✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गूढ कथा: "भ्रमभारीत"

न
निमिष सोनार यांनी
Sat, 09/29/2012 - 19:30  ·  लेख
लेख
(१) दुपारचे दोन वाजले. अक्षांश जरा जड डोक्यानेच झोपेतून उठला. आई ने त्याला म्हटले, "चल फ्रेश हो. जेवून घे." अक्षांश कालची नाईट शिफ्ट करून सकाळी सातला घरी आला होता. त्याच्या अंगात काळा टी शर्ट होता, त्यावर "व्हाय'रस'? टेक ज्युस!" असे लिहिलेले होते. कॅब दाराशी सोडून गेल्यानंतर झोपेच्या धुंदीतच तो पायर्‍या चढून वर आला, बेल वाजवताच त्याच्या आईने दार उघडले आणि तो बेडवर आडवा झाला होता. आता दुपारी त्याला आपोआप जाग आली होती. झोपेच्या धुंदीत त्याला आईचे "फ्रेश, जेवण" एवढेच ठळक आणि नीट ऐकू आले. त्याने समोरच्या खिडकीतून पाहिले असता जरा अंधारून आल्याचे त्याला जाणवले. खिडकीतून पूर्णपणे पलिकडचे दिसत नव्हते कारण खिडकीसमोरच एक मोठे झाड होते. आता फक्त सहा तासांनंतर पुन्हा नाईट शिफ्टला कंपनीत त्याला नेण्यासाठी कॅब येणार होती. तो कॉल सेंटर मध्ये कामाला नव्हता तर टेक्नीकल सपोर्ट चे त्याचे काम होते. नेटवर्कींग सपोर्ट. चोवीस तास सातही दिवस सपोर्ट. म्हणून शिफ्ट. पण, शेजारचे लोक शिफ्ट ड्युटी असली म्हणजे बहुतेक कॉल सेंटर मध्ये काम असावे असेच गृहित धरत. तसा तो सहसा त्यातला फरक इतरांना समजावून सांगण्याच्या फंदात पडायचा नाही.... पण हे काय? आज जरा डोके दुखतेय? नेहेमी पेक्षा जरा जास्तच. का? अक्षांश फ्रेश होवून आला. त्याने टि.व्ही.ऑन केला. आईने किचनमध्ये जेवण गरम करायला घेतले. टि.व्ही. वर "माय इंडीया न्यूज" चॅनेल लागले होते. म्हणायला ते न्यूज चॅनेल होते पण त्यावर न्यूज वगळता इतरच काहीबाही दाखवत होते. " ये देखिये असली भूत. भूतहा तसवीरें. अगर आप भूतों पे विश्वास नही करते, तो ये प्रोग्राम आपके लिये है. अगर आप भूतों पे विश्वास करते है तो भी यह ये प्रोग्राम आपके लिये है. देखिये कैसे एक घर में एक भूत ने मचाय हडकंप.. देखते रहिये ब्रेक के बाद!" "काय वात आणलाय यांनी बाप रे. डोकं भेंगाळलंय नुसतं. आई SSS", तो ओरडला, "रिमोट कुठे आहे?" स्वयंपाक घरात अन्न गरम करत असतांना आईचे लक्ष किचनच्या खिडकी बाहेर खालच्या बाजूला असणार्‍या एका भाजीवालयाकडे गेलं. आईचे लक्ष नाही पाहून अक्षांश ने स्वतःच रिमोट शोधला आणि "फायदे की आवाज" चॅनेल लावला. त्याने गुंतवलेल्या शेअर्स चे भाव खालच्या सरकणार्‍या पट्टीवर येईपर्यंत तो वाट पाहू लागला. आई त्याचे समोर येवून म्हणाली, " अरे अक्षांश, ऐक. अन्न गरम करून वाढून ठेवले आहे. खाऊन घे. मी जरा भाजी घेवून येते, गाडीवाल्याकडून. दोन चार दिवसांसाठी. आज रात्रीसाठी डबा नेणारेस की कॅन्टीन मध्येच खाणार? म्हणजे त्यानुसार मी आतासाठी सुद्धा भाजी आणते..." "आई... सरक बाजूला. माझा शेअर सरपटत निघून जाईल...मी रात्री जेवेन कॅन्टीन मध्येच किंवा बाहेर कुठेतरी!" "बरं!" असे म्हणून आई खाली निघून गेली. अक्षांश किचनमधून ताट वाढून टि.व्ही. समोर आणून जेवण करु लागला. त्याने गुंतवणूक केलेला शेअर आहे त्याच किमतीत होता. आठशे रूपये! ना कमी , ना जास्त. जेवतांना सहज म्हणून खिडकी कडे लक्ष गेले असता, त्याला दिसले की पाऊस वेगाने बरसायला लागला होता. विजा चमकत होत्या. अचानक कोण जाणे त्याची नजर झाडावर खिळली. खिळूनच राहिली, डोळ्यांच्या पापण्या न हलता! त्याला दोन शून्य दिसले. पुसटसे. अस्पष्टसे. त्या शून्यांकडे तो शून्यात हरवल्यासारखा बघत राहीला. विजेच्या लखलखाटात ते दोन शून्य स्पष्ट दिसायला लागले. त्यापैकी एका शून्यांत एक मानवी कवटी आपल्याच धुंदीत हसत होती. दुसर्‍या शून्यात आणखी एक कवटी होती. तीच्या चेहेर्‍यावर प्रथम खिन्नता आणि विषाद् व नंतर कारुण्य, वैषम्य असे भाव दाटायला लागले. विषाद आणि खिन्नता जेव्हा त्या कवटीच्या चेहेर्‍यावर दिसली तेव्हा ती सगळ्यात भेसूर कवटी वाटत होती. वीज मावळली. नंतर लख्ख अंधार! केवळ अंधार. पुन्हा वीज कडाडल्यावर तेथे कुरळ्या केसांचा एक अस्पष्ट चेहेरा आकार घ्यायला लागला. समोर काय दिसतंय आणि का दिसतंय असा विचार अक्षांश च्या डोक्यात यायच्या आधीच त्याचे विचार थिजून गेले होते....दृष्टी तर थिजली होतीच. फक्त समोर काहीतरी अमानवी दिसत होते, याची जाणीव मनाच्या कोपर्‍यात त्याला होत होती. "त्सामिना मीना एह एह, वक्का वका एह एह, त्सामिना मीना झांगलेवा, धीस टाइम फॉर आफ्रिका!" असा रिंगटोन त्याच्या मोबाइलमध्ये वाजल्यावर त्याची ती नजर बंद करून टाकणारी तंद्री भंग पावली. "हॅलो!" अक्षांश भेदरलेल्या अवस्थेत म्हणाला. "हॅलो अक्स! अरे दचकलास की काय माझ्या फोनने? झोपला होतास का?" "नाही रे. काही नाही. असंच आपलं! बोल तू!" त्याला आलेल्या अनुभवाला मुद्दाम विसरत तो म्हणाला. "मी म्हटलं की येतोस का माझे घरी? थोड्या गप्पा गाणी आणि थोडी रपेट मारून येवू या अफाट शहरात! आज मला आज थोडे खासगी काम होते, म्हणून सुटी घेतली होती पण आता ते काम झाले आणि मी फ्री आहे. मधुरा पण फ्री आहे. ती सुद्धा येते आहे कारण तीच्या रुम पार्ट्नर्स दोन्ही सुद्धा बाहेरगावी गेल्यात!" पलीकडून अभय बोलत होता. "हे मनातलं बोललास. जेवण संपवून मी निघालोच." आता पावसाचा जोर कमी झाला होता. जेवण आटोपून, रेनकोट घालून, हेल्मेट घेवून आणि दरवाज्याला लॅच लावून तो खाली निघाला. आई ने भाजी घेतलेली दिसत होती आणि ती कुणा शेजारच्या ओळखीच्या स्त्रीशी बोलत घराच्या एका ओट्यावर छताखाली बसली होती. बाईक स्टार्ट करून त्याने घराची चाबी आईकडे फेकली आणि ओरडला, "आई, मी जरा येतो अभयकडे जावून SSS ही चाबी घे...!" चाबी आईजवळ ओट्यावर पडली. आई त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, " ठीक आहे. संध्याकाळी ये लवकर घरी, सात साडेसात पर्यंत!!" पावसाच्या धारा कापत फक्त "घरी लवकर" एवढाच आवाज त्याचे पर्यंत पोहोचला. (२) पाऊस कमी असला तरी अंधारून आलेले होते. आता तो थोडा शहराबाहेरील निर्जन रस्त्यावर होता. अक्षांशच्या बाईक चा वेग जसजसा वाढत होता तसतसा बाईकचा वेगदर्शक काटा मात्र विरुद्ध दिशेने फिरतोय असे लक्षात आल्यावार तो हादरला आणि त्याने त्या वेगदर्शकाच्या काचेत पाहिले. तर तेव्हा मात्र काटा योग्य दिशेनेच जात होता. मग, आधी दिसलेते काय होते? भास? आणि हे काय? आता मात्र काचेत त्याने जे पाहीले त्यामुळे त्याच्या तोंडातून आरोळी सुद्धा निघू शकली नाही इतका तो हादरला. त्याचे हेल्मेट घातलेले प्रतिबिंब त्याला दिसले खरे पण हेल्मेट्च्या आत पिवळी कवटी होती...अचानक अनुभवलेल्या या भयाने तो सैरभैर झाला आणि त्याने हेल्मेट काढून बाजूच्या झुडुपांत फेकले. त्याची बाईक थोडक्यात पडता पडता वाचली आणि त्या अंधार्‍या झुडुपांत त्या हेल्मेट्च्या आत मात्र एक जळणारी पिवळी कवटी हसत होती. आता पाऊस बंद झाला होता. अभयचे घर अजून दोन किलोमीटर होते. विना हेल्मेटनेच तो निघाला. हा भयप्रद अनुभव त्याला मनापासून हादरवून गेला. आता हे नक्की मी अभयला सांगतो, असे ठरवून तो अभयच्या घरी पोहोचला. मधुरा आलेली होती. तीने काळी थ्री फोर्थ जिन्स आणि लाल तंग टी शर्ट घातलेला होता. अभयने जिन्स आणि हिरवा टी शर्ट घातला होता. तीघे कॉलेजपासूनचे मित्र. शिकले याच शहरात, जॉबपण याच शहरात. त्यामुळे वरचेवर भेटणे व्हायचे. तिघे बॅचलर्स. अभयच्या रुम मध्ये नवीन गाणी ऐकत त्या निघांनी दुपार घालवली. मग त्यांनी संध्याकाळी हॉटेलमध्ये जायचे ठरवले. "डिलक्स डिनर डायजेस्ट" म्हणजे थ्रीडी मध्ये संध्याकाळी डिनरच्या वेळेस दिवसातले दोन विचित्र अनुभव अक्षांशने सांगितले. अभय: "हे बघ मित्रा, आपण जीवंत असतांना मेलेल्या माणसांच्या गोष्टी कशाला करायच्या? एन्जॉय यार. ही अमीता बघ. मस्तपैकी आठवडाभर आपले काम व्यवस्थित करते. पैसा कमावते. नंतर त्या अंकेश बरोबर मस्त एन्जॉय पण करते. नंतर ही सुद्धा जाणारेय युएस ला. लोक कुठल्या कुठे चाल्लेत. तू आपला करत बसलास भूत भूत...." मधुरा : "अक्षांश, खरे सांगायचे तर विज्ञानाकडे या गोष्टीचं पण उत्तर आहे. याला भास असे आपण म्हणतो. मनात विचार जास्त झाले की असे होते, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की देशाचे जसे होते तसे! मन एका मर्यादे पलीकडे जास्त विचार सहन करू शकत नाही." अभय: "किंवा मनात एकाच प्रकारचे विचार जास्त गर्दी करू लागलेत कि सुद्धा असे भास होतात, जसे एखाद्या देशात हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त जाल्यावर देशाचे जसे होते तसे, बरोबर ना मधुरा?" मधुरा हसली. अक्षांश: " अरे पण, मझ्या मनात तशा प्रकारचे काही विचार नव्हतेच...खरं सांगायचं तर, कोणत्याच प्रकारचे विचार नव्हते मनात!.. तरीही असे कसे होईल?" मधुरा: "अशा वेळेस आपलं सुप्त मन जागृत होतं आणि आपल्या मुख्य मनाला विचार पुरवतं! गॉट इट? आता चल पार्टीचा मजा किरकीरा करू नको... तिकडे बघ!" स्टेजवर आकर्षक गायिका मादक स्वरात गाणे गात होती. तिघांची ती संध्याकाळची सोबत त्यांनी मस्त मजेत घालवली. नंतर थोडे डिजे वर थिरकून मग एकमेकांना बाय बाय करून ते तीघे आपापल्या घरी गेले. रस्त्याने येतांना अक्षांशला जेथे हेल्मेट फेकले होते ती जागा आल्यावर तिकडे लक्ष देण्यावाचून रहावले नाही. तेथे हेल्मेट नव्हते. पण बाईक थांबवून कुतुहल म्हणून त्याने त्या झुडपांत पाहिले. तेथे शांतता होती. हेल्मेट कुठेच नव्हते. तो पुन्हा रस्ता ओलांडून बाईक कडे वळला तेथे एक आश्च्रर्य त्याची वाट बघत होते. बाईकच्या हॅण्डलला त्याचे तेच कालचे फेकून दिलेले हेल्मेट लावलेले त्याला दिसले. त्या निर्जन ठीकाणी एखाद दुसरीच बाईक जाता येतांना दिसत होती. एक बाईकस्वार अक्षांशपासून थोड्या अंतरावर थांबला कारण त्याला मोबाईलावर एक कॉल आला होता. गाडी बाजूला लावून तो मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचे लक्ष अक्षांशकडे गेले. अक्षांशकडे सहजपणे त्याचे लक्ष गेले असता डोळ्यात आणि चेहेर्‍यावर विचित्र कुतुहलमिश्रीत भाव तरळले आणि त्याचे डोळे विस्फारले. अक्षांश ने अभयला कॉल केला आणि म्हटले, "माझे आलेले अनुभव मी संगितल्यावर तुम्ही हसत होतात? अरे मी तुम्हाला सांगितले होते ना त्या फेकून दिलेल्या हेल्मेटबद्दल! ते आज मला इथेच सापडले! पुन्हा! या इथे..." आणि त्याचे वाक्य अपूर्ण राहिले कारण ते हेल्मेट आता तेथे नव्हते. त्याच्या तोंडातून पुढे शब्द फुटत नव्हता. त्याने मोबाईल बंद केला. त्याचे मनात विचार आला की आपण त्या दुसर्‍या बाईकवरच्या माणसाला विचारूया की हेल्मेट त्याने तरी जरूर आपल्या गाडीवर पाहिले असेल. पण तो बाईकवाला तेथे नव्हता. बाईक चा आवाज सुद्धा न येता आता येथे उभा असलेला तो बाईकस्वार अचानक कुठे गेला होता? ...त्याने भेदरलेल्या अवस्थेत बाईक सुरू केली आणि मागे वळून न पहाता, वेगाने तो घरी पोहोचला. आठ वाजणारच होते. आलेल्या अनुभवाबद्दल आता तरी आईला सांगायचे नाही असे त्याने ठरवले. आईशी जुजबी बोलून तो रात्रपाळी साठी कॅब च्या पिकअप पॉइंटकडे निघाला. नाईट शिफ्ट करून झोपेत बाईक चालवणे धोकेदायक असल्याने त्याने कॅब सेवा स्वीकारली होती. कॅबमध्ये बसल्यावर अभयचा मॅसेज होता त्याच्या सेलवर आलेला त्याने पाहीला: "व्हॉट्स त मॅटर, ड्युड?"" अभयला त्याने मॅसेज पाठ्वून दिला: "नथींग सिरियस. जस्ट आय वाज जोकिंग!" अभय ने लिहिले: "गुड दॅट इट वॉज अ जोक! रिलॅक्स अन डू वर्क! गुड नाईट..." (३) "त्सामिना मीना एह एह, वक्का वका एह एह, त्सामिना मीना झांगलेवा, धीस टाइम फॉर आफ्रिका!" ऑफिसमध्ये त्याने नुकतेच कॉम्प्युटरवर लॉगीन केले होते आणि तेवढ्यात डेस्कवर ठेवलेला सेलफोन वाजला. "अरे अक्षांश्...मै नही आ रहा हूं आज. थोडी तबियत ठीक नही है..!" पलीकडून अभिषेक होता. " ठीक है यार. चल फिर आराम कर." "अरे सिर्फ वो तीन टी़टी है मरे नाम के, वो बस जरा रिझोल्व कर देना. वैसे मैने मेल डाला हुवा है युजर्स को! अगर कॉल आता ही है तो युजर्स को इन्फोर्मेशन बता देना. डेस्क्टॉप पे अभि न्यू करके एक डॉक्युमेंट है... उसमे लिखा हुवा है की क्या इन्फर्मेशन बतानी है. मैने मॅनेजर को मेल डाल डिया है की आज मै नही आ पाऊंगा... चल बाय!" फोन कट! अक्षांश मनात म्हणाला, "घ्या! म्हणजे आज हा येणार नाही. माझे काम डबल झाले. आणि येस... रोस्टर नुसार या प्रोजेक्ट्चे आम्हीच दोघे नाईटला होतो...वेळेवर हा आजारी पडला म्हणजे या युनिटमध्ये आणि या बिल्डींगच्या या सातव्या फ्लोअरवर मी एकटाच ... पूर्ण रात्र्..!! बोअर होणार! हम्म! माझे मेल आता चेक करतो...पाहू किती वर्क लोड आहे आज रात्री!" तो मेल चेक करू लागला. दिड वाजेपर्यंत हातातली सगळे कामे त्याने आटोपली. सगळे कॉल अ‍ॅड्रेस केले. आता नवीन एखादे टीटी आले किंवा कस्टमर्चा कॉल आला तरच काम असणार होते आणि दर अर्ध्या तासाने करावराची रुटीन चेक अ‍ॅक्टीव्हिटी. त्याला थोडी डुलकी लागायला लागली. त्याने समोर भिंतीवर लावलेल्या तीन पैकी भारतातली वेळ दाखवणार्‍या घड्याळात पाहीले. सगळे अंक इंग्रजीत होते. रात्रीचे दोन चाळीस वाजले होते. मिनिट काटा आठवर होता. इतर दोन घड्याळे युके आणि युएस मधली वेळ दाखवत होते. आठवर असलेला मिनीट काटा गळून पडला. आठ चा आकडा दोरखंदाने बनलेला होता आणि त्याची आठ बनवणारी गाठ सुटून आठ शून्य बनले. शून्याच्या आत तोच अस्पष्ट आणि कुरळे केस असलेला चेहेरा ....दुपारी झाडावर पाहीलेला.... त्यानंतर नऊ आणि सहा अंक घड्याळाच्या मध्याभागी आले. सहा जवळ नऊ आला आणि उलटा झाला. आता सहा आणि नऊ यांनी एकमेकांना आरशात पाहिल्यासारखी स्थिती होती.....नंतर सात अंक भूकंप झाल्यासारखा हलू लागला आणि एखाद्या सिंहाप्रमाणे इकडे तिकडे येरझारा घालू लागला.....ते पूर्ण घड्याळच अस्वस्थ झाले होते....तीन वाजले! "ट्डींग" असा डेस्कटोप वर आवाज आला आणि त्याने पाहीले चॅटींग मध्ये त्याचा युएस मधला मित्र आवान होता. "हे अक्स. यु फ्री?" घड्याळात पाहिलेल्या त्या भासाचा अर्थ लावण्यापूर्वी त्याची तंद्रीभंग पावली. त्याने आवान ला टाईप केले: "येस. एक मिनिटांत येतो..." कॉफी व्हेंडींग मशीन मधून त्याने गरमागरम इलायची चहा चे बटण दाबले आणि वाफाळता कप घेवून डेस्क वर आला. बरे झाले हा ऑनलाईन आहे. युएस मध्ये आता दिवस आहे. आता चहा घेवून झोपेवर पण नियंत्रण ठेवता येईल आणि याच्याशी बोलत बोलत टाईमपास होईल. भास पण होणार नाहीत!!आवान त्याचेसोबत इंजिनियरींगला होता. मग नंतर सात वर्षे त्यांची भेट झाली नव्हती. तो लगेच युएस ला निघून गेला होता. तेथे कसल्याशा फायनान्शियल फर्म मध्ये जॉईन झाला होता. फेसबुक वर भेट होत होती. अधून मधून. त्या दोघांच्या आवडी निवडी, वैचारीक पातळी सारखी होती. "बोल रे. कसे काय चाल्लेय तिकडे?" "अक्स. फसलोय रे. जाम फसलोय." "का? काय झालं?" "आमच्या फर्म चं दिवाळं निघालं. इतर दुसरीकडे नोकरी मिळेनाशी झाली आहे..." "अरे तिकडेच माझा कझिन आरव असतो.बघ तो काहितरी मदत करू शकेल तर! मी पत्ता देतो..." " नाही रे! उशीर झालाय!" " म्हणजे?" "अरे! शेअर्स मध्ये गुंतवलेले माझे सगळे पैसे बुडाले. युएस आणि इंडीयन मार्केट मधले सगळे!" "हा यार. आपन दोघांनी पैसे गुंतवलेला तो शेअर वाढतच नाहीये. कित्येक महीने झाले." " अरे मी खुप धोका पत्करून त्यात पाच लाख गुंतवले होते...! त्या वेळेस फर्म डबघाईला जाणार असा अंदाज बांधला जात होता. त्यावेळेस मी तुला या शेअर मध्ये किती रुपये गुंतवले ते सांगितले नव्हते कारंण तू मला तसे करू दिले नसते...तो शेअर पूर्वी सोळाशे ला होता आता आठशेलाच झालाय! सगळी कडे नुकसानच नुकसान...." "असे? मी काय मदत करू शकतो? शक्य ते मी करेन. त्याच शेअर मध्ये मी पण गुंतवले पण, त्या वेळेस आठशे च होता आताही आठशेच!" "मदत्? आता उशीर झालाय! फक्त एकच काम कर..." "अरे असे काय निगेटीव्ह बोलतोस? आपण गोष्टी सावरू शकतो" " हाहा...शक्य नाही. फक्त एकच काम कर्, मी तुला एक ईमेल केलंय. त्याची अ‍ॅटॅचमेंट फाईल ओपन कर, प्रिंट कर आणि माझे घरी दे. त्याचा पासवर्ड पण मी मेलमध्ये पाठवलाय" "अरे पण इकडे येना भारतात. येथे तुला जॉब मिळेल." "आता उशीर झालाय... हे सगळे मी घरी सांगितले नाही. मी येथे एका संस्थेत पैसे पण गुंतवले होते. तेही बुडाले. घरी कोणत्या तोंडाने हे सांगणार? कर्ज होते.... बँका मागे लागल्या होत्या!तुला चॅटींग वर मिळवण्यासाठी मला किती आटापिटा करावा लागला माहितेय? एवढं सोपं नाहीये ते! आत्मा शरीरातून निघून गेल्यावर किंवा आत्मा स्वतः आपण बळजबरीने बाहेर काढल्यावर मग एखाद्या मित्राशी चॅटींग करून निरोप कळवणं एवढं सोपं नाहीये.... सगळं उलटं झालं होतं.... माझी गाडी वेगाने चाललीय असं वाटत होतं मला. पण प्रत्यक्षात तीचा वेग कमी कमी होत जाऊन ती थांबली...सगळे माझे निर्णय बूमरॅन्ग झाले सात आकड्यासारखे...मार्गच सापडत नव्हता....आठ आकड्यात अनंतपणे गाडी चालवावी...तसे! फिरून परत त्याच त्याच जागी.... अनंतपणे!!!" "म्ह...म्हणजे", थरथरत्या हाताने अक्षांशने टाईप केले, "तू तू जिवंत नाहीस?" "नाही. दोरखंडाची फार मदत झाली मला आत्म्याला मुक्त करण्यासाठी...चल बाय...सी यू टुमारो असे मी म्हणत नाही...मी गेले आठ तास झाले जग सोडून गेलो आहे! त्या आधी मला खुप प्रकर्षाने वाटत होते की तुला हे सांगावे ....पण अशा रसातळाला गेल्यावर माणसाचा असा गोंधळ उडतो ना... वेळेवर काही नीट सुचतच नाही....तुला कॉल करता आता असता...पण, मनाचा फार गोंधळ उडाला होता... तुझा बदललेला नंबर माझेकडे नव्हता... शेवटी वेळेवर जे सुचले नाही ते वेळनिघून गेल्यावर सूचले.....मी सांगतो... येथे फार वेगळे जग आहे बाबा!! येथे खिन्नता, विषाद, कारुण्य असे खुप काही आहे.... आता माणसे घाबरून जातात मला. मी तुझ्याशी चॅटींग करतांना किबोर्ड आणि माऊस आपोआप चालत असल्याने शेजारचा माणूस बेधुद्ध पडला..ते असूदे! कधीतरी पुन्हा मी चॅटींग करेन तुझ्याशी...गरज पडेल तशी! बाय! मी अजून काही जणांचा हिशेब चुकता करून मग अवकाशात जाणार...तुला एक सांगतो... तो आठशे वाला शेअर उद्या विकून टाक्...अकरा वाजेच्या आत...नाहीतर बुडशील!!!" .... अन तो ऑफलाईन झाला. हाच तो कुरळ्या केसांचा अक्षांशचा मित्र! सुन्न होवून अक्षांश विचार करत राहीला. एखादा अणु किंवा रेणू पोझीटीव्ह किंवा निगेटीव्ह चार्ज (धन किंवा ऋण भार) धरतो...तसाच तो कालपासून भ्रमभारीत झाला होता...पण आता त्या भ्रमभारापासून तो मुक्त झाला होता. जे काय सगळे कालपासून तो अनुभवत होता ते याच साठी.... कालचे बोलणे त्याला आठवले, ".....अक्षांश, खरे सांगायचे तर विज्ञानाकडे या गोष्टीचं पण उत्तर आहे. याला भास असे आपण म्हणतो. मनात विचार जास्त झाले की असे होते, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की देशाचे जसे होते तसे! मन एका मर्यादे पलीकडे जास्त विचार सहन करू शकत नाही.......मनात एकाच प्रकारचे विचार जास्त गर्दी करू लागलेत कि सुद्धा असे भास होतात, जसे एखाद्या देशात हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त जाल्यावर देशाचे जसे होते तसे, बरोबर ना मधुरा?.... अरे पण, मझ्या मनात तशा प्रकारचे काही विचार नव्हतेच...खरं सांगायचं तर, कोणत्याच प्रकारचे विचार नव्हते मनात!.. तरीही असे कसे होईल...... अशा वेळेस आपलं सुप्त मन जागृत होतं आणि आपल्या मुख्य मनाला विचार पुरवतं! गॉट इट? आता चल पार्टीचा मजा किरकीरा करू नको... तिकडे बघ!" अक्षांश मनात म्हणाला, "नाही मधुरा...सुप्त मनालासुद्धा कधीतरी कुणीतरी विचार पुरवतो...ते विचार बाहेरून कुठून तरी आपल्या मनात शिरतात आणि त्यामुळे भ्रम होवू शकतात...ते साधे विचार नसतात. ते विशिष्ट ध्येयाने भारीत विचार असतात..." ....त्याने ईमेल चेक केला. नुकताच एक ईमेल आला होता. सोबत अ‍ॅटॅचड डोक्युमेंट होती. ईमेलमध्ये फाईलचा ओपन करण्यासाठीचा पासवर्ड लिहिला होता...8697" ... शेजारी डेस्कवर त्याचे हेल्मेट होते. ते शांत होते!! (समाप्त)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13169 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

आवडेश

निनाद मुक्काम …
Sat, 09/29/2012 - 21:46 नवीन
आवडेश येथे बेधुंद पाऊस कोसळत आहे. कालपासून आधी स्पा आणि आता तू मस्त भट्टी जमवून आणली आहे. कामाचा सारा शीण निघून गेला. झकास
  • Log in or register to post comments

मस्स्त!!

तुषार काळभोर
Sat, 09/29/2012 - 22:00 नवीन
मस्स्त थ्रिलर!
  • Log in or register to post comments

मस्त भयकथा!

पैसा
Sat, 09/29/2012 - 22:57 नवीन
बरेच दिवसांनी लिहिलीत! पण झक्कास!
  • Log in or register to post comments

रंजक

मन१
Sat, 09/29/2012 - 23:14 नवीन
रंजक. मळलेली वाट, पण तरीही जमलय.
  • Log in or register to post comments

झक्कास लिहलंय.

किसन शिंदे
Sun, 09/30/2012 - 00:53 नवीन
झक्कास लिहलंय. पण... काही ठिकाणी वाचताना बराच गोंधळ उडाला.. अभय घरातून दुपारी बाहेर पडतो...मग संध्याकाळपर्यंत मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर वाटेतले अनुभव सांगून परत निघतो, कामाला जाण्यासाठी....पण परत येताना त्याला ते हेल्मेट दिसत नाही जे त्याने 'काल'?? :o फेकून दिलेले असते. काळ-वेळ चुकलीय का? कि माझाच काही गोंधळ उडतोय? :(
  • Log in or register to post comments

मधुरा की अंकिता?

प्रभाकर पेठकर
Sun, 09/30/2012 - 01:36 नवीन
>>>>एन्जॉय यार. ही अमीता बघ. मस्तपैकी आठवडाभर आपले काम व्यवस्थित करते. बरोबर मधुरा होती नं! ही अंकिता कोण? कुठून आली? कुठे गेली? सगळीच 'भयकथा'.
  • Log in or register to post comments

अनावधानाने झालेल्या चूकीबद्दल क्षमस्व...

निमिष सोनार
Sun, 09/30/2012 - 08:23 नवीन
>>>>एन्जॉय यार. ही "मधुरा" बघ. मस्तपैकी आठवडाभर आपले काम व्यवस्थित करते.बाईकच्या हॅण्डलला त्याचे तेच >>> बाईकच्या हॅण्डलला त्याचे तेच "येतांना" फेकून दिलेले हेल्मेट लावलेले त्याला दिसले. >>> अरे मी तुम्हाला सांगितले होते ना त्या फेकून दिलेल्या हेल्मेटबद्दल!
  • Log in or register to post comments

काही कारणास्तव खाली दिलेले वाक्य टाकायचे राहीले ते वाचा....

निमिष सोनार
Sun, 09/30/2012 - 08:30 नवीन
आवानः "त्या आधी मला खुप प्रकर्षाने वाटत होते की तुला हे सांगावे ....पण अशा रसातळाला गेल्यावर माणसाचा असा गोंधळ उडतो ना... वेळेवर काही नीट सुचतच नाही....तुला कॉल करता आता असता...पण, मनाचा फार गोंधळ उडाला होता... तुझा बदललेला नंबर माझेकडे नव्हता... शेवटी वेळेवर जे सुचले नाही ते वेळनिघून गेल्यावर सूचले..."
  • Log in or register to post comments

खरं सांगु, जम्या नाय. तुमच्या

५० फक्त
Sun, 09/30/2012 - 09:42 नवीन
खरं सांगु, जम्या नाय. तुमच्या पुर्वीच्या लिखाणापेक्षा थोडं कमीच राह्यंलंय..
  • Log in or register to post comments

कवटी वापरून घाबरवण्याचे धंदे

यकु
Sun, 09/30/2012 - 13:56 नवीन
कवटी वापरून घाबरवण्याचे धंदे बंद होतील तो सुदिन ;-) कवट्या सगळ्यांनाच असतात त्यात एवढं शिरेस?
  • Log in or register to post comments

मस्त झाली आहे गूढ कथा़

ज्ञानराम
Sun, 09/30/2012 - 16:19 नवीन
मस्त झाली आहे गूढ कथा़ , वाचतेय आणखी येऊ द्यात. "आता माणसे घाबरून जातात मला. मी तुझ्याशी चॅटींग करतांना किबोर्ड आणि माऊस आपोआप चालत असल्याने शेजारचा माणूस बेधुद्ध पडला..ते असूदे! कधीतरी पुन्हा मी चॅटींग करेन तुझ्याशी." -----------हे एकदम विनोदी वाटलं ,.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा