✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव.

ग
गवि यांनी
गुरुवार, 08/30/2012 - 13:39  ·  लेख
लेख
"तुम्ही मिसळपाव डॉट कॉमवर नाही आहात का? एकदा या आणि बघा तरी.", ब्लॉगवाचक यकु एक दिवस ईमेलमधून वदला. मी आलो. काही जोरदार चर्चा वाचल्या. "अमुक विधानाची गंमत वाटली", "ड्वाले पाणावले", "मोठे व्हा" वगैरे .. सॉरी वैग्रे वैग्रे काहीकाही वाचत होतो. बर्‍याच मिपा मेंबरांचे वाढदिवस इतरांकडून लक्षात ठेवले जातात अशीही माझी समजूत झाली, कारण तेवढ्या थोड्या दिवसांतही "वाढदिवसाच्या शुभेच्छा.. हॅपी बड्डे" वगैरे आपल्याशी मतभेद असलेल्या व्यक्तीलाही दिल्या जात होत्या. विक्षिप्त आदिती, विसोबा खेचर, धमाल मुलगा, बेसनलाडू,टारझन,पंडित गागाभट्ट, गोगोल, गांधीवादी, छोटा डॉन, परिकथेतील राजकुमार अशा बर्‍याच रंगीबेरंगी वाटणार्‍या आयडींनी लक्ष वेधलं जात होतं. पण सदस्य झाल्याशिवाय तितकी खास मजा नाही असं यकुने लक्षात आणून दिल्यामुळे मी एक सदस्यनाव घेऊन अ‍ॅप्लाय केलं. सदस्यत्व ताबडतोब मिळत नसून ते यथावकाश, संमतीनंतर मिळेल असं लक्षात आल्याने मी वाट पाहिली आणि विसरून गेलो. तीनचार दिवसांनी एकदम आठवण झाली म्हणून पाहिलं तर अ‍ॅप्रूव्हल नाहीच. नंतर दुसर्‍या नावाने परत अ‍ॅप्लाय केलं. पुन्हा वाट पाहिली. मग म्हटलं, जाऊ दे.. मला ब्लॉगरपणाच्या हवेत खूप मजा येत होती. मिसळपाव बिसळपाव काही मला अ‍ॅक्सेप्ट करत नाहीये, जावदे.. मग अचानक एक ईमेल आली. खातं चालू झाल्याची. लॉगिन केलं आणि हे सगळं सुरु झालं ते या क्षणापर्यंत चालू आहे. आधी मी असं पाहिलं की इथे ब्लॉगपेक्षा बरंच जास्त चलनवलन, दळणवळण आहे. प्रतिक्रिया आणि चर्चाही एकदम गरमागरम आणि सदैव चालू उपसा असलेल्या.. "लेखन करा" च्या लिंकवर गेलो. ब्लॉगवरुन एक विमान कसं चालवावं याविषयीचा लेख चोप्य पस्ते केला. (हॅ हॅ हॅ... हे चोप्य पस्ते, असले अच्र्त ब्व्लत शब्द ही मिपाचीच भेट.) यामागे सरळ विचार असा होता की पब्लिकशी ओळख नाहीये, उगाच काथ्या कुटायला घेतला आणि झाला भडिमार तर काय घ्या? त्यापेक्षा आपल्या पक्क्या कॉन्फिडन्सवाल्या विषयावरचा लेखच पेस्टूया.. लेख प्रकाशित केला न केला आणि धडाधड प्रतिक्रियांना सुरुवात. आयला.. तशा तर माझ्या ब्लॉगवरही बर्‍यापैकी संख्येने प्रतिक्रिया येतच होत्या. पण तुलनेत इथे प्रतिक्रियांचा धोंदाणाच.. रॉयल रिजन्सी नावाच्या कोण्या हॉटेलातला बुफे "ब्रेकफास्ट" आणि मामा काण्यांच्या स्वच्छ उपाहारगृहातली नाश्त्याची झुंबड इतका संख्यात्मक फरक होता.. मग काय.. मी ब्लॉगवर आधी लिहिलेले लेख उचलून दणादणा मिसळपाववर टाकायला लागलो. त्याच्यावरही बरेच प्रतिसाद येत गेले. ब्लॉगच्या पद्धतीमधे प्रत्येक वाचकाच्या उत्तराला वेगळं प्रत्युत्तर लिहिण्याची पद्धत पाहिली होती. त्यामुळे इथेही प्रत्येकाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. मी वाचक "मेंटेन" करण्यासाठी योग्य "कर्टसी" दाखवत होतो.. माझ्यामते. सकाळी एक लेख, संध्याकाळी एक लेख. मग कसाबसा एक दिवस थांबून अजून एक लेख.. असं चालू झालं. परिकथेतील राजकुमार या आयडीने हळूहळू माझ्या लेखांवर डायरीची चित्रं डकवायला सुरुवात केली. "तुम्हाला डायरी भेट द्यायला हवी", "वा वा, मिपाच्या गगनात तुमच्याच विहार्‍या दिसत आहेत", "कधीकधी मी मिपावर आलोय की तुमच्या ब्लॉगवर तेच कळत नाही" अशा कॉमेंट्स टाकायला सुरुवात केली. त्रासदायक आयडी दिसतोय.. याला काय बरं उत्तर द्यावं असं म्हणत मी वेगवेगळ्या पद्धतीने या आयडीला उत्तरंही दिली. लगेचच काही जणांनी मला पाठिंबाही दिला, इत्यादिं इत्यादि. पण हा परिकथेतील राजकुमाराचा तिरकसपणा जाईना. मग मी काहीतरी टोकाचं उत्तर दिलं. वादावादी मनस्ताप इत्यादिंमधून जरा शांत झाल्यावर मला लक्षात आलं की हा माझा ब्लॉग नाहीये. हे पब्लिकचं संकेतस्थळ आहे. विमानोड्डाण शिकताना आणि करताना आपण एका एरोस्पेसमधले सर्व विमानांचे पायलट्स मिळून एकच रेडिओ फ्रीक्वेन्सी वापरुन एअरपोर्टशी आणि एकमेकांशी संवाद साधत असतो. ती आपल्या घरच्या टेलिफोनची लाईन नसते. तसंच इथे मिसळपाववर कोणताही नवा धागा टाकला किंवा कोणत्याही धाग्याला प्रतिसाद आला की तो धागा पहिल्या पानाच्या पहिल्या नंबरवर येतो आणि सर्व धाग्यांना एक एक अशा मात्रेने खाली ढकलतो. पहिल्या पानावर जे काही आहे त्याला लक्ष मिळतं. दुसर्‍या पानावर सरकलं की ते इतिहासजमाच, जवळजवळ. हे मला माहीत नव्हतं. किंवा दिसत असलं तरी लक्षात आलं नव्हतं असं म्हणू. माझं सगळं लक्ष लेख टाकून प्रतिक्रिया वाचण्यात अन सुखावण्यात होतं. मी मिसळपावचे नियम किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न यापैकी काहीच वाचलेलं नव्हतं. सगळा रोख हा मिळालेल्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याकडे होता. परिकथेतील राजकुमार हे केवळ एक निमित्त झालं मला या सर्व गोष्टी जाणवण्याचं. त्या आयडीने वाईटपणा घेऊन मला हे जाणवून दिलं आणि ते आवश्यकच होतं. त्याबद्दल त्या आयडीचा मी आभारी आहे. याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं. दणादणा पोस्टे टाकणं कमी झालं आणि इतर लोकांचं लिहिलेलं वाचण्याची अक्कल आली. मग सुरु झाली एक नवी मिपा लाईफस्टाईल. काय लिहितात लोक इथे.. वा. एकोळी धाग्यापासून ते पूर्ण महाभारताच्या आकारापर्यंत. पण खरी मजा धाग्यात नसते. ती असते प्रतिसादांमधे. मला वाटतं नव्याकोर्‍या धाग्याच्यासुद्धा नावावर क्लिक न करता थेट नवीन प्रतिसादांच्या लिंकवर क्लिक करुन आधी प्रतिसाद वाचणारी आणि नंतर वाटल्यास संदर्भासाठी मूळ धागा पाहणारी मंडळी कमी नसावीत. मिपावर रुळतारुळता त्या वेळचे लक्षात राहिलेले हायलाईट्स म्हणजे जागुताईचे जिताडा आणि मांदेली हे एरवी पाककृतीमधे फारसे न दिसणारे पण घरोघरी खाल्ले जाणारे मासे. या माश्यांची पूर्ण सीरीज वाचताना आपल्याला इतक्या माश्यांची नावंही माहीत नाहीत हे समजून थक्क व्हायला होत होतं. वामेपासून तिसर्‍यांपर्यंत सगळं कव्हर केलं होतं. समुद्रखजिना.. टारझन हे त्या क्षणी मिसळपाववर माजी व्यक्तिमत्व होतं. या आयडीचं अस्तित्व खुद्द तो आयडी जागृत नसूनही धाग्याधाग्यात जाणवायचं. टारु, टारबा असे उल्लेख आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या खमंग कॉमेंटसचे क्वोट्स वगैरे यायचे. त्याची आठवण काढली जायची. बसवला टेंपोतचा हा जनक आहे अशी माझी माहिती आहे. मला आठवतंय, त्याचं आफ्रिकेचं प्रवासवर्णन हा मिपाच्या इतिहासात जतन करुन ठेवावा असा ठ्ठोवा , सॉरी ठेवा आहे. एक दिवस नोटिफिकेशन निघून टारबा परत आले आणि आल्यापासून त्यांच्या प्रतिक्रियांनी ठ्ठो करुन हसायला लावलं. हजरजबाबीपणाचा अद्वितीय नमुना. नंतर परत गायब.. अजूनही कधीतरी परत येईल अशी आशा, किंवा आलाही असेल..या संशयित आयडींतला नेमका कोण टारबा ते कळायला हवं इतकंच. पंडित गागाभट्ट यांच्या करड्या पांढुरक्या हायलाईट्स वापरुन दिलेल्या प्रदीर्घ प्रतिक्रिया वाचून डोळे थकायचे, पण त्यातला मुद्देसूदपणा आणि बिनतोडपणा लाजवाब होता. कितीही कीस पडला तरी चालेल पण मुद्द्याची सालं काढण्याचं काम ते अत्यंत चिकाटीने करत. आणि नुसता वादासाठी वाद नव्हे, त्यासोबत ठाम मत आणि तीक्ष्ण विनोदबुद्धीही. शंका हा पंगाशेटचा ट्रेडमार्क. "एक शंका" अशा टायटलने हे अशा काही शंका विचारत की धागाकर्ता गरगरलाच पायजे. पंडित गागाभट्ट ऐवजी "शंकित काकाभट्ट" असाही आयडी त्यांनी घ्यायला हरकत नव्हती. यात संपादक नेमके कोण आहेत हे काही कळायचं नाही, अजूनही कळत नाही.. म्हणजे कळतं पण नेमकं कळत नाही. पण मधेच लाल रेघ आली की काहीतरी इचकलंय इतकं समजायचं .. एखादा बळी रोजचाच असतो.. पण कधीकधी साठसत्तर प्रतिसादांचं सामूहिक हत्याकांडही होतं. या ठिकाणी "हत्या" की "वध" यावर वाद हा मिपाचा पेटंटेड वाद असल्याने तो मोकळा ठेवतो. स्पा या पात्राची प्रसिद्धी एका जबरी निराशावादी धाग्यामुळे झालेली होती. नंतर मात्र हे व्यक्तिमत्व अवली (अवलिया नव्हे) असल्याचं लक्षात आलं. हे साधारणपणे भीतीदायक कथा लिहितात असं दिसत होतं. अधेमधे भेळ वगैरे पदार्थांना पाककृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कामही त्यांनी केलं. नंतर हळूहळू तो स्पावड्या झाला. यथावकाश पाहतो तो काय, आम्ही दोघे एकाच इमारतीत नोकरीला आलो आहे हे लक्षात आलं. "वर्ल्ड इज स्मॉल"चं इथलं पहिलं उदाहरण. चोता दोन हे प्रकरण आधी कळलं नव्हतं. पण ब्लॉग माझा स्पर्धेत टीव्हीवर झळकलेला लांब केसांचा तरुण तोच हा "छोटा डॉन" हे नंतर लक्षात आलं. वायदेआझम हे नाव याला का पडलं असावं यावर तेव्हाही प्रश्न पडला होता आणि आताही आहे. ज्याने मिपा सुचवलं ती खुद्द यशवंत कुलकर्णी ही व्यक्ती त्यावेळी काहीतरी तुफान पंगे घेऊन गच्छंती अवस्थेत होती. यथावकाश त्याला मिपाशिवाय स्वस्थ झोप येईना म्हणून यशवंत एकनाथ बनून तो परत आला. त्यावेळी यूजी सीरीज आणि कासाराचा गोईदा , गुंजग्रामीचे दिवस या वाचकाला अडकवून ठेवणार्‍या गोष्टी त्याने लिहिल्याचं आठवतं. अस्सल जिवंत आणि खरीखुरी, दिल से भाषा हा यकुचा खास ट्रेडमार्क आहे. भारतातल्या मध्यरात्री दीड-दोन वाजता ही वल्ली न चुकता ऑनलाईन दिसत असायची. अमेरिकेतली जनता त्या वेळी ऑनलाईन असेल हे तर समजायचं, पण यकु नक्की भारतातच असतो ना अशी मला शंका यायची. नंतर ब्लॉग माझामधे माझं बक्षीस घ्यायला माझ्यातर्फे तो गेला आणि टीव्हीवर दिसला तेव्हा तो इथेच असतो याची खात्री पटली. हल्ली नर्मदातीरी जाऊन आल्यापासून मेल्याने जिवाला घोर लावून ठेवला आहे.. शिल्पा ब हे कॅरेक्टर अधूनमधून प्रतिसादांमधे दिसायचं. दिसायचं म्हणजे काय, अजूनही दिसतं. घाबरतात की काय त्या? त्यांना मात्र सगळे घाबरतात.. या ताई त्यांच्या कीबोर्डची "वाय" ही कळ नवीन बसवून अथवा दुरुस्त करुन का घेत नाहीत हा प्रश्न मी आजपर्यंत त्यांना विचारलेला नाही. यांच्या धारदार जिभेला बरेच मी तरी घाबरुन असायचो. पण कधीकधी "चांगलं आहे" "आवडलं" असंही लिहितात, तेव्हा पोटातला खड्डा जरा कमी होतो. "ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा" अशा जब्रा ज्वलनशील षिर्षकाचा लेख वाचून राजेश घासकडवी हे नाव एकदम पाठ झालं. तार्किकतेचा अर्क कोळून प्यायलेला मुद्देसून मनुष्य म्हणून यांना गुर्जी म्हणत असावेत अशी समजूत मी करुन घेतली आणि कायम ठेवली आहे. कंसातली दर्जेदार विडंबनंही यांचीच खास ठेवणीतली चीज..अगदी झ झ झ झ झोपडीत चारपाई या हल्लीच्या विडंबनापर्यंत. बाबागिरीच्या साबणाचा पहिला गिर्‍हाईक, किंवा मिपावर स्लटवॉक असल्या अफलातून कल्पना यांच्याच सुपीक डोचक्यात उगवतात. परिकथेतील राजकुमार, अवलिया, मृत्युंजय, असुर या सर्व एकाच माणसाच्या आयडी आहेत अशी माझी समजूत होती. किती वेगवेगळं बेअरिंग मेंटेन करतो ना हा मनुष्य, असं आश्चर्यही वाटायचं.. कोणत्या आयडी डुप्लिकेट आहेत हा मिपाजन्मापासून आजतागायतचा हॉट टॉपिक आहे. कौल हा सेक्षन त्यावेळी इथे होता. कराटेप्रमाणे हय्या करुन कौलं फोडणारे खूप कौलपटू दिसायचे. इफ आय अ‍ॅम नॉट राँग, इंटेश, ऊर्फ इंटरनेटस्नेही हा याचा चँपियन होता. काथ्याकूट हा मिपाचा अंतरात्मा. बाकी काही असो नसो.. जोसवर काथ्याकूट आहे तोसवर मिपा आहे. अनेक विषय आले गेले, पण गे-लेस्बियन, स्त्री-पुरुष, देव, धर्म, ज्योतिष, शाकाहार मांसाहार, निवासी अनिवासी हे विषय म्हणजे मराठा मंदिरमधे सतरा वर्षं चालू असलेल्या "दिलवाले दुल्हनिया"सारखे आहेत. ब्राह्मण अब्राह्मण याविषयी काही बोलायचीच सोय नाही. ब्रा म्हणता ब्रह्महत्या असा प्रकार होतो. ..... (अपूर्ण..)
  • मिसळपाव.. २.

Book traversal links for मिसळपाव.

  • मिसळपाव.. २. ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
37320 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

अजूनही एक भाग लिहीणार होतो.

पैसा
Fri, 08/31/2012 - 18:40 नवीन
अजूनही एक भाग लिहीणार होतो.
हे कशासाठी म्हणे? अजून लिहा की! सुहासने लिहिलंय आणि त्यातल्या काही गोष्टी पटणार्‍या आहेत. पण तरी...खरं तर मीही तुमच्या जरा आधीच इथे मेंबर झाले त्यामुळे ५ वर्षांपूर्वी इथे काय होतं याबद्दल मी न बोलणं चांगलं. पण गेल्या दोन अडीच वर्षांत तरी इथे कंपू आहेतच. त्यापूर्वीही होते असं जुने लोक सांगतात. तेव्हा त्याबद्दल सुहास म्हणतोय ते नॉस्टॅल्जिक आहे असंच मी म्हणेन. हा माणसाचा स्वभावच आहे की भूतकाळातल्या गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. अगदी जोरदार कडवट वादविवाद भांडणांच्या आठवणीसुद्धा भूतकाळातले म्हणून सुखद वाटायला लागतात. मी कोणत्याही कंपूत सामील नाही. पण माझा तरी अनुभव असा आहे की बरेचदा जवळचे मित्र म्हणवणारे लोक तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देत नाहीत, तर जे कोणत्याही कंपूत नाहीत ते नक्कीच देतात! आणखी एक पैलू आहे. माझा बिल्ला नं. १०९५२. गेल्या २ वर्षांत मेंबर्सची संख्या १९२०० च्या आसपास झालेली आहे. म्हणजे जवळपास दुप्पट. मिपा बदलत आहे आणि बदलणारच. सुरुवातीला अवखळ झरा असलेली नदी हळूहळू शांत होत जाते. तसं होणं अपरिहार्य आहे. सदस्य संख्या वाढणार तशी धाग्यांची संख्या वाढत जाणार. त्यातले चांगले वाईट फरक ठळक करणारे आपण वाचकच आहोत. मालक बदलले. बरेचसे संपादक बदलले तरी मिपा अजून लोकप्रिय आहे आणि मायबोलीनंतर इतकं यशस्वी दुसरं मराठी संस्थळ मला तरी माहिती नाही. संपादकांबद्दल सुहासने लिहिलंय त्याला माझा पास. संपादक हे इतरांसारखेच सामान्य सदस्य आहेत हे सर्वांनीच लक्षात ठेवलं तर बरं. साहित्याबद्दल बोलायच तर अजूनही खूप चांगले धागे येतात. नियमितपणे लॉगिन करणार्‍याला "इथे हल्ली चांगले धागे येत नाहीत" असं वाटायचं कारण नाही. गेल्या महिन्यात सुरू झालेलं "अन्न हे पूर्णब्रह्म सदर", जयंत कुलकर्णी, मोदक, वल्ली यांचे इतिहासावरचे धागे/मालिका, रमताराम, गवि, श्रामो, नीतिन थत्ते, बिका, नगरीनिरंजन, चिगो यांचे वैचारिक लेखन, काही गडकिल्ल्ल्यांचे फोटो असलेले धागे, पराची फटकेबाजी, ५० फक्त आणि अपर्णा अक्षय यांच्या कादंबरी मालिका कितीतरी चांगले धागे आठवत आहेत. क्लिंटन, मन१, अर्धवटरावांचे आणि इतर काही जणांचे प्रतिसाद स्वतंत्रपणे वाचनीय असतात. (ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी रागवू नका!) अर्थात काय चांगलं वाईट हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही. लवकरच मिपा द्रुपल ७ वर नेण्यात येणार आहे. बरेच काही बदल होणार आहेत. त्यांचं स्वागत करूया! आणि गवि तुमचा पुढचा लेख जरूर लिहा. आम्ही वाट बघतो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+अगणित

सोत्रि
Fri, 08/31/2012 - 22:25 नवीन
पैसातैच्या शब्दाशब्दाशी सहमत! ह्याचा अर्थ असा नाही की सुहासने जे व्यक्त केले आहे ते रास्त नाही. सुहासशी काही अंशी (बराचसा) मी सहमत आहे. मी मिपावर रुळायला किंवा मिपाचा जो USP होता तो सुहासने अगदी यथार्थ व्यक्त केला आहे. पण काळाबरोबर सर्व बदलते, नव्हे बदलावेच लागते. मिपाही त्यातुन जात आहे किंवा असेलही पण त्यामुळे गविंनी जे लिहीले आहे त्याची परिणामकारकता कमी होते असे नाही. सदा सर्वकाळ 'जुने ते सोने' हे उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. हे म्हणजे किशोरकुमार किती अस्सल आणि कुमार सानू किती नक्कल ही तुलना करण्यासारखे झाले. असो, गवि तुम्ही तुमच्या चष्म्यातुन आम्हाला, तुम्हाला जसे मिसळपाव भावले ते लिहून कळवाच. कारण आमचा तुमच्या लेखणीवर सार्थ विश्वास (आणि टंचंनिकेवर जीव ;) ) आहे. - ( ही मिसळपाव बखर आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी जरा ...

चौकटराजा
Sat, 09/01/2012 - 18:14 नवीन
मला आता मिपावर येऊन पाचेक महिने झाले असतील. पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही. या वाक्याला माझा पाठिंबा आहे.काही निरि़क्षणे अशी आहेत की त्यात मिपाचे मालक संपादक काहीही करू शकत नाहीत. कारण मुक्तद्वार व्यासपीठ म्हटल्यावर फारसा रोल मालक किंवा संपादक याना रहात नाही.मिपावर मला आढळलेला दोष हा ऑर्कुट व फेसबुकवरही आढळलेला आहे तो म्हणजे कंपू बाजी. वैचारिक कंपूबाजी. त्यामुळे अयोग्य ठिकाणी प्रतिसादांची खैरात तर काही धागे वेगाने मागे पडण्याची सोय. दुसरे असे की प्रतिसादाला इथे प्रतिप्ततिसाद देण्यात जवळ जवळ सर्वच सदस्य चिकटपणा करतात. काही वेळेस प्रतिसादही लेखाइतकच माहितीपूर्ण असू शकतो.पण मुळ धागाकर्त्यालाच प्रतिसाद दिला जातो.. धाग्याच्या विषयापेक्षा धागाकत्याची वाहवा किंवा निंदा कशी करता येईल याचा प्रयत्न दिसतो. धागा कर्ता हा केवळ निमित्त असतो. धागा महत्वाचा. पण एखाद्या विषयावर प्रतिसाद दिल्यास त्या प्रतिसादांची दखल घेण्याचे प्रमाण कमीच आहे. उलट प्रतिसाद लिहिंण्यापेक्षा वेगळा धागा काढा ! दुसर्‍याच्या धाग्यात तुमचे गुर्‍हाळ नको अशा अर्थाचे व्यनि पाठविले जातात. बरेचसे सदस्याना विशेषता: नव्याना नाउमेद करण्याचा उद्यम काही आयडी करतात. पी आर ओ वाढवा व धाग्यात लोकप्रिय व्हा ही संस्कृति ज्यानी खस्ता सोसून मिपा काढले त्याना नक्कीच अपे़क्षित नसावी. तरीही म्हणतो पण परिस्थिती वाईट आहे असं मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एरवी

श्रावण मोडक
Fri, 08/31/2012 - 10:35 नवीन
हा असा विचार करता येतो तर एरवी बऱ्याचदा अंगात आल्यासारखं वागण्याचं कारण काय? संताप वगैरे ठीक आहे. तो सारखाच व्यक्त करत बसलास तर हे असं संतुलित लिहिलेलंही वाऱ्यावर जातं. हा सल्ला वैयक्तिक नाही, तो 'सुहास..' या आयडीच्या एकूण लेखनक्षमतेसाठी आहे. तरीही क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बाप रे !

सुहास..
Fri, 08/31/2012 - 12:06 नवीन
तुमच्या लेखणीतुन प्रसवलेल 'क्षमस्व' वाचण्यापुर्वी माझ्या मॉनीटर ला आग का लागली नसावी !! एरवी बऱ्याचदा अंगात आल्यासारखं वागण्याचं कारण काय? संताप वगैरे ठीक आहे >>> थोडासा संताप आहेच ! का नसावा ? कोणीच बोलत नाही म्हणुन बर्‍याच मंडळीना शेफारताना या डोळ्यांनी पाहिले आहे . बाकी अंगात येण्याची लेखन प्रेरणा तुम्हीच आहात ;) ...आठवा .. " ही नको त्या वेळी 'लोकशाही ' बरी अंगात येते तुमच्या ! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

१००% मान्य

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 08/31/2012 - 12:36 नवीन
ही नको त्या वेळी 'लोकशाही ' बरी अंगात येते तुमच्या
अगदी १००% मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

:-)

श्रावण मोडक
Fri, 08/31/2012 - 13:24 नवीन
थोडासा संताप आहेच ! का नसावा ?
असलाच पाहिजे. व्यक्तही केला पाहिजे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

वाघुळ मित्रा , ते वाक्य माझं

सुहास..
Fri, 08/31/2012 - 14:03 नवीन
वाघुळ मित्रा , ते वाक्य माझं नाही , खुद्द श्रामोंनी एकदा एका सिनीयर संपादकाला खडे बोल सुनावताना वापरलेले वाक्य आहे ते ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सगळा प्रतिसाद काही पटला नाही.

रेवती
Fri, 08/31/2012 - 20:46 नवीन
सगळा प्रतिसाद काही पटला नाही. मिपाचे मालक, चालक, संपादक बदलले की हे सगळे बदल होणारच. तुझ्या काही कल्पना असतील तर मिपा मालकांकडे आराखडा द्यावास. संपादकांचे वागणे पटले नाही तर ओरडा होतच असतो. ते आता नवीन नाही. यात बदल हवे असल्यास नीलकांतला व्य. नी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेचा फायदा करून घेतल्यास बदल होण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणता येतील. तात्यांनी स्थळ चालवले ते चांगलेच होते. सगळ्यांनाच मान्य असेल. त्यानंतर दर्जा खालावत गेल्यामुळे जे तुझ्याशी खासगीत बोलले ते आणि तू यांनी अत्यंत दर्जेदार लिखाण कितीवेळा दिलेत? नियमीतपणे महिन्यादोन महिन्यांनी अत्यंत सुंदर लिखाण देण्याचा परिपाठ का ठेवला नाही? जे सदस्य पूर्वी येऊन नियमीत लिहायचे ते आता येत नसल्याचे कारण फक्त मिपाचा दर्जा हे एकच असण्याची शक्यता आहे काय? इतर कारणे नसतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही काय? एकवेळ मिपा बंद पडेल अशी आली होती. हे संस्थळ निदान आहे तसे चालू अवस्थेत रहावे यासाठी प्रयत्न काही ज्येष्ठ सदस्यांनी केले. नीलकांतने येऊन सगळी जबाबदारी घेतली. एकदा मूळ मालक (काही कारणाने) सोडून गेल्यावर लोकांची जमवाजमव करण्यात काही वेळ जाणे हे अपरिहार्य आहे. तुला आणि ज्यांना हे संस्थळ ब्राह्मणी वाटते त्यांनी ते तसे वाटू नये म्हणून प्रयत्न करायला कोणाची ना आहे? मिपाचे नियम पाळून लिहायला तुला कोणी मनाई केलीये? बर्याच दिवसांत मिपावर चांगला पुस्तक परिचय, सिनेमाचे परिक्षण, कथा आली नाहिये असे वाटते त्यावेळी आपण काय करू शकू? असे का नाही वाटत? कविता विभागाला तू ज्याप्रकारे संबोधलं आहेस त्यावर मात्र पुन्हा विचार करावास असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

चला आता अजुन सविस्तर लिहावे लागेलच !

सुहास..
Fri, 08/31/2012 - 21:26 नवीन
रेवाकाकू , हे असे कोणाचे तरी कान टोचले जाणार हे ही मी गृहीत धरलेच होते . आता सध्या ( खरच ) जरा बिझी आहे ..पण सविस्तर लिहीनेच ...फक्त अजुन " पोल-खोल " झाली तर राग येवु देवू नकोस. शेवटी " कळकळ " आहे म्हणुन च बोलतो. संपादकांना ग्गोड - ग्गोड , गुलाबी गुलाबी कोथरूड च्या गल्ल्यांमधुन, जरा चाकण चा कचरा डेपो दाखवायची वेळ आणलीच तू :) ( फक्त रडारड करू नका नंतर कांताकडे जावून )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मला कचरा डेपो बघण्याची इच्छा

रेवती
Fri, 08/31/2012 - 22:20 नवीन
मला कचरा डेपो बघण्याची इच्छा नाही. रोज जेवढा दिसतोय तो पुरेसा आहे. सांगायचं एवढच आहे की स्वत:कडेही तीन बोटे असतात हे विसरून चालणार नाही. कालच्या मिपावर तुला जे चित्र दिसले ते कदाचित आज बदललेले असू शकते. काही प्रश्न नव्या मंडळाने वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. तो अयस्वी झालेला असू शकतो. तूही काल होतास तसा आज नाहीस. खूप रागाने प्रतिक्रिया देणारे सदस्य आज निवळू शकतात तर कालपर्यंत गोग्गोड वाटणारे तलवार घेऊन येऊ शकतात. फक्त रडारड करू नका नंतर कांताकडे जावून तुला नक्की हेच म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लई भारी ओ गवि, अवांतर -

५० फक्त
Fri, 08/31/2012 - 08:06 नवीन
लई भारी ओ गवि, अवांतर - मिपावर निवडणुका येई घातल्या काय मिपाजी वन गौरव पुरस्कारासाठी ?
  • Log in or register to post comments

मस्तच ! आवडल्या गेले आहे.

सूड
Fri, 08/31/2012 - 12:53 नवीन
मस्तच ! आवडल्या गेले आहे. माझी अवस्था 'असा मी असामी'तल्या बेंबट्यासारखी झाली आहे. गविंनी लिहीलेलंही पटतंय आणि डॉटवाल्या सुहासने म्हटलेलंही काही प्रमाणात योग्य वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments

फारच छान

पाषाणभेद
Fri, 08/31/2012 - 08:43 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Fri, 08/31/2012 - 10:19 नवीन
गवि तुमचा मिपाप्रवास आवडला. लिहित रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मतितार्थ म्हणजे आमचा परा महा

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 08/31/2012 - 09:55 नवीन
मतितार्थ म्हणजे आमचा परा महा हल़कट शिरोमणी आहे पण नाना एव्हडा नाही
  • Log in or register to post comments

ब्येश्ट....

टिवटिव
Fri, 08/31/2012 - 10:28 नवीन
फारच छान!!! मला जे. पी. मॉर्गन यांच्या क्रिकेट वरिल लेखाने मिपा चि ओळख झालि. तेव्हापासुन दिवसभर मिपावर पडिक असतो.अर्थात वाचनमात्र...
  • Log in or register to post comments

गवि राव एकदम झ्कास !!!!

स्वप्निल घायाळ
Fri, 08/31/2012 - 10:30 नवीन
गवि राव एकदम झ्कास !!!!
  • Log in or register to post comments

गविंना हे असं लिहीण्याची काय

प्यारे१
Fri, 08/31/2012 - 10:41 नवीन
गविंना हे असं लिहीण्याची काय गरज पडावी ब्रं????? असो. चान चान.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/31/2012 - 12:14 नवीन
लेखनात आणि प्रतिसादात आमचे नक्की कौतुक केले आहे, का अपमान केला आहे हे समजले की सविस्तर प्रतिक्रिया देईनच.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ, बस का पराषेट.. बाकी

गवि
Fri, 08/31/2012 - 12:26 नवीन
हॅ हॅ हॅ, बस का पराषेट.. बाकी सर्व जाऊ दे.. तुम्हालाही डिस्क्लेमरची गरज भासावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नका जाउ हो गवि

इरसाल
Fri, 08/31/2012 - 12:33 नवीन
नका जाउ हो गवि त्यात काय इतके राग मानायचे ते ?
  • Log in or register to post comments

एकदम

सुमीत भातखंडे
Fri, 08/31/2012 - 14:19 नवीन
एकदम मनातलं...
  • Log in or register to post comments

क्या बात है! छानच हो गवि! आधी

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/31/2012 - 15:01 नवीन
क्या बात है! छानच हो गवि! आधी मलाही प्रदीपदांना वाटलं तसं वाटलं! :)
  • Log in or register to post comments

आणि ते इन्द्रराज पवार ?

सातबारा
Fri, 08/31/2012 - 16:29 नवीन
या धाग्याच्या निमीत्ताने इन्द्रराज पवारांच्या मेगाबाइटी प्रतिसादांची पण आपण आठवण काढू यात.
  • Log in or register to post comments

मला वाटते की इंद्रराज पवार,

सोत्रि
Fri, 08/31/2012 - 22:34 नवीन
मला वाटते की इंद्रराज पवार, संजोपराव, घासकडवी.... हे सगळे 'अपूर्ण' ह्यात सामावलेले असावे! -(मिपाकर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

पहिले एकदम निरवा निरवीची भाषा वाटली.....

जयनीत
Fri, 08/31/2012 - 20:16 नवीन
म्हटलं गवि निरोप घेताहेत का? नाय तसं! लगे रहो....
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/31/2012 - 22:16 नवीन
मला वाटलं गवि कुठं चाल्ले की काय ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवडलं...

नीलकांत
Sat, 09/01/2012 - 15:43 नवीन
तुमची मिपा सफर आणि सदस्यांबाबतच्या आठवणी आवडल्या. छान लेखासाठी धन्यवाद. - नीलकांत
  • Log in or register to post comments

नको तो विषय

आदिजोशी
Mon, 09/03/2012 - 17:58 नवीन
मिपा चा भूतकाळ हा जितका भावूक करणारा विषय आहे, तितकाच तो अनेक अतर्क्य निर्णयांमुळे क्लेषकारकही आहे. मात्र, सुरुवातीचं मिपा मनापासून आवडत होतं. मिसळकट्टे जोरात होते. त्यानंतर मध्यंतरी मिपा प्रचंड गंडलं होतं. आता पूर्वीइतके अ‍ॅक्टीव्ह नसल्याने सद्ध्याच्या परिस्थिती विषयी भाष्य करू शकत नाही. एकच सांगतो, पूर्वी आमचं मिपा म्हणजेच एक मोठा कंपू होता.
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
Mon, 09/03/2012 - 20:08 नवीन
अ‍ॅड्या, काय बोललास रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

:)

शैलेन्द्र
Mon, 09/03/2012 - 22:04 नवीन
माझ्यासारखा माणुस काय बोलणार? मी साधारण गेली पाच वर्षे मीपावर आहे. माझ्यासारखे अनेक सदस्य असतील ज्यांनी सवडीनुसार व कुवतीनुसार कधी प्रतिक्रिया दिल्या, कधी थोडे पांढर्‍यावर काळे केले. काही व्यवधानांमुळे म्हणा किंवा स्वभावधर्मानुसार म्हणा, आम्ही जालीय विश्वाशी आमच्या आयुष्याची सांगड घालु शकलो नाही. काही व्यक्तींशी/आयडींशी खर्‍या आयुष्यात मैत्री कराविशी वाटते/ वाटेल- कधी जमते कधी नाही योग येणार सुहास म्हणतो तो काळ पाहीला तसचं स्थित्यंतरानंतरचा काळही पाहीला. काही गोष्टी अपरिहार्य असतात. त्या तशा घडतातच, पण आजही दोन घटका निवांतपणा मिळाला किंवा हवा असला तर मिपा नक्किच उघडल जात, आणी आजही इथला झरा वाहताच आहे.. पाणी कदाचीत बदललही असेल.. बाकी गविंचा लेख मस्तच..
  • Log in or register to post comments

मिसळपाववर रोजची फेरी झाल्याशिवाय चैन पडत नाही.

NAKSHATRA
Wed, 01/13/2021 - 19:58 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा