Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by किलमाऊस्की on Mon, 05/14/2012 - 17:35
लेखनविषय (Tags)
इतिहास
मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप तज्ज्ञांच्या मते, मेसोअमेरिकन प्रांतातील पहीली वसाहत ही बहुदा सैबेरीयापासून स्थलांतरित झालेले भटके लोक. त्यांच्या स्थलांतराचा निश्चित कालावधी जरी माहीत नसला तरी Tlapacoya (North-East Mexico city) येथे सापडलेल्या काही हाडांच्या रेडीयोकार्बन डेटिंगने सिद्ध झाले आहे की आस्तेक वस्ती ज्या भागात होती त्या भागाच्या आसपास सुमारे ख्रि.पू. २१००० वर्षे वस्ती असावी. याच मनुष्यवस्तीमधील काही प्रगत पिढ्यांना “ओल्मेक” असे नाव देण्यात आले. इतिहासाने ज्या संस्कृतीला “मेसोअमेरिकन संस्कृतीची जननी” असं नाव बहाल केलं आणि जी पुढील बर्‍याच मेसोअमेरिकन पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरली त्या संस्कृतीचा आढावा या लेखात आपण घेऊ. ओल्मेकांचा शोध लागेपर्यंत मायन संस्कृती प्राचीन मानली जायची. परंतु अलिकडे झालेल्या संशोधनात ओल्मेकांचं स्थान खूप आधीच असल्याच सिद्ध झालं आहे. ओल्मेकांचा निश्चित कालखंड इतिहासाला माहित नाही. त्यांच्या काही कलाकृती सोडल्या तर त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. इतकाच काय त्यांना दिलेलं “ओल्मेक” हे नावही आस्तेकांच्या "नौवात्ल"(१) भाषेने त्यांना बहाल केलं. ओल्मेक म्हणजे “रबर पीपल” (Rubber People) त्यांना हे नाव मिळण्याचं कारणही एवढंच की त्यांचे अवशेष रबर पिकणार्‍या प्रांतात मिळाले. ओल्मेकांचा कालखंड ख्रि.पू. १५०० - ४०० असा मानला जातो. गंमत म्हणून एक दृष्टिक्षेप टाकू नेमकं या काळात बाकी जगात काय चालू होतं. याचं सुमारास इजिप्शियनस पिरॅमिड बांधण्यात गर्क होते. भारतात आर्य संस्कृती फुलत होती, शून्याचा शोध लागला होता, ऋग्वेद जन्म घेत होता. तिकडे पूर्वेत चायनीज पतंग उडवत होते आणि रेशमाचा शोध तर त्यांनी फार पूर्वी लावला होता. युरोपात ग्रीसमध्ये होमारने “इलियड” आणि “ओडिसी” लिहायला सुरवात केली होती. इतर संस्कृतींच्या मानाने ओल्मेक जरी मागासलेले असले तरी त्यांनी एका संस्कृतीचा पाया रुजवला. वस्तीस्थान : मेक्सिकोच्या पूर्वेस असलेल्या Tuhtala डोंगरांच्या आसपास त्यांची वस्ती होती. याच भागाला संशोधकांनी "ओल्मेक Heart Land " संबोधले आहे. “ओल्मेक Heart Land” मधे १) सान लोरेन्सो (San Lorezo) २)ला वेंता ( La Venta) अशी दोन मुख्य पुरातत्त्व ठिकाणे अंतर्भूत आहेत. १)सान लोरेन्सो : सान लोरेन्सो हे नाव सान लोरेन्सो, तेनोच्तीत्लान(२), पोत्रेरो नुएवो या तीन पुरातत्त्व ठिकाणांना एकत्रितरित्या दिलं गेलं आहे. ही तिन्ही ठिकाण मेक्सिकोच्या आग्नेय दिशेस वेराक्रुझ (३) येथे आहेत. साधारण ख्रि. पू. १२००-९०० या काळात सान लोरेन्सो मोठे शहर असावे तसेच ते शेतीसाठी उपयुक्त अशा भागाच्या आसपास होते. साधारणपणे ७०० हेक्टर परिसरात बांधलेल्या या शहरात दगडी पाईप बांधून केलेली सांडपाणी वाहून नेण्याची सोय होती. ख्रि. पू. ९५० सुमारास सुरु झालेल्या सान लोरेन्सोच्या र्‍हासाची कारणे वातावरणातील बदल तसेच नद्यांनी आपल्या मार्गात केलेला बदल मानला जातो. २)ला वेंता (La Venta): सान लोरेन्सोच्या र्‍हासानंतर ला वेंता हे ओल्मेकांचे मुख्य केंद्र बनले. ओल्मेकांचे दिडशेहून अधिक अवशेष व्हीय्ये एरमोसा (४) मधील वेंता पार्क मध्ये पाहायला मिळतात. नमुन्यादाखल ही काही चित्रे. हे पाहिलं चित्र आहे ग्रान आल्तारचं. ग्रान आल्तार: अभ्यासकांचा असा अंदाज आहे कि बेसॉल्ट खडकातील “आल्तार” म्हणजे भव्य शिला ज्या ओल्मेक राज्यकर्ते महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रम व रितिरिवाजांसमयी बसण्यासाठी वापरत असत. या चित्रातील शिळेत वरच्या बाजूस कोरलेली पट्टी आहे. मधला भागात बसलेला रक्षक आपल्या हातातील दोरखंडाने दोन्ही बाजूच्या कैद्यांना पकडून ठेवत आहे. ला वेंता मधली अजून एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे जायंट हेड्स(Giant Heads). खाली दिलेल्या चित्रामधे जवळ जवळ १२ फुट उंच अस हे आफ्रिकन माणसाचं मस्तक. चित्रात दिसत असल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे. अतिशय साधारण अवजारांचा वापर करून ही इतकी भव्य आणि तितकीच प्रमाणबद्ध कलाकृती पाहताना त्याच्या निर्मात्याला मनापासून दाद दिल्या खेरीज राहवत नाही. अशी सुमारे १२ मस्तके या ठिकाणी सापडली आहेत. मोंते आल्बान : इसवी सन पूर्व ५०० वर्षे ओल्मेकांनी मेक्सिको मधील मोंते आल्बान इथे डोंगर माथ्यावर शहर वसवलं. डोंगर माथ्यावर शहर वसवण्याचं कारण या परिसराचा भूगोल. तीन दर्‍यांमधे असलेला हा सुपीक प्रदेश सर्वत्र नजर ठेवायला अतिशय उपयुक्त होता. ओल्मेकांनी याच कारणास्तव आपली राजाधनी येथे बनवली असावी. त्या काळी देखील या ठिकाणी १० हजाराची वस्ती असल्याचा कयास आहे. ओल्मेकांचा हा निर्णय किती अचूक होता ते त्यांच्या नंतर आलेल्या झापोतेकानी मोंते आल्बानला आपली राजधानी बनवून सिद्ध केलं. ओल्मेकांचा प्रभाव : ओल्मेकांच्या बर्‍याचं परंपरा, रिती, देवदेवता इतकचं काय तर अंक, लिपी पुढच्या सर्व मेसोअमेरिकन संस्कृतींनी आपलेसे केले. आस्तेकांच्या देवदेवता असोत किंवा मायनसची दुहेरी चक्र पद्धतीची कालगणना असो बर्‍याचं ठिकाणी ओल्मेकांचा प्रभाव आपल्याला वेळोवेळी जाणवतो. जग हे चार दिशांमध्ये विभागले गेले आहे ही कल्पना मेसोअमेरिकन जगात ओल्मेकांनीच प्रथम मांडली. ओल्मेकांनी छपाई तंत्र विकसित केल्याचे पुरावे सापडले आहेत. दगडी दंडगोल छाप्यावर शाईसारखा द्रव टा़कून अंगावर, कपड्यावर फिरवित असत. तज्ज्ञांच्या मते माया लोकांच्या लिपीचे मूळ हे ओल्मेकांच्या सांकेतिक चिन्हात आहे. ओल्मेकांच्या कलाकृतींमध्ये अभ्यासकांना १८० हून अधिक संकेतिक चिन्हे आढळली आहेत. हा एक ओल्मेक चित्रलिपीचा नमुना. देवदेवता : मेसोअमेरिकन काळात अनेक देवदेवता एका पिढीकडून दुसर्याे पिढीकडे हस्तांतरित झाल्याचे दिसून येते. आस्तेक आणि माया लोकांचे बरेच देव ओल्मेकांकडून आले. ओल्मेक प्राथमिक स्वरूपात या देवांची पूजा करत असत. जसे Tlaloc(आस्तेकांचा पर्ज्यंन्देव) , Tezcatlipoca(आस्तेकांचा रात्रीचा देव) , Quetzalcoatl( आस्तेकांचा पहाटेचा देव आणि माया लोकांचा kukulcan), Huehueteotl ( अस्तेकांचा अग्निदेव). नमुन्यादाखल हे चित्र आहे Tlaloc या देवाचं. बॉल गेम : बॉल गेम शोधून काढण्याचं सर्व श्रेय मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये ओल्मेकांना जात. “पासो दे ला आमादा” (Paso de la Amada) येथील बॉल कोर्ट हे मेसोअमेरीकेतील सर्वात जुने बॉल कोर्ट मानले जाते. “एल मानाती” (El Manati) जवळ एक डझनाहून अधिक रबरी बॉल सापडले आहेत. परंतु ते नक्की ओल्मेकांनी वापरले असतील की नाही यावर अजून ही दुमत आहे. बॉल गेमसाठी लागणारे बॉल ओल्मेक रबराच्या झाडाचा चीक आणि मॉर्निंगग्लोरी फुलाची वाईन यांच्या मिश्रणापासून बनवत. रबरामुळे चेंडू उसळ्ण्यास मदत होई. नगर रचना : ओल्मेक घरे साधारणपणे विस्तृत मैदानात विखुरलेली असत. घराजवळच्या बागेत औषधी वनस्पती व घरगुती वापरासाठी छोटी पिके जसे सुर्यफुल इत्यादी घेत असत. कोको, अवकाडो सारखी फळे ही त्यांना माहित होती. फळे व भाज्या या बरोबरीने मासे, कासव, साप, ससा इ. भक्षण केले जाई. शेते मुख्यत्वे गावाबाहेर असत आणि त्यात मका, स्कॉश, बटाटे, कापूस या सारखी पिके घेतली जात. र्‍हास : ओल्मेकांच्या र्‍हासची दोन कारणे दिली जातात. वातावरणात अचानक झालेला मोठा बदल जो मोठ्या लोकसंख्येला मानवाला नाही. ओल्मेक सर्वतोपरी मुख्यत्वे शेतीवर गुजराण करीत. नद्यांच्या पत्रात झालेला बदल शेतीसाठी अयोग्य ठरला. दुसरा प्रवाद असा आहे की वारंवार या प्रदेशात होणारे ज्वामुखीमुळे ओल्मेकांनी दुसर्‍याजागी स्थलांतर केले असावे. ओल्मेकांच्या र्‍हासाची कारणं काहीही असली तरी त्यांनी मेसोअमेरिकन जगाला दिलेली देणगी अमूल्य आहे. मेसाअमेरीकन संस्कृतीचा पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या जगाला फारशी माहीत नसलेली ही संस्कृती जगाच्या पाठीवर नांदली, बहरली आणि पुढच्या अनेक पिढ्यांना मार्ग दाखून नाहिशी झाली. ओल्मेकांच्या अनेक शिल्पकृतींमध्ये कोरलेले चेहरे बसक्या नाकाचे(चीनी, मंगोलियनसशी मिळतेजुळते), जाड ओठांचे(आफ्रिकन) तर काही युरोपियनांसारखे टोकदार दाढीचे आढळून येतात. अमेरिका खंडाला कोलंबसचे पाय पहिल्यांदा लागले तर मग जगाशी संपर्कं नसलेल्या या ओल्मेकांनी कोरलेले हे चेहरे नक्की कोणाचे? या आणि अशा अनेक प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन एक संस्कृती जगाच्या पाठीवरून लुप्त झाली. सर्व मेसोअमेरिकन संस्कृती मध्ये “ओल्मेक” हे माझे सर्वात लाडके. त्यांच्याबद्दल कितीही वाचालं, ऐकलं तरी उत्सुकता न संपणारी. तुर्तास काही माझ्या आवडत्या ओल्मेक कलाकृतींचे फोटो इथे डकवून ओल्मेकांना निरोप देत आहे. ओल्मेक लहान बाळ : हातात लहान बाळ धरलेली मूर्ती: हा पहिलवान : माशाच्या आकाराचं भांडं :
***
टिपा : प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. थोडी अवांतर माहिती: १. नौवात्ल : ही आस्तेकांची भाषा. तिच्यात “त्ल” हे अक्षर फार येत. २. तेनोच्तीत्लान : आस्तेकांची राजधानी तेनोच्तीत्लान आणि या लेखात उल्लेख केलेली तेनोच्तीत्लान दोन्ही वेगवेगळया. आस्तेकांची राजधानी मेक्सिको सिटीच्या जवळपास होती. ३. वेरा क्रुझ : आर्नान कोर्तेसने मेक्सिकोच्या किनर्‍यावर उतरल्यावर येशूच्या नावाने क्रॉस उभा केला आणि तो प्रदेश स्पॅनिश राजाच्या नावे घोषित केला. त्याच नाव त्याने वेरा क्रुझ (Vera Cruz – अर्थ : True Cross) असं ठेवलं. ४. व्हीय्येरमोसा (Villahermosa) : हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ – सुंदर खेड. (व्हीय्या – खेड एरमोसा – सुंदर) संदर्भ : १) मेक्सिकोपर्व (मीना प्रभू) २) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones ३) Wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Olmec ३) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून. ४) Lost Civilization (Paramount Publications) (लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
  • Log in or register to post comments
  • 9270 views

Book traversal links for मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture)

  • ‹ मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप
  • Up
  • मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People) ›

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/14/2012 - 18:08

Permalink

सूंदर माहिती..

छान छान
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 05/14/2012 - 18:58

Permalink

सुंदर! अप्रतिम! थक्क होतोय!

सुंदर! अप्रतिम! थक्क होतोय! सायबेरिया, अलास्का, कॅलिफोर्निया असं करत करत माणूस दक्षिण अमेरिकेत पोचला हे आता मान्य झाले आहे बहुधा. जनुकिय पुराव्यांवरून साधारण दहाएक (की त्याच सुमारास) वर्षांपूर्वी माणूस खाली चिली वगैरे पर्यंत पोचला असं सिद्ध होतंय. यावरची बीबीसीची प्रसिद्ध डॉक्युमेंटरी बघण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Mon, 05/14/2012 - 19:18

In reply to सुंदर! अप्रतिम! थक्क होतोय! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

धन्यवाद!

सायबेरिया, अलास्का, कॅलिफोर्निया असं करत करत माणूस दक्षिण अमेरिकेत पोचला हे आता मान्य झाले आहे बहुधा. >> +१ हो खरं आहे. एक प्रवाद असा ही आहे की ओल्मेक आफ्रिकेतून स्थलांतरीत झाले. कारण त्यांनी कोरलेल्या शिल्पकृतींमधिल चेहरे अफ्रिकनांशी मिळते जुळते आहेत. परंतु मला हे फारस पटत नाही. कारण ओल्मेकांमधे "शमन" (मांत्रिक?) ची प्रथा होती. हे शमन आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत. साधारणे अशाच कहिश्या प्रथा अर्टिक्ट व सैबेरियात दिसुन आल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 05/15/2012 - 09:45

In reply to सुंदर! अप्रतिम! थक्क होतोय! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

>>>>साधारण दहाएक (की त्याच

>>>>साधारण दहाएक (की त्याच सुमारास) वर्षांपूर्वी<<< हजार? लाख? नक्की किती वर्षं?
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Tue, 05/15/2012 - 13:07

In reply to >>>>साधारण दहाएक (की त्याच by प्यारे१

Permalink

माझा तर्क

माझा तर्क : त्यांना असं म्हणायच असेल "साधारण दहाएक वर्षांपूर्वी मिळालेल्या जनुकिय पुराव्यांवरून लेखात उल्लेख केलेल्या सुमारास माणूस खाली चिली वगैरे पर्यंत पोचला असं सिद्ध होतंय. "
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 05/15/2012 - 14:14

In reply to माझा तर्क by किलमाऊस्की

Permalink

टायपोबद्दल क्षमस्व. काही

टायपोबद्दल क्षमस्व. काही वर्षांपूर्वी जनुकशास्त्राच्या आधाराने मानव जात आफ्रिकेतून कशी बाहेर पडली आणि ती संपूर्ण जगात कशी पसरली यावर काही निश्चित असे पुरावे शोधून काढून एक थिअरी मांडली गेली आहे. त्यानुसार मानवजातीचा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करून बिबिसीने एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. अतिशय सोपी आणि रंजक अशी डॉक्युमेंटरी एकदा तरी बघावीच अशी आहे. त्यानुसार, मानव दक्षिण अमेरिकेत सगळ्यात शेवटी पोचला. मला आत्ता आठवतंय त्यानुसार, साधारण दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी. हा प्रवास सायबेरिया ते अलास्का असा झाला असावा. त्यावेळेस हा संपूर्ण भूभाग जोडला गेलेला असावा अशीही शक्यता आहेच. त्यानंतर हा प्रवास अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरून खाली उतरत झाला. उत्तर युरोपातून, विशेषतः ग्रीनलँडमधून, अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर स्थलांतर झाले आहेच. व्हायकिंगना हा मार्ग माहित असावा आणि ते लोक आत्ताच्य कॅनडाच्या पूर्व किनार्‍यावर स्थायिक होते असे आता मानले जाते. मात्र त्यांनी किनारा सोडून फार आत जाणे उचित समजले नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 05/14/2012 - 19:41

Permalink

सुस्रेख मालिका

आफ्रिकन माणसाचं मस्तक वाचून एक क्षणभर प्रश्न आला डोक्यात. पण पुढं तुम्हीही तीच शंका लिहिलित. म्हणजे ती लिहिण्यातली चूक नाही. ओल्मेकांच्या अनेक शिल्पकृतींमध्ये कोरलेले चेहरे बसक्या नाकाचे(चीनी, मंगोलियनसशी मिळतेजुळते), जाड ओठांचे(आफ्रिकन) तर काही युरोपियनांसारखे टोकदार दाढीचे आढळून येतात. अमेरिका खंडाला कोलंबसचे पाय पहिल्यांदा लागले तर मग जगाशी संपर्कं नसलेल्या या ओल्मेकांनी कोरलेले हे चेहरे नक्की कोणाचे? डिस्कवरी वरील एका माहितीपटात पाहिल्याप्रमाण्म कोलंआबसाच्या कित्येक शतके आधी डेन्मार्क्-नॉर्वे व इतर स्कँडिनेविअन भूभागातून एक आख्खा मानवसमूह समुद्रमार्गे अमेरिकेस पोचला होता. मध्ये त्या विधानाची चाचणी म्हणून खरोखर त्या काळासारखीच निव्वळ शिडाची जहाजे कुठलीही आधुनिक सामुग्री न वापरता इकडून तिकडे नेउन दाखवण्यात आली काही अभ्यासकांकडून. अधिक माहिती :-http://en.wikipedia.org/wiki/Kon-Tiki दुसरे म्हणजे अजून एक प्रवाद आहे की चीनमधून "अमरत्वाचे वरदान शोधण्याच्या" बहाण्याने कुणीतरी मोठा राजवैद्या, का राजाचा दिवाण राजाकडून भरपूर संपत्ती घेउन "अमर भूमीच्या" शोधात निघाला. एका सफरीनंतर तो परत आलाही, पण राजाला त्याने सांगितले की "तिथे प्रवेश करण्यापूर्वी काही राक्षस व हिंस्त्र जनावरांशी लढावे लागेल. त्यासाठी अधिक संपत्ती व सैन्य दे" तसे ते राजाने दिले. ते घेउन राजवैद्य जो पसार झाला तो झालाच. नेमके त्याच वेळेशी ढोबळ मानाने चीनी लिपीशी साधर्म्य दाखवणारे काही अर्धवट शिलालेख दक्षिण अमेरिकेत सापडले. उपक्रमावरची ह्याविषयीची मारामारी http://mr.upakram.org/node/961 इथे पाहता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Mon, 05/14/2012 - 22:26

In reply to सुस्रेख मालिका by मन१

Permalink

उत्तम प्रतिसाद.

Kon-Tiki बद्द्ल माहिती होती. उपक्रम वरील चर्चेत एक मुद्दा मांड्ण्यात आला . "हजारो वर्षांपूर्वी मधे रशिया आणि अमेरिकेच्या टोकांमधील गॅप पूर्ण भरलेली असण्याची शक्यता आहे. " माझंही काहिस असचं मत आहे. लिंक साठी धन्यवाद. दुसरा किस्सा जो चीन बद्द्ल लिहिला आहे त्याचा तपशिल मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Mon, 05/14/2012 - 20:10

Permalink

हा ही भाग

हा ही भाग तपशीलवार माहिती देणारा आहे. उत्तम :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 05/14/2012 - 21:00

Permalink

फार छान!

सगळी चित्रं आणि माहिती संपूर्णपणे नवीन आहे. ते पुतळे तर इतके सुंदर दिसतायत की काय बोलावं! मात्र ते मोठे मोठे आफ्रिकन चेहरे या लोकांनी कसे तयार केले असतील? आणि निग्रो चेहरेपट्टी कुठे पाहिली असेल?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 05/14/2012 - 21:33

In reply to फार छान! by पैसा

Permalink

लेख अन मनोबांचा प्रतिसाद

लेख अन मनोबांचा प्रतिसाद दोन्ही आवडले पण पैसातै, निग्रो ही जातवाचक शिवी मानली जाते जसे महारडा वगैरे त्यामुळे त्यांना अफ्रीकन किंवा काळे म्हंटलेलं बरं.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 05/14/2012 - 21:40

In reply to लेख अन मनोबांचा प्रतिसाद by शिल्पा ब

Permalink

ओके

लक्षात ठेवीन. विकि वरील म्हणण्याप्रमाणे 'निग्रो' याचा अर्थही 'काळा' असाच आहे, पण गुलामगिरीच्या काळाची आठवण करून देणारा म्हणून अमेरिकन-आफ्रिकन्सना तो पसंत नाही. साहजिकच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Mon, 05/14/2012 - 22:33

In reply to ओके by पैसा

Permalink

स्पॅनिश मधे काळ्या रंगाला

स्पॅनिश मधे काळ्या रंगाला "नेग्रो"(negro ) म्हणतात. ( आणि कदाचित पोर्तुगिज मधेही. चु.भु.दे.घे. माझा पोर्तुगिजचा अभ्यास नाही.) उदा. zapato negro = black shoe . पण तोच शब्द आपण स्पॅनिशेतर भाषांमधे वापरला तर तो जातिवाचक ठरतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 05/14/2012 - 22:36

In reply to ओके by पैसा

Permalink

हो.

हो.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 05/14/2012 - 21:05

Permalink

छान झालाय लेख.

छान झालाय लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Mon, 05/14/2012 - 21:37

Permalink

मस्त

हा लेखसुद्धा छान आणि माहितीपूर्ण आहे. वाचतांना काहि दिवसांपूर्वी पाहिलेली बीबीसीची डॉक्युमेंट्री आठवत होती. आफ्रिकेतून निघून जगभर पसरलेल्या मानववंशाचा इतिहास फारच रोचक आहे. तुम्ही लिहिणं थांबवू नका :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 05/15/2012 - 17:24

Permalink

रोचक..

सध्या धावता-धावता वाचला आहे लेख.. वाचनखूण साठवून ठेवण्यात आली आहे. लिहीत रहा..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 05/15/2012 - 17:38

Permalink

झकास!

हा भाग देखील खुपच सुरेख. लेखमाला अतिशय आवडेश. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 05/15/2012 - 18:02

Permalink

छान

दोन्ही लेख आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Tue, 05/15/2012 - 18:15

Permalink

एक शंका !

नौवात्ल : ही आस्तेकांची भाषा. तिच्यात “त्ल” हे अक्षर फार येत. कशामुळे ? हे लोक टंग पिअर्सिंग करायचे का ? ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Tue, 05/15/2012 - 21:42

In reply to एक शंका ! by हारुन शेख

Permalink

चांगला प्रश्न विचारलात.

भाषा अभ्यासक याचं उत्तर चांगल्याप्रकारे देऊ शकतील. तरीही माझ्यापरिने मी प्रयत्न करते. नौवात्लबद्दल समजून घेण्याआधी थोड आस्तेकांबद्दल जाणून घेऊया. स्पॅनिशांनी आस्तेकांचा पडाव केल्यावर त्यांच्या खुणा पुसायचा चंग बांधला. त्यात धर्म, शहर, कलाकृती सगळचं भरडल गेलं. आस्तेकांचा धर्म नृशंस, वाईट ठरवला गेला आणि लोकांच्या मनावर वाईट त्याच गोष्टी बिंबवल्या गेल्या. स्पनिशांच्या हकालपट्टीनंतर लोकांना हळू हळू आपल्या संस्कृतीची , भाषेची ओळख पटली. पण तोपर्यंत बर्‍याच कलाकृती, ऐतिहासिक ठेव्याची वाट लागली होती. नौवात्ल भाषेत आज माहित असलेले उच्चार तसे असल्याचं मानलं जातं परंतु ते नक्की कसे होते हे नीटस सांगता नाही येणार. उदा. हेमांगी या शब्दाचा उच्चार आज मला नक्की माहित आहे कारण मराठीवर जो संस्कृतचा प्रभाव आहे त्या संस्कृतचं व्याकरण तसंच बरेचसे मूळ बारकावे फार पूर्वी लिहून ठेवले आहेत. नौवात्लचं तस नसावं. आस्तेक जी नौवात्ल बोलत तिला "क्लासिक नौवत्ल" म्हणतात. आज महित असलेल्या नौवात्ल पेक्षा ती थोडी वेगळी असवी. आता मुळ प्रश्नाकडे वळू. मूळ नौवात्लचे ४ उच्चार आहेत. Nahua, Nahuatl, Nahuat, or Nahual असे. त्यातला दुसरा उच्चार सर्वसाधारणपणे केला जातो. नौवात्लचं वैशिष्ट म्हणजे त्यात येणारे लांबलचक शब्द. भाषेच्या agglutinative गटात नौवात्ल येते. या गटाच वैशिट्य म्हणजे शब्दाच्या धातूला असे उपसर्ग लावतात की ज्यामुळे लांबलचक क्लिष्ट शब्द तयार होतो. त्यामुळे होतं काय की या भाषेतला एक शब्द आपण जर इंग्रजी किंवा मराठी अशा भाषांमध्ये भाषांतरित करायला गेलो की ते लांबलचक वाक्य बनतं. आपण जशी मराठीत शब्दयोगी अव्यये (prepositions) वापरतो. तशी -tla, -pan, -ca, -cingo, ही नौवात्ल मधली शब्दयोगी अव्ययं. याचा अर्थ “आत” किंवा “च्या जागी असं होतो. उदा. tlalpan याचा संधी असं होईल tlal + pan आणि अर्थ जमिनीवर. अवांतर : बरेच शब्द नौवात्लने स्पॅनिश आणि इंग्रजीला बहाल केले आहेत. उदा. चॉकोलेट = नौवाल्त शब्द : xocolātl, (bitter water) अशी बरीच उदाहरणं आहेत. खरं तर यावर एक लेख पाडता येईल पण तूर्तास एवढंच पुरे. :-) अति अवांतर : मका, तंबाकू, चॉकोलेट , रबर, मिरची, चुइंगम अशा बर्‍याच भेटी आस्तेकांनी जगाला दिल्या. च्युइंगम जन्माची तर प्रसिद्ध् गोष्ट आहे ती पुन्हा कधी तरी.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 05/15/2012 - 21:52

In reply to चांगला प्रश्न विचारलात. by किलमाऊस्की

Permalink

<<मका, तंबाकू, चॉकोलेट , रबर,

<<मका, तंबाकू, चॉकोलेट , रबर, मिरची, चुइंगम अशा बर्‍याच भेटी आस्तेकांनी जगाला दिल्या. च्युइंगम जन्माची तर प्रसिद्ध् गोष्ट आहे ती पुन्हा कधी तरी. पुन्हा कधीतरी नको, आता लिहितच आहात तर हे सुद्धा लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/16/2012 - 00:18

In reply to चांगला प्रश्न विचारलात. by किलमाऊस्की

Permalink

हेमांगीतै! _/\_ ... मजा येते

हेमांगीतै! _/\_ ... मजा येते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 05/16/2012 - 11:37

Permalink

सुरेख

केवळ भारतीय नि युरपिय इतिहासच ठाऊक असलेल्या आम्हा अडाण्यांना हा अज्ञात खजिना खुला होतो आहे. मझा असतो. अवांतरः अवांतर नि अतिअवांतर हे अवांतर राहू न देता त्याला लवकर 'मुख्य प्रवाहात' आणावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/16/2012 - 12:57

In reply to सुरेख by रमताराम

Permalink

अवांतराला जोरदार अनुमोदन!

अवांतराला जोरदार अनुमोदन!
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Wed, 05/16/2012 - 13:09

Permalink

सर्व प्रतिसदकांचे आभार.

अवांतर, अतिअवांतर सगळचं लेखमालिकेच्या शेवटी येणार्‍या आस्तेकांच्या लेखात सविस्तर येणार आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 05/17/2012 - 10:22

Permalink

उत्तम लेखमाला आहे.. पुढील भाग

उत्तम लेखमाला आहे.. पुढील भाग वाचण्यास उत्सूक आहे. बाकी माणूस कुठे कसा स्थलआंतरीत झाला याचे एक छान संकलन विकीपिडीयावर इथे वाचायला मिळेल
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on गुरुवार, 05/17/2012 - 13:06

Permalink

उत्तम !

उत्तम !
  • Log in or register to post comments

Submitted by किलमाऊस्की on Fri, 05/18/2012 - 00:05

Permalink

धन्यवाद !

या मालिकेतील पुढिल भाग : मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com