Skip to main content

दीपोत्सव किल्ल्यांवरचा !

लेखक जातीवंत भटका यांनी गुरुवार, 07/06/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
दीपोत्सव किल्ल्यांवरचा !
राजगडावरील दीपोत्सव
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप- आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ आणि या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव !!!
रायरेश्वरावरील दीपोत्सव
पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा सह्यगिरीतील किल्ल्यांवर माणसांचा राबता होता त्यावेळी गडांवर नक्कीच दीपावली साजरी होत असणार यात शंका नाही. त्यावेळचे गडवैभव नक्कीच डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे असेल. या गडकोटांनाही वाटत असेलच की पुन्हा पहावी तशीच दिवाळी !! याचसाठी गडांच्या भूतकाळात दडलेल्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लबची दिवाळी दरवर्षी सह्याद्रीतील एखाद्या किल्ल्यावर साजरी होते. घरचं लक्षीपूजन उरकलं की पावलं आपसूक सह्याद्रीकडे वळतात ते याच दीपोत्सवासाठी. थोडा फराळ एकवेळचा डबा, आकाशकंदील, तीन-चारशे पणत्या,२ लीटर गोडं तेलं, वातींचं बंडल, आणि प्रसादासाठी मोतीचूराचे लाडू इत्यादी सामानाची खरेदी उरकून सुर्यास्तापूर्वी गडावर पोहोचायची लगबग असते. गडावर पोहोचल्यावर सगळी मंडळी आपापल्या कामाला लागतात. कोणी मंदीर झाडून घेतो, तर कोणी अंगणात सडे टाकतो, कोणी वाती वळायला लागतो तर कोणी पणत्याची मांडणी करतो, कोणी तेल भरण्याची जबाबदारी घेतो. उत्साही महिला मंडळाची रांगोळ्यांची तयारी चालू असते. मुख्य गाभार्‍यासमोर घातलेल्या मोठ्या गालीच्या पासून ते अगदी प्रत्येक पणतीच्या भोवती घातलेली सुरेख नक्षी वातावरण मंगलमय करून सोडते. कोणाच्या तरी मोबाईलवर मागे मंद आवाजातील बिस्मिल्लाची सनई सुरू असते. गडदेवतेसमोर धूपदीप लावले जातात. वातावरण एकदम उत्साहपूर्ण आणि प्रसन्न असते. मंदीर आणि परीसरात सगळीकडे पणत्या लावल्या जातात. पारंपारीक पेहरावात मग गडदेवतेची आरती होते. सगळीकडे मंत्रमुग्ध करणारं आणि काहीसं भारून टाकणारं असं वातावरण असतं. तिकोन्यावरील दीपोत्सव या मंगलमयी सोहळ्यात कधी गडावरील किल्लेदार, गावकरी, पायथ्याच्या गावातली मंडळी कधी गडावरची ट्रेकर मंडळी आवर्जून सामिल होतात. राजगडावरील किल्लेदार ढेबे, रायरेश्वरावरचा दगडू जंगम, तिकोन्याचं वसंता बोडकेचं कुटूंब ही काही उल्लेखनीय नावं. त्यांना या सोहळ्याचं फार कौतूक ! दरवर्षीचा दीपोत्सव रायरेश्वरावरच व्हावा हा दगडूचा निरागस हट्ट ! जेवणं झाल्यावर रंगतो गप्पांचा फड आणि मग मागील दिवाळीच्या आठवणीत मंडळी रमून जातात. शिवकल्याण राजातील गीतांची आवर्तनं होतात. किल्ल्याच्या इतिहासाची माहीती आणि महती जमलेल्या उपस्थितांना दिली जाते. पुढल्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी एखाद्या नवीन किल्ल्याची निवडही तिथेच होते. ह्या सगळ्यातून काय मिळतं ? तर उत्तर एकच, आत्यंतिक समाधान ! या गडकिल्ल्यांशी जोडली गेलेली नाळ अधिकाधिक दृढ होते, ते अशाच सगळ्या सोहळ्यांमुळे. या सगळ्यातून मिळाणार्‍या समाधानाची तुलना अन्य कश्या सोबत होणं निव्वळ अशक्य आहे !! टीपः ब्लॉगई-शिवसह्याद्री मासिकात पूर्वप्रकाशित -- जातीवंत भटका

वाचने 8887
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

सगळेच फोटो सुंदर! गडकिल्ल्यांवरच्या दीपोत्सवाची कल्पना फारच आवडली. कधीतरी जमेल तेव्हा एखाद्या दीपोत्सवात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल, पाहू कधी आणि कसे जमते ते.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

भटक्याचे धागे बघून त्यांच्यासोबतवेगवेगळ्या ट्रेक्सवर जायची फार इच्छा होते, बघू कधी शक्य होतंय. फोटोही सुरेखच... शेवटचा खूप आवडला.

कल्पना छान आहे. येत्या दिवाळीत असाच एखादा दिपोत्सव साजरा करायला खुप आवडेल.

फोटो मस्त आहेत. दिपोत्सवची कल्पना देखील छानच!! :)

व्वा !!! फोटो इतके सुरेख आले आहेत की " एखादे दिवाळिचे शुभेच्छापत्र बघत आहे की काय असे वाटुन गेले " :)

मला सुध्दा आवडेल सहभागी व्हायला.......... या वेळेचा कार्यक्रम ठरला की सांगा.............

In reply to by पैसा

पैसाबाय, एकदम सोप्पं आहे! काय करायचं माहित्येय? तुमच्या जवळपास एखादा पर्वत बनवा आधी. एकदम उंच उंच आणि चिक्कार शिखरं असलेला. मग त्यावर काही किल्ले बांधा. मस्त मस्त. मग बघा, हा भटक्या आणि त्याची ग्यांग आपोआप येतील तिथे. त्यांना आमंत्रणची गरज नाही पडणार. मग ते लोक आले की तुम्ही पटकन त्यांना जॉइन व्हायचं! हाकानाका! :)

सगळे फोटो सुंदर आहेत. वृत्तांत आवडला. आणि किल्ल्यांवर दिपावली साजरी करण्याची कल्पनाही भन्नाट आहे.

दिपोत्सवाला येणार म्हणजे येण्णारच...! आणी तुंम्ही पण बोलवायचच! लाजवाब फोटो... आणी तितकच सुंदर वर्णन... मानलं राव तुम्हाला! आय.डी.नेम घ्यावं तर ते असं,,,,सार्थ आणी कृतिशील...! त्रिवार मानाचा मुजरा...!

भटके बुवा. ..... मिपावर कोण काय आयडियेची कल्पना आणेल याचा नेम नाही. आपली कल्पना तर लय भारी पण हे फोटो आपण काढलेयत ना ते मस्ताड ! येत्या दिवाळीत मी जयपुरास जाण्याचा संभव आहे.पण ते झाले नाही तर या म्हातुर्‍या साठी सोपा गड निवडाल काय ? आ प्ला चौ रा

उत्तम उपक्रम, आणि सुरेख फोटो.

वाह. खुपच सुरेख. नितांत सुंदर. पण तरीही मला दिवाळी घरच्यांबरोबर घरीच व्यतीत करायला आवडेल. :)

ह्या उपक्रमाची जमेल तिथे जाहिरात करण्याचा अनावर मोह होत आहे. आणि आयुष्यात एकदा तरी ह्या उपक्रमात माझ्यासह जमेल तितक्या लोकांना सहभागी करण्याचा मानस आहे.

'ज्याची-त्याची दृष्टी' असा मामला असला तरी, प्रस्तुत लेखकाकडे इथे दिली आहेत त्यापेक्षा अधिक देखणी, प्रेक्षणीय प्रकाशचित्रे आहेत हे नक्की. :-)