Skip to main content

गाजराचं रसरशीत लोणचं

लेखक जयवी यांनी बुधवार, 26/12/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे. Pickle साहित्य : मस्त लाल गाजरं - ५-६ लसूण पाकळ्या ५-६ मीठ चवीप्रमाणे गूळ - चवीप्रमाणे लिंबाचा रस - चवीप्रमाणे केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर मोहरी हिंग कृती: १. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं. २. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या. ३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं. ४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं. एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण खाऊ शकतात ;) अधिक टिपा: फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो. ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट. आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं. गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं.

वाचने 8063
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

फोटू छान दिसतोय. चवही मस्तच असणार. माझ्या घरी असे लोणचे बऱ्याचदा करतात आणि त्यात कांद्याच्या बियांची (कलौन्जी) फोडणी घालतात.

केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
केप्रचं तयार गाजर लोणचं मिळत नाही का? :)

अरे वा! सोपं लोणचं आहे. मी हे नक्की करणार. मला केप्रचा मसाला शोधावाही लागणार नाही (वाचतोयस ना परा?). फोटू पाहूनच रसरशीतपणाचा अंदाज येतोय. मस्त. हे लोणचं लोणच्यासारखं खाल्लं जात नाही. ;)

In reply to by रेवती

मी पायाला, मनाला, लेखणीला कुठ्ठे कुठ्ठे घाण लागू नये म्हणून सतत जपत असतो बरे. बाकी काकूंना तिकडे केप्रचा मसाला कुठे मिळाला म्हणे ? इकडच्या फुजीच्या इंडिया मार्ट मध्ये सगळी बोंबच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इकडे केप्रचा मसाला, भाजणी (साधी/उपासाची), अगदी शेवभाजीचा मसालाही मिळतो (मी तो कधी वापरला नाही). सातूचे पीठ मिळते. आता तू इकडेच का रहायला येत नाहीस? साधा समुद्र तर ओलांडायचाय. ;)

कसलं टेप्टिंग दिसतय. करायला पण एकदम सोप्प...पण आता इथे केप्रचा मसाला कुठे शोधु?

फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलयं नक्की नक्की करून बघणार , घरात लोणचं मसाला आहेच :) धन्यवाद

लोणच्याचा रसरशीतपणा बघुनच तोंडाला पाणी सुटलं म्हणुन लगेच लिहुन ठेवली पण प्रतिसाद द्यायचा राहुनच गेला तो आता देते आहे. जातीच्या कलावंताला काहीही सुरेखच जमते. तुमचे आणि तुमच्या आईंचे आभार.

हे लोणचं तर मातोश्रींनी केल्याकेल्या भाजीगत खाऊन संपवत असू आम्ही. आहाहाहा काय आठवण करून दिलीत वाह!!!!

खुप छान रेसेपि आहे,करुन पाहील्,आवड्ले घरी सगळयाना.

पण एक शन्का, केप्र लोणचे मसाला ण मिळाल्यास पर्याय काय? घरी मसाला करता येइल का?

धन्यवाद :) जर्मनीकर...... मसाला मिळाला नाही तर तिखट, थोडी मोहरीची पूड घालून मेकप करता येईल :)

गाजराचं लोणचं अतिशय आवडतं (मिरचीच्या लोणच्या व्यतिरीक्त). मोठ्या लांब फोडी असल्यास उत्तम :) (घरी केलेलं लोणचं लवकरच खराब होत असल्यामुळे विकत घेणे हाच पर्याय सध्या आहे).