Skip to main content

आक्रमण

Published on सोमवार, 17/12/2012
सतत भेटीला येणा-यांची वर्दळ काही नजरा झुकलेल्या, काही चोरुन न्याहाळणा-या काल ते पोलिस देखील असेच काय काय विचारीत होते. तिला काहीच उमजत नव्हते, हे कोण आहेत, कशाला चवकशा करीत आहेत? नवरा तिला सारखा समजावित होता. अग तू धीराने घे. तुझी काहीच चुकी नाही. तू कशाला स्वत:ला बोल लावतेस? तू व्यवस्थित माहिती दे, पोलिस त्या बदमाषाला नक्की पकडतील... नव-याचे समजावणे, पोलिसांची चवकशी शब्दांचे मोहोळ तिच्या कानांना दंश करीत सुटले होते त्या वणव्यातही नवरा इतका शांत कसा राहिला? चवताळून त्याने सगळे जग पेटवून का दिले नाही? का नुसता माझ्या जखमांवर सांत्वनाचे शब्द चोळीत बसला होता? सतत भेटीला येणा-यांची वर्दळ लाज, कींव, दु:ख, सुटकेचे निश्वास पांघरलेल्या नजरा आता कशी आहेस? काही मदत हवी आहे का? कसं सहन केलं असेल हो पोरीनी? जमिनीत रुतलेल्या तिच्या नजरेला दिसल्या नुसत्या समोरच्या हलत्या सावल्या. वादळ येऊन गेल्यावर जागोजागी विखुरलेल्या पानांसारख्या, तशाच दोन क्षण थांबून निघून जाणा-या. त्यांनी विचारलेले शब्द देखील हवेत विरून गेलेले, मनावर काहीच उमटले नाही. कानांना जाणवत होती भेटायला येणा-यांची दबकी कुजबूज अंधा-या बिळातून जशी खसखस ऐकू यावी तशी आक्रमक न होता आक्रमणाची शक्यता सांगणारी. तो देखील असाच अंधा-या बोळातून अचानक समोर आला होता. रात्री उशीरा कामावरून परत येतांना, घराकडे निघालेली ती आपल्याच स्वप्नात मग्न घरी जाऊन मस्तपैकी वॊश घेऊन टीव्ही समोर लेट शो पहात पडायचे उद्या सुट्टी, कामासाठी लवकर उठण्याची घाइ नाही! नवरा उद्या रात्री परगावाहून परत येणार त्याचा आवडता स्वयंपाक करून ठेवायचा. असे बेत डोळ्यासमोरून तरळत होते, तेवढ्यात, अंधारातून अचानक अंगावर आलेली वावटळ अंगाभोवती आवळले गेलेले दोन राकट हात चेह-यावर फ़ुत्कारणारे उष्ण, पुरुषी श्वास गळ्यावर बोचणारे सुरीचे पाते तिच्या धडपडीला न जुमानता तोंडात खुपसले गेलेले बोळे डोळ्यावर बांधलेली पट्टी, गाडीच्या मागच्या सीटवर, हातपाय बांधलेल्या असहाय अवस्थेत हुंदके गिळत केलेला प्रवास आतापर्यंत लग्नानंतरच्या दोन वर्षात नव-याने नाजूक फ़ुलासारखे वागविलेले. जणू पारिजातकाचा सुगंध घ्यावा, तो देखील आपला उष्ण श्वास लागून ते कोमेजणार नाही ह्याची काळजी घेत! त्याच्या हळूवार फ़ुलविण्यानी ती मोहरून जायची मोरपिसांच्या झिरमिळ्या गात्रांत झिरपाव्या असा त्याचा स्पर्श! बुडबुड्यावर स्वार होऊन झुळुकेबरोबर तरंगत रहावे असा आभास तिच्या देहाची स्वायत्तता कायम ठेऊन, तिचा देह स्वत:मधे सामावून घेण्याची त्याची जादू. हे सगळे आपल्याला पुन्हापुन्हा हवेहवेसे वाटायचे, तरी प्रत्येक वेळीस मिलनासाठी त्यानेच गोडीगुलाबी करायची, दोन वर्षातील प्रत्येक मिलनात आस्वादलेले सुखद क्षण हिरव्याकंच वृक्षांचे गालीचे पसरलेला आणि मनमोहक फ़ुलांच्या राशींनी बहरलेला निळासावळा डोंगर सावरीच्या पिसावर स्वार होऊन सुगंधी झुळुकांसोबत अलगद चढायचा डोंगरमाथ्यावरील सोनेरी किरणांमधे नहाण्यासाठी डोंगरमाथ्यावर आल्यानंतर खाली पाहीले की खोल खोल खाली खुणवायचे चकाकते चंदेरी पाणी वाटायचे, सावरीच्या पिसाची पेटलेली उल्का व्हावी अन त्यावरून सूर मारावा वेगाने खाली त्या चंदेरी सरोवरात मुसंडी मारावी उल्केच्या जळणा-या स्पर्शाने चंदेरी पाण्यातून निमिषार्धात कढत वाफ़ेचे ढग उफ़ाळावे चोहीकडे आपण तसेच उल्केसोबत खोल आतपर्यंत डुबकी मारून तेथेच विसावावे पण असे न होता, तो अलगद सावरीचे पीस फ़ुंकरीत घेऊन जायचा मला चंदेरी सरोवराकडे हळूवार डोलत, लहरत, पीस उतरायचे झिरमिल पाण्यावर, अन तिने तरंगत रहायचे स्वप्नवत, पाण्यावरच. तप्त उल्केची आता ठिणगी झालेली एखाद्या गारगार शिंतोड्याने तीही केव्हा विझली ते कळायचे नाही. पुढच्या वेळेची हुरहूर लावून नाहिशी होणारी उल्का, तरीही पुढच्या वेळीस तीच पुन्हा त्याला लटके दूर ढकलणार, आणि तोच पुन्हा नवीन सफ़रीसाठी मनधरणी करणार! त्या रात्री कोण कुठल्या आगांतुकाने केलेली बळजबरी, तिच्या देहाची विटंबना, तिच्या अस्तित्वाचे धिंडवडे, कारमधून उचलून कुठल्याशा रानातील झोपडीत तोंडातले बोळे निघाल्यावर कानठळ्या बसविणारा तिचा आक्रोश फ़क्त बहि-या रानाने ऐकलेला ओरडून ओरडून घसा सुजलेला रडून रडून डोळे आटलेले त्याला हवे ते घेऊ दिले नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या पोकळ नाहीत हे त्याचे अमानुष थंडगार डोळे बजावित असले तरी, शरीरावर इतके अत्याचार होत असतांना जीवाची भिती माणसाला इतकी लाचार बनविते? त्या रात्री जिवाच्या भितीने थिजून तिने सर्वस्व त्या नराधमाच्या आधीन केले होते फ़ांद्यावरून फ़ुले ओरबाडून ती मुठीत चुरडून हुंगावी तसा त्याचा आवेश! जंगली श्वापदाने कच्चे मांस दाढेखाली भरडावे तशी बुभुक्षा! ती विव्हळली, होरपरळी, ठसठसली. यातना असह्य झाल्या तशी ती आक्रसली, आक्रसून जशी तिने वास्तवातून माघार घेतली, तशी ती एका अगम्य खडबडीत मार्गावरून जाऊ लागली होती झंझावातावर फ़ेकले गेलेले सावरीचे पीस तिला प्रचंड वेगाने एका डोंगरमाथ्याकडे घेऊन निघाले पण तो डोंगर मात्र पुर्वी दिसला होता तसा हिरवाकंच, किंवा सुवासिक फ़ुलोरा पांघरलेला नव्हता. चारीकडे निवडुंगाची काटेरी राने माजलेली, निवडुंगांच्या नग्न देहांना विळखे घालून रक्तपिपासू विषवेली त्यांचे हिरवे रक्त शोषतांना, जमिनीवर विंचवांचे थवे दंश करण्यास टपलेले बोच-या काट्यांमधून, विंचवांच्या नांग्यांमधून, विषवेलींचे जहाल विष अंगावर घेत अतिशय वेगाने झंझावाताने पिसाला डोंगरमाथ्यावर आणून सोडलेले खोल खाली तेच शांत सरोवर, तेच चंदेरी पाणी बोलावतेय, मार सूर खोल खोल आतवर क्षणार्धात पिसाची तप्त पेटती उल्का होऊन झेपावली खाली........ प्रचंड वेगाने जन्मोजन्मीची अघोरी तृष्णा शांतवायला....... तिच्या डोळ्यांतून झरणा-या अदृष्य आसवांच्या लडी रुमालाने टिपीत तिचा नवरा अजूनही तिला समजावित असलेला... अगं, तू स्वत:ला दोष नको लावून घेऊ. तू आरडाओरडा केला नाहीस ते चांगलेच केलेस. तुला काही झाले असते, तर मी आज काय केले असते? त्याने जे काही केले, ते तुझ्या इच्छे्विरुद्ध केले. पण तू तर फ़क्त माझीच आहेस ही वस्तुस्थिती थोडीच बदलतेय! एखाद्या वेड्याकडे पहावे तशा अचंब्याने आपल्या शांत नव-याकडे पहातच राहिलेली ती... देहाची होत असलेली विटंबना त्या रात्री ती टाळू शकत नव्हतीच. निसर्गानियमानुसार देहाने कोणते का संकेत मनाला पाठविले असेनात, तरी मनाने ते संकेत धुडकारून देहावर ताबा का मिळविला नाही? कां असेल नसेल ते बळ गोळा करून, गळ्यावर खुपणारी सुरी खेचून त्या नरपिशाच्याच्या छातीत खुपसली नाही? की त्याच्या आक्रमणाचा धसमुसळेपणा मनाला क्षणासाठी तरी, भुलावून गेला? अन हा हिमालयासारखा शांत नवरा म्हणतोय, अगं, तू कशाला स्वत:ला बोल लावतेस! त्या रात्री न झालेले आज स्वत:च पूर्ण करण्यासाठी हा पेटून कां उठत नाहीये? कां मिळेल ती सुरी घेऊन माझे कलंकीत शरीर आणि मन संपवून टाकीत नाहीये? न सुटणारे प्रश्न उगाळीत ती मिटून बसली. नव-याचे समजावणे चालूच होते. त्याचे हळुवार, गोंजारणारे शब्द कानांवर पडत होते, पण त्यांचा अर्थ मात्र हलकेच तरंगणा-या पिसावर स्वार होऊन तिला खिजवीत राहिला.
लेखनविषय:

वाचन संख्या 4156
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

_/\_

.....

In reply to by एस

खरच! वाचून कसतरीच झालं. दिल्लीतलं काय किंवा केरळ मध्ये होणारे अत्याचार काय, हे मिडीयावाले बातम्यांसाठीही एखादी थीम ठेवतात असं वाटतं. एका आठवड्यात फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या, एका आठवड्यात महिलांवर होणारे अत्याचार वगैरे. इथं बायका किती सुरक्षीत आहेत आणि होत्या हे थोडे डोळे उघडे ठेउन आजुबाजूला बाघितलं की कळेल. 'अशा जगात आपण पुढच्या पिढीतल्या मुलींना कसे वाढवणार आहोत?' हा प्रश्न आपला समाज स्त्री भॄणहत्या करून सोडवतोय. सगळच भयानक. कायदा, पोलिस आणि सो कॉल्ड दी ग्रेट इंडीयन ब्लडी कल्चर इस नॉट XXX हेल्पींग इट.

_/\_ तिच्या मनातल्या वेदना अगदी नेमक्या शब्दात मांडल्यात.

की त्याच्या आक्रमणाचा धसमुसळेपणा मनाला क्षणासाठी तरी, भुलावून गेला? अन हा हिमालयासारखा शांत नवरा म्हणतोय, अगं, तू कशाला स्वत:ला बोल लावतेस! त्या रात्री न झालेले आज स्वत:च पूर्ण करण्यासाठी हा पेटून कां उठत नाहीये? कां मिळेल ती सुरी घेऊन माझे कलंकीत शरीर आणि मन संपवून टाकीत नाहीये? न सुटणारे प्रश्न उगाळीत ती मिटून बसली. नव-याचे समजावणे चालूच होते. त्याचे हळुवार, गोंजारणारे शब्द कानांवर पडत होते, पण त्यांचा अर्थ मात्र हलकेच तरंगणा-या पिसावर स्वार होऊन तिला खिजवीत राहिला.
विशेषतः अधोरेखित वाक्यांमधून काही नवीन शक्यता ध्वनित होताहेत . रोचक!!!

In reply to by बॅटमॅन

ही बाजु देखील आहेच, पण मन आणि शरीर वेगळं करणं प्रत्येक वेळी सहज शक्य नसतंच. पण इथं त्यावर चर्चा नको.

.

In reply to by इनिगोय

"घर" ची आठवण झाली असे म्हटले आहे. हा सिनेमा मी पाहिला नाही, पण इथे दिलेली लिंक वाचली. बहुदा वाचकांच्या लक्षात आले असेल, की 'आक्रमण' मधे संकल्पना वेगळी आहे. तिचे आधीचे हळूवार अनुभव जेव्हा पाशवी अत्याचारातील वेगळ्या अनुभवाशी कळत नकळत कॉन्ट्रास्ट होतात, तेव्हा तिच्या मनात एक वादळ उठते....

सर्व वाचकांचे आभार. काही (. , _/\_, ..... ) इत्यादी प्रतिसाद वाचून कधी कधी शब्द हे सोन्याहून मौल्यवान असतात, ह्या सत्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आपण आपले कर्म करीत रहायचे, आपापल्या कर्मानुसारच फळ मिळत असते, त्यामुळे नो रिग्रेट्स!

In reply to by अरुण मनोहर

इथे शब्द सोन्याहुन महाग नाही आहेत पण जे वाटतय (या क्रुर अनुभवाच्या मांडणीमुळे) ते शब्दात मांडण कठीण आहे म्हणुन. इतक सेन्सीटीव्ह लिहिणार्‍आ लेखक हे शज उमजु शकेल अशी आशा.

बलात्काराच्या गुन्ह्यांबद्दल फास्ट कोर्ट चालवले पाहिजे. शिक्षाही केवळ फाशीचीच असावी. दयेचा अर्ज करण्यास बंदी असावी. गुन्हा घडल्यापासून कमीतकमी वेळांत शिक्षा अंमलात आणली पाहिजे. तरच जरब बसेल.

In reply to by तिमा

कमीत कमी नेपाळ मध्ये आहे तशी २४ तासाच्या आत बलात्कारित स्त्री अथवा तिच्या रक्ताच्या नातेवाईकांना गुन्हेगाराची हत्या करण्याची परवानगी असावी. बराच आळा बसेल मग असल्या कृत्यांना.

अस्वस्थ करणारं मुक्तक..

... विसंगती जीवनाला पाचवीला पूजलेली.. कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्याच उरी.. [सुन्न] राघव

मस्त जमले आहे. वाचनिय