✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पैसा

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 06/22/2012 - 11:46  ·  लेख
लेख
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे. तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित! कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्‍या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील! मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं. हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता. दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते. तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता! चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते. पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही. इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते! मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं! माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
39218 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

अप्रतिम

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 11:58 नवीन
अर्थशास्त्राचे ज्ञान व तुमचे जीवनाचे सरळ सोपे असे तत्त्वज्ञान यांची सांगड घालून परिणामकारकरीत्या संदेश देणारा लेख. संग्रही जपून ठेवावा अन इतरांनाही दुव्याद्वारे पाठवावा असा...
  • Log in or register to post comments

+1

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/22/2012 - 12:09 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पैशाबद्दल आमचा फंडा

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 12:07 नवीन
जय रॉबर्ट कियोसाकी! :)
  • Log in or register to post comments

प्रकटन आवडले .......! सहजपणे

रुमानी
Fri, 06/22/2012 - 12:21 नवीन
प्रकटन आवडले .......! सहजपणे , पण विचार करायला लावणारे.
  • Log in or register to post comments

ऑ?

सहज
Fri, 06/22/2012 - 12:22 नवीन
>मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आता फायनान्शियल प्लॅनर्स म्हणणार की ही अध्यात्मीक, लाईफ कोच वाल्या लोकांनी सोडून दिलेली अफवा आहे.. कॉलिंग सदानंद ठाकूर साहेब!! कॉलिंग सदानंद ठाकूर साहेब वर लेखात असे शक्य नाही हा जो मुद्दा आला आहे त्याच्याशी असहमत इतकेच नोंदवायला हा प्रतिसाद. याउप्पर जगद्गुरू क्षीरसागरसाहेब यांचा प्रतिवाद आम्हाला जमणे नाही. तेवढे ग्रह नशीबात नाहीत.
  • Log in or register to post comments

मायला, हे अध्यात्म आणि आयुष्य यांचा काय पंगा घालतं पब्लिक?

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 12:39 नवीन
आहो, अध्यात्म म्हणजे सगळं सोपं कसं होईल, मजेचं कसं होईल ते सांगणारं शास्त्र, जीवन आणि अध्यात्म अशी अजिबात फारकत नाही, तुम्ही ते वेगळं करु नका. माझं केवळ नशिब की दोन्ही गोष्टी लाभल्यात नाही तर कुणी एक शब्द ऐकून घेतला नसता! या लेखातला विचार ही अध्यात्मिक अफवा नाही, वर्षानुवर्ष असं जगून त्या अनुभवातनं लिहिलय आणि त्याला अध्यात्मिक बॅकग्राऊंड देखील आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूनी बिनधास्त राहा आणि जे लिहिलय ते संपूर्ण आत्मसात करा. नुसतं वाचायला इतकी मजा येते तर जगायला काय सॉलिड मजा येत असेल याची कल्पना करा, तुम्ही फक्त मनावर घ्यायचा अवकाश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

माझा मित्र एकदा मला म्हणाला

मृत्युन्जय
Fri, 06/22/2012 - 12:23 नवीन
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता हे पण वाचा. थोडेफार तुम्ही म्हणता तेच आहे. http://www.odditycentral.com/news/woman-hasnt-used-money-in-15-years.html
  • Log in or register to post comments

मृत्युंजय, दुवे वाचायचा मला फार कंटाळा आहे

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 12:48 नवीन
तुमचं आकलन सारांशानं इथे लिहिलत तर बरं होईल. तसं ही आता या विषयावर वाचायच काहीही राहिलं नाही म्हणून तर लिहितो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ते माझे नाही दुसर्‍या कोणाचे

मृत्युन्जय
Fri, 06/22/2012 - 13:08 नवीन
ते माझे नाही दुसर्‍या कोणाचे तरी आकलन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण..

चौकटराजा
Fri, 06/22/2012 - 12:58 नवीन
मानव जात काही दशलक्ष वर्ष या ग्रहावर आहे. तेंव्हा पैसा नव्हता पण सत्तेची कल्पना त्यावेळेपासून अस्तित्वात आहे. पैसा म्हणजे सत्ता मिळविणे. काही प्रमाणात वस्तू मिळविणे.आपण अधिकात अधिक स्वावलंबी झालो तर सत्तेची गरज उरत नाही. उदा. चाललो तर रिक्शावाल्यावर सत्ता गाजविण्याची सक्ती येत नाही. तसे वस्तू उपभोग कमी केला तर पुन्हा पैशाची गरज कमी होते. उदा. शीळ वाजवून गाणे म्हणता येत असेल तर बासरी विकत घ्यावी लागत नाही. पण संगीताचा आस्वाद घेण्यात अडचण येत नाही. पूर्वीचे लोक चांदण्या रात्री अंगणात बसून चकाट्या पिटत. त्याला किती पैसे खर्च होत बरे ?
  • Log in or register to post comments

चौरा, `पैसा म्हणजे सत्ता' हा विचार फक्त पैश्याबद्दल आपल्याला

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 13:21 नवीन
पूर्वापार असलेल्या काँप्लेक्समुळे आहे. जो पैश्यापुढे झुकतो त्याला ती सत्ता वाटते, ज्याला काँप्लेक्स आहे त्याला ती पॉवर वाटते. असा विचार सोडा, पैसा फक्त युटिलिटी आहे. संपूर्ण स्वावलंबी कुणीच होऊ शकणार नाही कारण अस्तित्वच परस्परावलंबी आहे. जो रिक्षावला मला इतक्या गर्दीतून एका ठिकाणहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवतो त्याचाशी मी नेहमी गप्पा मारत प्रवास करतो आणि कधीही सुट्ट्या पैशासाठी हुज्जत घालत नाही, ७६ झाले तर सरळ ८० देतो आणि उतरताना त्याचे न चुकता आभार मानतो, मला त्याचेच माझ्यावर उपकार वाटतात. पैश्यानं माझ्यापेक्षा कमी असलेल्यां विषयी सहानुभूती आहे त्यामुळे माझ्यापेक्षा कित्येक पट श्रीमंत असलेल्यां बरोबर वावरतांना त्यांचा पैसा मला जाणवत देखील नाही आणि त्यांनाही माझ्या बरोबर मजा येते! पैसा असेल तर वापरा नसेल तर नाराज होऊ नका, बुद्धी पैश्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे, वेगळा पर्याय निवडा. पैश्यावर स्वतःला कधीही तोलू नका कारण तशी वस्तुस्थिती नाही, तुमचं असणं पैश्यावर अवलंबून नाही ती फार रहस्यमय आणि मौलिक घटना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अस्तित्व परावलंबीच तरीही...

चौकटराजा
Fri, 06/22/2012 - 14:17 नवीन
तरीही जास्तीत जास्त माणूस काय करू शकतो ? तर जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. माणसांच्या एकमेकांवरील अबलंबनातून पैसा वा सत्ता या कल्पना उदयास आल्यायत. आपण विचार करतो त्याला या दोन्ही चीजा लागत नाहीत. स्वप्ने पहातो त्याला या दोन्ही गोष्टी लागत नाहीत. पण अशी पूर्ण स्वावलंबनाची स्थिति अप्राप्य म्हणजेच मोक्ष असावा बहुदा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१ सहमत आहे.

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/22/2012 - 14:25 नवीन
पूर्वीचे लोक चांदण्या रात्री अंगणात बसून चकाट्या पिटत. त्याला किती पैसे खर्च होत बरे ?
मिपावरच्या काही सदस्यांनी आता तरी शहाणे व्हावे आणि आंतरजालाला आपल्याला त्रासातून मुक्त करावे अशी भाबडी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बरोबर पण त्या बरोबर,

सुधीर
Fri, 06/22/2012 - 13:15 नवीन
तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पैसा हा नक्की दुय्यम आहे; आणि "स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा" असं मलाही वाटत नाही. पण.... आपल्याला "नेमकं" काय हवय हे कळणं जास्त महत्त्वाच आहे आणि ते मिळविण्यासाठी अर्थाजन वा अर्थाची तरतुद करणं हे ओघाने आलंच. त्यासाठी "आर्थिक साक्षर" असणंही तितकंच महत्त्वाच आहे असं मला वाटतं. निदान भविष्यात येणार्‍या संभाव्य आर्थिक गरजा-जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी आजच सजग राहून आराखडा (फायनान्शिअल प्लान) आखला पाहिजे. माझ्या मते श्रीमंत माणूस तोच, जो आपल्या "मर्यादीत" आर्थिक गरजा ओळखून त्याची योग्य ती तरतूद करतो.
  • Log in or register to post comments

हे आवडले

चौकटराजा
Fri, 06/22/2012 - 14:22 नवीन
पण.... आपल्याला "नेमकं" काय हवय हे कळणं जास्त महत्त्वाच आहे सुखाने जगण्याचा सर्वोतम उपाय म्हणजे काय हवे व काय नसले तरी चालेल याची पक्की यादी तयार असणे. माझेच उदा. असे की मला प्रवास हवा फोर व्हीलर मालकीची नसली तरी चालेल. मी सयकलवरून चक्कर मारून आलो तरी मला प्रवासाचा आनंद मिळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

मला तरी

jaypal
Fri, 06/22/2012 - 13:25 नवीन
ह्या पैश्याचा आवाज आवडला आहे.
  • Log in or register to post comments

फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि

मराठमोळा
Fri, 06/22/2012 - 13:27 नवीन
फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि प्रॅक्टीकॅलिटी यांची सांगड घालणं सामान्य विचारसरणीच्या माणसाला तितकं सोपं नाही. आपण आजच्यापेक्षा भविष्याचा विचार जास्त करतो हे खरंच आहे पण त्यामागे कारण पण तसंच आहे. पुढे जाण्याची इच्छा, जगाच्या शर्यतीत आपण मागे राहु नये अशी ईच्छा. आजचा दिवस पार पडणार आहे हे माहित आहे पण पुढचं काय? हा प्रश्न सतत माणसाला भेडसावत असतो. तुम्ही म्हणता ते विचार पाश्चात्य/विकसित देशातल्या लोकांसाटी फिट्ट बसतात कारण तिथे नागरीकांना नोकरी गेली, अपंगत्व आले, मुले झाली, रिटायर झाले तरी सरकार पैसे देतं, जबाबदार्‍या त्या मानाने फारच कमी असतात. हा विचार कुठेतरी मनातल्या मनात दिलासा देत असतो, मग आपोआपच माणूस धाडसी होतो आणि पैसे जमवून उद्याची चिंता करण्याची त्याला गरज वाटत नाही. आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. घर घेणे, आयुष्यभर त्याचं कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण, लग्न या जबाबदार्‍या माणसाला घाबरट आणि चिंतातूर बनवतात, मग तो पैसे साठवणे, उद्याची चिंता करणे असे प्रकार करत बसतो. कारण उद्या नोकरी गेली, अपंगत्व आले तर खरा आधार म्हणून असं त्याच्याकडे काहीच नसतं.
  • Log in or register to post comments

दुसर्‍या अन तिसर्‍या पॅराशी

स्पंदना
Fri, 06/22/2012 - 16:55 नवीन
दुसर्‍या अन तिसर्‍या पॅराशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

-१

नितिन थत्ते
Fri, 06/22/2012 - 13:59 नवीन
नीटसं कळलं नाही. पण कुठेतरी पुढचा विचार करू नका असा काहीसा संदेश वाटला. पैसा ही कल्पना खरी नाही. संपत्ती ही कल्पना खरी आहे. पैसा हे संपत्तीचे रिप्रेझेन्टशन आहे. संपत्तीची (संपत्ती साठवण्याची) प्रेरणा संपली की आनंदात जगता येईल अशी सूचना असेल तर ती चुकीची आहे. संपत्ती (उपयुक्त वस्तू) साठवणे हा (कॉम्प्लेक्स) सजीवांच्या नैसर्गिक प्रेरणेचा भाग आहे. जी प्रेरणा मुंग्यांपासून झाडांपर्यंत सर्वांना असते. माझी समजूत चूक असेल तर सांगावे. इथे वॉरन बफे यांचे वाक्य आठवते "Money is not everything. But make sure you have plenty of it before you say this nonsense".
  • Log in or register to post comments

ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/22/2012 - 14:13 नवीन
ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन कोसळला आहे. असो... मिपावरचे धुरिणी श्री. कुंदन ह्यांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत

नाना चेंगट
Fri, 06/22/2012 - 14:25 नवीन
कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत असे कळते. नुकताच त्यांनी ग्रीसचा दौरा केला आणि युरो वाचवला. नंतर ते अमेरिकेत जाणार असून डॉलर इंडेक्स कसा चढता राहिल हे पाहून नंतर दोन दिवस मुंबईत मार्गदर्शन करणार आहेत. निमंत्रितांसाठी असलेल्या मर्यादीत पाससाठी खवमधे मागणी नोंदवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा व नाना

कुंदन
Sat, 06/30/2012 - 16:04 नवीन
परा व नाना यांचे वैयक्तिक टिका करणारे प्रतिसाद , त्याबद्दल त्यांचा निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

दुय्यम पैसा....

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 14:21 नवीन
'पैसा ही आयुष्यातील अत्यंत दुय्यम वस्तू आहे.' फक्त, वरील विधान करण्या पूर्वी तो तुमच्या गाठीशी भरपूर असला पाहिजे. पैसा दुय्यम आहे हे मला पटले पण ते माझ्या कुटुंबाला, दुकानदाराला, कापड विक्रेत्याला, शिंप्याला, चष्मेवाल्याला, केमिस्टला, चांभाराला, डॉक्टरला, हॉस्पिटलला आणि शेवटी स्मशानातील लाकडे देणार्‍याला/विद्युत वाहिनीवाल्याला पटविले पाहिजे. उद्या व्यवसाय बंद करून मोकळ्या वेळेचा निवांत आनंद घेईन म्हणतो. 'गरज' आणि 'हव्यास' ह्यातील फरक ओळखून गरजेपुरता पैसा कमवावा/साठवावा. कुठल्याही गोष्टीचा 'हव्यास' वाईट. पाटा-वरवंटा गरीबाची, मिक्सर मध्यमवर्गीयांची तर फूड प्रोसेसर श्रीमंतांची गरज असू शकते. घराला, वाहनाला वातानुकुलन यंत्रणा ही एखाद्या स्थळी श्रीमंतांचे चोचले असू शकतात तर आखातासारख्या उष्ण प्रदेशात, जिथे उष्णतामान ५५ अंशाच्याही वर जाऊ शकते, ती सर्वसामान्यांची गरज आहे. प्रत्येक स्थल, काल आणि आर्थिक परिस्थितीनुसार 'गरजां'चे रुप बदलते. रिक्षावाल्याला टाळून पायी जाता येईल पण किती अंतर? तसेच, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करण्यासाठी वाहनाची गरज लागणारच लागणार. मुंबईत राहणारा माणूस स्वयंपाकासाठी गॅसवाल्यावर अवलंबून राहणार नाही म्हणाला तर रोज सकाळी खांद्यावर कुर्‍हाड टाकून लाकडे तोडायला २५-३० किलोमिटर चालत जावे लागेल जंगल शोधायला आणि तेवढेच अंतर पुन्हा पायी परतायचे? मला तरी अशक्य होईल हे जीवन. १५-२० वर्षांपूर्वी 'जगायला' जेवढा पैसा लागायचा त्याच्या कितीतरीपट जास्त पैसा आज 'जगायला' लागतो, त्याहून कितीतरी जास्त नजीकच्या भविष्यात लागणार आहे. जगण्यासाठी कमवायचे तर जेंव्हा कमविण्याची शारीरिक क्षमता उरणार नाही आणि तरीही जीवन चालूच राहणार आहे तेंव्हा काय करायचे? जसजसे शरीर 'वृद्ध' होत जाईल तसतसे खाण्यावरील खर्च कमी झाला तरी डॉक्टरांचा/औषधांचा खर्च भरपूर वाढणार आहे. लहानसहान गोष्टींसाठी मुलांसमोर उभं राहायचे/ हात पसरायचे दिवस गेले. आता, स्वतःच्या म्हातारपणाची सोय आत्ताच, सशक्त वयातच करायची असते. त्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कराविच लागणार तरच कमाईचे साधन आणि शारीरिक ताकद नसताना 'रेव्हेन्यू' चालू राहिल...... हे फक्त जगण्यासाठी.
  • Log in or register to post comments

अरे हो, वॉरन बफेचा प्रतिवाद करायचा राहिला!

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 15:14 नवीन
आणि तेवढ्यात पेठकरांचा हा प्रतिसाद आला. वॉरन बफे म्हणतो "Money is not everything. But make sure you have plenty of it before you say this nonsense". तुम्ही कोणताही विचार घ्या आणि मंथन सुरु करा तुम्हाला काळजी वाटलीच म्हणून समजा! प्रत्येक क्षणी (पुन्हा नमूद करतो प्रत्येक क्षणी ) तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक, विचार करणं किंवा दोन जगणं. तुम्ही कितीही थोर विचार करा तो बफेचा असू द्या की पेठकरांचा, तुम्ही दुय्यम व्हाल आणि विचार प्रार्थमिक होईल. मी तुम्हाला सांगतो की श्वास महत्त्वाचा आहे आणि तो पैश्यावर अवलंबून नाही पण पैश्याचा विचार किंवा कोणताही विचार एकच काम करतो ते म्हणजे तुमच्या श्वासाची लय बिघडवणं! इथे फक्त एकच क्षण गॅरेंटेड आहे आणि तो म्हणजे चालू क्षण, हा आत्तचा क्षण, आता तुम्ही वॉरेनचं ऐकलत तर तुमच्या मनात येणार Do I have plenty of money? आता प्लेंटी म्हणजे नक्की किती हे वॉरेनला सांगता येत नाही पण मी सांगतो, Just to meet the situation on hand! and that too if it requires money! If it doesn't require money Warren's saying doesn't matter at all. आणि पेठकरांना तेच सांगतो, आपण उद्या वृद्ध होऊ या काळजीनं आजच निराश व्हाल, मग तुमच्याकडे पैसा कितीही असो तो तुम्हाला नेहमी कमी वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तत्त्वज्ज्ञान आणि वस्तूस्थिती.

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 19:48 नवीन
तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक, विचार करणं किंवा दोन जगणं. कुठलीही गोष्ट (अगदी आयुष्य जगणेही) विचार करून करावी असे पूर्वज/ज्येष्ठ सांगत आले आहेत. ते ही विचार करायचे आणि ८०-९० पर्यंत 'जगले'. त्यामुळे विचार करून जगणे हा तिसरा पर्याय अनुभवातून आलेला आहे. तो सदैव असणारच. तुमच्या वरील विधानातून 'सर्व विचारवंत अल्पायुषी होते आणि सगळे दिर्घायुषी विचारच करायचे नाहीत' असा अर्थ निघतो, तो मला मान्य नाही. श्वास महत्त्वाचा आहे आणि तो पैश्यावर अवलंबून नाही. हॉस्पिटलात आपल्या प्रिय माणसाला किंवा स्वतःला वैद्यकिय उपचार हवे असतात तेंव्हा हे तत्त्वज्ज्ञान त्यांना सांगून पाहा तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला ते हॉस्पिटलात भरती करून आवश्यक वैद्यकिय उपचार देतात का. तिथे पैसाच लागतो. आपण उद्या वृद्ध होऊ या काळजीनं आजच निराश व्हाल. काळजी कोण करतय? आणि निराश?? हॅ: अज्जिबात नाही. आजही मजा करतो आहे आणि वृद्धापकाळीही नैराश्य न येता काळजी विरहित जगण्याची सोय करून ठेवतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वल्ला!

पिवळा डांबिस
Sat, 06/23/2012 - 00:10 नवीन
पैसा दुय्यम आहे हे मला पटले पण ते माझ्या कुटुंबाला, दुकानदाराला, कापड विक्रेत्याला, शिंप्याला, चष्मेवाल्याला, केमिस्टला, चांभाराला, डॉक्टरला, हॉस्पिटलला आणि शेवटी स्मशानातील लाकडे देणार्‍याला/विद्युत वाहिनीवाल्याला पटविले पाहिजे. उद्या व्यवसाय बंद करून मोकळ्या वेळेचा निवांत आनंद घेईन म्हणतो. वल्ला! पेठकरमियां क्या बात है!!! :) "पैसा खुदा तो नही है लेकिन खुदाकसम, खुदासे कम भी तो नही...." -एक जाणकार राजकारणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

@ परा, ममो आणि नितीन, तुमच्या सर्वांच्या विचारांची दिशा एकच

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 14:44 नवीन
आहे म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. पहिली गोष्ट, मी या लेखातून चंगळवाद मांडत नाहीये, मी खरं तर एकच महत्त्वाचा मुद्दा मांडतोय की पैसा निर्जीव आहे आणि आपण सजीव आहोत, आपण प्रथम आहोत आणि पैसा नंतर आहे, आपल्यामुळे पैसा सार्थक आहे. दुसरी गोष्ट, आज मधे जगणं नेहमी उद्याचं जगणं आनंदी करत कारण उद्या हा निव्वळ अ‍ॅटीट्यूड आहे, उद्या हा विचार आहे त्याला वास्तविकता नाही. उद्याचा विचार भीती निर्माण करतो, आहे ते उपभोगू देत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे या विचारांमागे कमालीचं अध्यात्म आहे (पण ते आता इथे मांडत नाही) त्यामुळे ही विचारसरणी पाश्चिमात्यांसारखी उथळ आणि एकांगी नाही. मी स्वतः कौटुंबिक जीवन जगतो आणि सहा जणांची जवाबदारी घेऊन घर चालवतो, तरीही जगण्यात कमालीचा स्वछंद आहे. विचार काय आहे, मन काय आहे, काल आहे किंवा नाही, मृत्यू काय आहे, आनंद म्हणजे काय, आपण नक्की कोण आहोत या सर्वांवर समग्र विचारांती हे लेखन आहे आणि सुदैवानं याला अत्यंत भक्कम अशी रोजच्या जगण्याची जोड आहे कारण पैसा हा मी आरपार आभ्यासलेला विषय आहे. माझं म्हणण इतकच आहे की या विषयावर विवादात जगातल्या कुणालाही मी पराभूत करिन पण त्याचा काही उपयोग नाही, अत्यंत मनस्वीतेनं हा लेख अशासाठी इथे पोस्ट केलाय की तुमचं जगणं आनंदाच व्हावं. उदाहरणार्थ, नितिननं संपत्ती , पैसा आणि साठवण्याची प्रेरणा असा विचार मांडलाय पण तो मी `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' मधे क्लिअर केलाय. प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही लेख पुन्हापुन्हा शांतपणे वाचा आणि आचरणात आणा, माझा एक पैश्याचा स्वार्थ नाहीये, तुमचं आयुष्य बदलेल याची मी ग्वाही देतो.
  • Log in or register to post comments

तात्विक भाष्य सुंदरच आहे.

गवि
Fri, 06/22/2012 - 15:38 नवीन
तात्विक भाष्य सुंदरच आहे. त्यातला विचार अतिशय महत्वाचा आहे. पण प्रत्यक्षात हे असं वागणं बर्‍याच पॅरेडॉक्सेसना जन्म देणारं असेल असं दिसतं. तुम्ही स्वतः हे आचरणात आणत असाल याविषयी पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या व्यवसायामुळे "पैसा" या गोष्टीचा एंड टू एंड अभ्यासही तुमचा कधीचाच घडलेला आहे हेही कळतंय. पण कोणतीही घटना / गरज / स्थिती ही फक्त "आज", "आत्ताच्या क्षणी" इतक्या लहान प्रमाणात नसते. उदा. अचानक कुटुंबातल्या व्यक्तीवर कोसळलेला भयानक आजार आणि त्याने व्यापलेले आयुष्यातले सहा महिने.. पैकी ३ महिने त्या व्यक्तीने आयसीयूत छत बघत आजचा क्षण जगलेले..आणि अन्य नातेवाईकांनी आयसीयूबाहेर वाट पहात काढलेले.. वन डे अ‍ॅट अ टाईम करत. पण हॉस्पिटलचं बिल आजचा क्षण + आजचा दुसरा क्षण + आजचा तिसरा क्षण असं करत क्युम्युलेटिव्ह वाढतं. आज द्यायला नाही जमलं की उद्या ते दोन दिवसांचं बनून येतं. तिथे हॉस्पिटल असं नाही म्हणत की फक्त आजच्या या क्षणाचं बिल द्या. आपण कालच आजचा (त्यावेळच्या उद्याचा) विचार करुन विमा उतरवलेला असला तर त्याची लिमिट संपेपर्यंत ठीक असतं मग आपण उसने घेतो कर्ज काढतो ते "उद्या" 'परवा' असे दीर्घ मुदतीत परत करायचे असतात. उद्याचा विचार न करता आजच्या क्षणात जगावं हा विचार उमदा आहे आणि अगदी शक्य तेव्हा आचरणात आणावाच.. पण प्रत्यक्षात बर्‍याच सिच्युएशन्समधे त्याला फक्त एक सुंदर थियरी इतकाच अर्थ उरतो हेही कटू सत्य आहे. पैशाचा भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा त्रास / ताण कोणी करुन घेत नाही संजयसर, तो होतो. आपण प्राथमिक, पैसा दुय्यम.. मग आपण दुय्यम पैसा प्राथमिक असं काही कोणी आधी थिअरी ठरवून मग प्रॅक्टिकल करत नसतो.. ते त्या त्या क्षणी टाळता येत नाही हेच खरं. आता मी तुम्हाला काय सांगावं आणखी..? मला तर असं वाटतं की ज्या वेळी मनाला जे वाटायचं असेल ते वाटू द्यावं.. पैशाची काळजी? ठीकाय.. भविष्याची चिंता..? ठीकाय..वाटू दे तेच्यायला.. गो थ्रू इट.. बाहेर आलात की आनंद.. नाही आलात तर मरा.. जे वाटतंय ते बळंच टाळून एखादी थियरी डोक्यात घुसवत जगायचं त्यात काही मजा नाही.. आत निवांत तरच बाहेर निवांत..
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Fri, 06/22/2012 - 16:05 नवीन
गविंशी सहमत आहे. मागे इतरत्र एका चर्चेत निवृत्तीच्या वेळी किती रुपये असायला हवेत असा हिशेब मांडला गेला होता. तसे अडीच कोटी न जमवता निवृत्तीनंतर सुखात/आनंदात प्रत्येक क्षण जगण्याचा काही उपाय असला तर या संजयजींनी या धाग्यावर मार्गदर्शन करावे. पूर्वी ६०-७०च्या दशकात हिप्पी लोकांची एक चळवळ होऊन गेली. त्यांचाही विचार असाच काहीसा (आज आणि आत्ता मध्ये जगा) होता. ती चळवळ का फोफावली नाही याचा विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझ्याकडे किती पैसे आहेत ते मोजत नाही म्हणून

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 16:41 नवीन
मला काळजी वाटत नाही (अर्थात अडीच कोटी वगैरे नाहीयेत) पण निवृत्त काय जगेल असं आयुष्य आता जगतोय! निवृती नंतर असतं काय जगायला? पेठकरांना सांगीतलं तेच तुम्हाला सांगतोय उगीच निवृती, विकलांगता, मृत्यू, अत्यंसंस्कार, मग पत्नीचा चरितार्थ, मग तिची विकलांगता... आहो हे संपणारं नाही. आणि मी हिप्पी नाही हो, फुल्ल संसारी आहे, तुम्ही उत्तरं मनापासून वाचत नाही त्यामुळे असं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गवि, येस! आत निवांत तरच बाहेर निवांत..

संजय क्षीरसागर
Wed, 06/27/2012 - 13:23 नवीन
आणि आत निवांत होण्यासाठीच तर लिहिलय! आयुष्य हे वरुन तसं दिसत असलं तरी वास्तविकात क्युम्युलेशन नाहीये, स्मृतीमुळे तसा भास होतो. एखादा पेशंट तीन महिने आयसीयूमधे आहे असं आपण म्हणतो तेव्हा ते आता या क्षणी असतं, मागचे दिवस स्मृतीत असतात आणि पुढची काळजी (कितीही योग्य वाटली तरी) कल्पना असते. या क्षणी तुम्ही काय करणारा हाच नेहमी प्रश्न असतो, तो प्रसंग या क्षणी कसा हाताळता यावर सगळं अवलंबून असतं, पैसे असोत की नसोत. म्हणून तर सांगतोय पैसा दुय्यम आहे, तुम्ही प्रथम आहात, प्रत्येक वेळी याचच विस्मरण होतं, आणि जितकं विस्मरण तितकी काळजी. >जे वाटतंय ते बळंच टाळून एखादी थियरी डोक्यात घुसवत जगायचं त्यात काही मजा नाही.. = ही थिअरी नाही, पैश्याची ओढ सार्‍या जगाला आहे, पैसा मिळणार नाही म्हटलं तर कुणी सकाळी बिछान्यातनं उठायला देखील तयार होणार नाही! काय वाटतं? मी तुम्हाला वास्तविकता सांगतोय पण जग बहुदा प्रश्नात इतकं गुंतलय की त्यांना प्रश्नाचा विसर पडलाय, जे चाललय ते बरोबरच आहे असं वाटतय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

उत्तम विषय. फारच मस्त विषय.

शुचि
Fri, 06/22/2012 - 17:46 नवीन
उत्तम विषय. फारच मस्त विषय. आता हापीसातून लेख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया निवांतपणे वाचीन म्हणते. मग यावर माझे काही विचार मांडेन, प्रश्न विचारेन. इतका "सेक्सी" ( ;) ) विषय चर्चेस घेतल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विषय सेक्सी नाहीये पण असं जगायला लागल्यावर आयुष्य सेक्सी होतं

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 18:09 नवीन
हे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

चोच

तिमा
Fri, 06/22/2012 - 17:57 नवीन
कुटुंबनियोजनाला विरोध करणार्‍या, जुन्या पिढीतल्या एका नातेवाईकांकडून एक प्रतिवाद ऐकला होता. 'चोच आहे तिथे दाणा आहे'. वरील विचारसरणी मला त्याच प्रकारची वाटते आहे. पैशामागे धावू नये, गरजा कमी असाव्यात हे सर्व ठीक आहे. पण अलिकडील काही वर्षांत माफक दैनंदिन जगण्यासाठीही जास्त पैसा लागतो आहे. अशा वेळेला तुमचे आयुष्य किती आहे हे नक्की माहित नसताना, कोणालाही उद्याची चिंता वाटणारच. वर गविंनी लिहिल्याप्रमाणे, असाध्य व्याधींमुळे (त्यावरील इलाजांमुळे) एखाद्या कुटुंबावर इतके मोठे आर्थिक संकट कोसळते तेंव्हा, चंगळ न करता काटकसरीने जमवलेला पैसाच त्याच्या मदतीला असतो.
  • Log in or register to post comments

आहो, मी कुठेही 'चोच आहे तिथे दाणा आहे'

संजय क्षीरसागर
Fri, 06/22/2012 - 18:19 नवीन
पैशामागे धावू नये, गरजा कमी असाव्यात वगैरे म्हटलं नाहीये. तुम्ही पुन्हा शंतपणे वाचा : `उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत' ही टॅग लाईन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

:)

पैसा
Fri, 06/22/2012 - 18:17 नवीन
मला वाटलं माझ्यासाठी लेख लिहिलाय की काय! पण असो. लेख चांगला आहे. आणि विचार करण्याची ही पण एक पद्धत आहे. आपल्या जागी ती बरोबर आहे. तसं अचानक येणार्‍या संकटांसाठी काही तरतूद हवी हेही बरोबर आहे. मला वाटतं, क्षीरसागर साहेब "पैसे जमवू नका" असं म्हणत नाहीयेत तर "सदैव त्याबद्दलची काळजी करत बसू नका" असं म्हणत आहेत. प्रत्येकाने आपल्याला किती पैसे पुरेसे आहेत हे ठरवावं आणि तेवढे मिळाले की मनसोक्त जगावं. इतकं सोपं आहे हे!
  • Log in or register to post comments

निरर्थक, जडशीळ तत्त्वज्ज्ञान.

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 20:00 नवीन
प्रत्येकाने आपल्याला किती पैसे पुरेसे आहेत हे ठरवावं आणि तेवढे मिळाले की मनसोक्त जगावं. इतकं सोपं आहे हे! अगदी सत्य वचन. आणि तेवढे नाही मिळाले तर जे मिळताहेत, गाठीशी आहेत त्यावर समाधानी असावं. तेच तर करतोय. मग हे फुकाचं, पचनी न पडणार तत्त्वज्ज्ञान, कशाकरीता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुस्तक - द सोल ऑफ मनी

शुचि
Sat, 06/23/2012 - 00:00 नवीन
माझी एक मैत्रिण (रूममेट) आहे - शनी उच्चीचा आहे (तूळेचा), सूर्य उच्चीचा आहे (मेषेचा), मंगळ स्वराशीत (मेषेत) पण मला वाटतं शनीने शिस्त शिकवली आहे. इतकी टाईट्-फीस्टेड (जपून खर्च करणारी) आहे की बास ती पै न पै साठवून नक्की कोट्याधीश होणार. अन्य बाबतीत देखील ती खूप काटेकोर आहे. मला अशा लोकांचे खूप कौतुक वाटते. आता ती आयुष्य उपभोगते का? तर वेल, कदाचित रूढार्थाने नाही. आम्ही जेव्हा बाहेरचं घट्ट दही विकत आणतो तेव्हा ती घरी फुळकवणी, पांचट दही बनवून खाते. (घरचं दही चांगलं बनत असेल. इथे तिचं बनत नाही.त्यावर चर्चा नको.)हा झाला लहान प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत. आम्ही पट्टदिशी एसी लावतो तर ती लावत नाही वगैरे वगैरे. पण मला खात्री आहे तिचा वृद्धापकाळ सोन्याचा जाणार. जावो. तिचा हक्क आहे. ______________________________________________ पैशाविषयी एक अत्यंतिक सुरेख पुस्तक वाचले होते "द सोल ऑफ मनी" ज्यात लेखिकेने म्हटले आहे की - money इज लाईक water or blood: flowing it can purify, cleanse, create growth and nourish versus becoming stagnant and toxic to those withholding or hoarding it. मला ते पटते. पैसा हा आयुष्यात पाण्यासारखाच वहाता येतो/रहातो. पण पाण्याचा साठादेखील आपण करतो जो दुष्काळात उपयोगी पडतो. थोडा विचार केला तर पाणी , ओलावा= पैसा हे समीकरण खूप खूप पटून जाते.
  • Log in or register to post comments

माझ्या आयुष्याशी निगडीत बोलतो

गणेशा
Fri, 06/22/2012 - 20:14 नवीन
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत
माझे जगणे असेच आहे, तुम्ही वरती जेव्हडे लिहिले आहे ते तंतोतंत नसले तरी बर्याचांशी मला लागु होतेय म्हणुन बोलतो. आयुष्य भारीच वाटते.. पण माझ्या मागे माझे घरचे आहेत, वडिल अजुन कमावतात म्हणुन मला झळ पोहचलेली नाहिये जास्त. पण अश्या स्वभावामुळे घरच्यांचे बरेच बोलणे खावे लागते .. दूसरी गोष्ट अशी की काही लोन पण डोक्यावर आहे. प्लस पॉइंट असा आहे की, १८००० सॅलरी असताना रेसेशन चालु असताना २६ लाखाचे घर घेतले. ( लोन १२ लाख आहे पण ते फिटेल. अगदीच काही नाहि झाले तरी जुने घर आहे ते विकता येइलच) सध्याच्या २६ लाखाच्या घराची किंमत ३ वर्षात ७५००० झाली आहे. भारी वाटते. आनंद आहे. बिंधास्त स्वभाव आहे, पण घरी वडिलांचा पगार आहे म्हनुन खरी काळजी नाही. लग्न झाले.. १ महिना आधी पैसे नव्हते.. आले .. स्त्रोत अनंत असतात .. काळजी नव्हतीच.. पैसे आनखिन २ महिन्यात फिटतायेत. गाडी बुक केली, ऑलरेडी लोन चालु आहे, तरी घेतोय, आपोआप जुळेल सारे असे वाटते आहे. पहिला पगार १००० होता, तेंव्हा पहिल्या पगारात ८००० चा मोबाईल घेतला होता. ( बाकी पैसे घरच्यांचे) कंपणी चेंज केली, पहिला पगार १६००० रुपये. घरचे पॅशन गाडी घेवून देणार होते, मी अपाची घेतली ( पैसे घरच्यांचेच) माझा असाच स्वभाव आहे पण मागे घरचे भक्कम आहेत म्हणुन सर्व ठिक आहे, नाहि तर सारे अवघड आहे, १० लाख रोख घरच्यांनी दिले नसते तर २६ लाखाचे घर घेणे जमलेच नसते. परंतु स्वभाव असा असल्यावर आनंदी जगता येते हे मान्य .. पण सर्व कुटुंबाला बरोबर घेवुन आनंदी जगता आले पाहिजे असे वाटते, आणि तेच सध्या शिकत आहे... म्हणजे आनंद उपभोगणे आणि आनंद देणे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत हे मला पटले आहे.. खुप दिवस आनंद उपभोगण्यात घालवली आहेत, आता कुटुंबाला आनंद देण्याकडे कल वाटतो आहे.. कदाचीत मी प्रत्येक क्षणी सुखी नसेन पण प्रत्येक क्षण समाधानाने जगत असेन. आनंद हा समाधानाशी बांधला पाहिजे असे वाटते ,निवांत जगण्यात, जास्त काळजी न करता माणुस कदाचीत दु:खी होणार नाहि पण तो आनंदमयी जगत असेल असे वाटत नाही, कारण निवांतपणातुन/बिंधास्तपणातुन कायम आनंद झिरपत नाही. समाधान ही एकच गोष्ट अशी आहे जी सुखाची व्याख्याच बदलवुन टाकते. 'संत लोक समाधानी होते, तर राजे लोक सुखी होते ' या उदाहरणातुन वरची गोष्ट कळेल असे वाटते. नोट : बाकी कामामुळे धाग्याखालचे रिप्लाय न वाचताच रिप्लाय दिला आहे, त्यामुळॅ असे मत वरती कोणी मांडले आहे का ते पाहिले नाही. वेळ मिळताच सारे रिप्लाय वाचीन. बाकी धागा आवडला हे.वे.सां.न.ला.
  • Log in or register to post comments

बरंच नुकसान झालय हो तुमचं.

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 20:18 नवीन
सध्याच्या २६ लाखाच्या घराची किंमत ३ वर्षात ७५००० झाली आहे. एवढी उतरली? कुठे घेतलयं घर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

७५,००,००० सॉर्री.

गणेशा
Fri, 06/22/2012 - 20:19 नवीन
७५,००,००० सॉर्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तुमचा प्रतिसाद वाचुन तुमचे

गोंधळी
Fri, 06/22/2012 - 21:36 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचुन तुमचे खुप लाड झालेले दिसतायत. गाडि,मोबाईल्,आपाचे वा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

घर कुठे घेतलं?

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 00:21 नवीन
प्रपेंच्या प्रश्नाचे उत्तर राहिले की रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

सुरस आणि उद्बोदक

पिवळा डांबिस
Fri, 06/22/2012 - 23:25 नवीन
सुरस आणि उद्बोदक धागा. जाणकारांचे विवेचन वाचतोय.
  • Log in or register to post comments

फण्डा +१ रुपयाचा...

अर्धवटराव
Sat, 06/23/2012 - 05:16 नवीन
आपण ज्याला पैसा म्हणतो तो इतर काहि नसुन रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस ची इक्विवॅलंट गॅरॅण्टी आहे. सोपं उदाहरण घेऊ ... एक मनुष्य दिवस भरात ६ पोळ्या खातो. हि त्याची त्याला जाणवणारी गरज आहे. त्याला चॅलेंज नाहि. म्हणजे वर्षभरात जवळपास २२००. जर एका पोळीची वार्षीक सरासरी किंमत १ रु. घेतली तर त्या माणसाला वर्षभराकरता २२०० रु लागतील. नथींग जास्त, नो कमी. आता त्याच्याजवळ रोज ७ रु येण्याची शाश्वती असेल, म्हणजे ६ पोळ्या (+ १ रु...ऐश करो) तर तो श्रीमंत आणि सुखी. हे गणित ज्याला जमलं तो पैश्याच्या टेन्शनमधुन सुटला... अगदी सदेह वैकुंठप्राप्ती. थोडक्यात काय, तर आपलं शरीर - मन - बुद्धी - विवेक...आपल्याला किती भुक आहे याची खात्रीने कल्पना देते. टेक दॅट कॉल प्रामाणिकपणे, अ‍ॅण्ड मेक अरेंजमेण्ट्स. प्रामाणिकपणाच्या इक्विव्हॅलण्ट सुख पदरात पाडुन घ्या. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

च्यायला आमचाच फंडा चोरला की !

चौकटराजा
Sat, 06/23/2012 - 11:43 नवीन
आमचे हेच म्हणणे आहे की सारे सापेक्ष आहे. माझी गरज व माझी कमाई त्यात कमाई वरचढ झाली की मी श्रीमंत . गरज वरचढ झाली की मी गरीब . द आफ्रिकेने वन डे मधे ४३४ धावा करून शेवटच्या ओव्हर मधे ऑस्टेलियाला " गरीब" करून टाकले. गरजे पेक्शा त्यांची कमाई जास्त झाली. सबब द. आफ्रिका श्रीमंत ठरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थोडं वेगळं आहे माझं म्हणणं !!

अर्धवटराव
Sat, 06/23/2012 - 19:36 नवीन
आपली श्रीमंती आपणच ठरवावी... उगा दुसर्‍याशी कंपेअर करुच नये. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ज्यांना पटलय त्यांच्यासाठी

संजय क्षीरसागर
Sat, 06/23/2012 - 08:16 नवीन
श्वास ही सर्वात रहस्यमय घटना आहे. अठरा कोटी किलोमिटरवर सूर्यप्रकाशमान आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, या अनंत अवकाशात पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरतेय आणि तो मार्ग असंख्य ग्रह-तार्‍यातून अनाकलनीय पद्धतीनं निर्माण झालाय. पृथ्वी का फिरतेय, सूर्य का प्रकाशमान आहे, दोघातलं योग्य अंतर कसं राखलं गेलय आणि हे केवळ लक्षावधी वर्ष चालूये म्हणून ते असंच चालू राहिल अशी समजूत व्यर्थ आहे. पृथ्वी आसाशी कललीये म्हणून ऋतू आहेत, समुद्र आपली मर्यादा राखून आहेत म्हणून पाऊस आहे, पाऊस आहे म्हणून वृक्ष आहेत, आपला उत्छ्वास आहे म्हणून त्यांचा श्वास आहे आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आहे. अस्तित्वात परस्परावलंबित्व आहे आणि ते इतकं कमालीचं गुंतागुंतीचय की एखादा घटक जरी बिघडला तरी सगळ्या अस्तित्वातली परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स एका क्षणात बदलतील. माणसाची मजा अशीये की हे सगळं त्यानं इतकं अध्याहृत धरलय की माहिती असून सुद्धा ते विस्मृतीत गेलय, ज्या श्वासाच्या एका धाग्यावर त्याच्या सर्व कल्पनांचे महाल आहेत त्याची जाणीव त्याला बहुदा शेवटच्या श्वासाला होत असावी! त्याला वाटतय पैश्यामुळे जग चाललय. बुद्धाची सारी विपश्यना केवळ या गोष्टीवर आधारित आहे, जस्ट वन थिंग, श्वासाची दखल घेणं! ज्या क्षणी एखाद्याला श्वास चालूये हा अस्तित्वाचा काय उपकार आहे ते समजतं त्या क्षणी त्याच्या जीवनाच्या सार्‍या प्रायॉरिटीज बदलतात, तो त्याच्या मूळातच असलेल्या अस्तित्वाच्या एकरुपतेतून अस्तित्वाशी सुसंगत जगायला लागतो. जगण्याची दिशा त्याला अस्तित्वाशी साधलेल्या संवादातून, जाणीवेतून मिळते, तो काँटॅक्ट पॉइंट होतो; पुढे काय होईल, आता काय फिल्डींग लावू हा विचार व्यर्थ होतो. ज्यांना हे पटेल त्यांच्या आयुष्याची दिशा बदलेल, ज्यांना पटणार नाही त्यांच काय नेहमीसारखं चालू आहेच.
  • Log in or register to post comments

>>ज्यांना हे पटेल त्यांच्या

मराठमोळा
Sat, 06/23/2012 - 08:52 नवीन
>>ज्यांना हे पटेल त्यांच्या आयुष्याची दिशा बदलेल, ज्यांना पटणार नाही त्यांच काय नेहमीसारखं चालू आहेच. मी एकदा ईस्कॉन मधे गेलो होतो, तिथे मला ईस्कॉनचा सदस्य होण्यासाठी पटवायला लागले. मला त्यांचे विचार पटले नाहीत, उलट मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना देता आली नाहीत. नंतर म्हणाले की तु जे जगतोय्स ते आयुष्य नाही, आम्ही जगतो ते आयुष्य आहे.. ओशो अनुयायी पण बाहेरच्यांना कदाचित असंच म्हणत असतील तुमच्या वरील वाक्यावरुन असंच काहीसं वाटलं. सर्वात पहिले म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते कुणाला पटत नाहीये हा गैरसमज दूर करा. क्लीयर द परसेप्शन. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटतय की तुम्ही जे करताय तेच बरोबर आहे आणि बाकीचे अज्ञानी आहेत. तुम्ही जीवन जगताय आणि बाकीचे आयुष्य काढताहेत/ ढकलताहेत हाही गैरसमज दूर करा.. प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, स्वतंत्र अस्तित्त्व आहे. विचार करायचं सामर्थ्य आहे. तुम्ही तुमचे विचार मांडलेत, तुमचं काम झालं, ईतरांचे विचारही समजून घ्या. स्वतःला ईतरांच्या जागी ठेवून बघा. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कल्टवाल्यांचा हाच तर

शिल्पा ब
Sat, 06/23/2012 - 09:10 नवीन
कल्टवाल्यांचा हाच तर प्रॉब्लेम असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा