्याची शक्यता नाही, तेंव्हा खाली कॉर्नेल विद्यापिठाच्या लॉ डिपार्टमेंटच्या संस्थळावर मिळालेली माहीती देतो:
व्याख्या: The legal union of a couple as spouses. The basic elements of a marriage are: (1) the parties' legal ability to marry each other, (2) mutual consent of the parties, and (3) a marriage contract as required by law. Overview In the English common law tradition from which our legal doctrines and concepts have developed, a marriage was a contract based upon a voluntary private agreement by a man and a woman to become husband and wife. Marriage was viewed as the basis of the family unit and vital to the preservation of morals and civilization. Traditionally, the husband had a duty to provide a safe house, pay for necessities such as food and clothing, and live in the house. The wife's obligations were maintaining a home, living in the home, having sexual relations with her husband, and rearing the couple's children. Today, the underlying concept that marriage is a legal contract still remains, but due to changes in society the legal obligations are not the same.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

टीका विधानांबद्दल नव्हतीच.

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 11:47 नवीन
टीका विधानांबद्दल नव्हतीच. मूलभूत विश्वासांबाबतच होती.
संघ आणि समिती त्यांच्या समान ध्येयाबाबत सुस्पष्ट आहेत.
त्याबद्दलही वाद नाही. स्वयंसेवकांनी राष्ट्राचा उद्धार करायचा आणि सेविकांनी मातृत्वावर लक्ष केंद्रित करायचं याबाबत त्यांचं एकमत आहेच असं दिसतं. (वर उद्धृत केलेला परिच्छेद वाचावा) सेविकांसाठी 'सुजाण मातृत्व' हे पहिलं ध्येय. स्वयंसेवकांसाठी राष्ट्रोद्धार. आय रेस्ट माय केस. असो. कुठच्या संघटनेने काय ध्येयं ठेवावी ही त्यांची मर्जी. ठराव काहीही करता येतात पण प्रत्यक्ष वागणूक काय असते ती दिसते. शतकांपूर्वीची, आता कालबाह्य झालेली पितृसत्ताक मूल्य संघ कवटाळून बसला आहे असं मला दिसतं. मला दिसलं ते मी मांडलं. कदाचित तुमचंच म्हणणं बरोबर असल्याची तुम्हाला खात्री असेल. चला, सोडून देऊ इथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

...

विकास
Sat, 01/12/2013 - 19:42 नवीन
>>>आय रेस्ट माय केस. <<< बिनबुडाची केस असली की ती रेस्ट होत नाही तर डिसमिस होते. असो. >>>टीका विधानांबद्दल नव्हतीच. मूलभूत विश्वासांबाबतच होती. <<< ते आता काही म्हणा, पण टिका ही अभ्यास न करता होती. "....स्त्रियांना या कामांत भाग न घेऊ देता इतर कामं करायला सांगतो. आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन...." असल्या वाक्यांतून ते स्पष्ट होते. आधी समिती माहीत पण नव्हती, मग म्हणायचे ते लो की प्रोफाईल आहे. ज्यात परत बाकी काही नाही पण, माफ करा, फक्त परत परत वर्षानुवर्षे द्वेषाने पसरवलेल्या विचारांचा प्रभाव आणि त्याला आंधळेपणाने खरे मानण्याचा प्रकार दिसला. अभ्यास दिसला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अभ्यास दिसला नाही.

राजेश घासकडवी
Sat, 01/12/2013 - 21:47 नवीन
अभ्यास दिसला नाही.
समिती माहीत होती. दोन्हींच्या स्थापनांचा इतिहासही माहीत आहे. संघाची घटना व त्यावरची कॉमेंटरीही वाचलेली आहे. समितीच्या वेबसाइटवर जाऊन तिथेही काय सापडतं ते पाहिलं. इतकं सगळं करूनही अभ्यास नाही म्हणणं चुकीचं वाटतं. असो. मुद्दे संपलेले दिसतात, तेव्हा मूळ विषय सोडून ऍड होमिनिम ऍटॅक्सना उत्तरं देण्याऐवजी मी या चर्चेला पूर्णविराम देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

साहेब पुढची चर्चा वाचली तर

पिंपातला उंदीर
Sat, 01/12/2013 - 22:12 नवीन
साहेब पुढची चर्चा वाचली तर कळेल की या so called स्वयंसेवकाना फक़त भावनिक आवाहन देऊन चर्चा करता येतात. फॅक्ट्स द्या म्हणाले की वैयक्तिक हल्ले सुरू होतात. अती उजव्या विचारसरणीची लक्षण. नाझी असोत वा बजरंग दलाला पाठिंबा देणारे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

करेक्ट

अर्धवटराव
Sat, 01/12/2013 - 23:08 नवीन
>>so called स्वयंसेवकाना फक़त भावनिक आवाहन देऊन चर्चा करता येतात. -- एकदम पर्फेक्ट मुद्दा. कुठल्याही नैसर्गीक आपत्तीच्या काळात स्वयंसेवक केवळ भावनीक आहावन करतात आणि मदत कार्य आपोआप हवेतुन होऊन जाते... आहे कि नाहि गंमत :) >>फॅक्ट्स द्या म्हणाले की वैयक्तिक हल्ले सुरू होतात. -- अगदी बरोबर. जगात इंटरनेट नावाची गोष्ट आहे, थोडं सर्च मारलं तर संघाच्या कामांविषयी भरपूर माहिती मिळते.. अगदी फॅक्ट्स वगैरे. पण कशाला तेव्हढे कष्ट घ्यायचे. >>नाझी असोत वा बजरंग दलाला पाठिंबा देणारे .. -- जे ब्बात. असल्या लोकांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे. बाकी संघ आणि त्याच्या प्रेरीत संघटनांचं जाळं जर देशभरात उभं राहिलं नसतं तर मागे जे आझाद मैदानावर झालं ते आपल्या प्रत्येकाच्या घरात झालं असतं, आणि ते ही २१व्या शतकाची वट न बघता... पण हि बाब किरकोळ आहे. अरे हो.. ते कोकणास्थ वगैरे मुद्दे राहिले... कसय ना राव, असं आडवळणाने जाण्यापेक्षा सरळ सरळ ब्राह्मण म्हणुन विचारलं असतं तर मिपाकरांना तेव्हढाच खुराक मिळाला असता चघळायला. असो. तर काय म्हणत होतो कि, मलाहि हाच प्रश्न पडला होता गणिताच्या बाबतीत.. कि पहिल्य दहा आकड्यात २ अंकी संख्या का नाहि येत ते. थोडी मदत कराल काय ? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मग तू चालू कर नवे संघटन तुला

आशु जोग
Sun, 01/13/2013 - 23:00 नवीन
मग तू चालू कर नवे संघटन तुला हवे तसे... हे लिखाण म्हणजे अगदीच हे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

प्रसारमाध्यमांचा निषेध

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 01/12/2013 - 06:04 नवीन
एका संघसमर्थकाकडून (त्याच त्या फेसबुकावर) मिळालेल्या भागवतांच्या भाषणातली ही काही वाक्य:
हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। वे भोगवस्तु नहीं,देवी हैं। प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है। यह दृष्टि जब तक हम सबमें लाते नहीं तब तक ये बातें रुकेगी नहीं। केवल कानून बनाने से काम नहीं चलेगा। वो होना चाहिए किन्तु उसके साथ संस्कार भी होने चाहिए।’’
प्रसारमाध्यमांचा निषेध. भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा यावरून त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडता आलं असतं. पण भागवत वाट्टेल ते बरळले तरीही वर पुन्हा त्यांचीच माफी मागण्याची वेळ आली. आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत.
  • Log in or register to post comments

तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा ??

अर्धवटराव
Sat, 01/12/2013 - 08:03 नवीन
तुम्हाला भागवतांमध्ये तर्कहीनता आणि विज्ञानद्वेष्टेपणा कुठे दिसला? कुठेही दोन चार ओळी वाचुन उगाच मतं बनवायची याला तर्क आणि विज्ञानाचं कुठलं अधिष्ठान आहे? आणि वरुन स्त्रिद्वेष्टेपणा ??? इतिहास आणि वर्तमानाच्या मर्यांदा सांभाळुन राष्ट्रनिर्मीतीचं उद्देशाने काम करणार्‍या एका संघटनेला, तिच्या प्रमुखाला, सो कॉल्ड स्त्रि-पुरुष समानतेचं विजोड अस्तर लावण्यात काय हाशिल?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एकत्र प्रतिसाद देते.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/15/2013 - 22:23 नवीन
प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है।
या वाक्यात विज्ञानद्वेष्टेपणा पुरेपूर आहे. विज्ञानद्वेष नसेल तर अज्ञान आहे. प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही, ती माणसाच्या अस्तित्त्वाच्याही आधीपासून आहे आणि मानव त्याचा एक भाग आहे. 'सबकुछ देनेवाली माता'च असेल तर मग वडलांचं काय? वडलांचा शुक्राणू न वापरता बनलेला फक्त माईचा लाल (किंवा लाली) कोणी आहे का? या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे. "हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " काही स्त्रियांना माता समजणं वगैरे ठीक आहे. सर्व स्त्रियांना माता समजणं योग्य आहे का? वडील, वडीलधारे, मित्र, नवरा, भाऊ अशी काही नाती स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्त्वात नसतातच का? विशेषतः मित्र वगैरे नाती असणं (ज्याकडे पारंपरिक लोकं fishy नजरेने बघतात) भागवतांच्या (अ?)ज्ञानकोषात अस्तित्त्वातच नाही का? एकंदर स्त्रिया कशा महान, थोर वगैरे म्हणताना त्याही मनुष्यच आहेत, सामान्य मनुष्यांना असणारे राग, लोभ, वगैरे भावना त्यांनाही असणार हे विसरून सरसकटीकरण केलेली भावनिक आवाहनं करणार्‍यांना स्त्रीद्वेष्टे म्हणायचं नाही तर काय? एकीकडे स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या नकाराधिकाराचा संकोच करणारे जसे रोगट वृत्तीचे समजले जातात, तसे त्या वृत्तीला विरोध करताना दुसर्‍या टोकाला जाऊन स्त्रिया देवी असतात टायपातला बिनबुडाचा बकवास करणार्‍यांनाही स्त्रीद्वेष्टे का समजू नये? त्यातून कोणा सामान्य स्वयंसेवकांनी अशी बडबड केली (जे भरपूर करतात याची प्रत्यक्ष आयुष्यातल्या स्वानुभवातून कल्पना आहे.) तरी दुर्लक्ष करता येतं. पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्‍या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्‍या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं. --- समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे. सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक, प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं. पण या गोष्टींबद्दल भागवत सध्या बोललेले नाहीत. तेव्हा हे अवांतरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद

श्रीगुरुजी
Tue, 01/15/2013 - 22:45 नवीन
बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद वाचून हतबुद्ध झालो. "या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे." सरसंघचालकांनी आपल्या वाक्यांतून स्त्रीचा गौरव केलेला आहे. त्यात एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल तर कोणाल अज्ञान वाटेल. पण यात स्त्रीद्वेष कुठे दिसला तुम्हाला? "पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्‍या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्‍या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं." माध्यमे कुठे शांत आहेत? सरसंघचालक जी वाक्ये म्हटलेच नाहीत ती वाक्ये त्यांच्या तोंडात घालून व त्यांना त्याबद्दल झोडपून माध्यमांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावलेच ना! "सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक," हे कोणी सांगितलं तुम्हाला? "प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं." माझ्या माहितीतल्या आणि ओळखीच्या अनेक संघस्वयंसेवकांपैकी कोणीही आणि कधीही अशी वागणूक केलेली नाही. त्यांच्याविषयी "लाज बाळगत नाहीत" असे लिहिणे अत्यंत अयोग्य आहे. "या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे." सरसंघचालकांच्या विधानात अजिबात स्त्रीद्वेष दिसलेला नाही. किंबहुना आपल्या विधानातून त्यांनी महिलांचा गौरवच केलेला आहे. पण आपल्या संघाविषयीच्या अज्ञानातून सरसंघचालकद्वेष आणि संघद्वेष आलेला आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून एक मागच्या प्रतिसादात

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/16/2013 - 00:55 नवीन
अजून एक मागच्या प्रतिसादात लिहायचं राहिलं. स्त्रिया वस्तू नाहीत हे ठीक आहे. पण भोगावर कशाबद्दल आकस? भोगाशिवाय मातृत्त्व म्हणजे बलात्कार (किंवा शरद जोशींच्या 'इंडिया'तले लोक करू शकतात ती कृत्रिम गर्भधारणा, सरोगेट मातृत्त्व) हे भागवतांना समजत नसेल तर त्यांना सामाजिक शास्त्राबद्दलही माहिती नाही असं म्हणावं लागेल.
पण यात स्त्रीद्वेष कुठे दिसला तुम्हाला?
सिमोन दी बोव्व्हार, आणि मराठीत करूणा गोखले, मंगला आठलेकर इत्यादींनी लिहीलेलं स्त्रीवादी लिखाण वाचल्यास हा मुद्दा स्पष्ट होईल. इथे अवांतराच्या भीतीपोटी लिहीत नाही.
"सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक," हे कोणी सांगितलं तुम्हाला?
संघ ही संघटना (माझ्या माहितीप्रमाणे) स्वतःला सामाजिक काम करणारी संघटना समजते. आणि तिथे स्त्रियांना प्रवेश नाही. आणखी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नसावी.
माझ्या माहितीतल्या आणि ओळखीच्या अनेक संघस्वयंसेवकांपैकी कोणीही आणि कधीही अशी वागणूक केलेली नाही. त्यांच्याविषयी "लाज बाळगत नाहीत" असे लिहिणे अत्यंत अयोग्य आहे.
ही लाज जे स्वयंसेवक असे वागतात त्यांना वाटणं अपेक्षित आहे, अन्य लोकांना कशाबद्दल? तुम्ही नशीबवान आहात कारण रविवारी सकाळी-सकाळी तुमच्या(च तीर्थरूपांच्या) घरी येऊन कोणी तुमची झोपमोड केली नाही, आईला चहा-पोह्यांच्या ऑर्डरी दिल्या नाही आणि वर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या थोर भारतीय परंपरेवर लेक्चरही दिलेलं नाही. आठवतं तेव्हापासून असे अनेक अनुभव मला आलेले आहेत. कॉलेजमधे वगैरे असताना भारतीय पोशाखाचं महत्त्व, मुलींनी कसं शालीन, गृहकृत्यदक्ष असावं वगैरे वगैरे भरपूर बकवास मी ऐकून घेतलेला आहे. अवांतराच्या भयास्तव संघ स्वयंसेवकांच्या उठवळ वर्तनाच्या स्वत: पाहिलेल्या आणखी "मनोरंजक" गोष्टी सांगत नाही. अरे हां, स्त्रिया "प्रकृतिच्या निर्मात्या" वगैरे असल्यामुळे त्यांनी या उठवळ स्वयंसेवकांना क्षमा करावी अशी भागवतांची अपेक्षा असेल तर सॉरी! मी पण मनुष्य आहे आणि राग, लोभ वगैरे भावना मलाही तेवढ्याच आहेत जेवढ्या माझ्या आजूबाजूच्या इतर लोकांना आहेत. फक्त काही लोकं जन्मतः ठराविक प्रकारची गुणसूत्रं घेऊन येतात म्हणून ते महान (किंवा क्षुद्र) असं जे भागवत मानतात तसं काही मी मानत नाही. --- मला (ठाण्यात) समितीचा असणारा प्रत्यक्ष अनुभव एक दिवसाचा, माझ्या बालपणीचा आहे. (तिथे मला पाठवणं म्हणजे माझा वेळ फुकट घालवणं आहे हे नशीबाने तेवढ्यातच आमच्या मातोश्रींना लक्षात आलं.) पण समितीमधे कार्यरत असणार्‍या एक अलिकडेच फेसबुकावर भेटल्या. (त्या बहुदा पुण्याच्या आहेत.) त्यांनाही समितीच्या राजकारण, समाजकारणातील सहभागाबद्दल प्रश्न विचारले. "अशा प्रकारच्या कामांमधे आपण का नसावं?" असे प्रश्न त्यांनी समितीमधे विचारले; याचा परिणाम म्हणून अन्य समितीसदस्यांनी त्यांना वाळीत टाकलं, अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडूनच आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१००+

ईन्टरफेल
Wed, 01/16/2013 - 20:53 नवीन
१००+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चिविंची एक गोष्ट आहे, त्यात

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/17/2013 - 01:00 नवीन
चिविंची एक गोष्ट आहे, त्यात एका 'विद्वानांनी' एकच संस्कृत नाटक वाचलेले असते आणि संदर्भ सोडून प्रत्येक ठिकाणी ते त्याच नाटकाचा संदर्भ देत असतात. तुमचे काही प्रतिसाद वाचताना सतत त्या कथेची आठवण येते. असो, बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 01/17/2013 - 15:25 नवीन
चिविंची एक गोष्ट आहे, त्यात एका 'विद्वानांनी' एकच संस्कृत नाटक वाचलेले असते आणि संदर्भ सोडून प्रत्येक ठिकाणी ते त्याच नाटकाचा संदर्भ देत असतात. तुमचे काही प्रतिसाद वाचताना सतत त्या कथेची आठवण येते. असो, बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/20/2013 - 11:16 नवीन
>>>> बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे. विमेशी मिपावर एवढ्यात सहमत व्हावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. [फक्त कधी कधी च्या ऐवजी 'नेहमीच’ असा शब्द हवा होता] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विषयाशी पूर्णपणे अवांतर प्रतिसाद...

मदनबाण
Tue, 01/22/2013 - 17:06 नवीन
फक्त इतकेच म्हणु शकतो... हॅ हॅ हॅ... ;) विमे इथे विनोदाची कमी नाही हो... माधुरी दिक्षित चांगली अभिनेत्री नाही असा मोठा विनोद मी मिपावर पहिल्यांदाच वाचला होता...आणि खो खो खो असे मोठ्यांदा हसलो होतो,तरी नशिब खुर्ची धरुन ठेवली होती... नाही तर "तोल" गेला असता माझा ! ;) जुन्या आणि नविन सदस्यांच्या "मनोरंजनासाठी" परत माझा आठवणीतला धागा देतो कसा ! http://www.misalpav.com/node/19208 या धाग्यातले बरेचसे प्रतिसाद मि.इंडिया झाल्याने धाग्यातली मूळ मजा आता कमी झाली आहे ! @ प्रा.डॉ आपण सुचवलेल्या बदलाशी मी "प्रचंड" "सहमत" आहे. ;) @ निलकांत अरे निलकांता जुन्या धाग्यांचे संदर्भ देणे किती मजेशीर असते बघ... पण हल्ली अश्या धाग्यांची पाटी पुसलेलीच दिसते ! मग आम्ही जुने धागे का उकरावेत? काही तरी करा की राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृपया...व्याख्या सांगावी

विटेकर
Sat, 01/19/2013 - 17:57 नवीन
अवांतराच्या भयास्तव संघ स्वयंसेवकांच्या उठवळ वर्तनाच्या स्वत: पाहिलेल्या आणखी "मनोरंजक" गोष्टी सांगत नाही.
कृपया " उठ्वळपणाची" व्याख्या सांगावी.आणि कोणत्या स्वंयसेवकांनी काय काय उठवळपणा केला हे ही सांगावे. आता मनोरंजक आणि येथे अवांतर असेल तर नवीन धागा काढावा .. आपण " स्वयंसेवक " हा शब्द वापरला आहे , त्याद्वारे एका समूहाचे प्रतिनिधित्व होते, आपला रोख एखाद्या व्यक्तिवर आहे की पूर्ण समूहांवर ? एखादी भगिनी विक्षिप्त आहे म्हणून सारयाजणी विक्षिप्त आहेत असे विधान करता येईल का ? बाकी एका इंग्रजी म्हणीची आठ्वण आली.. When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty ! हा उपमा अलंकार आहे, तुम्हाला पिग म्हंट्लेले नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो

अर्धवटराव
Wed, 01/16/2013 - 01:03 नवीन
>>या वाक्यात विज्ञानद्वेष्टेपणा पुरेपूर आहे. विज्ञानद्वेष नसेल तर अज्ञान आहे -- विज्ञान कशाला म्हणावं याचा अत्यंत लघु दृष्टीकोन ठेवल्यामुळे असं तुम्हाला वाटतं. मुळात विज्ञानाचा परिघ फार विषाल आणि खोल आहे. तुम्ही तुमच्या "माहितीला" ज्ञान म्हणत असाल तर इतर प्रत्येक गोष्ट अज्ञान वाटणं स्वाभावीक आहे. अभिजनांनी ज्ञानाचे, कलेचे क्षेत्र आपल्याच व्याख्येने ठरवणे हे यात नवल ते काय . >>प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही, ती माणसाच्या अस्तित्त्वाच्याही आधीपासून आहे आणि मानव त्याचा एक भाग आहे. 'सबकुछ देनेवाली माता'च असेल तर मग वडलांचं काय? वडलांचा शुक्राणू न वापरता बनलेला फक्त माईचा लाल (किंवा लाली) कोणी आहे का? -- मनुष्य एका अर्थाने प्रकृतीच्या निर्माण शक्तीचं आणि ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे, प्रकटीकरण आहे. वडिलांचा शुक्राणुच कशाला, अगदी इतर कुठलीच बाह्य मदत न घेता देखील सृजनशक्ती आपलं काम नीट करु शकते. 'सबकुछ माता'च समजणं या आदरार्थी, काव्यात्मक भावाला शुक्राणुच्या कसोटीवर तपासणं म्हणजे गणिताच्या प्राध्यापकाने राग - रागिण्यांना आपल्या इक्वेशन मध्ये बसत नाहि असं म्हणणं... "भारतमाता" म्हणजे एका जमिनीच्या तुकड्याने मनुष्याला जन्म दिला असं म्हणाअयचं असतं का कोणाला? >>या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे. -- काहिही संबंध नाहि. >>"हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " काही स्त्रियांना माता समजणं वगैरे ठीक आहे. सर्व स्त्रियांना माता समजणं योग्य आहे का? वडील, वडीलधारे, मित्र, नवरा, भाऊ अशी काही नाती स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्त्वात नसतातच का? विशेषतः मित्र वगैरे नाती असणं (ज्याकडे पारंपरिक लोकं fishy नजरेने बघतात) भागवतांच्या (अ?)ज्ञानकोषात अस्तित्त्वातच नाही का? -- जर कोणाला स्त्रीयांमध्ये प्रकृतीच्या अलौकीक सृजन शक्तीचा वावर अत्यंत आदरणीय वाटत असेल तर ते वाईट आहे ? "सर्व स्त्रीयांना माता समजणं" याचा शब्दशः अर्थ काढतो म्हटलं तर तसं समजणं काहि स्त्रियांच्या बाबतीत देखील शक्य नाहि मग सर्व स्त्रियांच्या बाबतीत काय बात. आपली घटना समता, बंदुता तत्वांना सर्वोच्च मानते. आपल्या प्रतिज्ञेत "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं वाक्य आहे... म्हणुन भारत सरकारने लग्नांवर बंदी आणावी काय? किंवा प्रत्येकाची मालमत्ता अगदी देशभराच्या लोकांमध्ये समसमान वाटुन टाकायची काय? (जनरली) माणासाला सर्वात आपुलकीचं नातं त्याच्या आईबद्दल वाटतं. स्त्रीयांच्या बाबतीत जर कधी निगेटीव्ह भावना आलि, तसा प्रसंग आला, तर या आपुलकिच्या भावनेला एक चान्स द्या असा अर्थ आहे "सर्व स्त्रियांना माता समजा" या वाक्याचा... अर्थात, कुणि कुठल्या वाक्याचा काय अर्थ काढावा हि ज्याची त्याची समज. >>एकंदर स्त्रिया कशा महान, थोर वगैरे म्हणताना त्याही मनुष्यच आहेत, सामान्य मनुष्यांना असणारे राग, लोभ, वगैरे भावना त्यांनाही असणार हे विसरून सरसकटीकरण केलेली भावनिक आवाहनं करणार्‍यांना स्त्रीद्वेष्टे म्हणायचं नाही तर काय? -- सरसकटीकरण केलेली भावनीक आवाहनं "बाय अ‍ॅण्ड लार्ज पॉलिसी स्टॅण्ड" असतात. त्यात द्वेष कुठुन आला? "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं म्हणायला लावणारं भारत सरकार माझ्या वडिलोपार्जीत संपत्तीचा द्वेष करते असं म्हणावं काय? >>एकीकडे स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या नकाराधिकाराचा संकोच करणारे जसे रोगट वृत्तीचे समजले जातात, तसे त्या वृत्तीला विरोध करताना दुसर्‍या टोकाला जाऊन स्त्रिया देवी असतात टायपातला बिनबुडाचा बकवास करणार्‍यांनाही स्त्रीद्वेष्टे का समजू नये? -- "देवी" हि बिनभावनेची, सुख-दु:खापलिकडली, रबर-काष्ठ-पाषाणाची अशी काहि तरी वस्तु आहे हेच चुकीचं तत्वज्ञान आहे. हलाहल प्राशन करणारा शिव, माजलेल्या दैत्यांचं रक्त घटाघट पिणारी जगदंबा, १८ औक्षहिणी सैन्याचा रणयज्ञ मांडणारा श्रीकृष्ण, लेखनादी कार्यात अत्यंत रमणाण होऊन लग्न-संसार वगैरेचं भान विसरलेली शारदा, हे माणसाच्या कमाल क्षमतांना केलेली आवाहनं आहेत. इतकं प्रचंड मनुष्यपण उपभोगणं, अ‍ॅट्लिस्ट ते भोगायचा प्रयत्न करणं राहिलं एका बाजुला... त्यात द्वेष्टेपणा शोधावा? >>त्यातून कोणा सामान्य स्वयंसेवकांनी अशी बडबड केली (जे भरपूर करतात याची प्रत्यक्ष आयुष्यातल्या स्वानुभवातून कल्पना आहे.) तरी दुर्लक्ष करता येतं. पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्‍या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्‍या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं. -- त्या संघटनेच्या सर्वेसर्वाची वैचारीक बैठक किती खोल आहे, त्याला समाजमनाचं किती भान आहे, स्विकारलेल्या जबाबदारीचं त्याला किती मुल्य आहे... याचा काहिही विचार न करता असं एकदम स्त्रीद्वेष्टा वगैरे ठरवणं हे पेड न्युज देणार्‍या चॅनलवाल्यांना शोघतं... विचार करु शकणार्‍या सामान्य माणासाने तरी थोडा विवेक दाखवावा. >>समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे. -- त्याच संघटनेने प्रेरीत दुर्गावाहिनी मुलींना काय शक्तीवान बनवते हे देखील पाहाण्यासारखं आहे. तसं मला समितीच्या कार्यपद्धतीविषयी काहि कल्पना नाहि. पण एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर त्यात स्त्रीद्वेष्टेपणा दिसण्यात काहि अर्थ नाहि...(आपले सैन्यदल सुद्धा थोडंफार त्याच पद्धतीने कार्य करते) >>सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक... -- अत्यंत बिनबुडाचा आरोप एव्हढंच म्हणेल याविषयी. असो. >>...प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं. -- आमच्याकडे कोणि असं आलं तर आम्हि त्याला आपुलकी म्हणतो कोडगेपणा नाहि. हेच स्वयंसेवक घरदार सोडुन संघटनेच्या कामाप्रित्यर्थ वर्षोनवर्षे अनोळखी प्रदेशात घालवतात, वार लावुन जेवतात, असाहि अनुभव आहे. असो. अर्धवटारव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्या संस्थेने आपली

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/16/2013 - 01:32 नवीन
एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर ...
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

विशेष धन्यवाद

अर्धवटराव
Wed, 01/16/2013 - 01:49 नवीन
"पुरुषप्रधानतेने"चा अर्थ "प्राधान्याने पुरुषांनाच करायला दिलेली कार्ये" असा न धरता "पुरुष श्रेष्ठ आहेत" असा घेतला असेल तर विशेष धन्यवाद. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा लिंगसमानता हे मूल्य

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/16/2013 - 01:54 नवीन
एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की उपरोल्लेखित अर्थांपैकी कोणताही अर्थ तेवढाच (नि:)उपयुक्त ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

इमोटीकॉन्सची गडबड

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/16/2013 - 01:55 नवीन
एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की उपरोल्लेखित अर्थांपैकी कोणताही अर्थ तेवढाच (नि:!)उपयुक्त ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/16/2013 - 01:56 नवीन
तो शब्द निरुपयुक्त असा वाचणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुल्य वि. कार्यपद्धती

अर्धवटराव
Wed, 01/16/2013 - 02:00 नवीन
मुल्यांनाच कार्यपद्धती बनवायचा अट्टहास धरुन कार्यनाश करायचा कि मुल्याधिष्ठीत कार्यपद्धती ठेऊन कार्यभाग साधायचा हा इंडीव्हिज्युअल कॉल आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लिंगसमानता म्हणजे नक्की काय

कवितानागेश
गुरुवार, 01/17/2013 - 14:03 नवीन
लिंगसमानता म्हणजे नक्की काय काय अभिप्रेत आहे? बर्‍याच गोष्टीत एकसारखी ताकद असलेले पण काही वेगळी आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेले बहुतेक सगळ्या प्राण्यामध्ये दिसणारे निसर्गनिर्मित २ प्रकारचे परस्परपूरक जीव नेहमीच 'समान' नसतात. .............. आणि याचा प्रसारमाध्यमांच्या अप्रामाणिकपणाशी काय संबंध? भागवत चुकले की नाही, यापेक्षा प्रसारमाध्यमे नेहमीच या लोकांच्या बाबतीत का चुकतात, हा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अत्यंत समर्पक प्रतिसाद

श्रीगुरुजी
Wed, 01/16/2013 - 12:29 नवीन
अर्धवटराव, आपल्या अत्यंत समर्पक व सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' एवढीच सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

"परंतु हे विवेचन काही

श्रीगुरुजी
Wed, 01/16/2013 - 12:34 नवीन
"परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' एवढीच सदिच्छा." हे वाक्य पूर्ण लिहिण्याच्या आधीच सेव्ह झाले. "परंतु हे विवेचन काही जणांच्या बाबतीत 'पालथ्या घड्यावर पाणी' असे होऊ नये एवढीच सदिच्छा." असे लिहायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"पण एखाद्या संस्थेने आपली

श्रीगुरुजी
Wed, 01/16/2013 - 12:42 नवीन
"पण एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर त्यात स्त्रीद्वेष्टेपणा दिसण्यात काहि अर्थ नाहि...(आपले सैन्यदल सुद्धा थोडंफार त्याच पद्धतीने कार्य करते)" काही विशिष्ट क्षेत्रात फक्त पुरूषांनाच प्रवेश असतो. अभियांत्रिकीच्या "खाण अभियांत्रिकी" या अभ्यासक्रमाला मुलींना प्रवेश दिला जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे परिवहन महामंडळ स्त्रियांना चालकाची नोकरी देत नाही. बहुतेक अग्निशामक दलात सुद्धा स्त्रियांना प्रवेश नसतो (चूभूदेघे). अशी उदाहरणे पाहिली तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार स्त्रीद्वेष्टे आहेत असा दावा सहज करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

संघ आणि मिडियाचा विपर्यास

क्लिंटन
Fri, 01/18/2013 - 13:19 नवीन
ही चर्चा मी वाचत होतो पण चार-पाच दिवस बाहेरगावी असल्यामुळे आधी प्रतिसाद देता आला नाही. रा.स्व.संघ या संघटनेविषयी माझे दोन मुख्य आक्षेप आहेत.एक तर त्या परिवारातल्या संघटना इतक्या विचित्रपणे एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत की म्हणावे तर एखाद्या संघटनेचा एखादा अजेंडा असतो आणि म्हणावे तर नसतो.म्हणजे स्वदेशी जागरण मंचाचा "स्वदेशी" हा आर्थिक कार्यक्रम तर वाजपेयींच्या सरकारचा आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम हे दोन परस्परविरोधी अजेंडे असूनही स्वदेशी जागरण मंच आणि भाजप एकाच संघ परिवाराचे सदस्य एकाच वेळी असू शकतात. तसेच अयोध्या आंदोलन हे विश्व हिंदू परिषद आणि संघाचे तसेच बाबरी पाडली ती बजरंग दलाने असे म्हणत भाजप त्यातून पाहिजे तेव्हा अंग काढून घेऊ शकतो.तेव्हा एकाच वेळी विविध मुखवटे परिधान केले तर पाहिजे तेव्हा अनुकूल मुखवटा सामोरा करता येईल असे गणित असावे का? माझा या परिवाराविषयी हा पहिला आक्षेप आहे.याविषयी दुसरे काही मुद्दे असतील तर ते वाचायला आवडतीलच. दुसरा आक्षेप म्हणजे संघ परिवार मनाने भूतकाळात वावरतो (प्राचीन भारतीय संस्कृती इत्यादी) असे वाटते.जुन्या उज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळ उज्वल बनवायचा असेल तर त्यात काही चूक आहे असे वाटत नाही.पण अनेकदा गाडी पहिल्याच भागात अडकते (आमचा भूतकाळ उज्वल होता) आणि पुढे सरकत नाही (भविष्य उज्वल बनविणे). तरीही संघ स्त्रीद्वेष्टा आहे किंवा केवळ उच्चवर्णीय सरसंघचालक झाले म्हणून संघ जातीयवादी आहे अशा प्रकारची वक्तव्ये अप्रस्तुत आहेत असे मला वाटते. तसेच अनेक संघ स्वयंसेवक निस्वार्थीपणे काम करतात हे बघून माझ्यासारख्या पैशाच्या मागे लागलेल्या पक्क्या मटिरिअ‍ॅलिस्ट माणसाला नक्कीच कुतुहल आणि आदर दोन्ही वाटतो हे पण लिहितो. दुसरे म्हणजे मिडिआचे लोक स्वतःचा टी.आर.पी वाढवायला कसा "ध" चा "मा" करतात याची इतरही अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेस मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करते हा उजव्या गटाचा दावा नेहमीच असतो. त्या संदर्भात मागे बाळासाहेबांनी म्हटले होते (१९९४-९५ मध्ये इंटरनेट यायच्या आधी तेव्हा या गोष्टीचा आंतरजालिय पुरावा माझ्याकडे नाही)--- जर मुस्लिमांचा मताधिकार काढून घेतला तर काँग्रेस त्यांच्याविषयी अजिबात पर्वा करणार नाही. मिडियामध्ये याचा विपर्यास करून बातमी दिली होती--"बाळासाहेब ठाकरे यांची मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा अशी मागणी"!! तसेच अलीकडेच भाजप नेते रमेश बाएस (वैश्य) यांनी "पूर्ण वाढ झालेल्या स्त्रियांवर बलात्कार होणे समजण्यासारखे आहे" असे म्हटले अशी बातमी आली. त्याचा विपर्यास कसा झाला असावा (माझा तर्क)-- पत्रकारांनी रमेश वैश्य यांना दोन-तीन वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतात त्याविषयी विचारले असावे.त्यावर त्यांचे म्हणणे--"पूर्ण वाढ झालेल्या मुलकडे/स्त्रीकडे बघून बलात्कारी पुरूषांची जी काही भावना (किंवा हवस किंवा जे काही असेल ते) चाळविली जाऊ शकेल पण दोन वर्षाच्या मुलीकडे बघून असे कसे होते हे आश्चर्य आहे". आता यात त्यांनी पूर्ण वाढ झालेल्या मुलींवर्/स्त्रीवरील बलात्काराचे समर्थन केले आहे का?तरीही मिडिया बातमी द्यायला मोकळा की रमेश वैश्य यांनी म्हटले की "पूर्ण वाढ झालेल्या मुलींवर/स्त्रियांवर बलात्कार होतात हे समजण्यासारखे आहे"!! तसेच मध्यंतरी नितीन गडकरींनी म्हटले की "विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमचा आय.क्यू एकच आहे.विवेकानंदांनी तो चांगल्या कामासाठी वापरला तर दाऊदने वाईट कामांसाठी". यात मला तरी काही चुकीचे वाटले नाही.पण मिडियाची बातमी होती--"नितीन गडकरींनी विवेकानंदांची तुलना दाऊद इब्राहिमबरोबर केली". तेव्हा हे मिडियावाले एखादी गोष्ट कशी विपर्यास करून सांगतील याची काहीही गॅरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

दादा कोंडके
Fri, 01/18/2013 - 15:28 नवीन
तसेच मध्यंतरी नितीन गडकरींनी म्हटले की "विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमचा आय.क्यू एकच आहे.विवेकानंदांनी तो चांगल्या कामासाठी वापरला तर दाऊदने वाईट कामांसाठी". यात मला तरी काही चुकीचे वाटले नाही.पण मिडियाची बातमी होती--"नितीन गडकरींनी विवेकानंदांची तुलना दाऊद इब्राहिमबरोबर केली". तेव्हा हे मिडियावाले एखादी गोष्ट कशी विपर्यास करून सांगतील याची काहीही गॅरंटी नाही.
सहमत. मलाही चुकीचे वाटले नाही. पण एकदा राळ उठवून दिली आणि लोकमत तयार झालं की भल्याभल्यांना 'यु' टर्न घेउन माफी मागावी लागते. आणि एकदा माफी मागितली की कायमचा शिक्का बसतो. मला वाटतं आपले पंतप्रधान म्हणूनच तोंड उघडत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+२

गणामास्तर
Fri, 01/18/2013 - 16:23 नवीन
क्लिंटन यांचा नेहमीप्रमाणेचं संतुलित प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

क्लींट्न साहेब

विटेकर
Sat, 01/19/2013 - 18:18 नवीन
छान प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा