✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक पत्रकथा: संपूर्ण (अंतिम भागासहित)

व
वेणू यांनी
Sat, 06/09/2012 - 12:04  ·  लेख
लेख
१३ जून १९९१ आदरणीय (की प्रिय?)__, संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. असो. हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय... तुमच्या एका पुस्तकावर माझी २ पानं! आता ती डायरी पूर्ण भरलीये, ह्या पत्रासोबत पाठवतेय- निदान डायरीची पोहोच कळवावी. गम्मत अशी आहे, इतकं प्रगल्भ लिहिणार्‍या आपला कुठल्याही पुस्तकावर ना पत्ता आहे, ना खरं नाव माहिती आहे - हे कळत असूनही माझी डायरी मी पाठवत आहे- सारंच अगम्य!! शक्कल अशी लढवली- की तुम्ही तुमची पुस्तकं फक्त एकाच प्रकाशनामार्फत प्रसिद्ध करवता, त्यांचे एक ऑफिस इथे जालन्यात आहे, आमच्या घरात एक घरगडी आहे, 'काका" म्हणतो त्याला आम्ही, खुप जुना, म्हातारा माणूस, त्याला विश्वासात घेऊन हे पत्र नि डायरी त्या प्रकाशन ऑफिसमधे पाठवत आहे....! प्रकाशक तुमच्या पर्यंत हे (न उघडता) पोहोचवतील अशी आशा आहे, त्यांना तसे विनंती वजा पत्रही काकांच्या हाती पाठवत आहे. पुढील पत्रव्यवहार तुमच्या उत्तरावर विसंबलेला.... -आपली विनम्र वाचक निर्मयी (माझा पत्ता एन्व्हलोपच्या मागे नमूद केला आहे) ------------------------------------------------------------------------------ २५ ऑगस्ट १९९१ नमस्कार निर्मयी, तुमचे पत्र, डायरी मिळून बरेच दिवस झाले. डायरी खरोखर "एका वाचकाची भेट" म्हणून कायम जपून ठेवावी अशी आहे. आभार... -अस्तित्त्व. ------------------------------------------------------------------------------ १ सप्टेंबर १९९१ नमस्कार सर, आपण उत्तर पाठवलत, मी धन्य झाले. फारच मोजून शब्द लिहिलेत पत्रात... पुस्तकं जशी भरभरून असतात तसं नव्हतं, पण आलं हे ही नसे थोडके! कमाल वाटली, तुमच्या आलेल्या एन्व्हलोपवर ना तुमचा पत्ता आहे, ना जेथून ते आलंय त्या गावचा ठप्पा!! म्हणजे तुम्हीही त्या प्रकाशकांमार्फतच ते माझ्या घरी पाठवलं असावं असा कयास आहे. मी घरी नसल्यामुळे काकांनीच ते घेतलं आणि माझ्यापर्यंत पोहोचवलं... "नाते- संबध" ह्या विषयावर गहन लेखन करणारे आपण, साध्या वाचकाशी पत्रव्यवहार करताना, इतके सजग कसे? हे मनात घोळत राहिलं. तुमचं असं अगम्य वागणं तुमच्याबद्दलची ओढ वाढविणारं आहे- "प्रत्येक ओढीने नातं साकारलं जरी गेलं तरी ते टिकतं किती, हे वेळच ठरवितो" हे तुमच्याच "उन्मत्त" पुस्तकातील माझं आवडीचं वाक्य!! असो, उगाच भरकटत जात नाही, कामाच्या पसार्‍यात वेळ मिळालाच तर उत्तर द्यावे. ह्या पत्राचा प्रवास सुरू-- काका, प्रकाशक आणि शेवटी अस्तित्व!! -आपली विनम्र वाचक निर्मयी ------------------------------------------------------------------------------ २९ सप्टेंबर १९९१ नमस्कार निर्मयी उत्तर द्यावे की न द्यावे ह्या द्विधेत महिना गेला उगाच माणस जोडत सुटायचा स्वभाव नाही माझा. माणसं ओळखण्यात अनेकदा चुकलोय, आता सावध असतो. माझी ओळख देणे न देणे हा माझा प्रश्न आहे, सर्वस्वी!! हे पत्रही मी प्रकाशकांमार्फतच पाठवत आहे, माझा पत्ता कुणालाही देऊ नये असा त्यांना स्पष्ट निरोप आहेच. नाते संबंधांवर लिहीतो, कारण खूप जवळून डोळसपणे सारं पाहतो... नात्यांना जोडायला, क्षण पुरतो -तोडायला क्षणाचा हजारावा हिस्सा, टिकवायला मात्र जन्माचा ध्यास!! आणि, मी निर्मयीला उद्देशून लिहितो, पत्र मात्र "सायली जगतापे" हया नावाने जातात... हे ही अगम्य, नाही का?? -अस्तित्व ------------------------------------------------------------------------------ भाग -१ ------------------------------------------------------------------------- १३ ऑक्टोबर १९९१ अरे बापरे... चिडलात? मला वाटतं माझ्या सहज लिहीण्यात तुमची सलती नस दुखावली गेलीये. क्षमा असावी. तुमच्याशी बोलताना तुमच्या गुढतेचा ताळतंत्र समजायचाय मला अजून. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात नेमकं काय चालतं ह्यात मलाही स्वारस्य नाही, पण गेली अनेक वर्षे मी ज्या व्यक्तीला पुस्तकांतून ओळखते, ती व्यक्ती कधीही लोकांसमोर येत नाही, पुरस्कार समारंभांना नाही, त्या व्यक्तीचा पत्ता लोकांना माहिती नाही, त्याचं नावही तो सांगत नाही- आश्यर्य वाटणारच. मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जी एक वाट सापडली आहे, ती तुमच्या हजार चाहत्यांनाही गवसली असेलच ना! मग एकतर तुम्ही सार्‍यांनाच पत्रोत्तर देत नसाल किंवा असे तुटक उत्तर दिल्यावर वाचकच घाबरून पुढचा पत्रव्यवहार करत नसावा. अस्तित्व (ह्याच नावाने उल्लेखायची वेळ आलीये), सायली जगतापे मीच! 'निर्मयी' हे मला आवडणारं नाव, म्हणून ते "तुमच्याशी" बोलताना वापरलंय! तुमच्या लेखणीने मला आपलंस केलय, इतकं की पहिल्या पत्राच्या सुरुवातीला 'प्रिय' म्हणताना चरकले नाही. प्रत्येक कलाकाराला उद्विग्नतेचा शाप असतोच, ही माझी धारणा खरी ठरवू नका- इतकंच म्हणेन. जमलंच तर उत्तर द्या. वाट पाहतेय. तुम्हाला निदान मी स्त्री बोलतेय हा विश्वास तरी आहे, माझा पत्ता तुमच्याकडे आहे- कधीही येऊन तुम्ही चौकशी करूच शकता, पण मला उत्तरं नेमकं कोण देतंय, मलाही माहिती नाही- तरीही पत्र पाठवतच आहे. -आपलीच विनम्र निर्मयी (गेल्या आठवड्यात बरेचदा डॉक्टरांकडे जाणे येणे करण्याच्या गडबडीत पत्रोत्तराला उशीर झाला आहे) ------------------------------------------------------------------------------- २८ डिसेंबर १९९१ निर्मयी, पत्र भेटून बरेच दिवस झालेत, बहुधा महिन्याच्या वर! पण टेबलावर पडून असलेला तो एन्वलोप उघडावाच वाटत नव्हता... आज उघडला आणि आजच उत्तर देतो आहे. मला मित्र नाहीत. मला कुटुंब नाही, मला माणसांत भटकायला आवडत नाही. दोन व्यक्ती जवळ आल्या की "नातं" बनतं आणि आयुष्याचे नवे व्याप, ताप, संताप, वैताग सुरू होतात... त्यातले सुंदर क्षण वेचून ठेऊन वेगळे काढावेत म्हटलं तरी ते कुजलेल्या अपेक्षांमधून वेगळे असे काढता येतच नाहीत, त्यांनाही कुजका वास लागलेला असतो. मला नातीच नको आहेत. तू उत्तर नाही दिलंस तरी चालेल. माझी तर्‍हा ही अशीच आहे. -अस्तित्व. -------------------------------------------------------------------------------- ६ जानेवारी १९९२ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! "नाती- ह्यांची नावं ठरवली की अपेक्षांचा जन्म होतो" तुम्हीच लिहीलेलं आणखी एक वाक्य! देवाने निर्मिलेल्या दोन व्यक्ती, "फक्त व्यक्ती" म्हणूनच का जगत नाहीत? हा मला पडलेला कायमचा प्रश्न... प्राण्यांमधे पण असतील का मामा, काका, भाचा, पुतणी, आईच्या जावेची चुलत बहिण, मावशीची ननंद, नातू, आजोबा वगैरे? आपणही प्राणीमात्रच! मात्र बुद्धीजिवी- म्हणून ह्या गोष्टींन्ना जन्म द्यायचा, निव्वळ द्यायचा नाही ह्यांनाच घट्ट अतिघट्ट बिलगायचं... मग "संस्कार" नावाचा आणखी एक रोग! असे-असे वागले- तू सर्वोत्तम थोडे कमी पडलात- तू बरा थोडे आणखी कमी- गेलेली केस!!! असे सर्वसाधारण ठोकताळे. तरी गम्मत काय- पुरूषांना प्रत्येक गोष्टीत एक अलिखीत पळवाट, स्त्रिया त्या वाटेवर पदर डोक्यावर घेऊन जरी दिसल्या तर तिची गावभर बभ्रा!! -ह्या आपणच स्त्री-पुरूष जातीला दिलेल्या "मर्यादा" म्हणे- मर्यादा - मला हा एक हास्यास्पद प्रकार वाटतो, का? कळेलच (जर पत्रव्यवहार राहिलाच अबाधित तर) तर सांगायचं असं, की तुमचंच उदाहरण घेऊ या, तुम्ही जगभरातली नाती अनुभवून- उपभोगून, "मग" त्यांना कंटळला असावात, आता इतके की तुम्हांला वीट आलाय- माणसं म्हटली की शिसारी आलीये...!! कदाचित- कदाचित ही उदासीनता तुमच्यात काही काळापुरती असावी- "मनुष्य समाजशील प्राणी आहे" हे होतं वाटतं ना शाळेत शिकताना... हे ही मानवानेच ठरवलय बरं!! तुमचीच विनम्र, निर्मयी ------------------------------------------------------------------------------ भाग -२ ------------------------------------------------------------------------- २४ फेब्रुवारी १९९२ निर्मयी, निर्मयी.... मी हसलोय तुझं पत्र वाचून... नुसता नाही गडबडा हसलोय...!! माझ्या ह्या घराच्या भिंतीनांही ते चमत्कारिक वाटलं असेल.. 'हसणे' हा मानवी अविष्कार पार विस्मृतीत गेला असेल त्यांच्याही!!! माझा सेक्रेटरी धावत आला आत, मानवप्राण्यांपैकी सबंध ठेवलेले हे एकच पात्र माझ्यासोबत आहे.. आमच्यात 'संवाद' असा घडत नाही कधीच, तो माझे सर्व व्यवहार पाहतो- लेखन, प्रकाशन, पुरस्कार इ.इ., बावचळला तो, त्याला वाटलं म्हणे मी आज टेपरेकॉर्डर्वर "हास्य" ऐकतोय की काय.... पुन्हा माझा नॉर्मल झालेला चेहरा पाहून निघून गेला बिचारा- कुणाची पुण्याई म्हणून आजही हा माणूस मला चिकटून आहे, ते देव जाणो. असो. तुला वाटेल हा माणूस लहरी आहे, मनात येईल तेव्हाच पत्र पाठवतो- ते खरे आहे!! ह्यावेळी मात्र काही इतर कारणामुळे उशीर झालाय, (लहरीपणा प्रकारामुळे नव्हे.) तुला भटकायला आवडतं? माणासांच्या बाजारात नाही, निसर्गात?? तू माझी प्रवासवर्णनं, निसर्गवर्णनं का वाचली नाहीस आजवर? खरे पाहता, त्या पुस्तकांना पण बर्‍यापैकी नावाजलं गेलंय- की कदाचित तूच "नाती" ह्या विषयाच्या प्रेमात आहेस? मी माझी मोटरसायकल घेऊन, पाठीला एक होल्डोल अडकवून भटकायला गेलो होतो- निसर्ग जगायला गेलो होतो... बर्‍याचदा जातो- मनावर पुटं चढली की निसर्गाचाच कुंचा वापरतो. येताना जालना- औरंगाबाद करत पुढे आलो. क्षणभर वाटलं जालन्यात आल्यावर, पत्ता पाठ आहे, येऊन भेटावं तुला- पण लगेच माझ्यातला मी फणकारला- पुन्हा ओळख, भेटी, नातं नि अपे़क्षा? दुसर्‍या क्षणीच अगदी मी पुढचा गिअर टाकला अन अ‍ॅक्सिलेटर पिळला... कधी माझे पत्र येण्यास बंद झालेच ना तर समजून घे, एकतर पत्रव्यवहाराचा उबग आलाय किंवा तुझ्याकडे आकर्षित होऊन नवे व्याप वाढू नयेत म्हणून पूर्णविराम लावलाय- विचित्र ना? कारण तुझ्याकडे आकर्षित व्हायला तू नक्की कोण, साठीतली की पंचविशीतली हे ही कळत नाहीय्ये.. आणि प्रेमात पडायचा तिटकारा आलाय... कुठल्याही क्षणी आता नव्या नात्यात स्वतःला गोवायची माझी तयारी नाही- सार्‍या पाशांतून स्वतःला सोडवायला मी खूप झटलोय, भाजलोय- तोच मूर्खपणा आता नाही. हं.. तर तुझं पत्र वाचून हसलो, कारण... मी गेली ५ वर्षे "एकटा" राहतोय- एकटा.. खरंय सारी नाती उपभोगून झाल्यावर एकटा! आणि तू हे ताडलंस.. माणसाची लेखणी त्यालाच चार लोकांसमोर आणते, नुसतं आणत नाही तर त्याचीच चिरफाड करते कदाचित.. माझ्या ह्या स्थितीला हसलो. तुझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेवण्याचं कारण म्हणजे- तुझे विचार! स्त्रियांना स्वतंत्र विचारसरणी असते हे मी जाणतो- पण; तुझ्या विचारांतला स्पष्टपणा भावतो. काय म्हणालीस मागच्या पत्रात- पळवाट- पुरुषांची पळवाट- अलिखीत- पदर डोक्यावर घेतलेली स्त्री दिसली अक्षरशः.... संस्कार नावाचा रोग- हास्यास्पद मर्यादा- इन्ट्रेस्टींग!! तुला काय हवय गं मग? माणसांनी प्राण्यांसारखं वागायला- एक नर- एक मादा! बास? आणि तू स्वतः मर्यादाशील स्त्रीच वाटते आहेस पत्रांतून... ते काय आहे? परवा परतताना वेरुळच्या लेण्यांमधे डोकावलो, त्या लेण्यांवरून माझी मेलेली नजर फिरताना कसंनुसं झालं, तिथे काय आवडलं माहिती आहे? गहन शांतता... गुहांमधला गूढ गारवा, गार अंधार...!! जाणवलं पुन्हा- एकटं असणं चांगलं असतं.. आणि तू म्हणतेस, कदाचित ही उदासीनता काही काळापुरती असावी...? नाही निर्मयी, ती मी मिळवलीये- आत्म्याने स्विकारलीये..!! -अस्तित्त्व. ------------------------------------------------------------------------ ३ मार्च १९९२ नमस्कार! (अजूनही नाव माहितीच नाही आपलं) एक मुद्दा स्पष्ट करते- मग संवाद सुरू करेन. हा पत्रव्यवहार म्हणजे मी माझ्या साचलेल्या विचारांना वाट करून देण्याचं एक माध्यम समजत आहे. क्लिष्ट विचार ताकदीच्या माणसासमोर व्यक्त झाले तर आशय समजाविण्याचा आटापिटा नसतो. आपल्यासोबत कुठल्याशा नात्यात गोवलं जाण्याची ना माझी पात्रता आहे ना "इच्छा"!! तुमची भटकंती वाचून छान वाटलं, आणि विरक्ती वाचून आश्चर्य! सर्व काही मनममुराद उपभोगल्यानंतर "आता मला उबग आलाय" म्हणणे हास्यास्पद ना? मला ते सध्याच्या मार्केटमधील भोंदू साधूंसारखंच वाटतं, संसार करून घ्यायचा- तिकडे मुलं उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, आणि आपण "विरक्तीचा" आव आणून गावोगाव प्रवचनं करित फिरायचं- ब्रह्मचर्येवर!! शिष्य ब्रह्मचारीच हवेत- ही ही मागणी!! मी खरोखर स्तिमीत झाले, तुमच्या आत्ताच्या पत्रानंतर की, तुम्ही तुमच्या "अर्पण" पुस्तकातल्या ह्या ओळी- प्रत्यक्षात जगलात..? "नाती जुनी नसतात होत, संदर्भ बदलतात..! 'हिरवेपणा' टिकवण्याचा प्रयत्न संपला, की नातं टांगून ठेवावं! सोबत घेऊन फिरण्यात अर्थ कसा उरतो...? जीर्णता दिसून येते" तुम्ही खरंच सारी- सारी नाती ठेवून दिलीत टांगून, कदाचित स्वतःच्या घराच्या नाही... निरोपाच्या भिंतीवर? म्हणजे शोभेलाही घरात अडकवून नाही ठेवल्यात, जीर्ण झाली होती ना सारी..!!! रागावू नका, परखड व्यक्तव्यावर.... पण तुम्ही थेट 'नाती' लिहिता, त्या आधी "माणूस" समजलाय का? हाच प्रश्न गेली अनेक वर्षे मला सतावत होता- आणि "हाच प्रश्न" आहे आपल्या ह्या पत्रव्यवहाराचं मूळ कारण... तुमचं लिखाण, नात्यांतील उलाढाल, नाजूक मांडणी हे सारं वाखाणणीय आहे, हे सारं तुमच्याकडे असलेले पुरस्कारच सांगतात... पण हा प्रश्न मात्र टक्क जागा राहतो माझ्या मनात, तुमच्या प्रत्येक पुस्तकाची पारायणं करताना.. तुम्ही विचारलंत मला काय हवंय, प्राण्यांसारखेच जगायला का, नर- मादा वगैरे. तुम्ही निसर्ग जगता ना? मग त्याला अंडर एस्टीमेट का करताय? तुम्हांला काय वाटतं व्यभिचाराचं रण माजेल? इथे प्राण्यांमधेही मादा आपला नर स्वतः निवडते. तिला ती समज तुम्ही- मी नाही, ह्या निसर्गानेच दिलेली आहे. पण इथे, जन्मलेल्या प्रत्येकाने मोठं कसं व्हायचं हे त्याचे माता-पिताच ठरविणार...आपण सारे महारोगी आहोत- 'संस्कार' रोगाने पिडीत!! प्रत्येकाला "त्याची/तिची" अशी स्वतःची विचारसरणी आपण लाभूच देत नाहीत, संस्काराचं गाठोडं ठेवतो डोक्यावर आणि रस्ताही देतो आखून. बरं दिलेलं गाठोडं सदोष की निर्दोष हे ठरविणारं तसं पाहता कुणीच नाही- गाठोडं खाली नाही ठेवायचं एवढीच अट- ह्या पिढीने पुढच्याच्या आणि त्या पिढीने पुढ्याच्याच्या डोक्यावर देत चला, देत चला.... हसू येतय? का? हे विचार करणारी- मी एकटीच म्हणून? बरोबर आहे, माझ्यासारखा विचार करण्यार्‍याचा गट हवा किंवा तो पटणार्‍यांचा तरी. आज समाज- स्टेटस ह्या नावाखाली- हा मुलभूत विचार कानी पडला तरी डोक्यात शिरणार नाही, कारण डोक्यावर ते ओझं आहे!!! मी मर्यादाशील आहे असं म्हणालात- हो आहे. हे सारे असे विचार असूनही मी आहे आणि मी ते तशी असल्यामुळेच खूप भोगलंय आणि आज ह्या अवस्थेत तुमच्यापुढे उभी आहे. असो. पुढील महिनाभर माझ्याकडून पत्रव्यवहारत खंड पडेल... आपण ह्या पत्राचे उत्तर देऊन ठेवावे. आपली नम्र, निर्मयी (बरं झालं येऊन भेटला नाहीत! नाहीतर पुढची पत्र झालीच नसती.) -------------------------------------------------------------------------------- १२ मार्च १९९२ निर्मयी, तुझ्या पत्राने सुन्न झालो. गेल्या ५ वर्षंत निसर्गाने सोडून कुणीही असा सून्नपणा पदरी टाकला नसेल माझ्या. मर्यादा जपतांना स्त्रियांची घूसमट खरेच इतकी होते का? आणि तू दिलेला नवा विचार- ह्या मर्यादा कुणा समाजशील माणसाने बनविलेल्या- रचलेल्या- लादलेल्या!!! मागेही एकदा डॉकटरांकडे येणे- जाणे ह्यामुळे पत्रोत्तराला उशीर होतोय असे म्हणाली होतीस, आता महिनाभर नाही आहेस, सगळे ठीक ना? (आधी कधी हे विचारले नाही, कारण उगाच तुझ्यात अडकायचं नव्हतं, आता विचारतो आहे, कारण "एकमेकांत अडकायचं नाही" हा दोघांमधील ठराव आहे) उत्तराच्या अपेक्षेत, -अस्तित्व. -------------------------------------------------------------------------------- भाग -३ -------------------------------------------------------------------------------- २० मार्च १९९२ आज मी हसलेय... आणि हे "पत्रोत्तर" होतं? बाकी तुम्ही माणसाळल्याचा सूर पकडला ते पाहून जरा बरं वाटलं हे नक्की. मी बाहेरगावी निघणार होते, इतक्या लवकर तुमचं उत्तर येईल असं अजिबातही वाटलं नव्हतं, तुमचं पत्र आलंच तर ते काकांना जपून ठेवायला सांगितलं होतं, पण मी निघण्याआधीच ते आल्यामुळे उत्तर देऊ शकतेय. मात्र मी काहितरी वेगळं उत्तर येईल तुमच्याकडून ह्या अपेक्षेत होते. असो. घरच्यांच्या हालचालीवरून जाणवतंय माझा पत्ताही बदलेल लवकरच- कदाचित येत्या ८/९ महिन्यातच, कळवेन योग्यवेळी.. मी बरी आहे, माणूस म्हटलं की तब्येतीच्या कुरबुरी असणारच! आपली नम्र, निर्मयी. (पुढचं उत्तर महिन्याभराने) ----------------------------------------------------------------- २८ मार्च १९९२ निर्मयी, तुझ्या पत्रांमधून तुझ्या काकांवरही माझा विश्वास बसायला लागलाय, उत्तर त्यांच्या हातात सुरक्षितच राहिल असे गृहीत धरून- हे पत्र! माझ्यातल्या "मी" ला फार स्वातंत्र्य दिलंय मी... म्हणूनच बरेचदा माझी कित्येक कामं खोळंबतात! तो आपला उपटसुंभासारखा कधीही पडतो बाहेर, जग फिरायला, त्याची नजर वेगळी आहे, त्याला अदभुत गोष्टी दिसतात- ज्या सहसा आपल्याला उमगतच नाहीत.. खूप फिरून नवं काही बघून तो परतला की त्याला व्यक्त व्हायचं असतं आणि त्याचा व्यक्त होण्याचं माध्यम मीच असतो. मागच्यावेळी तुझं पत्र आलं तेव्हा सुन्न झालेला 'तो' काही कागदावर उतरू द्यायला तयारच नव्हता, त्यामुळे तेव्हा परिवर्तित झालेला तुझ्या तब्येतीबाबतचा एकमेव विचार लिहून पत्र पाठवून दिलं. आता तुझ्या शैलीत जरा लिहायचं झालंच तर, मला गंमत वाटते- तू मला, "माणूस समजलाय का?" विचारलेस तेव्हा. तुझ्या पत्रांतून आणि माझ्या वागण्यातून -तोच माणूस- उलगडतोय, असं नाही जाणवलं तुला? मला नकोत नाती, हे ज्या क्षणी मी ठरवलं त्या क्षणापासून झटून ते मिळवलं- तेव्हा माझ्यातल्या लेखक नव्हता, नाती जोपासणारा समाजातला समाजशील घटक नव्हता, ती मागणी माझ्यातल्या मूळ व्यक्तीची होती, मग हवं ते घेतलं करून... व्यक्तीला- व्यक्तीसारखे जगू द्यावे- हा तूच मांडलेला विचार- जेव्हा मी जगलो, तेव्हा तुला मी आजच्या भोंदू साधूंसारखा कसा भासलो... न कळे! आणि हो, हो- जीर्ण झालेली बेरंग नाती निरोपाच्याच भिंतींवर टांगली मी- कायमची...!! पण त्यांचे पायपुसणे तर नाही केले ना? त्या जीर्णत्त्वाचा सन्मान राखत निरोप दिलाय! तू म्हणतेस ते संस्काराचं ओझं मी डोक्यावरून जरा कडेवर काय घेतलं, तुला हजार प्रश्न पडले? ह्यांची उत्तरे तुझ्याचकडे आहेत. तू कधी निर्मीतीचा आनंद लुटला आहेस? त्यांत नखशिखांत न्हाली आहेस? माझ्यातला "मी" जेव्हा झिंगून परत येतो, जेव्हा त्याला मी हवा असतो व्यक्त होण्यासाठी तेव्हा तोच कैफ माझ्यावर दाटतो.. त्याला व्यक्त व्हायचंय की मलाच, तो सांगतोय मी लिहीतोय की मीच बेभान लिहित सुटलोय, की त्यानेच माझा सबंध ताबा घेतलाय आणि मी मनाच्या एका कोपर्‍यात निमूट उभा आहे- जे होतंय ते पहात? ह्यातलं काही काही कळत नाही... आमची सरमिसळ इतकी उच्च होते की एकरूप झाल्याची धाप लागते... शब्द कागदांवर झिरपत जातात आणि त्याच धुंदीत पानं भरत जातात, उलटत जातात.... तो कैफ-ती नशा-ती झिंग उतरते तेव्हा मी समाधानाने निथळत असतो- पाण्याचा एक ग्लास पोटात रिचवून मी कागदांवर उतरवलेलं वाचताना एक त्रयस्थ होतो- मी काय उमटवत गेलोय- आणि ते सुंदर आहे ह्याचा विश्वास बसल्यावर त्या क्षणाला जो आनंद असतो- जणू त्या "एका" क्षणासाठी हा जन्म होता... हा क्षण मिळवण्यासाठी अनेकानेक तास- दिवस मी रेंगाळतोय जगण्याचा निव्वळ भास घेऊन, असं वाटत रहातं.... तू परतलीस की उत्तर दे! उत्तराच्या अपेक्षेत - अस्तित्व. ------------------------------------------------------------------------ ३० एप्रिल १९९२ निर्मयी, अगं आलीस का? कशी आहेस? - अस्तित्व. ---------------------------------------------------------------------- १० मे १९९२ निर्मयी?? - अस्तित्व. ------------------------------------------------------------------------ ३० जून १९९२ निर्मयी, अगं महिनाभर म्हणून गेलीस कुठे? ह्या पत्राच्या उत्तराची १५ दिवस वाट बघणार आहे, न आल्यास, मी येतोय, तुला भेटायला. उत्तराच्या अपेक्षेत, - अस्तित्व. ------------------------------------------------------------------------- अंतिम भाग ---------------------------------------------------------------------------- १४ सप्टेंबर १९९२ नमस्कार श्री विश्वास सरंजामे, शेवटी आलातच ना...! अनेक "पण- परंतु- प्रश्नचिन्ह", मलाही देऊन गेलात, स्वतःही घेऊन गेलात!!! मी एवढ्या रुबाबात नाव लिहीलय वर तुमचं, पण ते तरी खरं आहे का? कारण आपली भेट झालीच कुठे? हे पत्र लिहीताना आज वाईट इतकंच वाटतंय की मनात "पहिल्या" पत्राची भीती फिरून तशीच उभी आहे, तुम्हांला हे पत्र मिळेल का, ह्याची. झाल्या प्रकारानंतर तुमचं आता पत्रोत्तर येणार नाही, हे गृहीत धरलंच आहे मी. तुम्ही आलात, फक्त 'सायली जगतापे' ला भेटलात, परत निघून गेलात..... का? मला भेटावसं नाहीच वाटलं? सायलीने वारंवार सुचवलं तुम्हाला माझी भेट घ्यावी म्हणून, पण.... नाहीच!! कसली भीती वाटली तुम्हांला विश्वास? - मी फसवलं असं वाटलं, की "स्वतःचीच:" भिती दाटली मनात? माझ्या बाबतीत वाईटातील वाईट जे घडू शकलं असतं, ते घडलंच, तुमच्या एका भेटीने अजून नुकसान ते काय होणार होतं? तुम्ही सायलीला भेटून तिच्या घराबाहेर पडतांना तिच्याच सासर्‍यांनी तुम्हाला पाठमोरं पहावं- काय हा योगायोग? की हे असंच घडणार होतं? सायली- माझी जिवलग सखी! तिने ह्या पत्रव्यवहाराला संमती दिली होती- तिचा पत्ता मला वापरू दिला होता, काकांनीही सर्वतोपरी मदत केली मला. मात्र तिला बिचारीलाच शेवटी सारा मनस्ताप झाला... तिला तिच्या घरच्यांच्या दबावाखाली येऊन, "ही पत्रं येत असत, पण ती निर्मयीची आहेत" हे कबूल करावं लागलं- हा तिच्या मानी संसाराचा प्रश्न होता. तिच्या घरी दिवसभर तिच्याव्यतिरिक्त कुणी नसे म्हणून आजवर हा पत्रव्यवहार बिनबोभाट पार पडला... मी तुम्हाला माझा पत्ता का नाही दिला, तिचाच का दिला, हे तुम्ही जाणता आता- आणि जे जाणलंय त्याचीच भिती वाटून तुम्ही पोबारा केलात... भले शाबास! एरव्ही मागितलेले हजार मागणे उधळून लावणारा तोच देव, एक रंगलेला डावदेखील सहजगत्या उधळू शकतो, हे पुन्हा अनुभवलं! तिच्या सासर्‍यांनी प्रकरण माझ्या घरच्यांसमोर मांडलं, काकांना अंग सुजेपर्यंत माझ्या घरच्यांकडून मार बसला- पर्यायी काकांना आमचं घर सुटलं नि मलाही. 'माझा पत्ता बदलेल कदाचित' हे जे मी तुम्हांला कळवलं होतं, ते घडलं- तुमच्या आकस्मिक प्रवेशामुळे ३ महिने अलिकडे घडलं- इतकंच काय ते. मला तुमच्याकडून तरी काय हवे होते, विश्वास? फक्त मन मोकळे करायची एक जागा.. त्यापलीकडे अपेक्षा तरी काय होती माझी? पण प्रवेशाची घाई केलीत, विश्वास... घाई केलीत... मला गाडीत घालून घेऊन जाताना तुमची शेवटची काही पत्रं आणि स्वतःचा माफीनामा माझ्या हाती कोंबून, माझी सायली टीपं गाळत होती!! माझा सारा इतिहास सायलीने तुम्हाला इत्यंभूत सांगितल्याचं तिने तिच्या माफीनाम्यात कळवलंय. (काय दुरवस्था, ज्या मुलीने मला "मोकळं" होऊ द्यायला मदत केली, तिनेच मला माफीनामा लिहावा!) माझ्या इतिहासाचा पूर्वार्ध जराही लक्षात न घेता माझी आताची परिस्थिती ऐकून तडक आल्यापावली निघून गेलात? कदाचित मला भेटला असतात, तर आज माझा शेवट वेगळा असता... पण जर- तर ला अर्थ असता... जाऊ देत. काय चुकलं होतं हो जगतांना माझं? काय दोष होता माझ्यात? मला स्वतंत्र- स्पष्ट- ठाम विचार होते, आहेत हा? की, त्या विचारांना समर्थपणे पाठिंबा देत मला बंडखोरी करताच आली नाही हा? लग्न करून सासरी गेले- चारचौघांसारखीच- नात्याचा तुमच्यासारखा तिटकारा नव्हताच मला. माणूस घडतो, पुढे जातो- त्याच्या जडणघडणीला प्रत्येक नात्याची पायरी गरजेची असते- असंच नेहमी वाटायचं. हेच जपत जगत होते. विचारांना तोवर फारशी तीव्रताही नसावी; पण अतिसंवेदनशील मन त्रासदायीच. नात्यांतले बदल नजरेला जाणवू लागले, मूल न होण्याची सारी जबाबदारी माझ्या एकटीवर लोटण्यात आली. भरीला गैर वागणूकही सढळ हस्ते देण्यात आली... का? आवाज उठवण्याआधी फक्त आई-बाबाच का दिसले डोळ्यांसमोर- मुलापे़क्षा मुलगी बरी- प्रकाश देते दोन्ही घरी... हे ते कारण, त्यांची मान मर्यादा जपायची... फक्त? माझं ऐकून घेण्याइतकाही सन्मान मी त्या घरात कमावला नव्हता का?? एक नाही, लाख प्रश्न! त्रास होऊ लागला आणि हाच- हाच पहिला वार होता- मनावर माझ्या जिवंतपणावर- माझ्या असण्यावर! त्रास असह्य झाल्याची परिणती घटस्फोटाशिवाय दुसरी असणार ती काय? निसर्गावर माझंही प्रेम होतं, विश्वास- जीवापाड होतं! जसं जगणं उलगडत गेलं, तसं हे प्रेम घट्टं होत राहिलं.... त्याने दिलेल्या स्त्री जन्मावर प्रेम होतं, त्याने माझ्यात पदोपदी घडविलेल्या बदलांवर होतं, त्याने देऊ केलेल्या प्रत्येक हळूवार भावनांवर होतं... दु:ख हे की, ह्याच भावनांनी माझा चुराडा केला. आता मला "आई" व्हायचं होतं! तुम्ही विचारलंत मला, निर्मितीतला आनंद मिळवला आहेस का? तुम्हाला तुमच्यातला तो कलाकार- उदार झाल्यावर ही निर्मिती करण्याच सुख मिळू शकतं, विश्वास, आम्हां बायकांना एक अत्युच्च िर्मिती करण्याची संधी खुद्द निसर्गदेवतेने देऊ केलीये.. मला ना कुठल्या ऐहिक सुखाची आस राहिली होती ना शारीरिक! माझ्यातल्या मूळ व्यक्तीची फक्त एक मागणी उरली होती- मला आई व्हायचं होतं... मला ती निर्मिती हवी होती त्या एका गोष्टीसाठी मला हा स्त्री जन्म सार्थकी लावायचा होता. दु:खाची सारी मरगळ झटकून उठले, माझं प्रत्येक आवश्यक चेक अप करून घेतलं, सगळे रिपोर्ट चांगले आले तेव्हा दुसर्‍या लग्नाची तयारी दाखवली. स्वतःच्या आईवर असफल प्रेमाचा सूड म्हणून कुणा एका पुरुषाने माझ्याशी लग्न तर केले, पण ...... पण त्या नात्यातच मला हवं ते मिळवून द्यायची ताकद नव्हती! इकडे निसर्ग मला पिळवटत होता आणि तिकडे माझं भाग्य माझ्यावर हसत होतं!! तुमच्यासारखं सडेतोड वागून, हवं ते मिळवण्यासाठी मला मात्र संस्कारांचं बलाढ्य गाठोडं नाहीच आलं उतरवता... आज वाटतं, पुढची पिढीच माझ्याकडून उदयाला येणार नव्हतीच तर गाठोडं मी तरी का जपलं? ह्या सार्‍या विचारांनी, मला दिवस दिवस खाल्लंय, मी कित्येक महिने एकांवासात काढलेत -शांत शांत बसून राहिलेय, कुणाशी बोलत नव्हते- एका खोलीत कोंडून घेतलं होतं स्वतःला... मला एकच ध्यास लागला होता- निसर्गाचं ते दान पदरी पाडून हवं होतं- बास!! ह्या इच्छेचा अंमल माझ्यावर इतका जबरदस्त होता की, कधी कधी माझ्यातला हिजडा जागा होत असे- हो हेच नाव देईन मी - कारण मला स्त्री मर्यादा ओलांडायला लावण्याचा त्याचा तगादा होता पण पुरूषांइतकाच मला कधी बेपर्वा होऊ न देणारा तो 'बंडखोर विचार' असायचा!! शेवटी सारं शांत झालं!! निसर्गाने वय वाढवलं उर्मीही दडपून टाकली पण; माझ्यावर जो हल्ला झाला होता- दोन मांजरींचा- एक स्वतः निसर्ग नि दुसरं माझं भाग्य, त्या हल्ल्यांनी मला उंदरासारखं खेळवून घेतलं, मला शांत करण्याआधी त्यांनी माझं सर्वांगीण नुकसान घडवलं!! दोन रितसर लग्न- रितसर काडीमोड-मनाची दुरावस्था- ह्यांत समाजाची बोलणी आणि माझे विमनस्क कुटुंबिय- ह्या मधल्या काळाने मला निपचित करून टाकलं होतं- माझी मनःस्थिती सुधारावी म्हणून मला मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्यात आलं.... तुमच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला, मी मोकळी होऊ लागले- इतकी, की माझ्यातले दडपलेले विचार मोकळे होण्याने माझ्यातली सुधारणा पाहून माझे डॉक्टरही स्तिमीत झाले. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं- अशीच जरा हसून खेळून राहशील तर 'तू ठणठणीत बरी आहेस हे सर्टिफीकेट देतो' हे सारं पाहून खरेच आनंद झाला होता, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं माझा पत्ता बदलेल कदाचित- माझे कुटंबीय मला घेऊन परदेशी भावाकडे जाणार होते- आजवर त्याच्या सुरेख संसारात माझ्या रोगाचं विष नको म्हणून मी इथेच होते आणि माझ्यामुळे माझे आई-वडील पार अडकले होते. मला डोक्टरांकडून परवाना मिळताच हे सारं तुम्हाला सांगून, तुमच्या पदरात सारं श्रेय टाकून तुम्हाला भेटणार होते- अर्थात तुम्ही "हो" म्हणाला असतात तरंच- ह्या सार्‍या गडबडीत पत्रव्यवहार खोळंबला कारण मी डॉक्टरांच्या कार्यशाळेत अचानक सहभागी झाले, तिथेच रहावे लागले. आणि मग तुमचा प्रवेश - मला न भेटताच एक्झिटही!! हा आपला पत्रव्यवहार- सारी पत्रं पाहून मानसोपचार तज्ज्ञांनी माझा पत्ता खरंच बदललाय!! "मनस्विनी मनोरुग्णालय....." मला भेटून- माझ्या आई बाबांना, डॉक्टरांना सांगितलं असतंत- ही मुलगी वेडी नाही- मी जाणतो हिचं अंतर्मन, तर कदाचित.... छे! पुन्हा जर- तर... मला मानसिक त्रास आहे- आणि माझ्यावर उपचार सुरू आहेत हे ऐकताच आपण पोबारा केलात... का सांगू? तुम्हाला भिती वाटली. स्वतःची, स्ततःच्या "व्यक्ती म्हणून जगण्याच्या" प्रवृत्तीची, तुमचाही पत्ता माझ्यासारखाच होऊ नये म्हणून पळ काढलात...! असो. आज कित्येक दिवसांतर भावनिक आवेगात हे सारं लिहीलंय, कदाचित हा आवेग शेवटचाच...! आता मनोरुग्ण म्हणून जगताना असले आवेग उपयोगाचेही नाहीत, आलेच तर ते पूरकच समजले जातील आता माझ्या डॉक्टरांकडून. कधी-कधी आयुष्य काठावर येऊन उभं ठाकतं, अशावेळी गरज असते एका हाताची! तो हात मला तुमच्या रुपाने गवसला. तोच हात मला ओढून नेऊन माणसांच्या यादीत बसवू शकला असता पण दुर्दैव असं की त्याने पलीकडे धक्का दिला.... पहा आज दरीत कोसळले आहे. पण एक सांगू, तुम्ही खर्‍या अर्थाने "व्यक्तीस्वातंत्र्य" मिळवलंय, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. मला माझ्याच नातेवाईकांनी वेड लावलं, तुम्हाला 'वेडं' ठरवण्यासाठी तुमच्या अवती- भोवती कुठलीच नाती नाहीत, न समाज तुम्हाला छळतोय! शिवाय तुम्ही दिलखुलास जगू शकताय- हवं तेव्हा निर्मितीच्या मौलिक समाधानात निथळू शकताय... असेच रहा! माझे इतर सल्ले तुम्हाला पटत आलेत- पण आज हे पत्र मनोरुग्णालयातून आलंय म्हटल्यावर हास्यास्पद वाटेल, नाही? माणसाचं अंतर्मन त्याचं व्यक्तिमत्व ठरवतं असं म्हणतात, तुम्ही माझं ते अंतर्मन जाणलंय, म्हणूनच मला फकत एकदाच उत्तर हवं होतं, तेही तुमच्याचकडून, मी खरेच मनोरुग्ण आहे का?? -निर्मयी ---------------------------------------------------------------------------------- समाप्त! एक संपूर्ण काल्पनिक कथा- पत्रकथा! -वेणू ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7318 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

नि:शब्द!

इनिगोय
Sat, 06/09/2012 - 12:34 नवीन
खूपच थेट बोलतेय ही निर्मयी.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म.........

कवितानागेश
Sat, 06/09/2012 - 12:36 नवीन
ह्म्म्म.........
  • Log in or register to post comments

ओक्के

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/09/2012 - 12:37 नवीन
ह्या लेखनाचे सार कोणी सांगेल काय ?
  • Log in or register to post comments

राजकुमार, सारापे़क्षाही

वेणू
Sat, 06/09/2012 - 12:46 नवीन
राजकुमार, सारापे़क्षाही आस्वादासाठी लिहीली आहे , नात्यातले काही रंग काही छटा.. दोन भिन्न व्यक्तीमत्त्वातला संवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/09/2012 - 12:49 नवीन
माझ्या माऊसचा स्क्रोल बिघडलाय हो. :( म्हणून मग सार विचारून मोकळा झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेणू

अनपेक्षित

अमृत
Sat, 06/09/2012 - 14:00 नवीन
शेवट खरच अनपेक्षित. कथा आवडली. एक प्रांजळ कबुली ही की काही भाग निटसा कळू शकला नाही एकदा परत वाचून काढेल. लिहीत राहा. अमृत
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न.

प्रभाकर पेठकर
Sat, 06/09/2012 - 15:10 नवीन
कथेचा बाज, प्रत्यक्ष 'कथासूत्र आवडले. पण शब्दांचा फापटपसारा फार झाल्याने परिणामकता फारच कमी झाली आहे असे वाटते. निर्मयीला आयुष्यभरात 'त्या' निसर्गदानाची अपेक्षा होती. तसेच, अस्तित्वलाही त्याच्या आयुष्याकडून काही अपेक्षा असणारच. पण त्याचीही इच्छा पूर्ण न झाल्याने तो न भेटताच परत निघून गेला. तसंही, त्याने कधी निर्मयीवर प्रेम वगैरे व्यक्त केलेले नाही पण निर्मयीने त्याच्या तिला न भेटता जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून, अप्रत्यक्षरित्या, 'भ्याड' , 'स्वार्थी' अशी दूषणे दिली आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. तिच्या आयुष्याकडून जशा काही अपेक्षा आहेत तशाच त्याच्याही आहेत. त्या पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याने 'दयाळू' होऊन तिला भेटावे, तिला 'मोकळे' होण्यासाठी मदत करावी, अशी चुकीची अपेक्षा तिने मनाशी धरली त्यामुळेच तिच्यावाट्याला दु:ख आले. असो. स्त्री, विचारांच्या-संस्कारांच्या दबावा खाली आणि पुरूष कसाही वागायला स्वतंत्र, आपल्या 'नैसर्गिक' गरजा सहज भागवू शकणारा वगैरे वगैरे चुकीच्या विचारांचा प्रभाव लेखनावर पडू न देता लेखिका (स्त्री असेल तर) खरोखर मोकळी झाली असती तर कदाचित कथा कौतुकास पात्र ठरली असती. तरिपण 'प्रयत्न' चांगला आहे असे म्हणावेच लागेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्रभाकरजी, तुमचा

वेणू
Sat, 06/09/2012 - 15:25 नवीन
धन्यवाद प्रभाकरजी, तुमचा मुद्दा पटण्याजोगा आहे! कथेतील प्रॉटोगोनिस्ट एक स्त्री असल्याने कथा जरा 'तिच्या' अंगाची झालीये, असे वाटते आहे.. सदर कथा, अनेक भागात वाचल्यास शब्दांचा त्रास वाटू शकणार नाही असे वैयक्तीक मत, आपल्या सुचनांची मनःपूर्वक आभारी आहे.. अमृतजी, सबंध कथेच्या प्रत्येक भागास आवर्जून दाद दिल्याबद्दल आभारी आहे :)
  • Log in or register to post comments

माझ्या मते कथा तिच्या अंगांची

निनाद मुक्काम …
Sat, 06/09/2012 - 18:04 नवीन
माझ्या मते कथा तिच्या अंगांची असली पाहिजे. आपण तटस्थ व तयस्थ नजरेने कथेकडे पहिले तर नायिकेने त्या लेखकाची बाजू समजून घेणे व त्याच्याकडून अपेक्षा न ठेवणे हा काकांचा मुद्दा पटतो. पण त्या नायिकेच्या जीवनात लेखकाचे पत्र हे नवीन उर्मी ,व जीवनाकडे सकारात्मक दिशेने पहाण्याचे एक निमित्त असते. तिचे चित्त ,आकांशा, ह्या लेखकाने वेधल्या असतात तर त्यात ती गुरफटून गेली असते. त्यामुळे ती त्याच्याकडून अशी अपेक्षा ठेवते. हे तिच्या मानसिक अवस्था व एकंदरीत परिस्थिती पाहता तिचे कथेतील वर्तन कथेला वास्तवादी बनविते. असे मला वाटते. प्रत्येक ओढीने नातं साकारलं जरी गेलं तरी ते टिकतं किती, हे वेळच ठरवितो. जन्मलेल्या प्रत्येकाने मोठं कसं व्हायचं हे त्याचे माता-पिताच ठरविणार...आपण सारे महारोगी आहोत- 'संस्कार' रोगाने पिडीत!! ही वाक्य हदयात खोल रुतली आहेत . आमच्या दैनदिन आयुष्यात रिसबूड गिरी करत ही वाक्ये समोरच्या व्यक्तीवर मारली जातील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेणू

आपण तटस्थ व तयस्थ नजरेने

प्रभाकर पेठकर
Sat, 06/09/2012 - 19:52 नवीन
आपण तटस्थ व तयस्थ नजरेने कथेकडे पहिले तर नायिकेने त्या लेखकाची बाजू समजून घेणे व त्याच्याकडून अपेक्षा न ठेवणे हा काकांचा मुद्दा पटतो. तटस्थ किंवा त्रयस्थ नजरेतून नाही. नायिकेच्या नजरेतूनही अस्तित्वकडून तिने काही अपेक्षा ठेवणे नैतिकतेला धरून होते आहे का? तो फक्त लेखक आणि वाचक असा पत्रव्यवहार आहे. तिने त्याच्यावर प्रेम व्यक्त केले आहे का? असेल तरी ते त्याने स्विकारले आहे का? ह्या पायर्‍या ओलांडलेल्या असतील तर नायिकेचा त्रागा पटतो. पण, तसे घडल्याचे कथेत दिसत नाही. असलेच तर ते नायिकेचे एकतर्फी प्रेम आहे. आणि एकतर्फी प्रेमात नायिकेने अस्तित्वला दूषणे देणे मलातरी अन्यायकारक वाटते. असो. पण त्या नायिकेच्या जीवनात लेखकाचे पत्र हे नवीन उर्मी ,व जीवनाकडे सकारात्मक दिशेने पहाण्याचे एक निमित्त असते. मान्य. त्यामुळे ते निमित्त पत्रव्यवहारापुरते मर्यादित ठेवावे. नाती नाकारलेल्या नायकाकडून नात्याची अपेक्षा ठेवणे ही चुक कोणाची? तिचे चित्त ,आकांशा, ह्या लेखकाने वेधल्या असतात तर त्यात ती गुरफटून गेली असते. सहमत. त्यात 'ती' गुरफटून गेली असते. दोघेही गुरफटलेले नाहीत. आणि हे तिलाही माहित आहे. 'माझा नात्यांवर विश्वास नाही' हे अस्तित्वने वेळोवेळी सांगितलेले आहे. ती मनोरुग्ण आहे (तेही मला पटत नाही, पण लेखिकेने तसे सुचविले आहे) हे समजल्यावर अस्तित्वने पुढे काही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला हे सुद्धा तिला 'वास्तवाची' जाणीव होऊन तिने त्यातून बाहेर पडावे ह्या उद्देशाने असू शकते. अगदी, वैयक्तिक सुखाचा विचार करून असले तरी समर्थनिय आहे. प्रत्येक आरोग्यपूर्ण व्यक्ती सुद्धा स्वतःच्या लग्नाच्या वेळेला ह्या सर्व गोष्टींचा विचार करतेच. कोण पुरुष अथवा स्त्री जाणूनबुजून 'मनोरुग्ण' व्यक्तीशी विवाह करतो/करते? तशी अपेक्षा अस्तित्वकडून ठेवावी हा त्याच्यावर अन्याय होईल, असे माझे मत आहे. संपूर्ण पत्रव्यवहार हा लेखक आणि वाचकातला पत्रव्यवहार आहे, प्रेमी युगुलाचा नाही, हे भान जागृत ठेवले तर संभ्रम होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

शिवाय अंतिम भाग फार सुटसुटीत

वेणू
Sat, 06/09/2012 - 15:26 नवीन
शिवाय अंतिम भाग फार सुटसुटीत झाला नाही आहे, हे मलाही जाणवलं!
  • Log in or register to post comments

संपवताना गाडी जरा जास्तच लेट

५० फक्त
Sat, 06/09/2012 - 18:49 नवीन
संपवताना गाडी जरा जास्तच लेट झालीय हे खरं.बाकी मुळ गाभा व्यवस्थित सांभाळलात, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

>>>>जन्मलेल्या प्रत्येकाने

नाना चेंगट
Sat, 06/09/2012 - 18:52 नवीन
>>>>जन्मलेल्या प्रत्येकाने मोठं कसं व्हायचं हे त्याचे माता-पिताच ठरविणार...आपण सारे महारोगी आहोत- 'संस्कार' रोगाने पिडीत!! खरं आहे. आता आईबापांनी मुल जन्माला आलं की बेवारस सोडून द्याव... त्याचं ते पाहून घेईल. उगाच कशाला महारोगी बनवायचे ! नाही का ? लेखन ठिक ठाक.
  • Log in or register to post comments

चेंगट, अत्यंत वास्तववादी आहे

वेणू
Sat, 06/09/2012 - 21:06 नवीन
चेंगट, अत्यंत वास्तववादी आहे कथेची प्रोटोगोनिस्ट 'निर्मयी' आणि त्याच वेळेला कुणीतरी हात देऊन त्या मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी- एक आधाराचा हात मिळावा, एक आशेचा किरण जगताना मिळावा, तो न मिळाल्याने तिचा होणारा क्षोभ हे सगळं उमटलंय...कारण ती ही एक व्यक्तीच आहे! अर्थात, कथेतील इतर सामान्यांना ह्यातलं काही एक न पटल्याने तिला 'मानसोपचार केंद्रात' पाठवून तिच्या ह्या वाक्यांवर,एकांगी अपेक्षांवर पडदाही पडलाच. निनाद, आपली सविस्तर पोस्ट आवडली. संपूर्ण पत्रव्यवहार हा लेखक आणि वाचकातला पत्रव्यवहार आहे, प्रेमी युगुलाचा नाही, हे भान जागृत ठेवले तर संभ्रम होणार नाही. >> हेच ते सार, राजकुमार, तुमचे उत्तरही ह्या वाक्यात आलेय, प्रभाकरजी धन्यवाद! कथेची दखल घेऊन तुमची मते कळवलीत, फार आनंद झाला :)
  • Log in or register to post comments

तटस्थ किंवा त्रयस्थ नजरेतून

वेणू
Sat, 06/09/2012 - 21:16 नवीन
तटस्थ किंवा त्रयस्थ नजरेतून नाही. नायिकेच्या नजरेतूनही अस्तित्वकडून तिने काही अपेक्षा ठेवणे नैतिकतेला धरून होते आहे का? तो फक्त लेखक आणि वाचक असा पत्रव्यवहार आहे. तिने त्याच्यावर प्रेम व्यक्त केले आहे का? असेल तरी ते त्याने स्विकारले आहे का? ह्या पायर्‍या ओलांडलेल्या असतील तर नायिकेचा त्रागा पटतो. पण, तसे घडल्याचे कथेत दिसत नाही. असलेच तर ते नायिकेचे एकतर्फी प्रेम आहे. आणि एकतर्फी प्रेमात नायिकेने अस्तित्वला दूषणे देणे मलातरी अन्यायकारक वाटते. असो. >> प्रभाकरजी, ह्या मुद्द्यावर बोलू इच्छिते. चर्चेचे स्वागत आहे. अस्तित्व कडून केल्या गेलेल्या अपेक्षा योग्य अयोग्य हा मुद्दा थोडा बाजूला ठेवला, तर मला एक सांगा- ओळख थोडी जरी निर्माण झाली तरी मानवी मनात (त्याच्याही नकळत) अपेक्षांचा जन्म होतो, इथे त्या दोघांत कसलेही नाते नाही, पण एक अलिखीत 'कन्सर्न' डेव्हलोप झाला असल्याचे जाणवते ना? निर्मयीचे उत्तर न आल्याने अस्वस्थ होणारा अस्तित्त्व! का झाला तो अस्वस्थ जर कुठलेली नाते नव्हते?- माणूसकी चे नाते- हे नसतेच का? तो तिला भेटायला अचानक आल्याने तिच्या 'पत्रांची' पोल उघडकीस येऊन, ती 'कदाचित' मनोरुग्ण असावी, ह्या सशंयावर घरच्यांनी शिक्कामोर्तबच केले... आणि ह्या कॉनसिक्वेन्स चा त्रागा म्हणून तिने शेवटाचे पत्र खरडलेय, की इथेपर्यंत आलाच होतात तर भेटूनही गेला असतत तर ह्या संभाव्य घटना तिच्यासोबत नसत्या घडल्या. सर, कुठल्याही कथेच्या अगदी लाखभर पॉसिबीलिटीज असू शकतात, ही त्यातलीच एक :) कृपया गैरसमज नसावा..
  • Log in or register to post comments

पटत नाही...

प्रभाकर पेठकर
Sun, 06/10/2012 - 03:07 नवीन
ओळख थोडी जरी निर्माण झाली तरी मानवी मनात (त्याच्याही नकळत) अपेक्षांचा जन्म होतो. हे काही पटले नाही. आजपर्यंतच्या आयुष्यात आपल्या सर्वांच्याच अनंत ओळखी होतात. त्या सर्वांकडून आपण काही अपेक्षा ठेवतो का? जेंव्हा नातं निर्माण होतं तेंव्हाच अपेक्षा निर्माण होतात. साध्या मैत्रीच्या नात्याकडून ते थेट प्रियकर-प्रेयसीच्या नात्यापर्यंत असणार्‍या अपेक्षा सारख्याच तीव्र नसतात. ओळख ह्या नात्यात तर अपेक्षाच नसतात. असो. एक अलिखीत 'कन्सर्न' डेव्हलोप झाला असल्याचे जाणवते ना? निर्मयीचे उत्तर न आल्याने अस्वस्थ होणारा अस्तित्त्व! का झाला तो अस्वस्थ जर कुठलेली नाते नव्हते?- माणूसकी चे नाते- हे नसतेच का? अगदी प्रेमाचे नाते निर्माण झाले असे आपण मानले तरी निर्मयीच्या पत्रव्यवहारातून ती मनोरुग्ण आहे हे कोठे व्यतीत होते आहे? तिचे सर्व लेखन अत्यंत तौलनिक आहे. ती मनोरुग्ण आहे असे कुठेही वाटत नाही. त्यामुळे अस्तित्व तिला भेटावयास येतो. पण तिथे, 'ती मनोरुग्ण आहे' असे जर त्याच्या मनावर बिंबविले असेल तर त्याने तिचा तथाकथित 'आजार' आपल्या भेटीमुळे वाढू नये असा विचारही केला असेल आणि म्हणूनही कदाचित भेट टाळली असेल. तसेही, त्याच्या मनात अगदी लग्नाचा विचार जरी असला तरी एखादी व्यक्ती 'मनोरुग्ण' आहे म्हंटल्यावर प्रकरण पुढे नेण्यात काही स्वारस्य नाही ह्या विचाराने भेट टाळली असेल तरी अस्तित्व दोषी, स्वार्थी किंवा भ्याड ठरत नाही. आपण सर्वही जाणूनबुजून 'मनोरुग्णाशी' लग्न करणार नाही. मुळात नाती टाळणारी व्यक्ती 'ओळखीच्या' ओढीने, उत्सुकतेपोटी भेटावयास गेली तरी नाते निर्माण होऊ देणार नाही, ह्यात अस्वाभाविक काही नाही. हा आपला पत्रव्यवहार- सारी पत्रं पाहून मानसोपचार तज्ज्ञांनी माझा पत्ता खरंच बदललाय!! "मनस्विनी मनोरुग्णालय....." मला भेटून- माझ्या आई बाबांना, डॉक्टरांना सांगितलं असतंत- ही मुलगी वेडी नाही- मी जाणतो हिचं अंतर्मन. तिच्या घरचेही तिला ओळखू शकले नाहीत. त्यांनीच तिला (मानसोपचार तज्ज्ञाच्या साहाय्याने) मनोरुग्ण ठरविले आहे. अस्तित्वच्या येण्या न येण्याने काय फरक पडला असता मला समजत नाही. उलट, तिचा पत्रव्यवहार पाहून तिला एका मानसोपचार तज्ज्ञाने मनोरुग्ण ठरवावे ह्याचेच मला आश्चर्य वाटले. ज्यांनी लहानाची मोठी केली ते समजू शकले नाहीत, एक मानसोपचार तज्ज्ञ वरील पत्रव्यवहार पाहून ठरवतो की ती मनोरुग्ण आहे. आणि एका त्रयस्थाने येऊन सांगायचे ' ती मुलगी वेडी नाही, मी जाणतो तिचे अंतर्मन' आणि ह्यावर दोघांनीही (घरचे आणि मानसोपचार तज्ज्ञ) विश्वास ठेवायचा, हे स्विकारणे जरा कठीणच आहे. मिपावर कोणी ह्या विषयाचा अभ्यास केला असेल तर ते प्रकाश पाडू शकतील. माझ्या आकलनशक्ती बाहेरील विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेणू

छान प्रामाणिक कथा. कसलेही

बॅटमॅन
Sat, 06/09/2012 - 23:50 नवीन
छान प्रामाणिक कथा. कसलेही आक्षेप न घेता आवडली :) सध्या तरी इतकेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

छान पण----

अनिवासि
Sun, 06/10/2012 - 00:54 नवीन
कथा क्रमशः येत होती त्यावेळेस फार लाम्बवली गेली असे वाटले नाही पण सम्पुर्ण एका वेळेस वाचताना मात्र तसे जाणवले. बहुतेक सर्व प्रतिसाद सुध्द्दा वीचार करण्यास लावणारे आहेत. सर्वाना धन्यवाद. पुढच्या महिन्यात(7july) ला येथे एक साहित्तीक गप्पान्चा कार्यक्रम आयोजीत केला आहे त्यावेळेस ह्या पत्रकथेचा उल्लेख जरुर करेन -- हरकत नाहीना?
  • Log in or register to post comments

प्रभाकर काका, तुमचे प्रतिसाद

वेणू
Mon, 06/11/2012 - 11:34 नवीन
प्रभाकर काका, तुमचे प्रतिसाद वाचले, चिंतनही केलं. ह्या कथेबद्दलचा माझा स्टँड थोडक्यात मांडू इच्छिते, तुम्हाला तो पटावाच असा अट्टहास नाही, पण एका व्यक्तीचा एक विचार- असे म्हणून त्याकडे पहावे. कुठलीही कथा लिहीताना कथाकाराच्या मनात एक ढाचा तयार होतो, त्यात काही बुलेट सिक्वेन्सेस असतात आणि त्याभोवती कथेची गुंफण होते, सदर कथेत (मी आधीही बरेच ठिकाणी म्हणाल्याप्रमाणे) निर्मयी कथानायिका आहे, कथा तिच्या अंगाची आहे आणि शेवट तिच्याच पत्राने झाल्याने- अस्तित्व नेमकं काय विचार करून परतला, हे स्पष्ट झाले नाही आहे- प्रत्येकाने आपापल्या लॉजिकप्रमाणे कयास बांधावा अगदी "हीच" अपे़क्षा माझी आहे! तुम्ही मांडलेले अस्तित्वचे विचार अनेक पॉसिबिलीटीज पैकी एक असू शकतात. इथे, अस्तित्वच्या पत्रांना बरेचदा निर्मयीने दिलेली उत्तरे तुम्ही पुन्हा एकदा वाचाल तर जगाबद्दलची उबग तिला झालेल्या त्रासामुळे जाणवते नकक्कीच, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चा उदासीन परिणाम शिवाय 'एकटेपणाचा' त्रागा आहेच. काका, सव्वा वर्ष पत्रव्यवहार केलेल्या एखाद्या व्यक्तीकडून 'दारापर्यंत येऊन भेट का नाही घेतली गेली?' असा प्रश्न निर्माण होणे मला तरी गैर वाटत नाही. अनिवासीजी, साहित्य- गप्पांमधे माझ्या कथेचा उल्लेख करण्यास माझी अजिबात हरकत नाही, ७ जुलै च्या कार्यक्रमाबद्दल अजून सविस्तर कळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/11/2012 - 16:15 नवीन
लेखिकेचे स्वातंत्र्य अबाधित आहे. निर्मयी बद्दलची भावनिक जवळीक आणि त्याने प्रेरीत लेखिकेने चितारलेले निर्मयीचे व्यक्तिचित्र समजून घेण्याजोगे आहे. निर्मयीच्या अस्तित्वबद्दलच्या अपेक्षांमधील साधेपणा आणि सच्चेपणा विचारात घेतला तर ती मनोरुग्ण नसून, अनुभवाने अपरिपक्व आहे अशा निष्कर्षाप्रती मी आलो आहे. कदाचित माझा हा विचारही एकांगी असू शकेल. निर्मयीने तसा आरोप केल्यास तो मला स्विकारार्ह आहेच. एकंदरीत, कथेच्या अनुषंगाने झालेली चर्चा, मतभिन्नता असली तरी, आरोग्यपूर्ण आणि विचारांस पोषक अशी झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेणू

सहमत

इनिगोय
Mon, 06/11/2012 - 18:25 नवीन
बर्‍याच दिवसांनी इथे दुर्मीळ झालेली अशी उत्तम चर्चा वाचता आली. तुमच्या प्रतिक्रियांनी अधिक विचार करायला लावला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रभाकरजी, दोन वेगळे व्यक्ती

वेणू
Mon, 06/11/2012 - 15:32 नवीन
प्रभाकरजी, दोन वेगळे व्यक्ती म्हणजे मतभिन्नता स्वाभाविक आहे.. भिन्न मतांचा आदर आहे :) मनःपूर्वक आभारी आहे ..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा