Skip to main content

तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 04/08/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्‍याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं. तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती. परिचय नव्हता. करुन घ्यावासा वाटत होता पण धीर होत नव्हता. एक दिवस जोरदार पावसाचा मारा छत्रीवर झेलत मी चालत होतो. कोपर्‍यावर एका बंगल्याच्या आडोशाने ती अंग चोरत उभी होती. तिच्याकडे पाहिले. तिने सुद्धा नजर मिळवली. काय झाले कळले नाही. मी रस्त्याच्या कडेला होत छत्री थोडी बाजूला सरकवली. पटकन ती छत्रीत आली आणि आम्ही चालू लागलो. सुरवातीला असलेला पावलांचा वेगळा ताल केव्हा एकताल झाला ते कळलेच नाही. जणू जन्मांतरीची भेट व्हावी अन सगळं काही परिचित असावं तसंच. तिच्या सोबत घालवलेला हर एक क्षण रोमरोमात भिनून गेला. तिच्याबरोबर हळु हळू माझा मी बदलत होतो. स्वभावाचे टोकदार कंगोरे कदाचित कमी होत होते. तु बदलला आहेस असं मित्र म्हणत तेव्हा मी हसून उडवून लावायचो. पण एकंदरीत जग कसं सुंदर वाटायला लागलं होतं. सगळं काही तेच होतं. माझी नजर बदलली होती. तेच आकाश, तेच ढग, तीच नदी, तेच तळे, तोच गाव, तेच रस्ते, सर्व काही तेच. पण आता सर्व हवेहवेसे आणि नवेनवेसे वाटत होतं. चर्चा वादविवाद यांचा कंटाळा आला होता. बास ! ती आहे आणि मी आहे. याशिवाय बाकी काही नको. कधी कधी मनात विचार यायचा ती नव्हती तेव्हा कसं होतं आयुष्य ! आणि आता ती आहे तेव्हा त्या आयुष्यात काय कमी होतं त्याची जाणीव होत होती. उगाच भटकणं, तंद्री लावून विचारात गुरफटणं, अकारण दारु पिणं, सिगारेटी फुंकणं अचानक कमी झालं. का कोण जाणे तिने कधी हे करु नको ते करु नको असं म्हटलं नाही, पण बदल झाला. असंच आयुष्य एकमेकांना साथ देत जगायचं ही शपथ घेतली होती. शपथ मोडण्याचा कधी प्रसंग आलाच नाही. हातात हात मिसळून आयुष्यातील सुख दु:खांना सामोरं जायचं ठरवलं खरं. पण माझ्या आयुष्यातील दु:खांचा जाब विचारायला आणि रदबदली करुन सुख मिळावं म्हणून याचना करायला नक्षत्रांच्या गावाला न सांगता निघून गेली. लख्ख चांदणं पडलं की त्या चांदण्यामधे तिचा चेहरा दिसतो. तेच ते हलके स्मित आणि केव्हाही झर झर वाहू लागतील असे टपोरे डोळे. त्यांच्याकडे पहातांना उरातील क्षोम झाकावाच लागतो तरी तिला ते कळतंच आणि एक अश्रू सर्रकन तिच्या गालावरुन ओघळतोच. चमचम करत विझून जातो. काळेकुट्ट ढग भरुन येतात तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांची आठवण येते. मन पुन्हा पुन्हा बावरतं आणि जिकडे तिकडे तिचाच भास होऊ लागतो. तिच्याशिवाय जगणं भाग आहे पण तिच्याशिवाय जगणं अवघड आहे. सुरेल महफिल चालू असतांना अचानक तंबोर्‍याच्या तारा तुटाव्या आणि सगळं शांत शांत व्हावं. कोपर्‍यातल्या घड्याळाचा टीक टीक जीवघेणा आवाज येत रहावा आणि गायकाने महफिलीतून निघून जावे. अभागी श्रोत्याच्या नशीबी फक्त रिकामा रंगमंच आणि लोंबकणार्‍या तारांचा तंबोरा पहाण्याचे भाग्य असावे. आयुष्यात सर्व काही मनासारखं होत नाही पण जे झाले त्याची आठवण गोंजारत जगणे भाग असते. जेव्हा जेव्हा आठवणींचा पूर व्याकूळ करतो तेव्हा दोन्ही हात वर करत एखाद्या डोंगराच्या माथ्यावर उभे राहून फक्त हेच सुर येतात "तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है , जहाँ भी जाऊ ये लगता हैं तेरी महफ़िल है "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8439
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

खूप म्हणजे खूपच आवडलं. मरेपर्यंत कधीतरी इतकं रोमँटिक होता येईल का असं वाटून गेलं क्षणभर!

In reply to by पैसा

त्यापेक्षा ह्या रोमँटिसिझम मधून बाहेर कधी पडलो तर बरं होइल असं वाटायला लागलय.

कधितरी मुखवटा उतरतो आणी खरा नाना बाहेर येतो.

:)

सुरेख आणि हळुवार मुक्तक. आवडलं.

रडवलस बघ सकाळी सकाळी.

हळुवार प्रकटन. शेवटचा पॅरा खरंच अप्रतिम उतरलाय. सालं असलं काही वाचलं की वाटतं 'आपल्याला का नाय सुचत असं काही लिहायला'

सुरेख लिहिले आहे..:)

!

तू नहीं तो जिन्दगी में, और क्या रह जाएगा ?? ... दूर तक तनहाईंयों का सिलसिला रह जाएगा ! दर्द की सारी तहे और सारे गुजरे हादसे... सब धुवां हो जायेंगे, एक वाकिया रह जाएगा ! यूँ भी होगा वो मुझे दिल से भूला देगा मगर, ये भी होगा खुद उसी में एक खला रह जाएगा ! दायरे इनकार के, इकरार की सरगोशियाँ .... ये अगर टूटे कभी, तो फासला रह जाएगा ! Nana is back into his own form ! :-) प्रकटन आवडले !!

:)

च्यायला, असं तकलिफ होणारं काहुन लिव्हतो रे बाबा. :) -दिलीप बिरुटे

नान्याच्याच जुन्या लेखांच्या धाटणीचं आहे.

हर एक फूल किसी याद सा मेहेकता ह्ये हर एक फूल किसी याद सा मेहेकता ह्ये... तेरे खयाल से जागी हुइ फिजाये ह्ये ये सिर्फ पेड ह्ये या प्यार कि दुवाये ह्ये तु पास हो के नहि फिरभी तु मुकाबिल ह्ये जहा भी जाऊ ये लगता ह्ये तेरी मेहेफिल ह्ये !! तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल ह्ये !!

मस्त मुक्तक!! :)

काटा आला वाचताना. प्रेमभंगाचे दु:ख भोगलेले असल्याशिवाय असे लिहिताच येणार नाही हो. बहुत गहरी चोट खायी लगता है.

अप्रतिम..
सुरेल महफिल चालू असतांना अचानक तंबोर्‍याच्या तारा तुटाव्या आणि सगळं शांत शांत व्हावं. कोपर्‍यातल्या घड्याळाचा टीक टीक जीवघेणा आवाज येत रहावा आणि गायकाने महफिलीतून निघून जावे. अभागी श्रोत्याच्या नशीबी फक्त रिकामा रंगमंच आणि लोंबकणार्‍या तारांचा तंबोरा पहाण्याचे भाग्य असावे.
.. :-( पुन्हा एकदा, जिंकलंस नाना.. (नानांचा फ्यान) चिगो..

सुरेख लिहिलात नाना. एकदम आवडून गेले. कधीतरी आपल्या गविंनी म्हणल्याप्रमाणे एखादे गाणे साँग ऑफ द डे होते. हे तर साँग ऑफ द इयर्स झालेले. त्यामुळेच..

अप्रतिम लेख... लेख वाचून भूतकाळात गेल्यासारख वाटलं.... काही वेळ प्रतिक्रिया द्यायचं देखील भान नव्हत... भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आठवला ...... नाहीरती इष्कात होता, दर्द आम्हाला हवा पाकळ्यांचे काय, त्यांचा गंध आम्हा हवा||

तू का लिहितॉस असं.. तू मोकळा होतोस पण आम्हाला हळवं करुन जातोस त्याचं काय! पाडगावकरांची 'तेव्हाची ती फुलं..' आठवली, उगाचंच!

नान्या किधर है रे तू? बुकमार्क करून ठेवलेला हा लेख उघडायचे धाडस होत नाही.

In reply to by विजुभाऊ

जिथे असशील तेथून नाना परत ये.... तुझा चेंगटपणा आवडत नसला तरी कधी तरी मनापासून लिहिलेले लेख आवडायचे रे.... -दिलीप बिरुटे (नाना चेंगट उर्फ़ अवलिया उर्फ़ मारकुटे यांच्या चांगल्या लेखनाचा पंखा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील संपूर्ण प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत ! जाता जाता :- इजुभाउंना खोदकामाची आलेली लहर परत एकदा लक्षात आली आहे, हा खोदलेला कितवा लेख म्हणावा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर काढल्यापासून ५व्यांदा वाचतेय.