Skip to main content

मिरचीचे रुचकर लोणचे

लेखक जागु
Published on शुक्रवार, 30/11/2012
साहित्यः १) पाव किलो मिरच्या २) २ चमचे धणे ३) २ चमचे जिरे ४) २ चमचे बडीशेप ५) १ चमचा राई ची डाळ ६) अर्धा चमचा हळद ७) पाऊण वाटी मिठ ८) अर्धी वाटी तेल ९) ३ लिंबू पाककृती : १) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत. २) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची. ३) हळद थोड्या तेलावर परतायची. ४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे. ५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे. ६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे. हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे. टिपः हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.

याद्या 7288
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

छान दिसतय गं जागु. या लोणच्यात आमच्याकडे बहुतेक धणे घालत नाहीत, पण नक्की माहित नाही.

भारीच. माझंही खुप आवडतं आहे हे लोणचं.

हीच पाकृ शोधत होते. अगदी हवी तेव्हा मिळाली. धन्स जागुतै. अवांतर : राई म्हणजे मोहरीच ना ?

आमच्याकडे करतात त्यात धणे, जिरे आणि बडिशेप नसते. निव्वळ मोहरीची डाळ, हळद, मीठ, तेल बस्स!! पण बडीशेप टाकून बरी चव येईलसं दिसतंय.

In reply to by सूड

आमच्याकडे पण हे लोणचं मोहरी फेसून करतात. आणि बडिशेप धने जिरे नसते. वेगळा प्रकार म्हणून करून बघायला हराकत नाही.

झणझणीत लागते. सध्या घरात मासे, कोलंबी, आणी लिंबाचे गुजराती प्रकारातले गोडे लोणचे असल्याने हा प्रकार तात्पुरता स्थगित करण्य्यत येत आहे

जागुतै रॉक्स !

अगं सोबत दडपे पोहे असलेल्या डीशचा पण फटू टाक की बाजूबाजूला........ कातिल मर गया...................... मर ही गया.... ;) :)

मला आजच घरी फ्रिजमध्ये मी करुन ठेवलेले मिरचीचे लोणचे सापडले. ह्या धाग्याने मला त्याची आठवण करुन दिली.. :D - पिंगू