माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते त्या अर्जुनी गावाजवळ महाराष्ट्रातले कॉलेज आहे. तिथे त्याने अकराव्वी बारावी केली. पुढे सांगली आणि पुणे. आता तो बंगळूरू मध्ये स्थाईक. मी सातवी पर्यंत कर्नाटकातल्या शाळेत. मित्र अर्जुनीच्या म्हंजे महाराष्ट्रातल्या शाळेत गेले म्हणुन तिथे गेलो. पुढे इंजीयारिंग महाराष्ट्रात. मी नाशकात स्थाईक. मला कानडी येतं. घरातले सगळे माझ्या पेक्षा उत्तम पणे कानडी बोलतात, लिहितात वगैरे. वडील कर्नाटकातल्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक. आत्ता निवृत्त. निपाणीला तीन चार महिन्यांनी नक्की जातो. घर आहे. मोप मित्र आहेत. 'बसलो' की कानडी आणि मराठी मधून गप्पा विनोद होतात. काका मावशी बेळगांव मध्ये आज ही आहेत. त्यामुळे बालपण बरंच निपाणी संकेश्वर बेळगांव अश्या ठिकाणी गेलं. या सगळ्या वाटचालीत तो कन्नडीगान्चा अन्याय त्यांचे अत्याचार किंवा जबरदस्ती, दादागिरी वगैरे वगैरे काही आजवर दिसलं नाही. मला नाही. माझ्या कुटुंबियांना नाही. मित्रांना नाही. शेजा-यांना नाही. सगळे सुखात आहेत. निवडणुका आल्यावर आणि दरवर्षी नोव्हेंबर मध्ये " सीमा प्रश्न" नामक काहीतरी अदृश्य जुनाट मढं काही ठराविक लोक उकरून काढतात. उगाळतात. पोळ्या भाजून घेतात. निवडून येतात. आणि थोडे दिवस शांत होतात. लहानपणीपासुन दरवेळी हे बघितलंय. अनुभवलंय.या दिवसात मुंबई पुण्यातले मोठे लोक येतात. राजकारणी येतात. नेहरू चौकातल्या नळावर सभा भरते. तुमच्यावर अन्याय होतो असे आक्रोश करून सांगतात. मजबूत पेटवतात. निघून जातात. काहीजण मग पेटतात. अन्याय होतोय म्हणतात. १ नोव्हेंबरला काळी फीत बांधून फिरतात. वर्षानु वर्षे हे चालू आहे. आम जनतेला यातल्या " कडकडीत हरताळ, दंगा, कर्फ्यू, गोळीबार इतकाच त्रास होतो. या व्यतिरिक्त जनता सुखात आहे, असे माझे प्रामाणिक निरीक्षण आहे.
शाळा कर्नाटकातल्या असल्या तरी माध्यम मराठी होते. निपाणी, बेळगांव वगैरे परिसरातल्या कितीतरी शाळा मराठी माध्यमांच्या आहेत. बोर्ड बंगळूरुचे. आम्ही मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकलो. मी सुमारे सहाव्या यत्ते मध्ये शिकत असताना. कन्नड विषय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली. कन्नड शिकणे सक्तीचे असले तरी त्या विषयात पास होण्याची अट नव्हती. त्यामुळे धमाल असायची. मित्र धमाल करायचे. मजा यायची. बाहेर पेपरात मात्र "कन्नडीगांचा आणखी एक अत्याचार" वगैरे मथळ्याच्या बातम्या यायच्या. नळावर उपोषण वगैरे झाले. एखादा दिवस हरताळ पाळला. आम्हाला वट्ट घेणंदेणं नव्हतं. शाळेत त्यानिमित्ताने नवीन गुरुजी आले. कोरे गुरुजी. कानडीचे शिक्षक. निपाणीच्या शेजारी असणा-या पट्टणकुडीचे. पहिल्या दिवशी वर्गात आले आणि डायरेक्ट कानडीतूनच बोलायला लागले. त्यांचा वर्गावर पहिला दिवस होता त्यामुळे आम्ही प्रथे प्रमाणे गोष्ट सांगायची गळ घालायला लागलो. खूप हट्ट केला. मध्येच गुरुजी मराठीत काहीतरी बोलायचे आणि आम्हाला धो धो हसू यायचे. कारण त्याना मराठी जाम बोलायला यायचे नाही. त्यामुळे त्यांचे मराठी उच्चार भीषण विनोदी असायचे. पण गुरुजींनी आमची विनंती मान्य केली. त्यांनी गोष्ट सुरु केली आणि ती सुमारे महिना भर चालली. आज ही मला त्यांच्या कथनाची आठवण झाली की शहारायला होतं. त्या गोष्टी मध्ये आम्ही सगळे मित्र इतके बुडून गेलो होतो की कोरे गुरुजींचा तास झालेल्या दिवशी आमच्या मित्रांपैकी बहुतेकजण न केकाटता न बोंबलता घरी जायचो. कोरे सरांच्या आम्ही तासाची प्रचंड वाट बघायचो. गोष्ट होती - "तीन मुले". साने गुरुजींचे हे पुस्तक शामची आई इतके प्रसिद्ध नसावे कदाचित. पण मराठीतच उपलब्ध असणारे हे पुस्तक आमच्या कानडी गुरुजींनी कोळून प्यायलं होतं. त्यांना जे कथन करायचे होते ते त्यांनी केलं, आम्हाला व्यवस्थित समजलं. आणि आजही आमच्या हृदयात ती कथा आम्ही लालबुंद मलमली कपड्यात बांधून, अगदी जपून ठेवली आहे.
आम्ही कानडी लोकांच्या सहवासात ज्यास्त वावरलेलो आणि बंगळूरू बोर्डांच्या शाळांमध्ये शिकलेलो आणि माझा जन्म दाखला अस्सल कानडीतून लिहिलेला या सगळ्या मुळे मराठी भाषेतल्या "अन्याय" या शब्दाची माझी व्याख्या कदाचित चुकत असेल. मला जो अन्याय माहिती आहे तो - "मलाला" या चौदा वर्षाच्या पोरीला शाळेत जायला पाशवी पद्धतीने रोखतो, शासनाच्या बेफिकिरीमुळे शेतक-यांना आत्महत्या करायला लावतो, लाचेची रक्कम देता न येणा-या माझ्या पानाच्या दुकानातल्या गिरीश्याला रेशनचे कार्ड अजुनीही मिळवून देत नाही, गडगंज श्रीमंती असताना देखील केवळ हिंदू असल्यामुळे लेह विमानतळावर माझी नेहमी वाट पाहणा-या सुकाच्या कुटुंबियाना काश्मीरच्या घाटीतून हुसकून लावून लेह मध्ये भाडोत्री वाहन चालवायला लावतो, केस विंचरून द्यायला आज आईने वेळ काढलाय या आनंदात केस विंचरून घेताघेता आईंच्या ताब्यातून हिसकावून घेतल्या गेलेल्या आणि रात्रंदिवस आळीपाळीने कुणा रानडुकरांच्या खाली झोपावे लागलेल्या नागपूरच्या वसंतदादा नाईक झोपडपट्टीतल्या लेकीचे आयुष्य बरबाद करतो, इत्यादी.....!
हा समाज मला बऱ्याचदा अट्टल दारूखस वाटतो. पोळी भाजून घेणा-यांना हे चांगलं माहिती झालयं की हा समाज दारूखस आहे आणि येडा ही आहे. हे हुशार लोक, एखादा अत्यंत पोकळ 'सीमा प्रश्ना' सारखा महाप्रचंड निरर्थक मुद्दा असा बेमालूमपणे शोधून, गाळून त्याची दारू पाजून समाजाला वर्षानु वर्षे झिंगत ठेवतात. झिंगणा-या येड्या जनतेला खरे काय आणि खोटे काय किंवा खरंच काय हवंय आणि काय नको हे ही समजत नाही. भाकरी, पाणी, सुरक्षित शांत झोप, आरोग्य या आणि अशा अन्य काही जगण्याच्या किमान गरजांची अनेक ठिकाणी भ्रांत आहे. पण अजुनी कर्नाटकातच आम्हाला ठेवलंय आणि हा आमच्या वर अन्याय आहे म्हणुन गळा काढून रडणा-या जनतेची शुद्ध हरपली आहे असे नाही वाटत ? ते तिकडे सीमा भागात झिंगत राहतात आणि त्यांची झिंग कायम राहावी म्हणुन आजूबाजूचे त्यांच्यावर होणा-या अन्यायावर कविता करतात, लेख लिहितात, चर्चा घडवून आणतात. पिढ्यान पिढ्या हेच चाललंय !
वाचने
4946
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला
लेख आवडला.
In reply to लेख आवडला by प्रकाश घाटपांडे
टोकदार लेख..
मस्त लेख!
लेख अगदी जमून आलाय. सामान्य
कडक!
जबरदस्त
तरूण
सुरेख लेख. अतिशय आवडला.
अच्च बेळगावी माणूस ब्येळगावच
In reply to सुरेख लेख. अतिशय आवडला. by यशोधरा
रेवती
In reply to अच्च बेळगावी माणूस ब्येळगावच by रेवती
धारवाड माझेही खूप लाडके शहर
In reply to रेवती by यशोधरा
लेखन आवडले.. मला भारत - पाक
मार्मिक अन प्रांजळ लेखन.
लेख आवडला
लेख चांगला लिहिलाय.
तुम्ही म्हणता ते सार मान्य
+१ अपर्णा ताई
In reply to तुम्ही म्हणता ते सार मान्य by स्पंदना
अपर्णा ताई, मी पण निप्पाणीचाच
In reply to तुम्ही म्हणता ते सार मान्य by स्पंदना
लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत.
लिखाण म्हणुन वैयक्तीक अनुभव
लेख म्हणुन उत्तम, पण
प्रकटन आवडले, माझेही बरेच
आभार