(चावडीवरच्या गप्पा - अभिजात संगीतोत्सव)
(सोत्री यांची क्षमा मागून).
"उस्तादजींनी म्हणे कहर केला मैफिलीत, आणि त्या झिपर्या, स्मार्ट तबलजीशी जोरदार जुगलबंदी झाली त्यांची. पूर्वी मिथुनदांना गरिबांचा अमिताभ म्हणायचे, तसा गरिबांचा झाकिर हुसेनच म्हणायला हवा या तबलजीला.", चिंतोपंत जगप्रसिद्ध 'खिडकी वड्याच्या' स्टॉलजवळची नुकताच नजरेत भरलेला सौंदर्यफुफाटा नीट न्याहाळता येईल अशी जागा पकडत.
"आजकाल काही राम राहिला नाही या मोठमोठ्या उस्तादांच्या आणि पंडितजींच्या मैफिलीत. असल्या वादनाला 'अभिजात' का म्हणायचे ते त्या शारदांबेलाच ठाउक. एक ना धड भाराभर चिंध्या. नीट 'जमून' एकच राग सादर करायचा सोडून पाडल्या जिलब्या अर्धा डझन राग रागिण्यांच्या." घारूअण्णा नाराजीने.
"अहो घारूअण्णा, पण अलीकडे हाच साचा रूढ का होतो आहे हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा ना थोडा.", सांगलीकर महाबळ जरा सावध होत.
"कसले काय हो! बिदागी पुरती वसूल करायची आणि अर्धी मैफिल तबला सोलोची, थोडा वेळ हुच्च आणि उदात्त बडबड, थोडा वेळ वाद्याशी झटापट आणि उरलेल्या वेळात चार वरवरच्या स्वरावली वाजवत थिल्लर चमत्कृती, सवाल जबाब करायचे की झाले चिल्लर पव्लिक तृप्त.", घारूअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.
"नाहीतर काय, वर 'शरद मल्हार' आणि 'ठाकरे भैरव' असल्या बिना शेंडाबुडख्याच्या रागांची निर्मीती करून सरकारी पुरस्कारांसाठी 'फिल्डींग' लाउन ठेवली, लॉबिंग केले की झाली सृजनशीलतेची पराकाष्ठा." नारूतात्या घारूअण्णांची री ओढत.
"नारूतात्या, आपले घारूअण्णा कधीकाळी चक्क तबलावादनाच्या 'मध्यमा प्रथम' परिक्षेत आणि ते ही पुण्यातून पहिले आलेले आहेत असे ऐकून होतो. आता तुम्हीही कुणाचे 'गंडा'बंद शागिर्द वगैरे झालात की काय?" इति आधुनिकविचारमहर्षी महाबळ काका.
"का ब्वॉ? अंतर्मुख होउन 'जमून' वाजवणे, मैफिलीत खरा रंग भरणे, अभिजातता जपणे, राग रागिण्यांमधला 'भाव' व्यक्त करणे आणि श्रोत्यांना 'चुना लावणे' यातला फरक समजायला काय 'सांगितीक अधिकार' वगैरे असावा लागतो की काय? अहो वोल्व्होतून प्रवास करणे आणि लाल डब्बा यष्टीतून हादरे खात जाणे यातला फरक काय फक्त ऑटोमोबाइल अभियंत्यालाच समजतो असे म्हणायचे का? तुम्ही पण राव उगाच वादासाठी वाद घालताय". इति नारूतात्या.
"अहो! एखाद्या पुरस्कारासाठी एवढी तिकडमबाजी करावी लागेल इतके हे कलाकार छोटे नाहीत. त्यांच्यावरचे समीक्षकांचे मोठमोठे लेख, अभ्यासक्रमात टाकलेले त्यांचे चरित्र, बेस्टसेलर आत्मचरित्र, परंपरेने पार तानसेनापर्यंत पोचणारी त्यांची ती मोठमोठ्ठी घराणी हे सगळे व्यर्थच म्हणावे काय? असेल त्यांच्या मनात राजकारणातल्या एखाद्या 'साहेबां'बद्दल खरोखरचा आदरभाव. केला त्यांनी तो रागनिर्मीतीतून व्यक्त, त्यात इतके आक्षेपार्ह ते काय?" सांगलीकर ठामपणे.
"तेच तर! आहात तुम्ही मोठे, तर मग हवीच कशाला ही तिकडमबाजी? आता एवढे थोरथोर संगीतमहर्षी होउन गेले, उस्ताद अल्लाउद्दीन खान असोत, उस्ताद हाफिज अली खान असोत, उस्ताद अल्लादिया खाँ असोत की सवाई गंधर्व असोत. किती नावे घ्यायची? एखादा 'इनायतखानी कानडा' अपवाद. पण मग संगीतक्षेत्रातल्या बाकी थोरामोठ्यांच्या नावाने का नाही झाली रागनिर्मीती?" घारूअण्णा थोडे सावध होत.
"रागनिर्मीतीच्या मुद्द्याचे एक वेळ राहू द्या. या संगीताच्या उरूस, जत्रा, यात्रा काही म्हणा. यातल्या मैफिलींचे काय? आम्ही बदलत्या काळाला सामोरे जातो ही सबब पुढे करत प्रत्येक गोष्टीचे सुमारीकरण केलेच पाहिजे काय? चार मिनीटे उपकार केल्यासारखी वाजवलेली आलापचारी, लगेच मध्यलयीतल्या गतीला सुरूवात. मग तबलजी आणि सतारिया/ सरोदिया यांची एकमेकांवर 'आवाज कुणाचा' छाप कुरघोडी करण्यासाठी आधी ध्वनियंत्रणा आयोजकांशी थोडावेळ हुज्जत. मग थोडावेळ एकमेकांवर सांगितीक कुरघोडी करण्याचा सवाल जबाबांचा पोरखेळ, मधेच 'कहर' करणारा जोरदार तबला सोलो, यांत्रिक पद्धतीने वाजवलेला झाला आणि भलीमोठी तिहाई घेत केलेला तितकाच यांत्रिक शेवट. ठेवणीतल्या शाली पांघरून, डिझायनर झब्बे, ड्रेस घालून आणि परफ्युमचे फवारे उडवून ऑरगॅझ्मिक चेहरे करत हा सगळा प्रकार ऐकून तृप्त होणारे रसिक! सगळेच धन्य आहेत." नारूतात्या भन्नाट सुटलेले.
सोकाजीनाना हळूच आपल्या बाजूला येउन हातात वडापावाचे रिकामे पुडके पकडून कधीचे ताटकळत उभे आहेत हे तिघांच्याही लक्षात आले नाही. पंधरा रूपयांचा 'खिडकी वडा' घेताना विसाची नोट देण्याचा अक्षम्य अपराध केल्याने गळ्यात पडलेल्या दोन कोथिंबीर वड्यांपैकी एक संपवून हलकेच खाकरत आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी करून दिली.
"तुमच्या या असल्या बुरसट, अतिचिकीत्सक वृत्तीमुळेच तर आपल्या एकएक कला अस्तंगत होत चालल्या आहेत. आता तुमचे हे तथाकथित 'अभिजात' गायन वादन ऐकण्याइतका वेळ आहे कुणाला? लोकांचा 'अटेंशन स्पॅन' बेताचाच नसतो का हल्ली? या काळात तुमच्या त्या गंधार लावेपर्यंत अंधार करणार्या थोर्थोर पंडित आणि उस्तादांचे काय लोणचे घालायचे आहे? शेवटी संगीत श्रोत्यांसाठी आहे की पुस्तकी अभिजाततेसाठी याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. अहो होते आहे लोकांचे मनोरंजन, तर होउ द्या की सुखाने! त्यातली अभिजातता आणि दर्जा ठरवण्याचा मक्ता तुमच्यासारख्या कालबाह्य अभिरूचीच्या लोकांना कुणी आणि कधी दिला म्हणायचा? मी तर ब्वॉ नेहेमी काळाबरोबर राहतो. संगीत फक्त चांगले किंवा वाईट असते. बाकी अगदी ही तुमची तथाकथित अभिजातता, घराणी बिराणीपण आपण काही मानत नाही." महाबळांचे जोरदार प्रत्युत्तर.
"हल्ली घराणी वगैरे नाहीच मानत कुणी. या 'न मानण्यातही' फरक असतो. सलग पंधरा मिनीटे लहरा न वाजवता येणारे, तानपुरा धड न जुळवता येणारे आणि तबला सुरात न लावता येणारे महाभागही घराणी वगैरे मानत नाहीत, आणि एखाद्या घराण्याची पक्की तालीम घेउन मग डोळसपणे इतर घराण्यांची खासियत आत्मसात करणारे व्यासंगी कलाकारही घराण्याच्या मर्यादेत अडकून पडत नाहीत." सोकाजीनाना नेहेमीच्या मासलेवाईकपणे.
"आणि शास्त्रीय संगीताच्या दर्जाबद्दल म्हणाल, तर टोकाची मते व्यक्त करणे मला तरी बरोबर वाटत नाही. एकीकडे काही ज्येष्ठ कलाकार बनचुकेपणाने श्रोत्यांची जाणकारी यथातथा आहे असे गृहीत धरत साचेबद्ध रीतीने पाट्या टाकत असले, तरी सरसकटपणे तसे म्हणता येणार नाही. नव्या पिढीच्या कलाकारांपैकी एखाददुसरा अपवाद सोडला, तर सगळ्यांचेच गायन वादन फार वरच्या दर्जाचे होते, अभिजात संगीताच्या उज्वल भविष्याबद्दल आश्वस्त करणारे होते असे निखालसपणे म्हणता येईल. तेव्हा या चांगल्या बाजूविषयी एकही अवाक्षर न उच्चारता जत्रा, उरुस वगैरे टीका करत तिरकस बोलत राहणे आपल्याला शोभत नाही. बरोबर आहे की नाही घारूअण्णा?" घारूअण्णा आणि नारूतात्या दोघांनी नजरेतूनच सहमती व्यक्त केली.
"आता थोडे वेळेचा अभाव आणि श्रोत्यांचा 'अटेंशन स्पॅन' वगैरे बद्दल. तुम्हीच सांगा महाबळ साहेब, ७८ स्पीडच्या इन मीन साडेतीन मिनीटांचा अवधी देणार्या लाखेच्या तबकड्या निघाल्या, तेव्हा तेवढ्याच वेळेत उ. अब्दुल करीम खानांनी बसंत, उ. विलायत खाँसाहेबांनी मधुवंती, पं. रामनारायणांनी यमनचे अफलातून सादरीकरण केलेच ना? तेच २०-२२ मिनीटांच्या एल. पी. रेकॉर्डचे. दरबारी, यमन, श्री सारख्या 'मोठ्या' रागांच्या अप्रतिम ध्वनिमुद्रिका निघाल्याच ना? त्या लोकप्रियतेच्या शिखरावरही गेल्या ना? मग आताच असे काय लोकविलक्षण बदल घडले आहेत, की अभिजात संगीताच्या प्रांगणात हा धांगडधिंगा सर्रासपणे चालावा? "
"खपते ते विकतो असा युक्तिवाद करणार्याने पॉप संगीतात जावे. कारण तसा निकष लावला तर 'अभिजात', 'शास्त्रीय' या शब्दांना अर्थच उरत नाही. आणि असेल एकाद्या मित्राला एखाद्या विषयातली जाण, त्याच्या मर्मज्ञतेला दिलखुलादपणे दाद द्यायची सोडून जिथे तिथे 'मी घराणी मानत नाही. मी काळाप्रमाणे बदलतो' असा मी मी चा हेका धरायचा, आणि मग निरूत्तर व्हायची वेळ आली की दुसर्यावर बुरसट, कालबाह्य वगैरे लेबल्स चिकटवत भलताच युक्तीवाद करायचा यात तरी कितपत अर्थ आहे?" सोकाजीनाना कठोर चेहेर्याने.
"अहो, आमचे सगळे फुसके आणि फसवे युक्तीवाद या दोघांसमोर. सोकाजीनाना, तुमच्यासमोर मात्र अगदी हाताची घडी आणि तोंडावर बोट" महाबळांची यशस्वी माघार.
"असो, या निमीत्ताने चांगली चर्चा झाली. येनकेनप्रकारेण आपल्या अभिजात संगीताबद्दल सगळ्यांनाच थोडीफार का असेना आस्था आहे हे सिद्ध झाले. हेही नसे थोडके! जाउ द्या, चला चहा मागवा! नारूतात्यांचा ब्रिजेश तीन महिने ऑनसाईट होता. येताना सालाबादच्या शिरस्त्याप्रमाणे 'शिवास रिगल' घेउन आला आहे. ती सत्कारणी लावायचा प्लॅन उद्या ठरवू या. " सोकाजीनाना चेहेरा निर्विकार ठेवत.
तूर्तास चहाची ऑर्डर देण्यास सर्वांनीच दुजोरा दिला.
याद्या
2269
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
गंधार लावेपर्यंत अंधार करणार्
:_)
जमली!
झक्कास जमली हो चावडी.
खासच
झकास जमली हो...
:))
नको! नको!
सॉलीड :)
झकास चावडी जमली आहे. मस्त.
लय भारी..
मस्तच.
झक्कास!!