गुरूबिन कौन बतावे बाट (दत्त संप्रदाय)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गुरूबिन कौन बताये बाट (दत्त संप्रदाय)
दत्त संप्रदाय फक्त महाराष्ट्रातच आढळून येतो. थोडासा अपवाद म्हणजे गाणगापूरच्या आसपासचा कानडी मुलुख. पण महाराष्ट्रात तो एक प्रमुख पंथ आहे व नवीन पायंडा पहाता तो वाढीस लागला तरी आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. " मी तुझ्या पाठीशी आहे " हा दिलासा बर्याच तरुणांना पुरेसा वाटतो असे दिसते. मुंबईतील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात चांगली गर्दी असते. हे लोण इतर शहरात पसरणे सहजशक्य आहे. शिर्डीनंतर साईबाबांची मंदिरे इतर शहरात पसरू लागली आहेत, तसेच. आजच्या तरुण पिढीला याचे आकर्षण का वाटत आहे याचे विवेचन शेवटी करणार आहे. या संप्रदायाची माहिती आज करून घेऊं. (१) दैवत, (२) इतिहास, (३) व्यक्तीविषेश, (४) स्थळविषेश, (५) काल, आज, उद्या, असे भाग सोयीकरता पाडले आहेत.
(१) दैवत :
अनसूयेने ब्रह्मा-विष्णु-महेश यांची केलेली तीन बालके म्हणजे दत्त ही कथा सगळ्यांना माहित आहेच.नारदाने केलेली अनूसयेच्या सतीत्वाची स्तुती न आवडून सावित्री, लक्ष्मी व पार्वती यांनी आपल्या पतींना अनूसयेचे सत्त्व हरण करावयास पाठविले.अत्री आश्रमात नसतांना तिघे अतिथीचा वेष घेऊन गेले व भिक्षा मागितली. अनसूयेने भिक्षा आणल्यावर त्यांनी तिने विवस्त्र होऊन भिक्षा वाढावी असा आग्रह धरला. अतिथी न जेवता जाऊ नयेत म्हणून तिने ते मान्य केले व पतीचे नाव घेऊन तिघांवर तीर्थ शिंपडले. तिघांची लहान बालके झाली व मग तिने विवस्त्र होऊन आईच्या ममतेने तिघांना भरविले. इकडे वाट पाहून थकलेल्या तिघीजणी आश्रमात आल्या व आपले नवरे लहान बालके झाले हे पाहून खजील झाल्या. त्यांच्या विनंतीवरून अनसूयेने तिघांना पहिले रूप दिले. जातांना अनसूयेच्या इच्छेप्रमाणे तिच्या पोटी जन्म घेण्याचे तिघांनी कबूल केले. त्याप्रमाणे विष्णूच्या अंशापासून दत्त, शंकराच्या अंशापासून दुर्वास व ब्रह्माच्या अंशापासून सोम अशी तीन मुले अनसूयेला झाली.या कथेप्रमाणे दत्त हा विष्णूचा मुलगा. हा विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी एक. (दशावताराची कल्पना नंतरची, आधी २४ अवतार कल्पिले आहेत्.) महाभारतात दत्ताचा उल्लेख आहे. पण तो उशीराचा भाग प्रक्षिप्त मानला जातो. तिथे त्याला अत्रीवंशज म्हटले असून तो गृहस्थाश्रमी दाखविला आहे. दत्तात्रेयाचे सर्व शिष्य क्षत्रीय असून फक्त एका ब्राह्मण शिष्याचा अपवाद आहे. अनेक प्रुराणात याचा उल्लेख असला तरी तो महान योगी असाच आहे. मार्कंडेयपुराणात मात्र तो तंत्रयोगी दाखविला आहे. नाथ संप्रदाय व तांत्रिक संप्रदायांत दत्ताला मोठे स्थान असून पुढे महानुभाविकांनी त्याचा महिमा वाढवला आहे. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. नवनाथांपैकी बर्याच जणांना दत्ताची अमोल मदत झाली आहे.
(२) इतिहास :
दत्तोपासना तशी अर्वाचिनच म्हणावयास हवी. दत्ताची जुनी देवालये सापडत नाहीत. तीनमुखी व सहा हातांचा दत्त पूर्वी नव्हता. (पूर्वीचा दत्त एकमुखी व चतुर्भुज.) अनसूयेच्या कथेनंतर तीनमुखी दत्त ही मूर्ती लोकमान्यता पावली. परमपदाच्या प्राप्तीसाठी योगसाधनेचा स्वीकार व गुरूसंस्थेची महनीयता ही दत्तस्वरूपातील वैशिष्ट्ये नाथसंप्रदायाने स्विकारली आहेत्.दत्त हा अवधूत जोगी आहे व नाथ संप्रदाय हा अवधूत संप्रदाय आहे. उत्तर काळात गोरख-दत्त यांचे संवाद प्रसिद्ध झाले. तंत्रसंप्रदायात, दत्ताशी जोडल्या गेलेल्या तांत्रिक गोष्टींमुळे, दत्ताची जवळीक झाली. महानुभाव पंथाची परंपरा दत्तात्रेय--चांगदेव राऊळ--गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. म्हणजे महानुभाव संप्रदाय हाही दत्त संप्रदाय म्हणावयास हरकत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे दत्त संप्रदाय व सूफी पंथाचा संबंध. एकनाथांना जनादर्नस्वामींनी दत्ताचे दर्शन घडवले ते मलंग रूपातच. माणीकप्रभूंच्या सकलसंतसंग्रहात मुसलमानांचा भरणा आहें. नरसिंहसरस्वतींच्या चरित्रातही तसेच आढळते. याचे कारण हे असावे की दत्त संप्रदायातील श्रेष्ठ पुरुषांच्याभोवती चमत्कारांचे जे वलय निर्माण झाले होते त्याचे आकर्षण सूफींना असावे. इतर समन्वय काही दिसत नाही. बाकी हिंदूनाच ही खाज असावी; नाही तर हिंदू देवतेने फकीर वेष घेण्याचे कारणच काय ? असो. दत्तप्रबोध, दत्तमाहात्म्य, गुरूचरित्र आदी ग्रंथात संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विवरण केले आहे. थोडक्यात
(१) ब्रह्म हे अखिल, अभंग्,निरुपाधिक, शुद्ध, शांत, निर्गुण, निरामय, नित्यानंद आहे. तेच जगद्रुपाने नटले आहे.
(२) परब्रह्माची त्याहून निराळी नसणारी इच्छाशक्ती म्हणजे प्रकृती. तिच्यापासून त्रिगुणात्मक माया, भूतसृष्टी व तिन्ही लोक उत्पन्न होतात.
(३) जे मूळ परब्रह्मस्वरूप आहेत परंतु भिन्न भिन्न देह धारण केल्यामूळे भिन्न भिन्न दिसतात ते जीव होत.
दत्त हा गुरूदेव आहे. श्रीगुरूदत्त किंवा गुरूदेवदत्त हा संप्रदायाचा जयघोष आहे. त्यामुळे कोणीही उपासक थेट दत्ताला गुरू करू शकतो. त्यामुळे मानवी गुरू-शिष्य परंपरेचे सातत्य राहिले नाही. यामुळे संप्रदायाची संघटीत बांधणी राहिली नाही. सिद्धावस्थेला पोचलेला प्रत्येक जण आपली पृथक पृथक विचारसरणी उपदेश करत गेला. त्यामुळे भारावलेले शिष्य वा सामान्य जन वेगवेगळे आचार व उपासना करू लागले. संप्रदायात रूढ अनुशासन असूनही एकवाक्यता राहिलेली नाही. माणीकप्रभूंचा सकलमतसंप्रदाय, पंतमहाराजांचा अवधूतसंप्रदाय, अक्कलकोतच्या स्वामींचा विधीनिषेधातीत साधनामार्ग , सगळे एकाच संप्रदायाचे ! वासुदेवानंद सरस्वती व केडगावकर महाराज यांच्या चूली परत वेगळ्याच.
समन्वय : दत्त संप्रदाय समन्वयाचे प्रतीक आहे. शैव-वैष्णव समन्वय साधला आहेच पण हिंदू-मुसलमान समन्वय साधण्याचा प्रयत्नही झाला. नरसिंहसरस्वती व जनार्दनस्वामी यांनी हा प्रयत्न केलाही. जे थोडेसे यश मिळाले ते सिद्ध पुरुषांच्या भोवतालच्या चमत्कारांच्या वलयामुळे. उलट असे झाले की काही मुसलमानी प्रथाच या संप्रदायात शिरल्या ! संगीताचे प्राधान्य, धूप या त्यातील काही गोष्टी.
(३) व (४) व्यक्ती-स्थळ विशेष :
वर सांगितल्याप्रमाणे पंथाची घडणच अशी आहे की एखादा सिद्ध पुरुष काही चमत्कार घडवितो, लोकांवर त्याचा प्रभाव पडतो व त्याचे अनुयायी वाढू लागतात. ऐतिहासिक काळापासून हे चालू आहे.महानुभाव पंथापासून सुरवात झाली म्हणावयास हरकत नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे इतिहास काळातील पहिले अवतार समजले जातात. नरसिंह सरस्वती हे दुसरे. नंतर एका शतकातच जनादनस्वामी-एकनाथ-दासोपंत दत्तभक्तीचा आश्रय घेऊन दत्तोपासनेचा प्रभाव वाढविला. नंतर मुक्तेश्वर्,निरंजन रघुनाथ्,नारायणमहाराज जालवणकर, माणिकप्रभू,वासुदेवानंद सरस्वती, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर, इ. काही सत्पुरुषांची नावे सांगता येतील. यांपैकी काही उन्मुक्त चिंतनाने भारलेले व विधीनिषेधातीत अवधूत वृत्तीचे तर काही कर्मकांडाचा पुरस्कार करणारे, उपासनातंत्राला प्राधान्य देणारे होते. प्रत्येकाला अनुयायी मिळाले.
दत्ताची मंदिरे तुरळक प्रमाणात सर्वत्र आढळतात. माहूर,पांचाळेश्वर,औदुंबर, नरसोबाची वाडी,गाणगापूर, लाडकारंजे, कुरुगुड्डी, गिरनार ही प्रमुख क्षेत्रे आहेत. मंदिरात एकमुखी, तीनमुखी मुर्ती वा पादुका असतात. तांत्रिक उपासनेचा प्रभाव म्हणून म्हणा भूताखेतांनी पछाडलेली माणसे सुटकेसाठी अशा स्थळी गर्दी करतांना दिसतात.
(५) काल, आज उद्या :
असे दिसते खरे की या पंथाचे अनुयायी ब्राह्मण वर्गातलेच. जनसामान्य आले ते चमत्काराच्या आकर्षणाने. बाधा उतरावयाला. मारुतीच्या, विठ्ठलाच्या मंदिरात आढळणारी जनता इथे अभावानेच. पण आता थोडा फरक पडून येत आहे असे वाटते. भुतेखेते, तांत्रिक गोष्ष्टी सोडूनही " मी तुझ्या पाठीशी आहे " हा आश्वासक दिलासा आज सगळ्यांच आकर्षित करत आहे. घरून निघालेला माणुस लोकलमधून सुखरूप परत येईलच अशी खात्री नसली की अशा आश्वासनाची गरज ही माणसाच्या कमकुवत मनाची गरज असते. येथे कोणत्याही तर्कनिष्ठेला वाव नाही. मुंबईच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात सर्व थरातील माणसे दिसतात. स्त्रीया आहेत, पुरुष आहेत. उच्चशिक्षित आहेत, न शिकलेलेही आहेत. गरीब आहेत, श्रीमंतही आहेत. थोडी मनःशांती लाभत असेल ; दिलासा मिळत असेल, सद्विचारांचा वारा लागत असेल तर छानच की. साईबाबांच्या मंदिरांचे पेव जसे गावोगावी फुटत आहे तसेच याचेही होईल. चांगली गोष्ट. इथे जर आठवले, पै यांसारखी जनसागराला योग्य वाट दाखविणारे आणखी काही सद्गुरू लाभले तर आणखी काय पाहिजे ? शेवटी हे खरेच की " गुरूबिन कौन बतावे बाट ?"
( काही ठिकाणी द्विरुक्क्ती झाली आहे, मान्य. क्षमस्व.)
शरद
प्रतिक्रिया
खाज
अगदी तिमा. लेखकाच्या
किंचित खुलासा.
तेराव्या शतकात जेव्हा मुस्लीम
सहमत.
चुकल.
किंचित अवांतर
वादग्रस्त...
मान्य.
सेतुमाधवराव पगडी यांच्या
तू झोप तुझा दत्त जागा आहे...
तुमचा अभ्यास चांगला आहे असे
भौगोलिक विस्तार
>>>> महानुभाव पंथाचे प्रवर्तक
गडबड
हे बरोबर.
प्रा. बिरुटेंची माहिती अधिक सुस्पष्ट करतो...
फोडा दत्तनाम टाहो
उत्तम माहिती..
लेख आवडला
हे दुवे जरूर पहा
लेख आवडला
लेख आवडला
खुपच माहिती मिळाली. नुसतच
आप्पाची वाडीची भाकणुक पुढारीत
छान लेख
दत्तात्रेयांचा एकेरी उल्लेख
एकेरी उल्लेखातच आपलेपणा...
आम्हाला नाही खटकला ब्वा..
दत्तगुरुंबद्दल अजुन महिती
छान माहितीपूर्ण लेख!
काय सांगतेस खर कि काय?
दत्त धुन
गजानन महाराज