मेलोड्रामा -गायकीचे शहनशाह - मोहंमद रफी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली. पन्नासच्या दशकात सर्वच संगीतकारांच्या प्रतिभेत सुवर्ण युगाचा संचार झाला. चित्रपटातील नायकांची प्रतिमा पूर्वीपेक्षा वेगळी झाली. साहजिकच गायकांच्या गायन शैलीतही फरक पडत गेला. सुरवातीस मोहमंद रफी यांच्या शैलीवरही जुन्या गायकांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो. ( आठवा - मै जिंदगीमे हरदम रोता ही रहां हू १९४९ ) . पण रफींच्या आयुष्यात दोन महत्वाचे संगीतकार १९५२ ते १९६० या काळात आले ते म्हणजे शंकर जय किशन व ओ पी नय्यर . या दोघानी संथ संगीताचा नूरच पार दूर भिरकावून दिला. रफीनी १९५२ नंतर आपली गायकी शैली बनण्यात ओपी नय्यर यांचा हात असल्याचे कबूल केले असे शम्मी साहेबानी एका मुलाखतीत सांगितले होते. ही शैली म्हणजे " मेलोड्रामा" शैली. या शैलीत प्रत्येक मूड हा थोड्या अतिरेकी प्रमाणात आणायचा असतो. रडणे हसणे , विस्परिंग, मृदुपणा, सारेच थोडे वाढवायचे. असा प्रकार मन्ना डे याना ही करता यायचा पण रफी यांच्या गायनात एकूण एक डझन आवाज लपलेले होते. त्यांच्या आवाजाचा पोत हा नायकाच्या पडद्यावरील रुपाचा ध्वनी माध्यमातील अविष्कार असे. रफी साहेब पुढे १९६९ पर्यंत आघाडीचे पुरूष गायक राहिले ते या दोन कारणाने .
या मेलोड्राम शैलीच्या गायकीची काय काय रूपे रफीनी दाखविली ते पाहणे रंजक आहे.
१) शायराना अंदाज - पूर्वी आपल्या सिनेमात मुस्लिम सोशल नावाचा एक फॉरमॅट होता. त्यात मेरे महबूब, पालकी , दिल हीतो है, चौदवीका चांद ई चित्रे आली. रफी याना शायराचा आवाज हा उत्तम पणे व्यक्त करता येत असे. विशेषत: न थरथरणारा, सुस्पट उचारांचा व प्रसंगी सॉफ्ट व प्रसंगी शार्प
होणारा आवाज रफी काढू शकत होते. त्यामुळे मुशायरा म्ह्टले की रफी. असा संकेतच होऊन बसला.
२) देशभक्ताचा आवाज- रफींचे दुसरे सामर्थ्य म्हणजे देशभक्तीपर गीत असले की ते एक वेगळाच मूड त्यांच्या शब्दफेकीत आणत- ऐ वतन ऐ वतन , वतनकी राहमे वतनके नौजवा , कर चले हम फिदा,अपनी आजादिको हम ही गीते ऐकली की कोणालाही स्फुरण चढावे अशी ताकद रफींच्या फेकीत असे. पुढे रफी यानाच गुरू मानणारे महेंद्र कपूर यानी आपला एक नवा देशभक्तीचा पहनावा
पुढे आणला हा भाग वेगळा.
३) लहान मुलांसाठीच्या गीतातील रफी.- हिदी सिनेमात लहान मुलांचे वाढदिवस ई गीताना स्थान असे. त्यात ही मेलोड्रामा शैली रफी खुलवत असत , नन्हे मुनन्नी बच्चे तेरी, रे मामा रे मामा रे, हम भी अगर बच्चे होते, आयी हे बहारे मिटे व चक्के मे चक्का ही गीते पहा .रफी कशी निभावून नेत.
४) शराबी मूड- हा मूड तर रफींचा हात खंडा- निराश शराबी- कभी न कभी , जरा सभ्य शराबी - मैने पीना सीख लिया, विनोदी शराबी- जंगलमे मोर नाचा संत्रस्त शराबी- मैने पी शराब तुमने क्या पिया
यात निरागस , धार्मिक मोहंमद रफी हा माणूस कुठेही आपल्याला आढळणार नाही. आपण पक्के व्यावसायिक पार्श्वगायक आहोत याचे भान रफी व आशा भोसले यानी जितके मनापासून ठेवले आहे त्या पुढे रसिकाची मान झुकलीच पाहिजे.
५) रडका चेहरा- उदास ,हताश रडका नायक व चरित्रनायक साकार करणे यात रफीनी कहरच केला
होता. है द्नुनिया उसीकी , बाबुलकी दुआए लेती जा, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, जाने ने क्या ढूंढती रहती है ये आखे मुझमे, ई गीते यासाठी पुरे आहेत.
६) विशिष्ठ आवाज - रफींनी सिंगापूर या चित्रात " रासासायंग रे रासा सायां " असे गाणे गायले आहे. त्यात त्यानी वेगळाच चिनी आवाज काढला आहे, त्यानीच गायलेल्या ले गई दिल गुडिया जापानकी
यातील जापान लव इन टोकियो यातील रफीचा आवाज ऐका.
७) विनोदवीरासाठीचा आवाज - प्रत्येक सिनेमात पूर्वी एक विनोदी पात्र नायकाच्या जोडीला असे त्याना सुद्धा रफी वेगळाच बाज असलेला आवाज देत. ऑल लाईन किल्यर, मै बम्बईका बाबू, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, सुनो सुनो मिस चट्रर्जी ई गीते विनोदवीरानी पडद्यावर सादर केली आहेत हे वेगळे सांगावेच लागत नाही.
या खेरीज, टांगेवाला असो खेळणीवाला असो, भिकारी असो सर्वांसाठी पार्श्व गायनाचे भन्नाट दुकान रफी यांच्या मालकीचे होते. रफी गरजू निर्माता गरजू संगीतकार असेल तर कित्येक वेळा या दुकानातील माल उदार हस्ते वाटीत. शम्मीकपूर, जॉनी वॉकर, दिलीप कुमार, राजेंद्रकुमार, यांचे वाटचालीत तर या आवाजाने किती हिस्सा उचलला याचा हिशेबच नाही. एका बाजूस मधुबनमे राधिका वा नाचे मन मोरा गाणारे रफी दुसर्या बाजूस बदनपे सितारे किंवा, अकेले अकेले हे गाणे म्हणूच कसे शकतात ? एका बाजूस किसी की यादमे दुनियाके है भुलाये हुवे किंवा तेरी ऑखोंके सिवा चा गजला गाणारे रफी दिवाना मस्ताना किंवा यार चुलबुला है यासारखी नटखट गाणी कशी म्हणू शकतात याचे उत्तर कोठे मिळेल? रफीना अभिनेताच व्हायचे होते म्हणे !
मराठीतील कवि ग दि माडगूळकर ,संगीतकार वसंत प्रभू व वसंत पवार , हिंदीतील गायक किशोरकुमार, हिदीतील अभिनेते संजीव कुमार , संगीतकार आर डी बर्मन, मदनमोहन याना काहीसे कमीच आयुष्य मिळाले तरी त्यानी त्यातच इतके काही करून ठेवले की आजही ते आपल्यात आहेत असेच वाटते . ३२ वर्षानंतरही मरहुम मोहंमद रफींची आठवण येते ती ही अशीच !
प्रतिक्रिया
मस्त लेख!
खरे आहे.
अजरामर रफी.
छान
मस्त लेख
मस्त लेख!
बडे गुलाम अलीम कडे
श्रद्धांजली.
अप्रतीम लेख
रफीसाहब...
एक शंका...
खरं सांगायचं तर
मस्त आठवणी!
८० च्या आधीची रफीची गाणी
गाणी व रफी - लता वाद
सुंदर लेख.. एका रसिल्या