Skip to main content

अमिरी खमण

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 17/06/2012 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १ वाटी हरबरा डाळ, १ वाटी मूग डाळ, २ टेबलस्पून तेल, २ पेराएवढे आले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा, २ चमचे दही किवा अर्धी वाटी ताक, १/२ चमचा हळद,१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे,१/२ चमचा हिंग (मिसळणाच्या डब्यातील लहान चमचा), एका मध्यम लिंबाचा रस, २ चहाचे चमचे साखर,मीठ चवीनुसार,५ते६ काजूबिया तुकडे करुन १/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर,१/२ वाटी बारीक शेव + थोडे खवलेले खोबरे, कोथिंबिर, बारीक शेव , डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी. कृती- दोन्ही डाळी वेगवेगळ्या ५ ते ६ तास भिजत घाला. नंतर त्या उपसून रोळीवर काढून वेगवेगळ्या वाटा, वाटताना त्यात आले व मिरच्याही घाला. डाळी वाटून झाल्यावर त्या एकत्र करा. त्यात हळद,मीठ, दही/ताक घाला व ढवळा. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. एका ताटलीला तेलाचा हात लावून घ्या. डाळीच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व ढवळा. हे मिश्रण ताटलीत ओता व ही ताटली त्या पातेल्यात ठेवून वरुन झाकण ठेवा. ढोकळ्याप्रमाणे उकडा, साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर लागतील. कोमट झाल्यावर ते कुस्करा. एका कढईत तेल तापत ठेवा, त्यात मोहरी घाला ती तडतडली की हिंग व जिरे घाला, काजूचे तुकडे घाला. नंतर मिश्रणाचा कुस्करा त्यात घाला व ढवळा.झाकण ठेवून २-३ वाफा काढा. लिंबाच्या रसात साखर व मीठ घाला व हे वरील मिश्रणात घाला. १/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर व १/२ वाटी शेव घाला आणि ढवळा. सर्व करताना वरुन शेव, ओले खोबरे,कोथिंबिर घाला. डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा.

वाचने 9863
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

न ऐकलेली (म्हणून अर्थातच न खाल्लेली!) पाककृती आहे, धन्यवाद! करून बघणार नक्की. 'अमिरी खमण' म्हणजे गुजराथी/राजस्थानी पाककृती की हैदराबादी?

In reply to by गणपा

श्री. गणपा साहेब, ही पाककृती, फरसाण विकणार्‍या गुजराथी दुकानदारांनी, आदल्या दिवशीचे उरलेले शिळे ढोकळे 'खपविण्यासाठी' शोधून काढली आहे. जसे, आपला 'फोडणीचा भात, फोडणीची पोळी'. 'अमिरी खमणला' गिर्‍हाईकांची मान्यता मिळाली तशीच फोडणीच्या भाताला आणि फोडणीच्या पोळीला (पुण्यात) 'पोटोबा' ह्या उपहारगृहाने गिर्‍हाईकांची मान्यता मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आमच्या 'कंपनी कॅन्टीन' ने शिळ्या भाताला फोडणी देऊन एम्प्लॉईंकडून मान्यता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न वारंवार केला आहे.

जाम भारी आहे हा प्रकार, पण घरी ढोकळा करणे शक्य नसल्याने ढोकळे विकत आणुन बाकी पुढची कृती करुन पाहिली जाईल.

In reply to by ५० फक्त

वार्ज्याच्या काकडे सिटीच्या अलीकडे नारायण ढोकळेवाला आहे. त्यच्याकडे मिळतो खमण. पण त्याच्याकडचा ढोकळा जास्त चांगला आहे बरे :) बाकी पाकृ खत्रा जमली आहे. :)

वॉव दिसतेय लै भारी पण बर्‍याच स्टेप्स आहेत :-( सध्या वाटली डाळ - ताक वर समाधान मानेन :-)

मस्त लागतो हा पदार्थ :)

स्वातीतै, अमिरी खमणची पाककृती मंगला बर्वे यांच्या "अन्नपूर्णा" या पुस्तकात दिलेली आहे. पण तू दिलेली पाककृती थोडीशी वेगळी आणि नाविण्यपूर्ण आहे.. - पिंगू

ते खोबरं, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे बघूनच समाधान झालं!

पण तुमच शुद्ध मराठीपण वाखाणण्याजोगं आहे. फक्त एक शब्द सोडला तर संपूर्ण शुद्ध मराठी धागा ;-) अमृत

पाकृ वाचून आणि फोटो बघून तर मस्तच दिसतेय. शेव, खोबरं आणि डाळींब दाण्यांमुळे छानच लागत असणार. पण स्टेप्स जरा जास्तच आहेत ;)

फार चविष्ट पदार्थ आहे. काजू आणि डाळींबाचे दाणे ह्या दोन घटकांनी 'गुजराथी' पदार्थाला 'पंजाबी' शाल पांघरली आहे. ह्यात अगदी बारीक चिरलेला लसूण फोडणीत घालून, लाल होऊ न देता, परतल्यास चवीत खुप फरक पडतो. (मला तशी चव आवडते).

खवय्यांनो, धन्यवाद. आपण नेहमीचा ढोकळा करताना डाळीचे पीठ वापरतो,त्यामुळे तसा ढोकळा करुन तो कुस्करायचा नाही तर डाळी भिजवून,वाटून, ढोकळ्याप्रमाणे उकडायच्या आणि कुस्करायच्या. अर्थात 'ढोकळा बिघडला..'( जिलबी बिघडली.. च्या चालीवर) तर त्याचा अमिरीखमण करुन मॉडिफाय करता येईल, :) स्वाती