✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

स
सोत्रि यांनी
Wed, 11/07/2012 - 19:17  ·  लेख
लेख
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी… ”, इति नारुतात्या. “डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत. “बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर. “अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.” “अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे उपरोधाने आणि किंचित रागाने. “अहो पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर हातातला ’हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत. “गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात. “हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय आहे?”, इति बारामतीकर. “बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत. “अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही, दारूचेही तसेच आहे, तारतम्य न पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच. पण त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत. “भले शाबास! बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत. “अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे. “हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून. “गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे . “वा रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून. “कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.” “अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत . “डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका. “अहो भुजबळकाका, हे तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का वाटत?”, चिंतोपंत. “नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना. “सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून. “हो, हे वाटणे खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!” “काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून. “सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही. पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?” “अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ’ ” सोकाजीनाना मिश्कील हसत. “अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा आपल्याला! चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत. घारुअण्णांनी हसणे आवरात चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22732 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

पोराच्या तोंडात बाटली रिकामी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/09/2012 - 14:47 नवीन
पोराच्या तोंडात बाटली रिकामी आम्ही कुठे म्हणतोय्,तुम्हीच म्हणताय म्हणुन.अहो त्यानीं त्याला घेउ देत असेच म्हणाले ना.आज तो लहान असावा ,तो मोठा झाल्यावर तुम्हाला विचारेलच हे कशावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मोठा झाल्यावर यातच आलं.

गणपा
Fri, 11/09/2012 - 15:13 नवीन

मोठा झाल्यावर

यातच आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मोठा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/09/2012 - 16:34 नवीन
मोठा म्हणजे ३५/ ४०चा नव्हे, जो पर्यंत त्याला बापाची गरज असते तेव्हढा मोठा. म्हणजे तो २०/२५ वर्षा चा झाल्यावर त्याने तुमच्या समोर घेतली तर तुम्हाला चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी

गणपा
Fri, 11/09/2012 - 16:57 नवीन
खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी समर्पक शब्दांत माझ्या मनातल्या भावना मांडल्यात म्हणुन पुन्हा शक्ती आणि वेळ खर्चण्यात अर्थ नाही. तुमाला त्या कळतील अशी भाबडी आशा बळगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

पुर्णविराम माझ्याकडुन

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/09/2012 - 17:08 नवीन
पुर्णविराम माझ्याकडुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तो मोठा झाल्यावर तुम्हाला

गवि
Fri, 11/09/2012 - 15:23 नवीन
तो मोठा झाल्यावर तुम्हाला विचारेलच हे कशावरुन.
मोठा झाल्यावर विचारुच नये.. स्वतःच ठरवावं.. मोठेपणी त्याचा सल्लागार होण्यापेक्षा आधीपासूनच त्याला मोठेपणासाठी तयार केलं तर उपयोग आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद मिळाला त्याने पुढच्या पिढीलाही मिळेलच याची "गॅरंटी" कधीच नसणार. पण तरीही आपण आपल्याला आनंद देणार्‍या गोष्टींचं "योग्य तेवढं" आणि "योग्य तेव्हा" एक्स्पोजर पुढच्या पिढीला देतोच ना? आवडलं, घेईल.. नावडलं, नाही घेणार.. एकाद्या गोष्टीला ती जितकी घातक आहे त्याहून खूप जास्त घातक म्हणत राहून आणि "पापा"त,"अवैधा"त वगैरे ढकलून आपण मोकळे होऊ शकत नाही. त्याने सुप्त आकर्षण दबलेलं राहतं आणि आपली "इन्स्पेक्टर"सदृश नजर दूर गेली की उसळून घातक ठरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

गा. प्रमुख,

सोत्रि
Fri, 11/09/2012 - 15:38 नवीन
गा. प्रमुख,
तो निर्णय त्यांचा असेल जो अनुभव सिद्ध असेल. माझ्या मोठ्या मुलाला साके आणि वाईन अजिबात आवडल्या नाहीत पण धाकट्याला आवडल्या.
तुम्ही हे वाचले नसेलच! बहुदा बोल्ड मध्ये नसल्याने तुम्हाला दिसले नसावे ;) - (आनंदी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हो ना वाचले ,पण धाकट्याच काय्

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/09/2012 - 16:39 नवीन
हो ना वाचले ,पण धाकट्याच काय्?त्याने केलेल चालेल काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अरे हे वाचलच नाही!

दादा कोंडके
Fri, 11/09/2012 - 15:45 नवीन
परवा चेन्नैमध्ये एक हेवी लोडेड ट्रक बघितला, तो मिझोराम मधून आला होता, अर्थात ड्रायव्हर मिझोरामचाच होता. त्याने आपल्या जिवनावश्यक वस्तू आपल्याला वेळेत मिळाव्या म्हणून घरदार सोडून यायचेच्,
उदाहरणादाखल त्या ट्रकड्रायव्हर सारखंच एखादी व्यक्ती महाराष्ट्रातून एका आठवड्यासाठीही चेनैला जाउ शकते. मग ती गरज चेनैमध्ये मिझोराममधून एक महिना राहिल्यावर की महाराष्ट्रातून एक आठवडा आल्यावर निर्माण होते हे कसं ठरवणार? वर्ल्ड इज ग्रे मान्य आहे. पण एखादी गोष्ट चांगली की वाईट हे मेजॉरीटी बघून ठरवायला अवघड जाउ नये. मग कायद्याची गरजच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अरे हे ही वाचलच नाही!

सोत्रि
Fri, 11/09/2012 - 15:49 नवीन
अरेच्चा, त्याच्याखालचेच हे ही वाचलच नाही तुम्ही! :)
काय चांगले, काय वाईट हे ठरविणे फारच अवघड आहे हो.
:) - (काहीही न ठरवणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

त्यांच म्हणने चांगले वाईट हे

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/09/2012 - 16:43 नवीन
त्यांच म्हणने चांगले वाईट हे नव्हे,गरज केव्हा निर्माण होते ते होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आवडले

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/08/2012 - 07:11 नवीन
वाह सोकाजीनाना, एका वादग्रस्त विषयावर सर्वसमावेशक भाष्य कसे करावे याचा आणखी एक उत्कृष्ट नमुना. दारू व इतर तंबाखूजन्य पदार्थ आपल्या सामाजिक मूल्यांनुसार बर्‍याच प्रमाणात आक्षेपार्ह असले तरी त्यापासून कररूपाने सरकारला जो महसूल मिळतो त्याचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. त्यामुळे कोणी काही म्हणाले तरी सरकारी धोरणाद्वारे त्यावर प्रतिबंध घातला जाणार नाही.
  • Log in or register to post comments

समयोचित

इरसाल
गुरुवार, 11/08/2012 - 09:21 नवीन
आणी "टिंबा" चा खुणपर्यंत लेख. (टु द पॉईंट का काय ते)
  • Log in or register to post comments

थोडी थोडी पिया करो

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/08/2012 - 09:26 नवीन
थोडी थोडी पिया करो बादमे गटर मे लोळा करो.Image removed.
  • Log in or register to post comments

हेच

मी_आहे_ना
गुरुवार, 11/08/2012 - 10:14 नवीन
अगदी हेच, सोकाजीनाना. धन्यवाद. तारतम्य पाळून (जसे कोणी म्हणले, मुलं आजूबाजूल असताना नको, ड्राइव्ह करायचे असेल तेव्हा नको इ. इ.) कुठलीच गोष्ट पूर्ण वाईट कशी असू शकेल. अजून एक मुद्दा - गुटखाबंदीसारखे दारूबंदीचेही कोलीत ह्या माकडांच्या हातात पडू नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments

विषय आणि आशय जुळत नाहित असे वाटतेय

किणकिनाट
गुरुवार, 11/08/2012 - 12:43 नवीन
सोत्रिच्या चावडीवरिल गप्पा नेहमीप्रमाणेच मनोर॓जक, पण ह्या वेळेस मन्ड्ळी॑चा गाप्पा॑चा विषय आणि आशय तसेच प्रतिसाद जुळत नाहित असे वाटतेय. बारामती, मद्यसम्राट, परमिटे, भ्रष्टाचार, धान्यापासून माद्य बनविणे, महाराष्ट्र आणि मद्य्र्राष्ट्र हे मुद्दे आणि मद्यप्राशनातील पारिमाणे, योग्यायोग्यता ह्या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे मझ्या अल्पबुद्धीस वाट्ते आहे. ब॑गना यापेक्शा जास्त ट्यार्पी नक्कीच योग्य आहे. किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........
  • Log in or register to post comments

मस्त चर्चा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/08/2012 - 13:48 नवीन
मस्त चर्चा चालली आहे. सोत्रि व गवि यांच्याशी सहमत आहे. असे वाचले होते कि दारु पिणार्‍या १०० लोकांपैकी १३ ते १४ व्यसनी होतात. अर्थात तुम्ही त्या १३ तले कि उर्वरित मधले हे सांगणे मुश्किल. तेव्हा आपल शास्त्रापुरती घेण उत्तम.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

मी_आहे_ना
गुरुवार, 11/08/2012 - 14:05 नवीन
सगळ्यांचे पूर्णविराम आले, चला आता मागवा एक एक, ही चर्चा थांबवायला. (हतबद्ध झालात तरी स्ट्रॉ असतेच) ;)
  • Log in or register to post comments

हतबद्ध म्हतले आहे हातबद्ध

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/08/2012 - 15:36 नवीन
हतबद्ध म्हतले आहे हातबद्ध नाही म्हटले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

हतबद्ध नाही हतबुद्ध हो बाकी

बॅटमॅन
गुरुवार, 11/08/2012 - 15:38 नवीन
हतबद्ध नाही हतबुद्ध हो :) बाकी पुण्याच्या पेशव्यांनी "हातबद्ध" अशी व्हर्जन जी उल्लेखिलेली आहे, तिजवरून येक लै लै बेक्कार श्लेष आठवला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

खीक

मी_आहे_ना
गुरुवार, 11/08/2012 - 15:54 नवीन
अहो ते सोत्रिंनी लिहिलंय 'हतबद्ध' म्हणून मीही तेच म्हणलो. ते जाऊदे, च्या (नाहीतर सोकाजीनाना मागवतील ते) पिणार का सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाओ तर! बिनदुधाचे ग्रीन टी

बॅटमॅन
गुरुवार, 11/08/2012 - 15:59 नवीन
हाओ तर! बिनदुधाचे ग्रीन टी/लेमन टी/इ.इ. सर्व "चहे" वेल्कम हैत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/08/2012 - 16:58 नवीन
चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे चहा चालेल . कोणी दारू घेत असेल तर सोड्यामधे लिंबू पिळून त्यात मीठ घालून प्यायला जाम आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

>>>>कोणी दारू घेत असेल तर

प्यारे१
गुरुवार, 11/08/2012 - 17:11 नवीन
>>>>कोणी दारू घेत असेल तर सोड्यामधे लिंबू पिळून त्यात मीठ घालून प्यायला जाम आवडते. फुल्ल टू-ल्ल्ल सहमत - 'कन्व्हर्टेड' प्यारे! ;) बाकी टू सोकाजी नि गवि व इतर सगळेच, एक छोटीशी :) टेस्ट करायची. एक वर्षभर दारु प्यायचीच नाही असं ठरवायचं नि ते पाळायचं. मग आपण दारु पितो की दारु आपल्याला पिते ते समजेल. आपण म्हणतो की आपला कंट्रोल आहे नि आम्ही एकदम कंट्रोल मध्ये असतो. पण जेव्हा दारु प्यायची नाही असं ठरतं तेव्हा जी तडफड होते ती काय प्र तीची असते त्यावर समजून जातं. इतर कुणासाठी नको, स्वत: स्वतःसाठी करा नि प्रामाणिकपणे कबूल करा. हीच गोष्ट 'सगळ्या' चांगल्या वाईट गोष्टींसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

प्यारेकाका,

गवि
गुरुवार, 11/08/2012 - 17:20 नवीन
प्यारेकाका, अगदी हीच गोष्ट.. मी "टेस्ट" म्हणून न करता माझ्याकडून आपोआप झाली. केवळ आता मागे पाहताना ते जाणवतं. मुद्दाम नोंद ठेवून प्रयत्नपूर्वक मद्यापासून दूर राहण्याची "टेस्ट" घ्यावी लागणे याचा अर्थ व्यसन ऑलरेडी लागलं आहेच. टेस्ट घेण्याचीही गरज नाही. त्या वेळी लक्षात आलं नाही पण मागे पाहून हिशोब लावला तेव्हा लक्षात आलं की एक वर्षं काय, त्याहून जास्त काळ अजिबात मद्य न घेता गेला होता. कारण ? : मुद्दाम ठरवून किंवा निग्रह करुन नव्हे. वेळच जमून आली नाही. लक्षात आलं नाही. आठवणही झाली नाही. कंपनी नव्हती किंवा स्वतःचा तसा मूड बनला नाही.. अशा कारणांनी इतका मोठा खंड पडला. त्यानंतर पुढचे योग्य ऑकेजन (गोवा वारी इत्यादि) आल्यावर पुढची बैठक झाली तेव्हाही "अरे, तब्बल अमुक इतक्या महिन्यांनी आज आपण हे पितोय", अशी जाणीवही झाली नाही. हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट = अल्कोहोलिझम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दारुपासून लांब राहणं तुम्हाला

प्यारे१
गुरुवार, 11/08/2012 - 18:38 नवीन
दारुपासून लांब राहणं तुम्हाला प्रयत्न न करता शक्य झालं म्हणून सगळ्यांनच्च जमेल असं नाही. कारण दारु. सिगारेट बंद चा नारा (फेसबुकवर स्टेट्स इ.इ.) देऊन १५-२० दिवसात टेबलला बसलेले बघितले आहेत. >>>>मुद्दाम नोंद ठेवून प्रयत्नपूर्वक मद्यापासून दूर राहण्याची "टेस्ट" घ्यावी लागणे याचा अर्थ व्यसन ऑलरेडी लागलं आहेच. अशा टेस्ट घ्याव्यात ना पण? प्रयत्नपूर्वक काळ ठरवावा लागेल ना? परिक्षा घेण्यासाठी किमान कालावधी आवश्यक असावा. >>>> वेळच जमून आली नाही. लक्षात आलं नाही. आठवणही झाली नाही. कंपनी नव्हती किंवा स्वतःचा तसा मूड बनला नाही.. अशा कारणांनी इतका मोठा खंड पडला. त्यानंतर पुढचे योग्य ऑकेजन (गोवा वारी इत्यादि) आल्यावर पुढची बैठक झाली तेव्हाही "अरे, तब्बल अमुक इतक्या महिन्यांनी आज आपण हे पितोय", अशी जाणीवही झाली नाही. दारु घेत नाही म्हणून अहंगंड नि घेतो म्हणून न्यूनगंड अथवा उलट असा अर्थ अपेक्षित नाहीच्च. दारु- जसं पाणी प्यायलो काय नि नाही प्यायलो काय याची आपण आठवण ठेवत नाही असा तुमचा दृष्टीकोन असलेला जाणवतो आहे. तुमच्यासाठी एक 'कॅज्युअल' गोष्ट असावी. मान्य. पण अशा वेळी अशा प्रकारचा दृष्टीकोन लोक ठेवत नाहीत. असला तरी तितकी ऐपत असेल असं नाही. ऐपत असली तरी शारीरिक क्षमता असेल असं नाही. त्यामुळं 'आगे धोखा है' चा बोर्ड आधीपासूनच असला तर काय वाईट????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/08/2012 - 22:10 नवीन
@हे मोजण्याची सुरुवात + गिल्ट = अल्कोहोलिझम. >>> क्या बात है ग.वि. क्या बात है...! उस्ताद हो आप...सचमुच के उस्ताद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टेस्टमध्ये पास झाल्यावर

गणपा
गुरुवार, 11/08/2012 - 17:23 नवीन
टेस्टमध्ये पास झाल्यावर बक्षिस म्हणूनImage removed. ही का? ;) झटपट काय नियम अटी काय आहेत या 'टेस्ट'साठी व्यनी करा बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जोपर्यंत

इरसाल
Fri, 11/09/2012 - 12:08 नवीन
तुम्ही आमाला ही बाटली देत नाय.......(मायदेशी येताना घेवुन येवुन) तोप्रयन्त आमी तुमाला तिरके परतिसाद देनार, तुमच्या धाग्यावर उलटेसुलटे बोलनार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हि(च) हि(च) हि(च)

जेनी...
Fri, 11/09/2012 - 12:10 नवीन
हि(च) हि(च) हि(च) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची

बॅटमॅन
Fri, 11/09/2012 - 13:54 नवीन
ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची उचकी :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

टपलेलाच असतो कैबे माझ्या

जेनी...
Fri, 11/09/2012 - 19:20 नवीन
टपलेलाच असतो कैबे माझ्या पोश्टानवर ??? :-/ तुलाबी पूस्प्गूच द्यावा लागल मंग मला :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

सोत्रि
Fri, 11/09/2012 - 19:30 नवीन
ए.. ए... मलाsss पण!!! मलाsss पण!!!!!! "पूस्प्गूच" :D :D :D - (पूस्प्गूच कसा असतो ते बघण्याची आस लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

निश यांच्याशी सहमत आहे. दारू

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/08/2012 - 16:57 नवीन
निश यांच्याशी सहमत आहे. दारू वाईट होतीच आणि आहेही. जरी रामायण किंवा महाभारत काळात प्यायली गेली असली तरी. यादवांचे कुळही दारू पिऊन आपापसात भांडूनच संपले. त्यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात प्यायली जात असलेली (अगदी मनुस्मृतीतही याचे उल्लेख आहेत. शंकराचार्यांच्या काळात सरस्वतीला दारूचा नैवेद्य दाखवल्याचेही पुरावे आहेत आणि आजही सरस्वतीपूजनाला काशाच्या वाटीत दूध आणि सैंधवाचे प्रतिकात्मक मद्य नैवेद्य म्हणून ठेवले जाते) दारू मधल्या काळात समाजाने किंवा बहुतांश समाजाने एकदम वाळीत का टाकली. याचाही विचार करावासा वाटतो. का तारतम्याच्या नावाखाली आपल्या संस्कृतीत असलेल्या सगळ्याच गोष्टी चूक आहेत असे म्हणायचे? आणि क्रॉस कल्चर वगैरे म्हणायचे झाले तर ख्रिश्चनांची दारू पिण्याची सवय मुळीच अनुकरणीय वाटत नाही. वाटतच असेल तर त्यांची शिस्त, सरळ (विषेशतः पाश्चात्त्यांचे) वागणे जास्त अनुकरणीय वाटते. बाकी आपले ते 'तारतम्य' आणि इतरांचे चे ते 'पोलिसिंग' असतेच. :)
  • Log in or register to post comments

बिन्गो!

सोत्रि
गुरुवार, 11/08/2012 - 18:13 नवीन
दारू मधल्या काळात समाजाने किंवा बहुतांश समाजाने एकदम वाळीत का टाकली. याचाही विचार करावासा वाटतो
पुपे, लाख पते की बात! एकढी प्राचिन संस्कृती (फक्त दारुच नव्हे, असंख्य गोष्टी) काळाच्या ओघात का गडप झाली आणि आपण ती का विसरुन गेलो त्याचा शोध घेणे फारच गरजेचे आहे. दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल. त्या अनुषंघाने अभ्यास करून, चर्चा होऊन दारुबद्दल विचार करायला हवा. उगाचच सरसकट दारुबद्दल आकस ठेवून दारु म्हणजे विष, दारु पिणे आणि गटारात लोळणे अशी विधाने करून विरोध करणे मला तरी पटत नाही. आणि हे माझे म्हणणे दारुचे उदात्तीकरण तर अजिबात नाही. कारण तारतम्य तर मझ्याकडे आहेच पण तारतम्य आणि पोलिसिंगमधला फरकही मला नक्कीच कळतो. :) - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

"मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी"

बॅटमॅन
गुरुवार, 11/08/2012 - 18:35 नवीन
"मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी" या नावाचे एक पुस्तक आहे. विविध व्यक्तींनी मद्याबद्दल स्वतःला काय वाटते ते लिहिलेले आहे, त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा एक "मद्येतिहास"पर लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

व्वा काय आठवन केलीत.

सोत्रि
गुरुवार, 11/08/2012 - 19:47 नवीन
अरुण शेवत्यांचे हे पुस्तक. एका दारु स्पेशल दिवाळी अंकात (आता नाव विसरलो) प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. खूपच छान लेख आहेत. सर्पुस्तकचाकात्याहवे असे. (ह्या पुस्तकाचा रेफरंस घेतला होता हा लेख लिहीताना :) ) खूप धावाधाव करून मिळवलेले हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. कोणाला हवे असल्यास वाचायला मिळेल पण त्यासाठी चेन्नैत यावे लागेल ;) - () सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

च्यामारी या गुगल वैतागलेला,

सोत्रि
गुरुवार, 11/08/2012 - 19:50 नवीन
च्यामारी या गुगल वैतागलेला, मराठी टंकने भयंकरच कठीण झाले आहे. :( - (गुगल क्रोमला वैतागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

च्यामारी या गुगल वैतागलेला,

सोत्रि
गुरुवार, 11/08/2012 - 19:50 नवीन
च्यामारी या गुगल वैतागलेला, मराठी टंकने भयंकरच कठीण झाले आहे. :( - (गुगल क्रोमला वैतागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

त्यातले किस्से लै भारी आहेत

बॅटमॅन
Fri, 11/09/2012 - 11:26 नवीन
त्यातले किस्से लै भारी आहेत मात्र :) अत्रे आणि ब्रह्मचारी पिक्चरचा किस्सा तर एक नंबरच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

llपुण्याचे पेशवे साहेब व प्यारे१ साहेब, तुमचे म्हणण बरोबर आहे.

निश
गुरुवार, 11/08/2012 - 17:17 नवीन
पुण्याचे पेशवे साहेब व प्यारे१ साहेब, तुम्हा दोघांचेही म्हणण बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

प्यारे१ साहेब, तशी टेस्ट खरच व्हायला हवी.

निश
गुरुवार, 11/08/2012 - 17:21 नवीन
प्यारे१ साहेब, तशी टेस्ट खरच व्हायला हवी. त्याच वेळी दारु आपल्याला पिते की आपण दारुला ते समजेल ज्याच त्याला.
  • Log in or register to post comments

१. ज्यांना भावले तेच पितात.

मृत्युन्जय
गुरुवार, 11/08/2012 - 19:12 नवीन
१. ज्यांना भावले तेच पितात. ज्यांनी त्यांनी स्वतःचे लिमिट ठरवावे हे सगळे खरे असेल तर एका मर्यादेत अफूदेखील औषधाचे काम करते हे लोक अमान्य करतील काय? शेवटी आपले लिमिट ज्याचे त्याने ठरवावे असे म्हणुन अफू देखील राजमान्य करावी काय? २. अभय बंग दारुला विरोधा करत आहेत असे वाटत नाहित तर दारुच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी जो राजकीय सामर्थ्याचा अयोग्य वापर केला जात आहे त्याला त्यांचा विरोध आहेसे दिसते. यावर कोणाला आक्षेप आहे काय? ३. "शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न " असा दृष्टीकोन असेल तर सिगरेट च्या पाकीटावर वैधानिक इशारा का असतो? गुटख्यावर बंदी का आहे? वेश्याव्यवसाय अवैध का आहे? समलिंगी संबंध कायद्याने गुन्हा का आहे? हेल्मेटसक्ती का आहे? ४. वैचारिक पातळीवर विचार न करता व्यावहारिक पातळीवर विचार करुन निर्णय घेतले जाणार असतील तर सावकारी पतपेढी आणि लोकशाही सरकार यामध्ये फरक काय उरला? ५. गुटखा, सिगरेट, अफू या पदार्थांएवधी दारु अपायकारक नसल्याने त्यावर बंदी नसावी असे जर मत असेल तर त्याचा अन्वयार्थ "दारु कमी अपायकारक असली तरी अपायकारक आहे" हे अमान्य करता येइल काय? ६. पुराणांमध्ये व्यक्त केले आहे म्हणुन मद्यपान ग्राह्य ठरते काय? तसे असल्यास बहुभार्यापद्धती, अश्वमेधात सांगितलेले नियम, राक्षस / पिशाच्च विवाह, चातुर्वर्ण्य पद्धती इत्यादी इत्यादी आजच्या समाजास मान्य व्हायला हवे असा आग्रह धरता येइल काय? ७. दारुने झालेले फायदे आणि दारुने उद्ध्वस्त झालेले संसार याचा आलेख मांडायचा झाल्यास कुठला आलेख उंच असेल? ८. शेरलॉक होम्स मज्जा म्हणुन अफू ओढायचा. अफूमुळे त्याच्या बुद्धीला चालना मिळते आणि मरगळ दूर होते असा त्याचा दावा होता. अर्थात तो माफक प्रमाणात अफू घेत असेल हे उघड आहे. तर मग तो माफक प्रमाणात अफू घेउन त्याचा लुत्फ उठवतो / उठवायचा, एखादा अतिसेवन करत असेल तर तो ज्याचा प्रश्न असे म्हणुन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येइल काय? यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर काहीही आले तरी मला शष्प फरक पडत नाही. मात्र दारु अवैध ठरवली तर दारुड्या मित्रांबरोबर बसल्यानंतर जेवणापेक्षा चविष्ट असा जो चखना असतो त्याला मुकावे लागेल हे लक्षात घेउन अतीव दु:ख होते. शिवाय तिसर्‍या पेगनंतर (काही केसेसमध्ये पहिल्या घोटानंतरच) काही लोक पार्टीमध्ये जी बहार आणतात ती नाहिशी होइल ही जाणीत होते. आणी त्यामुळेच मी दारुंबंदीचा तीव्र निषेध करतो. साहेबांचा विजय असो.
  • Log in or register to post comments

"अभय बंग दारुला विरोधा करत

इष्टुर फाकडा
गुरुवार, 11/08/2012 - 20:55 नवीन
"अभय बंग दारुला विरोधा करत आहेत असे वाटत नाहित तर दारुच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी जो राजकीय सामर्थ्याचा अयोग्य वापर केला जात आहे त्याला त्यांचा विरोध आहेसे दिसते. यावर कोणाला आक्षेप आहे काय?" >>>> हा मुद्दा महत्वाचा ! वाईन उत्पादन आणि निर्यात याला चालना मिळायलाच हवी. सध्या युरोपमध्येही 'न्यू वर्ल्ड' वाईन ची हवा आहे, ती भारताने वापरून घेतली पाहिजे. याचबरोबर अभय बंगांच्या इशार्याप्रमाणे वाईन उत्पादनाचे 'गृहोद्योगामध्ये' परिवर्तन होवू नये, त्याचा खरच बागायतदारांना फायदा झाला पाहिजे. भारतात वाईन संस्कृती नाही म्हणून आम्ही ती विकणारही नाही हे म्हणणे चुकीचे आहे. शिवाय इथे प्रत्येकाने गृहीत धरले आहे कि वाईन पिणारा प्रत्येक माणूस हा नव्याने दारू सुरु करणाराच असणार आहे. प्रत्यक्षात भारतात २० कोटी लोक व्हिस्की, रम आणि बिअर नियमितपणे पितात त्यातले काही जर वाईन कडे वळले तर पिणार्यांच्या तब्बेतीच्या दृष्टीने ते चांगलेच आहे. (अर्थात असे म्हणताना मी जबाबदार पिणार्यांना गृहीत धरतोय, आधी व्हीस्कीने मरत होता आता वाईन ने मरा ! असा अर्थ काढू नये.) दारूचे उदात्तीकरण होवू नये हे खरच पण सरसकट सगळ्याच दारू घेणार्यांकडे संशयास्पद, वक्रदृष्टीने पाहू नये हेही तितकेच खरे. इथले काही प्रतिसाद पाहता मला थोडंसं तसंच फिलिंग येतंय खरं :)
  • Log in or register to post comments

सोत्रि!..मस्त जमलंय!!!!

मृगनयनी
गुरुवार, 11/08/2012 - 22:20 नवीन
सोत्रि!..मस्त जमलंय!!!! :) :)
  • Log in or register to post comments

काय हवे ते राष्ट्र होऊद्या

आशु जोग
गुरुवार, 11/08/2012 - 22:40 नवीन
काय हवे ते राष्ट्र होऊद्या पण तेवढं स्वस्त करायचं पहा... गरीबाची संध्याकाळ तरी बरी जाऊद्या
  • Log in or register to post comments

अब्रह्मण्यम, सुब्रह्मण्यम

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/08/2012 - 23:13 नवीन
"दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल." हे असे सांगितले, तर बोलणे कुंठते. मग कुंथत येणारे उप प्रतिसाद बंद पडतात हे पाहून मजा वाटली. बाकी सोकाजीराव, तुम्हास अणुमोदन
  • Log in or register to post comments

त्या राजवटीत सगळ्याच वाइट

आशु जोग
गुरुवार, 11/08/2012 - 23:24 नवीन
त्या राजवटीत सगळ्याच वाइट गोष्टींना बंदी होती. इथे रामराज्यच अवतरले होते, असे नोन्दवावेसे वाटते. आता रामराज्य केवळ सौदी अरेबियामधे शिल्लक आहे. (दारु पिली तरी बुद्धी गहाण न टाकणारा) जोग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

खरयं, अगदी सहमत !

आबा
Mon, 11/12/2012 - 23:42 नवीन
==)) सोकाजीरावांचा तो प्रतिसाद स्ट्रॅटेजीक इंटेलिजन्सच चांगलं उदाहरण ठरावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

"दारु बद्दलच जर बोलायचे झाले

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/14/2012 - 10:46 नवीन
"दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल." बाकी एखाद्या संशोधकाने लिहीले म्हणजे ते मानायला पाहीजे असे नाही. अनेक संशोधकांनी लिहीलेली संस्कृतीपर मुक्ताफळे वाचली की भरपूर मनोरंजन होते . बाकी जैन धर्म इस्लामपूर्वीचाच ना हो? मग त्यात देखील दारू वर्ज्यच आहे. तरीपण त्याला इतके अनुयायी इस्लामप्रमाणे कत्तली न करता कसे काय मिळाले याचे आश्चर्य वाटते. का त्या अनुयायाना माहीत नव्हते की जैन झाल्यावर मांसाहार करता येणार नाही, दारू पिता येणार नाही. शंकराचार्यांची अनेक चरित्रे वाचली आहेत त्यातही शंकराचार्यांनी दारू प्यायल्याचा उल्लेख कुठे येत नाही. जो काही आहे तो मंडनमिश्र यांनी शंकराचार्यांना शिव्या देताना तुम्ही पिवळी दारू पिऊन आल्यासारखे बोलत आहात असा निर्भत्सनापूर्वक येतो त्यामुले वरील इस्लामविषयक मताचा शहाजोगपणा ज्याना मानायचा आहे ते मानतात बाकीचे मानत नाहीत. :) शेवटी ज्याना समर्थन करायचे आहे ते करतात कशाही पद्धतीने. आणि त्यात योग्य अयोग्य ठरवणे कठीण आहे असे स्वतःच म्हणतात. असो, कमीत कमी इथे जे काही थोडे लोक विरोधी मते मांडत आहेत ते दारू अयोग्य अशा मतावर ठाम तरी आहेत हे चांगले. म्हणूनच एका प्रतिसादात आधीच म्हणून ठेवले आहे की आपला तो संतुलितपणा आणि इतरांचा तो दुराग्रह हे असे सांगितले, तर बोलणे कुंठते. मग कुंथत येणारे उप प्रतिसाद बंद पडतात हे पाहून मजा वाटली. कुंठते? का खुंटते? कारण कुंठते हा शब्द मती , बुद्धी अशा ठीकाणी वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा