Skip to main content

बरबटलेले साहित्यक्षेत्र

लेखक Kavita Mahajan यांनी गुरुवार, 13/09/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं." हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते. असंच असेल तर मग उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराला किडनॅप करणे, मतदारांना पैसे वा काही वस्तू वाटणे, मतपेट्या पळवणे इत्यादी सगळे प्रकारदेखील राजकारणात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपण पाहत ऐकत आलेलो असतोच. हे सगळेही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत होऊ द्यायचे का? कारण 'करावंच लागतं' मध्ये असं काहीही येऊ शकतं आणि निवडणुकांमध्ये ते क्षम्यही मानलं जातं. "मी जात सांगून मत मागितलं नाही," असं ह.मो. म्हणत असले तरी मुळात जात सांगितलीच कशाला? जातिनिरपेक्ष विचार करणार्‍या दुसर्‍याची जात विचारण्याची व स्वतःहून ( अकारण ) स्वतःची जात सांगण्याची गरज भासत नाही. "असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले. तेही अनेकांना आक्षेपार्ह वाटले. जुन्या समर्पक म्हणी आहेत. तिचा अर्थ पाहिला, तर ह.मों.च्या वर्तनाशी ती तंतोतंत जुळते. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. मग संमेलनाचे चिपळूणचे आयोजक यांनीही याचा निषेध केला. एकूण सारे साहित्यक्षेत्र या निवडणुकींच्या धुरळ्यात दरसाली बरबटते, याची मात्र खंत वाटते.

वाचने 27271
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by Kavita Mahajan

हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे.
असा निष्कर्ष इतक्या ठामपणे तुम्ही कसा काढला. या बाबत ह.मो. ना त्यांची बाजू विचारायला हवी असे मला वाटते.
हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत.
ह. मो. हे ब्राम्हण आहेत आणि त्यांनी आपल्या जातीबांधवांसाठी काही कार्य केले असेल आणि त्याचा उल्लेख आपल्या पत्रकात केला असेल तर ते जातीयवादी ठरत नाहीत. ते दुसर्‍या जातीबद्दल कुठेही जाहीर पणे अपप्रचार करीत नाहीत. ते आपल्या लेखातून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत असे या वरून सिद्ध होत नाही .
त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे .
असे म्हणणे मला संयुक्तीक वाटत नाही. घटनेने सर्वांना विचाराचे आणि ते विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या विचाराचा प्रतिवाद करू शकता पण त्याला 'गरळ ओकणे ' असे लेबल लावणे योग्य वाटत नाही. आणि जेम्स लेन च्या पुस्तकाबाबत ह. मो. नी स्वतःच सांगितले आहे त्या पुस्तकातील मतांशी ते सहमत नाहीत. फारतर ही नंतर केलेली सारवासारव आहे असे कुणी म्हणू शकतात. हे सगळे वादविवाद ऐकताना, वाचताना एक मनात येते, कुणी कुणाला जातीयवादी म्हणावे?, सामाजिक तेढ नक्की कोण निर्माण करते आहे यावर सर्वांनी विचार करायला हवा. आणि यात महाराष्ट्र शासनाने काही भूमिका घेणे गरजेचे आहे असे वाटते. जे शासन "माय नेम इज खान' सारख्या चित्रपटाला संपूर्ण संरक्षण देते, त्याच शासनाने तेच धोरण संमेलनासंदर्भात घ्यायला नको का? ह. मो. जातीयवादी आहेत की नाही, त्यांची लेखक म्हणून पत काय आहे? हे त्यांचे मतदार ठरवतीलच. पण संमेलन कुठल्याही परिस्थितीत उधळले जाणार नाही याची हमी सरकारने घ्यायला हवी. तरच महाराष्ट्र हे वैचारीक स्वातंत्र्य जपणारे, आणि जातीयवाद न मानता सामाजिक समानतेवर विश्वास ठेवणारे राज्य आहे असे आपल्याला म्हणता येईल.

चर्चे दरम्यान महाजन बाईंचे छद्मी आणि श्री. बागवे ह्यांचे गालातल्या गालात हसणे बरेच 'बोलके' होते. खि:खि:

जातीचे विषारी फूल निवडणुकीत फुलणार साहित्य संमेलनही मागे कसे राहणार ? कामगिरी फत्ते झाली की दिलगिरी येते पाठोपाठ कुणाचे हीत कुणाचे मिलन सर्वांना आहे तोंडपाठ अमोल केळकर

हमोंचे ते वादग्रस्त पत्रक इथे उपलब्ध करून देण्यात आले तर त्या पत्रकाचा अभ्यास करून उत्तरे देता येतील. कारण कविता महाजन आणि श्री. नरके ह्यानी ते पत्रक तपशीलवार वाचले आहे (असे वाटते) आणि मिपा सदस्य फक्त 'त्या' मुलाखतीचा तपशीलच जाणतात. त्यामुळे चर्चा विषम पातळीवर होते आहे. पत्रक वाचून श्री. नरके ह्यांनी जे अर्थ लावले आहेत ते कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहेत हे कोण आणि कसे ठरवणार? ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. कविता महाजनांच्या लेखातील त्यांचे वरील विधान, आशू जोग ह्यांनी दिलेली 'लिंक' पाहता, असत्य असल्याचे जाणवते. ह.मो. निवडून आल्यास संमेलनावर बाह्मणी सावट असेल का? असा प्रश्न प्रसन्न जोशींनी उपस्थित केला होता. 'सावट असेल' असे विधान केलेले नाही. डॉ. सदानंद मोरेंनीही ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिलेले आहे. श्री. बागवेंनीही नकारार्थी उत्तर दिले आहे आणि श्री. विठ्ठल वाघ ह्यांनीही 'नाही' असेच उत्तर दिले आहे. जिथे पुराव्यादाखल लिंक असताना स्वतःचा मुद्दा पटविण्यासाठी 'असत्य' विधाने केली जातात तर जे पत्रक मिपा सदस्यांनी पाहिले नाही, वाचले नाही त्यातील मुद्दे स्वतःच्या समर्थनार्थ, असत्याचा आधार घेऊन, कसेही वाकविता, वळविता येतील.

In reply to by लोटीया_पठाण

धन्यवाद पठाण साहेब, वरिल लिंक वाचुन मला तरी आक्षेपार्ह असे काही आढळले नाही. स्वतःची टिमकी वाजवण्याचा प्रकार म्हणुन या पत्रकाकडे आणी या काथ्याकूटाकडे नक्की पाहता येईल ;-) असो... या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का? चेतन अवांतरः कंसात जर ब्राम्हण लिहले तर प्रतिसाद जातियवादी होतो का? हे प्रा डाँना विचारावे म्हणतो.

In reply to by चेतन

>>>>> कंसात जर ब्राम्हण लिहले तर प्रतिसाद जातियवादी होतो का? हे प्रा डाँना विचारावे म्हणतो. कोणता शब्द कंसात लिहायचा आणि कंचा शब्द कंसाच्या बाहेर लिहायचा त्यासाठी आमची कशाला साक्ष लागते राव. >>>> या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का ? पान नं ३ पासून आक्षेपार्ह लेखन सुरु होतं असं माझं मत आहे. पण पान नं ३ मधे तर काहीच आक्षेपार्ह दिसत नाही, असा एक व्यक्तिसापेक्ष विचारही सुरु होतो. ह.मोंना कायदेशीर प्रसंगाला सामोरं जावं लागलं ते क्रमांक तीनचं पान असावं. मटाची बातमी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटे सर.. >> पण पान नं ३ मधे तर काहीच आक्षेपार्ह दिसत नाही, असा एक व्यक्तिसापेक्ष विचारही सुरु होतो टिमकी वाजवणे नक्कीच आहे पण आक्षेपार्ह वाटत नाही. या बाबतीत मागे चिंतातुरजंतुना विचारलेल्या प्रश्नाची आठवण झाली. >> कोणता शब्द कंसात लिहायचा आणि कंचा शब्द कंसाच्या बाहेर लिहायचा त्यासाठी आमची कशाला साक्ष लागते राव. साक्ष नव्हे हो प्रश्न विचारला होता. आणि प्रा. डॉ. चा अर्थ तुम्हाला माहित आहेच. असे बरेच (प्रा. डॉ.) नक्कीच असावेत. चेतन

In reply to by चेतन

>>>>या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का ? पान नं ३ वरील एकच वाक्य. जे त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकात असल्याचे म्हंटले आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडला आक्षेप आहे पण श्री. नरके म्हणतात तेच वाक्य संभाजी ब्रिगेडने छापून हजारो पत्रके वाटली होती. आणि आज हमोंच्या त्याच वाक्याला संभाजी ब्रिगेड आक्षेप घेत आहे. नरके ह्यांच्या पत्रकातील विचार एकांगी आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. ब्राह्मणद्वेषापोटी त्यांनी त्यांना सोयीचे अर्थ लावून आपले निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. मला तरी 'मी ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणांनी मलाच मते द्यावीत' असे आवाहन कुठे दिसले नाही. ब्राह्मण समाजाबद्दल हमोंनी जे कार्य केले आहे, जे साहित्य प्रसवले आहे त्याची माहिती त्या पत्रकात आहे. पण त्या मागिल भूमिका स्वतः हमोंनी स्पष्ट केली नसती तर त्यांच्या त्या कार्याचाच त्यांच्या विरुद्ध अपप्रचार केला गेला असता असे वाटून (आणि त्या वाटण्यात तथ्य असावे हे नंतरच्या गदारोळानंतर जाणवते) त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. एखाद्या साहित्यिकाचा अध्यक्ष पदासाठी विचार करताना त्याचे सर्व लेखन आणि सामाजिक कार्य लक्षात घेतले गेले पाहिजे असे मलाही वाटते. 'आपल्यावर अन्याय झाला आहे' ह्या भावनेपोटी सर्वच जातीं आपापल्या जातींची भूमिका विविध साहित्यातून/कार्यातून मांडत आणि मांडताना भांडत असतातच. जेंव्हा ब्राह्मणांवर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण झाली तर त्यांनाही त्यांची भूमिका मांडायचा अधिकार आहे. आणि तेच हमो करीत आहेत असा त्यांचा दावा आहे. पण म्हणून तो जातीय प्रचार होत नाही. कुठली जात श्रेष्ठ आणि कुठली जात कनिष्ठ असा तो प्रचार नाही. उलट स्वतंत्र भारतात सर्व जातींनी निर्वैर एकत्र सहजीवन आनंदाने व्यतित करावे असा त्यांचा आग्रह आहे.

मला तर सगळ्या चर्चेतुन एवढंच कळालं की, कविता महाजनांना एबिपि माझावाहिनीवर चर्चेसाठी बोलावलं होतं. एवढं सांगण्यासाठी एक धागा आणि अजुन एकाने पुणे ते रत्नागिरी जाण्याचा काढलेला धागा यात काही फरक वाटला नाही असो.. बाकी हा धागा अजुन टिकुन का आहे याचे आश्चर्य वाटते, उघड उघड भ्रष्टाचाराचे आरोप होणारे मंत्री लाल दिव्याच्या गाडीतुन फिरताना बघुन होतं तसे. मिसळपाव.कॉम, हे मराठी साहित्य क्षेत्राशी विविध मार्गानं संबंधित असलं तरी आज जसा इथं एबिपि माझा वरच्या जातीयतेच्या चर्चेमुळं धुराळा उडतो आहे, तसं उद्या इथले संदर्भ दुस-या माध्यमांत बिनासंदर्भाचे वापरले जाउन नयेत अशी इच्छा.

फक्त ५० यांच्याशी सहमत >>>>>> +१०१%

या मजकूरात त्यांनी धोरण स्पष्ट केले आहे, त्यात आक्षेपार्ह काही दिसत नाही. अटकेचे कारण मलातरी अजून कळत नाहीये.

हमोंचे पत्रक वाचले. त्या पत्रकाचा दुवा दिल्याबद्दल आभार. पत्रकातले खालील उल्लेखही मह्त्वाचे वाटतात. इथे मला त्या ओळी चिकटवता येत नाहीत. माऊ, कसे केलेस गं? पान ३ - १. पहिल्या ३ ओळी. (आणखी एका विषयाबद्दल .... शंका येते) २. १४ ते १९ ह्या ओळी - (त्याच किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी.... ही अनिष्ट प्रवृत्ती आहे.) ३. २९ ते ३२ ह्या ओळी - (माझी एकूण भूमिका... अशी माझी भूमिका आहे) ह्या ओळींबद्दल आणि मध्ये, जी हमोंची भूमिका आहे, ज्यात काहीच विद्वेषमूलक वगैरे खरेच वाटत नाही, सुविद्य लेखिकेचे काय मत? २. त्याउलट ज्या हरी नरके ह्यांची (तुमच्या मतांशी जुळणारी किंवा व्हाइसवर्सा) जी प्रतिक्रिया तुम्ही इथे चोप्य पस्ते केली आहे त्यात ही जी काही वाक्ये आहेत, ती वाचताना मला पडलेले प्रश्न. १. हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत - आडनावावरुन नेहमीच जात पात लक्षात घेत असतील का हे नरके? कदाचित उघड बोलून दाखवत नसतील, पण मनातल्या मनात नोंदवत असतील का? २. "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे. - विनाकारण फुले व सावित्रीबाईंचे नाव वापरुन जनमानस उचकावणे. समाजात तेढ अशीच पद्धतशीर पसरवतात का? ३. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. - हे मला कुठे दिसले नाही हमोंच्या पत्रकात. माझ्या नजरेतून सुटले असल्यास क्षमस्व. ४. संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे हे कोणी मला समजावून सांगता का? ह मोंनी जेम्स लेन ह्यांना पुस्तक लिहायला आमंत्रित केले होते का? ह मोंच्या सांगण्यावरुन भांडारकरवर हल्ला झाला का? काहीतरी गोंधळ वाटतो आहे. आपल्या सोयीने वडाची साल पिंपळाला टाईप्स. ५. प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४} आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच. - ही वाक्ये सुविद्य लेखिका ह्यांना जातीयवादी वाटताहेत का? आणि हीच वाक्ये हमोंनी म्हटली असती तर सुविद्य लेखिकेला ती जातीयवादी वाटली असती का? असो. बाकी चालूदेत. एक सामान्य वाचकाच्या सामान्य मनात उठलेले हे बाळबोध, वेडेवाक्डे, ओबडधोबड प्रश्न समजा. कदाचित ह्या गदारोळामागे खूप काही असण्याची शक्यताही असू शकते. भविष्यावर नजर ठेवून केलेली बेगमीही असू शकते. अजूनही साहित्य संमेलने व्हायची आहेत, नाही का? आणि अजूनही माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या आकलनापलिकडचे बरेच काही असेल. चालूद्या.

In reply to by यशोधरा

श्रीयुत नरके ह्यांचे हमोंवर (कदाचित, हमो ब्राह्मण आहेत म्हणून) आगपाखड केलेले पत्र तुमच्या सुविद्य लेखिकेने इथे चिकटवले आहे त्या अर्थी त्यातील शब्दा-शब्दाशी त्या सहमत आहेत. ही साहित्यक्षेत्रातील 'कंपूबाजी' असावी. श्रीयुत नरके ह्यांच्या पत्रातील मुद्यांचे विश्लेषण करीत बसले तर एक फार मोठा प्रतिसाद होईल. त्यामुळे तो उद्योग केला नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मला लिंक कशी द्यायची माहित नाही पण लोकप्रभा दि. ५ ऑगस्ट २०११ मध्ये श्री नरके यांच्या सुस्पष्ट भुमिकेचा लेख व. ब्रिगेडिंचा पंचनामा केला आहे...

बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या. एवढंच समजलं की "ब्राह्मणांनी स्वजातियांबद्दल कै चांगलंचुंगलं लिहिलं की ते जातिय तेढ निर्माण करणारं ठरतं". बाकी ब्रिगेड वगैरे धुराळा चालु द्या.

सुरुवातीस हा धागा वाचुन आणि एकुणच जो गदारोळ चालु आहे ते बघुन मला असे वाटत होते की "मी ब्राह्मण आहे म्हणुन मला मत द्या" अश्या आशयाचे नसले तरी आपले ब्राह्मण्य सांगुन मत मागण्याचा काही प्रकार असावा असे वाटले. आणि ते मला बरोबरही वाटले होते. ही निवडणुक लोकशाही मार्गाने चाललेली आहे आणी लोकशाही म्हटल्यावरा जातिधारि मत मागणे काही नविन नाही. जातिधारित राजकीय पक्ष आहेत तर यांनी का मत मागु नये असे माझे आपले मत होते. जोपर्यंत हमोंनी इतर जातिंवर टीक केलेली नाही तोपर्यंत ते ठिक आहे असे माझे मत होते. परंतु हमोंचे पुर्ण पत्रक वाचल्यावर त्यांच्यावर टीका करणारे ठार मुर्ख आहेत असे माझे मत झाले आहे. ब्रिगेडी केवळ मुर्ख नाहित तर अक्कलशुन्य, गाढव, जात्यंध आणि अजुन बरेच काहीकाही आहेत याबद्दल दुमत नसावे. पण कविता महाजनांसारख्या ज्येष्ठ आणी श्रेष्ठ लेखिका असे काहितरी लिहितात आणि चक्क चुकीच्या बातम्या पसरवतात तेंव्हा खरेच मनापासुन दु:ख होते. हमोंनी जे काही लिहिले आहे ते फक्त त्यांच्या लेखनामागची त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणजे त्याचा वापर करुन कोणी त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करणार नाही. आता या लेखनाचाही विपर्यास होइल अशी अटकळ बांधण्याएवढी त्यांची मनोवृत्ती किडकी आणि सडकी नाही हे त्यांचे दुर्दैव. ३ पानी पत्रकात इतर गोष्टी न दिसता या जात्यंधजाना त्यात केवळ जातिवाचक प्रचार दिसतो हे मराठी समाजाचे दुर्दैव. हमोंनी स्वत:च्या लेखनाविषयी स्पष्टीकरण देताना हे स्पष्टपणे लिहिले आहे की: " माझी अकुण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वर्ण्याची तरफदारी करण्यची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, भाषा, परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जाति जातित निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे तरच भारतीय समाज एकसंध राहु शकेल. " इतके स्पष्ट लिहुनही कोणाला असे वाटत असेल की हमो जातीचा हवाला देउन मतांचा जोगवा मागत आहेत तर तो त्या माणसाच्या सडक्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे. आम्ही फक्त योग्य त्या मानसोपचार तज्ञाचा पत्ता देऊ शकतो आणि एवढेच म्हणू शकतो:

In reply to by मृत्युन्जय

पत्रक वाचुन मला जे जे काही वाटलं ते ते लिहिल्याबद्दल धन्यवाद...!!
परंतु हमोंचे पुर्ण पत्रक वाचल्यावर त्यांच्यावर टीका करणारे ठार मुर्ख आहेत असे माझे मत झाले आहे. ब्रिगेडी केवळ मुर्ख नाहित तर अक्कलशुन्य, गाढव, जात्यंध आणि अजुन बरेच काहीकाही आहेत याबद्दल दुमत नसावे. पण कविता महाजनांसारख्या ज्येष्ठ आणी श्रेष्ठ लेखिका असे काहितरी लिहितात आणि चक्क चुकीच्या बातम्या पसरवतात तेंव्हा खरेच मनापासुन दु:ख होते.
यासाठी तर +१००००० मला इतकाच प्रश्न पडलाय की ह.मो यांना उघडपणे ब्राह्मण महासंघानी पाठींबा का दिला नाही?

पत्रकात इतर गोष्टी न दिसता या जात्यंधजाना त्यात केवळ जातिवाचक प्रचार दिसतो हे मराठी समाजाचे दुर्दैव. 'ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केले' ह्या अपप्रचाराने प्रेरीत ब्राह्मणेतरांनी सर्व ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून पद्धतशीर रित्या हुसकाऊन लावणाचा प्रयत्न गेली अनेक वर्षे चालविला आहे. शिक्षणातील आरक्षण, नोकरी आणि नंतर बढती मिळविण्यामधील आरक्षण, राजकारण आणि आता साहित्यक्षेत्रातील ब्राह्मणांचे अस्तित्व टोचू लागल्याने तिथूनही ब्राह्मणांना हुसकाऊन लावायचा चंग कांही ब्राह्मणेतरांनी बांधलेला दिसून येतो. आता ह्या उदात्त हेतूसाठी दिसेल तिथे, आणि जिथे दिसणार नाही तिथे असत्याचा आधार घेत, ब्राह्मण्याची लेबले चिकटवित आपला लढा चालवायचा असा ह्या कांही ब्राह्मणेतरांच्या स्वयंघोषित मसिहांचा प्रयत्न दिसून येतो. पूर्वीच्या काळी कांही ब्राह्मणांनी आपल्या वर्चस्वाच्या लढाईत काही चुका केल्या त्याची शिक्षा आताच्या जातियतेपासून दुर जाणार्‍या ब्राह्मणांना द्यायची आणि त्यांना पुन्हा ह्या जातियतेच्या चिखलात ओढून आणायचे असे हे चित्र आहे. म्हणजेच जातीयतेला खतपाणी घालण्याचे आणि एकूण समाजातील जुन्या कल्पनांना, विचारांना, रिती-रिवाजांना सतत उजाळा देत जातीयता जागृत ठेवायची असा प्रयत्न कांही ब्राह्मणेतरांकडून केला जात आहे आणि स्वार्थासाठी 'उलट्या बोंबा' मारीत ब्राह्मणांनाच बदनाम करीत राहायचे. आजही ब्राह्मणेतरांमध्ये, त्यांच्या जातीतीलच, उचनिचतेचे विचार ऐकले आणि प्रथा पाहिल्या की जातीयता कोण पसरवीत आहे ह्या बाबत संभ्रम निर्माण होतो. पण, जातियतेला मागे टाकायचे असेल तर त्यावर नुसत्या चर्चा करून जातीयता जिवंत ठेवण्यापेक्षा कृतीतून ती मागे टाकणे गरजेचे आहे. एक लेखक म्हणून ह.मो. संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य असले तरी त्यांनी जे जातीचे मुद्दे अकारण मध्ये आणले, त्यामुळे वातावरण गढुळले. हे मुद्दे मध्ये आणले नसते, लेखन पाहता तेकमेव बरे नाव होते. वरील एका प्रतिसादात हे विधान करणार्‍या कविता महाजन ह्यांनी वाहिनीवरील चर्चे दरम्यान मात्र हमोंवर 'वैचारिक दारिद्र्या'चा आरोप केला आहे. म्हणजेच, 'वैचारिक दारिद्र्य' असणारा 'एकमेव' उमेदवारच संमेलनाध्यक्ष पदासाठी त्यांना आता योग्य वाटतो आहे. ह्याला दुटप्पी धोरण म्हणावे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

>>> ह्याला दुटप्पी धोरण म्हणावे काय? विचारवंत होण्यासाठी ती एक प्रमुख अट असते असे आमचे गुरू सांगतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह. मों.च्या या पुस्तिका लेखनात वैचारिक दारिद्र्य आहेच. बालकांडची प्रस्तावना वाचली तरी या दारिद्र्याचे दर्शन तिथेही घडते. जर चारही उमेदवारांचे लेखनकाम पाहिले, तर मात्र पुस्तकांची संख्या आणि वाचकप्रियता या बाबतीत ह. मो. उजवे ठरतात... इतकेच मला म्हणायचे होते. याचे अधिक स्पष्टिकरण मी लिहिलेले आहे, इतरांनी काय केलेले नाही ते इथे पुन्हा सांगत नाही.

In reply to by Kavita Mahajan

हा: हा: हा: वैचारिक दारिद्र्य असणारी व्यक्ती एवढी पुस्तके लिहीते आणि त्या व्यक्तीच्या पुस्तकांना वाचकप्रियताही लाभते म्हणजे ते सर्व वाचकही वैचारिक पातळीवर दरिद्रीच असले पाहिजेत आणि अशा वैचारिक दरिद्र्यांच्या वैचारिक दरिद्री साहित्यिकास संमेलनाध्यक्ष पदासाठी 'लायक' उमेदवार समजणे म्हणजे वैचारिक 'श्रीमंती' असावी. आनंद आहे.

ह.मों.चे पत्रक होते प्रचारासाठी. त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ साहित्यासाठीच वापरायला हवे होते. आणि जरी त्यांनी चूक केली तरी त्यात अटक करण्याइतके आक्षेपार्ह काही आढळलं नाही. या लेखनाला जर अटक होणार असेल तर खेडेकरचा पुस्तकाबद्दल अजामीन पात्र गुन्हा मानावा लागेल. अशाप्रकारे पोलिस दलाला अनावश्यक कामात गुन्तवण्यापेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे त्यांना करण्यास भाग पाडणे असे गृह खात्याला/ संबंधित अधिकार्‍याना वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे..

In reply to by बाळ सप्रे

ह.मों.चे पत्रक होते प्रचारासाठी. त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ साहित्यासाठीच वापरायला हवे होते.
बरोबर. यात जातीयता नव्हती तर जातीचं राजकारण होतं आणि भारतात बहुतेक सर्व राजकारण जातीवर होतं ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. यात चूक ही त्यांनी हे राजकारण किमान साहित्यापासून दूर ठेवायला हवं होतं.
आणि जरी त्यांनी चूक केली तरी त्यात अटक करण्याइतके आक्षेपार्ह काही आढळलं नाही. या लेखनाला जर अटक होणार असेल तर खेडेकरचा पुस्तकाबद्दल अजामीन पात्र गुन्हा मानावा लागेल.
+११११११ ... या पत्रकासाठी त्यांना इतक्या तत्परतेने अटक होऊ शकते तर ब्रिगेडचं "साहित्य" राजरोस प्रकाशित असताना आणि कल्पनेपलिकडे जातीय द्वेष पसरवणारं असताना त्यावर काहीही कारवाई होत नाही.
अशाप्रकारे पोलिस दलाला अनावश्यक कामात गुन्तवण्यापेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे त्यांना करण्यास भाग पाडणे असे गृह खात्याला/ संबंधित अधिकार्‍याना वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे..
मराठा महासंघ ही ब्रिगेडची मातृसंस्था आहे. मराठा महासंघाचा कर्ता धर्ता पक्ष आणि महाराष्ट्र गृह खातं यातले संबंध जगजाहीर आहेत. अजून प्रत्यक्ष काय पुरावा हवा त्यांच्या पक्षपाती पणाचा?

त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती. मतदार साहित्यिक हमोंच्या फक्त साहित्याचाच विचार करून मतदान करणार असतील तर अत्यंत न्याय्य विधान मानावे लागेल. पण, हमोंची भिती (जी पूर्वानुभवावर आधारीत आहे) अशी आहे की त्यांच्या भूमिकेमुळे अपप्रचाराला संधी मिळेल आणि त्यांना निवडणूकीत पाडण्यासाठी त्याचा गैरवापर केला जाईल. तसे काही घडू नये म्हणून त्यांनी त्याची भूमिका विशद करून मांडली आहे. असेही, नुसत्या साहित्याचा विचार करायचा झाला तर जे साहित्य त्यांनी ब्राह्मणांची बाजू मांडण्याकरीता प्रसवले आहे, ज्याला ते वैचारीक साहित्य म्हणून संबोधितात, ते 'साहित्य' नाही का? त्या साहित्याला, त्यांच्या एकूण साहित्यिक प्रवासात, मान नाही का? वर लिमाउजेट ह्यांनी इथेदिलेल्या उतार्‍यात हमोंनी व्यक्त केलेल्या भावना जातीयवादाला खतपाणी घालणार्‍या आहेत का? ब्राह्मणेतर लेखकांनी त्यांच्या जातीवर होणार्‍या/झालेल्या अन्यायांवर लेखन केले नाहीए का? 'झाडाझडती','उपरा' ह्या कादंबर्‍या त्या लेखकांच्या साहित्यिक कर्तृत्त्वात बसत नाही का? जे साहित्यिक कार्य आहे तेच हमोंनी दिले आहे. त्यातील ब्राह्मण जाती बद्दल लिहिलेले जे साहित्य आहे, त्यामागची फक्त त्यांची भूमिका मांडली आहे. ती ही तशी गरज होती म्हणून. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह. मों. नी याविषयावर लेखन केले तिथपर्यंत ठिक आहे. 'झाडाझडती','उपरा' या पंक्तीत ते बसते. यावर वाद नाही. पण मत मागताना जर त्यांनी साहित्यिक व्यासपीठावर ब्राह्मणांवरील अत्याचाराची बाजू जास्त मांडली असेल तर ते योग्य वाटत नाही. हे मुद्दे ब्राह्मण संघ वगैरे च्या व्यासपीठावर योग्य आहेत इतका नीरक्षीर विवेक बाळगायला हवा होता. माझ्याआधीच्या एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे ह. मों.चे हे आवाहन देखिल प्रतिगामीपणाचे उदाहरण आहे. एक साहित्यिक म्हणून आवाहन करायचे असते तर सर्व वाचकांना (irrespective of जात) आवाहन केले असते. साहजिकच हे आवाहन त्यांनी ब्राह्मणाना केले असे सत्कृत्दर्शनी दिसत असल्यामुळे एक ब्राह्मण असणे ही ओळख जास्त महत्वाची वाटली हे स्पष्ट आहे. काही लोक नको तिथे जातीचे राजकारण करतात म्हणून तुम्ही देखिल तसेच करणे योग्य आहे का? खरेतर यासर्व तथाकथित विद्वेषविरोधामुळे उगाच ब्रिगेड जास्त बोकाळते आहे. त्यांना शक्यतितके अनुल्ले़खाने मारणे योग्य ठरेल.

In reply to by बाळ सप्रे

साहित्यिक व्यासपीठावर ब्राह्मणांवरील अत्याचाराची बाजू जास्त मांडली असेल तर ते योग्य वाटत नाही. पत्रकात त्यांनी ब्राह्मणांची बाजू मांडली आहे की त्यांच्या त्या वैचारीक साहित्या मागील भूमिका मांडली आहे ह्यावर, ते पत्रक वाचून, पुन्हा एकदा विचार करावा ही विनंती. आवाहन करायचे असते तर सर्व वाचकांना (irrespective of जात) आवाहन केले असते. हे पत्रक सर्व वाचकांसाठी नसून, फक्त साहित्यिक मतदारांसाठी आहे. तेही, हे पत्रक, फक्त आणि फक्त 'ब्राह्मण मतदारांनाच' पाठविले आहे असा उल्लेख माझ्या तरी वाचनात कुठे आला नाही. साहजिकच हे आवाहन त्यांनी ब्राह्मणाना केले असे सत्कृत्दर्शनी दिसत असल्यामुळे..... काय आवाहन त्यांनी केले आहे? मी ब्राह्मण आहे म्हणून, किंवा ब्राह्मणांसाठी काही कार्य केले आहे म्हणून मला मते द्या असे? असे कुठलेही आवाहन त्यांनी केलेले नाही. त्यांनी फक्त त्या साहित्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ह्या धाग्याची, एवढी जास्त, पात्रता नसताना फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे म्हणून एवढी चर्चा झाली. पण आता त्या स्वतः ह्यात सहभागी होत नसल्याने ह्यावर अजून चर्चा करावी असे मला वाटत नाही. दूसर्‍या धाग्यांनाही न्याय द्यावा असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>>ह्या धाग्याची, एवढी जास्त, पात्रता नसताना फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे म्हणून एवढी चर्चा झाली. स्वल्प विरामाची जागा चुकली असावी का? ह्या धाग्याची एवढी जास्त पात्रता नसताना ,फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे , म्हणून एवढी चर्चा झाली. असे असायला हवे होते का? कारण नाही तर अर्थ बराच वेगळा होतो च्यामारी ओ मराठीचे प्राध्यापक जरा सांगा बरे... आमची समज जरा कमी आहे.

ज्या लेखनावरून गोंधळ सुरू आहे ते साहीत्य मानावे का मूळात प्रश्न आहे ? त्यामुळे साहित्यबाह्य गोष्टींना खरेच काही महत्व नाही. --