Skip to main content

पार्टी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 16/08/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
पार्टी हा शब्द खरं म्हणजे पूर्वी फक्त हिंदी सिनेमांमध्येच ऐकला आणि पाहिला. एका मोठ्या दालनामध्ये स्त्री-पुरुष हसत-खेळत, गप्पा करत हातातल्या उंची मद्याचा आस्वाद घेत झुलत आहेत; काही उत्साही कार्यकर्ते मंद-मंद संगीताच्या तालावर मोहक नृत्य करत आहेत वगैरे अशी ती अगदी ठोकळेबाज दृष्ये असत. मग मध्येच नायक किंवा नायिका एखादे गाणे सुरु करत असे आणि पार्टी अधिक रंगात येत असे. अगदी 'अनुपमा' मधल्या धर्मेंद्रच्या 'या दिल की सुनो दुनियावालों...' किंवा 'श्री ४२०' मधल्या 'मूड मूड के ना देख मूड मूड के...' पासून तर 'आशिकी' मधल्या 'मैं दुनिया भुला दुंगा...' किंवा 'हम' मधल्या 'कागज कलम दवात दिला...' पर्यंत पार्टीतली गाणी बघून पार्टी म्हणजे अगदी अशीच किंवा मग ती पार्टी नव्हेच अशी मनात घट्ट धारणा झाली होती. अर्थात नंतर ही नशा हळू-हळू उतरली हे सांगणे न लगे. पण तेव्हा मात्र पार्टीची ही जादू फार त्रस्त करून सोडत असे. आपणही मोठं झाल्यावर असल्या(च) पार्ट्यांना जायचं अशी मी लहानपणीच पक्की खूणगाठ बांधून ठेवली होती. अतिशय सुंदर दिसणारी नायिका हे त्यामागचं खास आकर्षण असे. अगदी स्टायलीत सिगारेटचा धूर सोडणे हे दुसरे आकर्षण! लिंबू सरबत, चहा, दूध आणि कधीतरी कैरीचे पन्हे याखेरीज कुठल्याच पेयाचे प्याले न चाखलेल्या जीभेला त्या पार्टीतल्या पेयाचेही सुप्त आकर्षण असणे साहजिकच होते. आपलीही एखादी अशी एक सुंदर नायिका असेल; तिच्या गोर्‍या कपाळावर तिच्या रेशमी केसांच्या बटा अगदी 'काली घटा' सारख्या दिसतील (हैरान हूं मैं आपकी झुल्फों को देखकर, इनको घटा कहूं, तो घटाओं को क्या कहूं...); तिच्या नाजूक कमरेभोवती भोवर्‍याभोवती दोरा गुंडाळावा त्याप्रमाणे आपले हात विळखा घालतील...अशा स्वप्नांत रात्री कशा उलटून जात कळत नसे. पुढे मोठेपण आले (फक्त वयाचे आणि शरीराचे). मोठेपणासोबत कॉलेज, अभ्यास, मिळालेल्या छटाकभर मार्कांवर कॉलेज शोधण्याची धडपड, मग अभियांत्रिकीचे शिक्षण वगैरे भुतावळ देखील आली. नोकरी, लग्न, घरखरेदी, गृहकर्ज वगैरे ही आधीच्या भुतावळीची पुढची पिढी! असो. तर अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर पार्टी हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला. पार्टीला जायचे! कुठल्या? फ्रेशर्स पार्टीला!! वा वा...बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला! वर्गातले लक्ष उडून माझ्या त्या मोहक नायिकेच्या कमरेवर जाऊन बसले (चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया... हे आत्ता आले; आता एक तर कुणी फिसलू देणार नाही आणि फिसललो तर खपलो अशी दुर्दशा होईल). कुठले कपडे घालायचे? चप्पल नीट आहे का? (बूट नव्हतेच). प्रश्न माझ्या मोहरलेल्या मनाला, 'नादान भंवरा' जसा फुलाला भंडावून सोडतो, तसे भंडावून सोडत होते. गेल्या-गेल्या आपली नायिका हेरून ठेवायची आणि बस मग सोडायची नाही. जे कुठले पेय मिळेल ते सटासट तोंडात ओतायचे आणि चान्स मिळाला तर धूर सोडून आपल्या परमप्रिय नायिकेला अगदी इंप्रेस करूनच सोडायचे असे ठरवूनच टाकले. ही संधी सोडता कामा नये; मी माझ्या अधीर मनाला बजावले. झाले, ती संध्याकाळ हळू-हळू जवळ येऊ लागली. माझे शतकानुशतके उराशी जपून ठेवलेले स्वप्न साकार होणार होते. संध्याकाळी आम्ही सगळे पार्टीच्या ठिकाणी पोहोचलो. एक छोटेखानी हॉल होता. त्याला फुगे-बिगे लावून सजवले होते. माझं मन खचत चाललं होतं. आमच्या सोबत अगदी एक-दोनच चांगल्या मुली होत्या. माझी नायिका म्हणून त्यातल्या कुणालाही मी संधी द्यायला तयार होतो. बाकी मुली कदाचित वरच्या वर्गातल्या असतील असा माझा कयास होता. त्यांच्यापैकी एक-दोन मुली बर्‍या होत्या. अगदीच काही नाही तर त्यांच्यापैकी कुणीही चाललं असतं. एक-दोन मुलांनी सूत्रे हाती घेतली. आमच्या वर्गातल्या त्या दोन मुली दिसत नव्हत्या. बाकी चार-पाच मुली मात्र हीहीहीहीही करून दात दाखवत हिंडत होत्या. त्यांना अर्थातच मी संधी देणार नव्हतो. वरच्या वर्गातल्या 'प्लॅन बी' मुली मात्र एका कोपर्‍यात बसून गप्पा मारत बसल्या होत्या. मनातल्या मनात मी हुश्श केलं. चला, 'ताजमहल नही ना सही; बीबी का मकबरा भी कुछ कम नही' या विचाराने माझ्या मनाला उभारी आली. एका बुटक्या मुलाने धेडगुजरी इंग्रजीमध्ये आम्हाला 'वेलकम' केलं. नंतर आम्ही अंताक्षरी खेळलो; अजून काहीबाही गेम्स खेळलो. अरे भाय, अपनी जानम किधर हैं? मी अधून-मधून 'प्लॅन बी' कडे नजर टाकून प्लॅन कोसळला तर नाही याची खात्री करून घेत होतो. या पोरांचा बालिशपणा संपत नव्हता. डँन्स कब शुरु होगा? सिगारेट के झुरके कब सोडूंगा? एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. मी चमकून पाहिले. मला गाणे म्हणायला सांगीतले होते. मी उठलो आणि 'नीले नीले अंबरपर, चांद जब आये...' हे गाणे गायला सुरुवात केली. 'ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जायें...' या ओळीवर मी न चुकता मधाच्या गोडव्याने ओथंबलेल्या नजरेने 'प्लॅन बी' कडे नजर टाकत होतो. त्या आता हात तोंडावर ठेवून खिदीखिदी खिदळत होत्या. माझं गाणं संपलं; बहुधा बरं झालं असावं. बर्‍याच टाळ्या वाजल्या. मी 'प्लॅन बी' कडे पाहिलं. उंदराने सुतळीचा गुंडा कुरतडावा त्याप्रमाणे त्या दोघी सँडविचेस तोडत दोन मुलांसोबत बाहेर जात होत्या. बाकीच्या मुली हीहीहीहीहीही करत काहीतरी हादडत होत्या. सँडविचचा घास मी तोंडात टाकताच मला भडभडून आले आणि चहाच्या पेल्याला बाजूला सारून मी बाहेर पडलो. माझ्या स्वप्नांचा हस्तिदंती मनोरा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात कोसळला होता. दिल के अर्मा आसूंओं में बह गये...अशा रीतीने माझ्या पहिल्या पार्टीने माझ्या मनोरम स्वप्नांचे अमृत मातीत मिसळवले होते. नंतर मग खास मुलांच्या पार्ट्या सुरु झाल्या. रात्री दोननंतर हॉस्टेलवर परत येण्याच्या पार्ट्या! नो नाजूक कमर, नो काली घटा! जोशात अमाप दारू पिऊन पोरे ढेर होत असत. जेवणाच्याच टेबलावर मनसोक्त उलटी करून त्याच गार-गार मऊ-मऊ शय्येवर निवांत मान टेकवून झोपणारी पोरे पाहिल्यावर स्वप्नातल्या पार्टीचे हसू येत असे. आमचे शेवटचे वर्ष होते. परीक्षा संपल्यावर आमच्या कंपूची एका ढाब्यावर जंगी पार्टी ठरली. जवळपास १५-२० मुले! लिटर लिटर दारू अक्षरशः पाण्यासारखी वाहिली. सगळ्यांना प्रेमाचे उमाळे आले. गळ्यात गळे घालून रडणे, हसणे, हंबरडा फोडणे असे सगळे भावनाविष्कार मुक्तपणे उधळले जात होते. ढाबामालकाला हे प्रकार नवीन नसावेत; तो शांतपणे त्याचे काम करत होता. "जित्या, आम्ही तुला सोडून सिगरेट प्यायला जात होतो, *डू! सॉरी यार!! पण साला तू सिगरेट धरली की सोडायचाच नाहीस. शहामृगासारखी मान पुढे करून सगळी संपवून टाकायचा. मग साल्या आम्ही काय ** ओढणार? म्हणून आम्ही तुला कलटी मारून जात होतो. सॉरी यार! आता नंतर भेटला की तुला पाकिटं पाजू यार...तू तर यार आहे आपला..." "जित्या, एकदा माझ्या रूममध्ये मी सिगरेट काढली पाकिटातून आणि तेवढ्यात तू आलास, मी आख्खं पाकिट फेकून दिलं कचर्‍याच्या डब्ब्यात...दोन-दोन कश मारून सिगरेट संपल्यावर तू निघून गेला. मग मी कचर्‍याच्या डब्ब्यातून पाकिट पुन्हा काढलं. अजून नऊ सिगरेटी होत्या त्यात. पहिल्यांदा काँट्री करून पूर्ण पाकिट घेतलं होतं. साल्या ***च्या तुला कळलं असतं तर तू सगळ्या फुंकून टाकल्या असत्या. मग आम्ही काय हलवत बसलो असतो का? सॉरी यार. तुला राग नाही ना आला?" "संज्या, तू जिच्यावर मरायचा, स्साला मी पन लई लाईन मारायचो यार तिच्यावर. काय माल होती यार ती! अजून आठवली की काटा येतो अंगावर. तू लई प्रेम करायचा तिच्यावर पन तिनं काही तुला भाव दिला नाय कधी. पन आय शप्पथ काय होती राव ती...सॉरी यार...विसरून जा तिला.." असे बरेच कबुलीजबाब चालले होते. घोटा-घोटासोबत माफीनामे जाहीर होत होते. शिक्षक, मुली, मुले, रेक्टर असा प्रत्येकाचा पद्धतशीर उद्धार सुरु होता. शेवटी रात्री (पहाटे) तीनच्या सुमारास ही पार्टी संपली. कुणी टेबलाखाली निजले होते; कुणी बागेतल्या गटारावर पालथे होऊन पडले होते; कुणी बाहेरच्या पायरीवर लुढकले होते तर कुणी येथेच्छ उलटी करून त्याच पदार्थांमध्ये हसत-खिदळत लोळत होते. पुढे नोकरी लागल्यावर मात्र थोड्या-फार प्रमाणात सिनेमासारख्या पार्ट्या अनुभवण्याच्या संधी मिळाल्या, अर्थात, त्या ही विदाऊट द नायिका!! नंतर आयुष्यात पर्मनंट नायिका आल्यावर राहिल्या त्या कॉलेजातल्या पार्ट्यांचे अतिसौम्य व्हर्जन!! अशा या पार्ट्या, आठवल्या की हसू येतं खरं पण त्यावेळेस केलेली धमाल आठवून थोडं बरं ही वाटतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4267
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

झकास रे, एक नंबर लेख. काही काही वाक्ये एकदम क्लासिक. ह्यानिमित्ताने अजुन बर्‍याच प्रकारच्या पार्ट्या आठवल्या. - छोटा डॉन

आवडेश. फार दिवसानी समीररावांच्या हल्क्या फुल्क्या शैलीचं दर्शन झालं म्हणायचं. मधे कुठं गायबला होतात?

तुम्ही पार्टीबद्दल बोलताय की प्यार्टीबद्दल?: ;)

मध्येच नायक किंवा नायिका एखादे गाणे सुरु करत असे इकडे वर्षानुवर्षे गाणे शिकून जनतेला ते तालासुरात म्हणता यायचे नाही पण नायक, नायिका मात्र गोड गळ्याचे असतात. मोठ्या बंगल्यात राहून, अभ्यासाच्या नावाने बोंब, पण गाणी फर्मास म्हणणार! ;) लेखन मजेदार आहे. आवडले.

मस्त खसखस पिकवली दादानु. अर्धवटराव

चला, 'ताजमहल नही ना सही; बीबी का मकबरा भी कुछ कम नही या वाक्यावर तर नुसत खुदखुद खुदखुद.

मस्त लेख, मजा आली वाचून... +१ टू अपर्णाताई "'ताजमहल नही ना सही; बीबी का मकबरा भी कुछ कम नही" क्या बात हैं!

समीरसूर क्लासिक.. :-) मजा आली वाचताना

मस्त मजेदार लेख आहे.लहानपणी पार्टीबद्दल आमचेही असेच काहिसे मत/अपेक्षा होते. एकंदरीत काय तर या हिंदी पिच्चरांनी नुसताच भास निर्माण केला होता ;)

वरच्या वर्गातल्या 'प्लॅन बी' मुली
वाहव्वा, बहोत खुब! आम्ही ह्यांना 'राखिव मरदारसंघ' म्हणायचो :D - (पार्टीबाज) सोकाजी