मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बार्ली डोसा

बहुगुणी · · पाककृती
नमस्कार मंडळी! 'या लेखकाने पाककृती विभागात सक्रिय लिखाण करण्याचं धाडस कसं केलं' असा विचार करून दचकू नका! ही पाककृती माझी नाही :-) तेंव्हा नि:शंक मनाने प्रयोग करा, हा पदार्थ फारच नामी होतो असा माझ्या जिभेचा दावा आहे! अमेरिकेत राहूनही फक्त शाकाहारी आणि फक्त स्वहस्ते शिजवलेलंच खाणार्‍या आमच्या परिचयातील हिमबिंदू या तेलुगू कन्यकेने, 'नेहमी नवीन काहीतरी प्रयोग करून पहायचं' या वृत्तीने ही अनोखी डिश खायला घातल्याबद्दल आणि त्याची पाककृती पुरवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा सहभाग फक्त ही पाककृती तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवणे इतकाच आहे, डोसा आवडेल अशी आशा आहे. [ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी: बार्ली हे गव्हासारखं एक द्विदल धान्य, ते असं दिसतं: ] डोसा: १ कप बार्ली १/४ कप उडीद डाळ अर्धी वाटी चणा डाळ १०-१२ मेथी दाणे वरील सर्व पदार्थ सकाळी एकत्र भिजवून ठेवा. संधाकाळी ८-१० तासांनी अर्धी वाटी पोहे ५ मिनिटे भिजवून, आधी भिजवलेल्या वरील मिश्रणात एकत्र करा, आणि हे सर्व मिक्सर मधून मऊ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. आता हे मिश्रण रात्रभर उबदार जागी आंबवण्यास ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे डोसे करा. ६-८ डोसे होतील. ते खालील दुधी भोपळ्याच्या चटणीबरोबर गरम-गरम खायला द्या/घ्या. दुधी भोपळ्याची चटणी: हिमबिंदूने ही चटणी बरीचशी या दुव्यावर दिलेल्या कृतीने केली, फक्त तिने दुधी भोपळा शिजवण्यापासून सुरूवात करण्याऐवजी दुधी भोपळ्याचा तयार पल्प वपरला आणि त्यात चिंचेचा एक चमचाभर कोळ वापरला. १०० ग्रॅम दुधी भोपळ्याचा पल्प आणि अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ हे दोन्ही एकत्र करून त्याला १ चमचा गरम तेलात खालीलप्रमाणे फोडणी द्या: १ टेबल्स्पून उडीद डाळ, ती तांबूस/ ब्राऊन झाल्यावर, २ टेबल्स्पून जिरं चिमूटभर हिंग १ लाल मिरची ६-८ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या २ लसूण पाकळ्या ६-७ पानं कडीपत्ता हे क्रमाने घातल्यावर मग वरील दुधी भोपळा-चिंच मिश्रण घाला. आता १/२ चमचा हळद घालून ३-५ मिनिटे परता (कच्च्या दुधी भोपळ्याचा वास गेला पाहिजे). नंतर हे परतेलेले मिश्रण १ मूठभर भाजलेले, सोललेले शेंगदाणे घालून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करा, आवश्यक वाटेल तितकेच पाणी घाला.

वाचने 11718 वाचनखूण प्रतिक्रिया 38

गणपा Fri, 09/07/2012 - 03:02
हा प्रकार बराच पौष्टिक असणार याबद्दल दुमत नाही. चटणीचा ही नवा प्रकार कळला. बहुगुणी काका ही पाककृती इथे दिल्याबद्दल आभारी आहे. हिमबिंदूस ही आमचे आभार कळवा.

धनंजय Fri, 09/07/2012 - 04:27
काही वर्षांपूर्वी मी वेगवेगळी धान्ये भिजवून दोसे बनवण्याचे प्रयोग केले होते. पैकी बार्लीचा दोसा छान लागतो +१ चटणीची नवी कृती कळली. हिमबिंदू व बहुगुणी दोघांना धन्यवाद. त. क. बार्ली आणि गहू दोन्ही एकदल धान्ये आहेत. उडीद डाळ हे द्विदल धान्य आहे. एक आणि द्वि-दलाचे मिश्रण, शिवाय भिजवलेले, त्यामुळे दोसा पौष्टिक आहे.

रेवती Fri, 09/07/2012 - 06:59
बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य वाटले. :) ही पाककृती ग्रेट आहे. दुधीची चटणी पहिल्यांदाच पाहिली. हिमबिंदूस धन्यवाद आणि तुम्हालाही. माझ्याकडे पाव किलो तरी बार्ली आहे. पूर्वी एका पाकृसाठी आणली होती. आता हा पदार्थ करता येईल. फोटूही छानच आलाय.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Fri, 09/07/2012 - 10:04
पूर्वी एका पाकृसाठी आणली होती. नक्की कुठल्या पाककृतीसाठी? इथे शेअर केल्यास आम्हीही घरच्या घरी प्रयत्न करून पाहू.

In reply to by प्रभाकर पेठकर

रेवती Fri, 09/07/2012 - 18:47
बार्ली सूपची पाकृ एका पुस्तकात पाहिली व बार्ली आणि हिरवे वाटाणे असे घेऊन आले होते. ते सूप काही रेस्टॉरंटसारखे झाले नाही व उत्साह मावळला. ;) उरलेले वाटाणे भिजवून, उकडून एकदा पावभाजीत वापरून टाकले पण बार्ली शिल्लक आहे. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जयखान्डेकर Sun, 09/09/2012 - 17:00
हात्तेरे की. मी उगीच, ग्लास वगैरे घेऊन, बसलो होतो पाककृतीची वाट पाहात. अहो मग ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे? माफ करा परिचय नसताना प्रतिक्रिया दिली, पण राहवले नाही. संजय

In reply to by रेवती

बहुगुणी Sat, 09/08/2012 - 04:58
आणि आश्चर्य का म्हणे? रेवतीताई, अहो मी इथे पाकविभागात नेहेमीच टपकतो..षटकार मारता येत नाही म्हणून मॅचच बघू नये असं थोडंच आहे :-)

कच्ची कैरी Fri, 09/07/2012 - 09:06
चटणीचा नविन प्रकार कळला :) आणि डोसाही पौष्टिक असल्याने दोघही रेसेपिज करुन बघितल्या जातील :)

पैसा Fri, 09/07/2012 - 17:56
मस्त आयडिया आहे. करून बघणार. चटणीसुद्धा आवडली. पाकृ देणार्‍या हिमबिंदू यांना आणि पाकृ आमच्यापर्यंत आणणार्‍या बहुगुणींना धन्यवाद!

तर्री Fri, 09/07/2012 - 18:07
सगळे करून पाहणार आहेत. माझे येथेच तर जबरी वांधे ! ( काही म्हणजे काही करता येत नाही ) बाकी सर्व पाककला मार्तंड प्रतिक्रिया देते झाले आहेतच. त्यास दुजोरा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रेवती Fri, 09/07/2012 - 18:44
कोणीतरी कश्याला? हक्काचं माणूस तळकोकणात वाट बघतय पण आम्हाला लग्नाची घाई नाही ना! काय करणार?

In reply to by रेवती

अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे बरे.
कोणीतरी कश्याला? हक्काचं माणूस तळकोकणात वाट बघतय पण आम्हाला लग्नाची घाई नाही ना! काय करणार?
कोण.. कोण ?

बहुगुणी Fri, 09/07/2012 - 22:15
हिमबिंदूला नक्की कौतुक कळवेन, इथल्या महारथींनाही पाककृती आवडली यातच सगळं आलं. पाककृती वाचणार्‍यांचे आणि टंकनकष्ट घेणार्‍या सर्व प्रतिसादकांचे आभार!

पिवळा डांबिस गुरुवार, 10/04/2012 - 09:09
बार्लीची फक्त बीयर चांगली होते.... आणि ती आमची पत्नी घरच्याघरी उत्तम बनवते!! काय नंदन, खरां की खोटां? :) तेंव्हा पास....

स्मिता. गुरुवार, 10/04/2012 - 20:45
कधी न ऐकलेली आणी पौष्टिक पाकृ आहे. करून बघायला हरकत नाही. पण आधी इकडे बार्ली शोधणे आले ;)