✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पैठणचा ताजमहाल

ड
डॉ अशोक कुलकर्णी यांनी
गुरुवार, 07/26/2012 - 15:07  ·  लेख
लेख
पैठणचा ताजमहाल ============== पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध. शासनानं जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी साडेदहा एकर जागा दवाखान्याच्या विस्तारासाठी राखून ठेवलेली. पण त्यासाठी आर्थिक तरतूद वैद्यकिय शिक्षण विभागानं करायची की आरोग्य खात्यानं या वादात प्रकरण ठप्प झालं होतं. मी या प्रकरणाचा अभ्यास केला आणि चार्ज घेतल्यापासून दीड वर्षातच जमीनीचा ताबा घेतला. ताबा घेतांनाच एक एकर जमिनीवर राजकीय पुढा-याच्या कृपेनं अतिक्रमण झालेलं असल्याचं आणि त्या सदगृहस्थानं तिथं एह गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतल्याचं निदर्शास आलं. गंमत म्हणजे हाच माणूस मला दवाखान्याचं विस्तारीकरण कां लांबतंय याची सतत विचारणा करायचा! आता पुढची स्टेप म्हणजे ताब्यात घेतलेल्या जमिनी वर बांधकामाचे प्रस्ताव तयार करून पाठवणे. यात थोडे नाही तर आठ एक वर्षे गेली. दरम्यान तिकडे दवाखाना जाणार म्हणून त्या भागातले जमिनीचे दर वाढले आणि ज्याची जमीन संपादित केली तो वाढीव मोबदला मिळावा म्हणून कोर्टात गेलेला! सुदैवाने त्यातूनही मार्ग निघाला. दरम्यान सरकारं आली, गेली, बदलली. आमदार बदलले. शेवटी एका आमदारानं मनावर घेतलं आणि बांधकामाचे प्रस्ताव तयार होवून अर्थसंकल्पात तरतूद झाली आणि आता प्रकल्प मार्गी लागेल असं चित्र निर्माण झालं. पण हे व्हायचं नव्हतं. मी माझ्या मित्रांबरोबर धरणाच्या बाजूला रोज फिरायला जात असे. एके दिवशी पहातो तो त्या जमिनीवर रातोरात झोपड्या उभारलेल्या. मी जावून चौकशी केली तेंव्हा गावातल्या आणखी एका वजनदार राजकारण्याचा त्यांना आशिर्वाद असल्याचं कळलं. त्यांना सरकारी जमिनी देण्याचं आणि काहीही कार्यवाही होणार नाही असं आश्वासन या महाभागानं दिलं होतं. काही दिवसांनी तालुका समन्वय समितीच्या बैठकीत सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेलं असूनही सरकारी दवाखान्यातले अधिकारी मात्र झोपा काढत आहेत असं म्हणून याच गृहस्थानं आकांड-तांडव सुद्धा केलं! मी त्या अतिक्रमण करणारांना नोटीसा द्यायचं ठरवलं तर ती मंडळी धड नावं सांगेनात.पण नोटीसा देणं तर आवश्यक होतं. शेवटी एक शक्कल लढवली. आमच्या मलेरिया कर्मचा-याला फीवर सर्व्हे करायला म्हणून पाठवलं तेंव्हा त्यांची नावं कळली. अपेक्षेप्रमाणे नोटीसा परत आल्या. दरम्यान ज्या आमदारांनी प्रयत्न करून सर्व प्रोजेक्ट मंजूर करून घेतला होता त्यांनी मंत्री महोदयांची गांठ घेतली आणि त्यांना भूमीपूजनाचं निमंत्रण देवून टाकलं आणि आपल्या पक्षाच्या आमदाराचं निमंत्रण सुद्धा मंत्री महोदयांनी स्विकारून टाकलं. मुहूर्त ठरला, स्वातंत्र्य दिनाचा (पंधरा ऑगष्ट) आणि ज्या जमिनीवर भूमिपूजन व्हायचं त्या जमिनीवर मात्र अतिक्रमण झालेलं! आमदार भूमिपूजन व्हावं म्हणून आग्रही. (निवडणूका जवळ आलेल्या ) तर अतिक्रमण वाल्यांना दुस-या वजनदार पुढा-याचा आशिर्वाद. मोठाच प्रश्न होता. मी दोन कर्मचा-यांना आणि पोलीसांना घेवून चौदा ऑगष्टला भूमीपूजन होणार तिथं गेलो आणि त्या लोकांना जमिन खाली करायची विनंती केली. तेव्ह्ड्यात एका दगड भिरभ्रत आला आणि माझ्या जवळच येवून पडला. पोलीस लाठीमाराच्या तयारीत होते, पण मीच थांबवलं. परत विनंती केली. पण सकारत्मक घडेल असं वाटेना. काही मंडळी भांडण व्हावं, प्रकरण विकोपाला जावं यासाठी प्रयत्न करताहेत असा मला संशय यायला लागला. तेव्हढ्यात एका झोपडीतून एक म्हातारा बाहेर आला. त्यानं डोळ्यावर हात घेवून मला निरखून पाहिलं आणि म्हणाला: "दाक्तर तुमी इथं? आन कशापाई?" आणि त्या माणसानं सगळा प्रश्न चूटकीसरशी सोडवला. झालं असं होतं की त्याची सून लग्नानंतर ब-याच दिवसांनी गरोदर राहिली होती. त्यानं खाजगी दवाखान्यात दाखवलं पण परवडेना म्हणून तो आमच्याकडे आला आणि त्याला मुलगा झाला. विशेष म्हणजे डिलीव्हरी माझ्या हातून झालेली आणि त्या रात्री मी दोन पर्यंत केवळ ह्या एका डिलीव्हरी साठी थांबून बाळंतपण केलं होतं. आणि आता त्याला परतफेड करायची संधी मिळाली होती. त्यानं सगळ्यांना समजावून सांगितलं. त्या सर्वांनी रातोरात दुसरी कडे जायचं कबूल केलं. मी पण जायकवाडी धरणावरच्या इंजिनीअरला विनंती करून त्यांना दोन-तीन ट्रक मिळवून दिल्या. त्या ट्रक मधून आपलं सामान घेवून ती भली माणसं आपला मोडका-तुडका संसार घेवून निघून गेली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझे ही डोळे ओलावले होते. भूमीपूजन समारंभ व्यवस्थित पार पडला. आमदारांनी आपल्या प्रयत्नानं हा दवाखाना होत असल्याचं आवर्जून सांगितलं. अतिक्रमणास प्रोत्साहन देणारे वजनदार पुढारी पण समारंभाला होते. त्यांनी पण जोरदार भाषण ठोकलं ! माझ्या डोळ्या समोर मात्र त्या वृद्ध गृहस्थाचं चित्र राहून राहून येत होतं. पैठणला आता तीस खाटांचं रूग्णालय त्या जागेवर उभं आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आणि द्न्यानेश्वर उद्यानाला लागून. . तुम्ही पैठणला गेलात तर धरण पहाल, उद्यान पहाल. उद्यानाला लागूनच असलेलं पैठणचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक गावाचं भूषण आहे. मात्र ताजमहालच्या प्रमाणेच या ठिकाणी पण हे सगळं होण्यासाठी काही गरीबांचे हातभार लागलेले आहेत हे मात्र मी विसरू म्हटलं तरी विसरू शकत नाही. -अशोक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नोकरी
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
5290 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अवघड आहे...

मन१
गुरुवार, 07/26/2012 - 15:23 नवीन
अवघड आहे....
  • Log in or register to post comments

पैठणला जायची वेळ येईल तेव्हा

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 07/26/2012 - 15:26 नवीन
पैठणला जायची वेळ येईल तेव्हा हा लेख निश्चितच आठवेल व हे इस्पितळ पहाण्यात येईल.....
  • Log in or register to post comments

+१

जाई.
गुरुवार, 07/26/2012 - 15:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जयंतराव... नक्की जा !

डॉ अशोक कुलकर्णी
गुरुवार, 07/26/2012 - 15:30 नवीन
जयंतराव... नक्की जा ! ज्ञानेश्वर उद्यानाला लागूनच हे प्रशिक्षण केंद्र आहे !
  • Log in or register to post comments

हा लेख पूर्वी येवून गेलेला

विजुभाऊ
गुरुवार, 07/26/2012 - 15:33 नवीन
हा लेख पूर्वी येवून गेलेला आहे डॉक्टर. तुम्हीच लिहिला होतात
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
गुरुवार, 07/26/2012 - 16:31 नवीन
आमची विस्मरणशक्ती एवढी चांगली नाही.....! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजू भाऊ "माझे लेखन" यात हा

डॉ अशोक कुलकर्णी
गुरुवार, 07/26/2012 - 19:33 नवीन
विजू भाऊ "माझे लेखन" यात हा लेख दिसला नाही, म्हणून टाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मला वाटते तुम्ही "मी मराठी"

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 07/26/2012 - 19:48 नवीन
मला वाटते तुम्ही "मी मराठी" वर टाकला होता. तिथे वाचला असेल विजुभाऊंनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ अशोक कुलकर्णी

मेंहेंदळे साहेब

डॉ अशोक कुलकर्णी
गुरुवार, 07/26/2012 - 22:36 नवीन
मेंहेंदळे साहेब....... अगदी बरोबर. मी-म वरच टाकला होता हा लेख आधी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

डॉक्टरसाहेबांचे अनुभव जबरा

बॅटमॅन
गुरुवार, 07/26/2012 - 15:37 नवीन
डॉक्टरसाहेबांचे अनुभव जबरा आहेत!!! लै भारी, मानलं तुम्हाला :) (अनुभवसमृद्धांचा कायमचा फ्यान) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

छान अनुभव!

पैसा
गुरुवार, 07/26/2012 - 16:07 नवीन
आणखी जरूर लिहा.
  • Log in or register to post comments

चांगले कर्म - डॉक्टर तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा !

चित्रेचा तारा
गुरुवार, 07/26/2012 - 16:22 नवीन
आपण आता कलियुगाच्या अंती पोहोचलो आहोत. काळ वैर्‍याचा आहे. सद्य स्थितीत चांगले काम करणे खूपच कठिण होऊन बसलेले आहे. पुढे काय होईल, कुणाचा अंतस्थ हेतू काय असेल हे समजणे फारच कठिण आहे. या अनुभवावरून हेच समजते कि चांगले कर्म करत राहा. भविष्यात तीच तुम्हाला वाचवतील. डॉक्टर तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मान गये डॉक्टर आप को

आनंद भातखंडे
गुरुवार, 07/26/2012 - 16:36 नवीन
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील आपण ज्या पद्धतीने दवाखान्यासाठी आणि त्याच्या जमिनीसाठी पाठपुरावा केलात तो खरंच स्तुत्य आहे. +१
  • Log in or register to post comments

वाचुन खुप छान

गणेशा
गुरुवार, 07/26/2012 - 19:30 नवीन
वाचुन खुप छान वाटले. दवाखाण्याच्या भिंतींवर नाव असण्यापेक्षा, त्याच दवाखाण्याच्या पायासाठी झटणार्‍या लोकांची किंमत खुप मोठी आहे आणि राहिल.... ते म्हतारे गृहस्थ आज असतील नसतील.. पण त्यांच्या एका निर्णयाने खुप काही पालटले.. योग्य निर्णय खुप काही छान करु शकतो ... राजकारण ही चांगले आहे पण सदसदविवेकबुद्धी वापरुन निर्णय घेणारेच आता तेथे टिकत नाहित ... असो .. त्या गृहस्थांना आणि तुमच्या टीमला अभिवादन
  • Log in or register to post comments

डॉक्टरकाका, मानलं तुम्हाला.

पिंगू
गुरुवार, 07/26/2012 - 19:55 नवीन
डॉक्टरकाका, मानलं तुम्हाला. इतकी वर्षे पाठपुरावा करुन योग्य काम करुन घेणे ही जिकीरीची गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष करुन दाखवल्याबद्दल सलाम...
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/27/2012 - 02:48 नवीन
रक्तहिन क्रांती....दुसरे काही म्हणताच येणार नाही. अभिनंदन आणि अर्थात अभिवादनही.
  • Log in or register to post comments

चिकाटीने प्रशिक्षण केंद्र

टुकुल
Fri, 07/27/2012 - 04:55 नवीन
चिकाटीने प्रशिक्षण केंद्र उभारुन घेतल. लेखातल्या बाकीच्या व्यक्ती इतरत: हि बर्‍याच असतील आणी त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे किती तरी अशी चांगली कामे अडकुन पडली असतील :-( --टुकुल
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Fri, 07/27/2012 - 05:18 नवीन
लेख आवडला. शैली आणि अनुभव दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण. वांग मराठवाडी धरणाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसणारा.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

इरसाल
Sat, 07/28/2012 - 09:19 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments

तुम्ही इतकी वर्ष चिकाटीने

शिल्पा ब
Sun, 07/29/2012 - 04:33 नवीन
तुम्ही इतकी वर्ष चिकाटीने प्रयत्न केला अन त्या म्हातार्‍या व्यक्तिने सुद्धा शेवटच्या क्षणी मोलाची मदत केली. दोन्ही कौतुकास्पद.
  • Log in or register to post comments

कधी कधी शब्द अपुरे वाटतात

स्पंदना
Mon, 07/30/2012 - 08:42 नवीन
कधी कधी शब्द अपुरे वाटतात डॉक्टर, खर सांगु त्या आग्र्याच्या ताजमहालला लाजवेल हा ताजमहाल अस अंगभुत सौंदर्य आहे याला.
  • Log in or register to post comments

इरसाल, शिल्पा आणि

डॉ अशोक कुलकर्णी
Sun, 08/05/2012 - 19:00 नवीन
इरसाल, शिल्पा आणि अपर्णा... धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त लेख डॉक्टरसाहेब... जिक

भडकमकर मास्तर
Mon, 08/06/2012 - 15:42 नवीन
मस्त लेख डॉक्टरसाहेब... जिक डे तिकडे सारखं सत्य / वास्तव वगैरे दु:खी करणारं वाचताना काही सकारात्मक वाचायला खरंव्च मजा येते...
  • Log in or register to post comments

सही !

डॉ अशोक कुलकर्णी
Mon, 08/06/2012 - 17:18 नवीन
सही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा