Skip to main content

ये कैसी चाल ???

लेखक अर्धवटराव यांनी शनिवार, 21/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चौसष्ट घरांच्या समरांगणी वजीर सर्वात उपद्व्यापी. तो सरळ, तिरका, कसाही चालेल. पण त्याला देखील मर्यादा आहेत. घोड्याप्रमाणे तो अडीच घरं चालु शकत नाहि. आमचे बारामतीकर काका या वजीराचे देखील बाप म्हणावे लागतील. सगळं काहि सुरळीत असताना शेवटच्या बॉलवर अच्यानक गुगली टाकावी आणि फलंदाज काहि कळायच्या आत बाद व्हावा असल्या भयंकर चाली आमचा राजा खेळतो. गेल्या दोन दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधुन बाहेर पडण्याच्या बातम्या येत होत्या. आजतर "सकाळ" वर राजीनाम्याची बातमी अधिकृतरित्या पब्लीश झाली. निमीत्त होतं मंत्रीमंडळातील दुसर्‍या स्थानाच्या वादाचं. पवारांना म्हणे प्रणवदादा गेल्यानंतर मंत्रीमंडळात ते स्थान हवं होतं... पण ते गेलं मॅड्ड्मच्या लाडक्या अँटोनी कडे. पवारांनी तडक आपला राजीनामा सादर केला. कारण दिलय कि पक्षबांधणी करता वेळ द्यायचा आहे. सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे म्हणे. अर्थात, हि सर्व वरवरची कारणे. असली गोम काय असावी ? पाटबंधारे विभागावर महाराष्ट्र सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे... ते प्रकरण दाबायला हे दबाव तंत्र असावे असा एक युक्तीवाद आहे. पण एव्हढ्या क्षुल्लक कारणासाठी हा चाणक्य राजीनाम्याचे अस्त्र खचितच उपसणार नाहि. राहुलबाबा सरकारात मोठी भुमीका वठवण्याची तयारी करताहेत. दिल्ली त्यासाठी सज्ज होतेय. एक मेजर गेअर शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा मुहुर्त काढुन पवारांनी हि चाल केली असावी काय? २०१४ ला प्रधानमंत्री पदाची शेवटची संधी साधायला तिसर्‍या मोर्च्याची तयारी म्हणुन तर हे सर्व चाललं नसेल?? काहिही असो. आपण हा खेळ कौतुकाने बघत राहावा हेच बरे.

वाचने 4440
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

कसला माचो आणि कसला चाणक्य? ५४५ पैकी फक्त ९ खासदार हे निश्चितच चाणक्यगिरीचे लक्षण नव्हे. हे सगळे थैल्यांचे राजकारण असते.बाकी सगळे दाखवायचे दात असतात.

In reply to by चिरोटा

अगदी बरोबर! एकेकाळी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणार्याला, आज पंतप्रधानांच्या शेजारच्या खुर्चीसाठी लाचार व्हावं लागतंय! स्वकर्तुत्वाने कमावलेल्या दगाबाज प्रतिमेचं हे फळ आहे. काही दशकं राजकारणात राहून स्वतःच्या राज्यात वीज - पाण्यासारख्या सुविधांची बोंब असूनही त्याबाबत काहीही करू न शकणार्या नाकर्त्या राजकारण्याला केवळ राजकीय कुरघोड्यांबद्दल "चाणक्य" वगैरे संबोधणं हास्यास्पद आहे.

In reply to by श्रीरंग

एकेकाळी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणार्याला, आज पंतप्रधानांच्या शेजारच्या खुर्चीसाठी लाचार व्हावं लागतंय!
शरद पवारांनी मार्च-एप्रिल १९९७ मध्ये सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला तेव्हा त्यांच्याविरूध्द बंड करायला हवे होते.त्यावेळी सोनियाही सक्रीय राजकारणात आलेल्या नव्हत्या आणि पवारांनी त्यावेळी बंड केले असते तर १४५ पैकी बहुसंख्य खासदार केसरींना सोडून त्यांच्याबरोबर आले असते असे म्हणायला वाव आहे. (चाचा केसरींना कोण विचारत होतं?त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका काँग्रेसने लढविल्या असत्या तर पक्षाचे बळ लोकसभेत दोन आकड्यावर आले असते हे नक्कीच) अशावेळी त्यांना काँग्रेसचे नेतृत्वपद अगदी अलगद मिळाले असते आणि कदाचित नंतर पंतप्रधानपदही. पवारांची ती हुकलेली संधी होती असे मला वाटते.

In reply to by क्लिंटन

१४५ खासदार काँग्रेस सोडून पवारांबरोबर गेले असते? पैशाच्या जोरावर वाटेल ते घडू शकते हे मान्य केले तरी ही शक्यता खूप कमी वाटते.

In reply to by चिरोटा

१४५ खासदार काँग्रेस सोडून पवारांबरोबर गेले असते?
यातील बहुसंख्य खासदार पवारांबरोबर गेले असते असे मला म्हणायचे आहे. आणि ते पवारांबरोबर--not necessarily काँग्रेस सोडून. काँग्रेस वाल्यांचा एक गुण आहे आणि तो इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी घेण्यासारखा आहे. इतर वेळी ते एकमेकांशी अगदी भांड भांड भांडतील. पण आपले राजकीय भवितव्य अंधारात आहे असे वाटले तर मात्र ते आपले अस्तित्व जपण्यासाठी योग्य ती पावले उचलतात. १९९७ मध्ये देवेगौडा सरकारचा पाठिंबा केसरींनी (मुद्दामून केसरींनी लिहित आहे-- काँग्रेसने नव्हे) काढून घेतल्यानंतर मध्यावधी निवडणुका व्हायची शक्यता होतीच. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याही नव्हत्या (त्या नंतर मे १९९७ मध्ये झाल्या). चाचा केसरींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या असत्या तर पक्षाचे काय झाले असते हे वेगळे सांगायला नको. त्या काळी चाचांविरूध्द बंड करायची क्षमता असलेले नेते होते पवार/ माधवराव शिंदे आणि काही प्रमाणात राजेश पायलट. त्यापैकी पवारांइतकी ताकद इतर दोघांमध्ये नव्हती. मला असे वाटते की तेव्हा काँग्रेस खासदार चाचांना आव्हान देत असलेल्या नेत्याची वाट बघत होते आणि नेमके तेच नेतृत्व उभे राहिले नाही. पुढे गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर निवडणुका होणार हे नक्की झाले आणि सोनिया राजकारणात उतरणार हे जाहिर करण्यापूर्वी (परत काँग्रेसचे भवितव्य केसरींच्या नेतृत्वाखाली अंधकारमय आहे हे लक्षात येताच) पी.रंगराजन कुमारमंगलम, अस्लम शेरखान, अब्रार अहमद आणि इतर काही नेते काँग्रेस सोडून सरळ भाजपवासी झाले होते.यात कोणी मोठा मासा नव्हता पण सोनिया राजकारणात येणार म्हटल्यावर exodus थांबला. गुजराल सरकार पडल्यानंतर भाजपने काँग्रेस खासदार फोडून सत्तेत यायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी "कितने आदमी थे" या प्रश्नावर अडवाणींचे "चालिस थे लेकिन नौ कम पड गये" हे उत्तर प्रसिध्दच आहे. जर काँग्रेस सोडून ४० खासदार भाजपवासी व्हायला तयार होते तर त्यापेक्षा जास्त खासदार केसरींना सोडून पवारांबरोबर गेले असते हे म्हणायला वाव आहे असे मला वाटते. पुढे मार्च १९९८ मध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सगळे काँग्रेस नेते केसरींना सोडून १० जनपथ ला सोनियांना साकडे घालायला गेले होते.चाचांबरोबर अगदी एकही खासदार राहिला नाही. अगदी तसाच प्रकार नाही तरी बहुसंख्य खासदार चाचांना सोडून पवारांबरोबर या घटनेच्या एक वर्ष आधी-- एप्रिल १९९७ मध्ये झाला असता असे म्हणायला वाव आहे असे मला वाटते. सोनिया राजकारणात आल्यानंतर पवारांचा मात्र पत्ता कटला.

राजकारणातला एक जबरदस्त मॅन्युप्युलेटर म्हणजे शरदचंद्र पवार. कधी कोणाला कसा धोबीपछाड टाकतील ह्याचा अंदाज येणे मुश्कील ही नही नामुंकीन हॆ. -(राष्ट्रवादी) सोकाजी

जरा दम धरा अजुन सगळे पत्ते दाखवले नाहीयेत साहेबांनी. सगळे पत्ते पाहिल्यावर कळेल कि हे नक्कि काय आहे... लै बेरकी हाय त्यो...

क्रिकेट बास आता आपण पत्त्यान्चा खेळ बघू. यान्चा खेळ होतो. जीव जनतेचा जातो.

काल कुठेतरी वाचलं : "आयुष्यभर दोन नंबरचे धंदे करणार्‍यांना दोन नंबरची जागा मिळाली नाही तर राग नाही येणार तर काय !"

हा माणूस मराठी असल्याची खंत वाटते
गैर समज आहे. १. याला माणूस म्हणणे म्हणजे माणूस जातीचा अपमान आहे. तरस, गिधाड वगैरे जमातीचा हा मानवी आविष्कार समजायला हरकत नाही. २. हा प्राणी मराठी नाही. मराठी माणसाची कोणतीही लक्षणे याच्यात नाहीत (प्रामाणिकपणा वगैरे). वेळ पडल्यास मराठी लोकांना तर सोडाच, पण स्वतः च्या घरच्यांना पण हा गहाण ठेवेल.

In reply to by काळा पहाड

तरस आणि गिधाड यांच्या जमातीस खालच्या दर्जाची शिवी दिल्याचा निषेध.. ( या जातीयवादाचा पण निषेध !!) :) बादवे मराठी माणूस प्रामाणिक असतो असे म्हणायला काही विदा आहे का ?

In reply to by अस्वस्थामा

बादवे मराठी माणूस प्रामाणिक असतो असे म्हणायला काही विदा आहे का ?
मराठी माणूस नाइलाजानेच प्रामाणिक असतो. व्यवसायात गुजराथी, सरकारी नोकरीत युपी बिहार वाले/तामिळ, उद्योगात पंजाबी, शेतीत पंजाबी/हरयाणवी/युपी वाले आपल्याला भारी पडतात. आपण अ-प्रामाणिक होणार तर कशात?

In reply to by काळा पहाड

म्हणजे उद्योग/व्यवसाय करायला अप्रामाणिकपणा लागतो हे गृहीतक एकदा धरले की आपल्या नाकर्ते पणाचे खापर आपल्या तथाकथित प्रामाणिकपणावर फोडायला आपण मोकळे. मराठी माणूस पण इतरांसारखाच अप्रामाणिक आहे. पण मुळातच आळशी (किंवा लघुत्त्वाकांक्षी म्हणा हवे तर) असल्याने तिथेही आपण फार पुढे जात नाही. उगाच आपली पाठ थोपटून घेण्यात काय हशील ?

In reply to by काळा पहाड

एका वयस्कर (वय ७०च्या आसपास ), राजकारणी (आहेतच), अनुभवी (आहेतच), स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला ( एकही एफ आय आर/ चौकशी नाही ) असे बोलले गेलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. असो.

In reply to by प्यारे१

अगदी खरं आहे. एका कनवाळू (तटकरेंसारख्या निरागस निष्पाप भाबड्याचा जाहीर कैवार घेणारे.) निष्कलंक (तो तेलगी लुच्चा आहे. नार्को टेस्टमध्येही खोटं बोलला.) जाणत्या राजाला (फ्लेक्सवर लिहिलं म्हणजे खरंच असणार) असे बोलले गेलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. असो.

अखेर साहेबांनी तलवार म्यान केली. तसंही वार करायला ति उपसली नव्हतीच. साहेबांच्या बाबतीत असं म्हणतात कि त्यांना वार करायचा असतो तेंव्हा मरणार्‍याला कळत देखील नाहि कि "हाईट उपरसे ४ इंच छोटी" कधी झाली... मग या नाट्याचा काय उपयोग झाला? साहेबांनी आपल्या उपद्रव मुल्याची जस्ट एक चाचपणी तर केली नसेल ? आपल्या बाजुने किती व कोण उभं ठाकतं याचा अंदाज घ्यायला म्हणुन ... आता यु पी ए पातळीवर एक समन्वय समिती स्थापन झाली. सरकारचे निर्णय समन्वय समितीने पास केले म्हणजेच त्या निर्णयांचं क्रेडीट या समितीकडे जाणार... राहुलबाबा सरकारात समील होऊन मोठी जवाबदारी पाडायला तयार आहेत. त्यांची इमेज बनवायला सरकार काहि मोठे निर्णय घेईल व त्याचे क्रेडीट राहुलबाबाला दिले जाईल. त्या क्रेडीटमध्ये वाटेकरी व्हायचा मार्ग म्हणजे हि समन्वय समिती, असं तर नसेल? म्हणजे यदाकदाचीत जनतेच्या पदरी काहि चांगलं पडलच तर ते एकट्या युवराजांनी नाहि तर समस्त समितीने केलेलं कार्य आहे... त्यातल्या त्यात आमच्या साहेबांनी... असं काहि गणीत तर नसावं... असो. नांदा सौख्यभरे. अर्धवटराव