त्यादिवशी नक्की काय झालं होतं ते मलाच कळत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. संध्याकाळी थोडा आरामही पडला खरा, पण मनाला काही केल्या शांतता मिळेना. काहीतरी फार मोठं घडणार आहे असं सारखं आतून वाटत होतं. पण जे घडणार आहे ते चांगलं नाही. उलथापालथ करणारं आहे, अशी सारखी जाणीव होत होती. अशी अशांतता मी अनुभवली होती ती म्हणजे एक-दोन नात्यातली माणसं गेली तेव्हा. त्यावेळची आणि आजची अवस्था अगदी सारखी होती. पण कळत काही नव्हतं. माझा जीव मुलांमध्ये अडकला होता, मी इथे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी काही उपद्व्याप करुन ठेवू नये येवढंच वाटत होतं. खरंतर मी काळजी करावी असं वय नव्हतं त्यांचं, पण मला मात्र अशांत का वाटतंय ते कळेना.
त्याच विचारात डोळा लागला. सकाळी नर्सने खिडकीचा पडदा बाजूला केला, त्या उजेडाने जाग आली. नर्सशी बोलता बोलता मला डिस्चार्ज कधी देतील त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. त्यादिवशी अंडर ऑब्जर्वेशन ठेवून दुसर्या दिवशी सोडतील असा एकंदर अंदाज मी बांधला. ब्रेकफास्टनंतर परत तीच संध्याकाळची अशांतता !! नंतर नंतर डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. मी काहीतरी पुटपुटत होते. काय ते आता मला नीटसं आठवत नाही. त्या अंधारीनंतर बेशुद्ध झाले, जेव्हा जाग आली तेव्हा नाकाला कसलीशी नळी लावली होती. हाताच्या बोटांना कसल्याशा क्लिपा लावलेल्या होत्या. आजूबाजूला विचित्र आवाज करणारी यंत्र होती. हे हॉस्पिटल नक्कीच मी ज्यात अॅडमिट झाले होते ते नव्हतं. हे निराळं वाटत होतं, नर्सेस डॉक्टर निराळे होते. मी किती वेळ बेशुद्ध होते? तास? दिवस? महिने ? सगळ्या विचाराने भंडावून मी एकच आक्रोश सुरु केला. मला सोडण्याच्या मी विनवण्या करु लागले, पण घडत मात्र उलट होतं. नर्सेसनी माझ्या पायाची बोटं कॉटच्या सळ्यांना एका दोरीने बांधली. उजव्या पायाच्या दोरीची गाठ नेमकी बोटातल्या जोडव्यावर आली आणि आधीच घट्ट झालेलं जोडवं बोटात रुतून गेल्यासारखं वाटलं.
सगळ्या गदारोळात लांब उभी ताई मला दिसली आणि माझा जीव भांड्यात पडला. मी एकदम शांत झाले आणि ताईला हाक मारली. डॉक्टर नर्सेस बाजूला झाल्या आणि ताई जवळ येऊन बसली. पाय अजूनही बांधलेले होते. दोन्ही हाताची मधली बोटं त्यांनी कधी दोरीने कॉटला बांधली तेच मला कळलं नव्हतं. ताईला जवळ पाह्यलं तसं मात्र पाणी आलं माझ्या डोळ्यात. ताईची अवस्था काही निराळी नव्हती पण ती डोळ्यातलं पाणी कधी दिसू देत नसे, आताही ती यशस्वी झाली. मी पहिला प्रश्न केला तो मी किती वेळाने शुद्धीवर येतेय ते विचारायला. ताई म्हणाली त्याप्रमाणे मी आदल्या दिवशी जी बेशुद्ध झाले होते ती त्यादिवशी दुपारी शुद्धीवर येत होते. मला काय झालंय हे विचारलं तेव्हा त्याचं उत्तर मात्र तिच्याकडे नव्हतं. तिने डॉक्टर डायग्नॉस करतायेत येवढंच सांगितलं. पण मला ती वेळ मारुन नेतेय असं वाटलं, तिला माहित होतं पण ती सांगत नव्हती. माझ्या आजूबाजूची इक्विपमेंट्स बघून हा आयसीयूच होता हे मी ठामपणे सांगू शकत होते. पण मग झालं तरी काय होतं की मला आयसीयूत ठेवावं लागलं.
ताई अजूनही तिथेच होती, माझ्या चेहर्यावरचे प्रश्न बहुतेक तिच्यापर्यंत पोचले असावेत. "फार काळजी करु नकोस. तुला लवकर बरं व्हायचंय येवढंच लक्षात ठेव. तुला डिस्चार्ज देईस्तोवर मी इथेच आहे. तुला घरी नेलं की मी घरी जाईन.", असं म्हणतेय तेवढ्यात नर्स मागून कोकलायला लागली फार वेळ थांबू नका म्हणून. म्हणजे अजून आठवडे दोन आठवडे तरी हॉस्पिटल होतं माझ्या नशिबात. ताई निघून गेली आणि मी मात्र 'आता पुढे काय?' या विचारात हरवले. मन बाकी भारी विचित्र असतं. जेव्हा घरी होते, ठणठणीत होते तेव्हा रोजच्या कामाच्या धबडग्याचा वैताग यायचा. मला दहापंधरा दिवस या कामातून सुट्टी मिळाली तर बरं असं वाटायचं. आता तर नुसतं पडून राहायचं होतं बरं होईस्तोवर. पण आता मात्र घरी कधी जातेय असं झालं होतं.
तेवढ्यात एक नर्स आली आणि रक्ताचं सँपल घेऊन गेली. बेशुद्ध असताना उजव्या हातावर जास्त इंजेक्शन्स दिली असावी असं वाटत होतं, कारण हात थोडा ठणकत होता. पाठीलाही कळा जाणवत होत्या. एका नर्सला बोलावून मी ते सांगितलं, मूव्ह वैगरे घेऊन येते म्हणाली आणि गेली ती गेलीच. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली, जेवणही हॉस्पिटलमधूनच मिळणार होतं. कसंबसं घश्याखाली ढकललं, तेवढ्यात औषधं घेऊन एकजण आली. गुंगीने दुखणं थोडं कमी झालं आणि डोळा लागला.
(क्रमशः)
वाचन संख्या
6224
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरवातच गुंत्यात टाकणारी झाली
सगळ जणु डोळ्यासमोर घडत आहे अस
सहमत.
In reply to सगळ जणु डोळ्यासमोर घडत आहे अस by सासुरवाडीकर
सुरुवात जरा मोठी हवी होती हो,
+1
In reply to सुरुवात जरा मोठी हवी होती हो, by सस्नेह
+२
In reply to सुरुवात जरा मोठी हवी होती हो, by सस्नेह
+२
In reply to सुरुवात जरा मोठी हवी होती हो, by सस्नेह
+२
In reply to सुरुवात जरा मोठी हवी होती हो, by सस्नेह
उत्सुकता निर्माण झालीय.. आता
खरंच गुंता
अंदाज येतोय थोडाथोडा.
जास्त वाट बघायला लावू नको
वाचतोय. काल काही बोलला नाहीस
इंटरेस्टिंग. वाचतोय...
खुपच छान लिहलय्...पुढचा भाग
हम्म...
खुप छान लिहिलय्..
पुढचा भाग कधी?
सुरुवात वेधक
मस्त सुरुवात