✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फाटकी झोळी

अ
अरुण मनोहर यांनी
Fri, 09/07/2012 - 11:18  ·  लेख
लेख
फ़ाटकी झोळी ३० जानेवारी जुन्या तारखेतले हे पान आज केवळ आठवणीतून लिहीत आहे. इतक्या काळाने ह्या पानावर लिहायची वेळ आली, कारण सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी घडायला ह्या दिवसापासूनच सुरवात झाली असावी. पण अर्थात त्यावेळी मला ते माहित नव्हते. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मला ते चित्र एका फ़कीराने दिले होते. “अल्ला मालिक” असा बुलंद आवाज दारावर येणा-या फ़किराने लावला. मी नुकताच जेवायला बसलो होतो. आईने गरम गरम पोळी भाजी ताटात वाढली होती. मी त्यावर ताव मारायला सुरवात करणार, तेवढ्यात फ़कीराची ती हाक कानावर पडली. त्या आवाजात अशी काही विचित्र पुकार होती, की मला राहवले नाही. पानातली पोळी भाजी गुंडाळून त्या फ़कीराला नेऊन दिली. त्याने ती दारातच बसून खाल्ली. “पाणी पाज” अशी हातानेच खूण केली. मी आणलेल्या गडव्यातले पाणी त्याने ओंजळीत टाकायला सांगून गटागटा प्यायले. “मालिक तेरा खयाल रखेंगा बच्चा. तू यह तसबीर रख. जहां हमेशा तेरी नजर पडती है, वहा रख. मालिककी नजरका आयना तेरी हर मुराद पुरी करेंगा.” त्याने कळकट फ़ाटक्या झोळीतून एका चित्राची पुंगळी काढून माझ्या हातात दिली. आत येऊन मी ते चित्र पाहिले. जाड कागदावर ऒईल पेंटने काढले होते. चित्र बरेच जुने वाटत होते. फ़कीराच्या झोळीत राहून त्यावर धुळीचे पुटण चढले होते. एक प्रकारचा ऎंटिक फ़ील होती. चित्राच्या मधभागी एखादा मोठा डोळा असावा असा काहिसा लंबगोल काढला होता. त्यातून वेगवेगळ्या रंगांच्या किरणांसारखे फ़र्राटे चारी बाजूला पडत होते. डोळ्याच्या बाहेरची सगळी जागा छोट्या मोठ्या आयताकृती आकारांनी व्यापली होती. त्यातही रंगांची वादळे होती. कुठल्याशा शिकावू मॊडर्न आर्टवाल्या चित्रकाराने एखादी कलाकृती निर्माण करायचा प्रयत्न केला असावा असे ते चित्र होते. चित्रकाराची सही काही वाचता येत नव्हती. पण तसे बरे दिसत होते. आणि फ़कीराने काही शुभेच्छा बोलून ते दिले होते. मी जास्त विचार न करता ते माझ्या अभ्यासाच्या टेबलवर बरोबर समोरच्या भिंतीवर लावले. अभ्यास करतांना कधी कंटाळा आला की नजर बरोबर त्या डोळ्याच्या मध्यावर लावून आत खोल पहाण्याची एक सवयच मला लागून गेली. पुढे कधीतरी त्या चित्राला एक फ़्रेम देखील लावून घेतली. पुढे जे काही घडत गेले, त्याच्याशी ह्या चित्राची काहीतरी सांगड असावी असा दाट संशय आल्यानंतर हे पहिले पान, आणि डायरीतली पुढची बरीच पाने आठवून आठवून अशीच मी नंतर भरलेली आहेत. माझ्या मनातला संशय पडताळून पहाण्यासाठी हे चित्र मिळाल्यानंतरच्या घटना संगतवार मांडणे आवश्यक आहे. ९ फ़ेब्रुवारी मॆथ्स मधला एक अतिशय कठीण प्रॊब्लेम घेऊन त्याच्याशी झगडत बसलो होतो. मी वर्गात काही खूप हुषार वगैरे म्हणून ओळखला जात नाही. मी आपला साधारण मध्यावर असतो. दोनचार हुषार मुलांशी माझी घट्ट मैत्री मात्र आहे. कठीण वगैरे प्रॊब्लेमच्या वाटेला मी जात नाही. आज वर्गात सर्वात हुषार समजल्या जाणा-या दिनेशनी हा प्रॊब्लेम न जाणे कुठून आणला, आणि त्याला तो सोडवता आला आहे असे सांगितले. आम्हा मित्रांमधे त्याने असाही दावा केला की आपल्या वर्गातला कोणीच हा प्रॊब्लेम सोडवू शकणार नाही. तेव्हा एक गंमत म्हणून मी तो लिहून घेतला. घरी त्याच्याशी बरीच झटापट करून काही मार्ग सुधरला नाही. कंटाळून सवयीने समोरच्या चित्रातील डोळ्यावर नजर लावली. त्यातील रंगांच्या कारंज्यात गोल गोल फ़िरून भोवळ यायला लागली आणि अचानक मनात विचार उमटला. “हा प्रॊब्लेम सोडवणे आपल्यासारख्याला केवळ अशक्य आहे. आधीच डिफ़रेन्शीयल इक्वेशन हा विषय बिचकतच आपण हाताळतो. आता दिनेश सारखा अत्यंत हुषार मुलगा म्हणतोय की फ़क्त तोच हा सोडवू शकेल, तर असेलही तसे. माझ्याने हा प्रॊब्लेम सुटणे केवळ अशक्य आहे.” असा विचार केल्यावर मी वही मिटली. पण डोळ्यासमोर मघा लिहीत असलेल्या स्टेप्स येतच राहिल्या. काही केल्या तो प्रॊब्लेम माझा पिछा सोडेना. मी पुन्हा वही उघडली, जुन्या स्टेप्स खोडून नविन विचाराने सुरवात केली. आणि कसे कोण जाणे, पटपटा उत्तर मिळविले. दिनेशने दिलेल्या उत्तराशी ते सही जुळत होते. माझा स्वत:वर विश्वासच बसेना. दुस-या दिवशी दिनेशनेही “तू एखाद्या पुस्तकात शोधून लिहीले असशील” असाच संशय घेतला. १५ फ़ेब्रुवारी तीन मुलांची शिक्षणे, वाढती महागाई ह्या सर्वांसाठी सरकारी नोकरीतला तुटपुंजा पगार पुरविणे ह्यात बाबांची ओढाताण होते आहे हे मला दिसते आहे. मी एकदाचा एंजिनियर झालो की निदान बरा पैसा घरी येइल. तोपर्यंत अर्थातच मला माझ्या सगळ्या मागण्या मनातच ठेवल्या पाहिजे. रोज कॊलेजमधे सायकल मारीत जाण्यात किती वेळ खर्च होतो. इतरांसारखी मोटारसायकल असती तर काय बहार झाली असती! मागे एकदा सहजपणे बाबांना म्हणून गेलो होतो. त्यांच्या चेह-यावरच्या असहाय्यतेनेच मला काय ते सांगितले होते. मोटार सायकल आता आपण स्वत:च्याच पैशाने घेणार. इंजिनियर झाल्यावर. असं आत्ता काही दिवसांपुर्वीच म्हटलं, आणि आज बाबा मला डिलरच्या दुकानात घेऊन गेले आणि तीन वर्षे जुनी बाइक माझ्यासाठी घेतली. बाबांचे इन्स्युरंसचे पैसे मिळाले होते, आणि सध्या मोठी अशी दुसरी गरज नव्हती, त्यामुळे त्यांनी आठवणीने माझी इच्छा पूर्ण केली होती. १८ फ़ेब्रुवारी प्रगतीच्या शाळेत गॆदरिंगसाठी नाटिका बसवली होती. तिची त्यात भाग घेण्याची खूप इच्छा होती. पण तिला काही चान्स मिळू शकला नव्हता. ती खूपच नाराज होती. “अग जाऊ दे. ह्या वर्षी नाही मिळाला, आता सगळ्यांचे सिलेक्शन झाले आहे. हा विषय विसर आता. ह्या वर्षी हे नाटक तुझ्या वाट्यात नाही.” असा दिलासा मी तिला दिला त्या दिवशीच ती शाळेतून नाचत घरी आली. कोणी एक मुलगी आजारी पडल्यामुळे तिला चान्स दिला होता. हे मी पुढे खूप काळाने लिहीत आहे, पण मी जे म्हणेन, त्याच्या नेमके उलटे परिणाम ते चित्र मला देत असावे अशी शक्यता वाटते. ८ एप्रील परिक्षा ऐन भरात आल्या आहेत. रोज अभ्यास करतांना त्या चित्रातील रंगांच्या फ़वा-यात गोल गोल फ़िरणेही चालूच आहे. जे पेपर्स खूप कठीण जातील अशी भिती होती, ते चांगले जात आहेत. ह्या उलट जे विषय अगदी सोपे वाटायचे त्यांनी विषेश हात दिलेला नाही. फ़किराने त्या चित्राच्या रुपात काही अगम्य त्राटक माझ्या हातात दिले आहे कां? ३ जुलै शेवटी एकदाचा रिझल्ट जाहीर झाला. मी इंजीनियर व्हावे हे बाबांचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या बॆचपैकी कितीतरी जणांनी कॆंपस इंटरव्ह्यूमधेच जॊब पटकावले. सिमेन्स, टाटा, बी एच ई एल, किती मोठमोठ्या कंपन्यांनी कॊलेजांमधून जाळी टाकली होती आणि परिक्षेच्या निकालाच्या आधीच निवड जाहीर देखील केली. मला मात्र कोठूनच निवड झाल्याचे पत्र आले नाही. इतके इंटरव्ह्यू दिले! एकदोन तरे ब-यापैकी छान झाले होते. मनात आशा उमटली होती की कुठेतरी नक्की चान्स लागेल. पण आता लक्षात येते आहे की अशी आशा मनात उमलली तेव्हाच मला कळायला हवे होते, की हे होणारच नाही. आता पेपरस चाळून वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज टाकायला सुरवात केली आहे. मनासारखी एकदेखील जाहिरात पहाण्यात येत नाही. तरी दिसेल त्या जाहिरातीलाच अर्ज पाठविले आहेत. पण त्यांचे कोणाचेच उत्तर नाही. माझ्यातच काहीतरी उणे आहे, की मला कोणी सिलेक्ट करणारच नाही. अगदी ७०% मार्क्स मिळवले आहेत तरीही. मी एकसारखे स्वत:ला बजावित आहे की मला कुठेच चांगली नोकरी मिळणार नाही. पण हे असे बजावून काही मला अपेक्षित असणारा परिणाम होणार नाहीये. चांगली नोकरी मिळणारच नाही हे अगदी सहजपणे मनात उमटले पाहिजे. इतके सहजपणे की, त्या त्राटकाची पुसटशी देखील आठवण त्या विचाराशी जोडलेली नको. पण असे काही झाले नाही. प्रत्येक वेळी मनात मीच ठरवून केलेला विचार असतो की मला नोकरी मिळणारच नाही. आणि त्याचा काहीच उपयोग नाही. हे सगळे आपोआप होण्याऐवजी माझ्या कंट्रोलमधे असते तर किती छान झाले असते! पण मला अनाहूतपणे चिकटलेले ते त्राटक माझ्या ताब्यात कधीच येणार नाही. (मी ठरवून असे म्हटले आहे त्यामुळे त्राटकाचा परिणाम इथे देखील नाहीच.) १५ जुलै बाबांनी आज पाचव्यांदा विनयच्या नोकरीचा विषय चघळला. विनय माझ्याहून दोनच वर्षांनी लहान, पण ग्रॆजुएट होऊन माझ्याआधी नोकरीला देखील लागला. आज तो एकटा बाहेरगावी राहून चांगल्या कंपनीत जॊब करीत आहे. आणि मी त्याचा मोठा भाऊ, अजूनही अर्ज खरडीत बसलो आहे. हे आतापर्यंत किती वेगवेगळ्या संदर्भांत त्यांनी मला आणि घरातल्या सगळ्यांना ऐकविले आहे. विनयचे तर इंजीनियरिंग देखील नाही. साधी कॊमर्सची डिग्री. मार्क्स देखील काही खास नव्हते. मला तर वाटलेच नव्हते की ह्याला कुठे लगेच नोकरी मिळेल. म्हणून त्यावेळी मी त्याच्या मागे लागलो होतो, की तू मास्टर्स कर. पण त्याला पडली पैसे कमाविण्याची आग! कोणाचे न ऐकता त्याने नोकरी शोधायला सुरवात केली. म्हटले शोध! नाही मिळाली की आपसूकच मास्टर्ससाठी ऎडमिशन घेशील. पण हेच चुकले. मला असे प्रकर्षाने वाटले, अन पंधरा दिवसातच त्याला इंटरव्ह्यूचे बोलावणे आले. तिथे तो सिलेक्टपण झाला. ते गाव आमच्यापासून सहा तासांच्या अंतरावर होते. सिलेक्ट झाल्यावर तिथून लगेच मिठाईचा डब्बा घेऊन आला होता. मी तोंडदेखली थोडी चाखल्यासारखे केले. मुळीच गोड चव लागली नाही. त्यावेळीस माहित नव्हते, आता लक्षात येते आहे, विनयचे सिलेक्शन होणार नाही असे मला प्रकर्षाने जाणवले हीच त्याच्या जॊबची सुरवात होती. आणि हां, बाबा नेहमी आम्हा मुलांना सांगतात, आपली सगळी कामे आपण स्वत:च्या हिमतीवर करायची. लहानपणापासून आम्हा भावांबहिणींना त्यांनी अशीच सवय लावली आहे. आणि त्यात वाईट काहिच नाही! आम्ही कधीच आईवडिलांकडे सपोर्टसाठी पाहिले नाही. विनयला जॊब लागला, तेव्हा बाबांच्या शिकवणीनुसार नोकरीच्या त्याच्या गावाला त्याने एकट्यानेच जायला हवे होते. मला तर अगदी खात्रीच होती. पण कां कोण जाणे, नोकरी जॊईन करायला गेला तेव्हा बाबा अगदी त्याने न म्हणता त्याच्याबरोबर गेले. त्याला सेटल करून देण्यासाठी म्हणून! तो एकटाच जाईल असे मला जे जाणवले, त्यामुळेच बाबांना त्याच्याबरोबर जावे असे वाटले, असे नाही तर दुसरे काय म्हणू? क्रमशः
  • फाटकी झोळी -२
  • फाटकी झोळी -३

Book traversal links for फाटकी झोळी

  • फाटकी झोळी -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
5946 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

हम्म! आता त्या चित्राला तुमचे

किसन शिंदे
Fri, 09/07/2012 - 11:35 नवीन
हम्म! आता त्या चित्राला तुमचे दुर्दैव म्हणायचे कि सुदैव..! कथा आवडली. कथेतल्या नायकाला जे अनुभव ते चित्र मिळाल्यानंतर आलेत तसे तर मला चित्र न मिळताही किती तरी वेळा आलेत. अगदी खरेखूरे.! मनातले विचार आणि घडणारी घटना यात बरीच सुसंगती असायची. काही अनुभव लिहतो इथेच, वेळ मिळाला कि.
  • Log in or register to post comments

दुर्दैव की सुदैव?

सूर्यपुत्र
Fri, 09/07/2012 - 17:56 नवीन
ते (वि)चित्र 'नियती' असावी. -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वाचतोय. पुभाप्र

अन्या दातार
Fri, 09/07/2012 - 11:50 नवीन
वाचतोय. पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्त...

राजो
Fri, 09/07/2012 - 11:57 नवीन
रत्नाकर मतकरींच्या कथा आठवल्या.. पुभाप्र
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Fri, 09/07/2012 - 13:35 नवीन
कथेची रूपरेखा मतकरी स्टाईल आहे. शैलीमधे सुधारणेला वाव आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

वाचतोय

मी_आहे_ना
Fri, 09/07/2012 - 12:04 नवीन
पु.भा.प्र. .. लेखन-शैली आवडली
  • Log in or register to post comments

छान आहे कथा. पुभाप्र.

मोहनराव
Fri, 09/07/2012 - 13:31 नवीन
छान आहे कथा. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

साधी...

प्रभाकर पेठकर
Fri, 09/07/2012 - 13:39 नवीन
साधी कॊमर्सची डिग्री. अरेरे! ह्या आमच्या (साध्या) कॉमर्सच्या डिग्रीने फार अपमानित केले आहे बॉ..!
  • Log in or register to post comments

सर, आजकाल जो तो डबल मास्टर्स,

अरुण मनोहर
Fri, 09/07/2012 - 14:33 नवीन
सर, आजकाल जो तो डबल मास्टर्स, एम बी ए आणि काय काय बिरुदे मिरवतो. साध्या डिग्रीवाल्यांनी काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

स्वतःला (किंवा इतरांना) कमी लेखू नये.

प्रभाकर पेठकर
Sat, 09/08/2012 - 02:15 नवीन
अरूण मनोहर साहेब, साध्या डिग्रीवाल्यांनी काय करावे? डबल मास्टर्स, एम बी ए किंवा काहीतरी बिरुद मिळविण्याचा प्रयत्न करावा. नाही मिळाले तरी स्वतःला (किंवा इतरांना) कमी लेखू नये. एखादी डिग्री त्या व्यक्तीला त्या क्षेत्रात असणारी 'गती' दर्शविणारी मोजपट्टी असते. ह्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला दुसर्‍या कुठल्या विषयात अजिबात 'गती' नसते किंवा त्या विषयात त्याची प्रगती होऊ शकत नाही. एम्. बी. ए. ची डीग्री नसूनही गेली २२ वर्षे मी माझा बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेट करतो आहे. आवडीनुसार क्षेत्र निवडावे आणि यश संपादन करावे. साधी डिग्रीवाली माणसेही आयुष्यात यशस्वी होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

प्रत्यक्ष जीवनात, आदर्शपणे

अरुण मनोहर
Sat, 09/08/2012 - 02:49 नवीन
प्रत्यक्ष जीवनात, आदर्शपणे तुम्ही म्हणता तसेच असावे, वादच नाही. पण कथेमधे, नायक इंजीनियर असून त्याला नोकरी नव्हती आणि "साध्या" डिग्रीवाला चांगल्या नोकरीत होता, ह्याचे त्याला वैषम्य वाटत होते. येवढेच. व्यक्ती तेवढ्या प्रवृती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अन्याय्य..

प्रभाकर पेठकर
Sat, 09/08/2012 - 10:24 नवीन
अरूण मनोहर साहेब, नायक इंजीनियर असून त्याला नोकरी नव्हती आणि "साध्या" डिग्रीवाला चांगल्या नोकरीत होता.. कुठल्याही व्यवस्थापनात तळागाळापासून ते थेट वरपर्यंत सर्व स्तरांवर वेगवेगळ्या कौशल्यधारकांची, पदवीधारकांची गरज असते. 'साध्या' पदवीधारकांची व्यवस्थापनात संख्येने गरज जास्त असते तशीच उपलब्धताही जास्त असते. त्यांच्या क्षेत्रातही खुप स्पर्धा असते. त्यांच्यातही वैफल्यपातळी फार वरची असते. त्यात 'उच्च' शिक्षितांकडून, 'साधी' पदवीधारक असे हिणविले जाणे जिव्हारी झोंबते. 'साधी' पदवीधारकास जर एखाद्या अभियंत्याच्या पदावर नियुक्त करण्यात येत असेल तर अभियांत्रिकी उमेदवारास त्याचं वैषम्य वाटले तर समजू शकतो. पण 'साधी' पदवीधारक जर एखाद्या त्याच्या पदवीला, कौशल्याला अनुरुप पदावर नियुक्त केला जात असेल तर कुणाही 'उच्च' शिक्षिताला त्याचे आश्चर्य वाटू नये. पण, दुर्दैवाने, नोकरी मिळाल्यावरही, हा हेटाळणीचा सुर त्याला आयुष्यभर इतरांकडून ऐकावा लागतो. तसा सुर आपण सर्व सुशिक्षितांनी टाळावा एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

तुमच्या ओळखीत फार इंजिनीअर

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/07/2012 - 15:20 नवीन
तुमच्या ओळखीत फार इंजिनीअर नाहीत वाटते ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कळला नाही.

प्रभाकर पेठकर
Sat, 09/08/2012 - 02:16 नवीन
विधानाचा रोख कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

प्रकाटाआ.

मोहनराव
Fri, 09/07/2012 - 13:41 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

फाटकी झोळी बद्दल

खुशि
Fri, 09/07/2012 - 13:58 नवीन
अनेक उत्तम आशीर्वाद अरुण. निराशेचे विचार झटकून टाक.अरे तू स्वतःचा व्यवसाय करणार आहेस म्हणून नोकरी लागत नाही. झट़कून टाक जीवा दुबळेपणा मनाचा विचार मनी असावा उत्तुन्ग आसमन्ताचा.
  • Log in or register to post comments

हौसला अफजाई के लिये शुक्रिया!

अरुण मनोहर
Fri, 09/07/2012 - 14:27 नवीन
हौसला अफजाई के लिये शुक्रिया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खुशि

नेहमीप्रमाणे आवडले!

पैसा
Fri, 09/07/2012 - 19:45 नवीन
बरेच दिवसांनी लिहिलंत पण खूप उत्कंठा वाढवणारं आणि मस्त! ही कथा नेमक्या कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज लावायचा प्रयत्न करते आहे!
  • Log in or register to post comments

कथा आवडतेय. पुढचे भाग सुद्धा

शिल्पा ब
Fri, 09/07/2012 - 20:39 नवीन
कथा आवडतेय. पुढचे भाग सुद्धा पटापट टाकत चला.
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

मन१
Fri, 09/07/2012 - 22:17 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा