Skip to main content

महाभारत.. माझा दृष्टीकोन

लेखक शरद यांनी गुरुवार, 10/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत ... माझा दृष्टीकोन भारतातील लाखों लोक गेली शेकडो वर्षे महाभारत वाचत/ऐकत आले आहेत. या वाचक/श्रोत्यांचा या कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो. चला तर , या वाचकांची ( मी वाचक म्हणत असलो तरी वाचक/श्रोते यांचे गुणोत्तर १: १००० याच्यापेक्षा निराळे नसावे, ते बाजूला ठेवूं.) थोडी वर्गवारी करावयाचा प्रयत्न करू.. (१) भाविक .... लिहलेले खरेच घडले यावर निनांत श्रद्धा असलेले.(म्हणजे एकोणविसाव्या शतकांपूर्वेचे सगळेच व आता ९० टक्के) (२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य ! काही वेळा सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती गोळा करणे हा ही उद्योग असू शकतो. (३) विद्वान व कवी मनाचे.... हे विद्वान असतातच. ते अभ्यासही भरपूर करतात. पण (२) मधील व्यक्तींपेक्षा त्यांच्याकडे एक अवयव जास्त असतो. सहृदय, रसिक कवीमन. हे लोक महाभारत हे एक काव्य आहे असे समजून व्यासांना दोन ओळींमध्ये काय सांगावयाचे आहे याचा शोध घ्यावयाचा प्रयत्न करीत असतात. सहज समोर येणारी दोन उदाहरणे म्हणजे दुर्गा भागवत व इरावती कर्वे. यातील एक पोटविभाग म्हणजे नगण्य विद्वत्ता व थातूरमातूर अभ्यास याच्या जोरावर कथा-कादंबरी पाडणारे लेखक. दोन ओळींमध्ये आपल्याला वाटेल ते घुसडणारे. (४) आजची आंग्लशिक्षित पिढी....यांचा कशावरच विश्वास नसतो.(चुकलो, विकीसोडून) महाभारतातील सगळ्या कथा फालतूक, असंभव व आजच्या घडीला अजिबात उपयोगी नाहीत असा यांचा दावा. अभ्यास जवळजवळ नाही. (५) मी (व माझ्यासारखी थोडी काही) म्हणजे काय ? मी (१) मध्ये नाही कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही. कृष्णाने मेलेले मुल जिवंत केले मला पटत नाही, ,,, मी भाविक नाही.(२) मधील विद्वानांकडे बघतांना आपली टोपी पडणार नाही इतके अंतर मी नेहमीच ठेवतो. आदर आहे, लॉ कॉलेज रोडने जातांना मी मान झुकवतोही. पण ती दुसर्‍या गृहावरची माणसे ! (३) मधील लोकांबद्दल आपुलकी आहे, त्यांची पुस्तके (विकत घेऊन ) वाचत होतो. काव्यरति हा आम्हाला जोडणारा दुवा.पण भरपूर अभ्यास ही माझ्यासारख्या आळश्याला झेपणारी गोष्ट नव्हे. शिवाय या विदुषी दोन ओळींमध्ये काय शोधतील याचा पत्ता मलाच काय पण व्यासांनाही लागणार नाही ( हा माझा एक अंदाज). आता राजवाडे यांच्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास " हे पुस्तक वाचणारे ( माफ करा, मला त्यावर लिहणारे असे म्हणावयाचे आहे) बरेच महाभाग जालावर आहेत; त्यांनी कर्वे बाईंचे 'युगांत " वाचावे, great entertenment guaranteed. जास्त मजा हवी असेल तर दुर्गाबाईंचे "व्यासपर्व "हे बरोबर वाचावे. दोघीजणी द्रौपदीच्या पैलूंवर इतका प्रकाशझोत टाकतात की आपलेच डोळे दिपून जावेत. मी द्रौपदी सभेत न सा सभायत्र न सन्ति वृद्धा ! वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् !! धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यम् ! सत्यं न तद्य्च्छलनानुविद्धम् !! असे म्हणाली यावरच खुश.म्हणजे (३) मध्येही मी नाहीच. (४) बद्दल म्हणाल त्यांच्यात व माझ्यात generations gap आहे. म्हणजे मी out. ही नेति नेति पद्धत सोडून मी महाभारताकडे कसे बघतो त्या कडे वळू. गेली साठहून जास्त वषे मी महाभारत वाचत आहे. निखळ आनंदाकरिता. शालेय कालात भीष्मपर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व भुरळ घालत. नंतर सुरवातीपासून असलेल्या निरनिराळ्या कथा वाचण्यात आनंद मिळू लागला. नल-दमयंती, सावित्री यांच्या कथा महाभारतातील वाचा, तुम्हालाही त्या निराळी अनुभुती देतील. उदाहरण म्हणून शकुंतला कथा घ्या. का ? तर कालिदासाने त्यावर नाटक लिहले व आपल्याला त्याचीच माहिती असत्ते. आता कालिदास नाटक लिहतांना एक स्वप्नसृष्टी निर्माण करतो. शाप, अंगठी वगैरे वगैरे. व्यासांची शकुंतला जमीनीवर उभी आहे. तिच्या दरबारातल्या भाषणात राग, उपरोध आहे पण अगतिकताही आहेच. राजाला मुलगा हवा आहे म्हणून तो शकुंतलेला स्विकारतो. व्यासपर्व वा युगांत वाचल्यावर एक निराळीच दृष्टी लाभली. पण लवकर वाटू लागले की "गड्या, यातील काहीच भाग आपल्यासाठी आहे. त्यांची संशोधनाची वाट आपण चोखाळू शकणार नाही. या गोष्टींकडे दुसर्‍याही दृष्टीने बघता येते एवढेच शिकावयाचे." मग संध्याछाया दिसू लागल्यावर शांतीपर्वाची गोडी लागली. आपल्या तुटपुंज्या वाचनावरून उपनिषदे व शांतीपर्वातील साम्यांकडे लक्ष गेले. पण हे थोडे दिवसच. आपला पिंड कथेकडेच. मग जाणवावयाला लागले की जर मला महाभारतापासून आनंद मिळवावयाचा असेल तर मला परत शालेय जीवनांत प्रवेश करावयास पाहिजे. म्हणजे काय ? म्हणजे मला आज कळते की सूर्यापासून कुंतीला मुलगा होणे शक्य नाही. तो दुर्वासापासून झाला असणे शक्य आहे. पण असे कळल्यावर मी महाभारत वाचण्यात गंमत काय उरली ? अशा शे-दोनशे घटना जर मी दरवेळी " हे अशक्य ", " हे अशक्य " म्हणत वाचणार असेन तर न वाचणेच उत्तम. जर "अरेबिअन नाईट्स" वाचावयाचे असेल तर मी आठव्या शतकातल्या अरबस्थानात गेलेच पाहिजे तसेच महाभारत वाचावयाचे असेल, त्यातून आनंद मिळवावयाचा असेल तर, मला पाच हजार वर्षांपूर्वीच्या भारतातच जायला पाहिजे. त्या वेळच्या वातावरणात, सामाजिक-कौटुंबिक-राजकीय समस्यांत समरस व्हावयास पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की मी भाविक झाले पाहिजे, मी १२ वर्षांचा मुलगा झालो पाहिजे. पण युद्धपर्व वाचतांना अर्जुनातल्या भात्यातले बाण संपत नव्हते यावर माझा विश्वास पाहिजे. नसेल तर व्यास माझ्यासाठी नाही, कालिदास माझ्यासाठी नाही, गांधीही नाहीत व गाडगेबुवाही नाहीत ! त्यांचे विश्व व माझे विश्व निराळे. माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !! शरद

वाचने 7055
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आपले लेख नेहमीच आवडतात व आवर्जून वाचले जातात. आजची आंग्लशिक्षित पिढी....यांचा कशावरच विश्वास नसतो.(चुकलो, विकीसोडून) महाभारतातील सगळ्या कथा फालतूक, असंभव व आजच्या घडीला अजिबात उपयोगी नाहीत असा यांचा दावा. अभ्यास जवळजवळ नाही. खरे आहे. त्यात काही अपवाद वगळता (मी पण आंग्लशिक्षित आहे पण कॉन्व्हेंट मध्ये शिकलेलो नाही ....) महाभारत व इलीयड मधले साम्य ... त्यांचा काळ.. पुर्वी मी दहा भागात महाभारत वाचलेले (लेखक मुळीच आठवत नाहीत - अभ्यंकर का कोणी होते) आठवत आहे तसेच शेवडे गुरुजींचे महाभारतातील १६ पात्रांवरची प्रवचन फार उद्भोदक असायची. त्यातल्या गीते ने तर अजूनच आजरामर झाले आहे. महाभारत हा जय नामक इतिहास आहे अशी माहिती आहे. आता प्रत्येक वाक्याला कोणी पुरावा मागत फिरणार असेल व तो नसेल तर हे सगळे थोतांड आहे व म्हणून वाचण्या लायक नाही तर मग काय बोलायचे. राम जन्म झाल्याचा पुरावा नाही म्हणून राम जन्म भूमी ही आयोध्या कशावरुन हे विचारणारे लोक अनेक. तसेच महाभारताचे देखील. कोठचीही गोष्ट खुप पुर्वीची झाली की इतिहास बनतो व त्याहून जुनी झाली की मीथ बनते. मीथ बनली की त्यात काळाच्या ओघात ब-याच गोष्टींचा भरणा होतो व एके दिवशी कोणी नास्तिक, कोणी क्रिटीक हे सगळे थोतांड आहे असे म्हणत फिरतो.

महाभारतातील पात्रांवर आलेले गेले काही तुमचे लेख मी अजुन वाचले नाहीत पण हा लेख आवडला. आमच्याकरता तुम्ही गटक्रमांक २ किमान ३ मधे आहात. तुम्हाला स्वताला ते मान्य नाही म्हणजे, जर महाभारतकार व्यास हे ओरीजीनल महान म्हणले तर पुढे आलेले सगळे गटक्रमांक १ किंवा ४ , ५. थोडक्यात नंतर विद्वान कोणीच नाही. पण असे तर होउ शकत नाही. कोणतरी लिडर हवेच ना सगळेच कसे अनुयायी? पूर्वी एस एम एस ने नसेल पण आवाजी/लिखाणी मतदानाने समाजात अन्य काही लोकांची निवड तज्ज्ञ म्हणून करतातच . थोडक्यात तुमच्यासारखे लोक कालौघात क्रमांक २ व ३ मधे मोडले जातात. यापुढचे लोक कदाचित लाईक बटण क्लिक्स, ट्विटर फॉलोअरशीपने इ. मार्गाने क्रमांक २ व ३ मधे स्थानापन्न होतील.

महाभारत हा इतिहास आहे कि काल्पनिक काव्य ? इतिहास म्हणावा तर बर्याच गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही ... कालखंड..सुपर पॉवर, देव , पाताळ लोक , स्वर्ग लोक ... पांडवांचे एकूण आयुष्य.. कृष्ण ..( विमाने ?? ) आणि संपूर्ण काल्पनिक म्हणावे तर .. हिंदू धर्मश्रद्धा तसे मानत नाही .. आपण कृष्णाला देव मानतो..गीता आपला पूजनीय ग्रंथ आहे ( धर्म ग्रंथ आहे कि नाही ?? ) आणि भारतामधील भौगोलिक वर्णने बर्यापैकि जुळतात.. अगदी द्वारका सुद्धा सापडते.. त्यामुळे महाभारत हे फार मोठे गुढ आहे .. खरे काय आणि खोटे काय ...काय कळत नाय !!

In reply to by कपिलमुनी

माझ्या प्रतिसादात मिथ व इतिहासा बद्दल हेच दिले आहे..कोठचीही गोष्ट खुप पुर्वीची झाली की इतिहास बनतो व त्याहून जुनी झाली की मीथ बनते. मीथ बनली की त्यात काळाच्या ओघात ब-याच गोष्टींचा भरणा होतो व एके दिवशी कोणी नास्तिक, कोणी क्रिटीक हे सगळे थोतांड आहे असे म्हणत फिरतो. ..............There is a dual between mythology and history. In India there are many historical facts which have become myths over a period of thousands of centuries as our ‘way of life’ is very old. There were no records of history kept in those times. History was never officially documented nor was there any necessity felt at that time. The history though which was never documented some how was kept alive from many folklores, many legends that got evolved over a period of time. The lines between the history and mythology have blurred. The epics Ramayana and Mahabharata were actually an earlier attempt in documenting the history in a different form. .............. पुर्ण लेख येथे http://www.rashtravrat.blogspot.in/2010/09/making-peace-with-history.ht…

In reply to by कपिलमुनी

महाभारत हा इतिहास आहे कि काल्पनिक काव्य ? इतिहास म्हणावा तर बर्‍याच गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही आणि संपूर्ण काल्पनिक म्हणावे तर .. हिंदू धर्मश्रद्धा तसे मानत नाही .. आपण कृष्णाला देव मानतो..गीता आपला पूजनीय ग्रंथ आहे = कपिलमुनी उवाच : एकदम सही उवाच!

>>माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !! - हे खासच ! आता माझ्यामागे माझ्या मुलांचे ७० रुपये वाचतील याचा मलाही आनंद झाला. - मी तरी बालबुद्धीनेच महाभारत आस्वादतो.

बालबुद्धीने कोणतीही गोष्ट वाचली तर ती जशी आहे; मग ती भले कितीही अवास्तव वाटली तरी मान्य होते. मग अर्जुनाच्या भात्यातून सेकंदाला हजार बाण सुटले काय नी एका आयुष्यात शंभर मुले झाली काय ('विकी डोनर' असेल तर शक्य आहे म्हणा ;) )... आणि समरसतेने वाचले तरीही ते मान्यच होणार... नक्की काहीच कळत नाही हेच खरे. (की खरे काय आहे, हे न कळण्यातच खरी मजा आहे?) -सूर्यपुत्र.

स्साला ९० च्या दशकात झालेल्या दंगलींमध्ये नक्की काय काय झाले हे अजूनही कुणी नक्की सांगू शकत नाही. इतक्या जुन्या गोष्टींच्या खर्‍यखोट्याची शहानिशा कशी काय करणार आपण? व्यासांनी ( किंवा अजून कुणीही) लिहिलेले हे काव्य्/इतिहास्/साहित्य जे काही आहे ते अतिशय प्रभावी आहे इतकेच म्हणता येइल. मानवी स्वभावाचा इतका सूक्ष्म अभ्यास फार कमी लोकांचा असतो. त्यामुळे कधीही कुठेही कुठल्याही माणसात महाभारतील अनेक पात्रांचा भास होत रहातो. आणि त्यामुळेच ही कलाकृती लोकांना भुलवत रहाते.

In reply to by कवितानागेश

आयला.. तुमच्या या असल्या विचारांमुळेच आपण तुम्हाला विदुषी म्हणतो... त्याबद्दल इतर पुराव्यात आपल्याला रस नाहि :) अर्धवटराव

तुमचा दृष्टीकोन आवडला. महाभारत हा इतिहास आहे की काल्पनिक कथा आहे याबद्दलचा वाद ज्याना करायचा आहे त्याना करू देत. मला तरी त्यातल्या जिवंत माणसांचं जिवंत व्यक्तिचित्रण फार आवडतं. आणि समजा ती काल्पनिक कथा असली तरी काय फरक पडतो? आपल्याला कथा आवडत नाहीत का? तसं असेल तर कोणतीच कथा आवडायला नको!!

"मला तरी त्यातल्या जिवंत माणसांचं जिवंत व्यक्तिचित्रण फार आवडत"...मलाही त्यावर महभारतातील जिवंत माणसांच्या मनाचा ठाव घेणे जास्त आवडते....मग बाकिच्या गोष्टीनी काही फरक पडत नाही.

आज पर्यत संपुर्ण महाभारत असं कधी वाचलंच नाही, जे अर्धवट वाचलं किंवा ऐकलं त्यावरच गफ्फा मारत असतो, ब-याच वेळा समोरचा गप ऐकुन घेतो, अन मग वर्ष दोन वर्षानी त्याच पुन्हा कुठुन तरी ऐकायला मि़ळतात, मुळ महाभारत सुद्धा असंच पाणी घालुन वाढवत वाढवत आज आहे त्या स्थितीला आणलेल असावं.

ज्या ज्या व्यक्तीने लहानपणी महाभारत वाचले किंवा कथा स्वरूपात ऐकले, त्या सर्वांना वाचनाची आवड निर्माण झाली. (माझ्या घरातील व वाचक मित्रांच्या अनुभुवावरून)

In reply to by ऐक शुन्य शुन्य

रामायण/महाभारत यांनी गोष्टींची/वाचनाची आवड निर्माण केली खरी.

लेख-मनोगत आवडले... पुराणांना आणि रामायण-महाभारतातील चमत्कृती असलेल्या गोष्टींच्या बाबतीत मी एकदा sugar coated pills असा शब्दप्रयोग ऐकला होता. तो मला बर्‍याचदा पटतो. म्हणूनच "अष्टादश पुराणेशु व्यासस्य वचनद्वयम। परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्॥" असे कोणीतरी कधीच्या काळी म्हणले असावे...त्यामुळे त्याची इतर चिकीत्सा न करता वाचावे असे वाटते. "महाभारत एक सुडाचा प्रवास" लिहीणारे दाजीशास्त्री पणशीकर त्यात सुरवातीसच म्हणतात की जे काही चमत्कार-नमस्कार आहेत ते तसेच्या तसे खरे समजून व्यक्तींरेखांच्या - त्या रूपातून दिसणार्‍या स्वभावांचे विश्लेषण केले आहे. पण पुस्तक वाचताना लक्षात येते की त्यात कुठलीच गोष्ट (चमत्कार) वास्तव असेल असे म्हणत justify केलेला नाही...तसेच कुठेतरी असावे असे वाटते.

महाभारत वा रामायणात लेहीलेले चमत्कार हे जादुचे प्रयोग दाखवुन विस्मय रस निर्मीतीसाठी नाहित... तर जीवनाचा मुलाधार व जीवनक्रम हा कुठलीही अमानवी शक्तीच्या आवाक्यातला नसुन माणसाचे मन-बुद्धी-विवेक हेच जीवनाचे स्तंभ होत हेच ठासुन सांगीतले आहे. म्हणुनच ब्रह्मशिरी अस्त्राचा प्रयोग आपल्याला अपील करत नाहि तर अश्वत्थाम्याचे दु:खभोग हादरवुन सोडतात , द्रौपदीचे न संपणारे वस्त्र अचंभीत करत नाहि तर संपूर्ण द्युतक्रीडा भवनाचा (पांडव धरुन) तिटकारा येतो. हनुमंताचे पर्वत उचलणे लक्ष्य वेधत नाहि तर त्याची पराकोटीची स्वामीभक्ती आणि रामाचा बंधु शोक मनात घर करते. अर्धवटराव

(२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य ! काही वेळा सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती गोळा करणे हा ही उद्योग असू शकतो. +१. त्याच्याही पुढे जाउन कधी कधी स्वतःमधला द्वेषही हे इतिहासात जमा करतात. कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही. जर आपली गणित संख्या इतक्या आकड्या पर्यंत पोहोचु शकते तर असेलही बापडे! पण एक गोष्ट आहे, की कोणत्याही गोष्टीच महात्म्य ठसवण्या साठी थोडा फार अतिशयोक्तीचा प्रयोग केला जातो. अन महाभारतात तर तो ठायी ठायी दिसतो. कृष्णाने मेलेले मुल जिवंत केले मला पटत नाही, परवाच एक जन्मतः मृत म्हणुन डिक्लेअर केलेल बाळ, अगदी छोट्याश्या कॉफिन मध्ये घालुन जवळ जवळ १५ तासा नंतर चर्च मध्ये नेल होत. त्याच्या आईला एकदा उघडुन बाळ बघावस वाटल म्हणुन कॉफिनच लॉक तोडुन उघडल तर आत बाळ जिवंत होत.वंडर बेबी म्हणुन ही न्युज टी. व्ही . वर होती. अर्थात ज्याच्या त्याच्या जन्माची दोरी! कावळा बसायला अन फांदी तुटायला म्हणतात तस असाव काहीस... उदाहरण म्हणून शकुंतला कथा घ्या. का ? तर कालिदासाने त्यावर नाटक लिहले व आपल्याला त्याचीच माहिती असत्ते. आता कालिदास नाटक लिहतांना एक स्वप्नसृष्टी निर्माण करतो. शाप, अंगठी वगैरे वगैरे. व्यासांची शकुंतला जमीनीवर उभी आहे. तिच्या दरबारातल्या भाषणात राग, उपरोध आहे पण अगतिकताही आहेच. राजाला मुलगा हवा आहे म्हणून तो शकुंतलेला स्विकारतो अगदी ! अगदी! हाच दृष्टीकोण मी कुंतीच्या बाबतीत इच्छीते. आता परत विषय निघालाच आहे तर थोडस स्प्ष्टीकरण देण्याचा माझा प्रयत्न. स्वतः व्यास हे मस्तगंधेच्या पोटी आलेले अस लिखित आहे. ते वयाच्या १२ वर्षा पर्यंत आपल्या आई कडे रहात होते. जेंव्हा त्यांना आपल्या जन्मा बद्दल कळल तेंव्हा ते आईच घर सोडुन ज्ञानार्जाना साठी अन तपःसाधने साठी निघुन गेले. आता या गोष्टीत कुठेही त्यांच्या जन्माबद्दल, एखाद मिथक आहे का? नाही. कारण मस्त्यगंधेला तश्या असत्याचा आधार घ्यावा लागणारी पार्श्वभुमी ( बडेजाव, मोठ घराण, कौमार्य) नाही. ती आहे तस वास्तव जगते आहे. पण कुंती ही एक राजकन्या. तिच्या कौमार्याशी सार्‍या घराण्याची, पुर्वजांची , सताधार्‍यांची अन तसच एका अतिथी म्हणुन आलेल्या ऋषीची प्रतिष्ठा निगडीत होती. माझ्यासाठी उरतात फक्त इन्कमटॅक्स रिटर्न्स, विजेची बिले व वैकुंठच्या विद्युतदाहिनीत आता सत्तर रुपये द्यावे लागणार नाहीत याचा आनंद !! नका हो इतके निरस शब्दात आमच वास्तव मांडु . लेखाचा बाज अतिशय उत्तम . पण एक गोष्ट मात्र आहे, या सार्‍या इतिहासाच्या उहापोहात नेहमीच "मी' पण बाजुला ठेवाव. एका बालकाच्या दृष्टीकोणातुन अमेझिंग असणार्‍या गोष्टी, एका तरुणाला त्यातुन मिळणारा रोमँटीसिझम, एका स्त्रीला त्यात जाणवणारा एखादा बोचरा कोपरा( का नाही? महाभारताच सार खापर द्रौपदीच्या अन रामायणाच सितेच्या माथी फोडतात माणस बोलता बोलता) अन एखाद्या वयोवृद्धाला जाणवणारा हताऽऽश पणा(भिष्माची व्यक्तीरेखा), त्या त्या व्यक्तीच स्व्-अनुभवाच वलय घेउन घडत असत. अन हेच महाभारताच यश आहे. बाकि माझ्या 'विदुराच' काय झाल?

कारण १८ औक्षहिणी भरतील इतकी सैनिक, घोडे, हत्ती इ. भारतात असतील असे मला वाटत नाही. आकडा खुपच कमी सांगितलात. युधिष्ठिराच्या म्हणण्याप्रमाणे १६६ कोटी २० हजार यौद्धे लढले आणि त्यापैकी २४०,१६५ जीवानिशी वाचले . अर्थात जेव्हा अक्षौहिणीचे वर्णन वाचले जाते आणि त्याची बेरीज केली जाते तेव्हा ती ४५ लाखांच्या आसपासच पोचते. त्यामुळे हा एवढा अतिप्रचंड आकडा युधिष्ठिराने कुठुन शोधून काढला हे तो कथाकारच जाणो. बाकी मला तुमची लेखमाला आवडली. मी स्वतः देखील पाचव्या श्रेणीतला आहे. सहजराव म्हणाले तसे तुम्ही मात्र दुसर्‍या श्रेणीत मोडता. तुमचे वाचन आणि महाभारताचे ज्ञान नक्क्कीच एका चांगल्या अभ्यासकाच्या तोडीचे आहे. महाभारत खरेच घडुन गेले यावर माझा विश्वास आहे. त्यातल्या तपशीलात थोडाफार गोंधळ असु शकतो पण त्याचे अस्तित्वच नाकारण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही.

महाभारत या जय नावाच्या इतिहासात काहीतरी तथ्य असणार असा विश्वास आहे. आता इतक्या काही हजार वर्षांनंतर त्यातली भेसळ अन खरेपणा कसा शोधणार? असो. कोणी काही म्हणो मला रामायणापेक्षा महाभारत वाचायला आवडते.

In reply to by शिल्पा ब

>>>कोणी काही म्हणो मला रामायणापेक्षा महाभारत वाचायला आवडते. जल्ला रामायनात हाय काय? येकाची बाईल दुसर्‍यान पलवून नेलीन, दोगा भांडली, पल वून नेल्यालाला मारलान बाईल परत आनली.... संपलो रामायन! म्हाभारतात लय म्हन्जी कय जन्क्शान गोष्टी हायत, कॅरॅक्टर हायत, पिरेम बी हाय भांडान बी हाय, खरं बी हाय नी खोटं बी हाय, देवाचा सगल्यात मोट्टा अवतार हाय आन सगल्यात वाईट्ट मानूस्स बी हाय. येकदम मल्टीस्टारकास्ट आनि ईष्टमनकलर हाय म्हाभारत ! कृपया सगळ्यांनी हलके घ्यावे!

In reply to by प्यारे१

रामायण - आयडियलिस्टीक म्हणूनच रामाला रोल मॉडेल म्हटले जाते - राम राज्य महाभारत - प्रॅक्टिकल जगताना होणारी द्विधा मनस्थिती. - कलीयुगाचा पाया.