Skip to main content

सत्यमेव जयते

लेखक सोत्रि यांनी रविवार, 06/05/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे. आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत. आता बर्‍याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते. मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने 46976
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

आधी दुसर्यांच्या पोरींना पळवून, त्यांच्या अपरिपक्व वयाचा आणि अर्धवट कायद्याचा फा...यदा घेवून त्यांच्याशी लफडी करून त्यांच्या आईबापाला फसवून लग्न करायचे. नंतर तिला सोडून द्यायचे. आणि वर स्त्री भरून हत्या थांबवा यावर कार्यक्रम करून लोकांच्यात प्रसिध्धी मिळवायची. अरे हराम खोरा ज्या पोरीला पळवून लग्न केलेस तिच्या आई बापाला काय वाटले असेल ? त्यांना विचारले कि तुम्हाला मुल होईल..तुमचा choice ..तर ते मुलगी होऊ देतील..? भिक्कार्ड्यांनो , आधी ज्यांच्या ज्यांच्या मुली अशी लफडी करून लग्न करून पळाल्या त्यांच्या आई बापांना विचारा काय वाटते ते..त्यांच्यावर एक programme घ्या आधी..See More By: मंदार संत

..


In reply to by अविनाशकुलकर्णी

आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे म्हणून त्याचा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणार चर्चिला जाणे साहजिकच आहे. त्याच्या आयुष्यात घेतलेल्या घटस्फोटाचा उल्लेख मला तरी पटला नाही. छापून येणार्‍या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा? कशावरून त्याची पहिली बायको त्याला त्रास देत नसेल? "पूर्व पत्नी और बच्चोंके दर्दनाक अनुभव" असा उल्लेख करण्यासाठी आपल्याकडे काही ठोस पुरावा आहे काय? चांगली घरघशीत भरपाई घेतल्याशिवाय ती बरी घटस्फोट देईल (आणि का द्यावा?). आमीर खान शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा घटस्फोट झालाच नाहिये का जगात? हजारो लोकांचा घटस्फोट होतो. काहींची चूक असते तर काहींना दुर्दैवाने नुसतेच दु:ख पदरी येते. ते लोकही आयुष्यात उभे राहतात, पुढे कर्तबगार बनतात. मग बाकीच्या लोकांनी सतत भूतकाळच आठवत का रहायचा?

In reply to by रेवती

प्रसिद्ध व्यक्ति जेव्हा असे काही मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम हाती घेतात तेव्हा त्यांच्यावर राळ उडणे सहाजिकच आहे. जसे त्याच्या बाजूने बोलणारे आहेत तसेच त्याच्या विरोधात बोलणारेही असणारच. त्याच्या प्रसिद्ध असण्यामुळे वैकक्तिक पातळीवर असणारी टीका, ही जरी बोचरी असली तरी, ती होणारच हे गृहीत धरलेच पाहिजे. त्यानेही ते गृहीत धरले असणारच. शेवटी 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती'. पण आमिरला 'हाथी चले बजार, कुत्ते भौके हजार' ही म्हण माहिती असावीच :) - (हाथी) सोकाजी अवांतरः दुसर्‍यांची मते अशी इथे डकवणे हे पटले नाहीच.

In reply to by रेवती

+१ त्याच्या पर्सनल लाईफचा इथे काय संबंध? आपल्याला काय माहीती की नक्की कशामुळे घटस्फोट झाला ते? लोकांना एक काड्या सारायची फार हौस असते..

In reply to by अविनाशकुलकर्णी

सहमत आहे. जे उपदेशपांडे बनून फिरत असतात त्यांचे स्वतःचे चारित्र्यही तितकेच परीक्षणीय का नसावे . :)

श्री. अविनाशकुलकर्णी यांनी जे काही वर कदाचीत मिपासदस्य नसलेल्या व्यक्तींचे बाहेरचे प्रतिसाद चिकटवले आहेत, ते चिकटवणेच पटले नाही, अमान्य आहे. कारण मग असे कोणिही, कुठल्याही विषयावर बाहेरून कुणाच्याही इमेल्स, फेसबुक पोस्टींग, वृत्तपत्रातील प्रतिसाद, ट्वीट्स, ब्लॉग पोस्टींग मधले तोडलेले तारे येथे चिकटवत बसू शकतात. अविनाशकुलकर्णी यांनी स्वतःचे विचार येथे मांडले तर ते योग्य ठरेल.

In reply to by विकास

सहमत. हेच लिहिण्यास आले होते. ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत ते मिपाचे सदस्य आहेत काय?

ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत ते मिपाचे सदस्य आहेत काय? ...................................... नाहि.... फेबु व इतर समुहावर पण चर्चा चालु आहे या विषयाची.. त्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.. नसेल नियमात बसत तर जे मोदरेतर्स ना वाटते ते करावे....... केजरीवाल नपण महत्वाचा विषय हाताळत आहे..त्याच्या वर पण वैयक्तिकटिका होतेच.. आणी त्याच्या घटफोटाचे काय ..३ वेळा तलाक म्हटले संपले. पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच.. वर स्त्रीयांचा कळवळा घेऊन प्रष्ण मांडायला तयार.

In reply to by अविनाशकुलकर्णी

>>आणी त्याच्या घटफोटाचे काय ..३ वेळा तलाक म्हटले संपले. -- दुसर्‍या कोणि ते कोर्टात जाउन २ महिन्यात केले असते हाच काय तो फरक. पण ज्याला धटस्फोट घ्यायचा तो या ना त्या मार्गाने घेईलच. >>पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच.. -- इतर लोक लग्न न करताच एकत्र राहुन मोकळीक साधतात... त्यात काय विशेष? नक्की आक्षेप कश्यावर आहे? >>वर स्त्रीयांचा कळवळा घेऊन प्रष्ण मांडायला तयार. -- घटस्फोटीतांना इतर स्त्रीयांचा कळवळा येऊ नये हा काय नियम ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अर्धवटरावांशी पूर्ण सहमत. :-) सर्वप्रथम आमिरखान ने का लग्न केले, नंतर का घटस्फोट घेतला आणि परत लग्न केले ह्या बाबतीत मी त्याचा वैयक्तिक मामला आहे असे वाटते. तेच मला इतर कुणाबद्दलही वाटते. अर्थात तरी देखील म्हणेन की जर तो "घट्स्फोट घेऊ नका" म्हणत इतरांना उपदेश करू लागला तर ढोंगी ठरेल. त्याने घटस्फोट घेतला असला तरी आधीच्या बायकोस काही मारहाण करून, हुंडा देण्यावरून काही तुटल्याचे ऐकीवात तरी नाही... पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच.. त्याचा येथे काय संबंध ? समान नागरी कायदा असावा असे मला देखील वाटते, पण तो वेगळा मुद्दा आहे.
तरी देखील लाकूडतोड्यावरून तयार केलेली एक मजेशीर गोष्ट अवांतर म्हणून सांगतो. प्रामाणिकपणा बद्दल सोने-चांदी आणि स्वतःची लोखंडाची कुर्‍हाड देवाने बक्षिस दिल्यावर खुष झालेला लाकूडतोड्या दुसर्‍या दिवशी देव कुठं भेटला हे दाखवायला बायकोला घेऊन जातो. बायको विहीराच्या काठावरून नवरा कसा लाकड तोडतोय हे बघत असताना तोल जाऊन विहीरत पडते. देवभक्त लाकूडतोड्या लगेच देवचा धावा करतो... देव आल्यावर सगळे सांगून बायकोस वाचव म्हणून प्रार्थना करतो. देव लगेच विहीरीत उडी मारतो आणि येताना स्वर्गीय सुंदरी असलेल्या अप्सरेस घेऊन येतो आणि विचारतो, "हीच का तुझी बायको?" लाकूडतोड्या म्हणतो, "हो हीच माझी बायको!" देव चिडतो आणि म्हणतो, "खोटे बोलतोस, तुला हाव झाली आहे!" , गरीब बिचारा लाकूडतोड्या म्हणतो की, "तसे नाही रे देवा, उगाच परत तू तीन तीन बायका वर काढून माझा प्रामाणिकपणा बघणार आणि त्या सगळ्याजणींना मला बक्षिस म्हणून देणार... इतक्यांना सांभाळणे कसे मला परवडणार?" ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, दुव्याबद्दल आभार. आमिरखानच्या व्यक्तिगत जीवनाची चर्चा सामाजिक समस्यांवरील या मालिकेच्या निमित्ताने होणारच आहे. माणूस म्हणून आदर्श जीवन जगत असलेल्या माणसानेच अशा कार्यक्रमाचं अँकरींग केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवू शकतो, पण तसे शक्य नाही. शक्य झाले तरी असे कार्यक्रम कोणी पाहणार नाही, पाहिले तरी फारसा प्रेक्षकवर्ग लाभेलच याची काही शाश्वती नाही. कार्यक्रमावर वेगवेगळ्या अंगाने टीका पुढे होणारच आहेत. कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत जावा, लोकांना सामाजिक प्रश्नासंबंधी जागरुकता यावी आणि मालिकेच्या निमित्तान काही व्यावसायिक गणितं या कार्यक्रमामागे असतील तर तीही यशस्वी व्हावी, हा भाग यात आहेच. पहिल्याच भागानंतर आमिरखानने राजस्थानच्या मूख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्टींग ऑपरेशन मधे सापडलेल्या डॉक्टरांवर कार्यवाहीसाठी काय केले पाहिजे अशी चर्चा केलीच आहे. जलदगती न्यायालयापुढे सदरील प्रकरणे घेऊन जाता येतील काय याबद्दल एक समाधानकारक चर्चा झाल्याचे विविध वाहिन्यांवरील बातम्यांमधून दिसले आहे. कार्यवाही होईल अथवा न होईल. अन्य कोणी सामाजिक चळवळींनी असे आंदोलन करुन मुख्यमंत्र्याचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी शासकीय पातळीवरील उत्तरे देऊन तोंडाला पाने पुसली असती, स्टार कलाकार आणि कार्यक्रमाला मिळालेल्या प्रसिद्धी, लोकभावना यामुळे मुख्यमंत्र्यांना सदरील प्रकरण जलदगती न्यायालयापुढे घेऊन जावे वाटले, हेच मला पहिल्या भागाचे यश वाटते. मागे प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे कार्यक्रमाचा एकच भाग आत्ता संपतोय. अजून बरेच भाग येणार आहेत तेव्हा पडद्यासमोरील आणि पडद्यामागच्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत. तो पर्यंत कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली मतं एकमेकांना पटोत अथवा न पटो प्रतिसादांच्या निमित्तानं सोत्रींच्या धाग्याला आपण मात्र हलते ठेवू.....! जाता जाता : राखी सावंत म्हणाल्याच आहेत ही तर माझ्याच कार्यक्रमाची कॉपी आहे. :) -दिलीप बिरुटे

लहान मुलांचे लैंगिक शोषणावरील दुसरा भागही चांगला झाला. लहान मुलांच्या शरिराशी खेळणार्‍या विकृतांपासून घ्यावयाची काळजी, असा संदेश देणारा हा भाग. दोनच दिवसापूर्वी कायद्याच्या बाबतीत राज्यसभेने विधेयक मंजूर केले. [बातमी मटा ]विधेयक मंजूर व्हावे यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले. अर्थात कार्यक्रमाचे रेकॉर्डींग अगोदर झालेले असले तरी अद्यावत माहिती कार्यक्रम निर्मात्याने ठेवले पाहिजे असे वाटले. पहिला भाग आणि आजच्या भागाची तुलना केली तर पहिला भाग आजच्या भागापेक्षा उजवावाटला. अर्थात आजचा भाग कोणाला उजवा वाटू शकतो. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असहमत! हा भाग सुद्धा तितकाच सुंदर होता. हे विषय ऐकून असं वाटलं होतं की काहितरी माहित असलेलंच सांगून मशी विडिओज, मुलाखती सांगून लोकांना रडवतील. पण काही माहिती आणि निष्कर्श धक्कादायक होते आणि काहितरी उपाय सुचवला जातोय. जसं की मगच्या भागात स्त्री भृणहत्येची सुरवात कशी झाली किंवा मेडीकल कौंसीलनी अजून एकाही डॉक्टरचं सर्टीफिकेट रद्द केलं नाहिये. वर्षानुवर्षे रोजचं वर्तमान पत्र वाचून निगरगट्ट झालेल्या माणसाला देखिल याचं आश्चर्य वाटेल. :) तसंच या केसेस मध्ये ५३% टक्के मुलं असतात किंवा आपल्या कडे अजून पर्यंत कोणताही या संदर्भात कायदा नाहिये असं कळल्यावर वाईट वाटलं. शेवटचं वर्कशॉप पण छान होतं. मध्ये "रिस्पेक्ट एल्डर्स" वगैरे संस्कारावर केलेली टिपणी सुद्धा मस्तच! हॅट्स ऑफ टू यू अमिर खान!

माफ करा, पण तुम्ही आणि इतरांनी जोडलेला बादरायण संबंध पटला नाही.. आमीरने पहील्या पत्नीला, जिच्याशी त्याचा प्रेमविवाह झाला होता, तिला घटस्फोट दिला ही गोष्ट मान्य.. पण त्याचा त्याच्या कार्यक्रमाशी काय संबंध? वर विकास बोललेयत त्याप्रमाणे, "अर्थात तरी देखील म्हणेन की जर तो "घट्स्फोट घेऊ नका" म्हणत इतरांना उपदेश करू लागला तर ढोंगी ठरेल. त्याने घटस्फोट घेतला असला तरी आधीच्या बायकोस काही मारहाण करून, हुंडा देण्यावरून काही तुटल्याचे ऐकीवात तरी नाही..." त्याच्या बायकोला किती पोटगी मिळालीय, ती पुरेशी आहे का त्या, प्रथमपत्नी आणि मुलांची जबाबदारी तो निभावतोय की नाही, हे माहीत नसतांना त्यावर उगाच टिप्पणी का करावी? आणि नुसत्या चित्रपटसृष्टीत पहील्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करणार्‍यांची यादी लै लांबलचक आहे.. की बोनी कपुरशी लग्न केलं म्हणून आज श्रीदेवीने कार्यक्रमात येणंही आक्षेपार्ह आहे? आमीरने वैयक्तिक आयुष्यात काय केलंय, ह्यापेक्षा तो कुठले सामाजिक प्रश्न उजेडात आणतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. "तारें जमीं पर" नंतर जास्त जागरुक झालेले पालक माहितीत आहेत. त्यामागची व्यावसायीक गणितांशी आपल्याला घेणं-देणं नाही.. आजचा कार्यक्रमही अगदी अंगावर येणारा होता.. "बाल-लैंगिक उत्पीडन" ह्या बाबतीत आपण आणि आपला समाज किती अज्ञानी आणि उदासीन आहे, हेपण ह्या कार्यक्रमातून कळले. मागच्या भागातले स्त्री-भृण-हत्येचा प्रकार जर जीवन नाकारणारा होता, तर आजच्या कार्यक्रमातला विषय हा जीवनातला आनंद नासवणारा होता.. जरा त्या पिडीत स्त्री-पुरुषांच्या नजरेतून विचार करा, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तिकडून असा त्रास / बलात्कार, तोही वर्षोनुवर्षे,भोगणे ह्यातील दुखः समजू शकेल कदाचित. मी पुढे चालून माझ्या मुला/मुलीला ह्या बाबतीत नक्की शिकवणार.. असो.. "सत्यमेव जयते" नंतर इनोची मागणी एवढी भरमसाठ वाढेल, असं वाटलं नव्हतं.. :D का इथेही आमीरने "व्यावसायिक गणिते" ध्यानात घेतली असतील ;-) ??

लंडन मध्ये माझा मित्र राज जो तेथील स्टार दस्त चा युके मधील आवृत्तीचा संपादक होता. महाराष्ट्रीयन व दादरचा रहिवासी अत्यंत उमदा व आपल्या कामात तरबेज. त्याने सर्वप्रथम आमीर चे युकेमधील प्रकरण शोधले व आपल्या व्यवसायाशी इमान राखत हे प्रकरण आपल्या मासिकात सचित्र छापले. पुढे ह्या मुळे आमीर चा भारतात घटस्फोट झाला. सदर महिला काही बार्बी एवढी सुंदर किंवा आकर्षक नव्हती. पण आमीर आणि तिचे सुत जमले. माझ्या मित्र राज ला मी तेव्हा सुद्धा सांगितले की मी शन्ना नवरे ह्यांचा कळत नकळत सिनेमा पहिला आहे. किंबहुना म्हणून मी समजू शकतो कि विवाहित माणसांचा खाजगी आयुष्यात काही गोष्टी घडतात. जेव्हा आपण महापुरुषाचे पाय मातीचे असतात ह्या विधानांवर विश्वास ठेवतो. तेव्हा आमीर एक चांगला नट व संवेदनशील माणूस आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात घडलेल्या गोष्ट जी माझ्या किंवा इतर कोणाच्याही आयुष्यात होऊ शकते. त्यामुळे त्यांचे सिनेमा कार्य किंवा भूमिका किंवा समाजातील कार्य दुर्लक्षित ठेवू शकत नाही. त्याने सौरभ व नगमा प्रकरण सुद्धा बाहेर काढायचा प्रयत्न केला पण इतके यश मिळाले नाही. पण ही गोष्ट कालांतराने काही मासिकांमध्ये आली पण म्हणून काय दादावर प्रेम करणारे त्यांच्या पंख्यांवर काहीही परिणाम झाला नाही. येथे मी माझ्या मित्राला दोष देत नाही. तो त्यांचे काम निष्ठेने करत होता. नाण्याचा दोन बाजू असतात. प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक दृष्टीकोन किंवा एक भूमिका असतात.

आताच दुसरा भाग पाहीला: त्याआधी सोत्रिंना धन्यवाद की हा धागा सुरु केला. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल एकच म्हणेन की " पालकांनी मुलांचा त्यांच्यवर जो विश्वास आहे तो कायम ठेवला तरच मुलांच्या बाबतीत काय चुकीचं चाल्लंय ते कळु शकतं". मुलांवर अविश्वास दाखवत राहीलं तर मुलं सांगण्यापेक्षा त्रास भोगत राहतील.

सत्यमेव जयतेच्या तिसर्‍या भागानंतर उत्सूकता आता रुटीन मालिकांसारखी व्हायला लागली आहे. आजच्या भागात 'लग्नात दिला जाणारा हुंडा' या विषयावर विविध स्त्रियांचे अनुभव बघायला मिळाले. अर्थात हा विषय फारसा नवा नव्हता. 'पकडा ब्याह' हा लग्नाचा प्रकार पाहून मात्र हहपुवा झाली. मारुन मुटकून घोड्यावर बसविणे म्हणतात त्याची आठवण झाली. सत्यमेव जयतेला आता यानंतरच्या भागात वेश्याव्यवसाय आणि समाज किंवा असाच काहीतरी ''भडक ''विषय घ्यावा लागतो किंवा तसेच काही घेतलेले असेल, तसे झाले नाही तर सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाची आठवणही पब्लिकलाही राहणार नाही, असे वाटते. अवांतर : आमिरखानच्या हावभावाबद्दल काही लिहू नये. उफ्फ, ओह, आणि प्रयत्न करुनही टीपूसभरही डोळ्यात न येणारं पाणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका तासात प्रत्यक्ष लोकांना बोलावुन त्यांचे अनुभव - चांगले अन वाईट दोन्ही दाखवत आहेत...प्रश्न अन संभाव्य उत्तर (जे दुसर्‍या कोणी करुन पाहीले आहे) ते दाखवत आहेत ते चांगलंच आहे..भडक सादरीकरण नाही हे आवडलं. आता विषय नवा नाही कारण इतक्या वर्षांनंतरही त्याच समस्या कायम आहेत...चुक आपली - समाजाचीच आहे...लोकांचे विचार बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. रोजच्या जीवनातील सबला स्त्रिया दाखवुन इतरांना प्रेरणा मिळत आहे... समस्यांचे विषय भडक आहेत म्हणणं सोपं आहे...पण नाईलाज आहे.

In reply to by शिल्पा ब

सहमत! - (भडक) सोकाजी

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या तिसर्‍या भागानंतर उत्सूकता आता रुटीन मालिकांसारखी व्हायला लागली आहे.
माझा आणि टिव्हीचा संबंध केवळ न्यूज बघण्यापुरता आणि मालिकांपासून मी शेकडो कोस दूर असतो. त्यामुळे ही मालिका रूटिन व्हायला लागली आहे की याची कल्पना नाही.सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागाविषयी बरेच ऐकले आणि शेवटी तिसरा भाग पहिल्यांदाच बघितला.या मालिकेतून थोडे तरी परिवर्तन होऊन काही स्त्री-भ्रूणहत्या किंवा हुंडाबळी जरी टाळले गेले तरी ते मालिकेचे चांगले फलितच असेल. कोणत्याही कारणाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

In reply to by क्लिंटन

कोणत्याही कारणाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? हेच म्हणणे आहे....

In reply to by क्लिंटन

माझा टीव्हीचा संबंध फक्त न्यूज चायनल्स एनजीसी डिसकव्हरी इतकाच मर्यादीत आहे. सुट्ट्या असल्यामुळे बालगोपाळांचा डान्स इंडिया डान्स चे ऑडिशन्सही अलिकडे पाहात होतो. या डान्स इंडिया डान्सच्या एक परिक्षक 'गीता मा' उर्फ गीता कपूर आहेत. (लैच मस्त आहेत दिसायला आणि बोलायलाही) कार्यक्रमात कधी कधी खूप गरीब मूलंही ऑडिशनला असतात तेव्हा ही मूलं कधी बूट पॉलीश करणारी असतात, कधी गवंडीच्या हाताखाली काम करणारी असतातं, कधी एखाद्या पित्याला मुलांनी असा डान्स वगैरे करणं आवडत नसतं त्या पेक्षा मुलाने कुठल्या रोजंदारीवर कामाला जाऊन पैसे मिळवावेत अशी अपेक्षा असते तेव्हा ही मुलं जेव्हा परिक्षकांशी बोलत असतात तेव्हा परीक्षक विशेषतः गीता मा अशा कुंटुंब कर्त्यांना आणि प्रेक्षकांना आवाहन करतात हे आवाहन प्रामाणिक, भावनिक आणि अगदी मनमोकळं असतं. लहान मुलांना कामावर पाठवू नका, उनका बचपना मत छीनो, वगैरे. तेव्हा या आणि अजून काही मालिका अधून-मधून सामाजिक प्रश्नांवर संदेश देतच असतात. प्रश्नांच स्वरुप अशा माध्यमातून कमी-जास्त प्रमाणात उमटतच असते म्हणून माझ्या दृष्टीने रुटीन मालिका. आपला प्रश्न आहे की आक्षेप का ? मला इतकंच म्हणायचं आहे की सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाबद्दल संजय पवारच्या लेखातून बाजारमूल्याचा विचार अतिशय उत्तम मांडल्या गेला आहे. छोट्या पडद्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणून परिवर्तन होत असतात का ? टीव्ही मालिका पाहून किंवा सामाजिक प्रश्वावरील चर्चेने सामाजिक प्रश्न सुटतात किंवा सुटले आहेत याचा काही विदा आहे का ? अन्य देशात असा एखाद्या कार्यक्रमाने असे काही क्रांतीकारक काही बदल घडवून आणले आहे काय ? एखादी पाऊलवाट तरी पडली आहे काय ? आणि सामाजिक प्रश्नावरचा हा काही पहिलाच कार्यक्रम आहे काय ? अशाने प्रश्न सूटत नसतात फार तर हळहळ च्च च्च करण्यापलिकडे काहीही होत नसते. असाह्य व्यक्ती आणि कोणाचेही दु:ख पाहिल्यानंतर माणूस आतून कळवळतो. कोणाच्याही दु:खाशी सहानूभूती निर्माण होत असते. अशा दु:खाचं सामाजिक प्रश्नाचं एक हायपो निर्माण करुन जे भांडवल केल्या जातंय यावर माझा मूख्य आक्षेप आहे. जाता जाता : अरे हो, नांदा सौख्य भरो असा एका मराठी वाहिनीवर कार्यक्रम (कोणत्या वाहिनीवर ते विसरलो) आहे. एकदोन एपिसोड पाहिले आहेत. नवरा-बायको आणि नव-याची आई अशांना बोलावले जाते त्यांच्यातल्या मतभेदांवर चर्चा केली जाते कोण कुठे चुकले त्याची चर्चा होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षंकाच्या समोर त्यांचे मनोमिलन होते, गैरसमज दूर होतात. मला कधी कधी प्रश्न पडतो असे सार्वजनिकरित्या कौटुंबिक प्रश्वावर चर्चा करुन प्रश्न सूटत असतील की वाढत असतील. -दिलीप बिरुटे

पॅरिस मधे अनेक भारतीय तरूण हे पाण्याच्या बाटल्या, भाजलेली कणसे, फळे वा आयफेल टॉवरच्या लहान प्रतिकृती वगैरे विकत रस्त्यावर उभे असतात. या लोकांशी बोलल्यावर कळते, की यातील बहुतांश पंजाब मधून आलेले असतात, आणि त्यांना इथवर पोहोचवण्यासाठी पंजाब मधील एजंटला दहा-पंधरा लाख रुपये द्यावे लागतात. हे पैसे तुम्ही कुठून आणले, असे विचारता सर्वांचे उत्तर "पापाने दिये" असे होते. आमिरचा आजचा एपिसोड बघितल्यावर कळले, की "पापा" कुणाचे. या तरुणांना किमान सहा वर्षे भारतात जाता येत नाही, कारण इथे आल्या आल्या त्यांनी स्वतःच पासपोर्ट नष्ट केलेला असतो, महिनाभर जेल मध्ये काढून, बाहेर आल्यावर फ्रान्स चे सरकार त्यांना एक फोटो कार्ड बनवून देते, त्या आधारे ते अशी छोटी छोटी कामे करत जगत असतात. सहा वर्षांनन्तर हजारो युरो खर्चून ते "पेपर्स" बनवण्यासाठी अर्ज करतात. मी त्यांचेशी बोलत उभा राहिलो, तर ते अस्वस्थ चोरटेपणाने इकडे तिकडे बघत, नंतर लक्षात आले, की त्यांच्यावर लक्ष ठेवणारा माणूस दूर उभा असतो. यातील अगदी तरूण असणारे उत्साही, आनंदी वाटले, तर चाळीशीत आलेले उदास-हताश. पॅरिस मध्ये ते एका खोलीत सात-आठ-दहा जण रहात असतात. त्यांना उघड्यावर जेवणाचे वेळी अल्प किमतीत राजमा-चावल वा छोले -कुलचे पोहोचवणे, हाही धंदा काहीजण करत असतात. यातील काही दरमहा साठ-सत्तर हजार रुपये भारतात पाठवतात, आणि त्यांचे वडील त्यांच्या खेडेगावात अलिशान घरे बांधतात. तिकडे म्हणे गावा-गावात अश्या भव्य हवेल्या झाल्या आहेत. त्या बघून इतर सर्व तरुणांना वाटते, की आपणही परदेशी जावे. (हवेल्या बघून अश्या घरात मुली द्यायला वधुपितेही उत्सुक असणार) आमिरच्या हुंड्यावरील आजच्या एपिसोड मधे सरदारजीने सांगितलेल्या तीस हजार विवाहित तरुणींचे नवरे, ते असलेच तरुण असणार, असे वाटले. (त्या तरुणींचे नवरे पुन्हा घरी परतणार नाहीत, हे उघडच आहे) आमिरचा हा कार्यक्रम, तो हाताळत असलेल्या समस्यांची ज्यांना प्रत्यक्ष झळ लागलेली नाही, अश्या प्रेक्षकांना जरी धंदेवाइक, वा नावे ठेवण्यासारखा वाटत असला, तरी झळ लागलेल्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरत असणार ... सत्यमेव जयते....

In reply to by चित्रगुप्त

हा कार्यक्रम मी यावेळी बघितला आणि फारसा धक्का बसला नाही. वाईट सगळ्यांना जेवढे वाटले तेवढेच वाटले असावे.;) वडील त्यांच्या खेडेगावात अलिशान घरे बांधतात अगदी अगदी. माझे नातेवाईक पंजाबात गेली दहा पंध्रा वर्षे रहात असल्याने अगदी हीच आणि आणखी भयानक माहिती काहीवर्षांपूर्वी कळली होती. ज्यांना झळ लागली त्यांच्यासाठी कार्यक्रम महत्वाचा वाटणारच. सहमत.

काल लोकसत्ताच्या लोकरंग मध्ये संजय पवार यांचा हा एक अत्यंत समर्पक लेख आला आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. बाकी चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

व्वा लेख आवडला. सालं आम्ही इतकं बोंब मारुन म्हणत होतो की सामाजिक विषयामागे आर्थिक गणितंच दडलेली असतात तर पब्लिक आम्हालाच वेड्यात काढायला निघालं होतं. च्यायला, लेख वाचून खूप खूप आनंद झाला. नगरीनिरंजन शेठ, लेखाचा दुवा दिल्याबद्दल आभार.... !!! -दिलीप बिरुटे (लेख वाचून आनंद कुठे ठेऊ नी कुठे नै असा झालेला)

In reply to by नगरीनिरंजन

त्या लेखात असहमत असण्यासारखं काहीच नाहिये. अनेक वर्षांपूर्वी झालेले परिक्रमा, रजनी (मी दोन्ही पाहिलेले नाहीत) यानंतर काळ किती बदलला. समाजाची विचारसरणी बदलली. पूर्वी एका कार्यक्रमातून (कदाचित) साध्य होणारी गोष्ट आता वाजत, गाजत, अश्रुपात दाखवून, शॉक देऊन आणि अनेकदा 'दिखावा' केल्यानेच पब्लिकला समजत असेल तर याचा व्यवसाय करून का होईना ती लोकांपर्यंत पोचवणे आलेच. समाजाच्या (मीही त्यात आलेच) इन्सेन्सिटीव्हिटीच्या प्रमाणात कार्यक्रमाचे सादरीकरणही बदलेल शिवाय त्याची किंमत आपण सगळेजण या ना त्या मार्गाने मोजत राहणार. पूर्वी देवळाच्या ओवरीत, राहत्या वाड्यात, लहान कार्यालयात होणारे लग्नसमारंभ आता तसे किती होतात? तसे ते साजरे केल्यास कितीजणाना रुचेल? उद्या मी कर्यक्रम सादर करायला गेले तर दुनिया राहू दे तुम्हीही तो बघायला टिव्ही चालू करणार नाही ;). आमीर तर आमीर, त्यामुळे का होईना कार्यक्रम पाहिला जातोय, चर्चा केली जातीये. त्या 'सेलेबल' अ‍ॅक्टरची किंमत जर काही कोटी असेल तर ती मोजणे भाग आहे. दोनचार मुलींच्या पालकांनीही जर धडा घेतला तर तेवढे जीव वाचले, कुटुंबावर कायमस्वरूपी होणारा वाईट परिणाम थांबला असे म्हणावे लागेल. वडीलांनी कर्जामुळे आत्महत्या केलेल्या मुलीची एक्सप्रेशन्स तर सगळ्या सासुरवाशिणींची कथाच सांगून गेली. किती गोड मुलगी होती ती. कार्यक्रमात दाखवलेला 'पकडवा ब्याह' की असेच नाव असलेला प्रकार मात्र वाईट आहे. त्यावेळी हसू आले पण नवर्‍यामुलांसाठी धोकादायक असलेले प्रकरण आहे. हुंडा, लग्नाचा खर्च परवडत नाही म्हणून असे प्रकार भविष्यात वाढले तर मात्र मुलांची खैर नाही. ;)

In reply to by रेवती

पूर्वी एका कार्यक्रमातून (कदाचित) साध्य होणारी गोष्ट आता वाजत, गाजत, अश्रुपात दाखवून, शॉक देऊन आणि अनेकदा 'दिखावा' केल्यानेच पब्लिकला समजत असेल तर याचा व्यवसाय करून का होईना ती लोकांपर्यंत पोचवणे आलेच.
म्हणजे लोकांची संवेदनशीलता वाढली की कमी झाली? आज वाजत-गाजत, डोळ्यातून पाणी आणून लोकांना जाणीव होतेय असं मानलं तर उद्या काय करावं लागेल? म्हणजे या कार्यक्रमाने अवेअरनेस वाढतोय वगैरे सगळी बकवास आहे, उलट लोकांना त्याचं काही वाटेनासं होतं किंवा काही वाटण्यासाठी खूप ड्रामेबाजी करावी लागते. अवेअरनेस असता तर स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द चुकीचा असून स्त्रीलिंगीगर्भपात असा शब्द वापरावा असे याविरुद्ध लढणारे कार्यकर्तेच कळकळीने सांगत असतात हे लोकांना कळले असते. पण लक्षात कोण घेतो? स्त्रीलिंगीगर्भपात करणे ही जर भ्रूणहत्या आहे तर इतर कोणताही गर्भपात हीसुद्धा भ्रूणहत्याच आहे. मध्यंतरी एक लेख वाचला होता लोकप्रभामध्ये. कोकणात काम करणार्‍या एका डॉक्टरांनी लिहिला होता. त्यात अगदी साधे मुद्दे मांडले होते. सामान्यतः नको असलेला गर्भ काढून टाकण्याचा निर्णय पहिल्या तीन महिन्यातच घेतला जातो. गर्भाचे लिंग चौथ्यामहिन्यानंतरच कळते. त्यामुळे स्त्रीलिंगीगर्भपात नेहमी उशीरा केले जातात असे त्या लेखात म्हटले होते.असे उशीरा केलेले गर्भपात ओळखण्यासाठी अत्याधुनिक वगैरे तंत्रज्ञानाची गरज नाहीय. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. पण मुळात ते करून घेणारे लोक चांगले शिकलेले आणि चांगल्या उत्पन्न गटातले असल्याने अशी इच्छाशक्ती निर्माणच होत नाही. हे असले कार्यक्रम पाहून या शिकलेल्या, श्रीमंत वगैरे लोकांचे मतपरिवर्तन होईल हा फारच भाबडा आशावाद आहे. उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा अतिवापर चांगला नाही, इंटरनेट व गेमिंगचा मुलांवर वाईट प्रभाव पडतो हे अनेक माध्यमांतून सांगितले जात असूनही कितीतरी सुशिक्षित मंडळी आजकालच्या स्पर्धेच्या जगात आवश्यक आहे म्हणून पोरांना अकाली कॉम्प्युटर आणि गेम्स आणून देतच असतात. तसंच हे. म्हणजे या शो ने फायदा तर काही होत नाही फक्त सामाजिक प्रश्नाबद्दल आपण जागरुक झाल्याचं लोकांना समाधान मिळतं जे एकप्रकारे मनोरंजनच आहे. शिवाय आता समाज जागृत झाला आहे वगैरे समज होऊन प्रश्न त्यामुळे कमी झाला असेल अशी परस्पर सोयीस्कर समजूत केली जाऊन लवकरच लोक त्या प्रश्नाला विसरून जातात. प्रश्नाचं निर्मूलन करण्यासाठी काय केलं पाहिजे हे लोकांना सांगितलंही जात नाही कारण करमणुकीत त्याची गरज नसते. मग नुसते सांगण्यासाठी किस्से उरतात, आमच्या लांबच्या नातेवाईकाने एका मुलीनंतर गर्भपात करून घेतला वगैरे गोष्टी कोणत्याही कृतीशिवाय चघळल्या जातात. सर्वात वाईट म्हणजे काही लोकांची तर आपल्यासारखे बरेच लोक आहेत असे वाटायला लागून अपराधीपणाची भावनाच नष्ट होते. आमीरखानला काय, तो आधीच दुसर्‍या प्रोजेक्टच्या मागे लागलाही असेल.

In reply to by शिल्पा ब

कोणाच्या तुलनेत? वास्तवाच्या तुलनेत ते निगेटीव्ह असेल तर चांगलं होईल. बाकी, आजवर झालेल्या भागांमधला कोणता प्रश्न तुम्हाला माहित नव्हता?

In reply to by नगरीनिरंजन

वरती मी एका प्रतिक्रियेत लिहिलंय सविस्तर पण तरी... या कार्यक्रमात आपल्यासारखेच सामान्य लोकं येउन त्यांच्या कथा सांगतात, त्यांनी काय केलं ते सांगतात, प्रश्नाचं उत्तर काय असु शकतं हे उदा. देउन दाखवतात - जे की सामान्य लोकांपैकीच कोणीतरी केलं असेल..वाईट काय ते समजलं नाही. आमीर खान अँकर असल्याने जास्त प्रसिद्धी मिळतेय ही एक गोष्ट. अन प्रश्न माहीत आहे याचा अर्थ गंभीरता माहीती असेलच असं नाही. एका बाईचे तिला न सांगता प्रत्येकवेळी एक इंजेक्शन देउन ६ गर्भपात करवले गेले असं मी कल्पनेतही आणलं नसतं...लोकांची मानसिकता कुठे पोहोचलीये!! दुसरा एपिसोड खास महत्वाचा वाटला.. असो. तुम्हाला पटलं तर पहा नाहीतर त्या डेली सोप पेक्षा वेगळं काहीतरी म्हणुन हवं तर पहा...नाहीतर नका पाहु. तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं?

In reply to by शिल्पा ब

तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं?
जाहिराती पाहूनच दर वेळी एका प्रश्नावर काथ्याकूट असणार हे माहित होतं. त्यामुळे अनपेक्षित असे कार्यक्रमात काही वाटले नाही. बालकामगार वगैरे प्रश्नही येतीलच पुढे. आमीरखानच्या मार्केटिंग तंत्राबद्दल कौतुकही वाटले. कारण या असल्या विषयांवरचे 'मातृभूमी', 'स्टॅनली का डब्बा' सारखे चित्रपट साफ आपटतात. सगळंच अपेक्षित असल्याप्रमाणेच असल्याने अपेक्षाभंग झालेला नाही आणि दर काही वर्षांनी आणखी भडक कार्यक्रम येत जाणार हेही अपेक्षित आहे.

In reply to by नगरीनिरंजन

लोकांची संवेदनशीलता वाढली की कमी झाली? संवेदनशीलता कमी झालिये म्हणूनच तर असले प्रकार घडतायत. तशी ती कमी झालिये म्हणून मग काही बोलायचे, सांगायचेच नाही का? हुंडाबळी कार्यक्रमाकडून मलाही फारश्या अपेक्षा नाहीत पण तो पाहिल्यावर ज्यांच्या मुलींची लग्ने ठरलेली आहेत, ठरण्याच्या मार्गावर आहेत, याच परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी भावनेच्या भरात जरी चांगले पाऊल उचलले तर तो फायदा मानावा लागेल. आता चार घरच्या मुलींच्या फायद्यासाठी काही कोटी ही किंमत जास्त नाही काय? तर नक्कीच आपण सगळेजण सगळ्या गोष्टींची भरपूर किंमत मोजतच आहोत. कार्यक्रम करून किंवा न करूनही. माझ्या मुलाच्या लग्नाच्यावेळी कदाचित मी याचा विचार जास्त करू शकीन्........आत्ता 'गरज' नाही म्हणून तो खूप सिरियसली होणार नाही हे मान्य. पण खेड्यापाड्यातल्या मुलींना फसवून, पैसे घेऊन परदेशी पळून गेलेल्या नवर्‍यांना पकडण्यासाठी पासपोर्ट ऑफीसची मदत होते हे आणखी बरेच जणांना समजले असेल असे मानते. कोणताही गर्भपात हीसुद्धा भ्रूणहत्याच आहे अगदी हेच म्हणणे आहे. मुलींचा गर्भ काढून टाकला तर डोळ्यात पाणी आणि मुलाचा काढला तर का नाही? याच धाग्यावर मागे किंवा कुठेतरी माझे मत मी नोंदवले होते की मुलगी हवी असणार्‍यांकडे आश्चर्यमिश्रीत कौतुकाने पाहिले जाते तर "आता मुलगा हवा" असे चांगल्या भावनेने व्यक्त झाले तरी गुन्हेगारासारखी अवस्था येते. कोणतीही भ्रूणहत्या नकोच! इलेक्ट्रॉनिक गेम्सबाबतीत सहमत. या शो ने फायदा आपल्याला होत नाहिये असे आत्ता वाटत आहे कारण आपण असे वाईट काही करत नाही म्हणून. ज्यांना व्हायचाय त्यांना झालाय (भावनेच्या भरात तात्पुरता का होईना). ज्यांच्या घरातल्यांची मनस्थिती एखाद्या अशाप्रकारच्या फटक्याने खालावलेली (त्यावेळी साध्या साध्या गोष्टी सुचत नाहीत, अगदी समोर असल्या तरी) आहे त्यांना निदान आशेचा किरण तरी दिसला असेल. यातून सपोर्ट गृप्स निर्माण झालेले मी पाहिले, अनुभवले आहेत, भारतात. आमीरखानने पुढचा सिनेमा दणदणीत मानधनासह स्विकारला असण्याची शक्यता जास्त, आणि का नाही?;) (चांगल्या रितीने) पैसे मिळवण्यात गैर ते काय?

In reply to by नगरीनिरंजन

अजीबात नाहि पटला. जे लोक प्रामणिकपणे प्रयत्न करताहेत त्यांना आमीरच्या शो मुळे काहि नुकसान होणार नाहि, झाला तर फायदाच होईल. समाजसेवेवर मनोरंजन कब्जा करेल काय या भितीऐवजी मनोरंजनावर समाजसेवेचं कलम चढलय हे ध्यानात घ्यायला हवं. टीव्ही माध्यमाची मुळ जबाबदारी मनोरंजनच आहे. या मनोरंजनाच्या खिडकितुन जर सामाजीक सत्याला वाचा फोडायला स्कोप मिळत असेल तर ते स्वागतार्हच म्हणावं लागेल. एवीतेवी आमीरखान वगैरे मंडळी लोकांच्या मनावर मनोरंजनाच्या माध्यमातुनच कब्जा करताहेत... तर त्यांच्या डोक्यावर समाजसेवेची टोपी चढवुन लोकांच्या मनात सामाजीक प्रश्नांना चंचुप्रवेश मिळत असेल तर काय वाईट?? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

......समाजसेवेवर मनोरंजन कब्जा करेल काय या भितीऐवजी मनोरंजनावर समाजसेवेचं कलम चढलय हे ध्यानात घ्यायला हवं..... अर्धवटराव यांचेशी सहमत.... थोडी अवांतर गंमतः कुणाला हा शो बंद पाडायचा असेल तर एक कल्पना: हुंड्यावरील शोमध्ये रडणार्‍या, पीडित महिला या हिंदु, पंजाबातील तीस हजार पीडित तरुणी हिंदु, याउलट शो मध्ये शामिल मुसुलमान महिला बुरख्यात असूनही (किंबहुना त्यांचे मुस्लिमत्व अधोरेखित करण्यापुरताच बुरख्यांचा वापर)चेहरा न झाकलेल्या, स्मार्ट, हसर्‍या... बर्‍हाणपुर मधील मुस्लिम समाजाचे पुरोगामित्व, आमिरला "आप कुर्बानी दे रहे हो" वगैरे भाव देणे, (एका एपिसोड चे तीन कोटी रुपये घेण्यात "कुर्बानी" कसली, हे त्या सर्वशक्तिमान परवरदिगारलाच ठाउक).... ..........ही कल्पना योग्य त्या गोटात पसरवणे...

छान छान!!.. लेख आवडेश!..... ही १०० वी प्रतिक्रिया!!!!! अभिनन्दन!!! :)

आजचा भाग वैद्यकिय क्षेत्रातल्या नैतिकतेवर होता. आजच्या भागात अतिशय उपयुक्त माहिती समोर आली आहे. डॉ. समीत ह्यांनी 'जनरीक मेडीसिन' नावाचा एक प्रकल्प राजस्थान सरकारच्या मदतीने चालू केला आहे. माझ्यामते आपण सर्वजण डॉक्टरांकडे ही जनरीक मेडीसिन प्रिस्क्राइब करायला सांगून हा उपक्रम महाराष्ट्रातही चालू करण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्यामध्ये दिलेल्या उदाहरणाप्रमाणे १.५ लाखाचे डायबेटीसच्या औषधाच्या पॅकची जनरीक मेडीसिन ची किंमत ८,०००-१०,००० इतकी होते आणि औषधांचे इंग्रेडियंट्स तेच असतात. ३५,००० कोटी रूपयांची वार्षिक निर्यात ह्या जनरीक मेडीसिन ची भारतातून होते आहे. ह्याचा पाठपुरावा आपण करू शकतो. डॉ. शेट्टींनी दक्षिण भारतात लो कॉस्ट हेल्थ इंश्युरन्स स्कीम तिथल्या सरकार मार्फत केली आहे जी देशभर जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न ते करीत आहे. आंध्रात ७०% तर तामिळनाडूत ६०% जनता ह्या स्कीमचा फायदा घेत आहे. मुख्य मुद्दा ह्या भागातून समोर आला तो म्हणजे, वैद्यकिय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायाभूत उभारणीची जरूर नसून, योग्य ती माहिती सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे आणी त्या सर्वसामान्यांनी त्याचा पाठपुरवा करायला हवा. - ( एकेकाळी मेडिकल रॅकेटला बळी पडलेला) सोकाजी

डॉक्टरांचा गोरखधंदा या विषयी अनेकदा छापून येत असते. आपले मिपाकर भड्मकर मास्तरांनी मिपावर संपादकीय लिहितांना ”आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता....यावर दोनहजार आठलाच लिहिले होते त्याची आठवण होत आहे. डॉक्टर तुमचे दोन विषय आत्तापर्यंत आमिरखाने हाताळले आहेत. :) आजच्या सत्यमेव जयतेच्या भागात सोत्रींनी वर विशेष असा सारांश टाकलाच आहे. किरकोळ आजारी असणार्‍यां रुग्णांना कसं फसवल्या जातं. एका डॉक्टरचा अन्य रेफर करणार्‍या डॉक्टरांशी असलेला सबंध, डॉक्टरांचा औषध कंपन्यांशी असलेले साटेलोटे. औषधांचे भरमसाठ भाव आणि बोगसडॉक्टरांवर कार्यवाही का होत नाही. तसेच मेडिकलला जाणारी पिढी जी डोनेशेन देऊन जात आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात ? खासगी महाविद्यालये आणि शासकीय महाविद्यालये यांची एक तुलनात्मक चर्चा वगैरे अशा तर्‍हेने आजचा माहितीपूर्ण भाग संपन्न झाला. आमिरखानचा दीर्घ पॉज वगैरे मला हसू येतं राव. पण चालायचंच. कोंबडा आरवल्याशी मतलब असल्याने आपण सालं कार्यक्रम गंभीरपणे बघत आहोत. -दिलीप बिरुटे

नालायक डॉक्टर्स आहेत.. फक्त स्वतःचे खिशे भरायचे दुसरं काही नाही. आमचाही एक अनुभव इथे शेअर केला होता तो सापडेना म्हणुन इथे लावलंय.

जातीतील आणि आंतरजातीय प्रेम विवाह. या निमित्तानं प्रेम विवाह करणार्‍यांना काय काय अडचणींना सामोरे जावे लागते त्यावरील उहापोह करणारा आजचा भाग. आजच्या भागात सर्व भावनिक विषय असल्यामुळे आणि दु:खाचे विषय असल्यामुळे मला लैच आणि सारखं सारखं गहिरवरुन येत होतं. -दिलीप बिरुटे (हळवा) आमिरखानच्या टीमला यापेक्षाही सामाजिक विषयांच्या बाबतीत उत्तम असे विषय पुढील कार्यक्रमात घ्यावे लागतील. आजच्या कार्यक्रमातही भावविवश होणार्‍या प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर क्यामेरा उत्तम फिरला आहे. प्रेम विवाह करणार्‍यांना काही काळापूरते पोलीसांचं संरक्षण मिळतं. असं असलं तरी काहींना आपला जीवही गमवावा लागतो. सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतं. परंतु अशा विवाहांच्या बाबतीत आता काही सामाजिक बदल स्वीकारले पाहिजेत असा ठाम संदेश देण्यात आजचा भाग यशस्वी ठरला काय याचे माझे उत्तर नाही, असेच आहे. -दिलीप बिरुटे (तटस्थ)

पुण्याच्या १५ डॉक्टरांची नोंदणी रद्द? डॉ. अनुराधा संत, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. एन. सी. आंबेडकर, डॉ. लक्ष्मीकांत शहा, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस. एम. हडीर्कर, डॉ. एम. एच. शेठ, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. विलास गायकवाड, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अनुराधा केळकर, डॉ. गणेश गाडगीळ, डॉ. अरविंद कुलकणीर् (सर्व पुणे) आणि डॉ. मोहन नागणे (पिंपरी चिंचवड) या पुण्यातील पंधरा डॉक्टरांच्या विरोधातही व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे शिफारस करण्यात आली आहे. सत्यमेव जयते! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

वा वा खुपच चांगली बातमी की. खालील लोकांची नोंदणी रद्द झाली आहे ना? डॉ. अनुराधा संत, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. एन. सी. आंबेडकर, डॉ. लक्ष्मीकांत शहा, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस. एम. हडीर्कर, डॉ. एम. एच. शेठ, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. विलास गायकवाड, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अनुराधा केळकर, डॉ. गणेश गाडगीळ, डॉ. अरविंद कुलकणीर् (सर्व पुणे) आणि डॉ. मोहन नागणे (पिंपरी चिंचवड) या पुण्यातील पंधरा डॉक्टरांच्या विरोधातही व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे शिफारस करण्यात आली आहे. सुदाम मुंडे आणी सरस्वती मुंडे या महानालायक लोकांवर तर अटक वॉरंट जाहीर झाले आहे. किती छान नै?

शारिरीक द्रष्ट्या अपंग असलेले मनाने इतरांप्रमाणेच सक्षम असतात त्यांना इतर माणसांप्रमाणे माणूस म्हणून वागवले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी समान संधी दिली पाहिजे. अपंगाकंडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. चित्रपटांमधे अपंग म्हणजे भिकारी, गाणे म्हणनारे, असे दाखवण्याऐवजी सक्षम असे दाखवावे, असा संदेश देणारा आजचा सहावा भागही संपला. आजच्या भागात एका लहान मुलीला तिच्या शारीरिक व्यंगासहित दाखवून लोक तिच्याबद्दल कसा वाईट व्यवहार करतात हे पाहतांना वाईट वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपंग मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे शाळेत प्रवेशाबद्दल मत मागविले गेले. अपंग मुलांना शाळेतही इतराप्रमाणेच प्रवेश दिला पाहिजे. परंतु काही मुख्याध्यापकांची अशी तक्रार होती की, अशा मुलांना पाहून बाकीचे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसतात तेव्हा अशा मुलांच्या प्रवेशाबद्दल आमिरने आज प्रेक्षकांची मत मागवली. मला वाटतं हा एक वेगळा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, आपल्याला या बद्दल काय वाटते. सवडीनं माझं मत इथे डकवतोच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्या मुख्याध्यापकांनी अशी तक्रार केली त्यांच्याकडे याविषयीचा डेटा आहे की "त्यांना असं वाटतं की लोकांना तसं वाटेल" या प्रकारचं मत आहे? एपिसोड बघेनच. बाकी शारीरीक व्यंगाचा बुद्धीशी काय संबंध? शारीरीक व्यंग असलेले रीटार्डेड असतात असं नाही. मी आमच्या शाळेत अन कॉलेजात शारीरीक व्यंग असलेले विद्यार्थी पाहीलेले आहेत. सगळेजण त्यांच्याशी सर्वसामान्यच वागताना बघितल्याच आठवतंय. एक विद्यार्थी तर पुर्णपणे शारीरीकदृष्ट्या दुर्बल होता. त्याची आई त्याला सगळीकडे मदत करायची. उत्तरपत्रिका लिहिताना लेखनिक म्हणुन कोणी विद्यार्थी दिला जायचा अन परीक्षेसाठी जिम वापरली जायची. खरं तर हा चर्चेचा विषय असु शकतो हेच कधी मनात आलं नाही.

In reply to by शिल्पा ब

जि.परिषदांच्या शाळेंमधे अशी अडचण येणार नाही. महाविद्यालयांमधेही नाही. मी अनेक विकलांग मुले महाविद्यालयीन शिक्षण घेतांना पाहिले आहेत. अपंगांसाठी शिष्यवृत्तीही असते त्यामुळे शासकीय शाळेची ही गोष्ट नसावी, ही गोष्ट खाजगी शाळांची असावी. >>>>>मुख्याध्यापकांनी अशी तक्रार केली त्यांच्याकडे याविषयीचा डेटा आहे की "त्यांना असं वाटतं मुख्याध्यापकांना असं वाटतं अर्थात हे असं का वाटतं तर आलेल्या अनुभवामुळेच वाटतंय. माझा अंदाज की अशी एखादी मुलगी [सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमात दाखवलेली मुलगी. हा फोटो मी नंतर काढणार आहे] मुली-मुलांच्या शेजारी बसणे वगैरे इतर सामान्य मुलांना अडचणीचे वाटत असावे. आपली दृष्टीच तशी असते. बर्‍याचदा आपली मुलं शाळेत असा कोणी मुलगा असला की सांगतात. तेव्हा, विकलांग मुलांची काळजी घेण्याची सोय खासगी शाळांमधे किती असावी ते माहिती नाही. अशा शाळेंना पैसा खोर्‍याने ओढायचा असल्यामुळे अशा सोयी सवलती शाळांमधे देणे त्यांना गरजेचे वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की उच्चभ्रू लोकांच्या जमातीला असे वाटत असावे की, आम्ही शाळेच्या वाटेल तितक्या फिया भरतो तेव्हा आमच्या मुलांना आमच्या बरोबरीच्या मुलांबरोबर शिकवायला पाहिजे तसेच सर्व मुले निरोगी असणारी सुदृढ अशी असावीत अशा अपेक्षेने कदाचित मुख्याध्यापकांचे मत तसे बनले असावे. >>>>> बाकी शारीरीक व्यंगाचा बुद्धीशी काय संबंध ? शारीरिक व्यंग असलेल्या मुलांचा बुद्धीचा काही संबंध नसेल परंतु काही मंद बुद्धीची असू शकतील. अशावेळी अनेक समस्या निर्माण होत असाव्या असे वाटते. बाय द वे, तुमच्या अमेरिकेत विकलांग मुलांच्यासाठी काही विशेष सोयी असतात काय ? काय पद्धत अशा मुलांसाठी ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

http://www2.ed.gov/about/offices/list/ocr/504faq.html#protected इथे पहा. मला एवढंच माहीती आहे अन अनुभवलं आहे की लोकं डीसएबल्ड पब्लिकला वेगळी- निम्न वागणुक देत नाहीत. त्यांच्यासाठी बहुतेक सगळया सार्वजनिक ठीकाणी सोयी असतात. उदा. रॅम्प - व्हीलचेअर साठी, दाराच्या उजव्या बाजुला ब्रेल लिपीत सुद्धा सुचना/ नाव/वगैरे असते. नोकरीत अथवा इतर कुठे केवळ अपंगत्व आहे याकारणाने डीस्क्रीमीनेशन केले तर ते बेकायदेशीर आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं आपली संवेदनशिलता फक्त अपंगांना 'हँडीकॅप' किंवा 'डिजेबल' न म्हणता 'फिजिकली-विजुअली चॅलेंज्ड' म्हणण्याइतपतच आहे. इतर पालकांचं काय मत आहे वगैरे पळवाट आहे. मुळात लोकं बदलली पाहिजेत, मानसिकता बदलली पाहिजे हे कागदावर ठिकंय. पण याची सुरुवात जर व्हायला हवी असेल तर वरूनच. त्याबरोबरच लोकजाग्रूती वगैरे होत राहील. नुसत्या लोकजागृतीवर विसंबून राहिलो तर सद्य परिस्थिती पाहता हे व्ह्यायला शेकडो वर्षे लागतील. त्यासाठी प्रत्येक शाळा अपंग विद्यार्थ्यांसाठी खुल्या पाहिजेत आणि कुठल्याही पालकाची तक्रार आली तर शहानिशा करून त्या संस्थेवर कारवाई व्हायला हवी. या कार्यक्रमाचं एक शक्तीस्थान म्हणजे टीम नी पुढची टिका काय असेल याचा विचार करून त्यावर आधिच टिप्पणी असते. म्हणजे आज आमिरनी म्हणल्यासारखं भारतापुढे आधिच एव्हड्या समस्या असताना अपंगांसाठी काय वेगळं करायचं असंही लोकांना वाटू शकेल असं विचारलं.

In reply to by दादा कोंडके

प्रत्येक शाळा अपंग विद्यार्थ्यांसाठी खुल्या पाहिजेत आणि कुठल्याही पालकाची तक्रार आली तर शहानिशा करून त्या संस्थेवर कारवाई व्हायला हवी. करेक्ट. खासगी शाळांमधून असे सांगोवांगी कळाले तरी कार्यवाही व्हावी. नुसत्या चर्चा करुन काय होईल. शाळेंवर कार्यवाही करण्याची वेळ आली तरी प्रशासकीय कामकाज पाहता कार्यवाही होईल असे वाटत नाही. पटपडताळणीचे पुढे काय झाले आपण सर्वांना माहित आहेच. -दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या सातव्या भागावर प्रतिसाद टाकायचा विसरलो. घरगुती हिंसाचार. विवाहित प्रत्येक दोन स्त्रियानंतर एका स्त्रीला पुरुष मारहाण करतो. मारहानीचे कारण अतिशय किरकोळ असतं. स्नेहलता, रश्मी, या स्त्रीयांनी पंधरा पंधरा वर्ष नवर्‍यांच्या छळ सहन केला आणि शेवटी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे स्त्रियांना कमी लेखलं पाहिजे. स्त्रियांना मारनं म्हणजे पुरुषत्त्व. अनेक पुरुष म्हणाले की, आम्ही स्त्रीयांवर हात का उचलतो. कधी कधी जी गोष्ट करायची नसते ती केल्यामुळे राग येतो आणि म्हणून थापड मारणारा पुरुष या कार्यक्रमात भेटला. कामावरुन परतल्यानंतर जेवण देण्याऐवजी झोपून राहीलेल्या पत्नीला पाहिल्यानंतर तिचे दात तोडणारा नवर्‍याची भेट याच कार्यक्रमात झाली. एकुणच पितृसत्ताक पद्धती आणि परंपरेने हुकुमत गाजवण्याची मानसिकतेमुळे स्त्रियांया या छळाला सामोरं जावं लागतं, अशा एक चर्चेचा सूर आजच्या कार्यक्रमात दिसला. आपल्या लहान मुलांसाठी, आई-वडील, समाज यांच्यासाठी नवर्‍याच्या छळ सहन करणार्‍यांची संख्या अधिक आहे. वरवर सुखी दिसणा-या कुटुंबाच्या आतही असा छळ दडलेला असतो. जोपर्यंत चर्चा बाहेर येत नाही तो पर्यंत तिथे काय चालले आहे, त्याची माहिती होत नाही. अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत संरक्षणासाठी कायदा आहे. कायद्याच्या आधारे पती स्त्रीला घराबाहेर काढू शकत नाही. अशा अत्याचारित स्त्रियासाठी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकीलही असतो, वगैरे. बर्‍याचदा अशी अडचण होते की, अशी अत्याचारित स्त्री पोलीस स्टेशनला जाते तेव्हा पोलीस तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. गुन्हा नोंदवला जात नाही, अशा वेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. शन्नु.... एक स्त्री नवर्‍याच्या मारहानीला कंटाळून आपलं एक नवं जीवन सुरु करते, अशा तर्‍हेने सातवा भागही संपला. बाकी, दुसरा उपप्रतिसाद माझाच पण... थोड्याशा सवडीनं.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीतल्या बर्‍याच सुशिक्षित, कमावत्या मुली, स्त्रीया नवर्‍याकडून मार खातात त्यामुळे मला तर पटला विषय. अमेरिकेतही बर्‍याच बायका नवर्‍याकडून मारहाण सहन करतात असे ऐकले आहे. व्यायामशाळेत भेटलेल्या मैत्रिणीला तिच्या गळ्यावर काळेनिळे बोटांचे ठसे पाहून मी विचारल्यावर ती काही न बोलता (व्यायाम अर्धा सोडून) निघून गेली होती. बाकी माझ्याच प्रतिसादांमध्ये प्रसंगाने आणखी अत्याचारही पूर्वी लिहिले होते. आमीरच्या कार्यक्रमात त्याने सहज केलेला विनोदही खरा आहे. मैत्रिण तिचा नवरा कामानिमित्त दौर्‍यावर गेला की "बरं झालं गेला, मला जरा चार दिवस सुखाचे मिळतील" असे कित्येकवेळा म्हणताना ऐकलीये. माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणीचा नवरा साठाव्या वर्षी अचानक गेल्यावर त्या बाईंची प्रतिक्रिया "सुटले एकदाची!" अशीच (स्पष्टपणे) होती. या सगळ्या स्त्रिया उच्चशिक्षित, श्रीमंत, स्वावलंबी आहेत. टिव्हीवरही एकदा त्या विषयावर कार्यक्रम सुरु होता जो तीन ते चार मिनिटांपेक्षा पाहणे शक्य नव्हते. त्यात एक अमेरिकन बाई (साठ पासष्ठ वर्षांची असावी) तिच्या भयानक आयुष्याबद्दल सांगत होती. डिव्होर्स होऊनही त्यानं धमक्या देणं थांबवलं नव्हतं आणि स्वत:च्या घरात ती बाई दिवस रात्र भीतीच्या छायेत जीवन कंठत होती.

In reply to by रेवती

निकोला जेम्सचे The Price of Love वाचुन तर अंगावर काटा येतो. एखादा माणूस किती विकृत आनि रानटी असु शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे. ते पुस्तक वाचुन Sleeping with the Enemy (आणि त्याची कॉपी अग्निसाक्षी) अगदीच् बालिश वाटायला लागतो.

In reply to by रेवती

स्त्रीयांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा-२००५ (दुव्यावर बरीच माहिती आहे) अंतर्गत बरीच सुरक्षा आहे. आपल्या प्रतिसादावरुन म्हणता येतं की, जगभर स्त्रीयांना या छळाला सामोरं जावं लागत असावं. घरगुती हिंसेला केवळ नवराच जवाबदार असतो असं काही नाही. कालच्या भागात जवळ-जवळ नवराच अशा छळाला जवाबदार असतो, असा एक संदेश दिसत होता. अर्थात सासरी सर्वात अधिक सुरक्षित जागा म्हणजे नवरा असतो आणि तोच जेव्हा बेताल वागायला लागल्यावर स्त्रीची मोठी कुचंबना होते. घर सोडलेलं, समाजाचं प्रचंड दडपण. आणि नव्या कुटुंबात होणारी वाताहात, तेव्हा ती काही निर्णय घेत नाही, सर्व जाच सोसल्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरत नाही. कालच्या सत्यमेव जयतेच्या भागात सामाजिक अंगाने थोडी चर्चा व्हायला पाहिजे होती. स्त्रीयांना बरोबरीचे स्थान, मानाचे स्थान, याचबरोबर पुरुष जसा काही ठिकाणी चुकत असेल तर काही ठिकाणी स्त्रीही चुकतच असेल. [कोण चुकतं म्हणुन वाद घालायचा नाही] पण, स्त्री आणि पुरुष दोघांच्या ठिकाणी असलेले अहंकार आणि नव्या समाजाच्या मांडणी आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्थेतील कुत्तरओढ हेही अशा हिंसाचाराचे मुळ आहे. स्त्री कर्ती झाली असेल तर तिच्याठिकाणी मी हे सर्व करते असा एक अहंकार डोकावतो कौटुंबिक वादाची ठिणगी पडत असावी, अर्थात स्त्रीयाच दोषी आहेत अशा माझा विधानाचा आशय नाही. अशा मताला माझ्याकडे काही विदा नाही. पण, एकदम नॉर्मल असणारी स्त्री एका क्षणात बदलते तिच्या वागणुकीत, चेह-यात, बोलण्यात, एकदम फरक पडतो. असेच पुरुषाच्या बाबतीतही होत असते अशा समस्यांमागे काही मानसिक कारणे असतात अशा मानसिक कारणांचा शोध घ्यायला हवा होता, असे वाटले. असो, या विषयावर जालावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. याच धाग्यातही कोणी तरी प्रतिसादात म्हटलं आहे की भारतातील समस्या त्याच आहेत फक्त नव्याने तुमच्या- आमच्यासमोर येत आहेत. कालच्या भागात मला वाटतं फक्त स्त्रीयांना घरगुती हिंसाचार कायद्याची माहिती सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आमिरखान करत होता, आता या कायद्यामुळे किती स्त्रिया अशा कायद्याचा आधार घेऊन अशा छळाचा बंदोबस्त करतील आणि सुखी होतील हे आमिरखान आणि सत्यमेव जयतेवाली टीमच जाणो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घरगुती हिंसेला केवळ नवराच जवाबदार असतो असं काही नाही. सहमत. सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद इ. लोकही जबाबदार असतात. ;) मुख्य म्हणजे सगळेजण आपला राग, वैफल्य कोणावर तरी काढायचा प्रयत्न करत असतात. पुरुष जसा काही ठिकाणी चुकत असेल तर काही ठिकाणी स्त्रीही चुकतच असेल नक्कीच. स्त्रीया नक्कीच चुकतात, जसे पुरूष चुकतात पण चुकीची जाणीव करून देण्यासाठी नवर्‍याला बायको रोज धोपटून काढते किंवा मुलीचे भाऊ, वहिन्या, आई, वडील जावयाला लाथाबुक्क्यांनी तुडवतात असे कितीसे दिसते? नवर्‍यांच्या चुकांसाठी त्यांच्या वाट्याला शारीरिक, मानसिक जाच कितीसा येतो? बायको गर्भार बघायची नाही की लहानगं लेकरू बघायचं नाही आणि मारत सुटायचं, जिन्यावरून ढकलून द्यायचं ही विकृतीच आहे. या कायद्यामुळे किती स्त्रिया अशा कायद्याचा आधार घेऊन अशा छळाचा बंदोबस्त करतील आणि सुखी होतील अगदी नगण्य प्रमाणातही कायद्याचा वापर केला जाणार नाही असे वाटते. यावर याच धाग्यात मी म्हटले होते. फरक पडणार नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही का? न जाणो एखादी दुसरी या यमयातनातून मोकळी होईल.

In reply to by रेवती

>>न जाणो एखादी दुसरी या यमयातनातून मोकळी होईल. -- असं झालं तरी ही संपूर्ण मालिका सफल झाली माझ्याकरता. १००% सुधारणा कधिही कोणिही कुठल्याही उपायाने करु शकत नाहि. पण कुठलाही प्रयत्न, अल्प - स्वल्प का होईना, फरक नक्की पाडतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गावाकडे माझ्या पाहण्यात एक स्त्री आहे. नवरा असला त्रासदायक अन कुचकामाचा म्हणुन सरळ त्याला सोडुन स्वतःच्या लेकीला वाढवते आहे. घरची कामं करते, जमेल ते काम करते. समाजाकडुन काही त्रास नाही तिला. अन अजुन एक स्त्री - मुंबईत- भरपुर पगाराची नोकरी - नवर्‍याने सोडलेली- आई वडीलांकडे राहते. भाउ, वहीनी त्रास देतात, मारतात. तिचे पैसे घेतात, एकदा तर तिचं मंगळसुत्रसुद्धा काढुन घेतलं अन घराबाहेर काढलं म्हणुन आमचं दार वाजवुन रडत होती. कोणावर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही म्हणुन स्वतः खमकं राहुन स्वतःच्या लेकरांना स्वावलंबी अन धीट करणं तर आपल्याला शक्य आहे ! कीतीकाळ रडारडी करणार? प्रत्येकाला स्वतःचे उद्योग, दुसर्‍याच्या लफड्यात कोण पडणार?

शेती-मालावर किटकनाश फवारणीमुळे त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम. नैसर्गिक खतामुळे आणि उपायांमुळे शेती उत्पन्नात कशी वाढ होते. आणि ते आरोग्यासाठी ते कसे चांगले असते. सिक्किम सरकारनं जैविक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. वगैरे वगैरे. आता प्रश्न असा आहे, की किटकनाशक फवारणीमुळे शेतीचे उत्त्पन्न वाढतं आणि जैविक खतांमुळे शेती उत्त्पन्न कमी होते. आता अशा वेळी आरोग्याचा विचार करण्याचा प्रयत्न काही राज्यामधे चालु आहे, अशा वेळी शेतकरी कोणता मार्ग निवडेल, काही सांगता येत नाही. च्यायला, मला आजचा विषय समजलाच नाही, माझा तरी गोंधळ झाला. गोंधळातून थोडं सावरल्यावर जमलं तर माझ्याच प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहीन. तो पर्यंत कोणी जाणकारांनी ’हरीत क्रांती’ आणि निमित्तानं स्पष्टीकरण केलं तर बरं राहील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय समजला तरीही मी शेतकरी नसल्यानं जाणकार नाही म्हणून येणारे प्रतिसाद वाचीन म्हणते. पंजाबात कीटकनाशक (अजैविक) फवारणीचं प्रमाण भरपूर आहे. माझ्या तिथे राहणार्‍या नातेवाईकांनी गंमत आणि प्रयोग म्हणून त्यांच्या घराच्या आगेमागे मोकळ्या (भरपूर) जागेत चार, पाच प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारची कडधान्ये पेरली. माळी ठेवला. अजैविक औषध प्रकार वापरला नाही. किडे जितकं खातील ते खाऊ द्यायचं जे राहील ते आपलं. असे करणे शेतकरी नसल्यामुळे (त्यावर उपजिवीका नसल्याने) परवडेल म्हणून प्रयोग करण्याचे ठरवले. कीड पडलीच पण त्यानंतरही घरगुती प्रकाराने काढलेले कडधान्य लोकांना वाटून, स्वत:ला वर्षभराचे ठेवून संपेना. भेंडी, वांगी व आणखी भाज्या वर्षभरात एकदाही बाजारातून आणाव्या लागल्या नाहीत. दोन वर्षं हा प्रयोग केला. नंतर साठवणूक आणि आणखे काही प्रश्न आले असतील म्हणून बंद केला पण आपण छोटी शेती करू शकतो ही गंमत अनुभवता आली. हौस म्हणून आत्ता मी कोथिंबीर, टोमॅटो, बेसील, कढीपत्ता लावला आहे. छान आलाय. ;)

"टॉक्सीक फूड" हा विषय असेल असं वाटलं नव्हतं. पण चर्चेमुळं एकुणच गांभिर्य कळालं. भ्रष्टाचार आणि लोकसंख्या या शिवाय भारतात प्रचंड प्रमाणात भेडसावत असणार्‍या कोणकोणत्या समस्या आहेत हे कळतंय. मला वाटत होतं की रासायनिक किटकनाशक आणि खतं यामुळे थोडासा साईड इफेक्ट होत असेल पण मोबाइलच्या/हायटेंशन लाईन्सच्या रेडीएशन सारखंच अतिशयोक्ती करून त्याचे परिणाम दाखवले जातात. आणि खूपवेळी खणखणीत वैज्ञानीक पुराव्यांऐवजी स्टॅटीस्टीकल अ‍ॅनॅलिसीस केलेलं असतं जे १००% विश्वासार्ह नसतात. आणि त्यांचा उपयोग बघितला तर साईड इफेक्ट्सकडे एक कोलॅटरल डॅमेज म्हणून दुर्लक्ष करू शकतो. पण सत्य वेगळच आहे. अगदी कागदोपत्रीसुद्धा भाजीपाला/फळं यांमधल्या किटकनाशकांचं प्रमाण तपासणारी यंत्रणाच नाहिये. इतर देशात बंदी असलेली किटकनाशकं सर्रास प्रमाणित केली जातात, केरळमधला प्रकार आणि पंजाबमधली कँसरट्रेन बघून वाईट वाटलं. :( अवघड आहे.

प्रतिक्रिया मोठ्याने वाचून दाखवा प्लीज :) सगळीकडे हीच चर्चा आहे. उपक्रम वर चक्कर टाकली नाही अजून पण मायबोलीवर प्रत्येक भागावर चारशे पोष्टी पडताहेत (अपवाद घरगुती हिंसाचाराचा ;) ) कालच्या भागाचे हिरो श्रॉफच ठरले.

दारुचे दुष्परिणाम. विजय सिन्हा, एक मोठा पत्रकार. आयुष्यात ’एकच प्याला’ आला आणि पुढे त्याचं व्यसन झालं आणि आयुष्य कसं काळाखोत गेलं. समाजातील बदनामी. आणि नंतर पुढे व्यसनापासुन सुटका. अशाच अनुभव असलेल्यांची काही अनुभव आणि दारु पिऊन गाडी चालवू नये, वगैरे. दारु एक आजार असुन त्यापासून सुट्का होऊ शकते. डॉक्टरांची मतं. काही गावात दारु बंदीचा असलेला अधिकार वगैरे आणि थर्टी एमएल घेतली तर ठीक आहे, असं सांगुन आजचा भाग संपला. सत्यमेव जयते हा कार्यक्रम 'यशस्वी' झाल्यामुळे 'सत्यमेव जयते पार्ट २' येत असल्याची बातमी आजच वाचली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या नावामागे डॉ. नसते तर आमिर खानच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणारे तुमचे प्रतिसाद वेगळे झाले असते अशी शंका वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

प्रा.असता तर प्रतिसाद कसे झाले असते, डॉ. असता तर प्रतिसाद कसे झाले असते, दिलीप असता तर प्रतिसाद कसे झाले असते, बिरुटे असता तर प्रतिसाद कसे झाले असते, असा विचार करण्याऐवजी सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाविषी आपलं मत काय ते लिहिले असते तर समजायला मदत झाली असती आणि समजा सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाविषयीचा काहींचा (माझाच) सूर कसा न पटणारा आहे, आणि त्यामुळे देश कसा बुडणार आहे, असे स्पष्ट लिहिले असते बरे झाले असते असे वाटले. -दिलीप बिरुटे