Skip to main content

सत्यमेव जयते

लेखक सोत्रि यांनी रविवार, 06/05/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे. आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत. आता बर्‍याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते. मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने 46976
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

'सत्यमेव जयते भाग- २ साठी महाविषय सुचवा' अशी महाप्रतियोगिता होणार असून त्यात राखी सावंत आणि भप्पीदा परिक्षक, तर सचिन पिळगावकर 'मान्यवर' म्हणून झळकणार आहेत, अशी चर्चा ऐकिवात आहे. पूर्वतयारी म्हणून मिपाकरांनी इथे विषय सुचवावेत.

आजचा भाग अस्पृश्यता / वर्णाधारित जातिव्यवस्था ह्या विषयाला वाहिलेला होता. इथे ह्याविषयावर एक चर्चा झाली होती. त्यावर मी दिलेला प्रतिसाद:
जातीयवाद संपला नाही, आणि संपणारही नाही. जातीयवाद हा समाजात नसून समाजातल्या प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. तो संपणे शक्य नाही कारण तो संपवण्याची दुर्दम्य इच्छा कोणातही नाही. खेड्यांमध्ये, निरीक्षरतेमुळे आणि त्यामुळे असलेल्या अज्ञानामुळे तो खेड्यांमधून संपणे शक्य नाही, तसेच शहरांमध्ये, सुशिक्षीतांमध्ये तोच जातीयवाद 'अस्मिता' नावचे गोंडस रुपडे धारण करून असतो त्यामुळे तो शहरांतुनही संपणे शक्य नाही.
ह्यावर मिपाकरांची मते जाणून घ्यायची ईच्छा आहे. - ( जातियवाद संपणे कठीण आहे असे मानणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोत्रिशी सहमत नागरी सेवासारख्या प्रतिष्ठेच्या नोकरीतही जातपात पाळली जाते हे पाहून अस्वस्थ वाटल

जातीव्यवस्था एकदम संपणार नाहीच. बदल एकेका स्तरावर व्हायला हवा. प्रथम आपण कोणालाही जात विचारणार नाही कोणालाही सांगणार नाही असा निश्चय तर करु शकतो? त्याबद्दल काही दुमत असायचे कारण नाही. त्याशिवाय आपल्या मुलाबाळांना योग्य वयात या व्यवस्थेबद्दल कल्पना देऊ त्यांनी असा भेदभाव करु नये आणि कोणी त्यांच्या बाबतीत केला तर खपवून घेऊ नये असे सांगू शकतो. असा बदल तातडीने होऊ शकतो. त्यानंतर आपण जर असा अन्याय होताना बघितला तर तुमच्या ताकदीमधे शक्य असेल तितका आवाज उठवणे गरजेचे आहे ते करु शकतो. कार्यक्रमात स्टालिनने आंतरजातीय विवाहाबद्दल मत मांडले ते बरोबर आहे. परंतु कदाचित ते एकदम या पिढीत होणार नाही. विचारात होणारे बदल हे कित्येक वर्षे चालू राहावे लागतात ती एकप्रकारची उत्क्रांतीच असते. कार्यक्रम बघणार्‍या लक्षावधी तरुण तरुणींचे विचार निदान या दिशेने धावायला लागले तरी पहिली पायरी गाठली गेली असे मी म्हणेन. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा सहभाग अतिशय आवडला. अत्यंत उत्स्फूर्तपणे, विनोदाची पखरण करत त्यांनी ज्या संयत शब्दात विषय मांडला त्याला दाद द्यायला हवी! शिक्षण आणि नोकरीमधले जाती आधारित आरक्षण आणि जातीभेद हे परस्परविरोधी मुद्दे आहेत यावर काही चर्चा अपेक्षित होती ती मात्र झाली नाही असे वाटते. कारण आरक्षण हवे असेल तर जातीव्यवस्थेनुसार विभागणी आवश्यक ठरवली जाते. आणि जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर तीवर आधारित आरक्षण होऊ शकत नाही. तेव्हा आरक्षणाची संख्या जातीपेक्षा हळूहळू आर्थिक परिस्थितीवर आधारित असलेली करत जावी का? अशी काही चर्चा होऊ शकली असती असे वाटते. माझ्या मते अजून २५-३० वर्षात जातीव्यवस्था घृणास्पद अवस्थेतून बरीच सुधारलेली असेल. रोटीबेटी व्यवहार सर्रास होत असतील. आणि त्यापुढल्या वीस वर्षात आपल्या देशाची स्थिती अमेरिकेसारखी होईल की जिथे जात विचारली जात नाही! :) -रंगा

सत्यमेव जयतेच्या दहाव्या भागानंतर, सोत्री, रंगाशेठ, आणि जाईनं आपापली मतं मांडून धागा हलवलाच आहे. आमिरखानंच्या सत्यमेव जयतेच्या आजच्या भागानं देशात अस्पृश्यता आहे, हे दाखवून दिलं त्याबद्दल आभारी, नाही तर आता समाजात अस्पृश्यता राहीलीच नाही, असे आम्ही समजत होतो. धन्स. :) बाकी, प्रतिसाद सवडीनं डकवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टालीन म्हणत होता अजूनही आपला समाज १६ ते २२ व्या शतकात वावरतो आहे, आणि त्यात न पटण्यासारखं काहीच नाही. जात जाईल तेव्हा समता येईल असे म्हणनारे खूप सापडतील पण जात सोडायची आहे, कोणाला. अस्पृश्यता नवीन नाही. हजारो वर्षापूर्वी आमच्या शास्त्रकारांनी समाजाची विभागणी चार वर्णात केली. आणि सर्वात शूद्र वर्ण हा हीन ठरला. कोणतेच हक्क न देता त्यांचे कर्म ’सेवा’ हा उच्च ठरवला गेला. आजही शाळेत भंगीच्या घरी जन्माला आलात म्हणून शाळेतले संडास स्वच्छ करायला लावणा-यांची वृत्ती अजूनही पाचहजारवर्षापूर्वीचीच आहे, असे म्हणावे लागेल. गावात प्यायचे पाणी भरु दिले जात नाही, बरोबरच आहे म्हणा. उच्च जातीत जन्माला आले नाही, तो त्यांचा दोषच, नाही का ? अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच ’मी अमुक अमुक आहे आणि मला अमुक अमुक असण्याचा अभिमान आहे’ असं वाचलं होतं. अशा अभिमानातूनच मग दुसरा हीन ठरायला लागतो. आणि स्वत: कसे श्रेष्ठ आहोत असे मग वृत्तीतून यायला लागते. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी जातीव्यवस्थेला अनेक मजली इमारतीचे उदाहरण दिले होते. इमारतीला जीना नसल्यामुळे तळ मजल्यावरचे कनिष्ठ राहीले तर वरच्या मजल्यावरचे वरीष्ठ ठरले, संवादाअभावी हे अंतर कमी झालेच नाही. ’श्रुतीवचन म्हणजे देववचन’ आणि देववचनाच्या विरोधात जाण्याचं काम नाही. वर्णाचे धर्म, निर्बध, आणि अधिकार एकदा देववाणीने ठरवले की त्याच्या विरोधात जाणे तसे कठीणच काम. आपण आज आधुनिक झालो आहोत पण अजूनही विचारांनी परंपरावादीच राहीलो आहोत. शाळेत शिकणा-या मुलाच्या जवळ कोणी डबा खायला बसत नाही, हाच मुलगा कोणाच्या जवळ बसला तर आजूबाजूची मुलं उठून जातात. गावातून उच्च वर्णीयांच्या घरासमोरुन जातांना हातात चपला घेऊन चालणारे आजही आहेत, त्याचे क्षणभरच आश्चर्य वाटले. शिक्षणाने अशा जातीपातीच्या भिंती अधिक मजबूत होतात की काय असे संस्कृतच्या प्राध्यापिका असलेल्या महिलेच्या अनुभवातून दिसलेच आहे. वाल्मिकी समाजात जन्मलेल्या मुलीनं शिकायचंच कशाला आणि तेही संस्कृत घेऊन. असं म्हणनारे शिक्षक अगदी अलिकडचेच आहेत. लोकमान्य टीळकांनी म्हटलं होतं ’शिंप्यांनी कौन्सिलात जाऊन काय मशीन चालवायची आहे. कुणब्यांना काय नांगर धरायचा आहे” त्याची आठवण झाली. शोषित, पिडितांचे दु:ख भल्या भल्यांना समजले नाही. मोठमोठ्या माणसांना माणसातला माणूस दिसला नाही. आपण तर किती तरी लहान. धर्माधिकारी म्हणाले ते तर कोणालाही पटेल. मी जन्माला आलो ते उच्च जातीत पण मला ही जातीयता पाळावी लागली नाही. स्वातंत्र्यापूर्वी आम्ही काही स्वप्न पाहिली (समता, बंधुता) होती ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही. सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमामुळे फार काही उजेड पडेल असे वाटत नाही. पण, शोषित, पिडितांचे हाल अपेष्टा पुस्तकातच ब-या वाट्तात. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य,समता, बंधुताचे स्वप्न पाहणा-यांना नामदेव ढसाळांनी विचारलम होतं ’स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे, रामराज्याच्या कितव्या घरात आपण राहतोत. उद्गम विकास उंची संस्कार संस्कृती कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा” असो. नामदेव ढसाळाच्याच गोलपिठातल्या ’कॉम्रेड अर्थात १२ बलुतेदारांसाठ” या दीर्घ कवितेतल्या शेवटच्या चार ओळी डकवतो. ”ही लोकशाही नाहीहे ही विटंबना सतरा पिढ्यांची म्हणा म्हणा कॉम्रेड दंड ठोकून म्हणा ’ हाण सख्या तुझीच बारी लोकशाही मेली तरी डेंगण्या मारी’ द्या द्या दवंडी कॉम्रेड ही लोकशाही नाहीहे ही विटंबना सतरा पिढ्यांची मूग गिळून पोसलेली” (गोलपिठा. पृ;क्र.६८) समाजात समता येईल आणि समता नांदावी अशा आशावाद बाळगलाच पाहिजे. हळुहळु बदल होत आहेत. बदल होतील. आंतरजातीय विवाह, जात-पोटजातीतले भेद हळुहळु कमी होत आहेत. कोणाचीही जात न विचारता सर्वांचेच रोटीबेटी व्यवहार आत्ताच होणार नाही, व्हायला वेळ लागेल, पण हे अंतरही फार दुरचं असणार नाही, असं ही मला कालचा भाग पाहतांना वाटले. असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोटीबेटी जाउ द्या पण इतरांना माणुस म्हणुन वागवायला काय हरकत आहे. जात कोणती का असेना जर माणुस स्वभावाने, विचाराने चांगला असेल तर मित्रतेत बाधा येउ नये. इथेही केवळ निम्न जातीतला आहे म्हणुन वाट्टेल ते लिहिणारा एक आय डी आहेच. अशा लोकांमुळे प्रगती नाहीच पण अधोगतीच होणार हे निश्चित. अजुन मी एपिसोड पाहीला नाही. पण आंतरजातीय म्हणजे ब्राह्मण - मराठा, ब्राह्मण-आगरी असे जोडपे माहीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ब्राह्मण मुली आहेत. विषय खुपच मोठा अन खुप वेगवेगळे उपविषय असणारा आहे. अन्याय करणारा अन अन्याय सहन करणारा दोघांचही चुकतं. फक्त भारतच नाही तर इतर देशातही...अन इतर बाबतीतही. अजुनही काही ठीकाणी अगदी शाळेपासुन वेगळी वागणुक दिली जाते हे वाचुन सखेद आश्चर्य वाटलं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१६ व्या शतकातली मानसीकता २१ व्या शतकात जोपासणे, पोथीनिष्ठ कर्मठपणा, संवादाचा अभाव, कुठल्याही कालीन विचारवंतांना समानतेचे महत्व न जाणवणे, समता - बंधुता वगैरे आधारीत कॉन्स्टिट्युशन, आंतर जातीय विवाह ... जातीव्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवायला आणि त्या दूर करायला हा सगळा मसाला कितीही चर्वण केला तरी त्यातुन काहिही साध्य होणार नाहि. कल्पना करा कि आज घडीला या सगळ्या उणीवा नष्ट केल्या गेल्या आहेत... तरी एका नव्या जातीव्यवस्थेचे बीजारोपण झालेले आहे, अगदी वैज्ञानीक पद्धतीने... व्हिकी डोनर. ५०० वर्षांनी ब्राह्मण, कुणबी, चांभार, भंगी अशी जातीव्यवस्था जाऊन क्लास ए, क्लास बी वगैरे इन्स्टिट्युट मधुन सर्टीफाय झालेले स्पर्म्स आपली नवी उतरंड तयार करतील. एक नवी डिजीटल मनुस्मृती, गोलपीठ, आणि कोड ऑफ कंडक्ट आपली जबाबदारी चोख निभवतील. समता, बंधुता वगैरे उपाय कधीच नव्हते आणि पुढेही त्याचा उपयोग नाहि. हि घडी सफलतेची व्याख्या बदलायची आहे. एक साधा प्रॅक्टीकल उपाय करता आला तर हे प्रोब्लेम्स निश्चित कमी होतील. शाळेत प्रथम क्रमांकाने पास होण्याची व्याख्या बनलुन टाकावी. ज्याला सर्वोत्तम गुण तो पहिला असं समिकरण न ठेवता जो अजीबात "ढ" होता त्याला पास होण्यास सर्वाधीक मदत कोणि केली तो प्रथम, असा उफराटा कारभार करावा. आपण एक साखळी तयार केली आहे, ज्यात एका मनुष्याने दुसर्‍याचे पाय पकडले आहेत. ति साखळी मोडुन एकमेकांचा हात धरणारी नवीन साखळी तयार करावी. वेगवान प्रगतीला हे गुणोत्तर अत्यंत मारक आहे, मान्य... पण सुखी सामाजीक जीवनाला सध्यातरी हाच एक उपाय दिसतोय. अर्धवटराव

In reply to by शिल्पा ब

त्याकरता बेसीक कंडीशन अशी कि आपल्याप्रमाणे इतरांनाही सुख - दुखः, आत्मसन्मान वगैरे असतो याची जाणीव ठेवणे. तिथेच तर घोडं पेंड खातं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव, समाजात असमानता आणि भेदभाव होता आणि राहील, ह्याच्याची सहमत.. पण 'कास्ट' आणि 'क्लास' मधला हाच फरक आहे ना,राव. जात जन्मासोबत जी चिकटते ती मेल्यावरही सोडत नाही. क्लास सिस्टीममधे माणूस त्याच्या लायकीच्या भरवश्यावर वर जाऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाले, तर त्यादिवशीच्या कार्यक्रमातील आय ए एस अधिका-याचे देता येईल जो क्लास वनला पोहचला तरी खालच्या जातीतलाच राहीला..

In reply to by चिगो

नविन जाति व्यवस्थेत "कास्ट" हा शब्द उरणार नाहि... त्याची जागा "क्लास" घेईल. हा "क्लास" जन्मजात(च) नव्हे तर जन्मापुर्वी पासुन चिकटेल. गॉड पार्टीकल्स शोधणार्‍या क्ष वैज्ञानीकाच्या पिढीतल्या अस्सल युरोपीयन जी ई लॅब सर्टीफाईड क्लास ए स्पर्म पासुन जन्मलेले आम्हि सॉकर विश्वचशक जिंकणार्‍या ब्राझीलीयन फुटबॉलपटुच्या ग्लॅक्सो लॅब सर्टीफाईड स्पर्म पासुन जन्मलेल्या इतर जीवांपेक्षा जन्मजात श्रेष्ठ आहोत, आम्हाला सॅल्युट करा... हा आहे नवीन जातव्यवस्थेतला गंड. अर्धवटराव

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच ’मी अमुक अमुक आहे आणि मला अमुक अमुक असण्याचा अभिमान आहे’ असं वाचलं होतं. अशा अभिमानातूनच मग दुसरा हीन ठरायला लागतो. अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच, "सचिनने राज्यसभेत प्रवेश 'भ्रमवृंदाच्या' नाकावर टिच्चून केलाय." अशा आशयाच्या विनाकारण जातीय टिप्पणी करणार्या एका हिणकस पोस्टच्या समर्थनार्थ एका उच्चशिक्षित प्राध्यापक / डॉ. ने "वाह! मस्त! निबर हाणलाय!" वगैरे जाहीर कौतुक केले होते. तेच सध्या समाजात समता येईल आणि समता नांदावी अशा आशावाद बाळगत असलेले बघून बरे वाटले. :)

In reply to by श्रीरंग

सचिनच्या राज्यसभेच्या प्रवेशाबाबतच्या कोणी कोणाला कोणत्या कारणाने हाणलं आहे, आणि शब्दाचा बाबतीत योग्य असा खुलासा योग्य तिथे केलाच होता तरीही असेल तशा आपल्या मताचा आदर आहेच. बाकी, सामाजिक उतरंड तशीही डोक्यातच जाते. उच्चशिक्षित प्राध्यापक डॉच्या अनावश्यक वाटलेल्या टीप्पण्या लक्षात ठेवूनही आपल्याला माझा समतेचा आशावाद भावला, त्याचे समाधान आहेच. -दिलीप बिरुटे

मागे त्या कीटकनाशक कंपनीच्या मालकाला बोलावून अवघड प्रश्न विचारून ग्रिल करणार्या आमीरने, दारूविषयीच्या भागात मात्र, चित्रपटांमुळे दारूला मिळालेले ग्लॅमर, त्यामुळे नवीन पिढीवर पडणारा प्रभाव, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. किमान स्वतःच्या चित्रपटात दारूचे ग्लॅमराईज्ड चित्रण करणार नाही असे जाहीर केले असते तरी त्याची बांधिलकी दिसून आली असती.

In reply to by श्रीरंग

किमान स्वतःच्या चित्रपटात दारूचे ग्लॅमराईज्ड चित्रण करणार नाही असं तो म्हणू शकेल असे वाटत नाही. चित्रपटाच्या कथेचा भाग म्हणून दारू आवश्यक असेल तर कोणता दिग्दर्शक त्याला तसे करू देईल? आता आमीर मोठा कलाकार आहे, तो स्वत:च्या अटी ठेवू शकतही असेल पण एखादी उत्तम पटकथा केवळ दारूचे सीन आहेत म्हणून नाकारायची हे पटत नाही. जसं काही आमीरने दारूवाले शिनेमे केले नाहीत म्हणून जनता दारू पिणे बंद करणार आहे! देशभक्तीचे सिनेमे किंवा देहभक्तीचे ;) दारूच्या संगतीनं पाहणारे प्रेक्षक असतातच.

In reply to by रेवती

>>जसं काही आमीरने दारूवाले शिनेमे केले नाहीत म्हणून जनता दारू पिणे बंद करणार आहे! पण आमीर / तत्सम कलाकारांमुळे दारूला ग्लॅमर प्राप्त होऊन, दारू पीणं कसं कूल आहे, असे मनावर बिंबवले जाऊन अनेक नवोदित तरूण प्यायला चालू करत असावेत असं नाही वाटत का तुम्हाला?

In reply to by श्रीरंग

एखाद्या सिनेमामुळे कपड्यांच्याही फ्याशनी येतात आणि जातात. दारू पिण्याची फ्याशन मात्र आजूबाजूच्या वातावरणाने (घरात किंवा नेहमीच्या येण्याजाण्याचे ठिकाण, मित्रपरिवार) लागू शकत असेल असा अंदाज आहे. शिवाय त्यासाठी पैसाही लागतोच. सिनेमा पाहून दारूची सवय लागलेल्यांचे प्रमाण कितपत असेल? दारूची फारच सवय असलेल्यांना विचारलेत तर 'सॉलीड' पिऊन 'राडा' करण्याची हौस अठवडाभरात संपत असेल (अंदाज). नंतर राहते ती सवय. दारूची सवय वाईट आहे हा काही आजचा शोध नाही. एखाद्या गोष्टीने आपले फार काही चांगले होणार नाही मग त्या वाटेला जायचे का? हा विचार ज्याचा त्याने करावा. आमीरने किंवा कुणीही असा मक्ता घेतलेला नाही/घेऊ शकत नाही. अगदी सख्खे आईवडील/बायको/मुलं तळमळून सांगतात, मुलांवर/नवर्यावर्/आईवडीलांवर कितपत परिणाम होतो? आमीरच्या जन्माआधीपासून पिऊन गटारीत लोळणारे नव्हते का? मुलांसाठी 'रोल मॉडेल' असणारे (पालक) जिथे ही मर्यादा सांभाळू शकत नाहीत तिथे सिनेमांची काय बात! तसं असतं तर देशभक्तीपर सिनेमे काय कमी आले होते?

In reply to by रेवती

अगदी अगदी...आमीरच्या आधीपासून पिऊन गटारात लोळणारे होतेच. सिनेमात "दारू प्या" असा थेट संदेश नसतो हे मलाही माहित आहे. पण चित्रपटांत दारू पीणं कसं 'कूल' आहे हे अभावितपणे ठसवलंच जातं असं माझं तरी मत आहे. कीटकनाशक कंपनीच्या मालकाला रासायनिक कीटकनाशकं बनवू नकोस सांगणं सोप्पं आहे, पण स्वतःच्या चित्रपटातून होणार्या दारूच्या भलामणीची मात्र कोणतीही जबाबदारी स्वतःवर घ्यायची नाही. कमाल आहे! असो. सिनेमा पाहून नवोदित तरुण प्रभावित होत असावेत हेच तुम्हाला पूर्णतः अमान्य असेल, तर आपला हा वाद व्यर्थ आहे.

In reply to by श्रीरंग

जरूर प्रभावित होतात. मान्य करते पण त्यांचे प्रमाण किती? (माझ्याकडे विदा नाही) त्या दारूवाल्या भागात डॉ. देशपांडे यांची मुलाखत पाहून रिसेप्टर्स तयार होण्याचे प्रकरण माहीत झाले. कपड्यांची एक फ्याशन येऊन ती लाट काही दिवसांत ओसरते पण या शारिरीक हानीचे काय? सिनेमात खून करा असाही संदेश नसतो. पण हे प्रकार धडधडीतपणे तुम्ही परिणामकारकरित्या लोकांसमोर आणता ना? परिणाम होणारच. परिणामकारक असले तरी देशभक्तीचे सिनेमे पाहून कोणत्या गोष्टींपासून लांब रहायचे हे आपण बरोब्बर ठरवतो ;) त्यावेळी हातात झेंडे घेऊन का बरे निघत नाही? मग हे का ठरवता येऊ नये? त्यासाठी आमीर कशाला हवा? त्याने सिनेमात दारू पिण्याचाचा अभिनय केला (अगदी दारू पिऊन केला असे समजू, कधीकधी तसे असतेही ) तरी त्याच्या हातात दिग्दर्शकाच्या नाड्या असतात का? आमीर हा काही आदर्श मनुष्य नाही. त्याच्या आयुष्याबद्दल आपल्याला विनाकारण जास्त माहिती आहे म्हणून आरोप करायला वाव तरी मिळतो नाहीतर याची पूजाच केली असती लोकांनी.

वृद्धांच्या समस्या ही एक सामाजिक समस्या आहे, आणि त्यावर मिपावर जालावर अनेकवेळा काथ्याकुट झालेला दिसतो. नवीन असं काही नसल्यामुळे आजचा भाग पाहण्याचा मुडच होत नव्हता. पण, सोत्रीच्या धागा रैवारी हलवायचाच असा मनोमन संकल्प असल्यामुळे आजचा भाग पाहावा लागला. (आता काय दोनच तर भाग राहीले) :) बाकी, आमिरखानचे डोळे आज सुरुवातीपासुनच भरत होते. विषयच तसा असल्यामुळे क्यामेराही नीट फिरत होता. असो. वृद्धांसाठीचे क्लब, एकटेपणावर विवाह हा एक मार्ग. आणि अशा विविध बाबी आजच्या भागात संपन्न झाल्या. आयुष्याचा आणखी एक डाव प्रसन्न अशा जोडप्यानं सुरु केला. त्यांची छबी टीपण्याचा मोह आवरता आला नाही. 2012-07-15-088 बाकी, प्रतिसाद सवडीने टाकतोच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे अजून दिसायचाय हा भाग. विषय काय असेल ही उत्सुकता होती. धन्यवाद हो सर! दहा पंध्रा मिंटात पाहते.

पाणी हेच जीवन आहे. पाणी. दुषित पाणी. पाण्याचे नियोजन. टँकरचा पाणीपुरवठा, होणारे अपघात. पाण्याच्या समस्या, गटाराच्या पाण्याने आंघोळ, पाण्यासाठी काय नियोजन केले पाहिजे. पाण्याचा योग्य वापर. असो, धन्यवाद. उफ्ह, ओह, गाल फुगवणे. इत्यादि. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला फार बॉ आमिर खान ची नफरत ! अर्थात आम्हाला फार प्रेम आहे अशातला भाग नाही, फिर भी.. मी माझ्या लहानपणापासुन पाणी वाचवा ! हे ऐकतेय पण कोणाला काही करताना पाहीलं नाही. म्हणजे नळाला पाणी असलं की वाटेल तितकं वाहु द्यायचं अन नसलं की बचतीचा प्रश्नच नाही. माझं स्वत: काँट्रीब्युशन म्हणजे दात घासताना नळ चालु ठेवत नाही, घासुन झाल्यावरच पाणी घेते. कुकरातलं पाणी वगैरे झाडांना घालते, फेकुन देत नाही. असं बारीक सारीकंच!

In reply to by शिल्पा ब

नफ्रत बिफ्रत कै नै. आमिरचे पिच्चर मी लै इंजॉय केले आहेत. पण, आमिरचं या कार्यक्राचं संचलन मला कधीच भावलं नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. माझ्या गावाच्या जवळुन गोदावरी नदी वाहते. सात कि.मि. अंतरावर आहे. जायकवाडी (पैठण) धरणाचं बॅक वॉटर आम्हाला उन्हाळ्यात पुरतं. नगरपालिकेच्या पाण्याच्या मोटर्स जळतात कधी कधी आणि त्यामुळे पाण्याचे हाल होतात. पाच-पाच दिवस पाणी येत नाही. प्यायचं पाणी खुप जपुन वापरावं लागलं. आमच्याकडे बोअर आहे, शेजारधर्म म्हणुन पाणी देतो बर्‍याचवेळी. पण, नळाला पाणी आलं की मग मत पुछो त्याचा कै च्या कै वापर, हे झालं आमचं उदाहरण पाण्याच्या बाबतीत सर्वत्र असंच असावं. -दिलीप बिरुटे

बारावा भाग संपला. हिंदुस्थानातील शिल्पकार. सत्यमेव जयतेचा आज शेवटचा भाग होता. आज कोणता विषय घेऊन आमिरशेठ येतात त्याची उत्सुकता होतीच. आज शेवटचा भाग असल्यामुळे आमिरखानंनं आत्तापर्यंतच्या भागांमुळे कोणी दुखावले असतील तर चुकभुल देणेघेणे असे सांगुन माझा उद्देश केवळ आहे ती परिस्थिती दाखवुन काही बदल व्हावेत या अपेक्षेने आपल्यासमोर विविध विषय घेऊन आलो असे सांगुन मुद्याला हात घातला. गुजरात भुकंप आणि दंगलीनंतर काहींच छत्र हरवलं अशा लहान मुलांचा सर्वोदय संस्थेनं सांभाळ केला. जम्मु-काश्मिरमधे गुलाम कादीर आणि आशा भट यांनी कसा भाईचारा स्थापित केला आहे, आणि गुलाम कादीरांनी काश्मिरमधुन गेलेल्या पंडितांनी परत यावे अशी हाक घातली. 'डोंग’( उल्लेख चुकत असावा) जमातीला कशी अस्पृष्यतेची वागणुक मिळत होती त्यांना सन्मानानं जगायला लावुन संघटन करुन दलितांना जमिनदाराच्या ताब्यात गेलेल्या जमिनी मिळवुन दिल्या. देहव्यापारातुन स्त्रिया, मुली, यांची मुक्तता करणारी स्मिता. सुभाषिनी आपल्या मुलाला अनाथालयात शिकवुन त्याच्या बळावर गरिबांसाठी मोफत सेवा देणारं रुग्णालयाचं स्वप्न पूर्ण केलं. विकलांगासाठी शिक्षण आणि रोजगार मिळवुन देणारी नसिमा. कॉलेज करता करता शाळेत न जाणा-या मुलांना एकत्र करुन शिकवणारा बाबर. आणि सरकारी शाळांमधुन उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी विप्रोचे मालक अजिमप्रेमजी यांच्या आर्थिक मदतीतुन राष्ट्रनिर्माणाचं एक स्वप्न साकारतंय. (नावांच्या बाबतीत चुभुदेघे) अतिशय धावपळीत उरकलेला आजचा भाग. हिंदुस्थानातल्या समाजासाठी काहीतरी करणा-यांचा धावता आढावा. या देशात काही चांगलंही होत असतं त्याची ओळख देणारा भाग. बाकी, एवढा देशप्रेमानं भारावलेला भाग पण फार कमी जणांचे डोळे भरलेले दाखवता आले. बाकी, आणखी दोन शब्द आणि आभार प्रदर्शन थोड्याश्या सवडीनं. जाता जाता : आज दै. लोकमतच्या मंथन पुरवणीत वाचलं अमेरिकेतली टॉकशॉवाली ओप्रा विनफ्रे (च्यायला काय अवघड नाव आहे) बाई म्हणे जीच्या कार्यक्रमाला उतरती कळा लागल्यामुळे जगभरातल्या समकालीन सामाजिक प्रश्नांचा गुंता उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकतेच भारतातल्या विशेषतः मुंबैतल्या झोपडपट्टीमधे फिरवुन म्हणे भारतीय कसे (गुण्यागोविंदानं) राहतात वगैरे असा विषय घेऊन 'ओप्राज नेक्स्ट चाप्टर' मधे दाखवलं. पुढेही जगभरातील दु:ख, दारिद्र्य, दाखवत ती बाई फिरणार आहे. आमिरनं स्टुडियोतुन बाहेर पडुन तिच्यासारखंच सत्यमेव जयतेचा दुसरा भाग सुरु करावा, कारण सामाजिक आणि दु:खाच्या प्रश्नांना मध्यमवर्गीयांकडुन चांगले पाठबळ मिळते आणि 'माध्यमातुन' अशाच विषयांवर मार्केट व्हॅल्युही कॅश करता येते, असं माझं रोखठोक मत आहे. -दिलीप बिरुटे

सत्यमेव जयते चा दुसरा भाग सुरु झालाय आजचा विषय महिलांवरील बलात्कार... :/ स्टार प्लस. -दिलीप बिरुटे

निर्भयाचा विषय घेऊनही कालच्या भागात अमिरखानला काही हाती लागलं नाही. कालचा भागात बलत्कार करणा-याचं काही होत नाही, दुर्दैवाने असाच संदेश गेल्याचे दिसते. टीआरपीच्या बाबतीत सर्वत्रच छापून आलंय की दुस-या भागात अमिरखान आणि त्याच्या टीमला काही जमले नाही म्हणून. ’सत्यमेव जयते विरोधाभासाच्या विळख्यात’ (दुवा दैनिक लोकमतला जातो) ज्या महिलांवर असे प्रसंग आले त्यांचे अनूभव ह्दयद्रावक होते. एकतर शारीरिक आणि मानसिक आघात पण समाज आणि न्यायपालिकेकडून आलेला निष्ठूरतेचा अनूभव हे पाहतांना दु:ख नक्कीच वाटत होते. -दिलीप बिरुटे