प्रयोग..
लेखनप्रकार
फार पुर्वी लिहीलेली एक कथा सापडली, ती जशीच्या तशी इथे टाकत आहे ( सुचत असून बदल करत नाही ) ;) फॉर अ चेंज यावर काकु करूया :)
*********
शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरू केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच. आयुष्यात चॅलेंजींग असं काहीतरी घडावं असं प्रत्येकालाच मनाच्या कोप-यात कुठेतरी वाटत असतं, मी ही त्याला अपवाद नव्हतो. पण रोजची ती रटाळ बडबड त्याच ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे.......... वैताग होता सगळा. अर्थात माझ्या प्रोफेशनमध्ये हे चालायचंच....
मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. फारच प्रसिद्ध नसलो तरी चर्चेत एखाद्यावेळी उल्लेख व्हावा इतपत नक्की यशस्वी आहे, आणि याला कारण म्हणजे सध्याची लोकांची जीवनशैली. पैशांचा पाठीमागे सतत धावणा-या माणसाला त्याच्या आयुष्यात शरीराशी, भावनांशी इतक्या तडजोडी कराव्या लागताहेत की त्यामुळे मेंदूला येणारा थकवा, ताण यांच्याकडे लक्ष द्यायलाही त्याला फुरसत नसते. परिणाम.....? लगेच दिसत नसला तरी त्याचे उशीरा जाणवणारे पडसाद त्याला माझ्यासारख्यांच्या दवाखान्यांची पायरी चढायला भाग पाडतातच. ही झाली उच्च मध्यमवर्गीय आणि त्या पुढच्या श्रीमंतांची मनोवृत्ती. सर्वसामान्य माणसांच्यातही असे त्रास जाणवतात, नाही असं नाही, पण त्यांची मानसोपचार घेण्याची तयारी अजिबात नसते. एखादं-दुसरा अपवाद वगळता. या मागे दोन कारणं आहेत एक तर मानसोपचार घेणारा म्हणजे ‘वेडा’ अश्या समजुतीचा घट्ट कोश त्यांच्याभोवती त्यांनीच विणलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या सारख्यांची दांडगी फी देणे कदाचित त्यांना परवडत नसेल. आता हे आपले माझे विचार झाले अर्थात....
विचारांच्या भरात मी ऑफिसच्या किल्ल्या घेऊन कधी मेनं डोअरपर्यंत आलो ते मलाच कळलं नाही. डोअर लॉक करून मी लिफ्टच्या दिशेने चालायला लागलो. मनातली विचारांची साखळी पुन्हा गुंफायला लागली.
सर्वसामान्य माणसांच्यात एक आणखी गोष्ट वेगळी आहे. सहसा ही माणसे कर्मकांड, दैव , बाहेरची बाधा असल्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवतात. आणि एखाद्या अनैसर्गिक वागण्याला खुशाल यातलं एखादं लेबल लावून टाकतात. पुढचा प्रवास अर्थातच भगत, मांत्रिक, बाबालोक यांच्या दारातून जाणार्या वाटेने सुरू राहतो. आता यातल्या काहींच्या समस्या कदाचित त्या मुळे दूर होतातही पण त्यामागे एक साधे मानसिक कारण आहे, ते म्हणजे विश्वास, फ़ेथ.... एखाद्या आजारातून आपण बाहेर पडतोय असे मनात एकदा रुजले की शरीरही जोमाने त्या आजाराचा सामना करते आणि जर आजार प्राथमिक पातळीवर असेल तर तो बराही होतो. याच विचारसरणीचा फायदा घेत एकेकाळी ‘फ़ेथहिलर्स’ चे फार मोठे स्तोम माजले होते. कधी कधी नुसत्या आरामानेही मेंदूला तजेला मिळतो. कधी सात्त्विक वातावरणाचा परिणाम होतो आणि मनुष्य बरा होतो. अर्थात हे फक्त प्राथमिक अवस्थेतल्या आजाराबद्दल शक्य आहे. त्या पुढे मात्र 'मनोचिकित्सा' हाच एक मार्ग राहतो.
कधी कधी अश्याच एखाद्या उशीरा शहाणपण सुचलेल्या पेशंटची केस मी हाताळलीही आहे. त्यातून जेव्हा एखाद्या झपाटलेल्या माणसाला ज्याला आवरायला चार चार जण अपुरे पडत असत, त्याला भूत बाधा झालेली नसून तो स्किझोफ्रेनिया रोगी असल्याचे सिद्ध करून त्याला योग्य त्या उपायांनी बरे केल्यावर चकीत झालेली शरमलेली माणसेही मी पाहिलीत.
एव्हाना मी गाडी स्टार्ट करून घरच्या दिशेने निघालोही होतो. घरी रेश्मा नक्की माझी वाट पाहतं जेवायची थांबलेली असणार. छोटा तनू कदाचित वाट पाहून कंटाळून झोपलाही असेल. आता माझ्या विचारांना घरची दिशा मिळाली होती.
माझी ही विचारमग्न अवस्था आता रेश्माच्या चांगल्याच माहितीची झालीय त्यामुळे प्रश्न वगैरे विचारण्याच्या फंदात न पडता ती तिची कामं चटचट आवरत असते. जेवण झाल्यावर माझ्या आवडत्या इझीचेअरमध्ये बसून काहीतरी वाचणे हा माझा छंद, पण आज मात्र काही केल्या विचारांची साखळी तुटायला तयार नव्हती. विचारांच्या भरात कधी डोळा लागला ते कळलंच नाही.
जाग आली तेव्हा सूर्य नुकताच उगवत होता. अंगावरची शाल ( बहुतेक मी झोपल्यावर रेश्माने अलगद माझ्या अंगावर पांघरलेली ) दूर करत आळस दिला. ‘चला नव्या दिवसाची सुरुवात झाली’ मनातल्या मनात विचार केला. आता पुन्हा पेशंट, पुन्हा प्रश्नोत्तरे. इतक्यात रेश्माची हाक आली.
" विकास, अरे डॉक्टर गाडगीळांचा फोन आहे."
मी अजूनही मोबाईल वापरत नाही कारण माझ्यासारख्या माणसाला त्याचा उपयोगही नाही. एकतर मी जिथे जातो तिथे फोन हा असतोच आणि दुसरं म्हणजे पेशंट बरोबर सिटिंग चालू असताना फोन वाजून मला डिस्टर्ब व्हायचीच शक्यता जास्त असते.
" हं, बोला डॉक्टर, आज सकाळी सकाळीच?" डॉ. गाडगीळांशी माझी मैत्री जुनीच पण आमची फील्ड वेगवेगळी.
" विकास, तुझ्याकडे एक पेशंट पाठवतोय. केस जरा चमत्कारिक आहे आणि माझ्या क्षेत्राच्या बाहेर आहे. म्हणून तुझ्याकडे पाठवतोय"
" पण त्यासाठी इतक्या सकाळी फोन?"
" हो, कारण व्यक्तीही तशीच महत्त्वाची आहे. बिल्डर गुप्तांच्या भावाची केस आहे ही. "
गुप्तांचं नाव ऐकल्यावर मी ही जरा सावरलो कारण हे एक फारच मोठं प्रस्थ होतं पण नक्की प्रॉब्लेम काय असावा?
" बाकी डिटेल्स तुला त्यांच्याच कडून कळतील. मी त्यांना तुझं नाव रेकमंड केलंय सोबत मी केसफ़ाईल पाठवतोयच त्यात माझी फ़ाईंडींग्जही आहेतच"
" हो, पण ते येणारेत कधी ? " माझ्या डोळ्यासमोरून आजच्या अपॉइंटमेंटची लिस्ट तरळून गेली.
" तुझं क्लिनिक उघडण्याच्या वेळातच येतील बहुधा, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम मधून कदाचित तूच बाहेर काढू शकशील" डॉ. गाडगीळांचा आवाज बदलल्यासारखा वाटला. बहुधा त्यांना बाकी चर्चा फोनवर नको होती.
गुप्तांसारख्या माणसाचं माझ्याकडे नक्की काय काम असावं ? हा आमच्या डॉक्टर्स चेनचा भाग नक्की नसावा. हो, आम्ही काही डॉक्टर्स अशी चेन चालवतो, म्हणजे माझ्याकडच्या एखाद्या गलेलठ्ठ बकर्याला यथेच्छ लुटून झाल्यावर दुसर्याकडे पाठवणे अश्याप्रकारची, पण तसं असतं तर कालच गाडगीळांनी मला याची स्पष्ट कल्पना दिली असती. पटापट आवरून मी क्लिनिकवर पोहोचलो. माझ्या सेक्रेटरीला आजच्या सकाळाच्या अपॉइंटमेंट्स पुढे ढकलण्याची सूचना देत मी माझ्या कन्सल्टींगरुममधे दाखल झालो.
गाडगीळांनी सांगितलेले अजिबात खोटे न ठरवता क्लिनिक उघडल्याच्या पंधरा-वीस मिनिटातच गुप्ता आले असल्याची सूचना मला मिळाली. पुढच्या काही सेकंदातच समोर बसलेल्या गुप्तांचे मी निरीक्षण करत होतो. अंगावरचा भारी सूट, हातातलं किंमती घड्याळ तेही मनगटाच्या सुलट्या बाजूला बांधलेले हे एकाचवेळी त्यांच्या जुन्या विचारसरणीचे, आणि उच्च राहणीमानाचे दर्शन घडवत होते. चेहरा आत्ता जरी थोडा म्लान असला तरी त्यावरचे आधीकारक भाव त्यांच्या स्वभावाची जाणीव करून देत होते. या उलट त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा ओढलेला चेहराच काहीतरी गंभीर घडल्याचे दर्शवत होता.
" हा माझा भाऊ कमल, आमच्या येण्याबद्दल तुम्हाला डॉक्टर गाडगीळ बोललेच असतील" गुप्तांनीच सुरुवात केली.
" येस, तुमच्या येण्याबद्दल त्यांनी मला सांगितले पण त्याचे कारण मात्र नाही सांगितलेले."
" त्याचे असे आहे डॉक्टर कमलला...."
" माफ करा गुप्तासाहेब पण मला जो काही प्रॉब्लेम असेल तो कमलच्या तोंडून कळायला हवा" त्यांचे बोलणे मध्येच तोडत मी म्हणालो. " आणखी एक विनंती आहे आमची सिटिंग चालू असेपर्यंत आपण जर बाहेर वेटींगरुममधे थांबलात तर बरं होईल तिथे तुम्हाला चहा, कॉफी ,मॅगेझिन्स अव्हेलेबल असतील तेव्हा प्लीज.........गैरसमज करून घेऊ नका पण कधी कधी तिसर्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे पेशंट थोडासा रिझर्व वागतो त्यामुळेच...."
कदाचित गुप्तांना याची कल्पना असावी ते कोणतीही नापसंती न दर्शवता बाहेर गेले.
कमल माझ्या कन्सल्टींग ईझी सोफ़ावर विसावल्यावर मी माझी प्रश्नोत्तरे सुरू केली. सुरुवातीला त्याच्या आवडीनिवडी, त्याचे छंद त्याच्या आयुष्यातल्या घडामोडी असे प्रश्न मी विचारत राहिलो. हो ! कारण इतर डॉक्टर्स प्रमाणे थेट ‘तुम्हाला काय होतंय?’ असं आम्ही मनोचिकित्सक थेट विचारू शकत नाही. त्यासाठी पेशंटला बोलका करावा लागतो, आपल्याबद्दल त्याच्या मनात विश्वास भरवावा लागतो तरच पेशंट मोकळेपणे आणि विना दडपण त्याचा त्रास सांगू शकतो.
" आता मला सांगा, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय?"
" मला? मला काहीच होत नाहीये पण तो, तो मला सारखा छळत असतो."
" तो? तो म्हणजे कोण? तुम्ही ओळखता त्याला?"
" नाही मी त्याला ओळखत नाही कारण त्याचा चेहराच कधी दिसत नाही"
" मग तो तुम्हाला नक्की कसा त्रास देतो?"
" त्याची ती नजर, जणू मला गिळून टाकेल असे भाव असतात त्या नजरेत"
" इथे बघा तुमचा थोडासा घोटाळा होतोय असं नाही का वाटत? कारण त्याचा चेहरा दिसत नाही असं तुम्ही आत्ताच म्हणालात मग त्याचे डोळे तुम्हाला कसे दिसतील?" अश्या पेशंटला कधी कधी त्याच्या बोलण्यातली विसंगती जाणवून दिली की त्याचा आत्मविश्वास थोडासा वाढतो आणि मग हाच आत्मविश्वास पुढे उपचारात उपयोगी ठरतो.
" त्याचा चेहरा दिसत नसला तरी त्याची नजर मला जाणवते, त्यातला तो हिंस्र भाव........" कदाचित आठवणीनेच त्याला धडकी भरली असावी. माझ्या एअरकंडीशन रूममध्ये त्याच्या कपाळावर चमकणारे धर्मबिंदू चांगलेच जाणवत होते.
" तो कधी दिसतो तुम्हाला म्हणजे एखाद्या ठरावीक ठिकाणी दिसतो का?"
" नाही कुठेही दिसतो"
"बरं तुम्ही एकटे असताना दिसतो की बाकी माणसं बरोबर असताना दिसतो?"
" केव्हाही दिसतो, कधी एकटा असताना कधी माणसांच्या गराड्यात असतानाही."
" बरं तुम्ही त्याचं चित्र काढू शकाल?" त्याच्या हातात एक ड्रॉईंग पॅड देत मी म्हणालो. " अगदी तंतोतंत नसेल तरी चालेल पण ढोबळपणे तरी काढू शकाल ना?"
या मागेही एक तत्त्व आहे माणसाचे हे असले भास कधीकधी एखाद्या दडपणामुळेही तयार होतात. आता सगळेच बिल्डर्स हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात असं मी मानत नाही. कदाचित धंद्यानिमित्ताने संबंध आलेल्या एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या घटनेचे पडसाद मनात कुठेतरी खोल रुजल्यानेही असे होत असावे. कमलचे रेखाटन चालू असताना मी हाच विचार करत होतो.
कमलच्या कागदावरच्या चित्रापेक्षा मला तो चित्र काढत असताना त्याच्या चेह-यावरचे भाव टिपायचे होते. सुरुवातीला सहज चालणारा त्याचा हात थोड्यावेळाने अडखळत चालायला लागला. मघापासून शांत जाणवणा-या त्याच्या चेहर्यावर आता थोडी खळबळ माजली होती. जसा जसा वेळ पुढे सरकत गेला तसा तसा कमलच्या अडखळण्याचे प्रमाण वाढत गेले. त्याच्या चेहर्यावरची साकळत जाणारी भिती वाढत गेली. अखेर त्याने तो कागद दूर भिरकटवला आणि हाताने चेहरा झाकून दोन्ही पायाची जुडी पोटाशी घेऊन बसून राहिला. हे एक आत्यंतिक घाबरलेल्या माणसाचे प्रतीक असते. अशावेळी त्या माणसाला काहीकाळ एकटं सोडणंच ठीक असतं, अन्यथा अचानक मारलेल्या हाकेने किंवा स्पर्शाने त्याच्या मनातल्या भितीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. म्हणून मी कमलने बाजूला भिरकावलेल्या कागदाकडे मोर्चा वळवला.
कागदावर मला अपेक्षीत असं काहीच दिसलं नाही. त्यावर फक्त एक संदर्भहीन रेखाटन होते. म्हणजे आपण आकाशात पाहिल्यावर जसे ढगांचे आकार दिसतात तसे, एकंदरीत आउटलाइन मानवी शरीराशी मिळतीजुळती होती, पण प्रमाणबद्ध नव्हे तर अनियमित ढगांच्या आकारासारखी. चेहरा बिलकुल नव्हता त्या ऐवजी तिथे फक्त एक ढगाळ पुंजका काढलेला होता. एकूणच या आकृतीला पाहून एखादे लहान मूलही घाबरले नसते. आणखी काही खास दिसतेय का ते पाहण्यासाठी मी मन त्या आकृतीवर एकाग्र केले आणि...........
" तो पहा, तो आला..... नको, नको त्याला हाकला आधी इथून" कमल सोफ्यावरून उठून माझ्या मागे कधी येऊन उभा राहिला याचा मला पत्ताच लागला नाही. नाही म्हटलं तरी मी दचकलोच.
" कोण आहे ? कुठे आहे" कमलच्या नजरेचा अंदाज घेत मी विचारले.
" तो पहा तिथे पुन्हा मला त्याच्या त्या जीवघेण्या लालभडक नजरेने पाहतोय" माझ्या उजव्या कोपर्याकडे तो माझे लक्ष वेधत होता. त्या ठिकाणी शो पीस म्हणून ठेवलेली एक उंच फुलदाणी होती.
" कमल तिथे काही नाहीये बघ नीट फक्त फुलदाणी आहे"
" नाही तोच आहे तिथे.., बघा कसा तारवटल्या नजरेनं माझ्याकडे पाहतोय तो."
कमलला होणारे भास पुन्हा सुरू झालेले दिसत होते. मी ताबडतोब ती फुलदाणी तेथून उचलून दुसर्या रूम मध्ये ठेवली. आता कमलच्या चेहर्यावर सुटकेचे भाव दिसत होते.
" पाहिलंत डॉक्टर, तो इथेही आला"
" पण आपण त्याला आता त्या रूम मध्ये कोंडून ठेवलाय ना? आता नाही दिसणार परत तो तुला" मी त्याची समजूत काढली. मला माहीत होतं हा तात्पुरता उपाय होता. याचं मुळं कुठेतरी खोलात होतं. मी कमलला बाहेर जायला सांगितले आणि गुप्तांना आत बोलावले.
आत आलेल्या गुप्तांच्या चेहर्यावरची काळजी स्पष्ट वाचता येत होती. त्यांना बसायला सांगून मी त्यांना आताच्या घटनेबद्दल सांगितले. माझे काही निवडक प्रश्नही त्यांना विचारले पण ते मी इथे लिहू शकत नाही कारण ते फारच वैयक्तिक आणि गुप्त स्वरूपाचे होते. पण माझे एकंदर निरीक्षण आणि परिस्थिती पाहता मला तरी हा स्किझोफ्रेनिया एक प्रकार वाटत होता. हॅल्यूसिनेशन्स म्हणजे भ्रम हे त्याचाच एक भाग असावेत. तसे मी गुप्तांनाही सांगितले. त्यावर शक्य असलेल्या गोळ्याही मी त्यांना लिहून दिल्या. पण माझी पूर्ण खात्री नव्हती.
"डॉक्टर कमल यातून पूर्ण बरा होईल ना हो ?" पेशंटच्या नातेवाइकांना नेहमी भेडसावणारा प्रश्न त्यांनी मला विचारला. या क्षणी मी त्यांना काहीच खात्री देऊ शकत नव्हतो. पण पुढच्या सिटिंगमधूनही काही रिझल्ट्स मिळतील अशीही खात्री देता येत नव्हती.
" पाहू, या औषधांना तो कसा प्रतिसाद देतो ते, नाहीतर पुढच्या सिटिंगमध्ये आपल्याला त्याच्यावर हिप्नॉटीझमचा प्रयोग करावा लागेल. कदाचित त्यातून काही कळलं तर !" माझ्या समोरचा शेवटचा मार्ग मी त्यांना सांगितला. कदाचित मला हा मार्ग सुचला नसता तर पुढची आपत्ती टळली असती का? कुणास ठाऊक.
पुढचे आठ-पंधरा दिवस बाकी पेशंटमध्ये मी इतका गुरफटून गेलो की कमलची मला आठवणही राहिली नाही. आणि एक दिवस अचानक......... गुप्ता कमलसह पुन्हा एकदा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन हजर झाले. नशिबाने त्या दिवशी फारश्या अपॉइंटमेंट नसल्याने मला त्यांच्याशी बोलता आले. मी दिलेल्या गोळ्यांचा कोर्स त्यांनी चालू ठेवला होता. त्या नंतर फारतर चार-पाच दिवस ठीक गेले आणि कमलचे भास पुन्हा सुरू झाले होते. यावेळी ते जरा जास्त मोठ्या प्रमाणावर होते. जास्त वेळ टिकत होते. कमलची अवस्था पार वादळात सापडलेल्या वृक्षाप्रमाणे झाली होती. या सततच्या अनुभवामुळे तो पार चुरमडून गेला होता. आता मात्र यावरचा पुढचा उपाय मला तरी एकच जाणवत होता तो म्हणजे त्याला हिप्नॉटाईझ करणे. माझ्या गरजेनुसार मलाही या शास्त्रात थोडी गती होती. अर्थात हिप्नॉटीझम काम कसे करते याची आजवर कुणालाच पूर्णपणे उकल करता आलेली नाही. ज्या उपपत्ती मांडल्या जातात ते केवळ अंदाज आहेत. मानवी मेंदू खरंच पूर्णतः कह्यात येऊ शकतो याबद्दल मलाही शंकाच आहे. पण तरीही मी कमलवर हा प्रयोग करून पाहण्याची गुप्तांकडे परवानगी मागितली आणि त्यांनीही ती दिली.
माझ्यासमोर सोफ्यावर पहुडलेला कमल बाजूला काळजीयुक्त चेहर्याने उभे असलेले गुप्ता आणि भिंतीवरच्या घड्याळाची सौम्यशी टिकटिक याखेरीज तिथे वेगळे असे काहीही नव्हते. मी माझ्या हातातली चेन जिच्या टोकाला एक चमकता लाल खडा लावलेला होता ती, कमलच्या चेहर्यासमोर घड्याळाच्या लंबकाप्रमाणे हालवायला सुरुवात केली. चेनच्या टोकाला असलेला खडा त्याची लालसर आभा पसरवत कमलच्या डोळ्यांना आकर्षीत करत होता.
" कमल तुला हा खडा दिसतोय?"
" हो"
"त्याच्यावर मन एकाग्र कर, शरीर एकदम मोकळं सोड, तुला या मण्याखेरीज काहीही दिसत नाही"
" होय" त्याच्या डोळ्यांची बुबुळे खड्याचा मागोवा घेत लंबकात्मक हालत राहिली.
" आता तुला झोप येतेय, गाढ झोप येतेय"
"हो"
"तुझ्या पापण्या जड झाल्यात, त्या उघड्या ठेवायला तुला त्रास होतोय" यावेळी त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
" आता मी एक, दोन, तीन म्हटल्यावर तू गाढ झोपी जाशील, मी टाळी वाजवल्याखेरीज तुला पुन्हा जाग येणार नाही" माझ्या सूचनेप्रमाणे कमल ताबडतोब गाढ झोपेत गेला.
थोडा वेळ असाच शांत गेल्यावर मी पुन्हा विचारले.
" कमल, तुला माझा आवाज ऐकू येतोय?"
"होय"
" आता तू भूतकाळात मागे जाणार आहेस, दोन वर्षे मागे. तुला काय दिसतंय?"
" आमच्या बांधकामाच्या साईट्स, तिथे चालू असलेल्या मशीनचा घरघराट, मजुरांचा कोलाहल आणि....... आणि त्या कोपर्यात तो, तो दिसतोय माझ्याकडे रोखून बघताना" कमलच्या कपाळावर घाम साचायला लागला होता.
" कमल, तू आणखी मागे जातोयस सहा महीने मागे तुला काय दिसतेय?"
" आमच्या बांधकामाची साईट पण यावेळी तिथे बुलडोझर फिरतायत."
"पुढे काय होतेय?"
" मोठे मोठे दगड सुरुंग लावून फोडले जातायत. मला, मला भिती वाटतेय...."
" कसली भिती वाटतेय तुला कमल?"
" माहीत नाही पण काहीतरी चुकीचे घडतेय असे वाटतेय, हा पहा ब्लास्टिंगमध्ये एक मोठा दगड उडाला आणि माझ्या अगदी जवळ येऊन पडलाय. वास्तविक आम्ही ब्लास्टिंगपासून खूप दूर सुरक्षित अंतरावर आहोत तरी तो इथपर्यंत आला, त्याचा आकार काहीतरी खास आहे जणू कुणीतरी मुद्दाम घडवावा तसा. पण त्याचे कशाशीच साधर्म्य नाहीये"
" पुढे काय घडतेय कमल?"
" पुढे, पुढे काही नाही फक्त अंधार दिसतोय" त्याच्या या उत्तराने मी चकीत झालो. गुप्तांना बरोबर चलण्याची खूण करत मी बाजूच्या रूममध्ये गेलो.
" गुप्तासाहेब तुम्हाला माहीत आहे तेव्हा काय झाले होते ते?"
" हो, म्हणजे बघा कमल त्या धक्क्याने बेशुद्ध पडला होता. तो मनाने जरा कमजोर आहे कदाचित त्यामुळे तसं झालं असावं, आम्ही ताबडतोब त्याला हॉस्पिटलात हालवलं होतं. त्या नंतर जवळपास चार तासांनी तो शुद्धीवर आला."
"कमाल आहे गुप्तासाहेब तुम्ही हे मला सांगितले नव्हतेत"
" मला त्यात काही खास असं वाटलं नव्हतं तेव्हा चार-दोन दिवसात आम्ही ती घटना विसरूनही गेलो"
आता माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते मी चुपचाप कमलकडे परतलो. आता कमलला त्याच्या बेशुद्धीनंतरच्या घटना विचारायला हव्या होत्या.
कमलजवळ पोहोचताच त्याचा विकृत झालेला चेहरा पाहून त्याला त्या अनुभवात काहीकाळ ठेवल्याबद्दल मलाच अपराधी वाटलं. मी पुढचा प्रश्न विचारला.
" कमल, आता तू पाच तास पुढे आलायस तू हॉस्पिटलातल्या बेडवर आहेस तुला आता काय जाणवत आहे?"
यापुढे ज्या घटना घडल्या त्यांची कल्पना मी खचीतच केली नव्हती.
" बस्स करा, तुमचे प्रश्न मला आणखी त्रास देऊ नका नाहीतर परिणाम वाईट होतील." एक खर्जातला खरखरीत आवाज कमलच्या तोंडातून निघाला. या अनपेक्षित घटनेने मी आणि गुप्ता दोघेही शहारलो. पुढचा प्रश्न विचारण्यासाठी ओठावर आलेला असताना मी तो गिळला. यापुढची कमलची हालचाल मात्र अकल्पनीय होती त्याने खाडकन डोळे उघडले. बापरे,..... त्याची ती नजर, जणू आम्हाला भस्मसात करण्याच्या तयारीत असलेली ....... वेळीच मी भानावर आलो आणि पुढे होऊन टाळी वाजवली. त्याबरोबर कमलचे डोळे पुन्हा मिटले आणि तो हळूहळू जागा व्हायला लागला.
त्या दिवशी तरी गुप्तांना मी थातुरमातुर कारणे सांगून परत पाठवले पण नाही म्हटलं तरी माझ्यावर हा एक आघातच होता. आजपर्यंतच्या माझ्या अनुभवात मी एकही पेशंट संमोहनिद्रेतुन आपोआप जागा होताना पाहिलेला नव्हता. माझ्या वैद्यकीयशास्त्राच्या पुस्तकात कुठेही असे उदाहरण मला वाचायला मिळाले नव्हते. मग हा कुठला वेगळ्या प्रकारचा आजार होता? या क्षणी तरी माझ्याकडे उत्तर नव्हते. मी पुढच्या पेशंटांना यंत्रवत तपासून लवकर घरी जायची तयारी केली. तेव्हा मला काय माहीत की आजच्या या कमलच्या केसमुळे पुढे माझ्या आयुष्यात काय उलथापालथ घडणार होती ते.
रात्री नेहमी प्रमाणे मी माझ्या ईझीचेअरवर वाचत बसलो. दिवसभरातल्या घटनांनी मन थकून गेल्यावर त्याला ताजंतवानं करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण कशानेतरी माझी वाचनसमाधी भंगली. नक्की काय घडले असावे याचा अंदाज घेयासाठी मी माझी नजर आजूबाजूला फिरवली आणि........ माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. कोपर्यात गुंजेसारखे दोन लालभडक डोळे माझ्याकडे रोखून पाहतं होते. मला नकळत कमलच्या नजरेची आठवण झाली आणि ए.सी. चालू असतानाही मला उकडत असल्याची भावना व्हायला लागली. मध्ये किती वेळ गेला ते मलाच कळले नाही. रेश्मा मला हलवत होती, तीच्या चेहर्यावरची भीती मला स्पष्ट दिसली. अर्थात मी जे अनुभवले त्याचे काही ना काही दृश्य परिणाम माझ्यावरही दिसत असावेत त्याशिवाय ती इतकी घाबरलेली नसणार. मी पुन्हा एकदा त्याच कोपर्यात नजर टाकली तिथे मंदपणे चमकत असलेला मॉस्क्युटो रिपलंटचा लाल दिवा अजूनही आपले काम करत होता. मग मघाशी मला दिसलेले ते दोन डोळे?.... मॉस्क्युटो रिपलंटला तर एकच दिवा असतो, कदाचित बराच वेळ वाचत राहिल्याने माझ्या डोळ्यांनी मला तसा भास घडवला असेल. तत्त्व मला माहीत नाही पण बराच वेळ नजर केंद्रित राहिली की कधी कधी काहीकाळ वस्तू दोन दोन दिसतात याचा अनुभव जवळपास सर्वांनी घेतला असेल. पण म्हणून मला डोळ्यांचीच जाणीव का व्हावी? कदाचित आजच्या त्या कमलच्या केसबद्दल फार विचार केल्याने असेल. मनाची समजूत काढून मी झोपायची तयारीने बेडवर कलंडलो.
रात्री झोप नीट न लागल्याने असेल किंवा आणखी काही कारणाने असेल दुसर्या दिवशी मला फार थकल्यासारखे वाटत होते. त्या दिवशी मी जरा लवकर घरी आलो आणि नेहमीप्रमाणे वाचत वगैरे न बसता सरळ ‘झोपेच्या’ च्या दोन टॅबलेट घेऊन झोपी गेलो. त्या नंतर मात्र दोन-चार दिवस नेहमी प्रमाणे नॉर्मल गेले. पण कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असावी.
त्या दिवशी रविवार होता मला क्लिनिकवर जायची गरज नव्हती. सहसा रविवारी मी, रेश्मा आणि तनू कुठेतरी छोट्याश्या पिकनिकला जात असू, पण आज सकाळपासून मला जरा अस्वस्थच वाटत होते त्यामुळे आम्ही तो बेत रहित केला. दुपारी रेश्माच्या हातचं सुग्रास जेवण घेऊन मी बेडरूममध्ये लोळत होतो. बाहेर रेश्माच्या आवराआवरीचा आवाज येत होता. आणि अचानक.......... भर दुपारी एकदम अंधारून आल्यासारखं वाटायला लागलं खोलीतली हवा भट्टीप्रमाणे तापल्यासारखी गरम लागत होती. हे सगळे बदल मला जाणवतायत न जाणवतायत तोच मला एका कोपर्यात ती आकृती दिसली. धुरकट पावसाळी ढगासारखी अनियमित आकाराची पण तरीही मानवी आकाराशी साधर्म्य दाखवणारी, मनाच्या कोपर्यात मला जाणवत होते की मी ही आकृती कुठेतरी पाहीलीये पण आता स्मरणशक्ती काम देत नव्हती. मनात दाटत होती ती भीती..... कसली, कुणाची ते जाणवत नव्हते पण भीतीने मनाचा ताबा घेतला होता. आणि एकदम मला आठवण झाली काळोखात एखादी आगपेटीची काडी क्षणभर उजळून जावी तशी. त्या कमलने.. हो कमलनेच, अशीच आकृती रेखाटली होती माझ्या क्लिनिकवर असताना. ताबडतोब मनाच्या खोलवर कुठेतरी धोक्याची घंटा खणखणली, ‘आपण इथून दूर व्हायला पाहिजे अगदी लगेचच’ पण आता बेडवरून उठायचेही त्राण राहिले नव्हते. माझे डोळे त्या धुरकट आकारात दिसणार्या दोन लालभडक खुनशी नजरेत अडकल्यासारखे झाले होते. हा काळ किती लांबला ते कळलं नाही पण कशासाठी तरी रेश्मा दरवाजा उघडून आत आली आणि पाहता पाहता समोरचे दृश्य विरघळून गेले. माझी अवस्था कदाचित वाईट असावी कारण रेश्माच्या चेहर्यावर काळजीची पुटं चढली होती. पण तिला काही सांगणे म्हणजे तिला आपल्यासोबत चिंतेच्या दरीत ओढल्यासारखे झाले असते त्यामुळे सकाळच्या अस्वस्थपणाचे कारण सांगून मी तिची समजूत काढली. तरीही तिला काहीतरी वेगळेपणा नक्की जाणवला असला पाहिजे कारण ती बाहेर पाडण्यापूर्वी ‘त्या’ कोपर्याकडे फार काळजीपूर्वक पाहतं होती. तसेही स्त्रियांचे मन हे पुरुषांपेक्षा जरा जास्त संवेदनाक्षम असतेच. मात्र त्या नंतरचा दिवस मी रेश्मा आणि तनूच्या सोबतच घालवला. न जाणो मी ही हॅल्यूसिनेशन्स शिकार झालो होतो की काय.
या नंतरचा अनुभव मला फार अनपेक्षित वेळी आणि ठिकाणी आला. क्लिनिकवर गुप्तांचा फोन आल्याचं कळलं आणि पुन्हा एकदा अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून मी त्यांची भेट घेतली. मनात एक दाट उत्सुकता होतीच, कमलचे पुढे काय झाले ते जाणून घेण्याची. गुप्ता बराच वेळ माझ्या रूममध्ये होते आणि आमची बरीच चर्चा झाली त्याचा सारांश इतकाच की कमलचे भ्रम आता पूर्वीपेक्षा जास्त वाढले होते अधे मध्ये एखादा तास तो नॉर्मल असे. बोलता बोलता त्यांच्याकडून नकळत हे ही कळले की तो नेमका या रवीवारी जवळपास दोन-एक तास नॉर्मल होता. आणि माझ्या शरीरातून भयाची एक शिराशिरी निघून गेली. गुप्तांच्या भेटीमुळे मला फारच अस्वस्थ व्हायला झाले म्हणून मी भर दुपारीच सरळ घरी निघून आलो. पण त्याने भागणार नव्हतेच कारण त्या नंतरचा अनुभव मला लवकरच आला.
सकाळचा चहा बाहेर लॉनवर घ्यायला मला आवडतो. त्याने दिवसभराच्या कामासाठी मनाला तरतरी येते असं आपलं माझं मत. त्या दिवशीही सकाळी मी आणि रेश्मा बाहेर लॉनवर चहा घेत होतो. आमच्या घराच्या लॉनच्या कडेला आम्ही गर्द सावलीचे गुलमोहोरासारखी झाडं लावली आहेत त्यामुळे लॉन जरा आणखी उठावदार दिसते. चहा घेतानाच पुन्हा एकदा आजूबाजूचे वातावरण बदलत असल्याची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली. यावेळी अंधारल्यासारखे वाटत नसले तरी नजर सारखी समोरच्या झाडाच्या सावलीकडे ओढल्यासारखी जात होती. एव्हाना तीच हवा तप्त झाल्यासारखी जाणीव व्हायला लागली. आणि समोरच्या सावलीत काहीतरी वेगळेपण जाणवायला लागले. होय, समोरच्या झाडाच्या सावलीत ‘ते’ आपला आकार धारण करत होते. माझ्या मानेवरून एव्हाना घामाचे ओघळ सुरू झाले होते. बापरे! त्याची ती नजर, जणू आपले विषारी पाश माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यातूनच कशीबशी नजर सोडवून घेत रेश्माकडे पाहिले तिचीही नजर तिकडेच लागलेली होती. देवा ! म्हणजे ‘ते’ तिलाही दिसत होते की काय? इतका वेळ लॉनवर बागडणारा तनू आता आईला बिलगला होता तरीही तिचे लक्ष त्याच्याकडे जात नव्हते. हे नक्कीच चांगले लक्षण नव्हते. पुन्हा तो ताणल्या गेल्यासारखा काळ...... एकदाचे ते दुष्टचक्र तात्पुरते का होईना थांबले. मी भानावर येत आधी स्वतःला सावरले आणि मग रेश्माला हाक मारली. त्या दिवशी माझा क्लिनिकवर जायचा मूडच राहिला नाही. सेक्रेटरीला फोन लावून आजच्या अपॉइंटमेंट्स पुढे ढकलायला सांगितले. नाहीतरी सततच्या माझ्या या चालढकलीमुळे पेशंटच्या संख्येवरही परिणाम झालाच होता.
झाल्या प्रकाराचा पहिल्यापासून विचार केल्यावर एकूणच माझ्या आतापर्यंतच्या ज्ञानाला सुरुंग लागण्याची वेळ आली होती. अशावेळी मला मदतीची गरज होती. आणि झटकन डोळ्यासमोर नाव आले ते प्रोफेसर शास्त्रींचे. प्रोफेसर शास्त्री मानसोपचारातली डॉक्टरेट घेतलेले आणि आता आपल्या ज्ञानाचा उपयोग माझ्यासारख्यांना शिकवण्यासाठी करणारे माझ्या कॉलेजचे प्रोफेसर. त्यांचा परामानसशास्त्राचा अभ्यास दांडगा. कॉलेजमध्ये असताना (आणि त्यानंतरही) आम्ही त्यांची यावरून खिल्ली उडवत असू. तरीही मनात सुप्तपणे त्यांच्याबद्दलचा आदरही होताच. कदाचित यावेळी मला तेच मदत करू शकत होते. ताबडतोब मी त्यांना फोन करून भेटण्याची परवानगी मागितली, आणि त्यांनीही ती अजिबात खळखळ न करता देऊन टाकली.
शास्त्रीसरांची भेट घ्यायला जरी मला त्रास झाला नसला तरी माझ्या मनातला विषय त्यांच्यासमोर उघड करायला मला फार अवघडल्यासारखे झाले होते. त्यामुळेच सरांबरोबर त्यांच्या स्टडीमध्ये बसल्यावर माझ्या गप्पा अवांतर विषयांवरच जास्त चालल्या होत्या. कदाचित माझी अवस्था त्यांच्या नजरेतून सुटली नसावी त्यामुळे त्यांनीच थेट मला त्यांची भेट घेण्याचे प्रयोजन विचारले. थोडा चाचरत थोडा गोंधळत मी बोलायला सुरुवात केली. आणि डॉक्टर गाडगीळांच्या फोनपासून ते मला आलेल्या अनुभवांपर्यंत मी बोलत राहिलो. सरही माझ्या बोलण्यात व्यत्यय न आणता डोळे मिटून माझी हकिगत ऐकत राहिले. ही त्यांची जुनी सवय पहाणार्याचा कधी कधी असा गैरसमज होत असे की शास्त्रीसर झोपलेयत की काय, पण ते मात्र समोरच्याचा शब्द न शब्द व्यवस्थित ऐकत असतं आणि नंतरच त्यांना खटकलेले मुद्दे विचारत असतं. माझे बोलणे पूर्ण होताच त्यांनी हळूच डोळे उघडले आणि आता ते काय विचारतात या कडे माझे कान लागले.
"विकास, या कमलला मला भेटता येईल का? आणि ते ही शक्य तितक्या लवकर." त्यांचा हा प्रश्न मात्र मला अनपेक्षित होता.
"नक्की सर, उद्याच मी त्यांना घेऊन तुमच्याकडे येतो."
" आणि हे पहा, शक्यतो त्याला एकट्यालाच आणायचा प्रयत्न कर बरोबर तू सोडून कुणीही नको"
" ठीक आहे सर"
" आणखी एक महत्त्वाची गोष्ट आज तुला पुन्हा तसे अनुभव येणार आहेत, तू त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष कर आणि अगदीच गरज वाटली तर झोपताना एखादं सिडेटीव्ह घे" त्यांच्या या वाक्याने माझ्या शरीरातले रक्त जणू गोठल्यासारखे झाले. तरीही सर सांगतायत म्हणजे त्यात नक्की तथ्य असणार असे गृहीत धरून मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांचा निरोप घेऊन मी घरी जाण्यासाठी गाडीत बसलो, काही यार्डच गेलो असेन इतक्यात गाडीतली हवा तापत असल्याची जाणीव मला व्हायला लागली. आजूबाजूचे वातावरण काळवंडत जात असल्यासारखे वाटायला लागले आणि......... आणि समोरच्या स्टियरिंग व्हीलच्या खालीच मला ते दोन भयाण डोळे दिसायला लागले. धमन्यांतून जणू बर्फाचे पाणी वाहतं असल्यासारखे माझे शरीर थंड पडायला लागले. वेळीच सरांची सूचना आठवली आणि मी गाडी सरळ रस्त्याच्या बाजूला थांबवली. दरवाजा उघडून बाहेर पडायला मला जे कष्ट झाले त्याचे वर्णन मला आता करता येणार नाही. गाडीचे दरवाजे लॉक करून मी सरळ टॅक्सीला हात केला.
घरी आल्यापासूनचे तास मी कसे काढले ते माझे मलाच माहीत. कधी टी.व्ही.च्या माध्यमातून तर कधी सजावटीसाठी लावलेल्या एखाद्या शो पीस च्या माध्यमातून मला ‘ते’ आपले अभद्र दर्शन घडवतच राहिले. अखेरीस ‘झोपेच्या’ च्या दोन गोळ्या घेऊन मी झोपी गेलो. रात्री काय काय स्वप्न पडली ती सगळी विस्मृतीच्या पडद्याआड गेली. सकाळी उठल्यावर मला प्रथम कमलला घेऊन शास्त्रीसरांच्या बंगल्यावर जायचे होते. त्यासाठी गुप्तांशी बोलणे गरजेचे होते. त्यांना फोन लावण्यासाठी मी फोन उचलला खरा पण, पुन्हा एकदा त्या अनामिक भितीने शरीर थरारून गेले. समोरच्या फोनचा की पॅड माझ्यावर नजर रोखून बसल्यासारखा वाटत होता. त्याकडे दुर्लक्ष करत ( यावेळी तसे करणे मला सहज शक्य झाले) मी गुप्तांना फोन लावला आणि कमलची अधिक तपासणी करण्यासाठी त्याला दुरर्या ठिकाणी न्यावे लागत असण्याची कल्पना दिली. त्याचबरोबर यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता असल्याने त्यांनी कमलला माझ्या क्लिनिकवर सोडून जावे नंतर मी स्वतः त्याला घरी सोडेन असेही सुचवले. त्यांनीही ते मान्य केले नाहीतरी त्यांच्या उद्योगाच्या व्यापातून त्यांना इतका वेळ काढणे कठीणच जाणार होते म्हणा. ठीक अकराच्या सुमारास कमल माझ्या क्लिनिकवर येऊन दाखल झाला. त्यानंतर घटकाभरही विलंब न करता मी त्याला घेऊन शास्त्रीसरांकडे गेलो.
शास्त्रीसरांना आधीच कल्पना असल्याने ते आमची वाटच पाहतं होते. त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांच्या घरात प्रवेश केला. बाहेर हॉलमधूनच वरच्या मजल्यावर जायचा जीना होता. वरच्या मजल्यावर उजव्या बाजूला फक्त एकच रूम दिसत होता. सरांनी आम्हाला थांबण्याची खूण करून आत प्रवेश केला. दोनच मिनिटात त्यांनी आम्हाला आत बोलावले.
चौकटीतून पाऊल आत टाकण्याआधीच या खोलीचे वेगळेपण नजरेत येत होते, बाहेरच्या आधुनिक सजावटीच्या विरुद्ध ही खोली होती. चारही भिंती झुळझुळीत पडद्यांनी झाकलेल्या दिसत होत्या, समोरच पडद्यानेच खोलीचे दोन भाग पाडलेले होते फक्त हे पडद्यांवर सोनेरी रंगात काही क्लिष्ट नक्षीकाम केलेले दिसत होते. सध्या पडदे बंद असल्याने पलीकडे काय असावे याचा अंदाज येत नव्हता. समोरच उभे राहून सर आमच्याकडे बारकाईने पाहतं होते. एखादं सेकंद घुटमळल्यासारखे करून मी आत प्रवेश केला पण कमल मात्र अजूनही दाराबाहेरच थांबला होता.
" कमल, आत ये ! " सरांनी हाक मारली मला त्यात किंचितशी अधिकाराची झाक जाणवली. पण कमल मात्र मुकाट्याने आत आला. सरांपाठोपाठ आम्ही समोरचे पडदे बाजूला करून आत गेलो, आतल्या दृश्याने मला किंचित अपेक्षाभंग झाल्यासारखे वाटले. मी आत एखाद्या उग्र चेहर्याच्या मूर्तीची त्यासमोर असलेल्या धगधगत्या अग्निकुंडाची वगैरे अपेक्षा करत होतो पण समोर मात्र एका सोनेरी कलाकुसरीने मढलेल्या एका टेबलाभोवती ठेवलेल्या चार खुर्च्या तेवढ्या दिसल्या. माझे विचार कदाचित सरांना समजले असावेत.
" पारलौकिक शक्तींशी सामना करण्यासाठी आत्मबलाची आणि ज्ञानाची गरज असते इतर ठिकाणी दिसणार्या भयावह गोष्टी म्हणजे फक्त संकेतात्मक असतात" आम्हाला खुर्च्यांवर बसण्याची खूण करत सर म्हणाले.
आम्ही खुर्चीत बसलो आणि सरांनी कदाचित टेबलाखाली असलेली काही बटणे दाबली असावीत. अचानक आतले लाइट्स बंद होऊन फक्त टेबलाभोवती निळ्या रंगाचा शांत प्रकाश पडला. आता सरांनी कमलकडे मोर्चा वळवला. इथेही पुन्हा माझा अपेक्षाभंग झाला. मला वाटल्याप्रमाणे सरांनी त्याला त्याच्या भासांबद्दल न विचारता त्याच्या गतायुष्यातल्या लहानसहान घटना विचारायला सुरुवात केली. बराच वेळ असाच गेल्यावर त्यांनी आम्हाला बाहेर जाण्याची खूण केली. आणि आत्ता प्रथमच मला एका सुरक्षित अवकाशातून पुन्हा अज्ञाताकडे निघाल्यासारखे वाटायला लागले.
कमलला न्यायला आलेल्या गाडीतून त्याला घरी पाठवल्यावर मी पुन्हा प्रोफेसर शास्त्रींकडे गेलो. एव्हाना ते ‘त्या’ खोलीतून बाहेर येऊन हॉलमधल्या सोफ्यावर बसले होते.
" सर, तुम्ही कमलच्या प्रॉब्लेमबद्दल त्याला काहीच विचारले नाहीत?" मघापासून मनात घोळणारा प्रश्न मी विचारून टाकला.
" त्याची गरजही नव्हती आणि त्याने आत्ता काही उत्तर दिले असते असे मला नाही वाटत."
" म्हणजे?"
"तू त्याला दारात घोटाळलेला पाहिला नाहीस का? या खोलीतला अवकाश खास संस्कारित केलेला आहे. इथे कुठल्याही अनाहूत शक्तीला प्रवेश नाही"
"पण कमलला तर तुम्हीच आत बोलावले होते ना !" माझा गोंधळ अजूनही संपला नव्हता.
" बरोबर आहे कमलला मी बोलावले होते त्याच्या सोबत आलेल्या छायकाला नाही" सर हसत म्हणाले.
" छायक?"
" हो, छायक म्हणजे मानव जेव्हा परग्रहावर यान पाठवतो तेव्हा स्वतः न जाता त्यातून एखाद्या प्राण्याला प्रायोगिक तत्त्वावर पाठवतो तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तसाच हा प्रकार फक्त इथे पारलौकिक शक्ती हा उपक्रम करू पाहतायत त्यांचे हे गिनिपिग म्हणालास तरी चालेल"
" पण त्यासाठी कमलच का?"
"सोपी गोष्ट आहे तो एकदा त्यांच्या फार जवळ जाऊन आलेला आहे, थोडक्यात त्यांना आपल्या नव्या जगाचा मार्ग दाखवून आलाय" यातला एकही शब्द मला कळला नाही.
" तो कसा काय?" माझ्या प्रश्नात अविश्वास जाणवत असावा.
" या साठी तर मी त्याचा भूतकाळ खणून पाहतं होतो"
" त्याच्या भूतकाळात तर तो सरळ साधा संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे असं दिसतंय"
"अगदी बरोबर, आणि त्यामुळेच त्याचा वापर करणे सोपे झाले त्यांना" सेकंदभर थांबून सर पुढे म्हणाले " तुला त्याच्या साईटवरचा ब्लास्टिंगच्यावेळचा अनुभव माहीत आहेच, त्याच वेळी कमल मृत्युभयाने बेशुद्ध पडला त्यात कदाचित तो मृत्युरेघेला स्पर्श करण्याइतपत गेला असावा"
" त्या मुळे हे असे घडले?" मी आणखी एक शंका काढली.
" नाही, जीवन आणि मृत्यूच्या परिसीमेच्या काठाकाठाने ही प्रकांड शक्ती भरलेली आहे. अर्थात तिचे धवल आणि कृष्ण असे प्रकारही असतीलही ,पण कमल मात्र त्या सीमारेषेवरून परत येताना एखाद्या वाईट शक्तीला आपल्या सृष्टीचा मार्ग खुला करत आला असावा."
"याचे कारण?"
" त्याच्या मनाचा संवेदनशीलपणा, त्याची कमकुवत इच्छाशक्ती,.... ब्लास्टिंगच्यावेळी त्याच्या जवळ पडलेल्या दगडात त्याला वेगळेपण जाणवले हे तुला माहीत आहेच, त्याच शेवटच्या भावनेत तो अचेतनावस्थेत गेला त्यामुळे कदाचित त्याचा संपर्क एखाद्या वाईट शक्तीशीच आला असावा"
" पण, मग असे कितीतरी लोक जीवनमरणाच्या रेषेवरून परत येतात त्यांच्या बाबतीत असे घडत नाही ते?" डॉक्टर असल्याने मला असे प्रश्न पडणार होतेच.
" का नाही? त्यातल्या कित्येक लोकांच्या स्वभावात बदल घडून आलेला दिसतोच की हे कसले द्योतक आहे? आणि प्रत्येक वेळी मनुष्याच्या इच्छाशक्तीचा कमकुवतपणा जाणवतोच असे नाही ना". ही मात्र विचार करण्यासारखी गोष्ट होती, आत्महत्या करणारे अनेक लोक अगदी शेवटच्या क्षणी वाचलेले मी पाहिलेत पण असे लोक वाचल्यावर पूर्ववत वागायला लागतात कदाचित त्यांची मरणाची क्षणिक इच्छाच इतकी प्रबळ असते की त्यांना साधन बनवणे ‘त्या’ शक्तींना शक्य होत नसावे. याउलट अचानक मृत्यूच्या तडाख्यातून सुटलेल्या माणसांच्या स्वभावात अचानक प्रौढत्व आलेले मी पाहिलेय.
मला विचारात पडलेला पाहून सरांनी मला विचारले तुला छायक म्हणजे नक्की काय असतं ते पाहायचंय का? मी मानेनेच होकार दिला. माझ्या आजपर्यंतच्या वैद्यकीय अनुभवात आज काहीतरी नवीनं घडू पाहतं होते.
सरांनी आतल्या खोलीतून काही उदबत्त्या पेटवून आणून समोर ठेवल्या. काहीच सेकंदात त्यांचा धूर वातावरणात पसरला. मनालाही उत्तेजना मिळाल्यासारखी वाटायला लागली.
" आता पहा बरं आजूबाजूला काही वेगळे असे दिसतेय का ते" सरांचा आवाज खोलातून आल्यासारखा जाणवला.
मी आजूबाजूला नजर फिरवली.............. आणि हॉलच्या उजव्या कोपर्यातली लँपशेड....... बापरे, तिथे त्या बरोबरच आणखी काहीतरी होते कधी दाट कधी विरळ होत त्या शेडच्या आकाराची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असलेले. माझ्या शरीराला पुन्हा घाम सुटू लागला, जीभ टाळ्याला चिकटल्यासारखी झाली आणि घशाला जणू कोरड पडली. किती वेळ हा प्रकार चालला कुणास ठाऊक पण सरांनीच काही केले असावे समोरचा तो आकार अचानक दिसेनासा झाला.
" यालाच छायक म्हणतात, तसे हे फार निरुपद्रवी असतात परंतु त्यांच्या आकलनात येणार्या गोष्टीच पुढे येणार्या त्यांच्या स्वामींना उपयोगी ठरतात. एक प्रकारचे गुप्तहेरच असतात हे असे म्हण ना !"
"पण हे असे कशाच्याही आकारात लपण्याची ताकद असलेला हा छायक मला नेमका आत्ता कसा दिसला?"
" हा सगळा तुझ्यासमोर लावलेल्या ऊदबत्त्यांचा प्रताप होता."
" याचाच अर्थ त्या उदबत्त्या साध्या नव्हत्या तर ! "
" नाहीच, खास ररायनांनी त्या संस्कारित केलेल्या होत्या, मुळात उदबत्ती या वस्तूंचा वापर आपण मांगल्याचे प्रतीक म्हणूनच करतो की नाही?"
" होय, पण.........." माझे वाक्य तोडत सर पुढे बोलत राहिले.
" मुळात पूर्वापार चालत आलेल्या हवन प्रक्रियेतला ‘धूम्र’ हा शब्द अपभ्रंश होऊन ‘धुप’ झाला आता त्या काळी धुपही काही खास वनस्पतींच्या रसायनाने सिद्ध केलेला असे, आता तसे करण्याची गरज नाही कारण आपल्या जगात उदबत्ती हा एक संकेत झालेला आहे आणि त्याचा मानवी मन सहज स्वीकार करते. आता जर मी तुझ्यासमोर धुप जाळला असता तर तुझ्या मनात नक्कीच शंका उपस्थित झाली असती आणि त्यामुळे तुझ्या मनाची पंचेंद्रियांवरची पकड आणखी घट्ट झाली असती मग तुला या तरल अवस्थेत जाणे नक्कीच कठीण झाले असते" मनोमन मलाही ते पटले जर सरांनी असे काही केले असते तर माझ्या डॉक्टरी मेंदूला ते नक्कीच वेगळे वाटले असते खरे.
"म्हणजे कमलला आणि मलाही जाणवलेले ते भयावह आकार म्हणजे हे छायकच होते का?" मघापासून विचारायचा प्रश्न मी विचारून टाकला.
" मुळीच नाही, आतापर्यंत त्या अघोरी शक्तींनी आपल्या सृष्टीत शिरकाव केलाच आहे पण त्यांना इथले नियम, रुढी, आकार हे शिकावे लागणार आहेत त्यासाठीच त्यांचा सततचा प्रयत्न चालू असतो. आणि त्यांना आपल्या सृष्टीत शिरकाव करण्याचा मार्ग तुझ्यामुळे सोपा झाला." हे विधान ऐकल्यावर मी दचकलो नसतो तर नवलच.
" माझ्यामुळे? ते कसे काय?"
" तू कमलला हिप्नोटाईझ केलेस, हिप्नोटाईझ झालेला माणूस म्हणजे घराचे सारे दरवाजे उघडे ठेवून झोपी गेलेल्या माणसासारखा असतो. त्याच्या मेंदूतली अनेक आज्ञात कवाडे उघडी असतात त्यातून आत शिरकाव करणे कुणालाही फार सोपे असते."
"याचा अर्थ त्यांनी कमल संमोहनिद्रेत असताना त्याच्या मनाचा ताबा घेतला तर ! "
" बरोबर त्यामुळेच तो संमोहनाखाली असला तरी त्याच्या हालचाली तुझ्या ताब्यात राहिल्या नाहीत" मला मनातल्या मनात कमलचे ते संमोहनात असताना घडलेल्या घटना आठवल्या आणि अंगावर शहारा आला. याचा अर्थ मी अजाणता का होईना भलतेच काहीतरी या जगात आणले होते. तरीही.........
" सर, पण मग कमलच्या पाठोपाठ मलाच ‘त्याची’ जाणीव का व्हावी?"
" हे फार सरळ समीकरण आहे ‘त्यांचा’ कमलवर अंमल सुरू झाला तेव्हा नेमका तूच त्याच्या सानिध्यात होतास. आणि ‘त्यांनी’ तुला त्यांच्या संमोहनाखाली घेतले" चटकन मला कमलचे संमोहित अवस्थेत असताना उघडलेले डोळे आठवले.
"पण याचा अर्थ मलाही कमलसारखे भास होतायत का?"
" नाही, या बाबतीत तुझी गफलत होतेय कोणतीही शक्ती विश्वास आणि भावना या दोन गोष्टींवर कार्यान्वयित होते. माणसाची श्रद्धा जर दगडात देवत्व आणू शकते तर त्याची भिती सैतानाची निर्मिती सहज करू शकते. आणि इथे तर त्या शक्तीला मूर्त रूप देण्याचे काम तुम्ही दोघे नकळत करत आहात."
" पण......... मग यावर आता पर्याय काय?"
" एकतर त्या अघोरी शक्तीशी मुकाबला करणे.. किंवा तिला पुन्हा तिच्या जागी पाठवून देणे यापैकी पहिला मार्ग फार विनाशकारी ठरू शकेल त्यामुळे आपण दुसरा मार्ग अवलंबणार आहोत"
" म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण?"
" मी पुन्हा एकदा कमलला संमोहनिद्रेत नेणार आहे, पण यावेळी मात्र त्याच्या अंतर्मनाचा केवळ एकच दरवाजा उघडा असेल ज्यातून ही जी काही अनिष्टकारी शक्ती आली आहे तिला जायला मार्ग मिळेल."
" पण यातही एक धोका आहेच जर ती शक्ती परत गेली नाही तर आपण तिला जादाची मदत मिळवायला मार्ग मोकळा करणार आहोत"
" नाही त्यावेळी कमलचे मन मी काही खास प्रकारे संस्कारित करणार आहे ज्यामुळे ‘त्यांना’ इथे राहणे अशक्य होईल."
" मग त्यासाठी कमलला पुन्हा इथे आणावे लागेलच ना? तसे मी गुप्तांशी बोलून घेतो"
" आत्ता लगेच नको, माझी तयारी पूर्ण झाली की मी तुला निरोप देईन तेव्हा तू त्याला घेऊन इथेच ये".
या नंतर काही जुजबी बोलणे झाल्यावर सरांचा निरोप घेऊन मी घरी परतलो.
यानंतर काही दिवस असेच वाट पाहण्यात गेले. आणि एक दिवस अचानक सरांचा फोन आला ज्याची मी मनपूर्वक प्रतीक्षा करत होतो. कारण मला होणारे भास अजूनही थांबले नव्हतेच एव्हाना त्यांनी जो आकार धारण केला होता मानवाशी साधर्म्य असलेला तरीही धुक्याच्या ढगासारखा, पण आता त्याच्यात बदल झाले होते. त्याचे ते धगधगत्या निखार्यांसारखे डोळे, तोंडाच्या जागी जाणवणारी काळी अंतहीन पोकळी आणि हातासारख्या भागाला दिसणार्या अणकुचीदार नख्या स्पष्ट जाणवत होत्या. एकूणच ‘ते’ आता शक्तिशाली बनत होते. सरांचा फोन आला आणि मला जरा सुटल्यासारखे वाटले सरांनी कमलसह मला त्यांच्या घरी बोलावले होते. मी बिलकुल उशीर न करता कमलला आणण्याची व्यवस्था केली आणि सरांच्या घरी पोहोचलो.
सरांच्या घरातले वातावरण वरकरणी तरी बदललेले वाटत नव्हते तरी त्यांच्या तयारीचा भाग आमच्यासारख्यांना जाणवणे अशक्यच होते अर्थात, पुन्हा एकदा आम्ही त्या खोलीत दाखल झालो. त्या सोनेरी कलाकुसरीच्या पडद्याआड जाण्याची इच्छा असूनही सरांच्या म्हणण्याप्रमाणे मला बाहेरच थांबावे लागले.
कमल आत गेल्याला अर्धातास उलटला आणि अचानक पडद्याआडच्या त्या खास जागेत काही भयंकर उत्पात घडत असल्यासारखे जाणवायला लागले. कदाचित सरांच्या प्रयोगाचा हा महत्त्वाचा टप्पा असावा. हा उत्पात पंधरा-वीस मिनिटे चालला असावा त्यानंतर आतमध्ये एकदम शांतता पसरली. बहुतेक सरांनी त्या उत्पाती शक्तीला पुन्हा परत पाठवले असावे. आणि अचानक.......... सर भेलकांडत त्या पडद्याआडून बाहेर आले. मी चमकून त्यांच्याकडे पाहिले आणि माझ्या शरीतातल्या रक्ताचा जणू बर्फ झाला. सरांची नजर एकदम कोरी दिसत होती, मानवी भावभावनांचा तिथे अजिबात मागमूस नव्हता. याचा अर्थ समजायला मला जो काही वेळ लागला असेल तोच त्या नंतर मी बेशुद्धीच्या गर्तेत कधी कोसळलो मलाच कळले नाही.
कुणीतरी गार पाण्याचे हबके चेहर्यावर मारत असल्याची जाणीव होऊन मी डोळे उघडले. वास्तवाचे भान यायला मला थोडाच वेळ लागला, समोर उभे असलेले गुप्ता माझ्याकडे काळजीने पाहतं असलेले दिसले.
" सर..... सर कुठायत? कमल कसा आहे?" मी पहिल्यांदा विचारले.
यावर काहीही न बोलता गुप्तांनी बाजूला नजर वळवली. तिथे प्रोफेसर शास्त्री आपल्या भावनाविरहित कोर्या नजरेने बसलेले होते.
" आणि कमल कुठे आहे?" मी प्रश्नाचा पुररुच्चार केला.
यावरही काही न बोलता गुप्तांनी मधला पडदा बाजूला केला, तिथे कमल टेबलाच्या बाजूच्या एका खुर्चीवर अस्ताव्यस्त कोसळलेला होता. तो आता जिवंत नाही हे सांगण्यासाठी कुणा जाणकाराची गरज नव्हती.
" शेवटी इथे झाले तरी काय?" आता प्रथमच गुप्ता आपले तोंड उघडत होते.
" गुप्तासाहेब माफ करा पण कमलला बरा करण्याचा हा प्रयोग पुन्हा एकदा फसलाय" वरकरणी जरी मी त्यांची समजूत काढत असलो तरी आतून माझा थरकाप झाला होता. सरांचा प्रयोग विफल झाला याचाच अर्थ आता ती अघोरी शक्ती आपल्या अचाट ताकदीनिशी आपल्या जगात प्रविष्ट झाली होती. तिच्या अस्तित्वाबद्दल माहीत असलेल्यांपैकी एकाचा तिने जीव घेतला होता तर दुसर्याचे मन पाटीवरून मजकूर पुसावा तसे पुसून टाकले होते. पण मग मी कसा वाचलो? ......... कदाचित समोरच्या त्या खास संस्कारित खोलीच्या बाहेरच्या बाजूला राहिल्याने असेल. मग आता ती शक्ती तिथेच अडकून राहील? कदाचित नाही कारण त्या खोलीतल्या वातारणावरचे संस्कार अजून टिकून असते तर गुप्ता आता जाऊन थेट त्या पडद्यांना हातही लावू शकले नसते याचाच अर्थ आता ती शक्ती मोकाट आहे, अनिर्बध आहे.
आता माझे आयुष्य नक्कीच शेवटाच्या जवळ पोहोचलेय कारण त्याबद्दल माहिती असलेला मीच शेवटचा माणूस शिल्लक आहे. म्हणून जोपर्यंत माझी विचारशक्ती शिल्लक आहे तोपर्यंत मी हे सारं काही लिहून ठेवत आहे. पण आता तुम्हालाही याबद्दल माहिती झालेली आहे त्यामुळे जपून रहा........... कदाचित तुमच्या आजूबाजूला दिसणार्या वस्तूपैकी एखादी वस्तू तिथे अस्तित्वात नसू शकेल त्या जागी तीच्या रूपात एखादा छायकही असू शकेल. ते कोणत्याही रूपात असू शकतात. आत्ता तुम्ही वापरत असलेल्या संगणकाच्या पडद्याच्या रूपातही...................... !
वाचने
5909
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान जमलीय ....
खल्लास!!
अजून तरी
भिती वाटावं असं काही, धन्यवाद
खुपच छान कथा..मस्त ओघवती शैली
बर्याच काळानंतर एक खूप उच्च
In reply to बर्याच काळानंतर एक खूप उच्च by प्रचेतस
+१००
In reply to बर्याच काळानंतर एक खूप उच्च by प्रचेतस
+१११११११११११११११११.
आभासि जग,छान आहे कथा
मस्त !!!!!!!!!!!!!!!!!
झकास झालीच आहे,
जबरा
भारी..
व्वा
प्रयोग आवडला आहे.
मस्त भीती वाटली.. खासकरुन
खिळवून थेवणारी कथा
ही ही हा हा हा!
जबरदस्त !
काल रात्रीच २ वाजता कथा अर्धी
श्रीराम जयराम श्रीराम जयराम
छान.
बाब्बौ! कथा चांगलीये पण शेवटी
सुरूवातीच्या भागात काही खूप
मस्त भयकथा
धन्यवाद
अतिशय छान लेखन. एकुण एक गोष्ट
जबरदस्त ! चकित करणारे लिखाण !
बर्याच दिवसांनी भयकथा वाचली..
(No subject)
पुन्हा एकदा धन्यवाद