Skip to main content

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

Published on मंगळवार, 23/10/2012
ऐलोमा पैलोमा गणेश देवा. परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?" "माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात." "हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?" "जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये! गाणी पण सारी खाण्याच्या पदार्थांचीच?) "पण तुला तर गुमामाम (गुलाबजाम) आणि सिंघम आवडतात ना? मग तुला आईने गाणे जिलबीचे आणि शिवाजीचे का शिकवले?" "तिला तेच येत मणून" नातवाच्या तोंडी ही गाणी ऐकून आजीपण खुश. या संवादाने माझ्या आठवणी ताज्या झाल्या. पितृ पंधरवडा संपत येतो तसे नवरात्राचे वेध लागतात. कसे ते ९/१० दिवस संपतात काही कळत नाही. तसे ते लहानपणी पण लागत. तेंव्हा कारण मात्र वेगळे असे. कारण नवरात्रीचे अप्रूप बाकी इतर कारणांसाठी नव्हे तर त्यातल्या "भोंडल्या" साठी असे. तेंव्हा "गरबा" नामक प्रकार बोकाळला नव्हता इतका. अगदीच तुरळक शक्यतो गुजराथी लोकानी आयोजित केलेला एखादा पारंपारिक गरबा असे. त्याचे फार कौतुक काही वाटत नसे. पण भोंडला महत्वाचा. भल्या मोठ्या अंगणात रोज एक किंवा दोघींचा भोंडला. सगळ्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी जमा होत असत. आमंत्रणाची तशी गरज नसे. आणि आताच्या आयांसारख्या तेंव्हाच्या आयाही नव्हत्या. म्हणजे तेंव्हा शिस्त नव्हती का तर कदाचित आतापेक्षा थोडी जास्तच होती, आई-बाप मुलांचे फाजील लाड अजिबात करत नसत. आमच्याकडे तर म्हंटलेच जायचे "खायचे प्यायचे लाड, नसते लाड नाहीत". सहामाही परीक्षा तेंव्हाही असतंच पण त्या कधी या भोंडल्याच्या आड आल्या नाहीत. तेंव्हा या भोंडल्याला जायला आम्हाला पूर्ण परवानगी असे, अर्थात सातच्या आत घरात हा नियम पाळूनच. भोंडल्याच्या आधीपासून आईच्या मागे "सांग ना आपल्याकडे तू काय बनवणार?" ही भूणभूण सुरु असे. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर मग भोंडला असे. पाटावर हत्ती रेखाटण्यासाठी कोणालातरी पकडावे लागे.(इतकी ग्रेट चित्रकला होती माझी :) ) मग हत्ती काढून झाला की खाली टीपके काढायचे, जितके टीपके तितकी गाणी म्हणायची. जिचा भोंडला आहे, तिने पटावरच्या हत्तीची पूजा करायची मग त्या हत्ती भोवती फेर धरला की भोंडल्याची अशी खास गाणी गात तो सुरु. ऐलोमा पैलोमा ने सुरुवात होवून मग शिवाजीचे,कारल्याचे, कोथिम्बीरीचे, जिलेबीचे, एक लिंबू झेलू बाई अशी गाणी सुरूच राहत. तशी सगळ्या मुली आणि त्यांच्या आयांना ही सारी गाणी येतंच असत. कोणी कोणाला शिकवलेली नसत, जशा लहानपणी गणपतीत कशा ना सगळ्या आरत्या कोणी न शिकवताच पाठ होत तशी. जवळपास तासभर हा गाण्यांचा कार्यक्रम चाले. एकदा का "आड बाई आडोणी" वर गाडी पोहचली की शेवट. मग बाकी मुलीनी खिरापत ओळखायची. अनेकदा एक मुख्य खिरापत आणि सोबत अनेक छोटे छोटे पदार्थ असत. जसे की इडली-चटणी सोबत, घरी तळलेले वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, कोणती तरी वडी किंवा लाडू,......अगदी काकडीचे काप, श्रीखंडाच्या गोळ्या इतक्या साध्या गोष्टींपर्यंत. जिचा भोंडला आहे तिचीच नव्हे तर शेजारच्या काकू, मावशी पण तिच्या भोंडल्यासाठी काहीतरी खिरापत बनवून देत असत. काय दिले ते महत्त्वाचे नसे तर त्यामागचे प्रेम. कोणालाच ओळखता येणार नाही अशी खिरापत आपल्या आईने बनवावी अशी फार इच्छा असे. शिरा, वाटलीडाळ, ढोकळा, आप्पे, घरी केलेला कुकर मधला केक, साटोरी, भाजणीचे वडे असे अनेक पदार्थ असत. एकदा का सर्व खिरापती आलेल्या मुलीनी ओळखल्या की मग सगळ्यांना अंगणात सतरंजीवर बसायला सांगून घरातून खिरापतीच्या प्लेटस आणायच्या, हसत खिदळत त्या फस्त करायच्या. असे सर्व होईतोवर सात साडेसात होत, दुसऱ्या दिवशी कोणाकडे ते पक्के करून सगळ्या पसार होत, पुन्हा दुसऱ्यादिवशी न चुकता भेटण्यासाठी. संस्कृती जेव्हा लहान होती तेंव्हा हौसेने २/३ वर्षे मी तिचा हा भोंडला केला पण होता. पण आता ती मजा येत नव्हती, न तिला न मला. सर्वात मोठे कारण म्हणजे, तोच शाळेच्या परीक्षा असण्याचा काळ असतो. आणि आता स्पर्धेच्या युगात आई वडीलांना लहान मुलींच्या छोट्या छोट्या परीक्षांचाही खूप मोठा बाऊ वाटतो आणि मग या काळात या गोष्टींमध्ये २/३ तास त्यांना भोंडल्या सारख्या गोष्टींमध्ये घालवू देणे आता कदाचित कोणालाच शक्य नाही. करमणुकीची जेव्हा असंख्य साधने उपलब्ध आहेत तेंव्हा इतके कष्ट घेताय कोण मुलीना २/३ तास रमवण्यासाठी? दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष अप्रूप उरले नसावे. मग जेमतेम २/३ लहान मुली, आणि त्यांच्या आया, संस्कृती आणि मी. काय मजा वाटणार? पण पूर्वीच्या संदर्भात पहिले तर या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य होत असाव्यात. जसे कि मुलींसाठी एक करमणूक, त्यातली जास्तीत जास्त गाणी ही सासर-माहेर या गोष्टींवर बेतलेली आहेत. कदाचित अशा गाण्यांमधून त्यांची मानसिक तयारी करून घेणे हा एक उद्देश पण असेल. त्यातली काही गाणी तर इतकी मजेशीर आहेत जसं की वेड्याचं गाणं भोन्डल्यात कधी एकदा हे गाणे म्हणतोय आणि त्यातल्या प्रत्येक ओळीवर कधी खिदळतोय असे लहानपणी आम्हाला झालेले असे. ... कारल्याच्या वेलाच गाणं घ्या वेल लावण्यापासून त्याला कारली लागेपर्यंत, आणि ती लागल्यावर त्याची भाजी करून वर आपलं उष्टं काढून मग मुलीची वेणी-फणी करून मग तिला माहेरी धाडणार. म्हणजे इतकी वाट बघावी लागणार तेंव्हा कुठे माहेरी जायला मिळणार. मनात आलं आणि आणि लगेच गेली असे घडत नाही. शेजारीच माहेर असणाऱ्या मला कदाचित त्याची एवढी किंमत वाटणार नाही, किंवा ऑफिसमधून परस्पर संध्याकाळी आईकडे जाऊन येणाऱ्या मुलींना पण नाही याचे फार अप्रूप वाटणार, पण माझ्या परदेशात असणाऱ्या मैत्रिणींना आजही हे भावेल, कदाचित अगदी सासरच्या लोकांनी जाऊ देण्याचा किंवा न देण्याचा संदर्भ नसेल तरीही... अगदी या भोंडल्याची सुरुवात ज्या गाण्याने होते हे गाणेच इतके मोहक आहे. त्यातल्या अनेक शब्दांचा अर्थ मला आजही कळला नाहीये तरी एवढं नक्की ही एक प्रार्थना, एक साकडंच आहे. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा....अनेकदा वाटून जातं मला कि हा खेळ म्हणजे भातुकलीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या संसाराचा आहे. आयुष्याचे रंग त्यात ठळक दिसतात, त्यात आयुष्याचे मागणे मागितलेय,त्यात येता जाता पडणाऱ्या पावसाचे वर्णन आहेत, परतीचा पाऊस कसे कणसात धान्य धरायला मदत करतो याचे वर्णन आहे एवढेच नव्हे तर अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे असे ही वर्णन आहे. कदाचित सातव्या आठव्या वर्षी लग्न झालेल्या मुलींचाही १६ वर्षापर्यंत भोंडला करत असतील त्याकाळी. त्याकाळच्या अनेक गोष्टी ज्या अशा आखीव असत त्याचे आजही कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही. ते दागिन्यांचे गाणे. म्हणजे त्यातूनही मोठी शिकवण आहे. कोणीही दिलेल्या दागीन्यापेक्षा नवऱ्याने दिलेला दागिना सर्वात महत्वाचा. आजच्या संदर्भात असे म्हणू हवे तर नवऱ्याने किंवा स्वत: घेतलेला. पण रुसून माहेरी आलेल्या मुलीने सासू, सासरे, नणंद, जाऊ हे सारे तिला परत न्यायला आले तर काय करावे की सगळे दरवाजे लावून घ्यावेत, त्यांनी दिलेले दागिने पण न घेता (अरे रे :( सोनं किती महागलंय, असं नाही करायचं......) झिपऱ्या कुत्र्याला सोडून द्यावे? संस्कार म्हणून पटत नाहीत पण कदाचित गमतीचा भाग असेल तो, पण स्व-कमाईच्या वस्तूंची बात काही और असते हे लहानपणापासून याच गाण्याने ठसवलं. पण एकंदरीतच ज्याकाळात ही गाणी बनली त्याकाळचे किमान मुली, स्त्रिया यांचे जगणे यातून प्रगट होत राहते. म्हणजे पहा एखाद्या लहानवयात लग्न लागलेली मुलगी, आपल्या वेडसर नवऱ्याचे वर्णन कसे करेल? "अस्से कसे झाले, माझ्या नशिबी आले?" असेच ना? माहेर सासर यामध्ये मुलीना वाटणारा फरक कसा जसा च्या तसा त्या गाण्यांमधून उतरतो. सासरची प्रत्येक गोष्ट कशी वाईट, माहेरची कशी चांगली, ते अंगण असो, तिथला वैद्य असो. मुलीना वाटणारी माहेरची कमालीची ओढ प्रत्यक गाण्यात दिसतेच. त्यातूनच हे शिकवले जात असेल कि "बाई ग असं असून देखील तुला तिथेच राहायचे आहे, तिथेच एकरूप होवून जायचे आहे. निसर्गाशी जवळीक अनेकदा गाण्यांमधून दर्शवतेच. म्हणजे कोथिम्बिरीच्याच गाण्याचं पहा कि आता मिळत असलेली म्हणजे अश्विन महिन्यापर्यंत असणारी कोथिंबीर हळुहळू मार्केट मधून गायब होईल, मग परत कधी मिळू लागेल तर चैत्रात. आजकाल १२ महिने सर्व भाज्या फळे मिळणाऱ्या आम्हाला नाही यात काही विशेष वाटणार. पण त्या काळी ते महत्त्वाचे असेल ना? कोणतही यातलं गाणं घ्या, काहीतरी शिकवण आहेच त्यात. जिलबी बिघडली हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक वर्षे "जिलबी बिघडली" हे माझ्या तोंडी वाक्य येतंच हमखास, जेंव्हा माझा एखादा पदार्थ हातून बिघडतो तेंव्हा. हीच शिकवण घेवून पुढे गेलेल्या मला मग त्या बिघडलेल्यातून काहीतरी घडवताही येतेच. यात याहीपेक्षा काही महत्त्वाचे काय तर काहीतरी बिघडत असतानाही सगळं कसं निभाऊन न्यायचे याचे शिक्षण. आजच्या आपल्या जगात या गोष्टी आता बदलून गेल्या आहेत, म्हणून त्या मागे पडल्या. इतकीच शिकवण पुरणार नाही, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. या गोष्टीना करमणुकीचे साधन म्हणून विशेष आता महत्त्व नाही, पण त्या काळी या गोष्टीतून सणवार म्हणून, प्रथा म्हणून केल्या गेलेल्या या भोंडल्या मधून करमणूक, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी साध्य होत असतील नाही? तर अशी ही विस्मृतीत गेलेली गोष्ट. माझ्या लहानपणी तरी आम्हा मुलींच्या दृष्टीने भोंडला ही अतिशय आवडती गोष्ट होती. याची आठवण झाल्याबरोबर मी जवळपास सगळी गाणी म्हणून पहिली. अजूनही सगळी पाठ होती. भोंडला करून नाही तर निदान त्या काळात एक फेरफटका मारून येवून् मला ते क्षण पुन्हा एकदा जगता आले हे काय कमी आहे?

वाचन संख्या 6846
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

नुकतीच भोंडल्याची आठवण आली होती. आता तुमचा लेख आल्यावर आणखी आठवण आली. लेख आवडला. जुन्या दिवसांत घेऊन गेला. खिरापतीही जवजवळ अशाच असत. माझे सगळे भोंडले आई, आज्जीनं हौसेनं केले. आमच्या घरातून एका दिवशी पंधरा खिरापती असत. साखर खोबर्‍यापासून सुरु होत त्या शेवटी विड्यापाशी येऊन थांबत. आईनं खास भोंडल्यासाठी म्हणून कापडाचा काळा हत्ती शिवला होता तो अजून आठवतो. आजकालच्या वाढदिवसांच्या पार्ट्यांपेक्षा भोंडले जास्त रंगत असत.

नामशेष झालेली आणखी एक परंपरा. तुम्ही ज्या गाण्यांचे संदर्भ दिले आहेत त्यातले 'ऐलमा पैलमा' सोडून कुठलंही गाणं ऐकीवात नाहीत. शक्य असेल तर ह्या गाण्यांचे बोल पण डकवा! लेख फार छान लिहिला आहे.

आम्ही लहान असताना भोंडला खेळायला जाताना आमचे लहान भाऊही मागे लागत आणि आमच्या सोबत भोंडला खेळायला येत, तेव्हा त्यांचा खूप राग येत असे. आणि आता हसू येते ती सर्व भांडणे आठवून.

आम्ही लहान असताना भोंडला खेळायला जाताना आमचे लहान भाऊही मागे लागत आणि आमच्या सोबत भोंडला खेळायला येत, तेव्हा त्यांचा खूप राग येत असे. आणि आता हसू येते ती सर्व भांडणे आठवून.

शिवाजी अमुचा राणा त्याचा तो तोरणा किल्ला किल्ल्यामध्ये सात विहिरी विहिरींमध्ये सात कमळे एक एक कमळ तोडिले भवानीमातेला अर्पण केले भवानीमाता प्रसन्न झाली प्रसन्न होवोनी तलवार दिली तलवार घेवूनी आला हिंदूंचा राजा तो झाला हिन्दूंनी त्याचे स्मरण करावे हादग्यापुढे गाणे गावे.

सुंदर लेख! लहानपणी बहिणी जेव्हा भोंडला खेळत, तेव्हा येणार्‍या सर्व पोरींची थट्टा मस्करी करण्यात पोरे खूप धमाल करायची. खिरापत आधीच चुपचाप पाहून घेऊन ती फोडणे, गाण्यांची विडंबने करून हशा मिळवणे असे पोरंचे उद्योग चालायचे. अनघा, ते जिलबीचे गाणे कोणते आहे?

एक्दम छान! - (भोंडल्याची लहानपणीची आठवण जागा झालेला) सोकाजी

अगदी हातात हात धरुन फेर धरावा तसा झालाय लेख. खुप ओघवत वर्णन आहे. जिलेबी बिघडली म्हणुन खुप वर्ष झाली. लिही बघु गाण ते. लेकीला ऐकवते जरा.

परवच आथवन कधलि न आज ह लेख वचुन वातले कि आजुन्हि आथवनि तज्य आहेत

जस आठवते तसे लिहिते, हरिच्या नेवेद्याला केलि जिलबि बिघडलि (२) त्यातले एवढेसे रहिले पिठ त्याचे केले थालिपिठ नेवुनि वाढिले पानात, जिलेबि बिघडलि हरिच्या नेवेद्याला केलि जिलेबि बिघडलि(२) त्यातला एवढासा राहिला पाक त्याचा केला साखरभात नेवुनि वाढिला पानात, जिलबि बिघडलि हरिच्या नेवेद्याला केलि जिलबि बिघडलि (२) त्यातलि एवढिशि रहिलि मोळि त्याचि केलि पुरणपोळी नेवुनि वाढिलि पानात, जिलबि बिघडलि हरिच्या नेवेद्याला केलि जिलबि बिघडलि (२) आणखि पण कहि तरि आहे पण आता आठवत नाहि

In reply to by अन्जलि

धन्स अंजली. हरिच्या नेवेद्याला केली जिलबी, जिलबी बिघडली (२) त्या सगळ्या जिलब्या उरल्या, त्या आंब्याखाली पुरल्या आंबा लागला गोड गोड, जरी जिलबी बिघडली हरिच्या नेवेद्याला केली जिलबी, जिलबी बिघडली

आणि अन्जलि, तू दिलेल्या गाण्याबद्दल धन्यवाद. वर दिलेल्या गाण्यातल्या शेवटच्या कडव्यातल्या "मोळि" शब्दाचा अर्थ काय असावा?

In reply to by सुबक ठेंगणी

बहुतेक पाक बिघडला तर जे काहि तयार होते त्याला मोळि म्हटले असेल थोडक्यात काय तर वस्तु बिघडलि तर काहि हरकत नाहि त्याचे काहि तरि नविन करा आणि वाढा. वेळ साजरि करा.त्यावेळचि मोठ्याचि शिकवण.

मस्त लेख. आमच्याही शाळेच्या वर्गातल्या भोंडल्याची आठवण आली आणि भूक लागली :)

लेख फार आवडला. >दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष >अप्रूप उरले नसावे. अगदी. दिवाळीला फराळ, गणपतीत मोदक अशी काही वैशिष्ट्ये राहिली असली तरी त्यातील जवळजवळ प्रत्येक पदार्थ वर्षभर उपलब्ध असतो. त्यामुळे आणि स्पर्धा/परीक्षांमुळे सणांमध्ये दोन घटका विराम घेऊन सण साजरा करण्याचा आनंद जवळपास हरवलेला आहे असे वाटते.

भोंडल्याची आठवण करुन देणारा सुरेख लेख.. भोंडल्याच्या खिरापती, गाणी सारेच फेर धरुन मनात गाऊ लागले. (स्मरणरंजनात मग्न)स्वाती

आम्हिहि असेच भोंडला 'मिस्' करत होतो. मग मुद्दाम ठरवून केला!

मीहि भोंडल्यावर लिहायचं ठरवलं होतं ,पण तितकसं नाहि जमलं .. इथेच देते .थोडक्यात . भोंडल्याबद्दल साहाजिकच थोडं आकर्षण आहे ,कारण भोंडला कधीच पाहिला नाहि .आमच्या जन्मापासुन आम्ही फक्त डीजे वर धडाक्यात चालणारा दांडीया ,गर्बाच अनुभवला .मोठमोठ्या मैदानावर दांडीयाचे कार्यक्रम साजरे केलेले पाहिले . भोंडला फक्त ऐकुन होते मी . त्यामुळे भोंडल्याबद्दल कुतुहल होतं .भोंडल्यात फेर धरुन मुली ,स्त्रीया गाणी म्हणतात .शांततेत पार पडणारा ,नऊ दिवसाचा उपक्रम असतो भोंडला .त्यात खिरापत हाही महत्वाचा भाग मानला जातो . नवरात्रीच्या उत्सवात ,देवीची रीतसर पूजा करुन , हा भोंडला नऊ दीवस साजरा केला जातो .देवीच्या उत्सवात उत्साहाला उधान आलेलं असतं .या सनात घरोघरी बायका देवीची नऊ दिवस उपासना करतात .सलग नऊ दिवस उपास करुण तो विजयादश्मी दिवशी देवीला पूरणपोळीचा नैवेद्य दाखवुन सोडला जातो . फुलांची किवा साध्या रांगोळीची गोलाकर रांगोळी मध्यभागी काढली जाते .त्यावर लाकडी , खेळण्यातल्या हत्तीची प्रतिमा ठेवुन त्यालाहि सजवलं जातं .किंवा मग पाटावर हत्तीचं चित्र काढलं जातं .हस्त नक्षत्राची सुरुवात म्हणजेच भोंडल्याच्या उत्सवाला सुरुवात .या नक्षत्रात हत्तीची पूजा केली जाते म्हणुन भोंडल्याच्या मध्यभागी हत्तीची प्रतिमा ठेवली जाते .काही ठिकाणी मातीने साकारलेलाहि हत्ती ठेवला जातो .त्याच्याभोवती सगळ्या लहान मोठ्या मुली फेर धरुन गाणी म्हणतात .नऊ दिवसातल्या पहिल्या दिवशी एकच गाणं म्हटलं जातं .दुसर्‍या दिवशी दोन ,अश्या प्रकारे शेवटच्या नवव्या दिवशी सगळी मिळुन नऊ गाणी म्हटली जातात .अगदि त्याचप्रमाणे खिरापतहि पहिल्या दिवशी एकच आणि मग हळु हळु वाढवली जाते .दसर्‍याच्या दिवशी दहा खिरापती वाटल्या जातात .हि खिरापत, खेळणार्‍या ( फेर धरुन गाणार्‍या मुलीनी ) ओळखायची असते . वेगवेगळ्या भागात हा भोंडला वेगवेगळ्य नावाने साजरा होतो .खानदेशात ह्याच भोंडल्याला भुलाबाई म्हणतात .. .फरक इतकाच असतो कि तिथे एकमेकींचा हात पकडुन , फेर धरुन गोल गोल फिरुन गाणी म्हटली जात नाहित ,तर खाली बसुन टाळ्या वाजवत ही गाणी म्हटली जातात. सांगली सातारा ह्या भागात ह्याच उत्सवाला हादगा म्हणतात .हादग्याची गाणी असं म्हटलं जातं .तिथे हादगा सोळा दिवसांचा असतो .तिथेहि पहिल्या दिवशी एक आणि नंतर सोळाव्या दिवसापर्यंत सोळा गाणी म्हटली जातात सोळाव्या दिवशी सोळा खिरापती . इथे मात्र दोन प्रतिमांची पूजा केली जाते . या प्रतिमा हत्तीच्याच ,पण एक पाटावरची आणि एक फोटोतली . पाटावरच्या प्रतिमेभोवती फेर धरुन गाणी म्हटली जातात ,तर फोटोतल्या प्रतिमेला रोज वेगवेगळ्या अश्या सोळाव्या दिवसापर्यंत सोळा माळा चढवल्या जातात . ह्या माळा फक्त फुलांच्याच नसुन ,त्यात खारका ,चुरमुरे ,शेंगदाणे ,फुटाणे ,खोबरं अश्या खाद्यपदार्थांच्याही माळा बनवुन फोटोला घातल्या जातात .फुलांमध्ये हादग्याची फुले ,कारळ्याची फुले ,झेंडु ,शेवंती ह्याना विषेश मान दिला जातो .हस्त नक्षत्र सुरु झाले की हादगा सुरु होतो ,नऊरात्रीत जर सोळावा दिवस आला नाहि तर मात्र कोजागिरि पोर्णिमेला बोळवला जातो . भोंडल्यात खिरापतिला विषेश करुन विषेश महत्व दिलं जातं .वेगवेगळे जीन्नस वापरुन खाऊ बनवला जातो त्याला वेगळच थोडक्यात विचित्र नाव दिलं जातं ,का? तर ते कुणालाहि ओळखायला येऊ नये म्हणुन .खिरापत ही ओळखुन खायची असते ,ह्या गोष्टीतच भारी मजा असते . बर्‍याच ठिकाणी ह्या खिरापतिचं नाव उखाण्यात घेतलं जातं .एकाच उखाण्यात चार पाच पदार्थांची नावं ,किंवा मग त्याला साम्य असणारे शब्द वापरुन उखाना तयार केला जातो ,त्यातुन नेमक्या खिरापतिला ओळखायचे असते .देवीच्या करमणुकिसाठी साजरा होणारा भोंडला प्रत्येकिच्या मनात किती उत्साह निर्माण करत असेल ,ह्याची कल्पनाच आनंद देऊन जातेय . गुजरात मध्ये हा उत्सव तर जल्लोशात साजरा केला जातो .तिथे टाळ्यांचा गरबा आणि दांडीया खेळुन हा नऊरात्रीचा सन साजरा होतो . भोंडल्याची सुरुवात ' ऐलमा पैलमा गणेश देवा " ह्या सुंदर गाण्याने केली जाते . ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडु दे करी तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या देरि पारवं घुमतय पारावरी गोदवरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या भुलोजी बायका ... एक लिंबु झेलु बाई दोन लिंबु झेलु दोन लिंबु झेलु बाई ,तीन लिंबु झेलु तीन लिंबं झेलु बाई चार लिंबं झेलु चार लिंबं झेलु बाई पाच लिंबं झेलु.. अडकित जाऊ खिडकित जाऊ ,खिडकित होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला ,नाव ठेवा दत्ता अडकित जाऊ खिडकित जाऊ ,खिडकित होतं तामण भुलोजीला मुलगा झाला ,नाव ठेवा वामण . अडकित जाऊ खिडकित जाऊ ,खिडकित होती बशी भुलोजीला मुलगी झाली ,नाव ठेवा शशी ..... अक्कणमाती चिक्कनमाती खड्डा तो खणावा अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्स जातं सुरेख बाई ,सपिठी दळावी अस्शी सपिठी सुरेख बाई करंज्या कराव्या .. अशी भरपूर गाणी गायली जातात . पुणे , मुंबई ,नाशिक ,सोलापुर भागात मोठमोठी महिला मंडळं अनेकानेक स्त्रीयाना एकत्र करुन भोंडला साजर करताना पहायल मिळतिल .मराठमोळ्या सनानी महारष्ट्राला एक आगळं रुप मिळवुन दिलय .ते असच टिकुन रहावं ,आणि ते टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाणे करावा एवढच मनापासुन वाटतं .

छानच लिहिला आहे लेख. मी ४-५ वर्षाचा असताना बहिणीचा भोंडला असायचा. त्यावेळेस ती आईच्या मागे लागुन कोणाला न ओळखता येणारे पदार्थ बनवुन घ्यायची आणि आजुबाजुच्या मुली मला खाउचे आमिष दाखवुन कुठला पदार्थ आहे ते काढुन घ्यायचे (त्यावेळेस ४-५ वर्षाचा असल्यामुळे खाउचेच आमिष असायचे हो ;) ) त्यामुळे बहिण माझ्यावर चिडचिड करायची. :) असो. मी मुलगा असल्याने भोंडल्याची याहुन जास्त आठवण नाही मला. पण तरी ते ऐलोम पैलोमा आठवते :)

वाह, अनघातै हा लेख वाचून परत जुन्या काळात गेल्यासारखे वाटले. अन त्यावर पूजाचा प्रतिलेख म्हणजे पोह्यावंर ओले खोबरे व कोथिंबिर.

मुलींचा कार्यक्रम म्हणून आम्ही पोरं आवर्जून दूर राहायचो. तरीही एकदा पाहिलं तेव्हा मुली एक गाणं गात होत्या, अस्संककसं ध्यान माझ्या नशिबी आलं.. असं काही गाणं होतंसं वाटतं. खिरापतीच्या पदार्थावरुन बराच सस्पेन्स ककेल्यावर शे वटी काय तर पोहेच.. :-) त्यानंतर भोंडला पाहण्यात आला नाहीच.

माझेहि स्मरणरन्जन झाले. सगळ्या गाण्यात 'माहेरी मौज आणि सासरी काटे' असेच वर्णन असायचे.