भ्रमाचा भोपळा
*
भ्रमाचा भोपळा
अध्यापन करणा-या कोणाच्याही आयुष्यात पहिलं लेक्चर हा अविस्मरणीय असाच प्रसंग असतो. विद्यार्थी असतांना आम्ही काही नवख्या अध्यापकांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण आता बाजी उलटली होती. मी "रिसिव्हिंग एन्ड्ला" होतो. ही वेळ माझ्या माझ्यावर कधी ना कधी तरी येणारच होती. फक्त ती अचानक आली इतकंच!
*
विभाग प्रमुखांनी एक दिवस अचानक बोलावलं आणि ते म्हणाले: "आपले ते हे आज नाहीत. रजेवर आहेत. तू त्यांचं लेक्चर घ्यायचं" झालं! संपलं! इतकं बोलून ते आमच्या एका वरीष्ठ सहका-याशी चर्चेत गुंग झाले. तेंव्हा साडेबारा वाजले होते आणि मला दोन वाजता आयुष्यातलं पहिलं लेक्चर घ्यायचं होतं! मी बाहेर येवून चौकशी केली. मला लेक्चर घ्यायचं होतं ते बायोस्टॅटीस्टीक्स (वैद्यकीय संख्याशास्त्र) या विषयातल्या "प्रॊपॅबिलीटी ऍन्ड नॉर्मल डीस्ट्रीब्युशन" या संकल्पनेवर. आधीच बायोस्टॅटीस्टीक्स हा वैद्यकिय विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय आणि त्यात प्रॊपॅबिलीटी ऍन्ड नॉर्मल डीस्ट्रीब्युशन" ही समजावून सांगायला आणखीनच अवघड अशी संकल्पना. मला समजेना की ही जवाबदारी नेमकी माझ्यावरच कां आली? मग आठवलं की मागे विभाग प्रमुखांनी "तुला कोणतं लेक्चर घ्यायला आवडेल?" असं विचारलं होतं तेंव्हा मीच जरा जास्तच आगावू आत्मविश्वासानं बायोस्टॅटीस्टीक्स असं सांगितलं होतं. हा टॉपिक बहूदा वरीष्ठ अध्यापकाला दिला जातो. त्यामुळे आपल्यावर ती वेळ येणारच नाही असा मुत्सद्दी विचार कदाचित त्यामागे असावा! पण मुत्सद्देगिरी आता अंगलट आली होती!
*
मी भराभरा पुस्तकं चाळली. नोट्स काढल्या. लेक्चरचा आराखडा मनातल्या मनात तयार केला. शिकवतांना वातावरण हंसरं ठेवावं असं शिक्षणशास्त्र सांगतं. म्हणून अधून मधून जोक्स सांगावे असं ठरवलं. वैद्यकिय संख्याशास्त्रावरचे एक दोन हातखंडा जोक्स आठवून तयार ठेवले. वर्गात प्रवेश कसा करायचा, नोट्स कुठे ठेवायच्या यावर विचार केला. नोट्स न लपवता सर्वांना दिसतील अशा ठेवायच्या असं ठरवलं. कारण आमच्याच एका अध्यापकाला ऐन वेळी नोट्स सांपडेनात. त्यामुळे कोटाचे, शर्टाचे, पॅण्टीचे खिसे तपासूनही नोट्स सांपडेनात तेंव्हा त्यांचा झालेला केविलवाणा चेहेरा आणि त्या हजेरीपटा खाली आहेत असं मी मागच्या बाकावरून ओरडून सांगितल्यावर आणि त्या तिथं खरंच सांपडल्यावर त्यांच्या चेहे-यावर दिसलेला सुटकेचा आनंद पाहून सगळा वर्ग खो-खो हंसलेला मी विसरलो नव्हतो ! वेषभूषेचा विचार आता करणं शक्य नव्हतं कारण माझं घर बरंच लांब होतं आणि तेव्हढा वेळही नव्हता. पण हातरूमाल आहे ना, तो स्वच्छ आहे ना याची खात्री करून घेतली. आपण विद्यार्थ्यांना "गुड आफ्टरनून" म्हणायचं की ती संधी त्यांनाच द्यायची याचा निर्णय झाला नाही. तो ऐनवेळी घेवू असं ठरवलं . सुरूवातीस उगीचच खाकरायचे नाही हा निर्णय माझाच. कारण मी विद्यार्थी असतांना असाच एक लेक्चरर खोकलला तेंव्हा सगळा वर्ग खोकू लागला होता ! चपराशाला सांगून वर्गात पिण्याच्या पाण्याचा जग आणि एक पेला याची सोय करून ठेवली. हो, उगाच घसा कोरडा पडून आवाजावर परिणाम व्ह्यायला नको! दुपारी एक ही आमची जेवायची वेळ. पण ह्या सर्व तयारीच्या गडबडीत ते राहूनच गेलं
*
आमच्या विभागाच्या वरच व्याख्यान कक्ष आहे. विद्यार्थ्यांनी बाकं बडवायला सुरूवात केली की निघायचं असा सर्वधारण शिरस्ता. पण ही संधी त्यांना द्यायची नाही म्हणून पाच मिनिटं आधीच पोहोचलो. सगळे विद्यार्थी आत गेले आहेत याची खात्री झाल्यावर मी आत गेलो. दरवाजा बंद केला. हो, उगाच कुणी पळून जायला नको! (पळ्ताय कुठे? ते दोर मी कधीच कापून टाकलेत!) नंतर मी वळालो खरा पंण पायात पाय अडकून माझ्या हातातलं डस्टर, खडू इत्यादी साहित्य खाली पडलं. आता हंशा, टाळ्यांचा पाऊस पडेल या अपेक्षेनं मी वर न पहाता सगळं सामान गोळा केलं. काहीही आवाज झाला नाही. उलट शांतता (वादळा पूर्वीची? ) पसरली.
*
मी डायस वर गेलो. फळा चपराश्यानं आधीच साफ करून ठेवला होता. तरीही मी तो पुन्हा साफ केला. या गडबडीत ते गुड आफ्टरनूनचं राहूनच गेलं. हजेरी शेवटी घेवूत असं ठरवून मी विद्यार्थ्यांकडे वळलो. सगळा वर्ग माझ्याकडेच पहातोय असं दिसलं. सगळ्या नवशिक्यांना हा प्रकार गांगरवून टाकण्यास पुरेसा असतो. पण मी तो पर्यंत ब-याच नाटकात कामं केली होती. त्यामुळे उलट मजा वाटली. मनोमन कुलदेवतेचं स्मरण केलं आणि सुरूवात केली. आधी स्वता:चं नाव सांगितलं. व्याख्यानाचा विषय संगितला आणि धडाक्यात सुरूवात केली.
*
"Probability that I will die some day is hundred percent. Probability that I will swim Indian Ocean unaided is zero percent and probability that you would pass MBBS some day or the other is ....?" असं म्हणून मी एक पॉज घेतला. अपेक्षेनुसार सर्व जण एका सूरात ओरडले : "हंन्ड्रेड पर्सेंट !!!" हळूहळू मी प्रॊपॅबिलीटीची संकल्पना समजावून सांगायला सुरूवत केली. पत्त्याच्या डावात बावन्न पानात बदामचा एक्का येण्याची शक्यता, फासा फेकला असता सहाचं दान पडण्याची शक्यता आणि नाणेफेंक केली असता "छाप" पडण्याची शक्यता.... विद्यार्थी लक्ष्य देवून नुसतं ऐकतच नव्हते तर लिहून घेत होते!! एक दोघांनी तर बोटं उंचावून "सर, जरा हळू" अशी सूचनाही केली. एका टप्प्यावर मी थांबलो. काही शंका आहेत कां ते विचारलं. दोघा तिघांनी शंका विचारल्या. मला त्या प्रामाणिक शंका वाटल्या. मी त्यांचं निरसन केलं आणि पुढे सरकलो. यथावकाश लेक्चर संपलं. मी हजेरी घेतली आणि हॉलचं दार उघडलं. इथं काही टार्गट कॉमेंट्स अपेक्षित असतात. पण तसं काही झालं नाही. आश्चर्य करत मी डिपार्टमेन्ट्ला परत आलो.बहूदा माझ्या अमोघ वक्तृत्वाची आणि विद्वत्तेची विद्यार्थ्यांवर छाप पडली होती यावर माझ्या मनात कुठलीच शंका राहिली नव्हती.
*
विभागप्रमुखांचं बोलावणं आलं. पहातो तो त्यांचे समोर "रजेवर" असलेले आणि ज्यांचं लेक्चर मला घ्यावं लागलं ते वरिष्ठ सहकारी! हे असं होतं तर ! मला लेक्चर घ्यावं लागावं म्हणून केलेला तो बनाव होता तर ! सरांनी चौकशी केली. "कसं काय झालं लेक्चर?" काहीच गडबड न होता लेक्चर झाल्याबद्दल मला वाटलेलं आश्चर्य मी व्यक्त केलं. त्यावर हंसून विभागप्रमुख म्हणाले: " आरडा ओरडा होणं शक्यच नव्हतं. ती एक्झाम गोईंग बॅच होती !!" (त्या टर्मला ज्यांची युनिव्हर्सिटीची परिक्षा असते तिला एक्झाम गोईंग बॅच असं म्हणतात.) परिक्षेच्या तयारीच्या टेन्शन मुळे हे विद्यार्थी लेक्चर्स मधे गडबड गोंधळ करत नाहीत, मुकाट्यानं ऐकतात हा सर्वसाधारण अनुभव. माझ्या ते लक्ष्यातच आलं नव्हतं. आपल्या अमोघ अक्तृत्वापुढे आणि विद्वत्तेपुढे विद्यार्थी अवाक होऊन शांत बसले होते हा माझा भ्रमाचा भोपळा अशा रितीनं फुटला होता !!
-अशोक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक अनुभव म्हणून ओके पण
अनुभव
हम्म!!
दादा कोंडके साहेब... हा
अनुभवात मी येणार नाही तर काय?
१+
असेच
येस्स, एकदम सहमत बघा !!!!
मेहेंदळे साहेब.... धन्यवाद
ओके
तुमच्या `ओक्के'ला आमचा पण `इटज ऑल राइट'
दाकों,.. लेखाचा अर्क काही
डॉक्टर! मस्त खुसखुशित लिहिलं
छान लिहीलय आवडलं
आवडले..
छान लिहिलात अनुभव........
छान लिहिलात अनुभव........
नवश्रीकृष्ण सध्याअतिकार्यमग्न
प्रांजळ अनुभव कथन. आवडले.
अनुभव आवडला.
डॉक्टर साहेब- लिहीत रहा.
+१
पण गोष्ट तीतकीच खरी आहे की
In democracy, People get the
माझ्या मते आपल्या देशात
डॉक्टरी पेहराव्याच्या बाहेर येउन लिखाण केले आहे
तुम्ह्चे विचार
+१
अनुभव वाचून प्रतिसाद देणा-या
झकास्स लिहिले आहे हो...
भडकमकर मास्तर..... या बाबतीत
भडकमकर मास्तर..... या बाबतीत
व्वा ! क्या बात आहे. आवडलं !
लिहा ना मास्तर...............
मस्त अनुभव!
+१
माझे मिप वरचे इतर गद्य लेखन
उत्तम...
तुम्हाला हे एवढं सगळं, इतके
मस्त. अजून येऊ द्या.
मस्त खुसखुशीत!
तुम्हाला आलेला अनुभव आणि तो
धन्यवाद !