Skip to main content

"अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी"

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 07/07/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं.. मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात.... आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)... आणि एक दिवस अचानक "ती" भेटली. तशी माझी आणि तिची भेट एका लग्नातली. ना मी तिला ओळखत होतो, ना ती मला. पण म्हणतात ना, कोणी आपल्या आयुष्यात येणार असेल तर, काही का होईना, ती व्यक्ती येतेच येते. तर अशाच एका मित्राच्या लग्नात ती दिसली. साधी, सरळ, निटनेटकी. केस "बडे अच्छे लगते है" टाईप एका खांद्यावर घेतलेले, कसलाही भपकेबाजपणा नाही. सहजंच अशी नजर गेली आणि सर्रकन एक विचार मनात आला, बास्.. लाईफ पार्टनर असावी तर अशी. बोलणं तर लांबच होतं कारण ओळख नव्हती. मग फक्त नजर भिरभिरू लागली. मित्राचं लग्न लागलं, जेवणं झाली, आणि मीपण निघालो. आलो घरी. पण काही केल्या तिचा चेहरा नजरेसमोरून जात नव्हता. असेच मग दोन-तिन दिवस तिची ओळख कशी काढू या विचारात गेले, पण सत्यानाश सगळा. एकही क्लू लागत नव्हता. असाच मग संध्याकाळी ऑफीसातून लवकर घरी आल्यावर त्या मित्राचे लग्नातले काही फोटो फेसबुकवर अप केले, आणि त्या मित्राला टॅग केल. आणि म्हणतात ना, की एखाद्याचा खरंच मनापासून विचार केला तर नसलेले मार्गही समोर येतात.. तसंच झालं. "ती" माझ्या मित्राच्या फ्रेंडलिस्टमधे होती आणि त्याला मी टॅग केलेल्या फोटोवर तिची कमेंट आलेली. आणि नंतर चक्क मला तिने पाठवेलेली रिक्वेस्ट हे सांगून की सुंदर फोटोग्राफ्स. हवेत उडायचा बाकी होतो फक्त. अहो बरोबर आहे ना, कसलाही दुवा नसतांना समोरून तिने अ‍ॅप्रोच होणं हे कसलं भन्नाट आहे.. :) तर, असेच दिवस सुरू झाले, मग चॅट, नंबर दिले गेले आणि मस्त एका रिलेशनशिपला सुरूवात झाली. फुलऑन खुशीत होतो मी. मग तिचाच विचार, काय आवडेल काय नाही... मग एक-दोन वेळा भेटलो. लाईफ सुसाट एकदम. हो पण तरी ते CCDचं वाक्य मात्र डोक्यात पिंगा घालतंच होतं. असंच एका रात्री एक मस्त आयडीया डोक्यात आली. दुसर्‍या दिवशी तिला फोन करून सांगितलं की, या आठवड्यात ऑफिसला दांडी मार आणि चल माझ्याबरोबर. अर्थातंच पुढचा प्रश्न होता, कुठे? मी: कॉफी प्यायला ती: अख्खा दिवस का मग? मी: तू चल गं. प्रश्न विचारत नको बसू. ती: पण अगोदर कुठे ते तरी सांग, नाहीतर येणार नाही मी (टिपीकल बायकांची डोकी) मी: तू भेट. मग सांगतो. ती: ठिक आहे. सांगते पण आता नाही. नंतर दोन-तीन दिवस असेच हा......... मग ही म्हणाली की, १ जूनला जाऊया. झालं. ठरलं होतं तर. आदल्या रात्री सगळी तयारी केली आणि हिच्या कन्फर्मेशन मेसेजची वाट बघत बसलो. वेळः रात्री १०.३० अंदाजे आणि मेसेज आला. उद्या सकाळी ९.३० ला गोरेगाव चेक नाका. मेसेज वाचला, रिप्लाय दिला आणि दिली पडी मारून. पण झोप खरंच लागणार होती का :) ? सकाळी अस्मादिक ९ला हजर. तीपण लवकरंच आली (बरं झालं, नाहीतर ट्रॅफिक वाट लावणार होतं). ती आली, भेटली आणि मग मारली बाईकला किक. निघालो. आता मात्र सगळीकडे हायवेज दिसायला लावल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू, ती: कुठे चाललोय आपण? मी: कळेल ना गं. शांत रहा. ती: अरे पण कुठे?? मी: थांब जरा. धीर धर. समजेल ती: तू सांग आधी. मी: थोडं पुढे गेलो की सांगतो नक्की. ती: शांत. पनवेल आल्यावर मात्र तिचा धीर सुटला आणि म्हणाली की अरे हे तर पनवेल आलंय, आतातरी सांग आपण कुठे चाल्लोय मी: कॉफी प्यायला ती: अरे.............. हो पण कुठे मी: खंडाळा ती: किंचाळून खंडाळा???????? मी: हो. तू कॉफी म्हणाली होतीस. कुठे.. ते थोडीच सांगितलंस ती: शांत............................... सुसाट बाईक मारत होतो. ही मागे शांत एकदम. खंडाळा आलं पण हवा तो स्पॉट मिळेना. तसेच पुढे लोणावल्याला गेलो. ९.३० ला निघालेलो आम्ही १२ ला लोणावळ्यात होतो. तिथे एका होटेलमधे थोडा स्नॅक्स घेतला. बसलो जरावेळ. फ्रेश झालो. पाय दुखत होता कारण आदल्या दिवशी डाव्या पायाच्या अंगठ्याला खाच्च्कन काच कापून गेली होती. स्टिचेस होते आणि त्यामुळे गिअर टाकायला थोडा त्रास होत होता. सहज म्हणून शूज काढला तर चांगला व्यासभर इंचाचा रक्ताचा डाग सॉक्सवर दिसत होता. पण एनिवेज. तिच्यासाठी वाट्टेल ते. पण माझा प्लॅन??? बाहेर आल्यावर एका काकांना विचारलं की, इथे लायन्स व्ह्यू पॉईंट कुठे आला? ते म्हणाले की पुढून डावीएकडे सरळ जा. हिला म्हटलं चल. लोणावळ्यापसून पॉईंट २४कीमी वर. मस्त रोड होता. ती: अरे हा रोड कधी संपणार रे मी: मलापण माहीत नाही गं. पण थांब संपेल. एकदाचा पॉईंट आला. दुपारचा १ वाजला असतांनाही तिथला सोसाट्याचा वारा मी म्हणत होता. मस्त हिल पॉईंट, बोटावर मोजण्याइतकी माणसं आणि आम्ही दोघे. बाईक लावली आणि पॉईंटवर गेलो. तर तिथे असलेल्या एका टपरीतून एक १५-१६ वर्षांचा मुलगा चट्कन धावत आला तो: साहेब काय घेणार? भजी, चहा, कॉफी, भुट्टा? मी: अरे काही नको फक्त तिथे (एक टपरीच होती. पण दुकान वगैरे नव्हतं. आणि वर ताडपत्री अंथरल्याने सावली होती) दोन खुर्च्या ठेव. मग आम्ही दोघे, रेलिंगजवळ गेलो. जाम खुश दिसत होती. तिच्या केसांशी खेळणारा वारा आणि तिची आपली केस सावरण्याची धडपड मी एंजॉय करत होतो. ती: इथे?? मी: कॉफी ती: ?? मी: बॅगपॅक उघडली, त्यातून थर्मोस काढला, दोन कप आणि दोन सॉसर्स काढले आणि कॉफी मॅटवर ठेवले. ती फक्त बघत होती. एका खुर्चीवर ती असल्याने साहजिकंच मी माझ्या खुर्चीवर माझं दुकान? मांडलं होतं. कॉफी कपमधे ओतल्यावर जेव्हा मी म्हणालो, कॉफी... आणि त्यावर तिने नुसतं हसून दिलेलं उत्तर जाम वेड लावणारं होतं. ती: हे एवढं?? मी: तुझ्यासाठी ती:पाय इतका दुखावलाय तरी का आलास? मी: हे बघ यावेळी माझ्या दुखण्यापेक्षा, तुझं सुख जास्त महत्वाचं आहे. सो लेट इट बी. एम् ओके. ती: परत एकदा शांत.... कोणी नव्हतं त्यावेळी तिथे. फक्त मी, ती आणि तो पॉईंट. विचार करत होतो की वेळ इथेच थिजली तर किती बरं होईल. मग गप्पा सुरू झाल्यावर मी म्हणालो; मी: इतकी गप्प का आहेस? ती: अरे मी कधी इतक्या लांब आलेले नाही ना. ठरवलं होतं की, कितीही जवळचा मित्र असला तरी मुंबई बाहेर जायच नाही. आणी आज माझाच विश्वास बसत नाहीए की मी इथे तुझ्याबरोबर लोणावळ्यात आहे. मी: शांत मी: काहीतरी वेगळं करायच होतं जेणेकरून तू आजचा दिवस नेहमी लक्षात ठेवशील. म्हणून इथे आणलं ती: फक्त हसली साधारण ३ वाजता तिथून निघालो कारण घरच्यांसाठी ती ऑफिसात होती ना. मग वेळेत घरी सोडायला नको. निघतांना बाईकला किक मारली तर ती सुरूच होईना (मनात म्हटलं, झाली काशी. आता बस बोंबलंत. खाज होती ना इतकं महागलेलं अरेरे पेट्रोल भरून इतक्या लांब यायची) पण झिडकारला तो विचार आणि मनातच म्हणालो कि तिच्यासाठी काहीही.. नशीब बाईक सुरू झाली. आणि परतीचा रस्ता धरला. प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यभराची एक सुंदर आठवण तिला दिली होती. ६ला पवई ला परत थोडं खाल्लं आणि मग आरे रोडने गोरेगाव चेक नाका शार्प ७ ला. म्हणजे परफेक्ट होत एकदम. तिला जरी सोड्लं तरी मी मात्र अजून तिथेच त्या पॉईंटवर होतो. तिचा अजूनही विश्वास नव्हता की आम्ही लोणवळ्याहून आलेलो होतो यावर. घरी आलो, आंघोळ केली रिलॅक्स झालो. एकदा मेसेज करून विचारलं, बॅक पेन वगेरे??? ति म्हणाली की आहे थोडं पण वुड बी फाईन. नंतर काही दिवसांनी प्रपोज केलं, अपेक्षेप्रमाणेच उत्तर मिळालं :) . आता ते कसं, हे सांगेन सविस्तर पुढे कधीतरी. सध्या वाट बघतोय तिची. ती माझी होईल ही खात्री आहेच. ती माझी, ती माझी म्हणतांना, मी तिचा कधी झालो तेच कळालं नाही. आणि झालो तो पण असा की, यापुढचे सगळे जन्म, फक्त ती आणि तिच्यासोबतंच. दरवेळी ती विचारते की अरे काय हे.... आणि मी फक्त एवढंच म्हणतो, "तुमच्यासाठी काहीही" Now i understand, "What can happen over COFFEE!!!!" ===================================================================== नोटः वाचतांना काही चित्रपटांचा संदर्भ लागू शकतो. ते संदर्भ जसेच्या तसे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न्त होता हा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5221
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

In reply to by अमोघ शिंगोर्णीकर

अर्थातच सुखांत झाला पाहिजे नाहीतर राखी बांधून घेण्यासाठी का कोणी इतकी खटपट करेल? ;)

कथा छान रंगली आहे. पण Now i understand, "What can happen over COFFEE!!!!" COFFEE चा फंडा नाही कळला?

In reply to by गोंधळी

गोंधळी, अहो त्यासाठीच तर तिला घेऊन गेलो होतो लोणवळ्याला. :) कॉफी चं कारण सांगितलं नसतं तर ती आली असती माझ्याबरोबर i doubt :) आणि पॉईंटवर कॉफी नसती तर, आम्हा दोघातला अबोलका वेळ नुसत्या भावनांत मांडला गेलाच नसता. :)

बास्.. लाईफ पार्टनर असावी तर अशी. हायला, मला प्रत्येक खेपेला असंच वाटतं. बाकी ते लोणावळा, थर्मास, कॉफी वगैरे सगळं 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' मधून ढपल्यासारखं वाटलं. असो. शुभेच्छा.

In reply to by अप्पा जोगळेकर

हायला, मला प्रत्येक खेपेला असंच वाटतं. >>>>>> जाम हसलो राव :) बाकी ते लोणावळा, थर्मास, कॉफी वगैरे सगळं 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' मधून ढपल्यासारखं वाटलं.>>>> हो! बरोब्बर. वर पाहुण्यांनीपण ओळखलंय की. आणि मी ते नुसतं ढापलं नाही तर प्रत्यक्षात उतरवलं. :) थोडं वेगळं केलं.. नेहमीपेक्षा. afterall.. मनासारखं झालं ना.... तेच बेस्ट. :) आभार. कलोअ अमोघ शिंगोर्णीकर

कॉफी पिणार का म्हणलं की, प्यार के साईड इफेक्ट मधला राहुल बोस आठवतो, खुर्चीवर बसुन, ' चुप चुप अभी नही, अभी टाईम है ' असं त्याला सांगणारा....

मस्त लिहिलस. आवडली कथा. लायन्स पॉइंटच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हाच तो लायन्स पाँईट.

नाही तर दंगा घालायला खुलं कुरणच मिळालं असतं.... कधी कधी फिल्मी श्टाईल गोष्टी पण करून पाहाव्यात या मताचा असल्याने कथा आवडली. अमृत

कथा छान रंगलिये, कॉफीसाठी येवढा घाट घातलात ? असो. वर ब्याटम्यान म्हणतो तसा कथेचा शेवट सुखद होवो ही अपेक्षा.

In reply to by सूड

कॉफीसाठी येवढा घाट घातलात ?>> कॉफीची रेशिपी टाक की मग. तू प्रत्येक वेळेस कशीकशी कॉफी केलीस हे वाचायला मिपाकरांना निश्चितच आवडेल! तुझी पद्धत पण कळू दे आम्हाला. ;)

कथा आवडली...

लेख छानच आहे ह्यात वाद नाही. पण खरी घटना असल्यास आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत. मित्रा, प्रेम वगरे ठीक आहे रे, पण आता तुझं लग्न होणार. आणि लग्न झाली की ही सगळी रोमँटिक बुमरँग तुझ्यावर उलटणार. हे घे नमुने: १) तेव्हा मारे खंडाळ्याला नेलंस, आता साधं कोपर्‍यावरच्या बागेत नेत नाहीस. २) आधी स्वतःहून प्लॅन्स बनवायचास. आता मी प्लॅन बनवते तर तुला आठवड्याची झोप पूर्ण करायची असते. ३) तेव्हा बरी जमायचं सुट्टी घ्यायला नी लवकर निघायला. ४) लग्नाआधी तर म्हणाला होतास "तुमच्यासाठी काहीही". आता काय झालं? ह्या प्रत्येक वाक्याचा शेवट "तू बदललास" ने होईल हे ध्यानात घ्यावे. ही सुरुवात आहे. असली पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. नोटः हा धागा माझ्या लग्नाळलेल्या मित्रांना समर्पीत. अमोलला उपेक्षीत नवरे कमिटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

In reply to by आदिजोशी

आय ऑब्जेक्ट. उनक सदस्यत्वासाठीचा आवश्यक 'न' तो झालेला नाही. बाकी आदिजोशी यांनी पाखरु प्रॉपर टप्प्यात आलेलं नसतानाच त्याच्यावर जाळं टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांच्या वर काय अ‍ॅक्शन घेता येईल ते उनकच्या पुढच्या बैठकीत ठरवले जाईल. बैठकीची वेळ.... ठरवताना नाकी नऊ तरी वाजणार हे निश्चित. ;)

In reply to by प्यारे१

ह्यावर उ.न.क.चे कार्यवाह श्री श्री धमालरावजी साहेब ह्यांचे मत ऐकायला आवडेल. उ.न.क.चा संस्थापक ह्या नात्याने मी नवे मेंबर्स मिळवण्याचे अभिनव प्रयोग सातत्याने करत असतो. त्यातलाच हा एक आहे. चिंता नसावी. पाखरू आज नाही तर उद्या गोटात येणारच.

In reply to by आदिजोशी

शमत आहे. काही काळाने " तु बदललास: हे वारंवार कानी पडायला लागेल. त्यानंतर रोज सकाळी दीनवाण्या चेहर्‍याने बायकोला कॉफी करायला सांगणे किंवा ती किचन मध्ये काही काम करत असताना आपण मध्ये लुडबुड करुन कॉफी करुन घेणे हे दोन्ही किती कष्टदायक आहे ते कळेल तेव्हा खरा हिसका बसेल.

सुपातल्या जात्यात ;) .. हा प्रतिसाद आमचे उनक चे अध्यक्ष अदीजोशी यांच्या समर्थनार्थ ;)

>>की वेळ इथेच थिजली तर किती बरं होईल हीच तर गोची आहे ना.. वेळ थांबतच नाय च्या मारी. असो, गोष्ट आणि आदिजोशीचा प्रतिसाद आवडला :)

सध्याच्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन अतिशय हळुवार असलेली कथा ( खरी / कल्पनिक) आवडली.

पण ही काल्पनिक कथा नाही असं दिसतंय. पुढे काय झालं ते आदि जोशीला (स्पेशली) सांगायला विसरू नकोस!