Skip to main content

मी,मी,मी,म्या,म्याउ!!!

गुरुवार, 26/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे. कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे. तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते. काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच. आहेच मुळी मी तशी हुश्शार! मला माझा आवाज ऐकायला फार फार आवडतो. आणि इतर कुणाचाच बिलकुल आवडत नाही. कुणी येऊन माझ्या जवळ उगीच काहीतरी बोलले तर मी सरळ एक फटका ठेऊन देते. माझ्या प्रेमळ स्वभावाचा फार गैरफायदा घेतात नाहीतर लोक! घरात मी सगळ्यात उंच ठिकाणी आपली आपणच जाऊन चढून बसते. तिथून सगळे इटुकले पिटुकले दिसतात. मन फार फार आनंदी आणि समाधानी होते. मी डोळे मिटून स्वस्थ बसून राहते. कशाचीही फिकीर बाळगत नाही. वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही.मग सगळेजण कौतुकानी म्हणतात, 'ऐट बघा महाराणीची! ' मला एरवी काही ना काहीतरी खाऊ खात राहायला फार फार आवडते. पण माझ्या घरातल्या बायका त्याबद्दल काहीबाही बोलत राहतात, 'जंत झालेत मेलीला, औषध द्यायला हवे!' पण मी मात्र मला आवडते तेच करत राहते. त्यांना वेड्यांना कळत नाही माझे कसे सगळे बरोब्बर होत असते ते. इथे आजूबाजूचे काही प्राणी उगीचच मला त्रास देतात. त्यांना वेड्यांना असे वाटत असते की घरातल्या बायकांनी दिल्याशिवाय आपल्याला काही खाऊ मिळणार नाही. मी मात्र मला हवे तेंव्हा हवे ते घेते आणि मजेत राहते. ते माझ्यासारखे स्वयंपूर्ण नाहीत. म्हणूनच असे गुलामगिरीत खितपत पडतात. तसे बाहेरही काही प्राणी एकेकटेच आहेत. त्यांना वाटते आपण आपली आपण शिकार करून राहतो , म्हणजे आपण फार फार हुशार झालो. माजोरडे मेले! असले अहंकारी प्राणी मला बिलकुलच आवडत नाहीत. मी त्याना माझ्या जवळपास थाराच देत नाही मुळी. या सगळ्याच प्राण्यांना माझ्या वागण्याचे फार फार आश्चर्य वाटते आणि ते परत परत माझ्याशी काहीतरी बोलायला येत राहतात. मीपण त्यांना मोठ्या मनानी माझ्या गुरगुराटात सामील करून घेते. कुणाला जर माझे गाणे कळले नाही तर अतिशय उंच स्वरात आणि तीव्र सप्तकात 'म्र्यांव म्र्यांव' करते. माझा तो मधुर आवाज ऐकून अजून खूप प्राणी, माणसे वगरे सगळे जमतात आणि माझ्याकडे कौतुकानी आणि आश्चर्यानी पहात रहातात. ज्यांना त्यातले माधुर्य आणि गांभीर्य कळत नाही असे करंटे जीव मात्र उगीच तक्रारीचा रटाळ सूर लावतात. त्यांना २-४ वेळा नख्या मारल्या कि लगेच त्यांना सगळे काही कळते. माझी पद्धतच अशी लोकविलक्षण आहे! त्या समोरच्या बोळात एकदा मी अशीच फिरत फिरत गेले होते. तर समोरून एक अवाढव्य गलिच्छ प्राणी आला. तो त्याच्या लांब नाकातून आवाज काढत होता. त्याचा आवाजही मोठ्या भोन्ग्यासारखा होता. आणि मी माझ्या नेहमीच्याच तीव्र शब्दात कडक समज दिली की असे नाकातून आवाज काढणे योग्य नाही. त्याला पटले आणि तो हसू लागला. शेवटी आनंदानी हसत तो एकीकडे माझ्याकडे वळून वळून बघत निघून गेला. 'हत्ती.....' का काहीसे नाव होते म्हणे त्याचे. इथे प्राणी फार दंगा करतात हल्ली. मला तो बिलकुल आवडत नाही. खेळ म्हणजे कसा असावा तर माझ्यासारखा. मी माझ्या स्वत:च्याच शेपटीशी मस्त खेळात बसते, हवे तेंव्हा, कधीही, लहर आली की. उगीच इतर लोकांवर आणि बाहेरच्या फुटकळ वस्तूंवर अवलंबून रहायची सवयच नाही मला मूळी. स्वत:ची शेपटी अगदी योग्य प्रमाणात पुढे घ्यायची आणि त्याच्याच भोवती गोल गोल फेर्‍या मारायच्या, तीच पकडायची, तीच चावायची. कित्ती कित्ती मज्जा! पण हे प्राणी उगीच इकडे तिकडे फिरत बसतात आणि नुसता गोंधळ घालत राहतात. मूर्ख नुसते. परवा तर मला अगदीच दया आली त्यांच्या वेडेपणाची. प्रत्येकाला जावून चावून आले. नंतर सगळ्यांनी माझी माफी मागितली, आणि अशी चूक पुन्हा करणार नाही असे कबूल केले, आणि तेही अगदी कोपरापासून नमस्कार करुन! आता कळले का तुम्हाला मी कशी लाडावलेली आहे ते. करणार ना मग माझे लाड? --तुमची सर्वांची अत्यंत आवडती माऊ डिस्क्लेमर: हे माझ्या मांजरीचे आत्मवृत्त आहे. याची प्रेरणा मला लोबसांग राम्पांनी लिहिलेल्या त्यांच्या मांजरीच्या आत्मवृत्तावरुन, 'लिविंग विथ द लामा' वरून मिळाली आहे. या बद्दल कुणाला काही शंका असल्यास त्यांनी स्वत: माझ्या माऊशी याबद्दल चर्चा करून खात्री करून घ्यावी. माझी माऊ कधीही कुणाचेही शंकानिरसन अगदी विनामुल्य करून देईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5967
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

माझी माऊ कधीही कुणाचेही शंकानिरसन अगदी विनामुल्य करून देईल..... माधुर्य आणि गांभीर्य कळत नाही असे करंटे जीव मात्र उगीच तक्रारीचा रटाळ सूर लावतात. त्यांना २-४ वेळा नख्या मारल्या कि लगेच त्यांना सगळे काही कळते. याच लोकविलक्षण पद्धतीने ....

माऊची म्याऊ म्याऊ आवडली! :D Smiley म्याS..ऊSS.........!! ;)

तुझी मांजरीने पण घड्याळ वापरणं सोडलं ग लिमाऊ? साधारण किती वर्ष्यापुर्वी ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मूळात मांजरीसारख्या सर्वशक्तीमान, सर्वज्ञानी प्राण्याला घड्याळासारख्या क्षूद्र गोष्टींची गरजच काय? मांजरीचा आतला ताल इतका स्पष्ट असतो की अशी बाहेरच्या यंत्रांची तिला पर्वाच नसते. झोप सलामत तो वेळ पचास! ;)

पाशवी शक्तींनी पाशवी शक्तीसाठी काढलेला धागा ;) (म्यांव म्यांव चे रूपांतर गुर्रर्र मध्ये कधी होईल कोण जाणे या चिंतेने ग्रस्त अर्धपशू) बॅटमॅन.

लेखन आगळं वेगळं आहे. माणसाचा दृष्टिकोन सोडून मांजरीच्या विश्वातलं मनस्वी दृश्य दाखवणारे थंड, घारे, आत्ममग्न डोळे गवसलेले आहेत. नक्की काय करणं श्रेयस आहे? या प्रश्नाला नख्या मारून शांतपणे खिडकीत जाऊन स्वस्थ उन्हात जाऊन बसणारा दृष्टिकोन आहे. मस्त. लिविंग विथ द लामा विषयी अजून वाचायला आवडेल. अर्थातच तुमच्या माऊला त्याविषयी सांगावंसं वाटलं तर.

जे काहि आहे ते पाशवि आहे! धन्स

या लेखावरुन एका गाण्याची आठवण आली ब्वॉ... माऊला नक्कीच हे गाणे माहित असणार त्या गाण्याच्या मला स्मरत असलेल्या ओळी पुढे देत आहे बाकी ह्या ओळींवरुन माऊ गाणे पुर्ण करेल ही आशा आहे... शुक शुक मन्या जातोस की नाही, शुक शुक अगं नको गं मने तुला न शोभे तुझ्या मन्याला असं हे टाकून बोलणं शुक शुक ;) बाकी माऊचा लेख आवडल्या गेला आहे :)

___/\___ काही रेफरन्सेस लागले असं मानायला जागा आहे असं वाटता वाटताच बरंच काही निसटून जात असावं काय असा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हाभोवती फिरत फिरत आपल्याला किती अभ्यास करावा लागणार आहे ह्याची जाणीव करुन देतानाच आपण किती छोटे आहोत हे सहज दाखवून जाताना मोठे होण्याची गरज असल्याचं भान आणवतो.

In reply to by गवि

भारतीय समाजव्यवस्थेवर केलेलं भेदक भाष्य >> नाय ओ! येगळंच हाय त्ये. लय वंगाळ हाय. मला भ्या वाटतं... नख्या मारंल त्ये!

म्यांऽऽऽऽव...म्यांऽऽऽऽव...म्यांऽऽऽऽव... घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र.... म्यांऽऽऽऽव...म्यांऽऽऽऽव...म्यांऽऽऽऽव... घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र....घुर्रर्रर्र....

आवडले. शाळेत नाट्यछटा म्हणून तर कधी आत्मवृत्त म्हणून निबंधप्रकार होता; त्यातलच दिसतय. मस्तय. बादवे, मनी म्हणजे मांजर तर मनोबा म्हणजे बोका काय?

लोंबसंग राम्पा हा एक अचाट माणूस होता. त्यंच्या पुस्तकावरून कळते की ते एक लामा होते , डॉक्टर होते , एरोनॉटीकल इंजीनीअर होते. त्याना त्यांच्या गुरुनी शस्त्रक्रीयाकरून तिसरा नेत्र दिला होता त्या द्वारे ते चुंबकीय क्षेत्र पाहू शकत असत. थर्ड आय , डॉक्तर फ्रोम ल्हासा , स्टोरी ऑफ अ लामा, ही त्यांची काही पुस्तके

मांजरीचे आत्मवृत्त आवडले :) अमोल केळकर

या निमित्ताने कॅट्स डायरी व्हर्सेस डॉग्ज डायरी हा आंतरजालावरचा प्रसिद्ध मजकूर आठवला.. The Dog's Diary 8:00 am - Dog food! My favorite thing! 9:30 am - A car ride! My favorite thing! 9:40 am - A walk in the park! My favorite thing! 10:30 am - Got rubbed and petted! My favorite thing! 12:00 pm - Milk bones! My favorite thing! 1:00 pm - Played in the yard! My favorite thing! 3:00 pm - Wagged my tail! My favorite thing! 5:00 pm - Dinner! My favorite thing! 7:00 pm - Got to play ball! My favorite thing! 8:00 pm - Wow! Watched TV with the people! My favorite thing! 11:00 pm - Sleeping on the bed! My favorite thing! The Cat's Diary Day 983 of My Captivity My captors continue to taunt me with bizarre little dangling objects. They dine lavishly on fresh meat, while the other inmates and I are fed hash or some sort of dry nuggets. Although I make my contempt for the rations perfectly clear, I nevertheless must eat something in order to keep up my strength. The only thing that keeps me going is my dream of escape. In an attempt to disgust them, I once again vomit on the carpet. Today I decapitated a mouse and dropped its headless body at their feet. I had hoped this would strike fear into their hearts, since it clearly demonstrates my capabilities. However, they merely made condescending comments about what a "good little hunter" I am. Bastards! There was some sort of assembly of their accomplices tonight. I was placed in solitary confinement for the duration of the event. However, I could hear the noises and smell the food. I overheard that my confinement was due to the power of "allergies." I must learn what this means, and how to use it to my advantage. Today I was almost successful in an attempt to assassinate one of my tormentors by weaving around his feet as he was walking. I must try this again tomorrow, but at the top of the stairs. I am convinced that the other prisoners here are flunkies and snitches. The dog receives special privileges. He is regularly released, and seems to be more than willing to return. He is obviously retarded. The bird must be an informant. I observe him communicate with the guards regularly. I am certain that he reports my every move. My captors have arranged protective custody for him in an elevated cell, so he is safe. For now ...

अतिशय प्रेरणादायी आत्मवृत्त. या मधे काही वैयक्तीक आणि कौटुंबिक छायाचित्रांची पेरणी केली असता या लेखनास अधिक बहार येईल असे सूचवावेसे वाटते. हे आत्मवृत्त वाचून त्यावर चित्रपट बनविण्याची प्रेरणा नक्कीच कुणाला ना कुणाला मिळेलच. त्या अगामी चित्रपटाला मिळणार्‍या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड साठी आणि ऑस्कर नॉमिनेशन साठी आगाउच अभिनंदन. शुभेच्छुक मनी.....षा

मिपावरती एकदाचे काहितरी वाचनीय आलेले बघून बरे वाटले. श्रावणात उंदीर वैग्रे न खाणारी आणि दर शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जाणारी ती हिच मांजर ना गं ? आता कोणीतरी बोक्याचे आत्मवृत्त पण लिहा.

एक लंबर . . . . . . . . . . .. .. . . .. . . . . भिकार लेख. भिकापाटील.