✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घुसमट

स
स्पंदना यांनी
Tue, 07/10/2012 - 06:54  ·  लेख
लेख
घुसमट-भाग १ स्वयपाक घरच्या दाराची कडी खळकन निघाल्याचा आवाज तिने ऐकला. ताठरल्या शरीरान श्वास रोधून ती पडून राहिली. क्षणा दोन क्षणातच बेडरूमच्या दारावर धसफशीचा आवाज आणि पाठोपाठ एक सणसणीत लाथ! 'स्साली' त्याच्या तोंडून निसटलेली शिवी तिला लख्ख ऐकू आली. बाजूला झोपलेल्या दोन्ही मुलांकडे तिने पहिले. आईच्या कुशीत निर्धास्त होती ती! घामान डबडबलेला चेहरा पुसत ती उठून बसली. हॉल मध्ये काहीतरी फेकल्याचा आवाज अन मग शांतता!!! दारावर लाथ घालणारा, तिचा नवरा होता! तिच्या दोन मुलांचा बाप ! सहाच महिन्यापूर्वी तिला घटस्फोट देऊन दुसर लग्न केलेला! त्याच्या शिवाय जगाव लागेल याची कल्पना कधीच न केल्यामुळे, उध्वस्त झाली होती ती. कोर्टाच्या फेऱ्या , वकिलांचे सल्ले, नातेवाईकांचे शेरे, या सगळ्या चक्रातून उस पिळावा तशी पिळवटली होती. त्याच्या पगारातून मिळणाऱ्या पोटगीवर घर चालण शक्यच नव्हत, मग याच निवडण टिपण, त्यांचा स्वयंपाक अशी अडली नडली काम करायला लागली होती ती. अन आज सहा महिन्यान तो मुलांना भेटायच्या सवलतीचा बहाणा करून आला होता. कोर्टात त्यान मुलांची जबाबदारी सपशेल नाकारली होती. ' मुलांना आईच हवी' हे त्याच तत्वज्ञान तिन खाल मानेन ऐकल होत. पण काल आल्यापासून मुलांशी बोलताना , त्यांच्याशी खेळताना , तिला जाणवत होती ती त्याची नजर! हावरी लोचट नजर! 'पप्पा तुम्ही घटस्फोट घेतला ना?' चार वर्षाचा प्रज्वल बोलून गेला . 'अरे घटस्फोट कोर्टासाठी ! म्हणून नाती थोडीच तुटतात?' त्याचा अर्धा प्रश्न तिला होता. 'अरे मी तुमचा बापच आहे ! भारतीय परंपरेनुसार काही बदललं नाही .' अच्छा ! म्हणजे तिन आजही त्याला नाही म्हणायचं नाही! धसमुसळा तर तो पहिल्यापासूनच होता. तीच डोक सणकल! जेवण आटोपून तो हॉलमध्ये गेल्याबरोबर तिने दाराला कडी लावून टाकली. स्वयंपाक घर आवरून तिने मुलं झोपवे पर्यंत त्यान वाट पहिली , पण मग मात्र एखाद्या चोरासारखा तो स्वयपाक घराची कडी काढून आत आला होता ! बेडरुमच्या दाराच्या दोन कड्यांमूळे त्याला चरफडत परतावं लागल! सकाळी ती नेहमीच्या गडबडीत रमून गेली. 'तुला गरज नाही वाटत का?' त्यान सरळच प्रश्न केला. तो कानाआड करत तिने आपली काम चालू ठेवली. आज एकांचा वीस माणसांचा पोळीचा स्वयंपाक होता. ती एखाद्या चक्रासारखी भरभर आवरू लागली. सगळ आवरून डबे भरे पर्यंत त्यांचा माणूस दाराशी आला. त्याने दिलेले पैसे घेवून त्याला डबे वेळेवर परत करण्याची आठवण करून ती दमून टेबलाशी बसली. 'जेवण विकून कामावतेस?' त्याचा छद्मी प्रश्न हल्ली तिला रडू सुद्धा यायचे बंद झाले होते. ती तशीच खाल मानेन बसून राहिली. 'अजून मंगळसूत्र अन कुंकू आहे ना?' तो परत बोलला. 'तुम्हाला किंमत आहे का त्याची?' ती उसळून बोलली. तिच्या डोळ्यात रोखून बघत तो म्हणाला,' आहे ना! म्हणून तर आलोय. तुझी गरज भागवायला! आठ दहा महिने झाले असतील नाही? नाही , तू तशी कुठे बाहेर जाणार नाहीस म्हणून म्हंटल.' आता मात्र तिचा संयम संपला. तिने सरळच टिकली काढून टेबलाला चिटकावली , पाठोपाठ मंगळसुत्र! तिचा तो संताप बघून तो खो खो हसू लागला, ' अग पुरुषांना सगळ चालत , बायकांना नाही चालत ' तस जुन पुराणाच तत्वज्ञान त्यान तिला सुनावलं. एकूण समाजाची सारी बंधन , उपचार तिच्यावर लादून तो निर्धास्त होता. तो घरात आलेला समाजाला चालत होत. त्यान जबरदस्ती केली असती तरी समाज तिलाच हसला असता. कुणीतरी साखळदंडान पाय जखडावेत तस झालं तिला. 'आज परत जायला हवय. मी परत येईन. तो पर्यंत शांत होशील ना? खूप दिवस झाले, मला सवय लागलीय तुझी' तो कोडगेपणा ऐकून ती मनातल्या मनात चरफडत राहीली. त्याच्याशी तिने नऊ वर्ष संसार केला होता. आई बापांनी करून दिलेला , समाजाच्या दृष्टीने तिला साजेसा , पुरेस कमावणारा अशी सारी विशेषने असलेला तो नवरा होता. सहा वर्षाची मुलगी अन चार वर्षाचा मुलगा असं हेवा वाटण्याजोग आटोपशीर , औरस चौरस कुटुंब होत! होत त्यात समाधान मानून तिच्या चाकोरीबद्ध आयुष्यात ती सुखी होती. अन मग अचानक आलेल हे वादळ. त्याचे बाहेर कुणाशी तरी संबंध, ते वाद, ती भांडण , त्याला हवा असणारा घटस्फोट, या सगळ्यातून ती आत्ताशी कुठे बाहेर पडत होती. 'कुणाची तरी कोण' म्हणून ओळखीशिवाय , एक व्यक्ती म्हणून बाहेर जात होती. समोरचा एकाकी अन अभद्र रस्ता तिला दिसत होता , पण त्यात हा नव्यान आलेला प्रश्न नव्हता . सगळ संपल आता, आता नवरा हा फक्त अपुऱ्या पोटगी पुरता. इथून पुढे दोन कच्चीबच्ची घेऊन त्यांच्या कडे बघत जगायचं , हे तिन नक्की केल होत. पण देत असलेल्या पोटगीच मोल मागायला तो परत येईल याची तिने कधीच कल्पना नव्हती केली. इतकी वर्ष त्याच्या बरोबर एकत्र राहिल्यान , ती त्याला लख्ख वाचू शकत होती. त्याच्या वागण्या बोलण्यात कायम , स्वत:च्या पुरुषत्वाचा उल्लेख असायचा. 'मी पुरुष आहे मला चालतंय.' 'मी पुरुष आहे मी करणार' ' या गोष्टी पुरुष करीत नाहीत, या बायकांनी करायच्या गोष्टी' हे सार त्याच्या बोलण्यात असे. कधी कधी उठून तिने वादहीं घातला होता. पण ते त्याचे संस्कार होते, आणि तसा विशेष या गोष्टीचा तिला फारसा जाच कधी वाटला नव्हता. उलट पुरुषाला थोडा अहंकार हवाच असं तीच मत बनल होत. आज मात्र तो पुरुषी अहंकार एका नरात बदलला होता! त्याच्या कळपातली एक मादी म्हणून तिला वापरायचा तो प्रयत्न नव्हे तर हक्क समजत होता. त्यान बाहेर सुख शोधल तर ते रास्त होत. पण तिने मात्र फक्त त्याचाच शिक्का शरीरावर घेऊन जगायचं होत. खरच ! या आठ दहा महिन्यात तिला कधीच हीं जाणीव झाली नव्हती. घटस्फोटात आपल शारीरिक सुखही कायमच दुरावल हीं जाणीव तिला स्पर्शलीही नव्हती. होती ती फक्त समाजाच्या चौकटीत रहायची धडपड ! तशी ती फार वयस्क नव्हती, एकविसाव्या वर्षी लग्न अन एकोणतिसाव्या वर्षी घटस्फोट...! सगळे विचार माग सारीत ती कामाला लागली, पुढची काम एकमेकात गुंतून गोंधळ होऊ नये म्हणून ती आलेली प्रत्येक ऑर्डर , प्रत्येक काम केलेन्डरवर लिहित असे. "अरे! मार्च....? एप्रिल मध्ये मुलीचा वाढदिवस...." तिच्या पोटात खड्डा पडला. म्हणजे या कारणान तो परत येणार. तिने तासाभराच्या अंतरावर दुसर्‍या गावात रहाणार्‍या आईला पोस्टकार्ड टाकल. हल्ली प्रवासाची आणि गाडीभाड्याची चैन विचार करुन करावी लागायची तिला. सारच लिहिता येत नसल्यान वाढदिवसाच निमित्त तिलाही पुरेस होत. घरात तिच्या आईला बघुन तो चमकलाच. पण मग परत डोळ्यात कावेबाजपणा घेउन त्यान मुलीला डिवचल "काय ग? किल्ले बांधतेस का?" रात्री टी.व्ही. वर लागलेल दूरदर्शन पाहुन त्यान मोठ्यान विचारल "केबल बंद केल का?' "मला परवडत नाही" तिने सरळच सांगुन टाकल "मी देतो ना पैसे ." तो तिच्या आईकडे बघत बोलला."मुलांना बर पडेल." "नको" ती तुटक बोलली. तिची आई अगदे कानकोंडी होउन बसली होती. म्हंटल तर ती त्याच्या घरात राह्यली होती, म्हंटल तर ती आपल्या घटस्फोटीत मुलीला आधार द्यायचा प्रयत्न करत होती. "हे बघा आई.."तो तिच्या आईकडे बघत बोलला," झाल ते झाल. विसरुन जा. अश्या उपचारांमुळे माणस तुटत नाहीत, नाही का? तुम्हाला मी आजपण आई म्हणुनच हाक मारतोय ना?" त्याच्या त्या निर्लज्ज्पणाच्या कळसान तिचा संताप संताप झाला, काही सुचेनास झाल तिला. उपरा कुणी जर वाकड्या नजरेन तिला पहाता तर ती उघड उघड विरोध करु शकली असती, पण हे सगळच अवघड होउन बसल होत. तिच्या नकाराची त्याला गंमत वाटत होती. जीव मुठीत घेउन पळणार्‍या उंदराशी खेळाव तसा उंदीर मांजराचा खेळ तो खेळत होता. (क्रमशः)
  • घुसमट-२
  • घुसमट-३
  • घुसमट-४
  • घुसमट-५

Book traversal links for घुसमट

  • घुसमट-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
25591 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

खूप प्रभावी लेखन! कथा

मराठे
Tue, 07/10/2012 - 21:41 नवीन
खूप प्रभावी लेखन! कथा वाचताना नायिकेच्या नवर्‍याचा खूप खूप संताप येतो, हेच कथा यशस्वी होण्याचं लक्षण आहे.
  • Log in or register to post comments

जमते आहे

मन१
Tue, 07/10/2012 - 21:59 नवीन
कथा जमते आहे. पुढील भाग्गाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

कथा रंगते आहे.

पैसा
Tue, 07/10/2012 - 23:29 नवीन
सुरुवातीकडे पाहता एक दमदार कथा वाचायला मिळेल असं वाटतं आहे. अपर्णाकडून अशाच कथांची अपेक्षा आहे. कसलाही परिणाम करून न घेता, जशी सुचली आहे तशी कथा लिहीत जा. त्या कथेच्या अनुषंगाने काय चर्चा होईल तीही विधायक होईल आणि कथा आणि प्रतिक्रिया मिळून एक उत्तम धागा तयार होईल याची खात्री आहे. स्पा, जगातल्या सगळ्या कथा ३/४ प्रकारच्या कथासूत्रांमधे बसवता येतील. तेव्हा विषय वापरून झाला आहे असा विचार करण्यापेक्षा कसा मांडला आहे, फुलवला आहे याकडे लक्ष दे.
  • Log in or register to post comments

जगातल्या सगळ्या कथा ३/४

बॅटमॅन
Wed, 07/11/2012 - 00:03 नवीन
जगातल्या सगळ्या कथा ३/४ प्रकारच्या कथासूत्रांमधे बसवता येतील.
एग्जॅक्टलि!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

घाबल्लो

स्पा
Wed, 07/11/2012 - 10:04 नवीन
बापरे सगळ्या पाशवी शक्ती माझ्या मागेच पडल्यात ... बर्र माझे शब्द मी मागे घेतो बाबा ... पण बरीच बुचं मारून झाल्याने , आता ती प्रतिक्रिया पण उडवता येत नाहीये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कथा म्हणून नक्कीच छान लिहिली

कवितानागेश
Wed, 07/11/2012 - 12:40 नवीन
कथा म्हणून नक्कीच छान लिहिली आहे. पण मला अशा कथा वाचवत नाहीत. मूळातच कुठलाही अन्याय सहन करताना कुणाला पहिले की मला भयानक राग येतो. शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला नक्की कधीपासून आणि कशामुळे 'अबला' समजायला लागल्या, हे तर मला कधीच कळू शकत नाही. मूळात सगळेच जीव, एक जीव म्हणून सारखे. जे काही फरक असतात ते वरवरचे. मग कुठल्याही फालतू कन्सेप्ट्स धरुन ठेउन कुणीही स्वतःला / दुसर्‍याला कमकुवत वगरै समजतात, आणि अन्याय करतात, सहन करतात, तेन्व्हा त्या सगळ्याच जीवांचा वैताग येतो.
  • Log in or register to post comments

शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला

५० फक्त
Wed, 07/11/2012 - 15:02 नवीन
शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला नक्की कधीपासून आणि कशामुळे 'अबला' समजायला लागल्या, हे तर मला कधीच कळू शकत नाही. - + १००, मलादेखील नाही. किमान माझ्या जवळच्या स्त्रिया तरी स्वताला नक्कीच अबला समजत नव्हत्या, हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नेहमी प्रमाणे ओघवते लिखान ..

गणेशा
Wed, 07/11/2012 - 14:46 नवीन
नेहमी प्रमाणे ओघवते लिखान .. पुढील भाग वाचल्यावर कथेची दिशा कळेलच. सामाजिकते पेक्षा ही माणसांच्या मनाचे कंगोरे दाखवणारी कथा असल्यावर वाचण्यास आवडेल. निदान पुन्हा ती स्त्री तिच्या आधीच्या नवर्‍याला (तिला अधिकार असताना ही) लांब रहा असे खडसावू शकत नाहिये त्यावरुन मनामनाची स्थीत्यंतरे दाखवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले...
  • Log in or register to post comments

सविस्तर प्रतिसाद कथेनंतर

निनाद मुक्काम …
गुरुवार, 07/12/2012 - 02:20 नवीन
सविस्तर प्रतिसाद कथेनंतर लिखाणात दळवी आणि काही अंशी तेंडुलकरांची झलक जाणवली. मात्र ही लेखन शैली साध्या सरळ भाषेत प्रसंग डोळ्यासमोर उभा करते. पुरूष प्रधान संस्कृतीत आजकालच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात असे प्रकार गावात आणि शहरांमध्ये अजूनही घडतात. आता भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले म्हणजे कुटुंबं व्यवस्था ढासळली असा सोयिस्कर अर्थ काढला जातो. पण खरे कारण स्त्री आता काही अबलेची सबला झाली आहे. आणि ओढून ताणून उगाच मदर इंडिया चा आव आणत जीव जाळत संसार करणारी स्त्री आता इतिहासजमा होत आहे. निदान शहरात तरी. कथा कोणत्या अंगाने जावी व त्यावर कोणत्या अंगाने चर्चा घडावी हे सांगण्याचा मला वाचक म्हणून अधिकार नाही. माझे कार्य कलाकृतीचा आस्वाद घेणे व जमल्यास आपल्या परीने त्यावर मत प्रदर्शन करणे. तेव्हा इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

सविस्तर प्रतिसाद कथेनंतर

निनाद मुक्काम …
गुरुवार, 07/12/2012 - 02:20 नवीन
सविस्तर प्रतिसाद कथेनंतर लिखाणात दळवी आणि काही अंशी तेंडुलकरांची झलक जाणवली. मात्र ही लेखन शैली साध्या सरळ भाषेत प्रसंग डोळ्यासमोर उभा करते. पुरूष प्रधान संस्कृतीत आजकालच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात असे प्रकार गावात आणि शहरांमध्ये अजूनही घडतात. आता भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले म्हणजे कुटुंबं व्यवस्था ढासळली असा सोयिस्कर अर्थ काढला जातो. पण खरे कारण स्त्री आता काही अबलेची सबला झाली आहे. आणि ओढून ताणून उगाच मदर इंडिया चा आव आणत जीव जाळत संसार करणारी स्त्री आता इतिहासजमा होत आहे. निदान शहरात तरी. कथा कोणत्या अंगाने जावी व त्यावर कोणत्या अंगाने चर्चा घडावी हे सांगण्याचा मला वाचक म्हणून अधिकार नाही. माझे कार्य कलाकृतीचा आस्वाद घेणे व जमल्यास आपल्या परीने त्यावर मत प्रदर्शन करणे. तेव्हा इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात.

रमेश भिडे
Tue, 12/16/2014 - 16:53 नवीन
छान सुरुवात.
  • Log in or register to post comments

"बाजार" चित्रपटातील

मराठी_माणूस
Tue, 12/16/2014 - 17:30 नवीन
"बाजार" चित्रपटातील नसिरुद्दिन चा एक डायलॉग आठवला. शब्द थोडे वेगळे असतील , मतीतार्थ मात्र तोच आहे "इस धरती पर सबसे दरींदा जानवर मर्द है"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा