✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही 'जपानी' अनुभव

स
सोत्रि यांनी
Mon, 06/18/2012 - 23:14  ·  लेख
लेख
जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक. अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य. माझ्या पहिल्या दौर्‍यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्‍या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो... हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्‍यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव... एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्‍या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. 'काम चालू रस्ता बंद' अशी पाटी न लागता 'तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल क्षमस्व' असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने बघायला लागला व म्हणाला, 'अरे त्या दोन कर्मचार्‍यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?' बर्‍याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते. ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव... एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्‍याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्‍यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, 'सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?' आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा... अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. 'एक मिनीट', म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्‍याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्‍यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, 'तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते'. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये! एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, 'त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?' ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला. ह्या दुसर्‍या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
प्रवास
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
14204 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

सोत्री आजवर केवळ प्रतिसादातून

चाफा
Tue, 06/19/2012 - 21:25 नवीन
सोत्री आजवर केवळ प्रतिसादातून ओळख झालेली लेखन खरंच इतकं अप्रतिम आहे तर लिहा की राव (सोत्रींच्या लेखनाच्या प्रतिक्षेत असलेला) चाफा :)
  • Log in or register to post comments

मी थोडं निगेटीव्ह देखील ऐकलं आहे !!

अर्धवटराव
Tue, 06/19/2012 - 22:53 नवीन
जपानमध्ये कुटुंब व्यवस्था मोडकळीला यायच्या मार्गावर आहे असं ऐकतोय... तरुणांमध्ये लग्न करुन घर-संसार चालवण्याची इच्छा कमी होत चालली आहे, जन्मदर रोडावला आहे, वृद्धांची संख्या अमाप वाढते आहे आणि जपानला पुढील काहि वर्षात जपानी ह्युमनरिसोर्स ची कमतरता प्रखकतेने जाणवेल, वगैरे वगैरे.... अर्थात, तसं असेल तर आम्हि तिकडे जायला अगदी एका पायावर तयार आहोत ;) तेव्हढं त्सुनामी-भुकंप-महागाईचं बघा म्हणाजे झालं :D अर्धवटराव
  • Log in or register to post comments

<<तरुणांमध्ये लग्न करुन

शिल्पा ब
Tue, 06/19/2012 - 23:01 नवीन
<<तरुणांमध्ये लग्न करुन घर-संसार चालवण्याची इच्छा कमी होत चालली आहे का बरं? काय प्रॉब्लेम आहे नेमका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नेमकं कारण ठाऊक नाहि...

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 00:04 नवीन
पण २४ तास व्यग्र असल्यामुळे घर-संसारासाठी जो एक निवांतपणा लागतो त्याची वानवा असावी... आर्थीक जवाबदार्‍या टाळण्याचा कल असावा... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

होय हे खरे आहे. लिहीतो ह्यावर

सोत्रि
Wed, 06/20/2012 - 00:22 नवीन
होय हे खरे आहे. लिहीतो ह्यावर पुढच्या भागात. -(घर संसाराची दुर्दम्य ईच्छा असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सुरेख

सुनील
Tue, 06/19/2012 - 23:26 नवीन
हा तसेच डॉ अशोक कुलकर्णी यांचा हा धागा वाचून अगदी सद्गदित झालो! जपानमध्ये पोलिस खाते असते का असा एक प्रश्नदेखिल डोक्यात येऊन गेला ;) असेच अजून अनुभव येऊद्यात! अवांतर - ५-६ वर्षांपूर्वी जपानशी काही कामानिमित्त संबंध आला होता. त्यांची काटागाना नावाची लिपी युनिकोडात उपलब्ध असल्यामुळे त्या लिपीतील फायली एन्क्रीप्ट करता येत परंतु त्यांची कांजी युनिकोडात उपलब्ध नसल्यामुळे त्या लिपीतील फायली एन्क्रीप्ट करता येत नव्हत्या, असे अंधुकसे आठवते आहे. सध्या काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments

तुमचे लेख नेहमीच छान असतात.

एमी
Wed, 06/20/2012 - 06:42 नवीन
तुमचे लेख नेहमीच छान असतात.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन... पुढच्या भागाची

मदनबाण
Wed, 06/20/2012 - 11:51 नवीन
सुंदर लेखन... पुढच्या भागाची वाट पाहतोय... (जरा ललनां विषयी "डिटेल" मधे लिहावे) बाकी जपानी स्त्रियांना जपानी पुरुष नवरा म्हणुन हल्ली आवडत नाही म्हणॅ ! स्त्रियांचे स्वतःचे दुकान, हॉटेल असेल तर सरळ हे पुरुष त्यावर कब्जा करतात असे ऐकुन आहे,म्हणुन जपानी स्त्रिया इंपोर्टेड नवरा सोधतात ! श्रीलंकेत तसेच भारतात येउन असे पुरुष त्यांनी निवडले आहेत.मला वाटत...त्यांनी बिहारी (बोधगया) नवरे सुद्धा कटवले आहेत. (संदर्भः- http://alturl.com/43uwf) जपानी लोकांनी चित्र विचित्र खेळाचे सुद्धा शौकीन आहेत. ते इतके विचित्र आहेत की विचारु नका ! मी असे काही व्हिडीयो तूनळीवर पाहिले आहेत... तो व्हिडीयो पाहुन तर... इथे तो व्हिडीयो द्यावा ? की नको असा अजुन विचार करतोय ! फार विचित्र, आणि भयानक आणि दु:खाची परिसिमा ओलांडणार आहे. ;) असो एक दुसरा व्हिडीयो इथे देतो... तो पाहुन घ्या ! नको... ती लिंक दिली तरी तो व्हिडीयो (वरती उल्लेखलेला) पाहता येउ शकतो. त्यामुळे कोणी "तो" व्हिडीयो इथे टाकण्याची विनंती केल्यास / अथवा व्यनी केल्यास लिंक देण्याची सोय करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

घोर कलियुग...

वपाडाव
Wed, 06/20/2012 - 12:02 नवीन
>>>बाकी जपानी स्त्रियांना जपानी पुरुष नवरा म्हणुन हल्ली आवडत नाही म्हणे !!>>> -या आफ्रिकन्स लोकांच्या *** * **....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खीक्क

सोत्रि
Wed, 06/20/2012 - 12:28 नवीन
हा हा हा... :-) , :-) ,:-) -(वप्याच्या भावना पोहोचलेला) सोकाजि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

या आफ्रिकन्स लोकांच्या *** *

मदनबाण
Wed, 06/20/2012 - 12:38 नवीन
या आफ्रिकन्स लोकांच्या *** * **... ख्या ख्या ख्या खीक्क... ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

भापो रे... पण अफवांच्या नादी

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/20/2012 - 14:00 नवीन
भापो रे... पण अफवांच्या नादी फार लागू नये बाबा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मस्त धागा

हंस
Wed, 06/20/2012 - 21:46 नवीन
सोत्रि, सुभाषचंद्र बोसांची रक्षा ज्या "रेंकोजी मंदिरात" ठेवल्या आहेत त्या मंदिराला भेट दिली कि नाही?, असो मार्चमध्ये मी ह्या ठिकाणी जाऊन आलो, तो क्षण माझ्या जीवनातील अतिशय उत्कट क्षण होता. त्याची काही प्रचि खाली देत आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आता तिकीटयंत्रात ज्या स्लॉटमधुन तिकीट बाहेर येते त्याच स्लॉटमध्ये जर न वापरलेले तिकीट आत सरकवले कि तेवढे पैसे परत मिळतात त्यामुळे तुम्हाला ज्या कटकटीला सामोरे जावे लागले त्याचा प्रश्नच येत नाही. आणि अनुभवाचे म्हणाल तर, परवाच बँकेमध्ये सायकलवर जात असताना, एक स्त्री आपल्या दोन लहान मुलांबरोबर रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलला थांबली होती, तिच्याबरोबर असणारा तिचा मुलगा हा फुटपाथवर खेळत होता, मी तेथुन जात असताना तो मला आडवा आला, ते पाहून त्याची आई अतिशय खजील झाली आणि तिने मला कमीतकमी ४-५ वेळा "सुमिमासेन" म्हणजे माफ करा म्हटले, आणि हे कमी कि काय तिच्या बरोबर असणारी तिची लहान मुलगी वय वर्ष ३-४ अतीशाय गोड हसुन "सुमिमासेन" म्हणाली, मी आवक् च झालो! इतक्या लहान वयात सिव्हिक सेन्सची असणारी समज आणि आईवडीलांची शिकवण ह्यांना मी मनोमन नमस्कार केला, आणि नकळत ह्या प्रसंगाची भारताशी तुलना करु लागलो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सोत्रि
Wed, 06/20/2012 - 22:13 नवीन
हंस तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीयेय, दोनदा गेलो पण कॅमेरा बरोबर नव्हता त्यामुळे फोटो नव्हते. ह्या फोटोंसाठी तुमचा गुलाम ह्यापुढे मी !!!
आता तिकीटयंत्रात ज्या स्लॉटमधुन तिकीट बाहेर येते त्याच स्लॉटमध्ये जर न वापरलेले तिकीट आत सरकवले कि तेवढे पैसे परत मिळतात त्यामुळे तुम्हाला ज्या कटकटीला सामोरे जावे लागले त्याचा प्रश्नच येत नाही
त्यामुळेच हे "हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे" असे म्हटले होते ऑलरेडी! - (नेताजींचा पुतळा आठवून डोळे ओले झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

Roads are full of Idiots या

मृत्युन्जय
गुरुवार, 06/21/2012 - 11:31 नवीन
Roads are full of Idiots या जाहिरातीची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

खि खि खि

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 21:58 नवीन
>>...आणि नकळत ह्या प्रसंगाची भारताशी तुलना करु लागलो. --- क्यो बे, अंधा है क्या.. आयला माझीच गाडी (सायकल असली तरी) भेटली काय जीव द्यायला, बापाचा रस्ता आहे का, माजलेत साले.... अर्धवटराव
  • Log in or register to post comments

भारतातील प्रतिक्रिया!

हंस
गुरुवार, 06/21/2012 - 20:03 नवीन
<क्यो बे, अंधा है क्या.. आयला माझीच गाडी (सायकल असली तरी) भेटली काय जीव द्यायला, बापाचा रस्ता आहे का, माजलेत साले...> अहो हे म्हणण्या आधी ती मायमाउली कंबरेला पदर खोचुन, केसांचा आंबाडा बांधुन बरोबर माझ्या सात पिढ्यांचा उध्दार करत म्हणाली असती "अरे ये मसण्या, तुह्या डोळ्यांच्या खाचा झाल्यात व्हय? तुला दिसना व्हय माहा बबड्या खेळतोय ते? डोळे फुटलं का रे डुचक्या........................." :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

एक अनुभव..

बिजुरीया
गुरुवार, 06/21/2012 - 15:39 नवीन
सोत्रिंचे लेख वाचनिय आणि सहज-सुंदर असतात यात काहि शंका नाही.. जपान आणि जपानी लोकांबद्दल आदर असलेल्यांपैकी मी एक. म्हणून मला माझा एक अनुभव इथे नमुद करावासा वाट्तोय... माझा छोटा तेव्हा 2 वर्षाचा होता आणि तो घरिच असायचा म्हंजे आम्ही त्याला शाळेत नव्हते घातले.. मोठा मात्र तिथल्या शाळेत जायचा.. एका दुपारी मोठा शाळेतून यायच्या तासभर आधि मी छोट्याला घेऊन जवळच असलेल्या किराणा दुकानात जाण्यासाठी घरातून निघाले..खाली आल्यावर माझ्या छोट्याला पार्कमधेच खेळायचे होते..दुपारची वेळ असल्यामुळे पार्कमधे दोन जपानी छोट्या मुलीन(6-7वर्षाच्या असतील) व्यतिरिक्त कोणी नव्हते.मला वेळ नसल्यामुले(मोठा शाळेतून परत यायच्या आत परतायचे होते) मी त्याला पार्क मधे ठेवून दुकानात गेले पण थोड्याच वेळात पाउस पडायला लागला म्हणून मी गडबडीत दुकानातून बाहेर निघाली. इकडे पार्कमधे पाऊस येउ लागल्यावर त्या दोन मुली घरी न जाता, रडणार्या माझ्या छोट्याचा हात पकडून दुकानाच्या दिशेने येत असलेल्या मला दिसल्या.मला पहाताच त्याचा हात सोडून त्या झाडामागे लपून त्याला माझ्यापर्यंत पोचेपर्यंत पाहात रहिल्या..मी छोट्याला विचारल्यास त्याने फक्त झाडाकडे बोट दाखवले. मी तिकडे पाहिले तेव्हा फक्त गोड हसून त्या त्यांच्या घरी निघून गेल्या. खरेच,मदत करनारी जपानी मोठी माणसे तर खूप भेटली परंतु त्या छोट्या अनोळखी जपानी मुली माझ्या कायम लक्षात राहिल्या..
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमच्या २वर्षाच्या

शिल्पा ब
गुरुवार, 06/21/2012 - 21:26 नवीन
तुम्ही तुमच्या २वर्षाच्या मुलाला पार्कात खेळायला सोडुन तुमचे कामं उरकायला गेलात? कमाल आहे? आणि हे असे मदत करणारे छोटे सगळीकडेच असतात हा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिजुरीया

हाच तर फरक आहे भारतात आणि

बिजुरीया
Fri, 06/22/2012 - 19:24 नवीन
हाच तर फरक आहे भारतात आणि जपानमधे...भारतात मुलाला सोडून नाही जावु शकत...तिथे सोसायटीत आणि पार्कमधे मुलाना कसलीही भिती नसते..माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा मेट्रो ट्रेन ने रोज शाळेत जायचा..आपल्याकडे ट्राफिक चे नियम पाळणारे क्वचित भेटतात..अपघात आपल्याकडे सामान्य गोष्ट झालेली आहे..तिथे खूप क्वचित घडतात अपघात. आम्ही ज्या दान्चीत (सोसायटी)राहायचो तिथे सात बिल्डिंग्ज होत्या.. प्रत्येक बिल्डिंग्अला 10 ते 12 मजले आणि प्रत्येक मजल्यावर जवळ्पास 100 घरे होती..विचार करा तिथे किती लोक राहात असतिल.. मदत करनार्या जपानी मुली सम्पुर्णपने अनोळखी..त्याना आपली भाषा नाही समजत ..आणि त्याहि छोटयाच..पण तरिहि त्याच्यासोबत आल्या.सामान्यपणे काहि मुले पावसात खेळताना आपल्यातच दंग झालेली असतात..त्याना आजुबाजुला काय चाललेय याचे भानही राहात नाहि. म्हनून ..जपान्यांसाठी हा अनुभव नसु शकेल पण भारतीयांसाठी नक्कीच तो अनुभव असु शकतो.. तुम्ही तुमच्या २वर्षाच्या मुलाला पार्कात खेळायला सोडुन तुमचे कामं उरकायला गेलात? कमाल आहे? कोणत्याही भारतीय आईला हा प्रश्न येणे साहजिक आहे.. पण ते दुकान पार्क च्या समोरच आहे.. मी काही खूप लाम्ब गेली नव्हती कामे उरकायल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा

रेवती
Fri, 06/22/2012 - 20:58 नवीन
माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा मेट्रो ट्रेन ने रोज शाळेत जायचा मी असे ऐकले होते की मुलांनी आपापल्या मार्गाने शाळेत जाणे येणे व्यवस्थित करावे म्हणून त्यांना आईवडीलांकडून त्याप्रकारे सराव करून घेतला जातो. त्याबद्दल काही सांगू शकाल का? अशाप्रकारची सुरक्षितता, शिस्त याचा अनुभव घेतल्याशिवाय विश्वास बसणे एरवी अवघड जाते. सगळे अचंबित करणारे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिजुरीया

खरेच आहे..अनुभव घेतल्याशिवाय

बिजुरीया
Fri, 06/22/2012 - 22:56 नवीन
खरेच आहे..अनुभव घेतल्याशिवाय खरे नाही वाटणार..पण एक नक्कि जो तिथे राहून आला तो जपान आणि तेथिल लोकांच्या आदरातिथ्याने प्रभावित झाल्याशिवाय राहनार नाही.. आम्हीतरी आसा काही सराव करून घेतला नव्हता..तिथली सुरक्षितता,आणि शिस्तीबद्दल खात्री झाल्यावरच त्याला एकट्याला पाठवायला सुरुवात केली होती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी

शिल्पा ब
Fri, 06/22/2012 - 23:24 नवीन
बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी जपानात काही दिवस जायला हरकत नाही. हे असं आबादीआबाद असल्यानेच का काय जपानी पोलिसांना काहीच काम नसतं म्हणे. म्हणुन मग ट्रेनमधे गर्दीच्या वेळी लोकांना ट्रेनमधे कोंबायला - ढकलायला पोलिस फोर्स वापरतात असं युट्युबवर पाहीलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिजुरीया

जब्राच

दादा कोंडके
Sat, 06/23/2012 - 01:21 नवीन
तुमची प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या समृद्ध अनुभवविश्वाची साक्ष देत असते. :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कस्चं कस्चं!

शिल्पा ब
Sat, 06/23/2012 - 01:31 नवीन
कस्चं कस्चं! :shy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ते जपान आहे का चीन ?

अर्धवटराव
Sat, 06/23/2012 - 01:45 नवीन
पोलीसांनी लोकांना ट्रेन मध्ये कोंबण्याची क्लीप बहुदा चीनची आहे, जपानची नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बस का राव?

दादा कोंडके
Sat, 06/23/2012 - 01:47 नवीन
ते तुमच्यासाठी. आमच्यासाटी चीन, जपान, कोरीया सगळ एकच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बस का....

अर्धवटराव
Sat, 06/23/2012 - 02:08 नवीन
>>बस का राव -- ते राव च्या अगोदर कंसात अर्धवट लिहायचं राहुन गेलं का? ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

http://www.youtube.com/watch?

शिल्पा ब
Sat, 06/23/2012 - 02:10 नवीन
http://www.youtube.com/watch?v=b0A9-oUoMug http://www.youtube.com/watch?v=ldx7RBWOCxs&feature=fvwrel http://www.youtube.com/watch?v=tx52f32toX0&NR=1&feature=endscreen कदाचित हेच हे चीन, कोरीया वगैर पण असेल... मिपापब्लिक फारच विद्वान बॉ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आवडला.

कलंत्री
Fri, 06/22/2012 - 14:59 नवीन
लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या.
  • Log in or register to post comments

जपानबाबती मित्राने त्याचा एक

कानडाऊ योगेशु
Sat, 06/23/2012 - 01:06 नवीन
जपानबाबती मित्राने त्याचा एक मजेशीर अनुभव सांगितला होता. जपानी लोकांच्या शिस्तशीरपणाबद्दल त्याने असे सांगितले कि समजा बसस्टॉपवर बाप,आई व मुलगा असे फक्त तिघेच जण असतील तर उभारतानाही ते व्यवस्थित रांगेत उभारतील व रिकाम्या बसमध्येही ते रांगेतुनच चढतील :) तर असाच आमचा हा मित्र एका बर्यापैकी गर्दी असलेल्या बसस्टॉपवर उभा होता.आता सगळेच जपानी रांगेत उभे आहेत म्हटल्यावर हा ही शहाण्यासारखा रांगेत उभारला.बस येताना दिसली सगळे जपानी ढिम्म.रांगेतुनच चढायचे म्हटल्यावर कोण कशाला घाई करेल.पण मित्राचा आतला "देसी" चुळबुळ करु लागला.बस स्टॉपला लागल्यावर पठ्या जपान बिपान सारे विसरुन भारतात व तेही मुंबईत असल्याप्रमाणे रांग मोडुन बसमध्ये घुसला.आतुन त्याने खिडकीतुन बाहेर पाहीले तर सारे जपानीही रांग बिंग मोडुन बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. थोडक्यात काय तर एक देसी किसी भी जपानीयोंको देसी बना सकता हय.!
  • Log in or register to post comments

आमच्या आम्रीकेत असं नसतं बॉ!

शिल्पा ब
Sat, 06/23/2012 - 01:29 नवीन
आमच्या आम्रीकेत असं नसतं बॉ! समजा एखादा असा रांग मोडुन शिरायला लागला तर तिथल्यातिथेच बोलतील किंवा मग अशा नजरेने बघतील की ज्याचं नावं ते! वर पुन्हा आपल्या नातेवाईक अन मित्रांना हा किस्सा (हे लोकं बघा कसे वागतात म्हणुन) सांगतील ते वेगळंच! बाकी मजेची गोष्ट सोडली तर तुमच्या मित्राचा किस्सा किंवा एकुणातच बेशिस्तीचं वागणं हे काही योग्य नाही हे आमचं मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

खरंय! मित्रा कडुन जी कृती

कानडाऊ योगेशु
Sat, 06/23/2012 - 10:23 नवीन
खरंय! मित्रा कडुन जी कृती घडली ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. पण इतकं मनाला लावुन घेऊ नका हो. ते म्हणतात ना कि ऐसे बडे बडे शहरो मे.. वगैरे वगैरे..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा