गुंता- भाग १
पाठीलाही कळा जाणवत होत्या. एका नर्सला बोलावून मी ते सांगितलं, मूव्ह वैगरे घेऊन येते म्हणाली आणि गेली ती गेलीच. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली, जेवणही हॉस्पिटलमधूनच मिळणार होतं. कसंबसं घश्याखाली ढकललं, तेवढ्यात औषधं घेऊन एकजण आली. गुंगीने दुखणं थोडं कमी झालं आणि डोळा लागला.
......पुढे
===============================================================================
रात्री जेवण दिलं तेही मी फार त्रागा केल्यावर. दुपारी शुद्धीवर आल्यानंतर अंदाज नाही पण साधारण तासाभराने मला भूक लागल्यासारखं वाटत होतं, तेव्हा म्हणे नाकाला लावलेल्या नळीतून आम्ही तुम्हाला आवश्यक आहार पुरवतोय. रात्री मात्र माझा धीर सुटला, एक तर भूक लागली की मला तात्पुरतं खायला काहीतरी हवं असतं आणि दुपारी उपाशी राहून रात्री या लोकांचं तेच पालुपद ऐकायची माझी अजिबात इच्छा नव्हती. शेवटी नाकाची नळी काढून मला जेवण द्यावंच लागलं त्यांना. तेही काही खास नव्हतं म्हणा, पण उपाशी राहण्यापेक्षा पोटात काहीतरी भर पडली हे फार !!
तर असं ते यथातथा अन्न खाल्ल्यानंतर औषध घेऊन मी झोपले खरी पण मला परत मध्येच जाग आली, पाठ ठणकत होती. डोळे उघडून पाह्यलं, सगळीकडे शुकशुकाट होता. माझ्या आजूबाजूची इक्विपमेंट्स सोडली तर कशाचा आवाज नव्हता. काय करु कळेना. एका हाताला सलाईन तसंच होतं. बेडच्या बाजूचं बटन दाबलं तशी एक नर्स आली. तिच्या तणतणत येण्यावरुन सरळ कळत होतं की तिची झोपमोड झालीय. पण माझाही नाईलाज होता. पाठीची कळ अगदी असह्य होत होती. तिला सांगितली की पाठ फारच दुखतेय. मूव्ह घेऊन आली आणि वरवर क्रीम लावल्यासारखी करुन निघत होती. मग मात्र मी न राहावून आवाज चढवला आणि तिला म्हणलं की निदान मसाज तरी करशील का नाही. काय हौस म्हणून आहे का मी इथे. पण ती काही केल्या ऐकायला तयारच नाही. तिला म्हणलं बये तुला जर करायचं नसेल तर तू जाऊन झोप, पण त्याआधी बाहेर माझी बहीण बसली असेल तिला पाठव आत. ती करेल माझ्या पाठीला मसाज. येवढं सगळं बोलून मी माझ्यासाठीच संकट ओढवून घेतलं.
ती गेली आणखी दोघीजणींना सोबत घेऊन आली आणि परत तोच प्रकार !! हात आणि पायाची बोटं कॉटला बांधून ठेवली. काय प्रकार होता हा ?? उठसूठ मला बांधून ठेवायला मी वेडी होते की आणखी काही ? बांधताना बडबड मात्र सुरु सुरु होती तिची. "रात्री सव्वातीन वाजता हिला हिच्या बहिणीला भेटायचंय. एक तर सगळ्या पेशंट्ससाठी मर मर करुन जरा डोळा लागला तर बाईसाहेब बहिणीला भेटायचा हट्ट करतायेत !!" आणखी बरंच काय काय बोलली पण मला येवढंच आठवतंय आता. पण मी बहिणीला बोलव सांगितलं ते गप्पा मारायला का ? माझी पाठ खरंच फार दुखत होती आणि हिला जर मसाज नीट करायचा नव्हता तर ताईला आत पाठवायला काय हरकत होती? तिने हसत सगळं केलं असतं. सकाळपर्यंत मी तशीच पडून होते डोळे मिटून. विशेष नाही पण रात्रीपेक्षा कळा बर्याच कमी झालेल्या पाठीच्या. मध्येच कदाचित एखादा चुटका लागला असावा उजाडता उजाडता. कारण आता हात आणि पाय बांधलेले नव्हते. डोळा लागलेला बघून कोणीतरी दोर्या सोडून गेलं असावं. पण या बांधून ठेवण्यामागचं कारण काही केल्या मला कळेना. विचारलं तर कोणी सांगेल अशीही अपेक्षा नव्हती.
उजाडलं तसं थोड्या वेळाने एकजण अंग पुसायला आली. तिचं काम चालूच होतं. अंग पुसणं म्हणजे काय देखल्या देवा दंडवत असा प्रकार होता. अर्थात तिला इतर पेशंट्स साठीही हेच काम करावं लागत असणार. त्यामुळे तिचं हातातलं काम भराभर उरकणं चालू होतं. मी सहज केसांना हात लावून पाह्यला, केस फारच कोरडे झाले होते. आजारपणात तसं दुर्लक्षच झालं. आता एकदा इथून बाहेर पडले की केसांना नीट तेल वैगरे लावेन असा विचार चालला होता माझा. केस मी खरंच जीवापाड जपत आले. आमच्या घरातच तोकड्या केसांचं असं कोणी नाहीच.
आई काय नि आम्ही बहिणी काय सगळ्यांचे केस कसे लांबसडक !! मला आठवतं, लहानपणी एक दिवस असा नव्हता की मी गजर्याशिवाय शाळेत गेले. नाहीच मिळाला गजरा तर एखादं फूल तरी. मैत्रिणींच्या घरी तर असा समज झाला होता की आमची फुलांची बाग आहे. अतिशयोक्ती वाटेल, पण खरंय. सासरीसुद्धा तसंच !! फुलं, गजर्यांच्याबाबतीत कधी कमतरता नव्हती. पण माहेर ते माहेरच. नाही म्हणायला ताईच्या सासरच्यांनी कहर केला होता तो भाचा झाला तेव्हा. म्हणजे माझं लग्न होऊन वर्षभर झालं असेल आणि भाचा झाला. मी बारशाला जाताना मस्त दोन गजरे माळले, चाफ्याची फुलं घेतली एक वाटा. त्यात नऊ दहा फुलं आली. एक मी माळलं बाकी ताईला आणि तिच्या जावेला, नणंदेला होतील म्हणून पिशवीत टाकली. बारशाला जाऊन बघतेय तर जिच्या लेकाचं बारसं तिच्या डोक्यात एक फूल नाही !! ताईजवळ गेले आणि चाफ्याची पुडी उघडून धरली तिच्यासमोर. तिने तोंड पाडलं. म्हटलं "का गं ? घे की !! तोंड का पडलं तुझं?"
"बाईंनी बजावलंय की बाळ निदान तीन वर्षाचं होऊस्तोवर फुलं माळायची नाहीत. फूल सुकेल तसं मूल सूकत जातं म्हणे", ताई म्हणाली.
हे वाक्य ऐकल्यावर मला हसावं की रडावं तेच कळेना. कोणत्या युगात वावरत होतीत ही माणसं !! मी ताईच्या खोलीत गेले आणि ती नेहमी जिथे ठेवायची तिथून सूईदोरा घेतला. सगळी चाफ्याची फुलं एकत्र ओवली. तिच्या जावेला आणि नणंदेला न जुमानता ती एकत्र गुंफलेली चाफ्याची फुलं ताईच्या केसात माळली, भरीसभर माझ्या केसातले गजरेही काढून तिच्या केसात माळले. तिच्या घरातल्यांची तोंडं बघण्यासारखी झाली होती. ते आठवून मला हसू आवरलं नाही. जवळ उभी नर्स मी का हसतेय ते बघायला लागली. तिला सांगितलं की काहीतरी जूनं आठवलं म्हणून.
मध्येच आठवणार्या या गोष्टी मला आजूबाजूच्या त्या रोगट वातावरणाचा विसर पाडायला लावत होत्या. अंथरुणावर पडून विचार करण्याशिवाय आणि जुन्या गोष्टी आठ्वण्याशिवाय काय काम होतं मला. भेटायच्या वेळेत ओळखीतलं कोणीतरी येऊन जायचं, तेवढंच बोलणं व्हायचं. नाहीतर छताकडे टक लावून पाहत राह्यचं हा एकच उद्योग होता. एवढं आजारपण मी पहिल्यांदाच अनुभवत होते आणि महत्त्वाचं म्हणजे मी आयसीयूत यावे इथपर्यंत मजल जावी असं घडलं तरी काय याचं उत्तर कोणी द्यायला तयार नव्हतं. शुद्धीवर आले तेव्हा मुलं भेटून गेली. वाटत होतं त्यांना विचारावं, पण त्यांची अवस्था बघून तीही आतून पार हलल्यासारखी वाटत होतीत. हसत होतीत पण मनावर आलेलं दडपण मला दिसू नये म्हणून. काही कळायला मार्ग नव्हता. मी मात्र कधीतरी या सगळ्यावरुन पडदा बाजूला होईल अशी आशा बाळगून होते. त्याहीपेक्षा वाट बघत होते असं म्हणलं तर योग्य ठरेल.
रोज रक्ताचे आणि युरिनचे सॅम्पल्स घेणं चालूच होतं. नाही म्हणायला आता मला बरंच फ्रेश वाटत होतं. या लोकांनी मला आयसीयूतून बाहेर काढायला हरकत नव्हती. त्या चारेक दिवसात नवरा मोजून चार वेळा भेटून गेला होता. त्याला तो बांधून ठेवण्याचा प्रकार सांगून पाह्यला पण त्याने चेहर्यावरची माशी हलू दिली नाही. म्हणे डॉक्टर त्यांच्या पद्धतीने ट्रीटमेंट करतील आपण कशी ढवळाढवळ करायची. मग मी समजून गेले की या माणसाला बोलण्यात काही अर्थ नाही. ताई भेटायच्या वेळेत अधूनधून फेरी मारुन जायची, पण तिचं मवाळ वागणं बघता तिलाही काही सांगण्यात अर्थ नव्हता.
त्याच दिवशी संध्याकाळी माझी मोठी जाऊ आली आणि नेमकं तेच माझ्या पथ्यावर पडलं. कोणी काही म्हणो तिला, पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर सगळं तिथल्या तिथे सांगून टाकायचा तिचा स्वभाव. तिला त्या तीन-चार दिवसांत जे काही घडलं ते सगळं सांगितलं. बांधून ठेवण्याचा प्रकार ऐकून ती जरा चिडलीच होती. तिच्या चेहर्यावरचे हावभाव बघून मला लक्षात आलं की मी योग्य ठिकाणी किल्ली लावलीय......
(क्रमशः)
वाचन संख्या
6925
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याहीपेक्षा वाट बघत होते असं म्हणलं तर योग्य ठरेल
खूप छान पण हेलावणारं लिहितोयस
(No subject)
पन नक्कि काय घडलय अस?
उत्तम लिखाण, या विषयाला हात
अरे
नक्की गुंता कुठे झालाय हेच
+1
In reply to नक्की गुंता कुठे झालाय हेच by अन्या दातार
लैच सूड घेताय राव .... लवकर
पहिल्या भागाची
गुंता
गुंता
लैच गुंता वाढू लागलाय...!
वाचतीये.
सगळा गुंता सुटल्यावर कथा वाचणार
कठीण आहे...
वाचतोय. पूर्ण वाचून
याला म्हणतात संपादकीय प्रतिसाद
In reply to वाचतोय. पूर्ण वाचून by गवि
काय झालय म्हणते मी? सांगाल तर
याचा पुढचा भाग
याचा पुढचा भाग