खाली अथांग पाणी, निळाई संपत कोठे आहे?
थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे?
समोरचा पाहतो दूरवर, मागचे शिस्तीने रांगी
कुठे कधी दिसणार धरित्री, प्रश्न मनीचे मोठे आहे
विसरलो केव्हा निघालो, केव्हा टिपिले दाणे
चारा हवेचा फक्त खाउनी पिळवटलेली पोटे आहे
वादळ वारे घेरुनि येता, विसकटल्या की रांगा
थकलेले जीव विसावतिल, आशा ही का खोटी आहे?
जे सोडले मागे ते की, जिथे चाललो ते घर अपुले?
धैयाच्या तव निष्ठेपुढती, शंका वादळ छोटे आहे
निशा पसरली, तिला डावलुनि, येई अरूण उदया
किरणगर्भी मेघाहाती आमंत्रणाचे लखोटे आहे
आता कळले असेल तुजला, नवीन घर ते कोठे आहे,
थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे?
सांग तुझे घर कोठे आहे?
वाचने
1057
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम कविता...
सुंदर
मस्त !
सुंदर रचना...