Skip to main content

आपण सारे झिंगु ....

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 14/10/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते त्या अर्जुनी गावाजवळ महाराष्ट्रातले कॉलेज आहे. तिथे त्याने अकराव्वी बारावी केली. पुढे सांगली आणि पुणे. आता तो बंगळूरू मध्ये स्थाईक. मी सातवी पर्यंत कर्नाटकातल्या शाळेत. मित्र अर्जुनीच्या म्हंजे महाराष्ट्रातल्या शाळेत गेले म्हणुन तिथे गेलो. पुढे इंजीयारिंग महाराष्ट्रात. मी नाशकात स्थाईक. मला कानडी येतं. घरातले सगळे माझ्या पेक्षा उत्तम पणे कानडी बोलतात, लिहितात वगैरे. वडील कर्नाटकातल्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक. आत्ता निवृत्त. निपाणीला तीन चार महिन्यांनी नक्की जातो. घर आहे. मोप मित्र आहेत. 'बसलो' की कानडी आणि मराठी मधून गप्पा विनोद होतात. काका मावशी बेळगांव मध्ये आज ही आहेत. त्यामुळे बालपण बरंच निपाणी संकेश्वर बेळगांव अश्या ठिकाणी गेलं. या सगळ्या वाटचालीत तो कन्नडीगान्चा अन्याय त्यांचे अत्याचार किंवा जबरदस्ती, दादागिरी वगैरे वगैरे काही आजवर दिसलं नाही. मला नाही. माझ्या कुटुंबियांना नाही. मित्रांना नाही. शेजा-यांना नाही. सगळे सुखात आहेत. निवडणुका आल्यावर आणि दरवर्षी नोव्हेंबर मध्ये " सीमा प्रश्न" नामक काहीतरी अदृश्य जुनाट मढं काही ठराविक लोक उकरून काढतात. उगाळतात. पोळ्या भाजून घेतात. निवडून येतात. आणि थोडे दिवस शांत होतात. लहानपणीपासुन दरवेळी हे बघितलंय. अनुभवलंय.या दिवसात मुंबई पुण्यातले मोठे लोक येतात. राजकारणी येतात. नेहरू चौकातल्या नळावर सभा भरते. तुमच्यावर अन्याय होतो असे आक्रोश करून सांगतात. मजबूत पेटवतात. निघून जातात. काहीजण मग पेटतात. अन्याय होतोय म्हणतात. १ नोव्हेंबरला काळी फीत बांधून फिरतात. वर्षानु वर्षे हे चालू आहे. आम जनतेला यातल्या " कडकडीत हरताळ, दंगा, कर्फ्यू, गोळीबार इतकाच त्रास होतो. या व्यतिरिक्त जनता सुखात आहे, असे माझे प्रामाणिक निरीक्षण आहे. शाळा कर्नाटकातल्या असल्या तरी माध्यम मराठी होते. निपाणी, बेळगांव वगैरे परिसरातल्या कितीतरी शाळा मराठी माध्यमांच्या आहेत. बोर्ड बंगळूरुचे. आम्ही मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकलो. मी सुमारे सहाव्या यत्ते मध्ये शिकत असताना. कन्नड विषय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली. कन्नड शिकणे सक्तीचे असले तरी त्या विषयात पास होण्याची अट नव्हती. त्यामुळे धमाल असायची. मित्र धमाल करायचे. मजा यायची. बाहेर पेपरात मात्र "कन्नडीगांचा आणखी एक अत्याचार" वगैरे मथळ्याच्या बातम्या यायच्या. नळावर उपोषण वगैरे झाले. एखादा दिवस हरताळ पाळला. आम्हाला वट्ट घेणंदेणं नव्हतं. शाळेत त्यानिमित्ताने नवीन गुरुजी आले. कोरे गुरुजी. कानडीचे शिक्षक. निपाणीच्या शेजारी असणा-या पट्टणकुडीचे. पहिल्या दिवशी वर्गात आले आणि डायरेक्ट कानडीतूनच बोलायला लागले. त्यांचा वर्गावर पहिला दिवस होता त्यामुळे आम्ही प्रथे प्रमाणे गोष्ट सांगायची गळ घालायला लागलो. खूप हट्ट केला. मध्येच गुरुजी मराठीत काहीतरी बोलायचे आणि आम्हाला धो धो हसू यायचे. कारण त्याना मराठी जाम बोलायला यायचे नाही. त्यामुळे त्यांचे मराठी उच्चार भीषण विनोदी असायचे. पण गुरुजींनी आमची विनंती मान्य केली. त्यांनी गोष्ट सुरु केली आणि ती सुमारे महिना भर चालली. आज ही मला त्यांच्या कथनाची आठवण झाली की शहारायला होतं. त्या गोष्टी मध्ये आम्ही सगळे मित्र इतके बुडून गेलो होतो की कोरे गुरुजींचा तास झालेल्या दिवशी आमच्या मित्रांपैकी बहुतेकजण न केकाटता न बोंबलता घरी जायचो. कोरे सरांच्या आम्ही तासाची प्रचंड वाट बघायचो. गोष्ट होती - "तीन मुले". साने गुरुजींचे हे पुस्तक शामची आई इतके प्रसिद्ध नसावे कदाचित. पण मराठीतच उपलब्ध असणारे हे पुस्तक आमच्या कानडी गुरुजींनी कोळून प्यायलं होतं. त्यांना जे कथन करायचे होते ते त्यांनी केलं, आम्हाला व्यवस्थित समजलं. आणि आजही आमच्या हृदयात ती कथा आम्ही लालबुंद मलमली कपड्यात बांधून, अगदी जपून ठेवली आहे. आम्ही कानडी लोकांच्या सहवासात ज्यास्त वावरलेलो आणि बंगळूरू बोर्डांच्या शाळांमध्ये शिकलेलो आणि माझा जन्म दाखला अस्सल कानडीतून लिहिलेला या सगळ्या मुळे मराठी भाषेतल्या "अन्याय" या शब्दाची माझी व्याख्या कदाचित चुकत असेल. मला जो अन्याय माहिती आहे तो - "मलाला" या चौदा वर्षाच्या पोरीला शाळेत जायला पाशवी पद्धतीने रोखतो, शासनाच्या बेफिकिरीमुळे शेतक-यांना आत्महत्या करायला लावतो, लाचेची रक्कम देता न येणा-या माझ्या पानाच्या दुकानातल्या गिरीश्याला रेशनचे कार्ड अजुनीही मिळवून देत नाही, गडगंज श्रीमंती असताना देखील केवळ हिंदू असल्यामुळे लेह विमानतळावर माझी नेहमी वाट पाहणा-या सुकाच्या कुटुंबियाना काश्मीरच्या घाटीतून हुसकून लावून लेह मध्ये भाडोत्री वाहन चालवायला लावतो, केस विंचरून द्यायला आज आईने वेळ काढलाय या आनंदात केस विंचरून घेताघेता आईंच्या ताब्यातून हिसकावून घेतल्या गेलेल्या आणि रात्रंदिवस आळीपाळीने कुणा रानडुकरांच्या खाली झोपावे लागलेल्या नागपूरच्या वसंतदादा नाईक झोपडपट्टीतल्या लेकीचे आयुष्य बरबाद करतो, इत्यादी.....! हा समाज मला बऱ्याचदा अट्टल दारूखस वाटतो. पोळी भाजून घेणा-यांना हे चांगलं माहिती झालयं की हा समाज दारूखस आहे आणि येडा ही आहे. हे हुशार लोक, एखादा अत्यंत पोकळ 'सीमा प्रश्ना' सारखा महाप्रचंड निरर्थक मुद्दा असा बेमालूमपणे शोधून, गाळून त्याची दारू पाजून समाजाला वर्षानु वर्षे झिंगत ठेवतात. झिंगणा-या येड्या जनतेला खरे काय आणि खोटे काय किंवा खरंच काय हवंय आणि काय नको हे ही समजत नाही. भाकरी, पाणी, सुरक्षित शांत झोप, आरोग्य या आणि अशा अन्य काही जगण्याच्या किमान गरजांची अनेक ठिकाणी भ्रांत आहे. पण अजुनी कर्नाटकातच आम्हाला ठेवलंय आणि हा आमच्या वर अन्याय आहे म्हणुन गळा काढून रडणा-या जनतेची शुद्ध हरपली आहे असे नाही वाटत ? ते तिकडे सीमा भागात झिंगत राहतात आणि त्यांची झिंग कायम राहावी म्हणुन आजूबाजूचे त्यांच्यावर होणा-या अन्यायावर कविता करतात, लेख लिहितात, चर्चा घडवून आणतात. पिढ्यान पिढ्या हेच चाललंय !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4946
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मराठी व कानडी दोन्ही भाषा व संस्कृती आपल्याला ज्ञात असल्याने लेख वजनदार झालाय! बाकी बहुभाषिक लोक माझ्या असूयायुक्त आदरास पात्र असतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाटाआ. माझाच घोळ झाल्यामुळे प्रतिसाद प्रकाटाआ. -दिलीप बिरुटे

"मलाला" या चौदा वर्षाच्या पोरीला शाळेत जायला पाशवी पद्धतीने रोखतो, शासनाच्या बेफिकिरीमुळे शेतक-यांना आत्महत्या करायला लावतो, लाचेची रक्कम देता न येणा-या माझ्या पानाच्या दुकानातल्या गिरीश्याला रेशनचे कार्ड अजुनीही मिळवून देत नाही, गडगंज श्रीमंती असताना देखील केवळ हिंदू असल्यामुळे लेह विमानतळावर माझी नेहमी वाट पाहणा-या सुकाच्या कुटुंबियाना काश्मीरच्या घाटीतून हुसकून लावून लेह मध्ये भाडोत्री वाहन चालवायला लावतो, केस विंचरून द्यायला आज आईने वेळ काढलाय या आनंदात केस विंचरून घेताघेता आईंच्या ताब्यातून हिसकावून घेतल्या गेलेल्या आणि रात्रंदिवस आळीपाळीने कुणा रानडुकरांच्या खाली झोपावे लागलेल्या नागपूरच्या वसंतदादा नाईक झोपडपट्टीतल्या लेकीचे आयुष्य बरबाद करतो, इत्यादी.....!
हे खरे विखारी अन्याय, मुतालीक साहेब.. पण कसं आहे, हे वैयक्तिक आहेत ना! ह्यांच्या भरवश्यावर जनतेला पेटवता येत नाही आणि त्याच्या आपापल्या मतलबाची पोळीही भाजता येत नाही.. लेख मस्त आहे. जाऊ द्या. टिव्हीवर खुर्शीद-केजरीवाल-मिडीया अशी तिरंगी कुस्ती जुंपलीय, ती बघतो. बाकी आपलं, जै हिंद..

माझंसुद्धा आजोळ बेळगाव असल्यामुळे आपल्या निरीक्षणाशी सहमत.

लेख अगदी जमून आलाय. सामान्य जनतेसाठी फक्त माणूसकी, बाकी काही नाही. तुम्हाला कर्नाटकात राहून तुमचं काही हरवलय, हिसकावून घेतलं गेलय असं वाटत नाही. मलाही महाराष्ट्रात राहून (कर्नाटकात न राहून) काही हरवलय असं वाटत नाही. कदाचित आजोबांना सोडून येताना वाटलं असेल, माहीत नाही. राजकारणी काय करायचं ते मात्र बरोबर करत राहतात. आजकाल सीमाभागात फक्त कानडीची जी जबरदस्ती चाललिये (असं ऐकून आहे) ती अस्वस्थ करते. असो. लेख आवडला.

+१ लेख प्रचंड आवडल्या गेला आहे. - (फक्त खर्‍या दारुने झिंगणारा) सोकाजी

लेखात तळमळ प्रकर्षाने जाणवते आहे. शेवटचे दोन परिच्छेद केवळ दंडवत.. यळ्ळूरचा लेख वाचल्यावर लगेच हा वाचला. यामध्ये थेटपणे कुठेही नसलेला मराठी माणूस काय बोध घेणार... केवळ सोयीचा, भाषिक अस्मितेचा. तुमच्या काळी निवांत राहणारा मराठी माणूस आज शाळांना पण पारखा झाला आहे बेळगावात? नुकताच वाचलेला मनोहर सोनावणे यांचा लेख जास्त बोचला. पण अंजन काहीसं घातलं गेलं. तुमच्या प्रत्यक्ष अनुभवांती आलेल्या लिखाणातून आणि थेट विचारातून. रोजच्या जगण्याची लढाई आणि पदोपदीचे अन्याय हे आपण गृहीत धरत आलो आहोत. सगळ्या अन्यायांचीच सवय झाली आहे. असो.. कशाची झिंग आहे हा जास्त विचार करायला लावणारा मुद्दा आहे. प्रचंड धन्यवाद या लेखासाठी..

लेख आवडला.
तुमच्यावर अन्याय होतो असे आक्रोश करून सांगतात
तरूण भारत वृत्तपत्र असल्या पेटवापेटवीत पी.एच.डी. आहे.'कानडी वरवंटा' वगैरे म्हणणार्‍यांच्या ईस्टेटी,घरे,मालमत्ता बेंगळूर्,मैसूरपर्यंत पसरलेल्या आहेत. सुदैवाने नव्या पिढीने ह्या प्रश्नाला फाट्यावर मारल्याने सध्या फरक पडत नाही.

सुरेख लेख. अतिशय आवडला. माझ्या बाबाचं बालपण ब्येळगावात गेलं. (अच्च बेळगावी माणूस ब्येळगावच म्हणतो की हो!) किल्ल्यात रहायचो आम्ही, म्हणे. जुनं ब्येळगाव म्हणजे बाबाची जीवामोलाची ठेव. गोव्याला जाताना बेळगावचा थांबा हा आम्ही नेहमीच घेत असू. किल्ला, जुनी बाजारपेठ, जुन्या गल्ल्या इथे नेहमीची फेरी. काही जुने, जीर्ण शीर्ण झालेले प्रेमळ म्हातारे लोक बाबाला त्याच मायेनं ओळख देत. मराठी बोलत, कानडी बोलत. बाबाही त्या,त्या भाषेत त्यांच्याशी गप्पा मारत असे. ब्येळगावात जे काही १-२ दिवस आम्ही असू, त्या काळाता बाबाचा चेहरा जसा फुललेला असे, ज्याप्रमाणे तो पुन्हा एकदा मूल होई, तसं मी अजून कुठेच त्याला पाहिलेलं मला आठवत नाही! आणि केवळ त्यासाठी ब्येळगावाबद्दल माझ्या मनात खूप आपुलकी, प्रेम आणि माया सतत दाटून येते. एका जुन्या दगडी घरात एकदा बिनदिक्कत त्याला शिरताना पाहून मी दबकले होते, पण तो ज्या जुन्या ओळखीने तिथे शिरला, तितक्याच आपुलकीने त्याचं स्वागत झालेलं पाहून त्या वेळी मला तो इतका महान वाटला होता की बस्स! अगदी येष्टीष्ट्यांडावरचे काही जुने परिचित लोक - त्यात कर्मचारी, हमाल वगैरे सगळेच त्याच्या परिचयाचे! तिथे उतरल्यावर त्यांच्यापैकी कोणी असले की गप्पा ठरलेल्या. त्यासमोर एका इराण्याचे हाटेल आहे तोही परिचयाचा आणि बाजारात त्याच्या मित्राचे दुकान, तेथे तर हजेरी लागायलाच हवी होती. तुम्ही हे जे लेखात लिहिले आहे ना, तसेच तो मला सांगत असे... आज हा लेख वाचून पुन्हा ते सगळे आठवले. मनापासून धन्यवाद.

In reply to by यशोधरा

अच्च बेळगावी माणूस ब्येळगावच म्हणतो आणि निपाणीला निप्पाणी! ;) आमच्याकडेही आजी आजोबां ब्यांकेचे वेव्हार करताना कानडीतून बोलायचे. आमचे आडनावही महाराष्ट्रीय आडनावांच्या मानाने विचित्रच! कोणी धारवाडकर इ. आडनावाचे दिसले तर ओळख करून घेताना आजोबांचा चेहरा अगदी फुलून येई.

In reply to by रेवती

रेवती :) धारवाड हे माझ्या आजी आजोबांचे लाडके होते. आजोबांच्या नोकरीचा बर्‍यापैकी काळ त्यांनी तिथे व्यतीत केला होता. तेथील वातावरणाशी माजी आज्जी खूप समरसून गेली होती. जसे बाबाला बेळगाव अतोप्रिय होते, तसे आज्जीला आणि आजोबांना धारवाड.

In reply to by यशोधरा

धारवाड माझेही खूप लाडके शहर आहे. युनिव्हर्सिटीजवळचा जयनगर भाग, मार्केटमधील लाईन बाजारातील ते बाबूसिंग ठाकूरचे पेढ्यांचे दुकान, तिथले धारवाडी पेढे, ते गावातले दत्तमंदिर आणि वेदपाठशाळा आणि माळमड्डी भागातील जीएंचे घर अजूनही आठवतात. शिवाय मावशीच्या हातचे सप्पिन सारु, बिशिबेळे अन्ना, आवलक्की आणि दोशाबरोबरची चटणीपुडी, आणि माळमड्डीतूनच विकत घेतलेले मांडे, आणि रस्त्यावर मिळणारे 'गिरमीट' ऊर्फ सुकी भेळ, आहाहा......ते हि नो दिवसा गता: ||

लेखन आवडले.. मला भारत - पाक सीमा ( काश्मिर ) प्रश्न यानी ( याची) झिंग चढते ... आणि त्याबाबतीत अपॉलॉजेटीक नसण्याचा निर्णय मी घेतला आहे. बाकी चिगोंशी सहमत.

मार्मिक अन प्रांजळ लेखन. मनापासून पटले. कर्नाटक बॉर्डर पासून २ किमी वर रहात असल्याने पुष्कळ मित्रमैत्रिणी अन परिचित कानडी बोलणारे आहेत. वरील लेखन शब्दशः खरे आहे. खरं तर मराठी माणसांपेक्षा कानडी लोकच जास्त प्रेमळ असतात हा अनुभव आहे. बाकी महान भारत अन गहन राजकारण याबद्दल काय बोलावे ? न बोललेलेच बरे !

मागे लिंक दिलेला कात्रीतलं बेळगाव हा लेख अन तुमचा स्वानुभव अन विचार आवडले. वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात त्यामुळे कदाचित माझ्यासारख्या तिसर्‍या माणसाला असे प्रश्न खूप किचकट वाटतात (थोडक्यात, बेंबट्या होतो).

लेख चांगला लिहिलाय. मी कधीही कर्नाटकात राहीलेले नाही त्यामुळे सीमा प्रश्न वगैरे वाचुनच माहीती आहे. पण कर्नाटक सरकार जर मराठीबहुल सीमा भागात कन्नडची सक्ती करत असेल, बेळगाव पालिका बरखास्त केली असं काही करत असेल तर नक्कीच काहीतरी राजकीय प्रकरण शिजत आहे असं जाणवतं. बाकी जे तिथे राहतात त्यांनाच नक्की काय ते माहीती.

तुम्ही म्हणता ते सार मान्य मुतालिक साहेब. मी स्वतः निप्पाणी भागातलीच. आम्हालाही हा प्रश्न असा जास्त नव्हता जाणवत. पण तोवर सारे अर्ज मराठीत उपलद्ध असायचे. माणस समोर येइल तशी भाषा बदलायची. इव्हन एसटी स्टँड्वर फलक मराठीत असायचे, बस वर मराठी बोर्ड असायचे. आज बेळगावात जाउन पहा. एकही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला मराठीत नाही मिळायच. माझा तर अक्षरशः ढ गोळा होतो कन्नड येत नसल्याने. अन उगा उठल सुटल कन्नड बोला म्हणुन कुणीही हल्ली सुनवुन जात. राग आम्हालाही नव्हता जोवर चटके नव्हते बसत. निप्पाणीच्या गुरुवारच्या...बेस्तरवारच्या ...बाजाराशिवाय आमच पान हलत नाही अजुनही. डिपेंडंन्सी तर सार्‍यांचीच असते. पण त्याच परिवर्तन तुम्ही डिपेंड आहात म्हणुन भिकारी समजण्यात होउ नये.तुम्ही म्हणता कन्नड सक्तीचे होते पण पास होण सक्तीच नव्हत. आज जाउन पहा, माझ्या नवर्‍याच दहावीच परसेंटेज कन्नड सक्तीने खाली गेल. पुर्वीच्या भावना आता उरल्या नाहीत दोन्हीही समाजात हेच खर्.इट इज अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शन.

In reply to by स्पंदना

अपर्णा ताई, मी पण निप्पाणीचाच. शिक्षण मराठी शाळेत. पहिल्या इयत्तेपासुन कन्नड भाषा शिकलो. (कारण-सक्ती). पण त्यात मला फायदे जास्त दिसले. शाळेत सुरुवातीपासुनच कन्नड विषय असल्याने मुलांना त्रास होत नाही. उलट सीमावासीय विद्यार्थ्यांना करीयरसाठी कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही पर्याय असतात. मी चिक्कोडीत शिकलो आणी आता पुण्यात जॉब करतोय. चिक्कोडी कन्नड आणी पुणे मराठी असुनही कुठेच भाषेमुळे अडलं नाही.

लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत. मी मिरजेचा, आजोळ इचलकरंजी, पण सर्व कन्नडिग. त्यामुळे कन्नडचा आणि कन्नडिगांचा परिचय जवळचाच. पण लेखात वर्णन केलेली परिस्थिती आज राहिली नसेल तर मात्र अवघड आहे.

लिखाण म्हणुन वैयक्तीक अनुभव ओक्के टोक्के ! ईतरांचे अनुभव एकले/पाहिले असल्याने 'अन्याय' या विषयावर भाष्य करण्याचे टाळतो आहे. राजकारणाविषयी पुन्हा कधीतरी :)

प्रकटन आवडले, माझेही बरेच मित्र बेळगावला आणि त्या साईडला राहतात तेही बरेसचे आपल्या सारखेच म्हणतात. दारूखस हा शब्द पहिल्यांदाच ऐकला, गांजेकस ऐकून होतो, दारूखस हा शब्द मात्र नवीनच ऐकला.

समस्त मिपाकरांस उत्तमोत्तम प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद. पोच द्यायला जरा उशिर झाला, त्या बद्दल दिलगिरी.