Skip to main content

शेतकरी आत्महत्या : संशोधनातील एक अनुभव

लेखक Kavita Mahajan यांनी बुधवार, 01/08/2012 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही विषय लिहायचे राहून जातात. विदर्भात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांबाबत मी एक अभ्यास टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसाठी केला होता. सोबत अंजली पवार ही कार्यकर्ती मैत्रीण होती. ज्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍यांच्या विधवांची सद्य:स्थिती, असा विषय होता. सुमारे ७५ डिप केसस्टडीज केल्या. या अभ्यासात आम्ही विदर्भातले ५ जिल्हे खेडोपाडी विभागून फिरलो. दोघी एकेकट्या फिरत होतो. यात काही अत्यंत विपरित अनुभव वाट्याला आले. आज त्यापैकी एक सांगते आहे. काही भागांत आत्महत्यांचे प्रमाण खूपच जास्त होते. एकेका लहानशा गावात १२ ते १६ आत्महत्या झालेल्या होत्या. सरकारने मदतीसाठी पात्र ठरवलेल्या व्यक्तींनाच आम्ही भेटणार होतो, ही एक चौकट असली, तरी संख्या अमाप होती. निवड कशी करावी याचे निकष नव्हते. अधिकाधिक गावांमध्ये जाऊन परिस्थिती पहावी आणि प्रत्येक गावातील एक वा दोन केसेस निवडाव्यात असे ठरले. यानंतर आम्हांला या स्त्रियांसाठी प्रत्यक्ष काय उपक्रम राबवता येतील, याविषयी अभ्यास मांडायचा होता. त्या भागातील तहसीलदारांना भेटून याद्या मिळवणे आणि मग प्रवास आखणे सुरू झाले. त्यात काही जुन्या केसेस होत्या. त्या बायका माहेरी निघून गेल्या, गावात राहत नाहीत ( कुठे गेल्या माहीत नाही), क्वचित कुणा तरुण मुलीचा पुनर्विवाह झाला असे समजायचे. चार-आठ तास पायपीट करून त्या गावातून परत यावे लागायचे. त्यामुळे काही जागी आम्ही स्थानिक कार्यकर्ते मदतीला येतील का पाहत होतो, ज्यांच्याकडे थेट माहिती असते. एका कार्यकर्त्यांना मी भेटले. कामाच्या वेळी मी माझी लेखिका इत्यादी ओळख पूर्ण बाजूला ठेवत असते. त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. अत्यंत उद्धट, मग्रुरीने ते बोलत होते. रेडलाईट एरियातले भडवेही सभ्य वाटावेत. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले,"यादी आमच्याकडेही आहे. कोणत्या बायकांना भेटायचे ते मी सांगू शकतो. तुम्हांला कोणत्या कॅटॅगिरीतल्या बायका पाहिजेत ते सांगा." मी भांबावले. म्हटलं,"कॅटॅगिरी अशी काही नाही. पण चार-पाच वर्षांपूर्वीची केस असेल तर त्या बाईची काही ना काही व्यवस्था झालेली असते. मला या एक-दोन वर्षांतल्या केसेस सांगा.आणि ज्यांना लहान मुले आहेत, मदतीची जास्तीत जास्त गरज आहे, त्या सांगा." ते हसत हसत उत्तरले,"म्हणजे तुम्हांला 'ताज्या विधवा' पाहिजेत तर!" माझा चेहरा एकदम कसनुसा झाला. स्त्रीत्वाचा हा अपमान पाहून डोळ्यांत पाणी आलं. मी लेखनात शिव्यांचा, अपशब्दांचा अनेकदा प्रासंगिक वापर करते; त्यामुळे लेखन अश्लील बनते, असा अनेकांचा आक्षेप असतो. पण 'अस्सल अश्लील भाषा' म्हणजे काय असू शकते, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. तेवढ्यात एका मोठ्या हिंदी / इंग्लीश न्यूज चॅनलची ओबीव्हॅन बाहेर येऊन थांबली. ते गृहस्थ लगेच मला म्हणाले,"ए पोरी, आता मला वेळ नाहीये तू जा." मी म्हटलं,"मला तुमच्याकडच्या या दोन फाइल्स बघायच्या आहेत. मी इथेच कोपर्‍यात बसून त्या बघून घेते. तुमचं काम संपलं की तुम्ही मला हवीये ती माहिती सांगा. रात्र झाली तरी थांबेन. पण उद्या तुम्ही नागपूरला जाणार आहात तर पुन्हा कधी न् कसे भेटाल?" त्यांनी गुरगुरत होकार दिला. आत्महत्यांच्या केसेसच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, लेख यांच्या कात्रणांच्या फाइल्स मी बघत, वाचत एका बाजूला बसले. माझा एकूण अवतार, भाषा पाहून मला इंग्लीश अजिबात समजत नसावं असं गृहित धरून त्यांनी चॅनलवाल्यांशी इंग्लीशमध्ये संभाषण सुरू केलं. मीही मान उचलून त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही, पण ऐकत राहिले. ती माणसं सांगत होती की, "कितीही दिवस थांबायला लागलं तरी चालेल. आम्ही थांबू. आमची सर्व व्यवस्था व्हॅनमध्ये आहे. खेड्यात आमची काहीही अडचण होणार नाही. पण आम्हांला या खेपेला एक 'लाइव्ह आत्महत्या' कव्हर करायची आहे." हा या दिवसातला दुसरा धक्का होता. हे कादंबरीत लिहिलं तर किती खोटं, भडक आणि अवास्तव वाटेल... माझ्यातला लेखक जागा होऊन पुटपुटला. व्यवहार ठरवून ते लोक गेले. दोन दिवसांतच मी बसमधून जात असताना एक रडवेला माणूस बसमध्ये चढला. कुणी ओळखीच्यानं त्याला विचारलं, तर म्हणाला,"शेजारचा पोरगा बापासह शेताकडे निघाला होता. सोबत वासरू होतं. मध्येच ते वासरू दावं सोडून पळालं आणि दुसर्‍याच कुणाच्या शेतात घुसलं. मुलगा त्याच्यामागे पळाला. वासरू बिनकाठाच्या विहिरीत पडणार हे पाहून मुलगा त्याला धरायला गेला आणि घसरून वासरासह विहिरीत पडला. एकुलता मुलगा होता. त्याच्या बहिणीला बोलवायला मी जातोय." दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये ही बातमी अपघात म्हणून होती. तिसर्‍या दिवशी दुरुस्तीसह आत्महत्या म्हणून होती. हे सर्व त्या गृहस्थांचे प्रताप असणार असं मनात येऊन मी मुंबईतील एका मीडियावाल्या मैत्रिणीला फोन करून त्या चॅनलबाबत विचारलं, तर तिनं सांगितलं की," त्यांची ब्रेकिंग न्यूज खळबळजनक ठरली आहे. विहिरीत कॅमेरे सोडून त्यांनी शूट केलंय. त्यांनी हे कसं जमवलं याचाच आम्ही विचार करतोय."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7542
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

पिपली लाईव्ह! वेगळ्या अर्थानं.

कवितातै, पण शिर्षक वाचून लेख उघडला आणि हातात मात्र काहीच पडले नाही असे झाले. खरेतर तुमच्याकडून ह्या संशोधनात तुमच्या हाताला जी काही माहिती लागली तिचे सार, त्या विधवा स्त्रियांचे तुम्हाला समजलेले वास्तव, सरकारी मदत आणि सरकारचा कारभार ह्या संदर्भात काही वाचायला मिळेल असे वाटले होते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तो सविस्तर अहवाल टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत उपलब्ध आहे. वाचकांसाठी तो तिथे उपलब्ध आहे. इतका मोठा विषय इतका संक्षिप्त करून इथे मांडणे अवघडच. वर्षभराचे काम एका लेखात मांडता येणे खरे नाही. दुसरे म्हणजे हे लिहिण्याचा हेतू म्हणजे, अहवालाबाहेरचे काही अनुभव मांडणे, इतकाच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मग त्या कुटुंबाची तुम्ही घेतलेली मुलाखत, हाती लागलेली माहिती इ. मिळेल असे वाटले. घडलेली घटना व काय झाले असावे हा अंदाज फारच भयानक वाटतो आहे. जर राजीखुशी मामला असेल तर किमान किडनी विकायचा सल्ला तरी द्यायचा कोणीतरी. किडनी रॅकेट व त्यात पैसे मिळतात हे कित्येक वर्षे पेपरमधे (आत्महत्या न्यूज यायच्या अगोदर) हमखास बातमी असायची :-(

भीषण दिसतंय सगळंच... लाईव्ह आत्महत्या कव्हर करायची ही इच्छा ऐकून दोनतीन सेकंद अक्षरश: गोठल्यासारखं झालं.. किंबहुना दोनतीन क्षण अविश्वसनीय वाटलं. मग हळूहळू बातम्यांचे चॅनेल्स डोळ्यासमोर आले आणि तुम्ही म्हणता ते अगदी सहज शक्य असं सत्य असेल अशी वाईट जाणीव झाली. ते इथिओपियातलं वाळवंटात सरपटत जाणारं सांगाडासदृश बाळ आणि त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहणारं गिधाड हा पूर्वी गाजलेला फोटो आत्ताच्या टीव्ही जर्नालिझमच्या अ‍ॅटिट्यूडशी चपखल जुळतो. बाईट = लचका. हे सर्व फर्स्टहँड ऐकायला मिळालं याबद्दल तुमचे आभार..

प्रत्यक्ष अन्यायग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या नावावर जगणारे अन्य लोक यांचे अनेक आयाम मी सुध्दा बघतोय. शाळेत असतांना काही लोक दुष्काळाची वाट पाहतात ही कल्पना झेपली नव्हती. आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर. कविता महाजनांचा हा अनुभव एकमेव नसेल अशी खात्री आहे. मी विदर्भाचा असल्यामुळे नेमके ठिकाण लक्षात न येऊनही पात्र कोण असेल याची पुसट कल्पना येतेय. चित्र केवळ एवढंच नाही तर या समस्येवर आलेला निधी कुठे रिचवल्या गेलाय आणि तो झिरपत शेतकर्‍याच्या हाती किती आला हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. - नीलकांत

In reply to by नीलकांत

इथे आंध्र प्रदेशात एका मोठ्या राजकीय नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत्यूने दु:खी झालेल्या अनेक लोकांच्या आत्महत्यांचे पेव फुटले होते. त्या पंधरा दिवसात राज्यात झालेल्या जवळजवळ सर्व आत्महत्या प्रत्येकी एक लाख रुपये दराने विकत घेतल्या गेल्या.

तुम्ही अनुभवलेला हा प्रकार अतिशय किळसवाणा वाटावा असाच आहे. :(

पण आपल्या महान देशात हे सहज शक्य आहे. खरं तर कशाचंच आश्चर्य वाटणं आजकाल थांबून गेलंय. ताज्या विधवा यासारखा शब्दप्रयोग करणारे इथे पुढारी म्हणून मिरवतात. दुसर्‍या घटनेत विहीरीत कॅमेरे आधीच कसे लावले गेले आणि त्या पोराचा मृत्यू खराच कसा झाला याचा विचार करू नये हे शहाणपणाचं. हजार पाचशे रुपयांसाठी पोटची पोरं विकण्याच्या घटना कानावर येतात, तिथे या अशा घटना होणारच. :( कविताताई, तुमच लेखन आवडतंच. अशा आणखी घटना जरूर आमच्यापर्यंत आणा. कुठेतरी एखादी ठिणगी पडली तर पडली. विदा वगैरे देत काथ्याकूट करता येतोच, पण जिवंत अनुभव जास्त थेट पोचणारे असतात.

In reply to by पैसा

>विदा वगैरे देत काथ्याकूट करता येतोच, पण जिवंत अनुभव जास्त थेट पोचणारे असतात. मी जो काय आयुष्यात अनुभव घेतलाय त्यासंबधाने बोलतोय. बर्‍याचदा पेपरमधे छापून आलेले, सांगोवांगी कथा किस्से असतात ते फक्त दोन घटका गफ्फा इतकाच परिणाम घडवून आणतात. हळहळ व्यक्त होते व विसरले जाते. उलट दरवेळी अश्या घटना घडल्या की त्या तिखटमीठ लावून दुसर्‍यांना सांगण्यापेक्षा त्याचा विदा मिळवून योग्य काथ्याकूट झाला, काय झाले व कसे टाळता आले असते याचा सखोल विचार करायला समाज शिकला व प्रश्न विचारू लागला, विदा मागू लागला की मग उडवाउडवीची उत्तरे देणारे व माजोरी सरकारी नोकर व पुढारी आपसूक सुधारतील. मुळ विषय व त्याचा खल करण्याऐवजी, तो ना असं म्हणाला, मग ना असं घडलं, काय न बै त्या मेल्यानेच केले असेल अश्या मालीकाछाप गफ्फा. वर परत लोक टिव्हीवरच्या मालीकांना नावं ठेवतात तेव्हा मला मौज वाटते. लोक असेच बघतात, चघळतात, विचार करतात म्हणूनच असले दाखवायची टिव्हीवाल्यांची हिम्मत वाढते. किरकोळ रकमेत आपल्या पोरांना विकणारे, मारणारे आईबाप आहेत म्हणुन एखादा/एखादी विहीरीत संपतात, किंवा बाजारात लुटले जातात, एखादा सरहद्द ओलांडून दुसर्‍यांना मारतो. पुन्हा मुळ प्रश्नाकडे न बघता आपण एखाद्या समाजाचा घाउक तिरस्कार अथवा टिव्हीवाले/पुढारी यांना शिव्याशाप देउन आपले कर्तव्य बजावतो. दुसर्‍या घटनांवर चर्चा करायला मोकळे होतो. ताज्या विधवा हा शब्द प्रयोग जितका असंवेदनाशील वाटतो तितकाच तो शहरी पॉलीटीकली करेक्ट भाषा व ग्रामीण मोकळेढाकळे रांगडे बोलणे हा फरक व त्याहून महत्त्वाचे एका ग्रामीण /उपनगरी भागातील अधिकार्‍याचा, शहरी व त्याच्या लेखी आपला वेळ खाणार्‍या व्यक्तीला भाव न देण्याचा प्रकार असु शकतो. त्याबरोबर काही शहरी लोक केवळ आकडेवारी/बातम्या ह्याच भावनेने त्याच्याकडे येत असतील व त्यामुळे त्याचे कडवट मत झाले असेलही. काहीही असो. पुन्हा कुठल्या शब्दात/अपमानात अडकून मुळ समस्येकडे दुर्लक्ष होणार असेल तर ती चूक त्या माणसाची की आपली? हे असे शेलक्या शब्दांनी, शिव्यांनी विदापूर्ण काथ्याकूटही थांबत असेल तर सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, बाबा आमटे यांचे कार्य कधीच थांबले असते ना? जाउ दे ते मोठे लोक आपणं कोण असा विचार करुन गप्प बसणार असु तर त्या समाजाला विकसनशील ते विकसीत ही दरी ओलांडणे जमायचे नाही. समाज सुधारकांनी मार्ग दाखवला आहे व वाटचाल आपल्यालाच करायचीच आहे. अण्णा हजारे करतील, झालेच तर रामदेवबाबाही आहेतच म्हणून कसे चालेल. अगदी रस्त्यावर उतरून काही केले नाही तरी बसल्याजागी गंभीर चर्चा करणेही शक्य नाही का? बिका व कविता महाजन या दोघांनी प्रत्यक्ष जागेत जाउन आढावा घेतला, इथे मांडला हे कौतुकास्पद आहेच पण त्याअनुषंगाने अजुन जास्त माहिती पुढे आली तर उत्तमच ना? का पुन्हा गफ्फा/गॉसीप्स होणार असतील तर एक पाउल पुढे व दोन पाउल मागे नाही का? किमान यापुढे सरसकट इतरांना असंवेदनशील, पुस्तकी- पांडीत्यवाले, समाज नावाची गुंतागुंत न समजणारे, सामान्य - हुच्चभ्रू असले शिक्के मारण्या अगोदर लोकांनी विचार केला की आपण तरी नक्की समस्येच्या उपाययोजनांवर नीट विचार करतो आहोत का, मतांमधे फरक असला तरी समोरच्याचा व आपला समस्यानिवारण हा हेतू एकच आहे ना? बास इतके जरी घडले तरी हा प्रतिसाद भरून पावेल.

In reply to by सहज

तुमचा प्रतिसाद आवडला. चर्चा आवश्यक आहे हे अगदी बरोबर. श्रामो, कविताताई, बिका यासारखे लोक काहीतरी नक्कीच उपयोग करतील. पण आपल्यासारखे निव्वळ मोकळा वेळ आहे आणि आणि ब्रॉडबँड उपलब्ध आहे म्हणून मिपावर चर्चा करणारे ९०/९५% लोक या चर्चेतून काही करणार आहेत का हा माझा प्रश्न आहे. त्यातही वादांना कंटाळून काथ्याकुटाकडे बरेच जण फिरकतही नाहीत. निदान असे अनुभव काही थोडे जास्ती लोक वाचतील. आणि त्यातूनच कोणाच्या मनात ठिणगी पडली तर पडली. तसे तर इथे नुसत्या चर्चा करणार्‍यांपेक्षा मेणबत्त्यावाले जास्त बरे. ते निदान रस्त्यावर तरी येतात. आमच्यासारखे लोक काथ्याकुटातून काही शिकणं कठीणच!
किमान यापुढे सरसकट इतरांना असंवेदनशील, पुस्तकी- पांडीत्यवाले, समाज नावाची गुंतागुंत न समजणारे, सामान्य - हुच्चभ्रू असले शिक्के मारण्या अगोदर लोकांनी विचार केला की आपण तरी नक्की समस्येच्या उपाययोजनांवर नीट विचार करतो आहोत का, मतांमधे फरक असला तरी समोरच्याचा व आपला समस्यानिवारण हा हेतू एकच आहे ना? बास इतके जरी घडले तरी हा प्रतिसाद भरून पावेल.
तुमचा आशावाद आवडला. मी पण मुळात आशावादी आहे, पण निदान इथे तरी काही घडणं कठीणच दिसतंय..

In reply to by पैसा

शंभर जण चर्चा करतील तर त्यातील निदान एखादातरी कृतीवीर निघेल. पण जर सगळेच शिक्के मारीत बसले तर एकही कृतीवीर निघणार नाही. नाही का? तुमचा आशावाद आवडला. मी पण मुळात आशावादी आहे, हेच म्हणतो. कविता महाजन यांचा लेख अस्वस्थ करणारा आणि सहजरावांचा प्रतिसादही पटण्यासारखा हेवेसांनल.

भयानक आहे हे वास्तव. "आम्हांला या खेपेला एक 'लाइव्ह आत्महत्या' कव्हर करायची आहे." मिडीयाची नितिमत्ता येवढी रसातळाला गेली आहे? न्यूज च्यानंल पाहणं फार वर्षापूर्वीच सोडून दिलं. कधी वेळ मिळाला तर सह्याद्रीच्या बातम्या पाहतो (विश्वासार्ह असाव्यात अशी आशा आहे). गविंनी दाखवलेलं छायाचित्र फार अगोदर पाहिलं होतं पण त्यापाठीमागे असं काही असू शकतं असा विचार त्यावेळी केला नव्हता. पण आता मात्र खात्री पटतेय, या सगळ्यापाठी अशीच रसातळाला गेलेली नितिमत्ता असावी.

या सर्व रोगांचे कारण म्हणजे आपली अर्थव्यवस्था आणि त्यातील दडलेले शोषण हे होय. कधीतरी यावरही उपाय मिळेळ. कविता महाजन यांच्या संवेदनशिलतेमूळे असे प्रकार उघडकीस येतात हेही कमी नाही.

"विहिरीत कॅमेरे सोडून त्यांनी शूट केलंय. त्यांनी हे कसं जमवलं याचाच आम्ही विचार करतोय" त्या वाहिनीचे नाव कळु शकेल काय? इथे देण शक्य नसल्यास व्य नी करावा ही विनंती