Skip to main content

बटाटा-सफरचंद खिर

लेखक जागु यांनी मंगळवार, 30/10/2012 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अर्धा वाटी तांदूळ अर्धे सफरचंद १ छोटा बटाटा १ मोठी वाटी दुध पाउण वाटी साखर थोडे केसर काजु, बदाम २ चमचे साजूक तुप १ छोटा पेला पाणी कृती: १) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा. २) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या. ३) काजू व बदामाचे काप करुन घ्या. ४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन लगेच वाटलेले तांदूळ परता. ५) त्यात १ पेला पाणी घाला व किसलेला बटाटा टाकुन तांदुळ व बटाटा शिजू द्या. ७-८ मिनिटांत शिजतात. ६) आता त्यात साखर, ड्रायफ्रुट्स घालुन उकळी आणा. ७) नंतर सफरचंदाचा किस घालुन चांगली उकळी येउ द्या. ८) मग सगळ्यात शेवटी दूध टाकुन उकळी आणा आणि त्यावर केसर घाला. झाली झटपट सफरचंद, बटाटा खिर तय्यार. अधिक टिपा: तुम्हाला आवडतील ते इतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता. स्वादासाठी वेलची-जायफळ घालू शकता. कधी कधी सफरचंद आंबट असतो म्हणून दुध घालायच्या आधी सफरचंदाचा किस घालून उकळी येउ द्यायची मग दुध घालायचे.

वाचने 7302
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

कल्पना वेगळी आहे. प्रयोगशील आहे. तरी एक विचार आला. सफरचंदापर्यंत ओके, पण बटाटा वापरला तर पिठूळ नाही होणार? करुन पाहण्याआधीच शंकानिरसन केलेलं बरं. (... पिठूळ चव आवडणारेही बरेच असू शकतील म्हणा..!!) बटाट्याचा गोड पदार्थ त्यामुळेच सहसा करत नाहीत का? रताळं थोडं गोड असूनही त्याच्यापासून केलेला गोड पदार्थ पिठूळपणामुळी खास लागत नाही, त्यापेक्षा तिखटमिठाचा खीस चांगला लागतो.

In reply to by गवि

सफरचंद ठीकै, बटाटा गोडात बरा लागेल का याबाबतीत जरा साशंकच आहे. एकदा चवीपुरती करुन बघायला हरकत नाही.

In reply to by गवि

तर मग गवी मी सांगते ही पाकृ फक्त माझ्या आग्रहाखातर करुन पहा. एक बटाटा, पाण्यात किसा (काळा पडु नये म्हणुन). जेव्हढा बटाट्याचा किस तेव्हढी साखर. दोन चमचे तूप. तूपावर किस टाकुन त्यात साखर मिसळा अन सुंदर चिकु रंगाचा होइतो एकसारखे मंद आचेवर हलवत रहा. टेस्ट इट अन देन टेल. बाहेरच्या व्यक्तीला न सांगता द्या. बिलिव्ह मी नोबडी विल गेस दॅट इट्स मेड ऑफ बटाटा.

गवि, सूड खिर जास्त शिजावी लागत नाही त्यामुळे पिठूळ नाही होत. आणि जर बटाटा तुम्हाला नसेलच आवडत तर नाही टाकला तरी चालेल. गणपा, प्रभाकर, मी आहे ना, अतृप्त आत्मा, इरसाल धन्यवाद.

पाककृती आवडली. सादरीकरण अप्रतिम आहे. एक प्रश्न - पहिल्या चित्रातील दूधाच्या वाटीच्या डाव्या बाजूला जे आहे ते काय आहे? माझा अंदाज - केसर.

ह्या खिरीत जर साध्या तांदुळाऐवजी वरीचे तांदुळ मिक्सरला रवा करुन भाजून घातले तर उपास करणारे सुध्दा ताव मारतील.

बटाट्याचा शीरा बर्याच वेळा केला आहे पण खीर मात्र कधीही नाही !!सफरचंद आणि बटाटा नविन काँबिनेशन मिळाले ,नक्कीच रुचकर असणार खीर :) http://mejwani.in/