१० वी 'क' - भाग ४
१० वी 'क' - भाग १
१० वी 'क' - भाग २
१० वी 'क' - भाग ३
थोडंस ओशाळत आणि सगळ्या वर्गाची नजर चुकवत कुलकर्णी दुसर्या रांगेतल्या पहिल्या बेंचवर जाड्या साठेच्या बाजूला जावून बसली. कुलकर्णीच्या येण्याने तात्पुरता खंडीत झालेला ओळखपरेडचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. आणि मराठीच्या पुस्तकावर असलेली माझी नजर वारंवार तिच्याकडे जाऊ लागली. तीला पाहताना आत-मनात प्रचंड उलथापालथ होत होती. दिसायला एकदम गोरीपान, रेशमी झुळझुळीत केसं, गहिरे आणि काळेभोर डोळे. कुलकर्णीने शाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यावर गारूड केलं होतं, मला ती भयंकर आवडली होती. समोरच बसलेल्या ठोंबरे बाई, बाजुचा पाल्या, संपुर्ण वर्ग या सगळ्याचा मला विसर पडला होता. संपुर्ण वर्गात मला फक्त माझं नि कुलकर्णीचंच अस्तित्व जाणवत होतं. वर्गातला एकेक जण उठून नाव सांगत होता, खाली बसत होता. ठोंबरे बाईंच वर्गावर लक्ष ठेवणं चालू होतं. वर्गातली मुलं-मुली हळूहळू आवाजात कुजबूजत होती. पाल्याही मराठीचं पुस्तक वाचण्यात गुंग होता. पण मी या कशातच नव्हतो. मी माझ्या स्वत:च्याच दुनियेत हरवलो होतो. अचानक सार्या वर्गाच्या खिदळण्याने भानावर आलो. सारा वर्ग खदाखदा हसत होता.
चमकून पाल्याला विचारल "काय झालं?"
"तीचं आडनाव काये माहीतेय का?" समोर उभ्या असणार्या मुलीकडे खुणवत पाल्या म्हणाला.
"क्काये?"
"सुचिता आगलावे!"
"बोंबला तेजायला....आगलावे!!"
"ह्या ह्या ह्या.." मी हि सार्या वर्गाच्या खिदळण्यात सामिल झालो. आगलावेच्या चेहर्यावर प्रचंड राग पसरला होता. आपल्या आडनावावर सारा वर्ग हसतोय म्हणून तीचा पारा होता चढू लागला होता.
"आगलावे...म्हणजे आग लावण्याचीच कामं जास्त करत असणार" पोरांमधून कोणीतरी बोललंच. सारा वर्ग पुन्हा खळखळून हसला.
आता मात्र आगलावे चिडली आणि एकदम तोर्यात बोलली"हो. आहे माझं आडनाव आगलावे, तुम्हाला काही प्रॉब्लेम?"
"नाही तुम्ही लावा आग, पाणी टाकण्याचं काम आम्ही व्यवस्थित करू." पुन्हा कोणीतरी वात्रट पोरगं बोललंच. पोरं पुन्हा जोरात हसली. हसताना सहज कुलकर्णीकडे लक्ष गेलं तर ती हि तोंडावर रूमाल ठेऊन खुदूखुदू हसत होती.
उफ्फ!! पार घायळ झालो तिच्या हसण्यावर.
हसताना मध्येच चेहर्यावर आलेली केसाची बट ती बोटाने मागे सारण्याची तिची ती लकब. तेव्हा तर माझ्या ह्रदयातली धडधड अजूनच वाढायची. वर्गात फुल्ल धम्माल सुरू होती. पोरींची नावं सांगून झाली आणि पोरं उठून आपापली नावं सांगू लागली.
"प्रसाद लाटणे" पोरांच्या रांगेतलं पाचव्या सहाव्या बाकावरचं पोरगं उठून उभं राहीलं.
"हो क्का? मग पोळपाट कुठंय??" आगलावेने आपली आग दाखवायला सुरूवात केली आणि पुढील वर्षभरात काय घडेल याची छोटीशी चुणूकच दाखवून दिली. ओळखपरेड संपली आणि बाईंनी पिरेडचं टाईमटेबल लिहून दिलं. टोल पडले तरीही ठोंबरे बाई थांबल्या होत्या कारण पुढचा पिरेड ना.शाचा होता आणि ना.शाला असलेले आमच्या शाळेचे मुख्यधापक जाधव सर आज शिकवायला येणार नव्हते. हजेरी संपवली नि मराठीचं पुस्तक काढून ठोंबरे बाईंनी शिकवायला सुरूवात केली. सारा वर्ग आता शांतपणे ऐकू लागला होता. शिकवण्याकडे माझंही तसं लक्ष होतंच पण नजर अधून मधून कुलकर्णीकडे जात होतीच. शिकवणं झाल्यानंतर बाईंनी प्रत्येकाला धडा मनात वाचायला सांगितला. एवढं होईतो टोल पडले आणि तास संपला. एका हातात हजेरीचं रजिस्टर आणि पुस्तकं घेतं आणि दुसर्या हाताने चष्मा नीटनेटका करत ठोंबरे बाई निघून गेल्या. पुढचा पिरेड संस्कृतचा होता. कोणी आलं नव्हतं म्हणून मग सगळ्या वर्गाच्या गप्पांना ऊत आला. तसं दरवाजाकडे लक्ष होतंच. पाच-दहा मिनिटांनी प्रसन्न हसत महाजन बाईंनी वर्गात प्रवेश केला. बाई आम्हाला संस्कृताला आल्या होत्या.
'येस्स', 'स्सही', 'भारीच'. संपुर्ण वर्गात आनंद पसरला आणि प्रत्येकाच्या तोंडून असे शब्द बाहेर पडत होते. मनमोकळ्या स्वभावाच्या आणि मुलांना समजून घेणार्या महाजन बाई शाळेतल्या प्रत्येकाला आवडायच्या. त्यामुळेच कि काय त्यांच आमच्या वर्गाला संस्कृताला येणं हि खुप आनंदाची गोष्ट होती. महाजनबाई आहेत म्हटल्यावर आता संस्कृताचं काही टेशंनच नव्हतं. "ठोंबरे बाई का वर्गशिक्षक?" महाजन बाईंनी आल्या आल्या विचारलं. मग थोडा वेळ शांत बसून त्यांनी सुभाषितं शिकवायला सुरूवात केली.
१० वी च्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं शिकवणं एवढंच झालं. शाळा त्यादिवशी लवकर सुटली. पाल्या नि मी घरी निघालो तसा आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. आषाढातला तो पाऊस तहानलेल्या भुमीवर वर्षाव करत तिला ओलचिंब करून तीचं मन तृप्त करत होता. आणि इकडे माझ्या मनात कुलकर्णीच्या आठवणींचे तुषार उसळून माझ्या अंतर्मनाला तृप्त करत होते. छत्री, रेनकोट काहीच नसल्याने भिजतच आम्ही घरी पोहचलो. अंतर्मनात काहीतरी मोठ्ठं खळबळजनक घडत असलं तरी गोडं वाटत होतं आणि म्हणूनच बाह्यरंगी मी थोडासा आनंदातच होतो.
शाळेचा पहिलाच दिवस चुकवला नाही म्हणून आईसाहेब खुष झाल्या होत्या. गेल्या गेल्या तीला इंगळेबाईंचा किस्सा सांगितला आणि मोठमोठ्याने हसायला लागलो. "ह्या वर्षी शाळेला एकही दांडी मारणार नाही" रात्री सगळे एकत्र जमल्यानंतर मी डिक्लेरच केलं.
"अर्रे व्वा! अभ्यासाचं महत्व शाळेच्या पहिल्याच दिवशी कळालं वाटतं कि आणखी काही भानगड आहे?" बंधुराजांनी खोचटपणा चालू केलाच. पण अण्णांनी नि आईसाहेबांनी माझ्या निर्णयाचं कौतूक केलं.
"सच्चू, या वर्षी रिझल्टनंतर तुला माझ्याकडचं 'एच.एम.टी'चं घड्याळ बक्षीस मिळणार आहे." बांबानी मी खुप अभ्यास करून पास व्हावंच म्हणून चावी द्यायला सुरूवात केली. त्याचं कारण म्हणजे फक्त चावीवर चालणारं ते घड्याळ मला खुप आवडायचं. आता हे शिवधनुष्य पेलायचंच हा निर्धार मनाशी पक्का केला.
शाळा सुरू होऊन आठवडा होत आला होता. मी आणि पाल्या रोजच्या रोज शाळेत जात होतो. त्यातल्या त्यात मी कुलकर्णीच्या अनामिक ओढीने रोजच्या रोज शाळेकडे ओढला जात होतो. पण या साल्या बापलेकरचा अजूनही पत्ता नव्हता. त्याने कदाचित शाळा सोडून दिली असल्याची किंवा बदलली असल्याची शक्यता मी पाल्याला बोलून दाखवली आणि त्याने ती लगेचच खोडूनही काढली. आणि एक दिवस शाळेच्या गणवेशात पाठीवर दप्तर टाकलेला बापलेकर एका नव्या कोर्या रेंजर सायकलसह आमच्या ठरलेल्या ठिकाणी माझी नि पाल्याची वाट पाहत उभा असलेला आम्हाला दिसला.
क्रमश:
Book traversal links for १० वी 'क' - भाग ४
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तीला पाहताना आत-मनात प्रचंड
वा!
सुरेख लेखन
http://www.misalpav.com/user
!
>>>>>>आम्हीबी १० वी क मध्येच
हे सगळे मला "शाळा " ह्या
आयला लयच भारी लिवलया सगळं
कुलकर्णी का शिरोडकर
वाचतोय. वाचनीय आहे.
छान...
किसनद्येवांची "साळा" अवडली.
एवढा मोठा गॅप का हो, शाळेचं
शाळेत काय अनुत्तीर्ण वगैरे
पुढचा भाग बी लैकर लिव्हा की.
पुढच्या भागात लेकरं लिव्हा..
मस्तच हो बोकिल
आधीच्या अनुभवावरून शेवटच्या
किसन देव आम्हाला पावले व
उशीरा का असेना लिहिलास याचा
पुभाप्र !!
हा भागही आवडला.
किसन देवा
हा पण जाम आवडला आता पुढचा
पु भा प्र
फुडलं कदी येनार?
हा फाऊल धरावा काय...
कैच्याकै,
हाहाहा
झकास .... आमचे बी दिवस आठवले
हे सगळे लेखक असे का? कथेची