✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काल

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 07/16/2012 - 00:10  ·  लेख
लेख
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही. वेळ वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. `काल' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न. ____________________ या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्‍याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. कालरहितता हा सिद्धत्वाचा गुणविषेश मानला गेलाय आणि कालमुक्तीला असाधारण महत्त्व आहे. इटर्निटी जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही. ___________________ अस्तित्वात प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांचा कालावधी मोजण्यासाठी आपण काल हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कालाचा सतत वापर करतो त्यामुळे काल वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये. ______________________ वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो. वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी वेळ गाठताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो. वेळ कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात. ________________________ वेळ भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: `कालाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अकाल आहोत! ज्याला काल भास आहे हे कळलं त्याच्यावर कालात घडणार्‍या घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो. शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की `वय' शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि उत्तररंग देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू! शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, शारीरिक वयाचा आपल्यावर चित्तस्थितीवर परिणाम होत नाही. _______________________ वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणार्‍या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो, साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे. वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशावरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते. ____________________ कालरहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, वेळेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं. अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही. टाईम फ्रस्टेट करणारा अवकाश परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च अवकाश होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय! _____________________ पैसा निदान कल्पना तरी आहे पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा. जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है! जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्‍याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
41254 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

`काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 22:01 नवीन
http://www.misalpav.com/node/22262#comment-413300 अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात...

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 12:31 नवीन
पैसा आणि आयुष्य, बालवत जगणं आणि स्मृती इतक्या विविध विषयावर तुम्ही एकाच वेळी कल्ला केलात..... सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... त्यांचे तुकडे पाडून विचार करण्यातूनच उलट गोंधळ उद्भवतात.
  • Log in or register to post comments

सर,सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात हे मंजूर आहे

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 13:08 नवीन
पण त्याचाच व्यत्यास म्हणून दुसरी गोष्ट तितकीच निर्विवाद आहे की एक उलगडा होऊ द्या, बाकीचे उलगडे आपसूक होतील. इतका साधा विचार करुन पाहा : रोजच्या जगण्यात वेळेचं दडपण आहे की नाही ? आणि वेळ हा निव्वळ भास आहे या अनुभवानं ते दूर होईल की नाही ? हे दडपण दूर झाल्यावर जे स्वास्थ्य येईल त्यातनं उत्साह येईल, त्यातनं बालवत (किंवा स्पाँटेनियस) जगणं शक्य होईल आणि स्मृतीसंयोजन सुविहित होईल. जे लिहिलय ते जगून लिहिलय त्यामुळे सर्व लेखात एकसमान धागा आहे, तुम्हाला एक उकल झाली की इतर गोष्टीही आपोआप कळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

एक डाव धोबीपछाड

चैतन्य दीक्षित
Tue, 07/17/2012 - 12:40 नवीन
या सिनेमातला एक प्रसंग या लेखाच्या निमित्ताने आठवला इतकेच.. काल आपण काळ शिकलो (सुबोध भावे) काळ आपण काल शिकलो (अशोक सराफ) दादा, काल आप्ण काळ शिकलो (सुबोध भावे) तेच तर मी म्हन्तोय ना. कालच तर आपण काळ शिकलो ना? (अशोक सराफ) :):)
  • Log in or register to post comments

कालपर्यंत आपण काल शिकलो, आणि काल आहे या मान्यतेत जगलो

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 13:26 नवीन
आज आपण काल नाही हे शिकतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

हे सारं कशासाठी?

Dhananjay Borgaonkar
Tue, 07/17/2012 - 15:46 नवीन
टाइम आणि स्पेसबद्दलची जाणीव प्रगत झाल्यानेच माणूस जनावरांपेक्षा वेगळा ठरला. यातून थोडाफार तणाव येणारच. त्याचे समायोजन करायचे सोडून हा उलटा प्रवास कशासाठी?
  • Log in or register to post comments

काल भास आहे की सत्य

आत्मशून्य
Tue, 07/17/2012 - 18:06 नवीन
काल भास आहे की सत्य यापेक्षाही त्यामुळे आपल्याला ज्या भौतीक मर्यादा येतात त्या जर बदलत नसतील तर काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? समजा एखाद्या मुलाला परीक्षेला अभ्यास करायला दोन महीने लागतात जे त्याला काही कारणाने मिळाले नाहीयेत म्हणुन मार्क कमी पडले आहेत. आता याक्षणी त्याच्या लक्षात आलं की काळ हा भास आहे तर तो त्याला पडलेले मार्क बदलु शकणार आहे काय ? हेच जर त्याला आधीच्या काळात २ महीने वेळ अभ्यासाला मिळाला असता तर मात्र त्याची तयारी नक्किच पुर्ण झाली असती. थोडक्यात काळाने एकदा परीणाम साधला (तो साधला जातोच) की तो भास होता की न्हवता याने कोणताही फरक साध्या भौतीक गोश्टीत पडत नाही तर एखाद्या काल्पनीक हुच्च अध्यात्मीक अवस्थेची बातच नको ? नाही का ?
  • Log in or register to post comments

खरंय!

राघव
गुरुवार, 07/19/2012 - 18:06 नवीन
काल भास आहे की सत्य यापेक्षाही त्यामुळे आपल्याला ज्या भौतीक मर्यादा येतात त्या जर बदलत नसतील तर काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? खरंय! ही सगळी चर्चाच रोचक आहे. :) काही मूलभूत प्रश्न पडतात ही सगळी चर्चा वाचून. - समजणे अन् उमजणे यातला फरक इथं लागू पडणार नाही का? - कालज्जयी या शब्दाचा शब्दशः अर्थ काळावर ज्यानं विजय मिळवला आहे असा होतो. तोच अर्थ अभिप्रेत आहे असे मला वाटत नाही. कालरहितता जाणणं हे काळाकडे दुर्लक्ष करण्यामुळे साध्य होणार नाही. खरोखर कुणी ठरवून कालज्जयी होऊ शकतो का? - व्यवहारात राहून व्यवहार विसरणं [म्हणजे दुर्लक्ष करणे नाही] ही भौतिक पातळी की अध्यात्मिक? एकत्रितपणे "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" हे सांगणं अन् असं टप्प्याटप्प्यानं हे सर्व फोल आहे असं सांगणं यातला हेतू म्हणजे, सगळयांना समजेल अशा भाषेत सांगणं आहे; हे मी गृहित धरतो. पण हे सर्व फोल आहे हे मान्य करून सुद्धा सर्वसाधारण आयुष्यात काही विशेष फरक पडत नाही. त्याचं कारण आपल्याला ते उमजत नाही हे होय. आता प्रत्येक वस्तू, विचार म्हणजे भास आहे हे पटवून घेत बसण्यापेक्षा जे सत्य त्याचीच अनुभूती घेण्याची इच्छा बाळगणं हे जास्त सोपं आहे, नाही? जे सत्य त्याची अनुभूती आली तर बाकी मिथ्य हे समजून घ्यायची गरजच पडणार नाही असं वाटतं. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

@ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 22:18 नवीन
माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे उगीच काही तरी फँटॅस्टिक होईल आणि कुणी काही आधिभौतिक चमत्कार घडवेल असा नाहीये, खरं तर अशा कल्पनेनच अध्यात्म बदनाम झालय. तुमचा प्रश्नये : काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? = तुम्हालाच काय प्रत्येकाला आपलं आयुष्य `जन्म ते मृत्यू' या कालावधित बद्ध वाटत नाही काय? ते एक सोडा, वेळेचं रोजच्या जगण्यात टेंशन आहे हे कुणी नाकारु शकेल का? जर कालातीतता जाणली तर या कालात घडणार्‍या घटनांनी आपण अबाधित होतो, वेळेप्रती आपण निर्धास्त होतो (आणि तरीही बहुदा त्याचमुळे सगळं वेळेत करतो!) >कालरहितता जाणणं हे काळाकडे दुर्लक्ष करण्यामुळे साध्य होणार नाही. = तेच तर सांगतोय, तुम्ही काल `इफेक्टीवली मॅनेज करु शकता' कारण तो भास आहे हे जाणल्यावर त्याचं मनावरचं दडपण शून्य होतं. >पण हे सर्व फोल आहे हे मान्य करून सुद्धा सर्वसाधारण आयुष्यात काही विशेष फरक पडत नाही.... = कृपया हा गैरसमज संपूर्णपणे काढून टाका, मी अध्यात्माला जीवन सोपं आणि आनंदी करणारं शास्त्र मानतो आणि माझं स्वतःचं आयुष्यावर सॉलिड प्रेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

@राधव = तेच तर सांगतोय, तुम्ही काल

आत्मशून्य
गुरुवार, 07/19/2012 - 23:00 नवीन
= तेच तर सांगतोय, तुम्ही काल `इफेक्टीवली मॅनेज करु शकता' कारण तो भास आहे हे जाणल्यावर त्याचं मनावरचं दडपण शून्य होतं.
मला सांगा मनावर कालाचं दडपण असतं हा जावैशोध शोध कोणी लावला ? मुळातच मनावर प्रक्रियेचं दडपण असतं कालाचं न्हवे. उदा... अवघड पेपर आहे अथवा उशीर केला तर लोकल सुटेल मग ती सकाळी ११ वाजताची लोकल असो की रात्री ७.३० वाजताची लोकल असो. लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं, ती चुकण्याचा "काल" सकाळ, दुपार, संध्याकाळ, भुतकाळ , वर्तमान काळ अथवा भविष्यकाळ किव्हा अगदी १,२.३ पासुन ते ११,१२ असा कोणताही असो फरक पडत नाही कारण मनावर कालाचं न्हवे प्रक्रियेचं दडपण असतं ही बेसीक गोश्ट राधव साहेब जरा संजय सरांना समजवाल काय ? स्वतःला असलेला अनावश्यक फोबीया पकडुन त्यावर मात करायची व हाच जगदोध्दाराचा मार्ग आहे आहे असं सर्व लोक विरोध करत असताना ठासुन सांगायचे म्हणजे काय ? मुळातच तुम्हाला काय म्हणायचय हेच संजय सरांनी तुमचा प्रतीसादात नीट लक्ष देउन वाचलेले नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं?

संजय क्षीरसागर
Fri, 07/20/2012 - 00:11 नवीन
लोकल चुकेल ही प्रक्रिया वेळेशी संबधित आहे म्हणून दडपण आहे, जर मला कोणतीही लोकल चालणार असेल तर दडपण कसं येईल? साधं स्टेशनपर्यंत चालणं देखील मजेचं होईल. जिथे जिथे कालशून्यता आहे तिथे तिथे आनंद आहे आणि त्या स्थितीतली प्रत्येक प्रक्रिया स्वच्छंद आहे. मला फोबीया वगैरे काही नाही तुम्ही तुमचा फंडा गंडलाय का ते पाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

कोणतीही लोकल चालणार असेल तर दडपण कसं येईल?

चित्रगुप्त
Fri, 07/20/2012 - 01:38 नवीन
कोणतीही लोकल तेंव्हाच चालणार असते, जेंव्हा गंमत म्हणून फिरायला वगैरे जायचे असते, तेंव्हा तसेही दडपण नसतेच. विमानाची, मीटींगची, ऑफिसची, डॉक्टरच्या भेटीची इ. ठरलेली वेळ गाठायला कोणातीही लोकल चालत नसते, हे उघड आहे. एकाद्या स्वच्छंद, पोटासाठी अमूकच वेळी अमूकच करायचे बंधन नसलेल्या वा रिटायर्ड वगैरे असलेल्यासाठी कोणतीही लोकल गाठली, किंवा न गाठता घरी येऊन निवांत झोपले, तरी चालेल. सर्वांनाच हे कसे शक्य आहे? यावर तुम्ही म्हणाल, करून तर पहा वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे

राघव
Fri, 07/20/2012 - 02:46 नवीन
माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे उगीच काही तरी फँटॅस्टिक होईल आणि कुणी काही आधिभौतिक चमत्कार घडवेल असा नाहीये, खरं तर अशा कल्पनेनच अध्यात्म बदनाम झालय. माझीही अध्यात्माबद्दल अशी काही चुकीची धारणा नाही आणि अध्यात्म या शब्दाला बदनाम करण्यात मला काहीही रस नाही. मला काय म्हणायचं आहे याचा काहीही विचार न करता तुम्ही दिलेली ही प्रतिक्रिया आहे. असो. जे समोर येतंय ते शक्य तेवढ्या आनंदानं, चागल्यानं जगावं हे साधं, सरळ तत्त्वज्ञान तुम्ही मांडता आहात अन् त्यासाठी काही उपाय, जे तुम्ही आचरणात आणलेत ते सांगण्याचा प्रयत्न करता आहात. इथपर्यंत सर्व ठीक आहेच. पण त्यापलीकडे जाऊन तुम्ही त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतांना चुकीची गोष्ट मांडत आहात. या लेखा संदर्भानं मला इतकंच म्हणायचं आहे की असं ठरवून तुम्ही कालातीत/कालरहित अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जसं बाल्यावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था अन् वृद्धावस्था या सर्व अवस्था जगतांना आपोआप प्राप्त होत असतात.. ठरवून त्या प्राप्त करून घेता येत नाहीत.. तस्सं. सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. तुम्ही म्हणता आहात ते काळाकडं दुर्लक्ष करणं आहे, त्याचा विसर पडणं आहे. त्यानं काळजी थोडी कमी होऊन जगणं सुखकर होईल हे मान्य. पण यास कालातीत/कालरहित अवस्था म्हणणं अयोग्य आहे. आणिक काय अन् कसं सांगणार. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुंदर !!

अर्धवटराव
Fri, 07/20/2012 - 03:25 नवीन
>>सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. __/\__ अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

@राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं

संजय क्षीरसागर
Fri, 07/20/2012 - 13:14 नवीन
मी सत्य आणखी दहा प्रकारे मांडू शकतो पण जिथे `काल हा भास आहे' इतकी साधी गोष्ट मंजूर होत नाही तिथे अद्वैतावर बोलून कसा उलगडा होईल आणि तो या लेखाचा विषयही नाही. >तुम्ही म्हणता आहात ते काळाकडं दुर्लक्ष करणं आहे, त्याचा विसर पडणं आहे. त्यानं काळजी थोडी कमी होऊन जगणं सुखकर होईल हे मान्य. पण यास कालातीत/कालरहित अवस्था म्हणणं अयोग्य आहे = मी काळ बेदखल करा असं कुठेही म्हटलेलं नाही तो भास आहे इतकं साधं विधान केलय आणि मी स्वतः कालात जगतोय आणि त्याची उपयोगीताही जाणतो हे तुम्ही लेख पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल. >सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. = हा उलगडा तुम्हाला झाला असता तर कालातीततेचा बोधच अद्वैताचं दर्शन घडवतो हे तुमच्या लक्षात आलं असतं. कालातीतता आणि अद्वैत हे एकाच सत्याचे पैलू आहेत आणि ते `बाल्यावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था अन् वृद्धावस्था' असे क्रमिक प्राप्त होत नाहीत कारण सत्याची एक फार मोठी खुबी आहे, ते एकतर समजलं किंवा नाही समजलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

हे फक्त बुद्धीभेद करणं आहे,

राघव
Fri, 07/20/2012 - 13:55 नवीन
हे फक्त बुद्धीभेद करणं आहे, अजून काहीही नाही. असो. तुम्हाला काहीही सांगणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे हे कळाले. मी आपणांस तसदीदिल्याबद्दल क्षमस्व. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी सत्य आणखी दहा प्रकारे

बॅटमॅन
Fri, 07/20/2012 - 13:59 नवीन
मी सत्य आणखी दहा प्रकारे मांडू शकतो पण जिथे `काल हा भास आहे' इतकी साधी गोष्ट मंजूर होत नाही तिथे अद्वैतावर बोलून कसा उलगडा होईल आणि तो या लेखाचा विषयही नाही.
म्हणजे काहीही करून तुमचा मुद्दा पटलाच पाहिजे तर.कुठे गेला तो वैचारिक मोकळेपणा?
मी काळ बेदखल करा असं कुठेही म्हटलेलं नाही तो भास आहे इतकं साधं विधान केलय आणि मी स्वतः कालात जगतोय आणि त्याची उपयोगीताही जाणतो हे तुम्ही लेख पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल.
इथले बरेच प्रतिसाद आणि हे वरचे वाक्य यांत काही फरक नसताना निव्वळ "भास" या लेबलसाठी का अडून बसावे हेदेखील कलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बर्‍याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्‍या वाटतात...

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 18:44 नवीन
बर्‍याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्‍या वाटतात... त्या मिळाव्यात वा घडून याव्यात असेही वाटू लागते, पण त्यांचे "साईड इफेक्ट्स" त्या कालांतराने प्रत्यक्षात उतरल्यावरच कळतात...
  • Log in or register to post comments

आहो, वेळ भास आहे ही गोष्ट प्रत्यक्ष आचरणात आणायला काहीही धोका

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 20:34 नवीन
नाही कारण ती वस्तुस्थिती आहे. कोणत्याही धारणा मुक्तीमुळे काहीही धोका नाही, मी गेली वीस वर्ष घड्याळ वापरत नाही तरीही प्रत्येक काम डेडलाइन पूर्वी पूर्ण असतं आणि जगणं संपूर्ण स्वच्छंद आणि मुक्त झालय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

डेडलाईन..................?

जयंत कुलकर्णी
Wed, 07/18/2012 - 12:31 नवीन
डेडलाईन..................?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

घड्याळ न वापरणे

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 20:57 नवीन
कालजयी होण्याविषयी प्रत्यक्षात काय करावे, यातील एक गोष्ट सांगितलीत, ती म्हणजे "घड्याळ न वापरणे" आता बाकीच्याही सांगा की.
  • Log in or register to post comments

कालज्जयी आपण आहोतच!

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 21:36 नवीन
घड्याळ वापरणं सोडल्यानं मी कालज्जयी झालो नाही; त्या उलगड्यामुळे आयुष्यात झालेला हा बदल आहे. आता या अनुभवातून तुम्ही जगणं सुरु करा. दर वेळी `किती वाजले' हा रेफरन्स घेऊन जगणं सोडा, तुमच्या जगण्यात निवांतपणा येईल, तुमची जाणीव तीव्र होईल. देअर वील बी अ शिफ्ट फ्रॉम थॉट टू फिलींग, तुम्हाला नुसती भूक लागली इतकंच कळणार नाही तर काय खावं, किती खावं हे पण कळेल. वेळेचा रेफरन्स गेल्यानं तुमची झोप निवांत होईल, वेळ झाल्यावर उठण्याऐवजी झोप झाल्यावर तुम्ही उठाल. सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `वेळ भास आहे' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात यायला हवा मग प्रगती इरिवर्सिबल होते, यू मूव युनिडिरेक्शनल! तुमच्या लक्षात येतय? इथले विवादी प्रतिसाद मूळ सिद्धांताचा (काल भास आहे) प्रतिवाद करत नाहीयेत (कारण ती उघड गोष्ट आहे) ते धारणेचं काय करायच? या विवंचनेतून येतायेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तुमच्या लक्षात येतय? इथले

आत्मशून्य
Tue, 07/17/2012 - 22:05 नवीन
तुमच्या लक्षात येतय? इथले विवादी प्रतिसाद मूळ सिद्धांताचा (काल भास आहे) प्रतिवाद करत नाहीयेत (कारण ती उघड गोष्ट आहे) ते धारणेचं काय करायच? या विवंचनेतून येतायेत
माझ्यापुरतं बोलाल तर मूळ सिद्धांताचा मला प्रतिवाद करायचा नाही कारण त्यावर चर्चेत तुम्ही पळ काढाल असं गृहीत धरत आहे, तुमची इच्छा असल्यास काळ हा भास न्हवे हे सप्रमाण सिध्द करणेत येइल. फक्त तुमची तयारी हवी , कारण सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `वेळ हा भास न्हवे' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात यायला हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन राइट डिरेक्शन. अवांतर :- इतकचं काय सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `तुमचं एलियन्सनी अपहरण केलं होतं' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन युनीडिरेक्शनल. आणी या जन्मात तुमचं एलियन्सनी कधीही अपहरण केलं न्हवतं ही भासमय धारणाही दुरं होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दर वेळी `किती वाजले'

चैतन्य दीक्षित
Tue, 07/17/2012 - 22:38 नवीन
दर वेळी `किती वाजले' हा रेफरन्स घेऊन जगणं सोडा, तुमच्या जगण्यात निवांतपणा येईल, तुमची जाणीव तीव्र होईल. मी गेले ४ दिवस 'किती वाजले' याचा विचार न करता हापिसात जातोय. ९ च्या ऐवजी ११/ १२ वगैरे. (राजिनामा दिलाय म्हणून एवढी मस्ती) पण तरीही बॉस काही माझ्या जीवनात निवांतपणा येऊ देई ना हो. रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या मेंबरची 'के.टी.' कशी चालू आहे? इ. प्रश्न रोज असतात... आणि असा उशिरा येत जाऊ नकोस वगैरे लेक्चर पण दिले आज.. आता उद्या त्याला हा तुमचा 'फंडा' सांगतो.. त्याला म्हणतो, अरे हे 'काल वगैरे सगळं झूठ आहे. कशाला उगाच त्रास करून घेतोस आणि माझ्याही डोक्याला करतोस? त्यापेक्षा तुझ्या जाणिवा तीव्र कर' बघूया असं म्हटल्याने माझा नोटिस पिरियड तरी कमी होतोय का ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काल

नितिन थत्ते
Tue, 07/17/2012 - 23:05 नवीन
तुम्ही हा लेख लिहिल्या"नंतर" लोकांनी प्रतिसाद दिले. आता हे आधी लिहिणे आणि नंतर प्रतिसाद येणे ही गोष्ट काल प्रत्यक्ष अस्तित्वात असल्याचे निदर्शक नाही का? की लोकांनी नंतर प्रतिसाद दिले हाच भास आहे. (लोकांनी प्रतिसाद दिल्यावर तुम्ही लेख लिहिला का)? आधी माझ्या डोक्यावरचे केस काळे होते आणि नंतर पांढरे झाले हा पण भासच आहे का?
  • Log in or register to post comments

प्रक्रिया भास नाहीये हो, ती वस्तुस्थिती आहे

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 23:30 नवीन
घटनाक्रम देखील वास्तविक आहे पण इतके वाजले, तितके वाजले असं काही होत नाहीये. केस पांढरे झालेत पण ते शरीराच वय झाल्यानं, आपलं नाही, आपण जसेच्या तसे आहोत. लेख लिहिण्यापूर्वीचा मी, लेख लिहिल्या नंतरचा मी आणि प्रतिसाद दिल्यावरचा मी सदैव एकसारखा आहे, हा `मी' तुमचा आणि माझा एकच आहे आणि त्याला काल भास आहे हे कळतय त्यामुळे तो कालातीत आहे. सर्व ज्ञानी लोकांनी वर्तमानात रहा असं सांगीतलय पण कालच नसेल तर वर्तमान तरी कुठेय? हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की कालरहितता ही एक अपरिवर्तनीय स्थिती आहे आणि ती स्थिती हेच आपलं स्वरुप आहे आपण त्या स्थितीपेक्षा वेगळे नाही त्यामुळे आपण देखील प्रत्येक घटनेनं, प्रक्रियेनं किंवा प्रसंगानं अनाबाधित आहोत. (चला, पहिला व्यवस्थित प्रश्न आला!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

:(

नितिन थत्ते
Wed, 07/18/2012 - 07:44 नवीन
>>घटनाक्रम देखील वास्तविक आहे पण इतके वाजले, तितके वाजले असं काही होत नाहीये. केस पांढरे झालेत पण ते शरीराच वय झाल्यानं, आपलं नाही, आपण जसेच्या तसे आहोत. जौंद्या. मी माझ्याविषयी बोलतो आहे. तुम्ही "मला ठाऊक नसलेल्या आणखी कुठल्यातरी माझ्या"विषयी बोलत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वीणा३

वीणा३
Wed, 07/18/2012 - 00:03 नवीन
"भूक लागली कि जेवा झोप आली कि झोपा" म्हंजे शरीराला भूक लागली कि जेवा आणि शरीराला झोपेची गरज वाटली कि झोपा, आणि हे सगळं शरीर हे एक भासच आहे हे गृहीत धरून करा. मला मागच्या हि लेखात वाटलं कि तुम्हाला सांगायचं कि आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा, जास्त काळजी चिंता करून नका, कशाचाच जास्ती विचार करू नका. पण तेच तुम्ही खूप मोठे मोठे शब्द वापरून सांगताय.
  • Log in or register to post comments

>आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 00:35 नवीन
जास्त काळजी चिंता करून नका, कशाचाच जास्ती विचार करू नका. पण तेच तुम्ही खूप मोठे मोठे शब्द वापरून सांगताय. = इतकं सोपं असतं सगळं तर मग काय बोलायच? >म्हंजे शरीराला भूक लागली कि जेवा आणि शरीराला झोपेची गरज वाटली कि झोपा, आणि हे सगळं शरीर हे एक भासच आहे हे गृहीत धरून करा. = शरीर भास नाहीये हो, आपल्याला आपण शरीर आहोत असं वाटतय हा भास आहे; पण ते कळणं दुर्लभ आहे (शरीर या लेखावरचे प्रतिसाद पाहा). सध्या वेळ खरी आहे की भास आहे यावर विवाद चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

त्याचं काय ए की जर काळ

शिल्पा ब
Wed, 07/18/2012 - 01:24 नवीन
त्याचं काय ए की जर काळ निर्माण न करता जर पृथ्वी किंवा इतर कोणताही ग्रह नुसतीच सुर्याभोवती फिरला तर मग मानवजातच नसेल अन त्यामुळे असे प्रश्न पडायला तुम्ही पण नसणार! कसं जमायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

"खरे" म्हणजे काय, आणि "भास" म्हणजे काय

चित्रगुप्त
Wed, 07/18/2012 - 00:38 नवीन
.................सध्या वेळ खरी आहे की भास आहे यावर विवाद चालू आहे.... आधी "खरे" म्हणजे काय, आणि "भास" म्हणजे काय, हे ठरवा.
  • Log in or register to post comments

वर्षातले उत्पन्न

नितिन थत्ते
Wed, 07/18/2012 - 07:56 नवीन
३१ जुलै हा "भासच" असल्याने आता मी इन्कम टॅक्सचे रिटर्न भरत नाही. "नंतर" इन्कम टॅक्सवाले माझ्याकडे जाब विचारायला आले की त्यांना "अहो कसली तारीख? कसले "वर्षातले" एकूण उत्पन्न? कसले प्रिव्हिअस इयर? कसले अ‍ॅसेसमेंट इयर? हे सगळे नुसते भास आहेत. तुमच्या काल आहे या खुळचट कल्पनेपायी तुम्ही केवढा फोलपटांचा डोलारा उभारला आहे?" असे सांगून पाहतो. शिवाय तुमचा लेखही वाचायला देतो. छान ऐड्या सांगितली बरं का तुम्ही. हे त्या इन्कम टॅक्सवाल्यांना पटलं तर तुमचा धंदाही बुडीत जाणार बहुतेक आमच्या "भविष्यकालात". :(
  • Log in or register to post comments

हीच तर मजाये ना!

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 08:50 नवीन
वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो हे तुम्ही लक्षातच घेतलेलं नाही! आणि मी स्वतः सीए असून ते तारतम्य असल्यानं "इन्कम टॅक्सवाले माझ्याकडे जाब विचारायला आले की त्यांना "अहो कसली तारीख? कसले "वर्षातले" एकूण उत्पन्न? कसले प्रिव्हिअस इयर? कसले अ‍ॅसेसमेंट इयर? हे सगळे नुसते भास आहेत. तुमच्या काल आहे या खुळचट कल्पनेपायी तुम्ही केवढा फोलपटांचा डोलारा उभारला आहे? असं मला सांगायला लागणार नाही, माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण असेल. इतक्या डेडलाइनवर मी कामही करतोय आणि उत्तरंही देतोय यातच सर्व येतय ना! याला मी स्वछंद जगणं म्हणतो आणि तो तुमच्या जीवनात यावं म्हणून लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण

आत्मशून्य
Wed, 07/18/2012 - 11:57 नवीन
माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण असेल. इतक्या डेडलाइनवर मी कामही करतोय आणि उत्तरंही देतोय यातच सर्व येतय ना! याला मी स्वछंद जगणं म्हणतो आणि तो तुमच्या जीवनात यावं म्हणून लिहितो.
तुम्ही स्वतः आता स्वतःच्याच विरुध्द मत व्यक्त करत आहात. काल तुम्ही मानत नाही पण एखाद्या कामाची डेडलाइन तुम्ही मानताय म्हणजेच कोणत ना कोणत युनीट व बंधन तुम्ही अजुनही मनात पकडुन आहात आणी डेडलाइनपुर्वी एखादे काम झाले पाहीजे हे ही तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजेच भलेही घ्ड्याळ तुम्ही वापरु नका पण समजा समोर टीव्हीवर चित्रपट सुरु आहे तर तो संपायच्या आत आमुक अमुक टास्क पुर्ण झाला पाहीजे हे तरी तुम्ही ठरवताच.... थोडक्यात तुम्ही कालमापनाचे काल्पनीक पण सुटसुटीत "युनीट" जे २४ तास आहोरात्र काटेकोर चालते पणं दुर्दैवाने काही कारणामुळे ज्याचा फोबीया/ट्रॉमा तुमच्या मनात लहानपणापासुन घर करुन बसल्याने त्याचा तुम्हाला फार त्रास झालाय इतका की जगणही मुश्कील वाटु लागलं , त्यापासुन सुटकेची काल्पनीक धडपड करुन इतर दुसर्‍या युनीटचा वापर करत आहात त्यामुळे तुम्हाला असं जगण्यात फार कंफर्टेबल वाटतय. जरुर करा तसं आपल्याला असलेल्या फोबीयावर इतर कोणाच्याही सल्ल्या शिवाय असं मात करता येणं अत्यंत कौतुकास्पद गोश्ट आहे . ज्या प्रकारे तुम्ही स्वत्तःच्या मानसीकतेच्या कमकुवत दुव्यावर नेमका अभ्यास करुन इतक्या सुरेखपणे मात करत आहात न्हवे तर त्याचा योग्य वापर करुन पॉझेटीव्ह रिझल्टही देत आहात (जर तुम्ही खरच वेळ पाळत नसाल तर) ते बघता मिपाकर म्हणुन मला तुमच्याबद्दल साहानुभुती न्हवे तर चक्क अभिमान आहे अगदीच ब्युटीफुल मांइड सारखा नाही पण एखादा मराठी विनोदी चित्रपट तुमच्या फिलोसॉफीवर नक्किच काढता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१. मस्त मुद्देसूद चिरफाड.

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 12:52 नवीन
+१. मस्त मुद्देसूद चिरफाड. काल, पैसा, इ. चे टेन्शन घेऊ नये इथपर्यंत ठीक, पुढचे सर्व बाल्डरडॅश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

+२

मन१
Sat, 08/11/2012 - 22:34 नवीन
ननिंनंतर हा दुसरा प्रतिसाद. पुरेसा, झेपेल इतपत तार्किक. मुद्देसूद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कालक्रमण आणि कालापव्यय

चित्रगुप्त
Wed, 07/18/2012 - 11:10 नवीन
काल म्हणजे काय, भास की सत्य, वगैरे काहीही माहित नसून, वा अश्या चर्चेत रस नसलेली माझी पत्नी दिवस भर अनेकानेक आवश्यक कामे, घरगुती व्यवहार इ.इ. समर्थपणे, प्रसन्नपणे पार पाडत असते, म्हणून मी मिपावर 'काल'क्रमण करू शकतो, हे मला दिसत आहे, आणि हे कालक्रमण हा 'कालापव्यय' आहे, असेही कधी कधी वाटू लागले आहे.... ब्रम्हसत्य... जगन्मिथ्या... 'मी' हा अनादि, अनंत, अविनाशी, अमर, अनाकलनीय, अतर्क्य, अविछिन्न, आत्मा आहे... साक्षीभाव आहे, विश्व चैतन्य आहे, अमूक आहे, तमूक आहे ... तो वस्त्र बदलावे, तसे देह बदलतो.... त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र भोक पाडू शकत नाही, त्याला कालाचे बंधन आही, इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. हे सर्व नीट जाणून घेतलेस, की अर्जुना,मग तुझी मजाच मजा आहे. हाच साक्षात्कार. हाच मोक्ष. हेच निर्वाण. हेच परमज्ञान. ... आणि हे धनुर्धर पार्था, हे परमगुह्य ज्ञान फक्त तुलाच मिपामुळे लाभत आहे. जय मिपा, जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments

सर पतंग तर लै वर नेला तुम्ही

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 11:49 नवीन
पण `ब्रम्हसत्य... जगन्मिथ्या' असं मी कुठेच म्हटलं नाहीये. मी सुद्धा संसार करतो, गॅस संपला की बुक करतो, घरच्यांना काय हवं नको ते बघतो, सध्या मामा हॉस्पिटलमधे आहे त्याची उद्या मेजर सर्जरी आहे त्यांच्या कुटुंबाला सपोर्ट करतो, लोकांची रिटर्न्स भरतो, इतक्या हॅपनींग लाईफमधे ब्रह्म देखील जाणलय आणि लेखनही करतो! मला जग आणि ब्रह्म दोन्ही सार्थ वाटतात आणि तीच खरी मजाये हे सांगायचा प्रयत्न करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काळाची भीती, टेन्शन घेऊ नका

नितिन थत्ते
Wed, 07/18/2012 - 12:02 नवीन
काळाची भीती, टेन्शन घेऊ नका हे तुमचे सांगणे ठीक आहे हो. उगाच काळ ही नुसती कल्पना आहे वगैरे नका सांगू.
  • Log in or register to post comments

आहो, काळ भास आहे हे नुसतं कळलं की भीती गेली!

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 12:35 नवीन
तो खरा वाटतोय म्हणून तर टेंशन आहे आणि तेच तर मी पहिल्यापासनं सांगतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः

सुधीर
Wed, 07/18/2012 - 12:54 नवीन
"..न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः.." - नासदीय सूक्त ऋग्वेद ...दिवस आणि रात्र ह्यातला फरक कळण्यास काही मार्ग नव्हता....'ब्रह्म सत्यम् जगन्मित्थ्या'. थोडक्यात काय, वेळच नाही तर सगळंच भासमान आहे असं आपलं प्राचिन तत्त्वज्ञान सांगते. खूप खोल विचार केल्यावर त्यात तत्थ्य असू शकतं असं वाटणंही स्वाभाविक आहे. तरी पण मला असं वाटतं, व्यवहारातल्या (भासमान जगातल्या) कुठल्याही कृती करताना सर्वात "शेवटी वा मागे" तत्त्वज्ञान असावं. तत्त्वज्ञानाला पुढे ठेऊन कृती करण्याचा विचार केला तर बरेच इनर कॉन्लिक्ट (अंतर्गत झगडे) निर्माण होतील. जर मला पहाटे ५ चं विमान पकडायचंय तर रात्री २ चा अलार्म लावलाच पाहिजे. अशा अवेळी उठण्याची मला सवय नाही. ३१ तारखेपर्यंत रिटर्न्स भरायचेत तर त्या कामाचं नियोजन मी अगोदर केलं पाहिजे. मग त्यासाठी साधी टू डू लिस्ट आणि अलार्म वापरा वा जी टी डी, पण वेळेचं नियोजन कराच. मग तत्वज्ञानाचा फायदा काय? स्वतःचं सांत्वन करण्यासाठी का? सुरुवाती सुरुवातीला कदाचित हो असंही उत्तर येईल. पण एवढं ते लिमिडेड नाही. हे तत्त्वज्ञान मेंदूत पक्क झालं तर भावनांवर विजय (कंट्रोलींग इमोशन्स) मिळवण्यास नक्की मदत होईल असं वाटतं. स्थितप्रज्ञ का काय म्हणतातना तेच ते. ज्या माणसाच्या आचरणात हे तत्वज्ञान भिनतं तो साधू होतो - शांत होतो, कर्तव्या-कर्तव्या मधल्या झगड्यातही कुठलीही द्विधा राहत नाही. याउलट फक्त डोक्यातच राहिलं तर वाद-विवाद करणारा पंडित होतो आणि आचरणात आणणं तितकंही सोपं नसावं.
  • Log in or register to post comments

जरा लांब प्रतिक्रीया देत आहे...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/18/2012 - 12:55 नवीन
पॄथ्वी पासुन दुर जाउन आपण फक्त कालाची परीमाणे बदलतो. पण कालाचे अस्तीत्व आपण बदलूशकत नाही. समजा उद्या आपण गुरुवर किंवा दुसर्‍या कोणत्या तरी ग्रहावर रहायला गेलो. म्हणजे आपण जास्त किंवा कमी जगणार आहोत का? किंवा आपल्या जगण्यात काही फरक होणार आहे का? (गुरुवर गेलात तरी इनकम टॅक्स रीटर्न भरावेच लागेल.) आपल्याला डोळ्यांनी दिसते, कानाने ऐकु येते, नाकाने वास घेता येतो, जिभेने चव कळते किंवा जसा स्पर्श करता येतो. ही सगळी किंवा या पैकी काही ज्ञानेंद्रीय वापरुन आपण जग कसे आहे याची कल्पना करत असतो. त्याच बरोबर स्मॄती नावाचे (वरदान किंवा शाप) जे काही आपल्या कडे असते त्या बरोबर आपण या अनुभवांची तुलना करुन त्याच्यावर प्रतिक्रिया देत असतो व या प्रतिक्रिया परत स्मॄती रुपाने साठवुन ठेवतो. भविष्यातील घटनांसाठी. जर आपण एखाद्या बालकाला शिकवले की झाडांचा रंग निळा असतो. तर तो त्या रंगाला निळे मानायला लागेल ज्याला आपण सगळे जण हिरवा म्हणतो. किंवा एखाद्या जन्मांधळ्या माणसाला जर आपणा सुर्योदयाचे वर्णन ऐकवले तरी ते त्याला कितपत समजेल? कारण प्रकाश त्याच्या साठी अस्तीत्वातच नसेल. हाच तर्क जर पुढे नेला तर सगळ्या जगाचे अस्तीत्व हे माझ्या जाणिवांच्या आधारावर आहे. मी आहे म्हणुनच जग आहे. मी नसतो तर जगही नसते. समजा आपली स्मॄती नाहीशी झाली तर आपल्या दॄष्टीने जगाचे अस्तीत्व संपले. मग या जगात काय घडते किंवा घडत नाही याच्याशी आपल्याला काहीही देणे घेणे रहात नाही. मग जगलो काय किंवा मेलो काय याने मला काहीही फरक पडणार नाही. म्हणजेच माझे जिवंत असणे हे माझ्या स्मॄतीवरच अवलंबुन आहे. (थत्ते चाचा आपल्या सगळया स्मॄती नष्ट करा मग इनकम टॅक्स रिटर्न नाही भरले तरी चालेल ) काल अस्तीत्वात आहे कारण माझ्या स्मॄती अस्तीत्वात आहेत. जर त्या बंद झाल्या तर कालही थांबेल / किंवा नष्ट होईल. पण जग भासमान आहे असे म्हणुन आपल्याला थांबता येईल का? तर नाही. आपल्याला असलेल्या मर्यादांच्या कक्षेत राहुन आपण जगा कडे पहात असतो. पण या जाणीवांच्या पलीकडेही काही जाणीवा कदाचीत अस्तीत्वात असतील. ज्याचा शोध कसा घ्यायचा हे आपल्याला ठाउक नसेल. समजा अशाच एखाद्या जाणीवेची भर आपल्या मधे पडली तर आपल्याला जगा कडे / स्वतः कडे पहायचा एक नवा दॄष्टीकोन मिळेल आणि मग आपण त्या नव्या प्रकाराने जग पहायला लागू. म्हणजे कसे ते सांगतो. आपण आईच्या पोटात होतो तेव्हा आपले जग काहीतरी वेगळे होते. पण बाहेर आल्यावर माझ्या जगात प्रकाश आला, गंध आला, चव आली आणि मग त्या नविन जाणीवेने मी जगाकडे पहायला लागलो. जग तेच होते माझ्या जाणीवा मात्र बदलल्या होत्या. एक महास्फोट झाला आणि जग निर्माण झाले. सुर्या पासुन पॄथ्वी तयार झाली. आणि पॄथ्वी पासुन आपण सगळे. म्हणजे हे जग जर एकाच गोष्टी पासुन तयार झाले असे आपण मानले तर जन्माला यायच्या आधिही मी अस्तीत्वात होतो आणि मेल्यावरही रहाणार आहे. फक्त माझी अस्तीत्वाची कल्पना बदलत जाणार आहे. मॄत्यु म्हणाजे कदाचीत हेच असेल. नव्या जाणिवांचे ज्ञान कदाचीत आपल्याला मेल्यावर होत असेल. अर्थात हे सगळे तर्कच आहेत माझ्या जाणिवांच्या आधारावर केलेले.
  • Log in or register to post comments

@सुधीर > हे तत्त्वज्ञान मेंदूत पक्क झालं तर

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 13:12 नवीन
भावनांवर विजय (कंट्रोलींग इमोशन्स) मिळवण्यास नक्की मदत होईल असं वाटतं. स्थितप्रज्ञ का काय म्हणतातना तेच ते. ज्या माणसाच्या आचरणात हे तत्वज्ञान भिनतं तो साधू होतो - शांत होतो, कर्तव्या-कर्तव्या मधल्या झगड्यातही कुठलीही द्विधा राहत नाही. याउलट फक्त डोक्यातच राहिलं तर वाद-विवाद करणारा पंडित होतो आणि आचरणात आणणं तितकंही सोपं नसावं. = आचरणात आणणं फक्त `पटण्याची पुढची पायरी आहे' कारण आपण वस्तुस्थितीच्या विपरित जात नाही, भासाला भास म्हणून जाणण्यात साहस ते काय? पण तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, तत्व नुसतं डोक्यात राहिलं तर चित्तदशा द्विधा होईल.
  • Log in or register to post comments

@पैजारबुवा,

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 13:25 नवीन
>पॄथ्वी पासुन दुर जाउन आपण फक्त कालाची परीमाणे बदलतो. पण कालाचे अस्तीत्व आपण बदलूशकत नाही = काल हा भास आहे कारण तो पृथ्वीच्या परिभ्रमणावर बेतलेला आहे, कालाची व्याप्ती कितीही झाली तरी मुळात काळाचं अस्तित्व असं काही नाही म्हणून तर `कालरहितता' महत्त्वाचीये. >काल अस्तीत्वात आहे कारण माझ्या स्मॄती अस्तीत्वात आहेत = नाही, माझ्या दृष्टीनं काल भासमान असून देखील माझी स्मृती उत्तम आहे. >पण जग भासमान आहे असे म्हणुन आपल्याला थांबता येईल का? = मी जग भासमान समजत नाही, काल भासमान आहे असं म्हणतोय >हे जग जर एकाच गोष्टी पासुन तयार झाले असे आपण मानले तर जन्माला यायच्या आधिही मी अस्तीत्वात होतो आणि मेल्यावरही रहाणार आहे. फक्त माझी अस्तीत्वाची कल्पना बदलत जाणार आहे. = येस, हा वेगळा विषय आहे त्यावर पुन्हा कधी तरी लिहिन
  • Log in or register to post comments

ह्म्म

सहज
Wed, 07/18/2012 - 13:32 नवीन
गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "भो राजा विक्रमा, अश्या तर्‍हेने साधुने नगरवासीयांना तणावमुक्त व्हायची गुरुकिल्ली देउन त्यांना आजन्म आपले ऋणी बनवले. आता ह्या ऋणातुन त्यांची मुक्ती कशी? म्हणजे संपूर्ण बंधनमुक्ती मिळाली नाहीच. व याचे आकलन होता नगरवासीयात पुन्हा तणाव आला. गुरुकिल्ली असुनही तणावमुक्ती नाही असे कसे?" तु उत्तर दिलेस तर मी निघालो पण ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असुन दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होउन तुझ्या पायाशी लोळू लागतील.
  • Log in or register to post comments

___/\___

प्यारे१
Wed, 07/18/2012 - 14:45 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

भो विक्रमा, नगरवासीयांना तणाव येण्याचं कारण ऋणमुक्ती नसून

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 14:59 नवीन
त्यांच्या अनेकानेक धारणांची सघनता आहे. `काल भास आहे' या एका धारणेतून मुक्ती झाल्यास पुढची दारे आपोआप उघडतील. संकेतस्थलावर ऋणमुक्त होण्याचा प्रश्न नसतो कारण कुणीकुणाचा अनुगृहित नसतो हे ऐकून सर्व नगरवासी शांत होतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काळ सोकावणे म्हणजे काय?

कवितानागेश
Wed, 07/18/2012 - 16:12 नवीन
काळ सोकावणे म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

आहो, जो अस्तित्वातच नाही तो सोकावेल कसा?

संजय क्षीरसागर
Wed, 07/18/2012 - 16:20 नवीन
ती उगीच आपली म्हण केलीये ज्यांना काल खरा वाटतो त्यांनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हाथ कंगन को आरसी क्या...

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 21:38 नवीन
ही चर्चा काळ सोकावण्याचं उत्कृष्ट उदाहरण नाहि का माऊ? तरिही तुला कळु नये? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा