✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सुवर्णक्षण

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 07/17/2012 - 14:09  ·  लेख
लेख
मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अ‍ॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला. 'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.' "प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला? तुला उद्या मातोश्रीला जायचे आहे, तुझ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे," पुढे तो काय काय बोलला हे मला अजूनही आठवत नाही. आ.श्री. दिवाकर रावते ह्यांच्या 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचा मी प्रकाशक असल्याने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाला मी हजर राहायलाच हवे आहे येवढेच माझ्या डोक्यात शिरले. काही वेळाने डोके काम करायला लागल्यावरती पुन्हा एकदा फोना फोनी करून ही गंमत नसल्याची खातरजमा करून घेतली. अर्थात त्या क्षणानंतर जी धाकधूक आणि काहीशी विचित्र मन:स्थिती होती तिचे वर्णन करणे खरेतर अशक्यच आहे. सकाळी ११ च्या सुमाराला समारंभ असल्याने पहाटेच मुंबईला निघणे आवश्यक होते. मन अजूनही खात्री देत नव्हतेच. अशातच श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले. सकाळी शिवनेरीने थेट दादर गाठले. मातोश्री परिसरातला बंदोबस्त पाहून हबकलोच. अहो एक चिलखती गाडी देखील तिथे उभी होती. श्री. दिवाकर रावतेंनी आमची नावे आधीच देऊन ठेवली असल्याने, आणि स्वतः ते देखील उपस्थित असल्याने चौकशी टळली, मात्र सलग तीन ठिकाणी तपासणीला सामोरे जावेच लागले. एकेक तपासणी नाका पार करत एकदाचे मातोश्री मध्ये प्रवेशकर्ते झालो आणि पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात तपासणीला सामोरे जावे लागले. पायर्‍या चढून मातोश्रीत शिरलो आणि कसेतरी दाबून धरलेले दडपण पुन्हा एकदा उसळी मारून वरती आले. आजूबाजूचे काय बोलत आहेत, काय विचारत आहेत हे देखील पटकन कळत नव्हते. हॉल मधून आत शिरताच लक्ष वेधून घेते ते माँ साहेब आणि बाळासाहेबांचे फुलसाईझ भव्य चित्र. जणू दोघे समोरच उभे आहेत असा सतत भास होतो. काही वेळाने 'साहेब आले आहेत, वरती बोलावले आहे. पण फक्त पाच जणांनीच चला' असा निरोप आला आणि आम्ही लिफ्ट मधून वरच्या मजल्यावरती पोचलो. लिफ्टमधून बाहेर आलो तर समोरच्या जिन्यात साध्याश्या टीशर्ट आणि पँट मध्ये श्री. उद्धव ठाकरे उभे होते. त्यांना मी ओळखलेच नाही, इतक्या साधेपणाने ते तिथे वावरत होते. सगळ्यात पुढे श्री. दिवाकर रावते, त्यानंतर सामना, नवाकाळचे दोन पत्रकार, फोटोग्राफर आणि सगळ्यात मागे थांबलेलो मी. रावते साहेब आत गेले तेव्हा आम्ही बाहेरच थांबलो होतो. सगळ्यात शेवटी जावे आणि शक्यतो मागेच थांबावे अशा विचारता मी असतानाच आतून 'ताम्हनकर, या आत या' असा आवाज आला आणि आपोआप मोकळी झालेली वाट तुडवत मी साहेबांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. आजवर फक्त न्यूज चॅनलमध्येच ही खोली पाहिली होती. खोली कसली, मस्त मोठा हॉल आहे तो. हॉल डाव्या हाताच्या भिंतीजवळ त्यांच्या नेहमीच्या खुर्ची वरती साहेब बसले होते. इतका मोठा हॉल तो, पण बाळासाहेबांच्या नुसत्या उपस्थितीनेच भरल्यासारखा वाटत होता. आत गेल्यानंतर काही वेळाने हा हॉल नुसता भरलेलाच नसून भारलेला देखील आहे हे जाणवले. आत शिरल्या शिरल्याच मा. बाळासाहेबांनी 'ए कोणी वाकून नमस्कार वगैरे करू नका बरं का. मला अजिबात आवडत नाही ते' असा खणखणीत आदेशच दिला. एका हाताच्या अंतरावरून त्या हिंदूहृदयसम्राटाला बघताना आणि तो गरजता आवाज ऐकताना असे काही रोमांच उभे राहिले म्हणून सांगू.. अंग चोरतच कसा तरी मी साहेबांच्या डाव्या हाताला उभा राहिलो. सोबत आणलेला पुष्पगुच्छ साहेबांच्या हातात देताना माझ्या हातांची थरथर मलाच जाणवच होती. साहेबांनी पुष्पगुच्छ हातात घेताच मी पटकन हात मागे घेतले. हो उगाच हाताची थरथर जाणवायला नको. "अहो थांबा, हात लावून ठेवा. फोटो काढतायत ते." पुन्हा एकदा आमचे हात पुष्पगुच्छाला चिकटले. फोटो काढून होताच पुष्पगुच्छ बाजूला ठेवण्यात आला आणि तीच संधी साधून मी साहेबांच्या पाया पडून घेतले. पाठीवरती हात आला आणि मी उभा राहिलो. साहेबांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचारायला रावते साहेबांकडे वळले. अचानक पुन्हा माझ्याकडे वळले आणि त्या भारून टाकणार्‍या आवाजात साहेबांनी विचारले "कानात काय घातले आहे हो तुम्ही ते?" झाले, आमची हवा गुल. कोरडे पडलेले ओठ आणि सुकलेला घसा ओला करत कसेतरी ' भि क बा ळी' हे शब्द तोंडात गोळा करत असतानाच साहेबच पुन्हा म्हणाले. "भिकबाळी आहे का हो ती? " "हो साहेब.." "खर्‍या भिकबाळीचे डिझाइन असे नसते, हे जरा वेगळे दिसते आहे. कोणाची युक्ती ही ?" "म म म.. माझीच साहेब." "छान दिसते आहे. मग पेशवे का तुम्ही ? ह्या प्रश्नावर काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात बाजूला सामनाचे श्री. द्विवेदी साहेब उभे होते. ते पटकन म्हणाले "साहेब, अहो पुण्याचेच आहेत ते." साहेब पुन्हा माझ्याकडे बघून विचारते झाले, "पुण्याचे का? मग गाता का तुम्ही?" ह्या प्रश्नावरती आजूबाजूला छान हशा पिकला आणि आमचे 'त त प प..' पुन्हा वाढले. "नाही साहेब गात नाही." "मग काय करत ?" "साहेब प्रकाशन करतात ते" परस्पर कोणीतरी माहिती पुरवली. "फक्त प्रकाशन करता ? किती प्रकाशन केलीत आजवर?" साहेबांचा कळीचा प्रश्न आला. "अं.. भरपूर केलीत साहेब." काय पण उत्तर दिले मी. वाह ! पुन्हा एकदा आजूबाजूला छानशी खसखस पिकली. त्या परिस्थितीतून माझी सुटका करायला रावते साहेब अगदी देवासारखे धावले आणि त्यांनी साहेबांसाठी आणलेली शाल माझ्यापुढे केली. एकतर साहेब बाजूला उभे असल्याचे दडपण, त्यात त्यांच्या प्रश्नांनी उडालेली भंबेरी अशा अवस्थेत मला धड शालीची घडी देखील उलगडता येईना. शेजारी श्री. उद्धव ठाकरे छानशे माझी अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते. शेवटी रावते साहेबांनीच शाल उघडून दिली आणि ती थरथरत्या हाताने मी बाळासाहेबांना पांघरली. मखमली कापडात गुंडाळलेल्या पुस्तकाच्या प्रती आल्या आणि मा. बाळासाहेब आणि श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आता कधी एकदा इथून बाहेर पळतोय अशी माझी अवस्था झाली होती. प्रकाशन आटोपले आणि बाळासाहेब पुन्हा एकदा विचारते झाले, "हं कशावरती केले आहे पुस्तक ?" "साहेब, मंत्रालयाला जी आग लागली, त्या घटनेवरती केले आहे." रावते साहेबांनी माहिती दिली. "अरे ! येवढ्यात छापून देखील आले ?" येवढे बोलून साहेब माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?" हास्याची एक जोरदार लाट उसळली आणि त्या लाटेत मी आपले कसेतरी गुळमुळीत 'नाही नाही..' येवढेच बोलू शकलो. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न रावते साहेबांना देखील विचारला गेला. साहेबांनी पुस्तक चाळले, त्याच्या किमतीची माहिती करून घेतली, त्यातील लेखांची माहिती घेतली, सामनातले कुठले कुठले लिखाण त्यात समाविष्ट केले आहे ते देखील आवर्जून जाणून घेतले. ते रूप, तो आवाज, तो करारीपण, प्रत्येक गोष्टीवरचे बारीक लक्ष पाहून क्षणभर वाटले की 'साहेबांच्या प्रकृतीची, ते भाषण करू शकतील का नाही' ह्याची सतत विनाकारण वांझोटी चिंता करणार्‍या काही सुमार पत्रकारांना ह्या क्षणी इथे बोलावावे आणि 'आता लिहा बरं तुमची बातमी' असे सांगावे. जाता जाता :- शक्यतो महिन्याभरातच माझ्या नवीन ग्रंथदालनाची सुरुवात करतो आहे. ह्या प्रसंगी मिपाकरांना खास सवलतीत पुस्तके देण्याचा मानस आहे. तरी ज्यांची खरेदीची इच्छा असेल त्यांनी व्यनी अथवा खरडीतून नोंदणी करावी अशी विनंती. पुस्तके तुमच्या हातात पडल्यावरतीच पैशाची देवाण घेवाण होणार आहे. ह्या व्यवहाराचा व मिपाचा काहीही संबंध नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
20660 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

अभिनंदन

ढब्बू पैसा
Tue, 07/17/2012 - 19:09 नवीन
मस्तच! मनापासून अभिनंदन. असेच मोठे होत रहा ;)
  • Log in or register to post comments

भारी ! लई भारी !! जाता जाता,

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/17/2012 - 19:15 नवीन
भारी ! लई भारी !! जाता जाता, परा-ठाकरे भेट आणि कालच्या घटना यावरून खालील दोन ओळी सुचल्या. पराचिया दादुलेपणाचा उबारा । न साहवेचि युवराजकुमारा ।। भेणे थरथरोनी राजभरा । आला हार्ट अटॅक* ।। * विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे. फार गंभीरपणे घेउ नये.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मदनबाण
Tue, 07/17/2012 - 19:30 नवीन
अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदंन !

अशोक पतिल
Tue, 07/17/2012 - 19:33 नवीन
अभिनंदंन ! पराजी ! छान !
  • Log in or register to post comments

इथे मुंबई आणि पुणे वाद न करता

मराठमोळा
Tue, 07/17/2012 - 19:40 नवीन
इथे मुंबई आणि पुणे वाद न करता अभिनंदन दिलेल्या सर्व मराठी लोकांचे अभिनंदन!!!!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आप्पा
Tue, 07/17/2012 - 19:49 नवीन
अभिनंदन पराशेठ, आपल्या ग्रंथदालनास भेट देऊन आपला परिचय करुन घेण्यास नक्की आवडेल
  • Log in or register to post comments

मस्त रे परा!

पैसा
Tue, 07/17/2012 - 20:08 नवीन
तुझ्या नशीबाचा हेवा वाटतोय! मस्त लिहिलंस!
  • Log in or register to post comments

"तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ?

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 20:40 नवीन
आधीच तयारीला लागला होतात का काय ? या हजरजवाबी प्रश्नाचं कौतुक आणि परा तुझं अभिनंदन!
  • Log in or register to post comments

बाळासाहेबांच्या .....

चौकटराजा
Tue, 07/17/2012 - 20:49 नवीन
हा खरे तर रा रा बाळासाहेब ठाकरे ( आमचे त्यातल्या त्यात आवडते राजकारणी ) यांच्या आयुष्यातील " सुवर्णक्षण " आहे. इतर सर्व नररत्नांबरोबर बाळासाहेबांचा फोटो म्हणजे ......... अहो भाग्यम !
  • Log in or register to post comments

परा

प्राध्यापक
Tue, 07/17/2012 - 20:57 नवीन
परा,खरच तुम्ही भाग्यवान आहात,आयुष्यात असे फार थोडे क्षण येतात ज्या बद्दल आपल्याला स्वत्;चाच अभिमान वाटायला लागतो, हे सुवर्णक्षण जपण्याच्या योग्यतेचेच आहेत्,तुमच्या ग्रंथदालनास शुभेच्छा. त्यामध्ये इतिहासाची पुस्तके असल्यास त्याची यादी व्य.नि.तुन कळविल्यास बरे होइल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

फारएन्ड
Tue, 07/17/2012 - 21:01 नवीन
आणि वर्णनही मस्त!
  • Log in or register to post comments

नशिबवान आहेस...

कौशी
Tue, 07/17/2012 - 21:15 नवीन
मस्तच! मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन रे पर्या

जाई.
Tue, 07/17/2012 - 21:25 नवीन
अभिनंदन रे पर्या
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

सुनील
Tue, 07/17/2012 - 21:26 नवीन
वृत्तांत आवडला. अभिनंदन आणि शुभेच्छा! वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे फोटोत बाळासाहेब आणि उद्धव वगळता अन्यांची नावे द्यावीत.
  • Log in or register to post comments

पराशेठ , अभिनंदन... उभे

शैलेन्द्र
Tue, 07/17/2012 - 21:40 नवीन
पराशेठ , अभिनंदन... उभे असलेल्यांपैकी दिवाकर रावते व द्विवेदी ओळखता येतायेत.. अर्थातच ठाकरे व परा सोडुन..
  • Log in or register to post comments

मस्त! अभिनंदन.. ग्रंथ दालनाची

खेडूत
Tue, 07/17/2012 - 22:00 नवीन
मस्त! अभिनंदन.. ग्रंथ दालनाची पण वाट पहातोय!
  • Log in or register to post comments

हाबिणंदन. आता तरी पार्टी

मृत्युन्जय
Tue, 07/17/2012 - 22:03 नवीन
हाबिणंदन. आता तरी पार्टी द्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.....:

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/17/2012 - 22:09 नवीन
अभिनंदन.....:Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

रेवती
Tue, 07/17/2012 - 23:17 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

वृतांत आवडला

क्लिंटन
Tue, 07/17/2012 - 23:24 नवीन
वृत्तांत खूप आवडला. किप इट अप.
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Tue, 07/17/2012 - 23:32 नवीन
वाघाच्या गुहेत जाणारी पावलेच फक्त दिसतात म्हणे.... पण इथे तुझी परतणारी पावलेच नव्हे तर अख्खा पर्‍या दिसतोय म्हणजे वाघोबा दिलदार असावेत. :) श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले. '... पण ते इथे चारचौघात उच्चारण्याजोगे नसल्याने इथे टंकले नाहीत' हा खुलासा लिहायचा राहिला का रे?
  • Log in or register to post comments

असं नाही!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/18/2012 - 10:19 नवीन
चारचौघात उच्चारण्याजोगे नसल्याने
असं नाही! मोडक म्हणून म्हणून काय म्हणणार पर्‍याला... "आता मोठे व्हा लवकर" ... असंच म्हणणार. ते अख्ख्या दुनियेला माहित आहे. मग कशाला लिहायचं? म्हणून नाही लिहिलं त्याने. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अभिनंदन साहेब..

चिगो
Tue, 07/17/2012 - 23:33 नवीन
अभिनंदन, कौतूक आणि शुभेच्छा.. जियो पराशेठ..
  • Log in or register to post comments

बाकिच्यांचं जाऊद्या, आमचे पराशेठ कोणते ?

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 23:36 नवीन
बाकीच्यांचं जाऊ द्या, आमचे पराशेठ कोणते ? हेच मुळात परगावी असणार्‍या अनेक मिपाकरांना ठाऊक नाही, त्यामुळे खुलाशाची अपेक्षा करत आहे.
  • Log in or register to post comments

अहो काका,

प्रास
Wed, 07/18/2012 - 11:49 नवीन
यातले गोबर्‍या गालाचे तरूण म्हणजेच प्रकाशक साहेब उर्फ परा होत.... अभिनंदन आणि शुभेच्छा पराशेठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अभिनन्दन

अभ्या..
Tue, 07/17/2012 - 23:41 नवीन
वाघाचा सामना. मार्मिक पणे. अभिनन्दन.
  • Log in or register to post comments

अरे वा

नंदन
Wed, 07/18/2012 - 00:08 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

जबर्‍या हो पराशेठ!!

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 01:05 नवीन
खरोखर सुवर्णक्षण अनुभवलेत तुम्ही. अभिनंदन. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

पिवळा डांबिस
Wed, 07/18/2012 - 01:48 नवीन
बाळासाहेबांचा सेन्स ऑफ ह्यूमर टेरेफिक आहे. त्याची पराशेठला थोडी झलक मिळाली.... :) बाकी तुमच्या त्या नवीन दालनात आमच्यासाठी कमीतकमी एखादी सतरंजी राखून ठेवावी ही विनंती... _/\_
  • Log in or register to post comments

परा मनःपूर्वक अभिनंदन!!

शुचि
Wed, 07/18/2012 - 01:55 नवीन
परा मनःपूर्वक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

मस्त रे परा. नशीबवान आहेस

टुकुल
Wed, 07/18/2012 - 05:54 नवीन
मस्त रे परा. नशीबवान आहेस :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

मोठ्ठं आभिनंदन मित्रा!!!

विवेक मोडक
Wed, 07/18/2012 - 08:21 नवीन
मोठ्ठं आभिनंदन मित्रा!!!
  • Log in or register to post comments

परा शेठ,

किसन शिंदे
Wed, 07/18/2012 - 08:24 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!! ग्रंथदालनाची यादी लवकरात लवकर जाहिर करा. :)
  • Log in or register to post comments

मस्त रे, अभिनंदन आणि नविन

५० फक्त
Wed, 07/18/2012 - 08:34 नवीन
मस्त रे, अभिनंदन आणि नविन उपक्रमासाठी भरघोस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन व अनेक शुभेच्छा

इन्दुसुता
Wed, 07/18/2012 - 09:05 नवीन
अभिनंदन व अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन बाकि माझा

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/18/2012 - 09:31 नवीन
हार्दिक अभिनंदन बाकि माझा रुमाल टाकतो आहे ग्रंथदालनाच्या उदघाटन सोहळ्याचा ... नक्की येउ पुस्तक घ्यायला
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

मूकवाचक
Wed, 07/18/2012 - 09:56 नवीन
परा यांना प्रकाशन व्यवसायातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

पराजी खूप खूप अभिनंदन.

Madhavi_Bhave
Wed, 07/18/2012 - 10:21 नवीन
पराजी खूप खूप अभिनंदन. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अश्या पद्धतीने आपण मोठ्या माणसाना नावे ठेवायला तयार असतो आणि वेळ प्रसंगी अपशब्द देखील वापरायला कमी करत नाही पण प्रत्यक्ष भेटलो तर आपली कशी वाट लागते आणि आपली स्वताची "औकात" (हे मी माझ्या बद्दल लिहिले आहे) हे कळून चुकते. अश्या मोठ्या माणसाना भेटलो कि अगदी बोबडी वळते आणि आपण नक्की काय बोलतो आहे तेच कळत नाही. पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपल्या पुस्तकांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करा. आम्ही उत्सुक आहोत. माधवी
  • Log in or register to post comments

मनापासून अभिनंदन !!! अमोल

अमोल केळकर
Wed, 07/18/2012 - 10:30 नवीन
मनापासून अभिनंदन !!! :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

श्रीवेद
Wed, 07/18/2012 - 11:16 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

लय भारी रे!

सुमीत भातखंडे
Wed, 07/18/2012 - 11:22 नवीन
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सहीच... वाघाच्या गुहेतील

सुहास झेले
Wed, 07/18/2012 - 11:41 नवीन
सहीच... वाघाच्या गुहेतील परिस्थिती योग्य शब्दात मांडलीस ;) :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/18/2012 - 11:58 नवीन
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद. पुस्तकांच्या यादी विषयी बर्‍याच जणांनी विचारणा केली आहे. पुस्तकाची माझी स्वतःची अशी यादी नाही. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी स्वतःच बनवायची. :) तुम्हाला ती पुस्तके जास्तीत जास्त सवलतीत मिळवून देण्याचे काम माझे. अर्थात यादी आधी पाठवून दिल्यास पुस्तके मिळवणे सोपे जाणार असल्याने, आपल्या भेटीच्या किमान ४ दिवस आधी तरी यादी पाठवावी अशी विनंती. फोटोतील व्यक्ती :- डावीकडून : सामनाचे पत्रकार मा. श्री. द्विवेदी, त्यांच्या शेजारी मा. आ. दिवाकर रावते, मा. श्री बाळासाहेब ठाकरे, मा. श्री. उद्धव ठाकरे, व त्यांच्या शेजारी मी. माझ्या व मा. श्री. उद्धव ठाकरेंच्या मागे फक्त चेहरा दिसत आहे ते आहेत अ‍ॅड. श्री. अनिल काळे. Image removed.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

michmadhura
Wed, 07/18/2012 - 12:00 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

किणकिनाट
Wed, 07/18/2012 - 12:31 नवीन
हार्दिक अभिनंदन परिकथेतील राजकुमार साहेब आणि अनेक शुभेच्छा ! किणकिनाट .....
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन ...

नि३सोलपुरकर
Wed, 07/18/2012 - 12:56 नवीन
परा , हार्दिक अभिनंदन... आणि खुप खुप शुभेच्छा
  • Log in or register to post comments

पूनप्रत्ययाचा आनंद झाला

सुचेता
Wed, 07/18/2012 - 13:07 नवीन
९५-९६ मधे अखिल भारतीय कामगार संघा च्या वार्षीक संमेलनात व्यासपिठा वरुन बोलण्याचे भाग्य लाभले होते, त्याची आठवण झाली. प्रत्य़क्श बाळासाहेबांना पाहने ही मर्म बंधातली च ठेव होय. सुचेता
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि

अभिज्ञ
Wed, 07/18/2012 - 22:28 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! सुवर्णक्षणाचा अनुभव आवडला. बादवे, पुस्तकांची यादी जरुर अद्ययावत करावीत जेणे करून पुढच्या वारीला एकाच दुकानातून हवा असलेला माल उचलता येईल. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

सुवर्णक्षणाबद्द्ल अभिनंदन आणि

सुप्रिया
गुरुवार, 07/19/2012 - 11:04 नवीन
सुवर्णक्षणाबद्द्ल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नगरीनिरंजन
गुरुवार, 07/19/2012 - 12:28 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा