Skip to main content

"प्रयास" वरून आठवलं....

लेखक मन यांनी शनिवार, 30/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853) विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार. तसच लान्स आर्मस्ट्राँगही आठवला. उत्तम सायकलपटू, ऐन उमेदीच्या काळात(१९७१चा जन्म, १९९६ला कॅन्सरचे निदान झालेले) अवघड ठिकाणी कॅन्सर झालेला. त्याच्या उपचारानेही बराच अशक्तपणा येणार असे डॉक्टरांचे मत. म्हणजे सामान्य निरोगी माणसात जितकी शारिरिक ताकद शिल्लक असेल त्यापेक्षाही हा जरासा कमीच असणार. मग शारिरिक श्रमाची परिक्षा पाहणार्‍या , टोकाचे कष्ट लागणार्‍या सायकलिंग सारख्या खेळात प्राविण्य तर अगदि दूर. अशक्य. काही चमत्कार घडला तरच तो पुन्हा थोडिफार सायकल चालवेल असे वाटलेले. पण खेळावर निस्सीम प्रेम आणि असामान्य जिद्द ह्याची शिदोरी गाठीशी. पठ्ठ्याने प्रयत्न चालूच ठेवले आणि बघता बघता काहीच काळात त्याने सायकल हाती घेतली. पुनश्च श्रीगणेशा केला. इथून पुढे त्याने पुन्हा यशोशिखर गआठण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खुळेपण ठरेल असेही कित्येकांना वाटले. साल १९९९ उजाडले आणि साहेब "टूर द फ्रान्स" ह्या जगातल्या सर्वात मोठ्या सायकलिंग स्पर्धेत विजेते ठरले!! अरे हो, हे टूर द फ्रान्स म्हणजे काय? साधारण ३२०० किलोमीटार्सची सायकलिंग एकट्याने करायची. स्पर्धा काही आठवडे चालणार! गंमत पुढेच आहे. १९९९ ते २००५ असे सलग सात वेळा तो हे जिंकला! शेवटी अपराजित म्हणूनच रिटायरही झाला. इतर ठिकाणी त्याची तुलना केवळ सचिन्,विश्वनाथन आनंद, कॅस्पराव्,पेले- मॅराडोना ह्यांच्या भीमपराक्रमाशीच होउ शकते. आजवर ही स्पर्धा त्याच्याशिवाय कुणीही इतक्यावेळेस जिंकलेली नाही. इतर काही जणांनी ५ वेळेस जिंकलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीने त्याच्यापुढे गुडघे टेकले. . . सुधा चंद्रन... बालवयातच एक नर्तिका म्हणून प्रचंड लौकिक झालेला. पुढे जाउन खरोखर फार मोठी जागतिक जागतिक किर्तीची नर्तिका होणार असा सगळ्यांना विश्वास. ऐन वयाच्या विशीतच ह्या नर्तिकेच्या पायाला कुठल्याशा उपचारादरम्यान गँगरिन असल्याचं सापडलं. गँगरिन म्हणजे जखमी शरिर सडू लागणे. तो भाग काढला नाही तर हळूहळू संपूर्ण शरीर सडत जाउन मरते. महाभारतात आधी मांडी फुटली, गँगरिन झाला आणि मग हलाखीने,वेदनेने दुर्योधन मेला, तसाच. पाय गेले स्वप्नं पंगु होत नाहित. आवडिला, ध्यासाला,वेडाला उडायला शरिरापेक्षाही वेगळिच मानसिक घडण हवी असते. ती असेल तर शरिर दुय्यम ठरु शकते. प्राप्त परिस्थितीतही पुढे जाउया अशी आशा धरुन तुटलेल्या पायाच्या ठिकाणी लाकडी जयपूर फूट लाउन तिने पुन्हा ठेका धरला. पुन्हा एकदा संगीत अंगात भिनू लागले. त्याही स्थितीत अत्युत्तम अशी कला सादर करणार्‍या सुधाची देश विदेशात इतकी ख्याती पसरली विविध खंडांत तिला आमंत्रणे आली. युरोप, अमेरिका इथेही तिचे प्रयोग झाले. "पाय तुटला" असे फार काळ वाटून न घेता "अजूनही बरेच शरिर शिल्लक आहे. ह्यायोगे मी संगीताचा आनंद घेउ शकते. ह्या शिल्लक शरिराला त्या ताला झोकून अजूनही जो शरिरापलीकडील आनंद मिळवायचाय तो मिळवता येइलच की." असं वाटणं हीच तिच्या दुसर्‍या इनिंगची नवसंजीवनी तर नसेल? . . शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं लहानपणापासूनच आकर्षण असनारा एक चिमुरडा. चार चौघात त्याची तारिफ होते गाण्याबद्दल आणि ऐन मोठा झाल्यावर तारुण्याच्या मध्यात क्षयरोग झाल्यानं थेट फुफ्फुसांवर हल्ल हनवीनचत्या काळात नवीनच शोधल्या गेलेल्या क्षयाच्या उपचारांमुळे त्याचा जीव तर वाचतो., पण फुफ्फुसांवर कायमचा मोठा आघात झालेला. लांब, पल्लेदार चालणार्‍या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत जाण्याचं स्वप्न पार धुळिला मिळालं. सगळ्या आशा संपल्या. आता तर ह्या गायकाला फार "चलता है" ह्या क्याटेगरीत पोचण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार इतका आजाराचा परिणाम वाटलेला. आता काही नाही असच वाटू लागलं. वाटू लागलं,.... पण कुणाला? इतरांनाच! स्वतः त्या गायकाच्या गावीही हे दु:ख नसावे. "गायला आवडते. मी गाणार. आजारी पडलो तर अंथरुणावर संगीताचा ध्यास घेणार. फुफ्फुसं कमी ताकतीची झाली तर आहे त्या ताकतीनं गाणार. एक फुफ्फुस बंद पडलं तर दुसर्‍यानं होता होइल तेवढं गाणार." असं काहिसं खूळ डोक्यात असेल तर काय होणार? चार चौघांसारखं मग तो तसं गाउ शकला नाही. पण म्हणून काय झालं.? त्यानं स्वतःची अशी एक सुरेल पण तुटक्-तुटक वाटेल अशी शैली निर्माण केली! त्या शैलीचा तो स्वतः जनक बनला. अरे हो, त्याचं नाव सांगायचं राहिलं. --पं कुमार गंधर्व. . . अशी जगभरातली शेकडो उदाहरणं देता येतील. मागे एकदा एका गिरीप्रेमी मिपाकरानं सांगितल्या प्रमाणं एका डोक्यात अस्सल ट्रेकिंगचं वेड चढलेल्या कुणीतरी आपले हातपाय गमावलेले. मग? आता फिटली का हौस जन्माची? जिरली का जिद्द? तर नाही. महाशय ट्रेकिंग करतच आहेत. हात पाय नाहित, तर नाहित. ते दाताने दोर व इतर साधने धरत हे करतात. अजूनही कुठल्याशा महिलेचा किस्सा ऐकलाय. सर्व खंडातील एकूणएक सर्वोच्च शिखरे पालथी घालताना कधीतरी तिने पाय गमावला. त्यानंतर विशेष अतिरिक्त मदतीशिवाय पुन्हा ती ही सर्व शिखरे चढून आली. आख्ख्या युरोपातली प्रमुख विरोधी राष्ट्रे जिंकल्यानंतर नाझी जर्मनीने १९३९- १९४० मध्ये संपूर्ण केले.एकाकी पडलेल्या ब्रिटनवर केंद्रित केले. अमेरिकाही युद्धात उतरलेली नव्हती. लंडानवर तूफान बॉम्बहल्ले होताना पाहून ब्रिटन नक्कीच गुडघे टेकेल असे कित्येकांना वाटले. पण लंडनने त्यानंतर अत्यंत हिमतीने अचाट असा दिलेला लढा "बॅटल ऑफ ब्रिटन" ह्यानावाने जणू दंतकथा बनून गेला. पडलेला प्रश्न एकचः- अशा असामान्य समस्या मानवात लपलेल्या असामान्य धैर्याला किंवा कुलूप लावलेल्या एखाद्या गुणसूत्राला क्वचित जागे करते काय? त्याच घटनेला इतरही तसेच सामोरे गेले असते का? ही जिद्द येते कुठून? मानसशास्त्र काय म्हणते ह्याबद्दल. तुम्हालाही काही विलक्षण उदाहरण ठाउक असतील, आठवत असतील तर अवश्य सांगावीत. टीप :- जवळपास सर्वच माहिती गप्पांतून, ऐकण्यातून, कार्यक्रमांतून समजलेली आहे. लिखित स्त्रोत नाही. शिवाय कुठल्याही विषयाची नीटशी मांडणी करणे अजूनही शिकतोच आहे. चुभूदेघे. --मनोबा दाता इतना दिजे ।जामे कुटुम समाय | मै भी भूखा न रहू । साधू न भूखा जाय ||

वाचने 3236
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

सुरेख मांडणी... जीद्दीला सलाम. माझाही हाच प्रश्न :- पडलेला प्रश्न एकचः- अशा असामान्य समस्या मानवात लपलेल्या असामान्य धैर्याला किंवा कुलूप लावलेल्या एखाद्या गुणसूत्राला क्वचित जागे करते काय? त्याच घटनेला इतरही तसेच सामोरे गेले असते का? ही जिद्द येते कुठून? मानसशास्त्र काय म्हणते ह्याबद्दल.

ह्या "लान्स आर्मस्ट्राँग" विषयी जेव्हढे वाचू तेव्हढे थोडे आहे.. ह्या वरून एक लिंक आठवली... ती देत आहे.. http://jessica-cox.blogspot.com ही अशी काही माणसे आपल्यालाच "खूजे" ठरवतात आणि मग आपल्याला स्वतःच्या अवयवांचे मोल समजते...

तुम्हाला जसे जमेल तसे लिहा... शैलीला काही महत्व नसते हो!!! महत्व असते , ते , त्यातील , विचारांना..संदेशांना. मनापासून लिहा, एक शैली, आपोआपच मिळून जाईल...

In reply to by मुक्त विहारि

अगदी बरोबर...

विषय आवडला, तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं वाचायला आवडतील. थोड्याफार फरकाने कमी-अधिक काटे सगळ्यांनाच कसल्या-ना-कसल्या स्वरुपात बोचतात. वर सांगितलेली माणसं नेमकी अशाच घटनांचं भांडवल करतात आणि वेगळी ठरतात तर बरीचजणं आयुष्यभर अशा दुर्दैवी घटनांना कुरवाळत बसतात. कुठल्याही स्तरातली-व्यवसाय, क्रिडा, चित्रपट इ.-यशस्वी माणसं घ्या, सगळ्यांच्या पाठीमागे थोड्याफार फरकाने अशीच एक श्टोरी दिसेल. कर्नल सॅन्डर्स च्या केएफसी मागे, बिली जोएलच्या संगीतामागे, वॉलमार्ट्चे सर्वेसर्वा सॅम वॉल्टनच्या ९९ वर्षाची लीज (भाडेकरार) घेण्यामागे, होन्डा कंपनीच्या मि. होन्डाच्या आयुष्यात घडलेल्या घटना, एडिसनच्या प्रयोगामागे... नावं संपणार नाहीत. ही सगळी नावं मला Anthony Robbins च्या "Notes from a friend" ह्या ४४ पानांच्या छोटेखानी पुस्तकातून मिळाली. पुस्तक कुठेना कुठे जालावर पिडीएफ मध्ये मिळेलचं.

छान.. विष्णु दिगंबर पलुसकरांच्या डोळ्यातही काही दोष होता. तरी ते जिद्दीने संगीत शिकले.

बरीच उदा. एकाच जागी दिल्याबद्दल धन्यवाद. धागा आवडला. या प्रसिद्ध व्यक्तींव्यतिरीक्तही "सामान्य"पणे जगणारे लोकंसुद्धा असणारच. जर कोणाच्या माहीतीत असतील किंवा ऐकुन वगैरे माहीती असेल तर त्यांच्याविषयीसुद्धा असं थोडक्यात लिहिलं तर छानच, कारण आपण त्याच्याशी रीलेट करु शकतो. सगळेच काही प्रसिद्ध होउ शकत नाहीत पण प्रत्येकजण आलेल्या संकटांवर मात नक्कीच करु शकतो नै का! यातही जवळच्या लोकांनी साथ दिली तर उत्तमच.

आवडले लिखाण. >>>पडलेला प्रश्न एकचः- अशा असामान्य समस्या मानवात लपलेल्या असामान्य धैर्याला किंवा कुलूप लावलेल्या एखाद्या गुणसूत्राला क्वचित जागे करते काय? हो नक्कीच. समस्या नको.. परिस्थीती म्हणूया. समस्या या शब्दाला एक निगेटीव्ह टोन आहे. परिस्थीती ने कॉर्नर केल्यावर आपणही उसळून प्रतिकार करतोच, कदाचित आपली परिस्थीती इतकी वाईट नसावी, पण प्रतिकार होणे महत्त्वाचे, जे आपण करतोच करतो. परिक्षेच्या शेवटच्या १० मिनिटात सोडवलेला प्रश्न ज्याने इतरवेळी ३०/३५ मिनिटे खाल्ली असती ऑफिस मध्ये एखाद्या दिवशी केलेले प्रचंड काम, क्वचितप्रसंगी दिवसेंदिवस सलग जागून केलेले काम. (झैरात करत नाही.. पण माझा स्वत:चा उच्चांक ४५ की ४८ तासांचा आहे, सलग ४ शिफ्ट नंतर ४० / ५० किमी बाई़क चालवून एक ट्रेक पण केला होता - नक्की खात्री आहे की असे प्रकार करणारे बरेच मिपाकर असतील!) विचार केला तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अशी बरीच उदाहरणे येतील की, आज.. आत्ता प्रश्न पडावा "ते करणारा मीच होतो का?" माझ्या मते, या "ग्रेट" लोकांच्यात आणि आपल्यात एकच फरक असतो, हे Self-Motivated असतात, आणि आपल्याला Motivation मिळते ते यांच्याकडून. हा अत्यंत छोटा फरक प्रचंड मोठा बदल घडवून आणतो. Youtube वर Motivational VDO बघणे हा एक "अनुभव" असतो, असाच हा एक - ग्रेटनेस अधोरेखीत करणारा. Lance Armstrong as a Boxer, Marion Jones as a Gymnast, Randy Johnson as a Bowler, Andre Agassi as a Baseball Player, Michael Vick as a Ice Hockey Player, Serena Williams as a Beach Volleyball Player (प्रतिसाद विस्कळीत झाला आहे का ? :-()

मानवाने हा जीवंतपणा जरा जास्त एक्स्प्लोर केला :) छान लिहीलेस रे मनोबा. अरे असे किस्सेच तर आपली जगायची, लढायची, प्रेम करयची उम्मीद कायम ठेवतात. अर्धवटराव

लेख आवडला. :) मला तरी वाटतं की कठीण परीस्थितीत सगळ्यांनाच ही अद्भुत शक्ती लाभते असे नसावे कारण साध्या संकटांनी देखील काही माणसे पार खचून जातात. कारण मग त्याशिवाय आत्महत्या, गुन्हे ई प्रकार घडले नसते. अशी जिद्दीने वेगळेपण सिद्ध करणारी माणसे विरळाच. त्यांना सल्युट.

लान्स आर्मस्ट्राँगचे चरित्र वाचले आहे. खूपच प्रेरणादायी आहे. दक्षिण आफ्रिकेचा अपंग धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियस. दोन्ही पाय नाहीत पण जगण्याची जिद्द, जिंकण्याची इच्छाशक्ती आणि प्रचंड लढण्याची ऊर्मी. आपल्या कृत्रिम पायांनी येत्या ऑगस्टमध्ये लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये धावणार आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदके जिंकली आहेत. अपंग खेळाडूंसोबत नव्हे तर सर्वसामान्य खेळाडूंसोबत सहभागी होऊन आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याची त्याची इच्छा आहे. ऑस्कर अवघा ११ महिन्यांचा असताना एक असं सत्य समोर आलं , जे ऐकून त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा पहाडच कोसळला. लहानग्या ऑस्करच्या हाडांची वाढ अपूर्ण होती. त्याच्या गुडघ्याखाली असलेली पावलं अर्धवट होती आणि त्यातून थिटी बोटं उगवली होती. प्लॅस्टर बांधूनही काहीच फरक पडणार नव्हता. तेव्हा त्याचे पाय थेट गुडघ्यापासून कापावे लागतील , जेणेकरून त्याला कृत्रिम पायांनी तरी त्याला चालता येईल. अन्यथा तो कधीच चालू शकणार नाही , असं डॉक्टरांनी सांगितलं. अखेर , शक्य होईल तितका ऑस्करच्या पायांचा भाग वाचवा , इतकीच विनंती करत चिमुकल्या ऑस्करला त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांच्या स्वाधीन केलं. तेव्हापासून ऑस्कर कृत्रिम पायांवर उभा आहे. समज येत गेली तसा त्याला आयुष्याचा भूतकाळही कळला. मात्र त्यानं अपंगत्वाला कुरवाळलं नाही. त्याच्या पायात कार्बन ब्लेड्स बसवण्यात आली आहेत , त्यांच्या आधारे ऑस्करने रनिंग ट्रॅक पकडला. पॅरालिम्पिक मधील धावण्याच्या शर्यतीतील अनेक विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर कोरले. एके दिवशी सुदृढांच्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्वप्नं त्याच्या डोळ्यात तरळलं. पण या स्वप्नच्या पूर्तीसाठी कायद्याची लढाई त्याला लढावी लागली. अनेक आरोप ऐकून घ्यावे लागले. अखेर पात्रता फेरी मर्यादित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण करत त्याने सुदृढांच्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याची परवानगी मिळवली. नैसर्गिक अपंगत्वाला धैर्याने तोंड देणाऱ्या या सर्व प्रेरणास्थानांना प्रणाम

सगळीच उदाहरणं प्रेरणादायक आहेत. एखाद्या परिस्थितीत सापडल्यावर तुम्ही तिचा सामना करायचा निर्णय घेता की तिथून निसटून पळायचा यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. ज्यानी जागीच उभं राहून सामना करायचा निर्णय घेतला ते सगळ्या अडचणींवर मात करून पुढे जातातच. यः पलायते सः जीवति हे कधी कधी खरं असतं पण अशा वेळी स्वतःचा जीव वाचवण्यापलीकडे त्यातून काही साध्य होत नाही. सामान्य माणसांतून थोडंसं वर जायचं असेल तर लढण्याला काही पर्याय नाही.

प्रयास वरुन मला मागे प्रकाश घाटपांडेकाका यांनी दिलेला एक दुवा आठवला. वल्लरी करमरकर आठवली. लाईफ इज ब्युटीफुल चे भाग पहा. (मिपाकर महीलांचा लाडका सुब्या निवेदक आहे बघा बर! ) http://in.youtube.com/watch?v=t3a2BblPILw http://in.youtube.com/watch?v=Q3B1270rHAs http://in.youtube.com/watch?v=xqhU-HWq0ug

मागच्या सोमवारी बहिणीकडे गेलेलो. झोपण्यापूर्वी काहीतरी वाचायला दे म्हणून पुस्तक मागितलं. 'व्हाय नॉट आय' हे पुस्तक मिळालं. (इफ नॉट राँग वृंदा भार्गवे लेखिका आहेत ) वाचायला साधारण १० ला सुरुवात केली नी वाचतच गेलो. ही सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका स्त्रीला नियतीकडून धक्क्यामागून धक्के मिळतात. नवरा अचानक मरतो. छातीत जळजळ म्हणेतो अ‍ॅटॅक. फिनिश. तरुण विधवा . पदरात दोन मुली. लव्ह मॅरेज म्हणून मोठ्या भावानं आयुष्यातनं डिलीट केलेलं. आईवडील राहण्याखाण्याचा खर्च मागत असतात. ही देते. नवर्‍याच्या जमा पुंजीतून. पुढं शिक्षिका बनते. घर नवरा जिवंत असतानाच बूक केलेलं पण ताब्यात मिळालेलं नसतं. कुतरओढ सोसत जीवन जगतानाच धाकट्या ७ वर्षाच्या मुलीला ताप येतो. औषध घेते. औषधाची अ‍ॅलर्जी होऊन अंगभर फोड. पापण्या बुब्बुळा ला चिकटू लागतात. बर्‍याच औषधांची अ‍ॅलर्जी असल्याचं निष्पन्न झाल्यानं भूल देखील देता येत नाही. तसेच डोळे साफ करायचे, औषध घ्यायचं. घरात आईवडलांचा अजिबात सपोर्ट नाही. फक्त दिर बरोबर यायचा. चेक करायला एकदा या दवाखान्यात एकदा त्या दवाखान्यात. असं करता करता समजलं चिकट लेल्या कातडीमु ळं नी औषधाच्या रिअ‍ॅक्शन अधिक उशीर या सगळ्यामुळं मुलीचं दिसणं बंद झालेलं. त्यात अश्रू तयार होणं देखील बंद. हे सगळं होताना देखील मुलीचा जीवनाकडं पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन नि त्यामुळं तिने अंधांच्या शाळेत न जाता 'नॉर्मल' शाळेत जाऊन देखील शाळेत, परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणं ... कॉलेज मध्ये देखील इन्टरनॅशनल लेव्हलवर तिचा पेपर सिलेक्ट होणं.... ! अगदी शहारुन गेलो पुस्तक वाचून. विजीगिषु वृत्तीला सलाम.

सर्व वाचकांचे आभार. @मुवि :- लिं़अ वाचता येत नाहिये हापिसातून. नंतर पहवी लागनार असं दिसतय. @सुधीरः- व्यवसाय, क्रिडा, चित्रपट इ.-यशस्वी माणसं घ्या, सगळ्यांच्या पाठीमागे थोड्याफार फरकाने अशीच एक श्टोरी दिसेल. कर्नल सॅन्डर्स च्या केएफसी मागे, बिली जोएलच्या संगीतामागे, वॉलमार्ट्चे सर्वेसर्वा सॅम वॉल्टनच्या ९९ वर्षाची लीज (भाडेकरार) घेण्यामागे, होन्डा कंपनीच्या मि. होन्डाच्या आयुष्यात घडलेल्या घटना, एडिसनच्या प्रयोगामागे... नावं संपणार नाहीत. +१ ही सगळी नावं मला Anthony Robbins च्या "Notes from a friend" ह्या ४४ पानांच्या छोटेखानी पुस्तकातून मिळाली. शोधून पहावं लागणार आता. @जामोप्या :- पलुसकरांबद्दल नव्यानेच समज्ले. संगीताच्या नोट्स(स्वरावली) लिहिण्यासाठी नजर चांगली असणे आवश्यक आहे असे वाटते. जाणकार संगतीलच अधिक. @ मोदक :- (झैरात करत नाही.. पण माझा स्वत:चा उच्चांक ४५ की ४८ तासांचा आहे, सलग ४ शिफ्ट नंतर ४० / ५० किमी बाई़क चालवून एक ट्रेक पण केला होता - नक्की खात्री आहे की असे प्रकार करणारे बरेच मिपाकर असतील!) -----/\----- मी फक्त सलग पंचवीस-तीस तास झोपा काढण्याचा विक्रम करु शकतो रे बाबा. असले पराक्रम नाहित केले अजून. @ममो:- मला तरी वाटतं की कठीण परीस्थितीत सगळ्यांनाच ही अद्भुत शक्ती लाभते असे नसावे कारण +१ @अमितसांगली :- पॅरा ऑलिम्पिक मधील एकेक सहभागी असेच इच्छाशक्तीची उदाहरणं असलेली दिसतात. पळा...बॉस आला. उरलेलं नंतर.