माझ्या लग्नाची एक गोष्ट...
लेखनाच्या कोणत्याही पुर्वानुभवाशिवाय लिहितोय. पण लग्न ठरत असलेल्या एका तरुणाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतोय. (फार पुर्वी आतंरजालावर एके ठिकाणी प्रकाशित केला होता..)या लेखामध्ये प्रकट केलेल्या घटना व विचारांशी लेखक सहमत असेलच असे नाही.. शिवाय संपुर्ण काल्पनिक.. अन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित बहुदा..
माझ्या लग्नाची एक गोष्ट...
साधारण २७ व्या वर्षी करायचं ठरवलं होतं.. दीड वर्षं अगोदर होतंय.. पण मुली बघायला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी एप्रील मध्येच.. मी घरापासून लांब राहतो.. चांगलाच लांब.. रेलवेनं घरी यायचं म्हटलं तरी २४ तास लागतातच लागतात. तिकीट वगैरेच्या पण सतरा भानगडी कराव्या लागतात. ईंजीनीअरिंगचं शिक्षण पुर्ण केल्या नंतर पुण्याच्या एका नामांकित कॉलेज मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि त्या दरम्यान भारतामधल्या सर्वात प्रतिष्ठीत कंपनीमध्ये आणि ज्या वयात आपण इतक्या सगळ्या पैशांचं काय करायच असा प्रश्न पडू शकेल इतक्या पगाराची नोकरी लागली. घरातला मोठा मुलगा पण घरचं सगळं चांगलं, आई पप्पानीं घराचं पुर्ण बस्तान किंवा ससांराची घडी व्यवस्थीत बसवलेली त्यामुळे माझ्या खांद्यावर विशेष काहिच जबाबदारी नाही. धाकट्या भावाचं शिक्ष्ण चालू होतं. लौकीकार्थाने मुलगा हाता तोंडाशी आलेला, आणि घरच्यांना जाम उत्साह. मी (खरंच) नको नको म्हणत असताना यानीं माझ्या नकळत पाहुण्यांमध्ये सांगून टाकलं "यंदा आम्हाला कर्तव्य आहे! " मग काय, मला नंतर कळलेल्या माहिती वरून सांगतो, घरी बऱ्याच फोटो पत्रिकांचा गट्ठा तयार झाला होता. सुरवातीला आडून आडून विचारणा व्हायची, आई म्हणायची " अजून किती दिवस मेलं एकटीला सगळ्यांच करावं लागणारंय" " आज माझी लेक असती तर तिनं किती हातभार लवला असता" " तिनं असं केलं असतं" " तिनं तसं केलं असतं" आणि अशा वेळी मागे हटेल ती मावशी कसली ती पण लगेच आईची बाजू घ्यायची. मी त्या दोघींचं बोलणं उडवून लावायचो, लगेच पप्पा तत्त्वज्ञाच्या भुमिकेत शिरून भावनिक पातळीवरून माझ्या मनाला साद घालायचे. त्यांचा वेगळाच पॉइंट, म्हणे "काही गोष्टी ठरावीक वेळेला झालेल्याच बऱ्या असतात" ते " आम्हा म्हातारा - म्हातारीचं सून मुख बघायचं एव्हढंच राहिलंय". मी काही बधत नव्हतो. अशा वेळी लोक राम बाण वगैरे काढतात पण माझ्या घरच्यांवर काय ही वेळ आली नाही. मुलगी कशी असावी आणि जिच्या सोबत लग्न कराय्चं ती मुलगी कशी असावी, मुली कशा असतात, मुली कशा नसाव्या इत्यादी इत्यादी या वेगवेगळ्या विषयांवर आम्हा मित्रांमध्ये खुप (निरर्थक) चर्चा व्हायच्या आणि सगळ्यानां खुप रस असायचा. मी नोकरीच्या ठिकाणी रूम वर रहायचो. चौघेजण चार कॅटेगरी मधले. सगळ्यात मोठा ज्याच्या लग्नाला ७ वर्षे पुर्ण झाली होती आणि २ मुले होती. दुसरा ज्याला त्याची अर्धांगिनी घावली होती अन त्यांचा साखरपुडा पण झाला होता, तिसरा ज्याला तेव्हा कर्तव्य होते आणि मी संटा (एकटा). मी तिघांच्या अवस्था बघत होतो. त्यातून शिकत होतो. पण लग्न म्हटले की 'स्वातंत्र्यावर घाला', कटकट, आणि एकुणच चेष्टेचा स्वर असतो. तसं वाटत नव्हतं त्यांच्याकडे बघून. त्यामुळंच खरं तर माझ्यामध्ये आत्मविश्वास जागृत का काय तो झाला. तिघांपैकी ज्याचा साखरपुडा झाला होता तो तर काय स्वर्ग सुखीच न्हाला होता. रोज किमान ३ तास तरी त्याच्या होणाऱ्या बायकोशी फोन वर बोलल्या शिवाय त्याचं समाधानचं व्हायचं नाही. मला विशेष वाटायंच, च्यायला सख्ख्या मित्राशी ते कधी ११ - १२ मिनिटाच्या वर स्वतः फोन करून बोललो नाही आणि हा मनुष्य प्राणी २ - ३ तास दुसऱ्या स्त्री प्राण्याशी बोलतो! तसा त्या दोघांच्या साखरपुड्यात आणि लग्नात ६ महिन्यांचं अंतर होतं म्हणा. मी तेव्हाच ठरवलं आपण असं काहिही करायचं नाही. अरे तिला पण तिची काही स्पेस आहे की नाही? का ह्याचा फोन येणार म्हणून तिने हातातली सगळी कामं बाजुला ठेवायची? तो म्हणायचा त्याचं त्याच्या (च) बायकोवर फार प्रेम आहे आणि ते दोघे एकमेकांसाठी वेळ देतात. मी म्हणायचो (मनातल्या मनात) ' अर्रे लब्बाडा, मुलीसोबत गुलू गुलू बोलायला मिळतं ते सांग की! ' आणि जो मुली बघत होता त्याचं जगणं मला बघवत नव्हतं. बिच्चारा, धड जेवायचा नाही, कामात लक्ष नाही, सतत त्याला चिंता लागून राहिलेली असायची - कोण भेटेल, कशी असेल, सर्व संभाळून घेइल ना? की डोक्यावर मिऱ्या वाटेल? की पदरात पडेल ते पवित्र करून घावं लागेल? एक ना अनेक शंका. पण आता त्याचे दोनाचे चार झाले आणि चाराचे सहा व्हायच्या मार्गावर आहेत. ज्याचं लग्न झालेलं होतं तो एक सल्ला द्यायचा ' एकमेकांचा आदर करायला शिका'. तेव्हा इतकं समजायचं नाही. अशात एका सुमुहुर्तावर मी पण माझ्या घरच्यांचा मला बेडीत अडकवण्याचा हेतू जाहीर केला तेव्हा तिघेही फक्त हसले. आणि समोर आलेल्या परिस्थितिला सामर्थ्यानं तोंड द्यायला सज्ज होण्यसाठी मी सज्ज झालो. विना मोबदला दुसऱ्याला देता येणारी गोष्ट - सल्ला. तोच पहिल्यांदा मिळाला न मागता. काय तर " लग्न? करू नको" " जियो और जीने दो" " एकटा जीव सदाशिव" " अजून किती दिवस आपला हात जगन्नाथ? बस्स झालं" " करून बघ आणि आम्हाला पण सांग कसं वाटलं ते " एक ना अनेक. लग्न झालेल्या अन न झालेल्या लोकांच्या प्रतिक्रिया मजेशीर होत्या. पण दुसऱ्या बाजुला माझ्या मनात पण विचार चालुच होते. त्रयस्थाप्रमाणे मी वेगळ्या पातळीवरून मी या मनुष्य स्वभावाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होतो. नक्की काय होतं जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांच सर्वस्व एकमेकांना अर्पण करायला तयार होतात आणि ज्यात व्याभिचाराला आजिबात थारा नसतो. या सगळ्या गडबडीत सांगायचा मुद्दा बाजुला रहिला. तर जेव्हा मी ठरवलं लग्नाबद्दल विचार करण्याचं तेव्हा थोडं आत्मपरीक्षण करावंस वाटलं. मी किती तयार आहे लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पेलायला? ज्या प्रमाणे मी मुलिबद्दल अपेक्षा ठेवतो त्या प्रमाणे ती पण मुलाकडून काही अपेक्षा ठेवत असेलच ना! माझ्याकडे असं काय आहे ज्याच्या बळावर मी मला पसंत पडलेल्या मुलिला मागणी घालू शकतो. चांगला पगार, स्वतःचं घर, ५ फूट ११ इंच उंची, सुंदर दिसणं हे एका मर्यादेपर्यंत महत्वाचं आहे. पण मी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल किती प्रामाणिक आहे हे पडताळून पाहणं पण मला तितकंच महत्त्वाचं वाटलं. आणि मन भुतकाळात गेलं. मुली.. पाचवीत असल्यापासून आमच्या शाळेत मुला मुलींची संख्या लक्षात घेउन एका बाकावर २ मुलिंमध्ये १ मुलगा किंवा २ मुलांमध्ये १ मुलगी आली पाहिजे हा वर्गात बसण्यासाठीचा नियम कटाक्षाने पाळला जात होता. मी पहिल्या प्रकारात मोडत होतो. ४ वर्षे 'अशी' गेल्या नंतर दहाविमध्ये मुलिंच्या रांगेचा मॉनिटर केला गेलो आणि त्याच रांगेत सर्वात पुढच्या बाकावर बसायची (माझ्यासाठी) शिक्षा / (इतरांसाठी) मजा मला मिळाली. अकरावी - बारावी मध्ये इंटरनेट आणि गाड्या पळवण्याचा गेम हाती लागल्या नंतर मुलिंच्या मागे लागण्यात रस वाटत नव्हता. सोबतच शहरातील आजुबाजुच्या डोंगराळ भागातील रम्य ठिकाणे हुडकून काढण्याचा नाद लागल्यामुळे आम्ही कॉलेज मध्ये दिसणं टाळायचं ठरवलं. बारावी पर्यंत मुलींशी विशेष संपर्क आला नाही. पण मैत्रिणी बनत गेल्या, खुप जवळच्या कोणीच नाही आणि कुणाच्या जास्त जवळ जायचंच नाही असं ठरवलं ही होतं. अकरावी - बारावी मध्ये एकत्र असलेल्या आम्ही मित्रांनी इंजिनीअरिंगला पण एकत्र ऍडमिशन घेतली आणि पुर्विचे उद्योग पुढे चालू ठेवायचं ठरवलं. यावेळी मात्र आमच्या ग्रुप मध्ये २ मुली सामील झाल्या. अन त्या पण त्या वेळच्या ऍडमिशन घेतलेल्या पैकी सर्वात अपर क्लास मुलिंपैकी दोघी होत्या. सौंदर्य आणि सरस्वतीचा वरदहस्त असा जबरदस्त मिलाफ होता. त्यांच्यामुळे आमच्या ग्रुपला आगळी शोभा आली. आमच्या उद्योगात त्या पण सामील झाल्या. खुप चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यावर आम्ही आपापल्या दिशेला पांगलो. नंतर नोकरीच्या निमित्तानं लांब आलो आणि जगप्रसिद्ध 'कामाच्या रहाटगाड्यात' ओढला गेलो. घरापासून लांब मेट्रो सिटी मध्ये रहायची संधी मिळाली. इथली जीवन पद्धती जवळून पहायला मिळाली. इथं कोणी विचारणारं नव्हतं. मस्त पैसा होता. तो फेकून मागेल ते मिळालं असतं. पण अशा गोष्टीमध्ये अडकावं असं कधीच वाटलं नाही. बाई झालं बाटली राहिलं. उत्सुकता म्हणून ते करून बघितलं. आत्तापर्यंत जिन, वाइन, रम, व्हिस्की, बीअर, व्होडका हे प्रकार पिउन पाहिलेले आहेत. प्रत्येकी एकदा. परत तोंडाची चव बिघडवणार नाही. नॉन व्हेज मात्र आमच्या जीभेला वंदनीय आहे. ते टाळु शकत नाही. तर चांगल्या पगाराची नोकरी, स्वतःच घर नसलं तरी पुढं मागं तेही घेउ शकेन असा पक्का अंदाज. आणि आत्तापर्यंत सांगीतलेल्या पुर्वायुष्यावरून मी पात्र वर ठरू शकतो असा कयास बांधला. आणि माझ्या मुलीबद्दलच्या अपेक्षा काय काय असाव्या या बद्दल विचार विनिमय चालू झाला. मी लग्न करायचं तर घरच्यांच्या पसंतीनेच असं ठरवलं होतं. तुम्हाला वाटेल काय मनुष्य आहे हा! स्वतःच्या आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय दुसऱ्यांच्यावर सोपवणार? तर तसं काही नाहिये. आणि माझे आई पप्पा बऱ्यापैकी खुल्या विचारांचे आहेत. खरं सांगायचं झालं तर त्यांचा प्रेम विवाह झालाय. म्हणजे मला पुर्ण मोकळीक होती अशातला भाग नव्हे. कधी कधी त्यांच्या बोलण्यातून डोकवायची त्यांची सुनेबद्दलची स्वप्नं. मग मी का त्यांच्या हिरमोड करू. आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करतात. थोडक्यात आपणंच त्यांच सर्वस्व असतो. मग त्यांनी जर माझ्या कडून ही एक अपेक्षा ठेवली तर मी ती पुर्ण करायला नको? तुम्हीच सांगा. मी परस्पर एखादी मुलगी पसंत केली आणि ती घरच्यांच्या पसंतीस नाही उतरली, आयुष्यभर मनात हा सल राहणारच ना? हा त्यांच्या भावनांचा अपमान नाही का? त्यामुळं सर्व संमतिनं मुलगी पसंत करायची असा सारांश. मुलीबद्दल काय अपेक्षा असायला हव्यात याचा मी नक्कीच कुणाला सल्ला विचारणार नव्हतो. मला माहिती आहे मी कसा आहे. माझ्यातले चांगले गुण आणि दुर्गुण ओळखण्याइतपत मी नक्कीच सुज्ञ आहे. आई शप्पथ! ज्या दिवशी लग्नाबद्दल सिरिअसली विचार करू लागलो त्या दिवसापसून माझी मुलिंकडे बघायची नजरच बदलली. ऑफिसमधल्या, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या, घरच्यांसोबत असणाऱ्या, ग्रुप मध्ये असणाऱ्या मुली. कसा असतो त्यांचा स्वभाव? त्यांचे हावभाव, हसण्याची पद्धत, केस मागे घेण्याची लकब, कशा उठतात, कशा बसतात, कशा चालतात, बोटांचे गाडीच्या चावीशी, पेनाशी चाललेले खोडकर चाळे, दाताखाली ओठ दाबायची स्टाईल, हाताची घडी कशी घालतात, एकमेकांना टाळ्या देणे, बोलताना मध्येच डोळे मोठे करणे.. मुलींच्या सहज हालचाली टिपून घ्यायची सवयच लागली म्हणा ना! म्हटलं थोडातरी थांग पत्ता लागेल त्यांच्या स्वभावाचा! पण एव्हढं सोप्पं आहे का ते? नंतर नंतर लग्न झालेल्या, ठरलेल्या मित्रांशी थोडं बोलणं वाढवायला सुरू केलं. ते लोकं नक्की काय विचार करून मुलगी पसंत करायला गेले होते. कधी कधी प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्यालाच चिकटून बसतात. मग त्या क्रायटेरिया मध्ये बसणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि पहिली बघितली जाते, मग दुसरी मग तिसरी असं करत करत मग मुलगी बघणे हा विनोद होउन बसतो. आणि नंतर वाटतं अरे यार तेव्हाच तिला हो म्हटलं असतं तर बर्र झालं असतं, पण तो पर्यंत वेळ टळून गेलेली असते. माझ्या माहिती मध्ये दोघेजण आहेत त्यां पैकी एकाने १८ मुलींनंतर १ पसंत केली आणि दुसरा ज्याने आत्तापर्यंत ४२ मुली बघितल्या आहेत तरी अजून लग्न ठरलेलं नाही. काही जण तर अभिमानाने सांगतात ह्या गोष्टी. माझे २ मित्र असे आहेत ज्यानीं एकच मुलगी बघितली, तिच त्यानां पसंत पडली आणि तिच्याशीच लग्न केलं, यात तो जो सतत अस्वस्थ, बैचेन असणारा माझा रूममेट पण आहे! मित्र मैत्रिणिंमध्ये मॅट्रिमोनिअल साईट वरून लग्न जुळवणारे, प्रेम विवाह करणारे आहेत, लग्नापुर्वी स्वतःचं घर असावं म्हणून ३ वर्षे थांबलेलं एक जोडपं ही आहे. जरी सगळ्यानांच ठेचा लागल्या नसल्या तरी मागचा मी मात्र शहाणा बनत होतो. या सगळ्यात माझं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी माझ्याकडे नव्हतं. शिट! काय करावं? मुलीबद्दल लग्नासाठी विचार करायचा म्हणजे नक्की कुठून सुरुवात करायची? मी हा असा मोठ्या कंपनीत काम करायला मिळतंय म्हणून घरापासून इतक्या लांब आलेलो, वेगळी भाषा, पुर्णपणे वेगळं कल्चर; राहणं खाणं, मेट्रो सिटी मध्ये रहायचं म्हणजे माझा एकट्याचाच कितीतरी खर्च व्हायचा. आणि मराठी मुली म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातच शिक्षण आणि सहसा घरापासून जवळ नोकरी अशातल्या. सर्व काही स्थिर स्थावर आणि सासर पण पुणे मुंबई असावं असं मनात ठेउन असणाऱ्या मुली घरापासून दोन हजार किलोमीटर दूर आल्या असत्या? येत असतीलही पण या सगळ्यावर पाणी फेरून एक्कलकोंड आयुष्य जगायला. नवरा दिवसभर ऑफिसमध्ये आणि ही घरात! सकाळी त्याला नाश्ता, डब्बा तयार करून द्यायचा; तो निघून गेला की धुणी भांडी करायची, घर साफसुफ करायचं, मग टीवी चालू करायचा त्यावर लागलेल्या मतीभ्र्ष्ट झालेल्या लोकांच्या, दर्शकांची बुद्धीभ्रष्ट करणाऱ्या मालिका, रटाळ सिनेमे, अन त्याचा कंटाळा आला की झोप काढायची. कारण अशा ठिकाणी शेजार कसा भेटेल, असेल की नाही कुणास ठाउक? आणि नव्या ठिकाणी नोकरी करायची मानसिकता किती मुलींची असते या बाबत माझं काही स्प्ष्ट मत नाही. मग संध्याकाळी अर्धा तास नवरा घरी आला की त्याच्या सोबत भाजी वगैरे खरेदी करायला म्हणून बाहेर पडायचं, रात्री घरी यायचं स्वयंपाक पाणी, भांडी आवरायची झोपून जायचं. ही माझ्या डोळ्यासमोरची दोन उदाहरणे आहेत. त्या दोघींपैकी एक कॉंप्युटर ईजिनिअर तर दुसरी एम. कॉम आहे. एव्हढं शिकल्या पण ज्ञान कधी उपयोगात आणनार? मी त्या दोघांच्या नवऱ्यानां विचारलं - ते माझे चांगले मित्र आहेत. यावर एकाची प्रतिक्रीया होती " मी काय तिला नोकरीसाठी नाही म्हणालेलो नाही, तिला हवी असेल तर तिनं करावी, पण जर तिलाच घरी बसावसं वाटत असेल तर मी काय करू शकतो? " मान्य. एकदम मान्य. दुसरा मित्र म्हणाला " बायको शिकली आहे ठीक आहे पण तिनं नोकरी नाही केली पाहिजे, तिनं घर संभाळावं, पुढं मागं मुल होइल त्याला मोठं करावं, त्याचा अभ्यास घेताना तिचं शिक्षण उपयोगी पडेल. माझ्या आई वडीलांकडे लक्ष द्यावं यातच सगळं आलं, आणि पैसा काय; मी आणतोयच ना कमवून! काही कमी तर पडू देत नाहिये ना? मग! ". माझ्या ऑफिस मध्ये माझ्या क्युबिकल मेटचं पण मुली बघायचं चाललं होतं त्याला एके दिवशी सहज त्याच्या मुलिंबद्दल्च्या अपेक्षांच विचारलं, त्यानं दिलेलं उत्तर सगळ्यात वेगळं तुम्हाला विश्वास बसणार नाही असं होतं. त्याला चांगली एम. बी. बी. एस. झालेली, शहरातल्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेली मुलगी चालून आलेली, तिला तो नाही म्हणाला. का? " मुली जास्त शिकल्या की त्या डोक्यावर बसतात. आणि नोकरी करणाऱ्या, लग्न झालेल्या न झालेल्या मुली पुरुष सहकर्मींकडे आकर्षीत होतात आपला तोल हरवतात आणि हाताबाहेर जातात. " आता काय म्हणावं या विचारसरणीला? त्यानं सरसकट नोकरी करणाऱ्या सगळ्या मुलींना 'हाताबाहेर जाणाऱ्या' ठरवलं होतं. त्याला शिकलेली चुल अन मुल सांभाळणारी बायको पाहिजे होती. एव्हढं मोठं शहर, महिन्याच्या महिना खात्यात जमा होणारा पाच आकडी लट्ठ पगार, एकटा, कुटुंबाची कोणतिही जबाबदारी खांद्यावर नसलेला मी. माझी जीवन पद्धती विशेष चैनीची, चंगळवादी, उधळपट्टी करणारी नव्हती. निर्व्यसनी. पण खायला प्यायला चांगलं, आम्ही चौघात मिळून ऑफिस जवळ, चालत १०मिनिटे लगतील असा, फुल्ल फर्निशड, टी वी, इनव्हर्टर असणारा, २ बी. एच. के. फ्लॅट घेतला होता. सकाळ संध्याकाळ स्वयंपाकासाठी, घर झाडून पुसून घेण्यासाठी, भांडी अन कपडे धुण्यासाठी कामवाल्या बाया होत्या. पंधरा तीन आठवड्यातून एकदा जंगी पार्टी व्हायची. दर दोन तीन महिन्यांतून बाहेर ४ -५ दिवसांची ट्रीप काढायची. कपडे, बुट ब्रॅंडेडच असले पाहिजेत असा काही अट्टहास नव्हता. वर्षातून ४ वेळेला घरी जाणं व्हायचं. त्यात एका बाजुने वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवास ठरलेला. आणि रेलवेमध्ये वातानुकुलीत द्वितीय श्रेणीतुनच प्रवास करायचो. घरी गेल्यानंतर जबरदस्त रकमेचा चेक पप्पांच्या हातात ठेवताना काय मस्त वाटायचं म्हणून सांगू! असं माझं आयुष्य लग्नानंतर बदललं असतं का? आणि तो बदल मी स्विकारू शकलो असतो का? कारण टिपिकल संसारी पुरुष म्हटलं की कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे झुकलेला, अट्ठावीस रुपये किलो मिळणारी भाजी सव्वीस रुपये किलो मिळेल म्हणून मण्डईतून फिरणारा चिंतातुर कीटक डोळ्यांसमोर येतो. मी काय करणार होतो? घरामधलं सशक्त आणि मोकळं वातावरण, निर्णय घेण्याचं पुर्ण स्वातंत्र्य आणि नोकरी, घरापासून लांब राहणं त्यामुळे पैशांच व्यवस्थापन, स्वावलंबनाची आणि बऱ्या वाईटाची जाणीव (मीठापासून पीठापर्यंत सर्व सामान, दूध, भाजी, लाईट, पाणी बील भरणे, सिलिंडरला नंबर लावणे, वेळ प्रसंगी स्वयंपाकवाल्या बाईने दांडी मारल्यानंतर स्वहस्ते स्वयंपाक, महिन्याच्या महिना हिशोब ठेवणे, सर्वांना वेळेवर पैसे देणे या आणि इतर घर चालवण्यासाठी लागणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या. बचत आणि गुंतवणुक व्यवस्थीत मनाप्रमाणे होत होती. त्याबाबतीत कधीच तक्रार नव्हती.) झाली होती. झालं मनात विचार चमकून गेला.. माझी होणारी बायको विनापाश आणि नोकरी करणारीच हवी. तुम्हाला माझी ही मागणी स्वार्थी वाटली का? कृपया तसा गैरसमज करून घेउ नका. मी तिच्या दर महिना कमवून आणणाऱ्या पगाराच्या आकड्याला उद्देशून म्हणत नाहिये. अर्थात तो पैसा आम्हाला आमचा संसार उभा करण्याच्या कामी येइलंच पण मूळ उद्देश हा नाही. यातून दोन हेतू साध्य होतात. म्हणजे नोकरी करण्याइतपत शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्वाचे 'हुशार' 'आत्मविश्वास' आणि 'स्वतंत्रपणा' हे पैलू सतेज होतात. घरातून बाहेर पडल्यामुळे तऱ्हे तऱ्हेचे लोक, त्यांचे स्वभाव, बाहेर काय परिस्थिती आहे, एकुणच सर्वसाधारणपणे म्हणायचं झालं तर जाणीवा व्रुद्धिंगत होतात. पगाराचं आर्थिक पाठबळ मिळतं. खऱ्या अर्थानं ती व्यक्ती सज्ञान झाली असं आपण म्हणू शकतो. आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत आणखी काय करायच्या अपेक्षा असणार? लहानाचं मोठं होताना आई वडील यांचे स्वभाव, घरातलं आणि आजुबाजुचं वातावरण याचा सरळ सरळ परिणाम मनावर होतो. विचारसरणीलाही तसंच वळण लागतं. त्यामुळं ती जेव्हा मला भेटेल तेव्हा मी या मुद्द्यावर चर्चा नक्कीच करणार. थोडक्यात काय तर मुलगी सुसंकृत घरातील असावी. आणि माझी ही मागणी गैर नक्कीच नाहिये. बरोबर ना? आत्ताशी कुठं माझ्या मुलीबद्दलच्या अपेक्षांना आकार येत चाललाय. आणि तो योग्य दिशेला पुढं सरकत असावा. नसेल तर तुम्ही मार्गदर्शन करा. मित्र - मैत्रिणिंना अधून मधून फोन होतच असतात. बोलण्याचे अनंत विषय. बहुमतं. एकमेकांना समजून घ्यायला विषेश प्रयत्न नाही करावे लागत. समवयस्क असण्याचा हा फायदा. लग्न झालेल्या मित्र मैत्रिणींमध्ये (परत तुलनत्मक विचार, मागील पानावरून पुढे... क्षमा असावी) किंवा आजूबाजुला पाहा अशी कितीतरी जोडपी दिसतील ज्यांच्या वयामध्ये सरासरी ३ ते जास्तीत जास्त ५ कधी कधी ७ वर्षे अंतर दिसेल. त्या दोघांच्या वयांच्या सोबत वैचारीक पातळीत पण फरक असणारच ना? जरी एखाद्याचं लग्न २७व्या वर्षी ठरत असेल तर त्याची सहधर्मचारिणी २४ वर्षांची. म्हणजे नुकतंच कॉलेज संपवून आयुष्याला नव्या दिशा देण्यासाठी, नव्या वाटा चोखाळण्यासाठी उतावीळ असलेलं एक अल्लड मन! त्याच्या गळ्यात संसाराचं जोखड अडकवलं की करीअरची भरारी, नावीन्याचे पंख आपोआपच जबाबदाऱ्यांच्या दोरखंडात निष्प्राण होउन करकचून आवळले जातात. वयानं जास्त असणारा नवरा आपोआपच अधिकाराच्या भावनेनं बायकोवर वर्चस्व मिळवण्याचा कळत नकळत प्रयत्न करतो. जाउ दे. तो फार मोठा विषय आहे. पण नाविन्याचे नऊ दिवस ओसरले की आयुष्याची चौकट बनून जाते. मला नेमकं हेच टाळायचंय. माझ्या आणि तिच्या वयामध्ये अंतर असणार हे नक्की. कारण ते माझ्या हातात नाही. पण ते एका वर्षापेक्षा जास्त नसावं या बद्दल मात्र मी घरच्यांना स्पष्टपणे सांगणार आहे. तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यांना माझा पुर्णपणे पाठींबा असेल. आणि तिची ध्येय्य साध्य होण्यासाठी मी माझ्या बाजुने जेव्हढे होउ शकतील तितके प्रयत्न करेन. वर सांगितलेल्या गोष्टी मी काही कुणासोबत चर्चा करून पडताळून पाहील्या नाहीत. तशी मला तरी गरज भासली नाही. पण हे सगळं एके दिवशी मी पप्पांसोबत फोन वर बोललो. त्यांचा सुरवातीला कानावर विश्वासच बसला नाही. त्यांनी आणि आई ने पुर्णपणे सपोर्ट करायची तयारी दाखवली. तशा मागण्या अवास्तव नव्हत्याच ना! आता राहता राहिल्या अटळ गोष्टी. बाह्यरूप, रंग, उंची, हुंडा वगैरे वगैरे. याबाबतीत मी एकदम निर्धास्त आहे. मग! आई, मावश्या कधी कामाला येणार? साल २००९, जून महिना, तारीख ३. सकाळी ७ वाजता मोबाईलची घंटी वाजली. घरचा नंबर. इतक्या सकाळी? कारण रोज रात्री जेवण झाल्यानंतर घरी फोन व्हायचा त्यानंतर दुसऱ्याच दिवशी. मी म्हटलं चुकून नंबर लागलेला दिसतोय आणि उचलला. त्या नंतरचा अर्धा तास सुन्न अवस्थेत गेला आणि शुद्धीत आल्यानंतर थरथरत्या हातांनी आणि अंधारलेल्या डोळ्यांनी मिळेल त्या गाडीचं घरी जाण्यासाठी रिझर्वेशन उपलब्ध आहे का ते शोधू लागलो.. तो फोन आईचा होता. घरी आलेल्या फोटो पत्रिकांपैकी फोटो + पत्रिका अशा दुहेरी कसोटीला उतरलेली 'एक मुलगी' माझ्यासाठी आई, पप्पा आणि मावशी यांनी सर्व संमतीने पसंत केली होती आणि माझ्या पसंतीची अपेक्षा - 'तुला आवडेलच! ' (दबाव) होती. आणि सकाळी सात वाजता करण्यामागे उद्देश हा होता की आठ वाजता रेलवेचा तत्काळ कोटा उपलब्ध झाल्यावर त्यामधून मी रिझर्वेशन करू शकेन. हे सगळं इतक्या तडकाफडकी झालं की मला विचार करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळंच मी थोडा सुन्न झालो होतो. म्हणजे विचारांची दिशा खुंटली होती. त्या दिवसापर्यंत मी मुली बघणं (लग्नासाठी) खुप हलकेपणानं घेतलं होतं, अन शेवटी ती वेळ आली होती. माझ्या मनात त्यावेळी थोड्या संमीश्र भावना होत्या. आनंद ही होता आणि या प्रक्रियेमधल्या यांत्रीकपणाबद्दल थोडीशी चीड पण. या चीडखोरपणावर उत्साहानं मात केली. त्याच दिवशी ५ जून चे तिकीट मिळाले, ६ तारखेला दुपारच्या जेवणाला घरी हजर. सकाळी घाई गडबडीमध्ये फोन बंद करावा लागला होता. ऑफिसमध्ये आल्यावर कामातून वेळ काढून ही शुभ वार्ता देण्यासाठी घरी फोन केला. आई होतीच घरी. बोलता बोलता मग आईला विचारलं, जरा सविस्तर सांग म्हणलं मॅच कशी फिक्स केली ते? आईनं सांगायला सुरुवात केली.. शुचिस्मिता घाटगे. ( अशा नावाची मुलगी असू शकते हे तेव्हा पहिल्यांदा कळलं. ) मस्त नाव. प्रभावित होण्यासारखं. हिला शोधायला घरचे नक्की कुठे गेले होते ही शंका तेव्हढ्यात मनाला चाटून गेली. शिक्षण - बी. एस सी. + एम. एस सी. पर्यावरण शास्त्र दुसरे वर्ष चालू. मनाजोगं शिक्षण. दिसायला बरी. म्हणजे आईच्या म्हणण्यानुसार मला शोभेल अशी. हे ऐकल्यानंतर मला माझी पत उंचावलेली आहे की खालावलेली तेच कळेना. आता मुलीचा फोटो स्कॅन करून मागवणं पण प्रशस्त दिसलं नसतं. म्हटलं हरकत नाही. पण पहिल्यांदी घरच्यांचं मत काय आहे ते तर विचारून घेउ. पत्रिका अगदी व्यवस्थीत जुळली होती किंबहुना जोशीकाकांनी ( जोशीकाका म्हणजे आमचे परंपरागत ब्राम्हण - वीस वर्षात सत्यनारायणाच्या पुजेपासून वास्तुशांतीपर्यंत सगळी कार्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडली आहेत. ) सांगीतले की अशा परफेक्ट जुळणाऱ्या पत्रिका त्यांना त्यांच्या करीअर (? ) मध्ये तीन - चार वेळेलाच पाहण्याचा योग (हा त्यांचाच शब्द) आला होता. त्यामुळं खरंतर घरचे जाम इंप्रेस झाले होते. आणि देणं - घेणं यात याचं त्यांच्या लेखी विषेश महत्त्व नव्हतं. मला माहिती आहे ते कधीच अवास्तव मागणी करणार नाहीत पण मुलीच्या वडिलांची किती तयारी आहे हे मात्र नक्की बघतील. माझी काय कल्पना होती की घरचे अगोदर मला सांगतील की बाबा एक स्थळ आहे, अमकी अमकी मुलगी आहे, पत्रिका जुळतीये, अमकं अमकं शिक्षण झालंय आणि मला फोटो स्कॅन करून पाठवतील अन मग मी सांगेन पुढे जायचे की नाही पण इथं नेमकं उलटं झालं होतं. मी थोडा हिरमुसलोच होतो त्यामुळं. पण घरच्यांनीच पसंत केलीये म्हटल्यावर मी तिकडे दुर्लक्ष केलं. आईचं 'मला शोभेल अशी' वाक्य दुहेरी आघात करत होतं. नक्की काय म्हणायचं होतं तिला काय माहीत. मग मी पण माझी अट आई पप्पांसमोर ठेवली की ज्यावेळेस आपण तिला बघायला जाउ तेव्हा तिच्या वडिलांशी पप्पांनी बोलून आम्हाला थोडं एकटं सोडायचं. म्हणजे मागील दोन लेखांमध्ये मी व्यक्त केलेल्या भावना तिच्यापर्यंत पोचवू शकेन जेणेकरून आम्हा दोघांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता येईल. हे घरच्यांनी कबुल केलं. मग खुप धम्माल वगैरे काही उडाली नाही पण स्वतःकडच्या कपड्यांच्या आणि पादत्राणांच्या संग्रहात एकही जोड असा नव्हता जो घालून मी मुलगी बघायला जाउ शकेन हे कळलं अन सगळ्यांनीच असं सांगीतलं. आणि मी ते ऐकलं कारण कपड्यांच्या रंगसंगतीची निवड अथवा भेंडीच्या ढिगाऱ्यातून ताज्या भेंड्यांची निवड अशा काही 'निवड'क गोष्टींमध्ये माझा आत्मविश्वास लाल गवत चरायला जातो. आता मला स्वतःचीच दया यायला लागली. नशीब कधी कुठल्या मुलीला प्रपोज नाही केलं. नाहीतर 'तुला चॉईस वगैरे काही आहे की नाही?' हे तिच्याकडून (अन तिला बघून मित्रांकडूनही..काहिही झालं तरी ते आपले हितचिंतकच असतात ना..) ऐकावं लागलं असतं. असो. तर वस्त्रप्रावरणं या आघाडीवर लढण्यासाठी खरेदीची मोहीम उघडावी लागली. पण या खरेदीमध्ये मी सोडून मित्रांपैकी कोणीच इंटरेस्ट दाखवत नव्हतं. मग लक्षात आलं, कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर घरच्यांसाठी, मित्रांसाठी खरेदी करतानाची माझी चिकित्सक दृष्टी या लोकांनि पुरेपुर ओळखली असणार. 'चला, नुसतं बघून तर येउ' असं म्हणून मित्रांना घराबाहेर काढलं आणि दुकानांमध्ये घेउन गेलो. मी कुठल्याही दुकानात कसल्याही रंगाच्या शर्ट पॅंटची जोडी काढली की 'हीच घाल त्या दिवशी' असं सांगत. मी त्यांचा स्वतःच्या आयुष्यामधले काही मौलीक क्षण वाचवण्याचा डाव ओळखला आणि नुक्कड पिझ्झा प्लेसवर नेउन इंधन चारले मग कुठे त्यांचा परफॉर्मन्स वधारला, म्हणजे ते स्वतःहून काही रंगसंगती सुचवायला लागले. जीन्स - टी शर्ट पासून सुरुवात झाली पण असंस्कृत दिसतं ते झब्बा पायजमा हे अतिसंस्कृत दिसतं यातून झब्बा आणि जीन्स असाही एक पर्याय निघाला पण तो तिथे उपस्थीत नसलेल्या माझ्या आई वडिलांना पसंत पडणार नाही अशा माझ्या अंदाजामुळं खोडला गेला. शेवटी पाश्चिमात्यांचं अंधानुकरण न करता ऑफिसवेअर फ़ॉर्मल्सची निवड करावी असा दुहेरी फायद्याचा ठराव एकमुखानं एकमत झाला अन मी ट्राय करण्यासाठी कमरेचा बेल्ट ढीला केला. 'साधारण किती इंच मापाची पॅंट लागेल जरा मोजून बघता का?' असं त्या कपड्यांच्या दुकानातल्या विक्रेत्याला सांगितल्यावर तेथे उपस्थीत मालक, नोकर चाकर, इतर ग्राहक अन मित्रमंडळी यांच्या डोळ्यात जो भाव दाटला तो बघून 'ऑफिस जॉब! बैठं काम आहे ना, त्यामुळं..हॅहॅ..थोडसं होतं असं..हॅहॅ'. सांगताना माझं पावसात भिजलेलं कुत्र्याचं केविलवाणं पिलू झालं होतं (तेव्हा मला माझं नाव बदलून दीनानाथ.. बोले तो दीन + अनाथ ठेवल्यासारखं वाटलं). माझ्या कपडे खरेदीला जाताना नेहेमीच एक काळी अद्रुष्य मांजर आडवी येते, माशी शिंकते, कुत्रे रडतात. अशुभ संदेश देणाऱ्या एकजात सर्व प्राणीमात्रांना माझ्या कपडे खरेदीची बहुदा चाहुल लागत असावी. म्हणून मी वर्षातून दोनदाच कपडे घेतो. त्याला कारण म्हणजे माझा रंग. तो नक्की कसा आहे हे अजून तरी कुणाला छातीठोक पणे सांगता आलेलं नाही. मला अजून आठवतंय.. लहानपणी दिवाळीला आई पप्पांसोबत माझ्या कपडे खरेदीला जाताना एस. टी. स्टॅंड मग खालचा रस्ता - वरचा रस्ता ते खण आळी पर्यंत सगळी दुकानं पालथी घालुन सॉरी उलथी पालथी करून शेवटी एस. टी. स्टॅंड शेजारच्या पहिल्या दुकानातच पाहिलेला शर्ट चांगला होता असं त्यांचं मत बनतं आणि दोन अडीच तासांच्या पायपीटीनंतर त्या दुकानदाराला ओळखीचं हसुं दाखवत त्याने कपड्यांच्या ढिगाऱ्यातून नेमका तोच शर्ट उपसून दिल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून धाकट्या भावाची कपडे खरेदीही तिथेच करायचो. थोडं विषयांतर झालं. हां, तर कुठं होतो? बरोबर कपड्याच्या दुकानात. माझ्या रंगाचा तिथेही प्रॉब्लेम आलाच. कुठलाच चांगला दिसणार नाही ते कुठलाही चांगला दिसेल अशा मतांचे माझ्या मित्रगणांमध्ये दोन गट पडले. मग मीच वैतागून एक फिकट गुलाबी रंगाचा अन पहिल्या नजरेत कळणार नाही अशा सुरेख नक्षीचा शर्ट आणि काळ्याच्या जवळ जाईल अशा गडद तपकीरी रंगाची पॅंट निवडली अन हीच मला चांगली दिसेल असं मित्रांना निक्षून सांगितल्यावर माना वर खाली - डावीकडं उजवीकडं हलल्या. पण या जोडीची किंमत बघून खिसा अन मी दोघेही चाट पडलो. पादत्राण खरेदीपर्यंत मित्रांच्यात त्राण उरले नव्हते मग कोल्ड्रिंकने सगळ्यांची अन्ननलीका धुवून काढली. पादत्राणांची खरेदी लगेच झाली. गडद तपकीरी व्रिंकल्ड लेदरचे निमुळत्या टोकांचे 'लेस'लेस बुटं घेतले. भरल्या मनाने अन रिकाम्या खिश्याने घरी आलो तेव्हा मित्रांच्या तोंडावरून समाधान ओसंडत होते. दुसऱ्या दिवशीची ट्रेन होती. सामानाची पॅकापॅक करून झाल्यानंतर चार घास हादडून अंथरुणावर पडलो तेव्हा कशी असेल 'ती'? या विचारांत कधी डोळा लागला ते कळलंच नाही. रात्री कधी डोळा लागला ते कळलंच नाही अन जाग मात्र मध्यरात्री सहा वाजता आली. झोपायचा प्रयत्न केला पण यश काही आले नाही. इतर दिवशी मात्र ८: ४० ला ऑफिस असल्यावर सव्वा आठला उठून वेळेच्या आत ऑफिस गाठलंय. (कसं ते विचारू नका! ) शेवटी उठलोच. पटपट आवरावं, आदल्यादिविशी बांधून ठेवलेलं सामान उचलावं, ऑफिसला जावं, बॉसला 'अति-महत्वाचं घरगुती काम' कारण सांगून लवकर सटकावं असं ठरवलं अन तसं केलं. ऑफिसच्या गेट पर्यंत सोडायला दोन मित्र आले. त्यातल्या एकानं निघण्यापुर्वी हातमिळवणी करताना का कुणास ठाउक पण माझा हात दाबला. आमची नजरानजर झाली तेव्हा कायमची ताटातूट होत असलेल्या दोन भावांच्या चेहऱ्यावर असतील असे भाव नकळत आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर उमटले. खरंतर तो विवाहित होता. त्याला कुणालाही काहिही सांगू नको असं बजावून ठेवलं होतं. निःशब्दपणे आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि मी रेलवे स्टेशनच्या मार्गाला लागलो. रेलवे गाडी ज्या फलाटावर थांबते तेथे येउन पोचलो. अजून पाउण तास बाकी होता. मला रेलवे स्टेशनवर किंवा विमानतळावर, बस थांब्यांवर कधीच बोअर होत नाही. तिथे आलेल्या प्रवाशांच्या, त्यांना सोडायला आलेल्या नातेवाइकांच्या, दंगा करणाऱ्या लहान मुलांच्या थोडक्यात माणसांच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात ना! गरमागरम चहाचा कप हातात घेउन एखादे मासिक चाळत लोकांना बघण्यातच माझा सगळा वेळ निघून जातो. तसा मला छंदच आहे म्हणा ना. हेच उद्योग मी त्या दिवशीपण ज्या ठिकाणी माझा डबा फलाटावर लागेल त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून करत होतो. तेवढ्यात एक नुतन विवाहित जोडपं माझ्या अंगावरून खिदळत पुढे निघून गेलं. 'ती' थोडी नाजुक पण अभ्यंकर नटलेली. तिच्या मानानं 'तो' बऱ्यापैकी थोराड वाटत होता. त्यानं केलेल्या कुठल्याशा चुकार - टुकार विनोदाला तिनं ओढून ताणून चेहऱ्यावर उसनं आणलेलं हसू सहज लक्षात येत होतं. मी मुद्दामच वाकून बघत होतो कुठं जातात ते. ते दोघं फलाटाच्या शेवटच्या टोकाला जाउन आले तरी त्यांना बसायला जागा मिळाली नव्हती. मग भाउनं तिकिट काढून बघितलं, डब्ब्याच्या क्रमांक बघितला अन माझ्या बाकड्या समोरच्या मोकळ्या जागेत सामान सुमान (तुमच्या मनात सामान सुमान म्हटल्यावर जे चित्र उभं राहिलं असेल त्याला ३००% एनलार्ज करा तितकं सामान त्या दोघांकडे होतं. आणि ते सगळं तो एकटा बाळगून होता. ) ठेउन तिच्या शेजारी उभा राहिला. ती उभी असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची बैचेनी वाढतच चाललेली होती. त्याला काहीकेल्या तिच्यासाठी बसायला जागा हुडकायची होती. तो इकडे तिकडे बघत असताना माझ्या मनात शंकेची पाल किंचाळत होती 'हा तुझ्याकडेच येणार! ' अन खरंच तो माझ्याकडं आला. 'भैय्या, जरा ऍडजस्ट करो' असं म्हणत स्वतःच तिथे टेकला. परत उठला अन तिला तिथं ती नको नको म्हणत असताना बसवलं. बघितलं तर गाडी लागायला फक्त पंधरा मिनिटं उरली होती, बायकोच ती अन कौतुक ते कौतुकच ना. मग त्यानं तिच्यासाठी वेफर्स, खारे शेंगदाणे, कोल्ड्रिंकची बाटली आणली. पंधरा मिनिटात हे सगळं त्यानं एकट्यानं संपवलं. तिला फक्त एकदा विचारलं असेल ती नाही म्हटली अन हा गटकावून मोकळा. तेवढ्यात गाडी लागली. माझं एकच ओझं असल्याने मी पटकन चढलो. माझी साईड अप्पर बर्थ होती. लगेच सामान खाली सरकवलं आणि वर जाउन बाकी सहप्रवाश्यांची वाट बघत बसलो. अन पाहतो तर काय ही जोडगोळी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये! एक मिडल अन एक लोअर बर्थ त्यांची. म्हटलं व्वा!! पुढचे सोळा तास चांगलंच मनोरंजन होणार तर. तेवढ्यात आणखी एक नवविवाहित जोडपं आमच्याच कंपार्टमेंटमध्ये चढलं (त्यांचं पण सामान पहिल्या दोघांइतकच होतं). त्यांची दुसरी मिडल अन एक लोअर बर्थ होती. अन उरलेल्या वरच्या दोन बर्थ वर असेच कोणीतरी दोघे चढले. माझ्या खालची बर्थ रिकामीच होती. प्रवास सुरू झाला. त्यानंतर रात्र होईपर्यंत पहिल्या जोडप्यातला 'तो' पुर्णवेळ झोपून होता अन 'ती' त्याचे पाय मांडीवर घेउन बसली होती. मला थोडं विचित्रच वाटलं त्यांचं हे वागणं. या उलट दुसऱ्या जोडप्यातली 'ती' बराच वेळ झोपून होती अन तो तिच्या सगळ्या आज्ञा पाळत होता. अक्षरशः तो तिला पिशवीतून कंगवा काढून देण्यापासून पाणी आणून देण्यापर्यंत सगळी कामं करत होता. खरंच दोन टोकांच्या दोन भुमिका पार पाडणारे नवरे मी बघितले. त्यांची मौजमजा बघत सकाळी रेलवे माझ्या हव्या असलेल्या ठिकाणी पोचली. गाडितून उतरलो अन घरला जाणारी बस पकडली. मागेच सांगितल्याप्रमाणे ६ तारखेला दुपारच्या जेवणाला घरी हजर झालो. "काय अवतार केलायस तू हा?? " माझ्या वाढलेल्या केसांकडं, दाढीकडं अन काळवंडलेल्या चेहऱ्याकडं बघून आई जवळ जवळ ओरडलीच. "उद्या सकाळी जायचंय त्यांच्याकडे आपल्याला, जा पहिला अवतार सरळ करून ये! " आईला म्हटलं 'अगं जरा थांब, पाणी तरी पिउ दे! ' तेवढ्यात आमचे बंधुराज 'फोटो' नाचवत बाहेर आले. त्याच्या हातातून फोटो हिसकावुनच घेणार होतो पण ते गुढग्याला बाशिंग बांधल्यासारखं दिसलं असतं. मी जवळ जवळ दुर्लक्षच केलं. मग आईनंच त्याच्या हातातून फोटो घेउन 'ढॅं टॅ डॅ न' असा बाँडगीतातल्या संगीताचा तुकड्याचं पार्श्वसंगित म्हणत माझ्यासमोर धरला. "ही!! " "माझ्यासाठी!!! " असं म्हणत मी सोफ्यावर कोसळलो. माझ्या आवाजातला नकाराचा स्वर आईला चांगलाच ओळखू आला होता. अन माझ्या हातातून फोटो काढून घेतानाच्या पद्धतीवरून आईचा हिरमोड झालाय हेही मी ताडलं. पप्पा अजून ऑफिसमधून आले नव्हते. आणि माझ्या नापसंतीची गोष्ट आईला पप्पांपर्यंत लगेच पोहोचू द्यायची नव्हती. मी हात पाय धुवून माझ्यासाठी तयार केलेली बासुंदी व्हरपली. बासुंदीचा वघळ पार ढोपरापत्तुर गेला व्हता. पोट भरल्यानंतर मी मन मोकळं करायला सुरुवात केली. खुप मोठी गोष्ट नव्हती पण फोटो बघून ती मुलगी मनात 'क्लिक' नाही झाली. तिच्याकडं बघून कुठल्याच ऍंगलनं ती डॅशिंग, स्पिरिटेड, लाईवली वाटत नव्हती. फोटो बघुनच तो काढताना आलेलं तिचं अवघडलेपण जाणवत होतं. ती घरापासून दोन हजार किलोमीटर दुर यायला तयार होइल का? मारून मुटकून तयार झालीच तर एकदम नव्या वातावरणात आत्मविश्वासानं वावरू शकेल का? की बावरल्यासारखी करेल? नाहीतर तिची सगळीच जबाबदारी मलाच पेलावी लागायची अन मागे तुमच्यासोबत शेअर केलेल्या माझ्या स्वातंत्र्या - बितंत्र्याच्या भावना सुरळीचे रुप घ्यायच्या. मनात आलेले विचार, प्रश्न मी सगळं आईला सांगितलं. या बाबतित घरच्यांचं तिच्याशी डायरेक्ट बोलणं झालं नव्हतं. पण तिची आत्या आमच्या शेजारी राहते तिला पुर्वी सांगितल्यानंतर तिनं 'येइल की! त्याला काय झालंय' असं म्हणून प्रश्नाला कदाचीत बगल दिली असावी. जेवण करून आईशी बोलून झाल्यावर हा विषय पप्पांजवळ बोलून दाखवण्यापुर्वी आईनं मला माझी डागडुजी करायला बाहेर पिटाळलं. मी तडक बाईक काढली अन स्वतःची डागडुजी करून घेण्यासाठी सदाकाकांकडं आलो. दुकानात कोणी गिऱ्हाईक नव्हतं. काकांना सांगितलं 'हाफ सोल्जर कट आणि दाढी खंप्लेट कल्ले नको अन मिशी थोडी कोरा'. काकांनी कलाकुसरीला सुरवात केली. कंगवा कात्री डोक्यावरून फिरेल तसे मनात विचार घुमू लागले. तशी ती दिसायला मंद होती अशातला भाग नव्हता पण ती खुप स्मार्ट होती असं ही नव्हतं. शोभून तर दिसली असती पण 'सो सो' कॅटेगरी. मी आत्ता पर्यंत सांगितलेल्या गोष्टी एका बाजुला अन 'ती' खरोखरच लग्नाला तयार आहे का हे जाणून घेणं पण तितकंच म्हत्वाचं होतं. म्हणजे तिचे आई वडील तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देतायत का? तिचं बाहेर अगोदर काही अफेअर होतं का? ती माझ्याप्रती शंभर टक्के एकनिष्ठ आहे ना? हे पण मी तिला विचारणार होतो. मला तिच्या मनाची तयारी जाणून घ्यायची होती. हे सगळं मी तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावरच कळणार होतं. त्यामुळं तुर्तास विचार करायला नको असं म्हणून शांत झालेलं डोकं सदाकाकांच्या ताब्यात दिलं. त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. चेहऱ्यासमोर अन डोक्यामागे धरलेल्या आरशात बघून मी त्याची खात्री करून घेतली. घरी आलो. थोड्यावेळाने पप्पापण आले. त्यांना ही गोष्ट मी आपणहून सांगितली. उद्या जोपर्यंत त्यांच्याकडे जात नाही तोपर्यंत मला उत्तराची वाट बघत थांबवं लागेल असं दिसलं. म्हटलं छोडो यार.. अन संध्याकाळी मित्रांसोबत भटकायला बाहेर पडलो. पण त्यातल्या कुणाला मी कानोकान ही खबर लागू दिली नव्हती. रात्री जेवताना हा विषय निघालाच. त्यातून तिच्याबद्दल थोडी माहिती कळली. ती तिच्या आई वडीलांची लग्नानंतर चौदा वर्षांनी झालेली कुटुंबात सगळ्यात लाडकी वैष्णोदेवीला केलेल्या नवसाची पोर होती. बी. एस. सी. मध्ये कॉलेज टॉपर अन एम. एस. सी. प्रथम वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेली मुलगी कोल्हापुरात शिकायला होती अन पर्यावरणशास्त्र विषय असल्याने रंकाळा बचाओ नावाच्या एन. जी. ओ. ची कार्यकर्ती होती. आंदोलन, साफ सफाई मोहिमेत हिरिरीने भाग घ्यायची. हे ऐकल्यानंतर डोक्याला जे शॉट लागले अन माझ्या या अगोदरच्या लावलेल्या अंदाजांचा साफ चुराडा झाला. मला माझ्या विचारसरणीतला संकुचितपणा अन आततायी निर्णय घेण्याचा, अंदाज लावण्याच्या उथळ स्वभावाचा तिरस्कार वाटू लागला. तिच्याबद्दल माझ्यामनात आदर वाढला. भले लग्न नाही झालं तरी चालेल पण एक स्वभावाला पैलू पडलेलं व्यक्तिमत्व म्हणून मला तिच्याकडून बरंच काही घेता आलं असतं. या विचारात जेवणं उरकली. सकाळी साडे दहा वाजता घरून निघायचं ठरलं. आमच्या इमारतीत दुकान असणारे पप्पांचे एक चांगले मित्र त्यांची कार घेउन ते स्वतः येणार होते. झोपण्यापुर्वी मी माझी खरेदी पाहून सर्वांना संतोष जाहला. मध्यरात्री सहालाच डोळे खाडकन उघडले. अंथरुणात उठून बसलो. सुरवातीला घरच्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना. पण आजचा स्पेशल दिवस असल्याने त्यांनी समजून घेतले. सात वाजेपर्यंत मी तयार! आता काय करायचं? वेळ म्हणून जात नव्हता. थोडी मनात चलबिचल होती. अस्वस्थता वाढत चालली होती. पण मी शक्यतो चेहऱ्यावरची कातडी विस्कटू देत नव्हतो. तेवढ्यात पेपर आला. तो आठ वाजेपर्यंत आठवेळा वाचून झाला. पण माझी अवस्था बघून आईनं तिचा चहाचा कप पुढं केला अन तो मी पिला. असं चार वेळा झालं. पाचव्या वेळेला आईनं तिचा चहा बशीत ओतून घेतला अन अर्धा कप माझ्यासमोर धरला. तो पण मी पिला. लाईट गेले होते. पप्पांची देवपूजा चालली होती. बंधुराज अंथरुणात काल रात्री जे गायब झाले होते ते अजून आतमध्येच. आई स्वयंपाकघरात. मी बाहेरच्या खोलीत. मेंदुच्या विचार करण्याच्या भागाची एंट्री आणि एक्झीट बंद झाली होती. डोळे समोरच्या भिंतीवर खिळावलेले. पाय गुंफलेले तसेच. हात गुडघ्यावर. सर्व निश्चल. नाही नाही!! पडदे हालत होते. पहाटे दहा वाजता कारवाले जाधवकाका येते झाले. "अरे उठ! बसलायस काय.. निघायचंय ना? नवरी नकोय वाटतं एका नवऱ्याला? " मी मनात म्हटलं 'नकोचय'. कसाबसा उठलो. जड हातांनी आवरलं. अकरा वाजत आले होते. सगळेजण तयार झाले. ठिकाण - धवनगड. घरापासून साधारण ३५ किलोमीटर दूर एक तालुका. तिथं त्यांच घर आहे पण आई - वडील नोकरीच्या ठिकाणी - पनवेलला. आणि ही कोल्हापुरात शिकायला. गाडीत बसलो. 'धड - धड धड - धडधड - धड' गाडीत बिघाड झाला होता काय? मी जरा लक्ष देउन ऐकलं. अरे!! ही तर माझ्याच हृदयाची धड - धड होती. कानशिलं गरम झाल्यासारखी वाटत होती. हात पाय थंडगार पडले होते. पोटात गोळा आला होता. मी खरंच घाबरलो होतो. मी तिच्या मनाची तयारी तपासायचं म्हणत होतो पण इथे माझंच मन अंड्याच्या टरफलासारखं चुरा होउन पडलं होतं. समजा ती मला पसंत पडली असती, सगळं मनाप्रमाणे जुळलं असतं, मी तिला हो म्हटलं असतं. पण... पण पुढे काय? तिला आपली माणसं, मित्र - मैत्रिणी, भविष्यातले प्लॅन्स, सगळं उलथं पालथं झालं असतं. नव्या जागेत, सर्वस्वी नव्या वातावरणात रुळणं भाग पडलं असतं. तिनं कधी ना कधी मला दोष दिलाच असता. एव्हाना आमची गाडी धवनगडमध्ये पोचली होती. मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळून आत थोड्या अंतरावर रस्त्यालाच अगदी लागून असलेल्या एका बैठ्या घरासमोर थांबली. बाहेरून विशेष आकर्षक नसलं तरी त्याच्या बांधकामात बराच पैसा लागल्याचं लक्षात येत होतं. म्हणजे घर बऱ्यापैकी सधन होतं तर. घराच्या मागेच धवनगडाचा पायथा सुरू होत होता. घरातौन बाहेर पडण्यासाठीच्या पायऱ्या थेट रस्त्याच्या कडेलाच उतरत होत्या. खालच्या पायरीवर बूट काढले. घरात शिरल्या शिरल्या नाकाला जाणवला तो टिपिकल खेडेगावतल्या घरात असतो तो शेण, गोधडी, पोतं, गुरं यांचा एकत्रीत वास. व्वाह!! बैठकीच्या खोलीत बसलो. पहिल्याप्रथम भिंतिंना टांगलेली चित्रं, कॅलेंडर, रंग उडालेल्या जागा, डोक्यचं तेल लागलेल्या जागा बघून घेतल्या. त्यावरून खोलीची आसनव्यवस्था बदलल्याचं लक्षात आलं. बैठकीच्या खोलीला लागून एक झोपायची खोली नंतर स्वयंपाकघर. बैठकीच्या खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जीना. त्यावर गच्ची. पाणी आलं. ते पीत खोलीत उपस्थीत मनुष्यप्राण्यांवर नजर फिरवली. साताठ जण तरी असतील. सगळेजण माझ्याकडेच बघत होते. दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरवाज्यातून स्त्रीवर्ग डोकावत होता. अन सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचं अनोळखी हसू. अशक्य प्लास्टीक. ते बघून मला हसायलाच आलं. प्रत्येकाला वाटलं याने आपल्यालाच प्रतिसाद दिला. म्हणून परत हसू. आता ओळख परेड चालू झाली. जो मला जसा नमस्कार करत होता त्याला मी तसंच उत्तर देत होतो. म्हणजे कोणी हात जोडले तर मी पण हात जोडायचो, कुणी मानेनं केला तर मी पण मानेनं. मग फॉर्मल गप्पा चालू झाल्या. सगळं माहित असुनही परत पत्रिकेची उजळणी. बायो डेटा मध्ये लिहिलेल्या माहितीवर आधारीत प्रश्न विचारले गेले. त्यात गाळलेल्या जागा, ऑड मॅन आउट, संदर्भासहित स्पष्टीकरण वगैरे प्रश्न होते. नशीब सिलॅबस बाहेरचं काही विचारलं नाही. आता मध्यंतर झालं. त्यात सरबत आलं. आई स्त्रीवर्गात सामील झाली पप्पा कर्त्या पुरुषांसोबत तंबाखू मळते झाले. आता त्या खोलीत सगळ्यात दुर्लक्षिला गेलेलो असा मीच शिल्लक होतो. बंधुराजांसोबत 'दोन ठेउन देईन' या भरतवाक्यासोबत संभाषण संपवणारा मी चक्क त्याच्याशी मार्केटमध्ये नवीन आलेल्या 'हाय का भुसा' बाईकचे सस्पेन्शन कसे चांगले आहे, व्हील बेस मोठा असण्याचे फायदे या विषयात मला असलेलं गम्य दाखवू लागलो. मंडळींच्या कौतुकमिश्रीत नजरा माझ्याकडे खेचून घेण्यात मी थोडा यशस्वी झालो. तंबाखुचा एक बार झाल्यावर "आता येउद्या मुलीला बाहेर" असं पप्पांनी म्हटल्यावर माझी मघाचची धडधड 'धड्याक धुडुम ठो ठॅक थुड थुड' व्हायला लागली. फुफुसांचा आतल्याआत भाता झाला. ती अवतरली. फोटोतली ती हिच का हा मला पडलेला पहिला प्रश्न. बैंगनी रंगाची सोनेरी काठाची साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. तिला माझ्यासमोरच्या खुर्चीत बसवण्यात आलं. तोवर आई माझ्या बाजुला येउन बसली होती. "हं, विचारा एकमेकांना काय विचारायचं असलं तर" कुठुनतरी आवाज आला. मी क्षणाचीही उसंत न घेता माझं कामाचं स्वरुप, ठिकाण ईत्यादी बद्दल माहिती आहे का? असं विचारलं. ती हो म्हणाली. पण हे सगळं म्हणताना तिची नजर थेट माझ्या नजरेला भिडली होती. मग तिनं मला माझं शिक्षण, खाण्याच्या आवडी निवडी बद्दल विचारलं. तिच्या बोलण्यात एक मोकळेपणा होता. कसलंही दडपण नव्हतं. या उलट माझ्याच घश्याला कोरड पडली होती. आता कोणच कोणाशी बोलेना. मी पप्पांना नजरेनं खुणावलं. त्यांनी पण लगेच समजून "आता या दोघांना जरा एकटं सोडुयात ना.. म्हणजे त्यांना आणखी खोलवर विचारता येइल. " तिच्या वडिलांनी लगेच होकार भरून "हो हो! तुम्ही दोघं वरती गच्चीत जा गप्पा मारायला" म्हणाले. ती पुढे चालली होती मी तिच्यामागून जीना चढत होतो. तिनं विशेष मेकअपकेला नव्हता. मोजकेच पण उठावदार सोन्याचे दागिने. बांगड्या. पायात पैंजण. मध्यम बांधा. केस कमरेपासून थोडे वरती. मानेजवळ केसांना क्लिप लावलेली. बाकी मोकळे. तोवर गच्चीत आलो. दारातून बाहेर पडल्या पडल्या समोर धवनगडाचा माथा अन त्यावर फडकणारा भगवा झेंडा डोळ्यात भरत होता. पावसाच्या सरी येउन गेल्या असाव्यात. हवेत मंद गारवा. मी तिला माझ्या मनातलं सगळं एका दमात सांगून टाकलं. अन सोबत हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध तर होत नाहिये ना? असं विचारयला पण विसरलो नाही. तिनं मग सानून टाकलं, हॉस्टेलवरचं लाईफ, मित्र - मैत्रीणी, पुढं शिकून एम. टेक. करायची इच्छा. एन. जी. ओ. मध्ये काम. खुप स्पष्ट, कुठल्याही दडपणाशिवाय ती माझ्याशी बोलत होती. ती मला पसंत होती!! मी तिला हेही सांगून टाकलं. ती ही नुसतं मानेनंच हो म्हणाली. मी आणखी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात आमचे बंधुराज वरती आले अन त्याच्या पाठोपाठ आई, पप्पा, तिचे आई वडिल आले. मागून चहा आला. चहा पीत वरच्या मोकळ्या हवेत गप्पा मारल्या. खाली गेलो तेव्हा कांद्या - पोह्यांचा वास त्या शेण वगैरेच्या वासावर ताण करू पाहत होता. नेमका त्या दिवशी माझा उपवास होता. माझ्याच कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमात मलाच ते खायला मिळाले नाहीत. माझ्यासाठी लगेच दुकानातून बटाटा आणि साबुदाणा चिवडा आणला गेला. पोटभर खाउन वर एक कप चहा पिउन तिच्या घरून निघालो. पण निघण्यापुर्वी मी तिचा स्वतःचा मोबाईल नंबर घ्यायला मात्र विसरलो नव्हतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद होता. मी माझी पसंती गाडीतच जाहीर केली अन पप्पांनी लगेच ९ तारखेला सत्यनारायण घालायची घोषणा केली. त्या दिवशी रात्री आलेल्या झोपेला शब्दशः 'सुखाची झोप' म्हणावं लागेल. ८ तारखेला सत्यनारायणाच्या पुजेची तयारी केली. ९ तारखेच्या सकाळी जोशीकाका आले अन 'चांगलं काम करताय' अशी पोचपावती पण दिली. घाटगेंना निरोप गेला. 'तिघेही या'. संध्याकाळी साडेचार वाजता त्यांचा फोन आला. पाच वाजता ते नवरा बायको दोघंच - तिचे आई वडील ते आले. शुची कुठाय विचारलं तर म्हणाले तिला कॉलेजवर महत्वाचं प्रेझेंटेशन असल्यामुळं ती कोल्हापुरला निघून गेली होती. माझ्या मनाचा हिरमोड झाला होता पण माझ्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असल्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. हळू हळू प्रसादासाठी मंडळी, शेजारी पाजारी, माझे मित्र मैत्रिणी, पप्पांच्या ऑफिसमधले जमू लागले. सगळ्यांची माझ्या भावी सासू सासऱ्यांची ओळख करून देण्यात आली. समारंभ संपल्यानंतर तिचे आई वडील नघून गेले अन रात्री जेवण करून गाढ झोपी गेलो. दुसऱ्यादिवशी सामानाची बांधाबांध करायची होती. ११ ला परत जाणाऱ्या ट्रेनचे बूकिंग केले होते. ११ला सकाळी बस पकडली दुपारी रेलवे स्टेशनवर पोचलो. यावेळी माझे लक्ष कुणाकडेच नव्हते. गाडी फलाटाला लागली मी जादू झाल्यासारखा आत चढलो. घरातून निघाल्यापासून २४ तासानी ट्रेन थांबली तेव्हा तरंगत स्टेशनच्या बाहेर आलो. तडक रिक्षा पकडून रूम वर आलो. गेल्या २४ तास झालेल्या प्रवासाचा शीण कोठेच दिसत नव्हता. रूम मेट ऑफिसला निघून गेले होते. घड्याळात बघितलं तर १२ तारखेचे सकाळचे साडे नऊ वाजले होते. पंधरा मिनिटात फ्रेश होउन पळत ऑफिस गाठले. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर बॉसनं पण हाफ डे लावला नसता. रिसेप्शनला लावलेल्या बोटांचे ठसे स्कॅन करून हजेरी नोंदवणाऱ्या यंत्रावर माझी हजेरी लावली अन मोट्ठा श्वास घेउन पायऱ्या चढायला लागलो. ऑफिसच्या दारासमोर पोचतो न पोचतो तोच मोबाईलची घंटी वाजली. बघतो तर घरचा फोन. अरे हो.. आपण व्यवस्थीत पोचलो हे सांगितलच नाही, पटकन आईला सॉरी म्हणू असं म्हणत फोन उचलला. "तुझं शुचिस्मिता बरोबर ठरलेलं लग्न मोडलंय. आत्ताच कुणाला काही सांगू नको. " मामा फोनवर बोलत होता. पुढंच मी ऐकलं नाही. फोन माझ्या हातातून गळून पडला होता. समाप्त..
याद्या
25824
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
खू...........................
अप्रतिम उतरलेला लेख असे म्हणत
अप्रतिम उतरलेला लेख असे वाचत
अनपेक्षित शेवटाबद्दल म्हणायचे
In reply to अप्रतिम उतरलेला लेख असे वाचत by ह भ प
हो शेवट अनपेक्षित आहे, रसभन्ग
असहमत
In reply to हो शेवट अनपेक्षित आहे, रसभन्ग by मंदार कात्रे
-१
In reply to हो शेवट अनपेक्षित आहे, रसभन्ग by मंदार कात्रे
अनुभव म्हणून ठीक आहे
+१००, कथेशी, नायकाशी, कुणाशीच
In reply to अनुभव म्हणून ठीक आहे by आदिजोशी
अरेरे! कसेसेच झाले वाचून.
आभार मिपाकरहो..
छान लिहिल आहे हभप.
अावडेश
तिसरा ज्याला तेव्हा कर्तव्य
असंस्क्रुत वाटत आहे का?
In reply to तिसरा ज्याला तेव्हा कर्तव्य by श्री गावसेना प्रमुख
नाही हो खटकत नाहीये,फक्त त्या
In reply to असंस्क्रुत वाटत आहे का? by ह भ प
मोडलेल्या लग्नाच्या कहाणीत
पहिल्याच प्रयत्नात छान
पहिलाच प्रयत्न असेल तर खरच
कथा आवडली,
लिहिलं छान आहेच. फक्त शेवटचा
अॅकचुअली तुम्ही कपडे
शुचिस्मिता तर इतकी धीट,
In reply to अॅकचुअली तुम्ही कपडे by स्पंदना
क्युं भाय? उसकोभी कुछ चॉइस
In reply to शुचिस्मिता तर इतकी धीट, by बॅटमॅन
नै नै चॉइस राहुंदे की, मला
In reply to क्युं भाय? उसकोभी कुछ चॉइस by स्पंदना
हां! हां!हां!
In reply to नै नै चॉइस राहुंदे की, मला by बॅटमॅन
घंटा. मला काय करायचंय जळून???
In reply to हां! हां!हां! by स्पंदना
चॉइस असण्याला विरोध नैच्चे
In reply to हां! हां!हां! by स्पंदना
मस्त जमलिये...
शेवटी अॅरेन्ज्ड म्यारेज हे
छान प्रयत्न
येस्स! ये एक पाँइंट है। आपण
In reply to छान प्रयत्न by कपिलमुनी
+१
In reply to येस्स! ये एक पाँइंट है। आपण by स्पंदना
हो हो..
In reply to +१ by पाटव
पहिला प्रयत्न छान
अभी अभी तो दोष कळ रहे हय..
In reply to पहिला प्रयत्न छान by पैसा
अभि अभि तो दोष कळ रहे हय
In reply to अभी अभी तो दोष कळ रहे हय.. by ह भ प
दोष कळून आल्यावर या कळकळीच्या
In reply to अभि अभि तो दोष कळ रहे हय by जेनी...
कळ नाय रे ' कळं ' असं लिव .
In reply to दोष कळून आल्यावर या कळकळीच्या by बॅटमॅन
इतका यमक हरामीपणा कसा कर्णार
In reply to कळ नाय रे ' कळं ' असं लिव . by जेनी...
यमक हराम कहिका
In reply to इतका यमक हरामीपणा कसा कर्णार by बॅटमॅन
माझ्या मते तरी लेख जमला आहे.
हभप
अजुन एक..
In reply to हभप by तिमा
किस्सा मस्त आहे. लेखन थोडे
क्रमशः राहिले का?
चांगले लिहू शकताय.. मध्ये
निरिक्षणः
In reply to चांगले लिहू शकताय.. मध्ये by कवितानागेश
लेख आवडला पण...
लिखाणाचा प्रयत्न छान जमलाय्
शेवट हज़म नाही झाला. असो, होऊ
हुश! दमलो बुवा वाचून. ही खरी
हम्म....