बासरीविषयी थोडेसे !

चैतन्य दीक्षित जनातलं, मनातलं
बासरी हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात् ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच बासरीचे मुखरंध्र, तिथून केवळ कान्ह्याने फुंकर मारली तरच आवाज येतो म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कान्ह्याला मी जास्त जवळची आहे. हे ऐकून गोपींचा अजूनच जळफळाट झाला. (त्या कथेत पुढे असेही लिहिले होते की म्हणूनच की काय, पण अजून एकही प्रसिद्ध स्त्री-बासरीवादक झाली नाही, पण या वाक्यात काही तथ्य नाही. आज अनेक स्त्रिया बासरीवादन करीत आहेत. उदा. सिक्किल सिस्टर्स- कर्नाटकी पद्धतीचं बासरीवादन, हरिप्रसाद चौरासियांच्या शिष्या- देबप्रिया आणि सुचिस्मिता इ.) गवळ्यांच्या हाती असलेलं एक 'लोकवाद्य' ते शास्त्रीय वाद्यसंगीताच्या मैफलीतलं वाद्य हा बासरीचा प्रवास रंजक आहे. बासरीला शास्त्रीय वाद्यसंगीतात मानाचं स्थान मिळवून देण्याचं श्रेय अमूल्य ज्योती घोष, अर्थात् पं. पन्नालाल घोष यांना जातं. पन्नालाल घोषांबद्दल काही कथा सांगितल्या जातात त्या अशा. पन्नाबाबू ८-९ वर्षांचे असताना त्यांना नदीच्या पात्रात एक बासरी मिळाली. आणि नंतर २ वर्षांनी त्यांना एक साधू भेटला. त्या साधूजवळ एक शंख होता आणि एक बासरी. साधूने पन्नाबाबूंना बासरी वाजवण्यास सांगितले. पन्नाबाबूंनी ती वाजवली. साधूने 'संगीतातूनच तुला मोक्ष मिळेल' असे सांगितले. पन्नाबाबूंच्या घरातच संगीताचं वातावरण होतं. वडील अक्षयकुमार घोष सितार वाजवीत. त्यांचे मामाही गवय्ये होते. त्यामुळे संगीताबद्दलचं प्रेम लहानपणापासूनच त्यांच्या मनी उपजलं. पन्नाबाबू बंगालमधल्या मूकपटांत बासरी (पावा) वाजवायचे. एका समारंभात संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास यांच्याशी ओळख होऊन ते अनिल विश्वास यांच्या वादकगटात सामील झाले. एकदा अनिल विश्वासांची एक रचना वाजवीत असता पन्नाबाबूंना खालच्या पट्टीच्या बासरीची निकड भासू लागली. अशी बासरी अस्तित्वात नव्हती. पन्नाबाबूंनी एका खेळणेवाल्याच्या मदतीने अशी मोठी आणि खालच्या पट्टीचे स्वर असलेली बासरी तयार करण्याचे प्रयत्न केले. तो खेळणीवाला बासरी तयार करण्यात वाकबगार होता. पन्नाबाबूंनी बासरीसाठी ब्रास, पितळ, स्टील, प्लास्टिक असे अनेक पदार्थ वापरून पाहिले. अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी 'काळी२' चा षड्ज असलेली ३२ इंची बासरी तयार केली. बासरीच्या शेवटच्या ३ छिद्रांपैकी पहिली (मुखरंध्राकडून पहिली) २ छिद्रे बर्‍यापैकी एकमेकांच्या जवळ असली तरी शेवटचे छिद्र त्या दोन छिद्रांपासून बरेच लांब असते. ही छिद्रे अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिकेने बंद केली जातात. ३२ इंची बासरीत तर हे अंतर फारच झालं (जवळपास २ इंच) (इथे पहा. चित्राच्या डाव्या बाजूला बासरीचे मुखरंध्र आहे आणि उजव्या बाजूच्या शेवटी ही तीन छिद्रे आहेत.)अनामिका ताणून हे शेवटचे छिद्र बंद करावे लागे. मुळात अशी इतकी मोठी बासरीच कुणी आधी पाहिली नसल्याने अशी अफवा पसरली की पन्नाबाबूंनी शस्त्रक्रिया करवून घेऊन मध्यमा आणि अनामिकेच्या मधले कातडे काढून टाकले. पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते. पन्नाबाबूंना सरावामुळे अनामिकेने ते शेवटचे छिद्र बंद करून बासरी वाजवणे शक्य होत होते. पन्नाबाबूंनी अजून एक प्रयोग केला, तो म्हणजे बासरीला सातवे छिद्र(मुखरंध्र धरून आठवे) पाडले. अनामिकेने बंद केल्या जाणार्‍या शेवटच्या छिद्राच्याही अजून थोडे खाली पण वादकाच्या बाजूला असे हे छिद्र होते. यामुळे बासरी अजून लांब झाली आणि खालच्या शुद्ध मध्यमापर्यंतचे स्वर बासरीवर वाजवणे शक्य झाले. (मुखरंध्र सोडून ६ छिद्रे असणार्‍या बासरीवर केवळ खालच्या पंचमापर्यंतचे स्वर वाजवता येतात. फुंकर मारण्याचा कोन बदलून खालच्या तीव्र मध्यमापर्यंतही जाता येते, पण तो स्वर जास्त वेळ टिकवून वाजवणे शक्य होत नाही. पन्नाबाबूंच्या ७ छिद्रे असलेल्या बासरीवर, फुंकर मारण्याचा कोन बदलून खालच्या गंधारापर्यंतचे स्वर वाजवणे शक्य होते.) आणि मध्यम आणि पंचम यांच्यात मींड वाजवणे शक्य झाले, जे एरवी ६ छिद्रांच्या बासरीवर शक्य होत नाही. या सगळ्या प्रयोगांमुळे पन्नाबाबू जवळपास शास्त्रीय गायकाच्या बरोबरीने एखादा राग बासरीवर वाजवू शकत होते. ही परंपरा त्यांच्या जी.एस्. सचदेव, रघुनाथ सेठ, विजय राघव राव, नित्यानंद हळदीपूर इत्यादी शिष्यांनीही अबाधित ठेवली आणि बासरीला शास्त्रीय वाद्यसंगीतात उत्तरोत्तर अधिक मान मिळत गेला. पन्नाबाबूंच्या परंपरेत, बासरीची छिद्रे बोटांच्या पहिल्या पेराने बंद करण्याची पद्धत आहे. (इथे पहा) याउलट, नंतरच्या काळात पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी, बोटाच्या मधल्या पेराने बासरीची छिद्रे बंद करण्याची पद्धत शोधून काढली (शोधून काढली किंवा ती पद्धत पुन्हा वापरात आणली). (इथे पहा) हरिप्रसाद चौरासिया हे ६ छिद्रे असलेली बासरी वाजवतात. अर्थात्, त्यांच्या बासरीवादनात त्यामुळे काहीच कमतरता येत नाही. (पंचम आणि मध्यमातली मींड तेवढी येत नसेल). हरिप्रसाद चौरासियांची परंपरा त्यांचा पुतण्या राकेश चौरासिया आणि त्यांचे इतर शिष्य सुनील अवचट, रूपक कुलकर्णी, वर उल्लेखलेल्या देबप्रिया आणि सुचिस्मिता इ. तरुण शिष्य मंडळी समर्थपणे पुढे चालवीत आहेत. पन्नाबाबू आणि हरिप्रसाद चौरासिया यांच्या वादनाची शैली थोडी भिन्न असली तरीही 'सेनिया' घराण्याचीच. कारण पन्नाबाबूंच्या संगीतावर संस्कार आहेत ते बाबा अल्लाउद्दिन खॉंसाहेबांचे आणि त्यांची कन्या श्रीमती अन्नपूर्णा देवी या हरिप्रसाद चौरासियांच्या गुरू. असे ऐकिवात आहे की हरिप्रसाद चौरासिया प्रथम उजव्या हाताने बासरी वाजवीत (म्हणजेच, बासरीची खालची तीन छिद्रे उजव्या हाताच्या बोटांनी बंद करीत) पण अन्नपूर्णा देवींकडे शिकायला गेले असता, 'आधीचे सगळे विसरून या' असे त्यांनी सांगितले. आणि हरिप्रसाद चौरासियांनी काही दिवसांचा वेळ मागून घेतला व नंतर गेले ते डावखुर्‍या बासरीवादकासारखेच. पाटी पूर्ण कोरी करून. पं. पन्नालाल घोषांनी लोकप्रिय केलेल्या मोठ्या बासर्‍या तयार करणारे अनेक कारागीर आज भारतात आणि भारताबाहेरही आहेत. अचूक श्रुतीत वाजणारी (करेक्ट्ली ट्यून्ड) बासरी तयार करणे हे काम मोठे अवघड. बांबू नैसर्गिक उत्पादन असल्याने कुठलाही बांबू हा अगदी अचूक सरळ आणि सिलेंड्रिकल नसतो. त्यामुळे गणिती पद्धतीने आकडेमोड करून बासरीच्या इतर छिद्रांचे मुखरंध्रापासूनचे अंतर ठरवणे सहजसाध्य नसते. सध्याच्या बासरी तयार करणार्‍या कारागिरांमध्ये मुंबईचे आनंद धोत्रे (श्री रामचंद्र धोत्रे यांचे सुपुत्र), श्री हर्षवर्धन, श्री सुभाष ठाकूर असे भारतीय तर 'जेफ व्हिटियर' सारखे अभारतीय लोक आघाडीवर आहेत. या प्रत्येकाच्या बासरीची विक्री करण्यासाठीच्या वेबसाईट्ससुद्धा उपलब्ध आहेत. पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या वादनाची लिंक देऊन हा लेख आटोपता घेतो. पं. पन्नालाल घोष यांचा सुंदर यमन इथे ऐका. पं. हरिप्रसाद चौरासियांचा भीमपलास रागाचा झाला इथे ऐका. - चैतन्य दीक्षित.
वर्गीकरण
लेखनप्रकार

58 टिप्पण्या 34,873 दृश्ये

Comments

प्रास नवीन

रोचक माहिती. तुम्ही जाणकार आहात. बासरी हे माझंही आवडतं वाद्य आहे. काही अधिक असंच याविषयी किंवा तुम्ही जाणलेल्या संगीताविषयी माहितीपूर्ण लिहिल्यास आनंद होईल. धन्यवाद! अवांतर - बहुतेक तुम्ही दिलेल्या पन्नाबाबूंच्या आणि हरिप्रसादांच्या वादनांच्या लिंका चुकल्यात. संपादकांना विनंती करून त्या सुधाराव्यात.

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by मराठी_माणूस

डावखुर्‍या बासरीवादकासारखे वाजवण्यात फायदा-तोटा काहीच नाही. हरिप्रसाद चौरासिया आधीचे सगळे विसरून गेले, इतके की ते मुळात उजव्या हाताने बासरी वाजवणारे होते हेही विसरून त्यांनी डावखुरे जसे बासरी वाजवतात ती पद्धत आत्मसात केली आणि मग अन्नपूर्णा देवींकडे गेले इतकेच सांगायचे होते त्या वाक्यातून. पण ही गोष्ट महाकठिण. एका पद्धतीने वाजवण्याची सवय असताना, ती सवय पूर्णपणे सोडून देऊन नवीन पद्धत अंगी बाणायची म्हणजे खरंच अवघड. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मन१ नवीन

In reply to by विजुभाऊ

निदान पुन्हा एखादा कट्टा जमवून एखादे झकासपैकी सादरीकरण केलेत तर तीच ह्या लेखाला दिलेली खरी दाद ठरेल. अवांतरः- तुमचा प्रतिसाद म्हणजे एखाद्या हलवायाने मिठायांवर उपलब्ध असलेले छपील साहित्य मागण्याचा प्रकार वाटला. कानसेन

सोत्रि नवीन

In reply to by मन१

अवांतर मधील वाक्याशी १००% सहमत. - (विजूभाऊंच्या सादरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी

मन१ नवीन

बासरीविषयी नादमधूर लेख. अवांतर :- अन्नपूर्णा देवींबद्द्ल ही माहिती नव्हती. दिग्गज सतार वादक पं. रवि शंकर ह्यांच्या एक पत्नी(लग्नापूर्वी रोशनआरा) म्हणून त्या ठाउक होत्या. बादवे, अन्नपूर्णादेवींना सतारिच्या क्षेत्रातही अधिकारी व्यक्ती म्हणून मानले जाते.

मोदक नवीन

In reply to by मन१

+१ बासरीविषयी नादमधूर लेख. मोदक.

मोदक नवीन

तुम्हाला"जलतरंग" या वाद्याविषयी माहिती असेल तर ती ही येवुद्या... मला इतकेच माहीत आहे की वेगवेगळ्या काचेच्या वाडग्यात पाणी भरलेले असते आणि एका स्टिकने (कोणत्या धातूच्या..? / लाकडी..?) नाजूक आघात केला जातो. स्वर / नाद हा किती पाणी भरलेले आहे यावर अवलंबून असतो. आणखी जाणून घ्यायला आवडेल.. मोदक.

तिमा नवीन

तुमचा बासरीवरचा लेख आवडला. याच विषयाच्या अनुषंगाने बासरी व पावा यातील फरक पण सांगावा. तसेच बासरीचा शोध कधी लागला याविषयी कोणास माहिती असेल तर बासरीचा इतिहासही वाचायला आवडेल.

विजुभाऊ नवीन

तसेच बासरीचा शोध कधी लागला याविषयी कोणास माहिती असेल तर बासरीचा इतिहासही वाचायला आवडेल. बासरीचा शोध कोणी लावला असे नाही. ते एक अगदी नैसर्गीक वाद्य आहे. इतर वाद्यांप्रमाणे तुम्हाला बासरी ट्यून वगैरे करावी लागत नाही. इतिहासात याचा उल्लेख कृष्णा सोबत आढळतो. पाश्चात्य लोकांत बासरी प्रमाणे बहुतेक सुशीर वाद्याना फ्ल्यूट असेच ओळखले जाते. सनई . क्लॉरोनेट यानाही फ्ल्यूट असेच सम्बोधले जाते. बासरीत तांत्रीक दृष्ट्या तीन प्रकार आहेत. उभी बासरी ( पावा) आडवी बासरी बटनांची बासरी.( ही पाश्चात्य संगीतात वापरली जाते ) ही सर्वात महाग असते साधारणतः ५ त्ते ६ हजार डॉलर्स पासून याची किम्मत सुरू होते. बासर्‍या बांबूच्या, धातूच्या ( स्टील पितळ) तसेच काचेच्या देखील असतात. बहुतेक सर्व संस्कृतीत बासरी प्रकारचे वाद्य आढळते. बासरी या वाद्याची एक गम्मत आहे . त्यात आरंभीचा स्वर बदलून बरेच राग वाजवता येतात. आडवी बासरी वाजवताना फुंकरीवर नियंत्रण ठेवायला सोपे जाते . त्यामुळे बहुतेक वेळा वादकांच्या हाती आडवी बासरीच नजरेस पडते.

मराठी_माणूस नवीन

In reply to by विजुभाऊ

त्यात आरंभीचा स्वर बदलून बरेच राग वाजवता येतात.
हा आरंभीचा स्वर कसा बदलला जातो ?

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by विजुभाऊ

>आडवी बासरी वाजवताना फुंकरीवर नियंत्रण ठेवायला सोपे जाते . काही इतर देशातल्या बासर्‍या (उदा. इजिप्त- जिथे बासरीचा बांबू दोन्ही बाजूंनी उघडा असतो म्हणे) विचारात घेतल्या तर तुलनेने सोपे जात असावे, पण तरीही आडव्या बासरीवर फुंकर नियंत्रित करून योग्य आणि अचूक स्वरात बासरी वाजवणे अवघडच !

विजुभाऊ नवीन

आरंभीचा स्वर बदलून म्हणजे "सा" हा स्वर वेगवेगळ्या बोटांनी वाजवणे. उदा सर्वसाधारनतः उजव्या हाताची तीन बोटे सोडून फक्त डाव्या हाताने बासरीची सुरवातीची तीन छिद्रे बंद करून " सा" हा स्वर वाजवला जातो व अनुषंगाने इतर स्वर वाजवले जातात. त्या ऐवजी चार छिद्रे बंद करून " नी" स्वरासाठीचे छिद्र " सा" स्वरासाठी वापरले याचा अर्थ आरंभीचा स्वर बदलून असा होतो.

मदनबाण नवीन

बासरी मला फार आवडते... मला कधीही ती वाजवणे जमले नाही ! :( युट्युबवर मी बासरी वादनाचे काही हटके व्हिडीयो मी पाहिले होते ते इथे देत आहे. १) Irish song flute music २) मी लहानपणी मारिओ हा व्हिडीयो गेम बर्‍याचवेळा खेळलो आहे,तुमच्या पैकी किती जणांनी तो खेळला आहे ? त्याची ती धुन माझ्या डोक्यात कायमची फिट झाली. मग विचार केला की याला कोणी बासरीवर वाजवले असेल का ? मग तसा शोध युट्युबवर घेतला, आणि एक नवा प्रकार मला ऐकला मिळाला... तो म्हणजे बीटबॉक्सिंग फ्लुट ! ऐका मारियो थीम बासरीवर... ;) ३)लहानग्याने किती अप्रतिम बासरी वाजवावी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे Bogdan Preda या मुलाची एकाग्रता उच्चकोटीची आहे,आणि बासरी वादन केवळ अफलातुन ! :)

जोशी नवीन

बासरी शिकण्याची फार दिवसांची इच्छा आहे. पुण्यात बासरी शिकवणारे कोणी आसल्यास कळवावे..धन्यवाद. जोशी.

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by जोशी

पुण्यात (निगडी) बन्सी बापू म्हणून कुणी तरी आहेत. (बन्सी बापू हे त्यांचे यूट्यूबवरचे नाव असावे. खरे नाव ठाऊक नाही) आणि अजून एक शिरीष कुलकर्णी म्हणून आहेत. पण या दोघांचेही पत्ते/ फोन नं. इ. ठाऊक नाही. शिरीष कुलकर्णींचं बासरी वादन डीडी सह्याद्री चॅनलवर एकदा ऐकलं होतं. राग श्री, हमीर आणि पहाडी वाजवला होता त्यांनी.

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by मराठी_माणूस

बहुतेक पं. गजेंद्रगडकरांनी लिहिलेले 'वेणूविषयी सर्वकाही' (नक्की नाव माहिती नाही) असे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. गूगलवर माहिती घेतली असता, पं. गजेंद्रगडकरांनी संगीतविषयक बरीच पुस्तके लिहिली असल्याचे समजले. ते आपल्यात नाहीत हे दुर्दैव.

मूकवाचक नवीन

In reply to by विजुभाऊ

पं अरविंद गजेन्द्रगडकर यान्ची 'स्वरमन्डल' ची सोलो मैफिल अजूनही स्मरणात आहे. (माझ्या माहितीप्रमाणे तरी स्वरमन्डल सोलो वादन करणारे ते एकमेव वादक होते).

चैतन्य दीक्षित नवीन

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार. विजूभाऊंनी बासरीबद्दल इतरही माहिती दिली आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. @ मोदक, जलतरंग या वाद्याबद्दल मलाही तितकीच माहिती आहे जितकी तुमच्या प्रतिसादात आहे. @ मदनबाण, लिंक्स निवांत चेक करतो. मूळ लेखात मला हरिप्रसाद चौरासियांचा हा भीमपलास द्यायचा होता. यात जोडीला राकेश चौरासिया आणि रूपक कुलकर्णीही आहेत. धन्यवाद, चैतन्य.

संदीप चित्रे नवीन

चैतन्य, माहितीपूर्ण लेख खूप आवडला. मी बासरी शिकायचा थोडाबहुत प्रयत्न केला होता. श्री. धोत्रेंकडून घेतलेले पांढरी तीनची बासरी अजूनही माझ्याकडे आहे जी हुक्की आली की वाजवायचा प्रयत्न करतो. आणि दादरला इराणी रेस्टॉरंटच्या बाहेर मांडलेल्या -- श्री.रामचंद्र धोत्रे ह्यांच्या राज्यात -- त्यांच्याशी गप्पा करत मग त्यांनी आपल्याला हवी असलेली बासरी बरोब्बर शोधून देणे इ. गोष्टी आज वीसेक वर्षांनंतरही स्वच्छ आठवतायत :) तुमच्या बासरीवादनासाठी शुभेच्छा! बाकी हरिजींनी वाजवलेला 'हंसध्वनी' हा माझा अत्यंत आवडता राग आहे!

५० फक्त नवीन

जबरदस्त माहिती, काहीतरी करायचंच आणि स्वताला सिद्ध करायचं अशा काळात बासरि शिकण्याचा प्रयोग करुन झाला आहे, पण नाही जमलं. तुम्ही इथं दिलेली माहिती खुप छान आहे, धन्यवाद.

मराठमोळा नवीन

माहितीपुर्ण लेख आवडला. तांत्रिक गोष्टी समजत नसल्या तरी. आणखीही वाचायला आवडेल. :) वाजव्ण्याचा प्रयत्न केला होता. थोडंफार जमलही होतं. ते प्रेम जास्त काळ टिकलं नाही. बासरी वाजवल्याने वाजवणार्‍याचा आवाज खराब होतो, त्यामुळे बासरी वाजवणारा उत्तम गाऊ शकत नाही असं एका बासरी शिकणार्‍या मित्राकडून ऐकलं होतं. खरं खोटं माहित नाही.

विजुभाऊ नवीन

In reply to by मराठमोळा

बासरी वाजवल्याने वाजवणार्‍याचा आवाज खराब होतो कोणतेही सुशीर वाद्य वाजवताना एकसारखी फुंकर मारल्यामुळे स्वरयंत्रावर ताण येतो ( एकदम ५०/६० रबरी फुगे फुगवले तरीही असे होते) त्यामुळे आवाजावर परीणाम होतो. त्यामुळे कोणताच गायक सुशीर वाद्ये वाजवत नाही मात्र याला अपवाद आहेत. सनईवादक बिस्मिल्लाखान हे उत्तम गायक होते.

बिपिन कार्यकर्ते नवीन

_/\_ आत्ताच दुसर्‍या एका धाग्यावर याच यमनची लिंक देऊन आलो!!!! धागा वाचनखुणेत टाकत आहे. अजून वाचायला आवडेल.

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

म्हणजे कमाल आहे. बासरीवर साधारण अडीच सप्तके वाजू शकतात. म्हणजे फार तर तार-पंचमापर्यंत. पण या यमनमध्ये अतितार निषाद, षड्ज आणि रिषभापर्यंत वाजवलंय. या क्लिपच्या एके ठिकाणी- अतिरार- नीरेसा, तार नीरेसा आणि मंद्र-मध्य नीरेसा (मंद्रातला नी आणि मध्यातले रे,सा) असे सलग वाजवले आहेत. क्लिपच्या अगदी शेवटी १८:२० ते १८:२२ इथे हे ऐकायला मिळेल. आई शप्पथ...... ! अशीच प्रतिक्रिया येते ऐकलं की...!

सुनील नवीन

लेख आणि प्रतिसादांतून बरीच माहिती नव्याने कळली.

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by मराठी_माणूस

बातमी वाचली. पांढरी ३ च्या बोटांनी इतर ११ स्वरांत बासरी वाजवता येईल- असे लिहिले आहे. अजबच आहे हे. खरंच असं असेल तर याला 'जादूच' म्हणावे लागेल. -चैतन्य.

अविनाशकुलकर्णी नवीन

बासरी वाजवणारी स्री असे चित्र हि बघावयास मिळत नाहि.. फोटो नाहि..जुने चित्र... या वरुन पुर्वि स्त्रीया बासरी वाजवत नसत असे सिद्ध होते का? तसे असते तर सरस्वति सतार ऐवजी बासरी वाजवताना दिसली असती... हल्ली समानतेचा ज्माना असल्याने शक्य आहे..

चौकटराजा नवीन

In reply to by अविनाशकुलकर्णी

आडवी बासरी हे " बडा बेवफा साज है " अशाने एकाने मस्त वर्णन केले आहे. कारण हुकमी फुंक न मिळणे हे कारण.पण आडव्या बासरीत निरनिराळे पोत काढता येतात आवाजाचे. आडव्या बासरीचा आनंद काही वेगळाच. बासरीत भैरवी राग वाजवायला सर्वात अवघड. कारण बरेचसे सूर कोमल. मग मूळ सा जर कोमल घेतला तर भैरवीचे बाकी सारे स्वर शुद्ध होतात व वादन सोपे होते. हिंदुस्थानी रागसंगीतात बासरीची साथ सहसा दिसत नाही पण दाक्षिणी संगीतात ते साथीचे प्रमुख वाद्य ही असू शकते व त्यत स्त्रिया ही साथीला असतात. खेरीज भरतनाट्यम चा वाद्यवृंदात देखील बासरीचा साथ म्हणून वापर दिसून येतो.

विजुभाऊ नवीन

In reply to by चौकटराजा

बासरीत भैरवी राग वाजवायला सर्वात अवघड. असे मला वाटत नाही. त्यातल्या त्यात पिलू राग हा अवघड असावा यात बाराच्याबारा स्वर वापरावे लागतात

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by विजुभाऊ

म्हणजे, लय कमी ठेवून वाजवणं अवघड नाही. पण एखादी हरकत घ्यायची म्हटलं किंवा मुरकी किंवा सपाट तान हे अवघडच जातं. तसाच तुम्ही म्हणता तो पिलूही अवघडच. पण पिलूत रिषभ तरी शुद्ध असतो ना? म्हणजे, गंधार कोमल आणि मध्यम शुद्ध असेल तर जरा तरी सोप्पं आहे (उदा. मालकंस) पण रिषभपण कोमल असेल तर सलग तीन छिद्रे अर्धी झाकावी लागतील ना (उदा. भैरवी) अर्थात, सरावाला, रियाजाला काहीही पर्याय नाही आणि रियाजाने ही अवघड गोष्टही सहजसाध्य होऊ शकते यात दुमत नाही.

विजुभाऊ नवीन

In reply to by चैतन्य दीक्षित

बासरीवर ओ पी नय्यर या संगीतकारांची गाणी एकदम सोपी वाटतात पण सलील चौधरी ( त्यांच्या रचनांवर असलेला मोझर्ट चा प्रभाव लक्षात घेवुन ) मात्र जर्रा कठीण जातात. बहुतेक हिंदी गाण्यांच्या चाली बासरीवर सहज वाजवता येतात. बर्‍याच गाण्यात बासरी हे वाद्य हे इतक्या ओघाने येते की मुद्दाम त्याचा इफेक्ट वेगळा काढताच येत नाही. उदा: " आ चल के तुझे मै लेके चलु" या गाण्यात संपूर्णपणे मागे बासरीवर साथ केलेली आहे. लगान चित्रपटातील "मधुबन मे कन्हैय्या जो किसी गोपीसे मिले" या गाण्यात तर बासरीने कमाल केलेली आहे. हीरो चित्रपटातील " लंबी जुदाई "गाण्यातील बासरी चा तो पीस.......... किंवा " मेहेबूब मेरे महेबूब मेरे" मधील पंजाबी टाईपचा दोन बासर्‍या एकत्र वाजवून जमवलेला बासरीचा तुकडा..... ममता चित्रपटातील " छुपालो युं दिलमे प्यार मेरा" मधील बासरीची साथ. जब वी मेट मधला "आओगे जब तुम ओ साजना" मधील बासरीचे सूर ........ बासरीच्या सुरावटी नेहमीच भावनेच्या पलीकडचे अनुभव देतात

चित्रगुप्त नवीन

आज अचानक या लेखाचा शोध लागला, आणि खूपच आनंद झाला. धन्यवाद. ......बासरी वाजवणारी स्री असे चित्र हि बघावयास मिळत नाहि.. हे वाचून जरा कुतुहल चाळवले गेले, आणि थोडा शोध घेता ही चित्रे सापडली:

चैतन्य दीक्षित नवीन

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त, चित्रे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (फक्त, जे भारतीय स्त्रीचं (६वं चित्र) चित्र आहे, ती बासरी नसावी, शहनाई वाटते आहे) बासरी हे तसं खूप जुनं वाद्य आणि जगातल्या बहुतेक सगळ्यास संस्कृती(सिविलायजेशन या अर्थाने)मध्ये त्याचा वापर आढळतो. लेखात जी 'ऐकीव कथा' लिहिली आहे त्यानुसार भारताबाबत 'बासरी वाजवणार्‍या स्त्रीचं चित्र फारसं दिसत नाही' असं म्हणायचं होतं. पुन्हा एकदा आभार :)

चिगो नवीन

In reply to by चैतन्य दीक्षित

(फक्त, जे भारतीय स्त्रीचं (६वं चित्र) चित्र आहे, ती बासरी नसावी, शहनाई वाटते आहे)
अगदी बरोबर, चैतन्यजी.. ती शहनाई असावी असे मलाही वाटते.. आणखी एक म्हणजे, ते मुगल/राजस्थानी शैलीतले चित्र आहे, पण मुघलकाळातील नाही. चित्र पुन्हा पाहील्यास लक्षात येईल की वरच्या भागात एक ठप्पा दिसतोय. राजस्थानमध्ये संस्थानांच्या काळातील "स्टॅम्पपेपर्स" वर मुघल शैलीतील चित्रे बनवणारे काही कारागीर आहेत, त्यापैकी एकाचे असावे हे.. मी स्वतः एका प्रदर्शनातून ह्या पद्धतीची चित्रे विकत घेतली आहेत. (आता शोधायला लागतील, कुठे आहेत ती..) लेख खुप छान झालाय. आवडला..

आत्मशून्य नवीन

वेगळा व आनंददायी धागा. माहीतीबद्दल अतिशय धन्यवाद.

अविनाशकुलकर्णी नवीन

छान लेख.. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की बासरी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे. बासरीचे अनेक प्रकार आहेत, परंतु बांबूच्या आणि चांदीच्या बासरीचा प्रभाव विशेष परिणामकारक असतो. - चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैश्याची अडचण भासत नाही. - सोन्याची बासरी घरात असेल तर घरात लक्ष्मी सदैव राहते, त्या घरात पैसाच पैसा असतो. - बांबूच्या झाडापासून तयार केलेल्या बासरी तात्काळ उन्नतिदायक प्रभाव दाखवते. ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही,किंवा शिक्षण, व्यवसाय, नोकरीत अडचणी येत असतील तर त्या लोकांनी आराम खोलीच्या दरवाजावर दोन बास-या लावाव्यात. - घरात वास्तुदोष असेल, दोन दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजावर दोन बास-या लावणे फायद्याचे ठरेल. - घरात एखादा सदस्य आजारी असेल तर, त्या व्यक्तीच्या खोलीबाहेर किंवा खोलीत बासरीचा उपयोग करावा लवकर चांगले परिणाम दिसून येतील.

विजुभाऊ नवीन

In reply to by अविनाशकुलकर्णी

चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैश्याची अडचण भासत नाही. - सोन्याची बासरी घरात असेल तर घरात लक्ष्मी सदैव राहते, त्या घरात पैसाच पैसा असतो. - बांबूच्या झाडापासून तयार केलेल्या बासरी तात्काळ उन्नतिदायक प्रभाव दाखवते. ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही,किंवा शिक्षण, व्यवसाय, नोकरीत अडचणी येत असतील तर त्या लोकांनी आराम खोलीच्या दरवाजावर दोन बास-या लावाव्यात. - घरात वास्तुदोष असेल, दोन दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजावर दोन बास-या लावणे फायद्याचे ठरेल. - घरात एखादा सदस्य आजारी असेल तर, त्या व्यक्तीच्या खोलीबाहेर किंवा खोलीत बासरीचा उपयोग करावा लवकर चांगले परिणाम दिसून येतील. या सर्वाचा बासरी यावाद्याशीयकाय संबन्ध? सोन्याचांदीच्या बासर्‍यवाजवाअययला कुचकामी असतात. घराच्या दारावर बासरी लावून त्याचा उपयोग काय? शेवटी बासरी म्हणजे बांबूचे लाकूड. हे असे होण्यासाठी नक्की कोणती भौतीकस्/रासायनीक्/जैवीक्/आण्वीक तत्वे उपयोगात आणली जातात याबद्दल थोडी शास्त्रीय माहिती द्याल का हे फेंगशुई वगैरे थोतांड आहे. .

गवि नवीन

In reply to by विजुभाऊ

- सोन्याची बासरी घरात असेल तर घरात लक्ष्मी सदैव राहते, त्या घरात पैसाच पैसा असतो.
यात काय चूक आहे हो? विचार करा.. कार्यकारणभाव उलट करुन तरी पटेल? ;)

अविनाशकुलकर्णी नवीन

बासरीच्या आख्यायिका बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. ... त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे. कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.' अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय. माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत. मला स्वत:चा आवाजही नाही.. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते. तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या. तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत. म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही……

चित्रगुप्त नवीन

....... .......चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैश्याची अडचण भासत नाही...... (कारण ज्याला पैश्याची अडचण भासत नाही, अशीच व्यक्ती चांदीची बासरी बाळगू शकते) .............. सोन्याची बासरी घरात असेल तर घरात लक्ष्मी सदैव राहते, त्या घरात पैसाच पैसा असतो......... (कारण ज्या घरात लक्ष्मी सदैव राहते, पैसाच पैसा असतो, असेच लोक सोन्याच्या बासरीसारखी निरुपयोगी वस्तु निव्वळ भरपूर पैसा आहे, म्हणून घेऊ शकतात)