आई...!
तुला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या
तुला खूप हसू आलं असतं ऐकून
तुझ्याशिवाय दुसर्या कुणाला यात रस नाही
आणि असला तरी कुणी तुझ्यासारखे समजून घेणार नाही आई
समजून घेतले तरी त्यात काही मजा नाही वाटणार त्यांना...
तुला सांगायचं होतं की आज सकाळी चहा करताना
साखरेऐवजी मीठ घातलं मी
पण कुणीच म्हटलं नाही, तू असा ढ च राहशील
तुला नाही जमणार चहा, बाजूला हो, मी करते...!
आई, तुला सांगायचं होतं की आज बाबांना
मी पाणीपुरी खाऊ घातली, जे ती कधीच खात नाहीत
आणि किती मजा... सगळे पाणी तर
बशीतच सांडले... पाणीपुरी तोंडात घालण्याआधीच
तुला सांगायचे होते की
तो गल्लीच्या कोपर्यावरचा दुकानदार नाहीये आता
छोट्या दाढीचा... जो साबणाचा एक रुपया जास्त घ्यायचा
बेईमान... पण त्याला कधी कुणी समजावलं नाही
की करशील तसं भरशील... एका रुपयासाठी जीव घालवू नको...
आई, तू नेहमी रागवायचीस ना
कि सगळ्या विषयांच्या वह्यांची मागची पानं मी कवितांनी का भरून टाकतो
आता पहा, किती लोक बोलावतात मला याच कविता ऐकवायला.. मला...
बघ ही शाल देखील दिली आणि...
तुला माहीत आहे ना आई मी भाषण किती छान देतो
मोठमोठी संमेलनं, सभा, चर्चासत्रांना जातो...
उदारमतवाद, बाजारीकरण, परदेशी पैसा, शिक्षणाची गरज... सारं बोलतो
मोठमोठे लोक ऐकतात... मोठमोठ्या गोष्टी बोलतो...
फक्त छोट्या गोष्टी ऐकण्यासाठी कुणी नाहीये आई
तू तर छोट्या छोट्या गोष्टींनी किती खुश व्हायचीस
मोठमोठ्या गोष्टी जगण्याचा देखावा करण्यासाठी बर्या असतात
पण जगणे तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असते ना...
तू ऐकलं असतस तर तुला किती मजा वाटली असती प्रत्येक गोष्टीची
तू ऐकलं असतस तर मला किती मजा वाटली असती जगताना...
तू कांदा चिरायला सांगायचीस... तेव्हा रडू यायचं चिरताना
अजूनही रडू येतं आई... कांदा चिरता... चिरता....
किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत आई.
जगणं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतं... तुला तर माहीत आहे ना आई...
तू ऐकलं असतंस तर... तू ऐकून तरी घेतलं असतंस ना एकदा...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2826
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
+१
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद सुरेख.
सुरेख जमलाय अनुवाद
हे उत्तम जमलंय.
सुरेख अनुवाद!
अतिशय सुरेख आशय. अनुवाद
अरे हो... एक सांगायचं होतं.
कवितान्तरण
In reply to अरे हो... एक सांगायचं होतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोटी छोटी बातें
सही
In reply to छोटी छोटी बातें by Kavita Mahajan
:-)
In reply to सही by श्रावण मोडक
प्रवाही
In reply to छोटी छोटी बातें by Kavita Mahajan